अरविंद पाटकर

विषय आणि लेखक निवडणारा, शोधणारा कार्यकर्ता

    माझ्या आयुष्यात काही विलक्षण योगायोग आहेत. महाराष्ट्रातील साहित्यिक जीवनात राजहंस प्रकाशन आणि मनोविकास प्रकाशन या सुवर्णमुद्रा आहेत. अनुक्रमे दिलीप माजगावकर आणि अरविंद पाटकर या दोन धडपडणाऱ्या तरुणांनी अथक प्रयत्नांतून त्या उभ्या केल्या आहेत. माझ्या आयुष्यातील विलक्षण योगायोग हा, की या दोघांच्याही पहिल्या धडपडीच्या वाटचालीत जवळचा मित्र म्हणून मी त्यांच्याबरोबर होतो – त्या धडपडीच्या कालखंडाला ते दोघेही ‘धडपणे पडत पुन्हा उभे राहण्याचा कालखंड’ म्हणत असत! 

माझी आणि दिलीपची ओळख होण्याचं तसं काही कारण नव्हतं. माझा किर्लोस्करमधील एक लेख वाचून त्याने मला पहिलं पत्र पाठवलं. ‘माणूस’मध्ये लिहिण्याचा मला आग्रह केला. मी लिहीत गेलो. १९८५ ते १९९० या पाच वर्षांत राजहंस प्रकाशन यांनी माझी जवळजवळ दहा पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांतील विज्ञानेश्वरी, प्रकाशवाटा, माते नर्मदे, बखर राजधानीची, ढगामधून गडगडत ही महत्त्वाची. म्हणजे त्या कालखंडात- लेखक म्हणून प्रस्थापित होण्याचा एक योग माझ्या आयुष्यात असणार!

त्यानंतर विसाव्या शतकातलं शेवटचं दशक उजाडलं. त्याने भारतालाच नव्हे तर सबंध जगाला प्रचंड हादरे दिले. अनेक जुन्या रचना नकळत सहजपणे मोडीत निघाल्या. विश्वास बसणार नाही असं तंत्रज्ञान पुढे आलं. जे होत होते, ते अनाकलनीय होते. ते समजावून घेऊन त्याच्याशी तडजोड करताना या दशकात सर्वांचीच दमछाक होत होती. जगभरच्या झोपडपट्ट्यांचा मानसिक आधार असलेला रशिया पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला होता. त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून भारताने समाजवाद नाकारून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली होती. एक प्रचंड मानसिक आघात करत बाबरी मशीद उद्‌धवस्त झाली होती. नानाजी देशमुख त्या वेळी म्हणाले त्याप्रमाणे, ‘या देशाचे धार्मिक ध्रुवीकरण आता पूर्ण झाले आहे. पाकिस्तान, बांगलादेश आता कधीतरी भारतात सामील होतील का? आमच्या मनातील अखंड भारत आता कायमचा संपला आहे!’ संवेदनशील माणसांची झोप उडवत ‘हवाला कांड’ पुढे आले होते. त्यामुळे मधू लिमिये अस्वस्थ नाही तर उद्‌ध्वस्त झाले होते. त्यांनी याबाबत जॉर्ज फर्नांडिस यांच्यापासून रज्जूभय्या यांच्यापर्यंत अनेकांना पत्रं पाठविली होती. उत्तरं राहू देत, साधी पोचसुद्धा आली नव्हती. त्या वेळी मी, विजय तेंडुलकर आणि प्रशांत दीक्षित मधू लिमिये यांना काही वेगळ्या कारणासाठी भेटावयास गेलो होतो. लिमये फक्त हवाला कांडात गुंतलेले. मला म्हणाले, “उद्या ये. नानाजींना एक पत्र देतो. ते घेऊन जा आणि त्यांच्याकडून उत्तर घेऊनच परत ये.” मनातून उद्‌ध्वस्त झालेले लिमये त्याच दिवशी रात्री हॉस्पिटलमध्ये गेले आणि दोन- तीन दिवसांत त्यांनी जगाचा निरोप घेतला.

