सदानंद पाटील हे पंढरपुरातील एक प्रथितयश डॉक्टर आहेत. एक काऊच पोटॅटो ते सराईत मॅरेथॉनपटू असा त्यांचा प्रवास कसा झाला ते त्यांच्याच शब्दांत ऐकू या. या निमित्ताने त्यांनी मॅरेथॉन धावण्याचे तंत्र व मंत्र याबाबत त्यांचे विचार मांडले आहेत. हे विचार अर्थातच त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांवर आधारित आहेत. त्यांचा स्वीकार करण्यापूर्वी आपापल्या व्यक्तिगत डॉक्टरांशी बोलून मगच कसलाही निर्णय घेणे श्रेयस्कर ठरेल. संपादक |

मी शाळा कॉलेजमध्ये हुशार पण गुटगुटीत – जाड विद्यार्थी होतो. मी कधीही मैदानावर खेळायला जात नसे. शारीरिक शिक्षणाच्या तासाला मला चक्क भीती वाटायची. २००३ ते २००७पर्यंत मी थोडेफार बॅडमिंटन खेळून पाहिले पण ते काही फारसे जमले नाही. हळूहळू माझे वजन ६५ किलोपासून ७७ किलोपर्यंत पोहोचले. वजन कमी करण्यासाठी थोडेफार चालाय-फिरायला सुरुवात केली. २०१६मध्ये पाठदुखी आणि चक्कर सुरू झाल्याने योगाभ्यास सुरू केला, तसेच व्यायामशाळेतही जायला सुरुवात केली.
२०१७ सालच्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही ८-१० मित्रांनी मिळून पंढरपुरातील कॉलेज ग्राउंडवर सकाळी पळायला जायला सुरुवात केली. सुरुवातीला १०० मीटर पळणे, ३०० मीटर चालणे असे करत करत हळूहळू ४०० मीटर पळणे आणि ४०० मीटर चालणे असा पल्ला गाठला. जानेवारी २०१८ मध्ये सोलापूर मॅरेथॉनला दहा किलोमीटरसाठी नोंदणी केली. चालत, पळत मी त्या वेळी दहा किलोमीटर एक तास १३ मिनिटांत पूर्ण केले. या वेळी मॅरेथॉनचे एकंदरीत वातावरण, उत्साह, लोकांचा प्रतिसाद पाहून मी अत्यंत प्रभावित झालो आणि २०१८ च्या फेब्रुवारीमध्ये सांगलीत पुन्हा एकदा दहा किलोमीटर पूर्ण केले. उर्वरित वर्षात सराव करून २०१९मध्ये सोलापूर आणि सांगलीमध्ये २१ किलोमीटर पूर्ण केले. २०२०मध्ये पंढरपूर मॅरेथॉनमध्ये दहा किलोमीटरचे अंतर २७ मिनिटांत पूर्ण करून मी माझ्या वयोगटामध्ये तिसरे बक्षीस मिळवले. माझ्या आयुष्यातले हे खेळाचे पहिले बक्षीस.
नंतर कोरोनामुळे सर्व ठप्प झाले. तीन वर्षे अशीच निघून गेली. या काळात मी धावण्याचा सराव मात्र चालू ठेवला होता. वय वाढल्याने आणि कोविड होऊन गेल्यामुळे पूर्वी इतका वेग राहिला नाही; तरी निराश न होता मी सराव करत राहिलो. येथील आयसीआयसीआय बँकेत काम करणारे रणजीत मिश्रा मला भेटले. त्यांनी आमच्याकडून ४२ किलोमीटरचा सराव करून घेतला आणि बघता बघता जुलै २२ मध्ये मी पुणे येथे पूर्ण बेचाळीस किलोमीटर अंतराची मॅरेथॉन पाच तास तीस मिनिटांत पूर्ण केली. त्यानंतर मी एकंदरीत सलग नऊ वेळा ४२किलोमीटर पळलो आहे. एकदा पन्नास किलोमीटरदेखील झाले आहेत. हळूहळू मला मॅरेथॉन धावण्याचे वेडच लागले. या वेळात सातारा बारामती पुणे मुंबई बार्शी सांगली अशा वेगवेगळ्या ठिकाणी अर्ध आणि पूर्ण मॅरेथॉन मी पूर्ण केली आहे. हा सर्व प्रवास अतिशय आनंददायी उत्साहदायक आणि मला कणखर बनवणारा ठरला.