तंत्रविज्ञानाच्या क्षेत्रात असेच काही धक्के बसत होते. फोन ही दुर्मीळ गोष्ट होती आणि आता काही काळाने प्रत्येकाच्या हातात भ्रमणध्वनी येणार असे दिसत होते. तो त्या वेळी खूप महाग होता. त्या वेळी एक मिनीट त्याच्यावर बोलण्यासाठी किंवा येणारे बोलणे ऐकण्यासाठी दर मिनिटाला १६ रुपये मोजावे लागत होते. त्या वेळी धीरूभाई अंबानी सांगत होते, ‘थोडे थांबा, हा पोस्टकार्डपेक्षाही स्वस्त होणार आहे.’ संगणक पुढे आला होता. तो आमच्या नोकऱ्या खाणार म्हणून अगदी आमच्या दिल्लीतील संशोधन संस्थेतसुद्धा सबंध प्रशासकीय विभाग त्याला हात लावायला तयार नव्हता! मी सांगितल्या त्या वानगीदाखल काही गोष्टी. मानवी इतिहासातील हा एक विलक्षण कालखंड. अशा वेळी काही लिहिणं वगैरे अशक्यच.

या अस्वस्थ कालखंडात माझ्या आयुष्यात एक नवा अध्याय नकळत सुरू झाला होता. अजिबात ओळखदेख नसताना दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर, सुनीता देशपांडे, डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी मला पत्रे पाठवली. आमचा आपापसांतील पत्रे आणि उत्तरे हा छान कार्यक्रम सुरू राहिला. अनेक वेगवेगळ्या विषयांवर अस्वस्थ मनाने अस्वस्थ कालखंडात केलेल्या चर्चा. त्या कालखंडात अचानक एकदा मला एक भले मोठे पाकीट आले. त्यात एक भले मोठे पत्र होते. ते पत्र होते अरविंद पाटकर यांचे. मी यापूर्वी त्यांना कधी भेटलो नव्हतो. पण या झुंजार कार्यकर्त्याबद्दल खूप काही ऐकून होतो. वयाच्या १७ व्या वर्षी मॅट्रीक झाल्यावर शिक्षण आणि नोकरी याच्या मागे न लागता हा कम्युनिस्ट पार्टीत सामील झाला. १८ व्या वर्षी त्या पक्षात ‘फुल टायमर’ झाला. काही काळाने डांगेंनी निवडलेल्या आणि घडविलेल्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाऊ लागले. मुंबई गिरणी कामगार युनियनचा तो जनरल सेक्रेटरी बनला. त्याने कामगारांच्यासाठी अनेक लढे दिले. त्यांतले दोन सर्वांत महत्त्वाचे : 

बॉम्बे गॅस कंपनीविरुद्ध त्यातून निघणारा धूर, तेथे अपघाताने होणारे मृत्यू यांविरुद्ध त्याने आंदोलन केले. चार दिवस रास्ता रोको करून रस्त्यावर उपोषणाला बसला होता. शेवटी रामराव आदिक, जवाहरलाल दर्डा यांनी मध्यस्थी केली – प्रश्न सुटला. अरविंदच्या कामगार चळवळीतील चढत्या आलेखात अशा अनेक गोष्टी आहेत. त्यांतील कळसाध्याय म्हणजे फिनले मिलच्या कामगारांचा अरविंदने घडवून आणलेला संप. तो संप आम्ही मोडणारच म्हणून शिवसेनेने आव्हान दिले होते. त्याने आव्हान जाहीरपणे स्वीकारले होते. त्याने प्रतिआव्हान दिले होते : ‘हा संप तुम्ही मोडून दाखवलात, तर मी कामगार चळवळ कायमची सोडून देईन.’ अनेक शिवसैनिक गेटवर उभे होते; पण एकही कामगार आत गेला नव्हता. हा संप यशस्वी झाला. अरविंदच्या आयुष्यातील एक प्रचंड यातनादायक, क्लेशदायक गोष्ट मी ऐकली होती. ‘जाम मिलच्या काऊंटर कामगारांचा लढा.’ त्याची पहिली मुलगी– दहा महिन्यांची, तापाने फणफणलेली. त्याने मुलीजवळ थांबणे, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे महत्त्वाचे होते; पण तो ठामपणे कामगारांसोबत गेटवर उभा होता. या वेळी आपण गेट सोडले तर आतून ७५ कामगारांना बाहेर काढतील, ही परिस्थिती होती. सर्व कामगारांची नोकरी राहिली. इकडे मुलीचा ताप वाढला. बायकोने एकटीने मुलीला हॉस्पिटलला नेले. मुलगी गेली आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्या पत्नीच्या मनावर प्रचंड आघात झाला.. त्या वेळी गिरणगावात एक खोलीची चाळ असे. अशा ५२ खोल्या असलेल्या एका चाळीत तो राहत होता. १०७ फुटांची खोली. अर्थात त्या वेळी त्यात काही नवे नव्हते. कृष्णा देसाई, गुलाबराव गणाचार्य त्या वेळी आमदार झाले तरी चाळीतील एकेका खोलीत राहत होते. 

त्याच वेळी अरविंदबाबतची दुसरी माहितीही मला मिळत होती; कारण मी आणि अरविंद जगातील सर्वात छोट्या आणि सर्वात श्रेष्ठ अशा ‘कुडाळदेशकर आद्य गौड सारस्वत ब्राह्मण’ या जातीत जन्मलो होतो. सारस्वतांच्यातील अनेक पोटजातींतील एक पोटजात म्हणजे ‘आद्य गौड.’ या आद्य गौड जातीत आठ पोटजाती. त्यांतील ‘कुडाळ देशकर’ ही एक! मी मुंबईत असताना ज्या कुमकुम चाळीत राहत होतो, ती सबंध चाळ या श्रेष्ठ जातीची होती. तिच्यातील श्रेष्ठ माणसं आपल्या जातीतील लोक कसे फुकट जातात, म्हणून त्यांची कथा सांगत असत, ‘अरविंदचे आजोबा १९२३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाठपरुळे गावातून लालबागला आले. आपल्या जातीतील ज्येष्ठ व्यापारी टोपीवाले यांच्या मदतीने तेथे कपड्याचे दुकान सुरू केले. दुकान भरभराटीला आले होते; पण अरविंदच्या वडिलांना दुकान विकावे लागले. लालबागमध्ये त्याच्या वडिलांनी एका चाळीत एक छोटी खोली भाड्याने घेतली. आईने घरातच खाणावळ सुरू केली. सर्व मुलं खाणावळीत मदत करत. अरविंदचा थोरला भाऊ जिद्दीने शिकला. आज आयआयटीला जे महत्त्व आहे, त्या वेळी ते ‘व्हीजेटीआय’ या संस्थेला होते. त्याचा थोरला भाऊ तेथून टेक्स्टाईल इंजिनिअर झाला, छानपणे मार्गाला लागला. धाकटा भाऊ आणि धाकटी बहीण शिकून मार्गाला लागले. याला मात्र हे भिकेचे डोहाळे लागलेत!’- ते खरोखरच भिकेचे डोहाळे होते. आज विश्वासही बसणार नाही. अरविंदची सुहागरात आणि मधुचंद्र कसा झाला असेल? त्या वेळी चाळीत एका खोलीत राहणाऱ्या तमाम नवदांपत्यांचा झाला असेल तसा! खोलीत एक लोखंडी कॉट असे, त्यावर वडील झोपत. खाली सतरंजी, त्यावर घरात असतील ती पाच ते दहा माणसं झोपत. नवदांपत्यासाठी, काही दिवस कॉटच्या खाली चारी बाजूला चादर लावून ‘बेडरूम’ तयार केलेली असे!