कोणीही कधीही धावायला सुरुवात करू शकतो. यासाठी पळण्यासाठी बनवलेले चांगले बूट आणि स्मार्टफोन या दोन गोष्टी असाव्या लागतात. सुरुवात कमी अंतराने करत हळूहळू अंतर वाढवा. एका आठवड्यात दहा टक्क्यांपेक्षा जास्त अंतर वाढवू नका आणि पाच-दहा एकवीस बेचाळीस असे हळूहळू टप्पे पूर्ण करा. अर्थात हे सर्व तुमची तब्येत सांभाळत आणि गरजेप्रमाणे तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेत करा.
धावण्याबद्दल काही गैरसमज आहेत.
१ धावण्याने गुडघे खराब होतात. उलटपक्षी शास्त्रशुद्ध पद्धतीने धावल्याने गुडघ्याभोवतीचे स्नायू बळकट होतात आणि हाडांची झीजही कमी होते.
२ अगदी रोजच्या रोज धावावे लागत नाही. आठवड्यातले तीन दिवस धावा, तीन दिवस व्यायामशाळेत व्यायाम करा आणि एक दिवस चक्क सुट्टी घ्या.
३ धावल्याने वजन कमी होते का? वेगात धावल्याने वजन कमी होत नाही तर हळूहळू धावल्याने( एरोबिक रन/ जॉगिंग) केल्याने तुमच्या शरीरातील फॅट वापरली जाते आणि वजन कमी होते.
४ धावल्यामुळे होणाऱ्या दुखापती : बहुतेक वेळी या दुखापती अतिवेगात धावल्याने, चुकीच्या शैलीमुळे,सदोष बुटांमुळे होतात. हळूहळू धावा आणि जास्त वेळ धावा.
५ मॅरेथॉनसदृश अंतरे पळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय असेल तर ती चिकाटी आहे. एका ४२ किलोमीटरच्या पूर्ण मॅरेथॉनसाठी १६ ते १८ आठवडे सराव करावा लागतो. आठवड्यात सहा दिवसांत एक दिवस दहा किलोमीटर एक दिवस सात किलोमीटर असे तर रविवारी १७ किलोमीटर असे पळून नंतर हळूहळू अंतर वाढवावे. रविवारी १७ किलोमीटर २१ किलोमीटर २५ किलोमीटर ३० किलोमीटर ३५ किलोमीटर असे करून नंतर वीस किलोमीटर १४ किलोमीटर असे करत त्या पुढच्या रविवारी तुम्ही ४२ किलोमीटर धावायला सज्ज होता.
६ आहार : मॅरेथॉन पळण्यासाठी फार काही वेगळे करायला लागत नाही; फक्त २५ ग्रॅम प्रोटीन शेक धावल्यानंतर तीन दिवस घ्या. चांगले जेवण घ्या. जंक फूड टाळा, उपवास करू नका, उपाशी पोटी पळू नका. सकाळी एक केळे खाऊन मगच धावा.
७ मॅरेथॉनच्या वेळी बारा किलोमीटर अंतर धावल्यावर तुमच्या शरीरातले पाणी कमी होते. २० कि. मी. च्या टप्प्याला ऊर्जा कमी होते. याची भरपाई करण्यासाठी प्रत्येक दोन किलोमीटरला जलसंजीवनी, तर सात किलोमीटरला खजूर खावा. अधूनमधून दोन-तीन वेळा थोडे मीठ खाल्ल्यास पायात पेटके येत नाहीत.
८ झोप आणि मॅरेथॉन : पुरेशा झोपेमुळे तुमचे शरीर मॅरेथॉननंतर पूर्ववत होते. त्यामुळे सहा ते सात तासांची सलग व शांत झोप मिळवायचा प्रयत्न करा. शक्य असल्यास दुपारी २० ते ३० मिनिटे वामकुक्षी घ्या.