या अशा अनेक कारणांमुळे अरविंद पाटकर या नावाभोवती माझ्या मनात एक विलक्षण कुतूहल होते. अरविंदचेपत्र मी वाचायला सुरुवात केली. अरविंदचे सविस्तर पत्र म्हणजे गोपुंची उद्ध्वस्त धर्मशाळा नव्हती, तर घर उद्ध्वस्त झाल्यावर मुलाने अंधारात चाचपडणे होते. अरविंदने त्याच्या पत्राची सुरुवात माझ्या एका लेखाने केली होती. रशिया कोसळत असताना मी रशियात मुक्तपणे भटकलो होतो. त्यावर ‘लाल ताऱ्यातून धुक्याकडे’ म्हणून एक सविस्तर लेख कुठेतरी लिहिला होता. त्या लेखाचा आधार घेऊन अरविंदने पुढे लिहिले होते, ‘मला तुमच्याकडून माझा रशिया समजावून घ्यायचा आहे.’ १९८३मध्ये पक्षाशी मतभेद होऊन कॉम्रेड डांगे यांना पक्षातून बाहेर फेकण्यात आले. त्या वेळी त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे जवळचे कार्यकर्तेही बाहेर फेकले गेले. अरविंद अर्थातच त्यांत होता. दरमहा मिळणारे १५० रुपयांचे मानधनपण संपले होते. त्याची ताकद माहीत असल्यामुळे इतर युनियन आणि पक्ष त्याला आमच्याकडे या म्हणून आग्रह करत होते; पण त्याला आजन्म फक्त कम्युनिस्ट म्हणूनच राहावयाचे होते. त्या वेळी रशियातून आपला विश्वास बसणार नाही, अशी विज्ञान सुलभ करून सांगणारी उत्कृष्ट छपाई, उत्कृष्ट निर्मिती असलेली पुस्तके अतिशय स्वस्त दरात भारतात येत होती. त्याने मुंबईत अनेक ठिकाणी फुटपाथपासून सर्वत्र ही पुस्तके विकायला सुरुवात केली. 

रशिया कोसळला. ही पुस्तके येणेपण थांबले. मात्र त्याच वेळी आपण हे करत होतो आणि आता आपण काय केले पाहिजे, हे त्याच्या लक्षात आले. त्याने लिहिले होते, ‘आम्ही चांगले आयुष्य जगू इच्छितो, आमची मुले शिकावीत, त्यांनी प्रगती करावी, यासाठी आम्ही धडपडत होतो. लोकांना पटणारा हा विचार ‘साम्यवादी चळवळ’ त्या वेळी गिरणगावात रुजवत होती. रशियन क्रांतीतून पुढे आलेला एक महत्त्वाचा विचार माझ्या लक्षात आला. ‘पुस्तक हे परिवर्तनाचे साधन होऊ शकते. झपाट्याने आपल्या साध्याकडे घेऊन जाणारे हे सर्वात प्रभावी साधन आहे, हा विचार माझ्या मनात रुजला होता. म्हणून मी पुस्तक प्रकाशनाकडे वळलोय.’ त्यानंतर तो पत्रात मुख्य मुद्द्याकडे वळला होता. त्याने लिहिले होते, ‘गेल्या पाच वर्षांत तुमचे एकही पुस्तक आलेले नाही. मात्र, किर्लोस्कर आणि इतर प्रमुख दिवाळी अंकांत तुम्ही ‘मागे पडणारा महाराष्ट्र’, ‘काश्मीर समस्या,’ ‘खलिस्तानचा प्रश्न’ यांवर मुलाखती आणि शोधयात्रेवर आधारलेले भलेमोठे लेख लिहिलेत, त्या सर्व लेखांचे पुस्तक काढण्याची परवानगी मला तुमच्याकडून हवी आहे.’ त्यानंतर त्याने त्या सर्व लेखांवर आधारित ‘दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत’ हे माझे पुस्तक प्रसिद्ध केले. पुस्तकाचे विमोचन करण्यासाठी तो मला घेऊन तेंडुलकरांच्या घरी गेला होता.