९ पळताना वापरायचे शूज : मी Asics, Nike, Skechersया या कंपन्यांचे बूट वापरले आहेत. प्रतिवर्षी मॅरेथॉनपूर्वी दोन महिने बूट बदला. खराब झालेले किंवा जुने झालेले शूज मैदानावर किंवा छोट्या अंतरासाठी वापरा. जुने शूज वापरल्याने दुखापती होण्याची शक्यता वाढते हे लक्षात ठेवा.
१० पळताना वापरायची उपकरणे : पहिली चार वर्षे मी स्मार्ट वॉच वापरत नव्हतो; पण २०२२ सालानंतर मी गार्विन वापरायला सुरुवात केली. यात हृदयाची गती, एका मिनिटात पडणारी पावले, पळण्याचा वेग या सर्व गोष्टी समजतात. तुमचे पळण्याचे सांख्यिकी विश्लेषण तुम्हांला समजू शकते. या सर्व गोष्टी नोंदणारी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत.
हे विश्लेषण तुम्हांला नियोजनासाठी उपयोगी पडू शकते.
११ मॅरेथॉन हे पळणे आणि चालणे यांचे मिश्रण असते. दर दोन किलोमीटर नंतर १२० मीटर चाला.
मी का पळतो?
१ सगळ्यात महत्त्वाचे कारण आपली तंदुरुस्ती वाढते.
२ जीवनातील आव्हाने, खडतर प्रसंग यांना तोंड देण्याची मानसिक तयारी होते.
३ अनेक चांगले मित्र मिळतात.
४ या निमित्ताने विविध ठिकाणी पर्यटन होऊ शकते.
५ एकंदरीतच जीवनातील ताण-तणाव यामुळे कमी होतात.
If you are happy, you run.
if you are sad, run more; You will be happy !
मॅरेथॉनची पूर्वतयारी म्हणून जे प्रशिक्षण दिले जाते त्याचे काही प्रकार आहेत.
क्रॉस ट्रेनिंग : यामध्ये दररोज पळू नका. तीन दिवस व्यायाम शाळेत व्यायाम करा. अधूनमधून योगाभ्यास करा, सायकल चालवा, झुंबा करा. या सर्व गोष्टींनी तुमचे आयुष्य परिपूर्ण होईल, तुमची ताकद गतिमानता आणि दम वाढवण्यासाठी त्या गोष्टी उपयोगाच्या ठरतील.
एका आठवड्यासाठी आदर्श वेळापत्रक :
१ इंटरवल रन : ४०० मीटर ८०० मीटर प्रत्येक तीन मिनिटांच्या विश्रांतीनंतर पळणे.
२ हिल रन : एखाद्या टेकडीवर वरती आणि खाली पळणे, मध्ये तीन मिनिटांची विश्रांती.
३ लॉंग इझी रन : शक्यतो रविवारी करा. जवळ जलसंजीवनी आणि खजूर ठेवा. स्मार्ट वॉचचा वापर करून हृदयाची गती १३० ते १४० च्या आसपास ठेवूनच पळा. हृदयगती यापेक्षा वाढली, की चाला. यामुळे तुमची चरबी जळायला मदत होते.
काळजी घेऊन दुखापत झाली तरी त्याचा सामना करा. मी लोणावळा मॅरेथॉनमध्ये ३५ किलोमीटरवर असताना अडकून पडलो, गुडघ्याला टाके पडले ते लवकर जुळून आले नाहीत; त्यामुळे दोन ते तीन महिने त्याची काळजी घ्यावी लागली. परंतु जखम बरी झाल्यावर मी पुन्हा पळायला लागलो.
माझे उद्दिष्ट : आता मी माझी मॅरेथॉन धावण्याची वेळ कमी करण्यासाठी पळत नाही. पूर्ण मॅरेथॉन पाच तासांत पूर्ण करणे एवढेच सध्या माझे ध्येय आहे. त्यासाठी मला माझ्या सध्याच्या मॅरेथॉन पूर्ण करण्याच्या वेळेतून फक्त दहा मिनिटे कमी करावी लागणार आहेत. त्यासाठी प्रयत्न चालू आहे.
तुम्हीही एकदा तरी मॅरेथॉन धावायचा प्रयत्न करा एवढे सांगून थांबतो.

सदानंद पाटील, नुकतीच झालेली मुंबई मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर.

Very good and inspiring write up Dr Sadanand sir.