ही गोष्ट १९९५ ची. त्यानंतरही अनेक कारणांमुळे मी काही लिहिण्याच्या मनःस्थितीत नव्हतो. एकविसावे शतक सुरू होत असताना मी दिल्ली सोडून सातारला आलो. त्यांनतर मी कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंकात ‘स्वामी विवेकानंदांची पत्रे’ म्हणून एक सविस्तर लेख लिहिला होता. दिवाळी अंक लोक वाचतात आणि विसरून जातात! मात्र हा लेख वाचून अरविंद सरळ सातारला माझ्याकडे आला. तुम्ही विवेकानंदांच्यावर पुस्तक लिहिले पाहिजे म्हणून आग्रह करून बसला. केवळ त्याच्या आग्रहामुळे मी ‘शोध स्वामी विवेकानंदांचा’ हे पुस्तक लिहिले. दहा वर्षांत त्या पुस्तकाच्या त्याने चौदा आवृत्त्या काढल्या. ठरल्याप्रमाणे प्रत्येक वेळी मला बारा टक्के मानधन दिले! या पुस्तकामुळे मी विवेकानंदांच्यावर महाराष्ट्रात अनेक भाषणे दिली. त्या भाषणांनंतर होणाऱ्या चर्चेतून विवेकानंद मला उलगडत गेले. ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ हे पुस्तक मी लिहिले. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे चळवळीला उपयोगी पडतील असे विषय आणि लेखक शोधत हा कायम हिंडत होता. विज्ञान सोप्या शब्दांत मुलांना समजावून देणे, मुलांच्या मनाचाही विकास होईल अशी पुस्तके प्रसिद्ध करणे हा त्याचा प्रमुख ध्यास होता. मात्र, त्याच्याही पलीकडे तो ‘कार्यकर्त्यांसाठी शिबिर आणि चर्चासत्र’ यांत वर्षभर गुंतलेला असे. २०२३ मध्ये त्याने पुण्याला एस.एम.जोशी सभागृहात जवळजवळ शंभर कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय शिबिर घेतले होते. एक सबंध दिवस त्याने मला दिला होता आणि एक सबंध दिवस ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांना. २०२४ मध्ये त्याने माझी दोन पुस्तके प्रसिद्ध केली. माझे विस्कळीत पडलेले लेख गोळा करून ‘संघ समजून घ्यावयास हवा’ हे पुस्तक आणि दुसरे ‘प्रकाशवाटा : दुर्गा भागवत आणि नानाजी देशमुख’

   मनोविकास प्रकाशनाच्या पुस्तकात प्रूफ रीडिंग फार वाईट असते. मात्र लेखक आणि लेखकाची संहिता यांचा तो फार मोठा सन्मान करत असे. मी काही फार मोठा लेखक नाही; मात्र माझी तीनही पुस्तके प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याने कळवले, ‘आमचे संपादक विलास पाटील यांना त्यात काही बदल असावेत असे वाटते. अर्थात लेखक म्हणून तुमचा शब्द शेवटचा आहे. मात्र आपण वेळ दिल्यास पुण्याहून विलास पाटील सातारला येतील आणि तुमच्याशी चर्चा करतील नंतर तुम्ही निर्णय घ्या.’ माझ्या तीनही पुस्तकांच्याबाबत विलास पाटील सातारला आले होते. चार-पाच तास आम्ही चर्चा केली आणि त्यामुळे माझी आणि विलास पाटील यांची चांगली मैत्री झाली

गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्येतर तो भलताच उत्साहात होता. अंदमानची फेरी मारून आला होता. पुणे येथे झालेल्या ग्रंथमहोत्सवात चार दिवस आपण आपल्या स्टॉलमध्ये उभे राहून पुस्तके विकली म्हणून कळविले. त्याचा शेवटचा फोन २७ जानेवारीला आला. भलताच उत्साहात होता. त्याने फोनवर कळविले, आज ‘सृजन संवाद’ या संस्थेबरोबर चर्चा करणार आहे. मनोविकास आणि सृजन संवाद मिळून नारायण सुर्वे यांच्यावर एक फार मोठी डॉक्युमेंटरी बनविणार आहेत. नागनाथ मंजुळेंना याबाबत गळ घालणार.’ त्यानंतर कळले ते एवढेच – २८ जानेवारीला प्रकृती बरी नाही म्हणून तो हॉस्पिटलला गेला आणि २९ जानेवारीच्या पहाटे त्याने या जगाचा निरोप घेतला. 

  एक अगदी वेगळी आठवण. ३१ ऑक्टोबरला अरविंद पाटकरचा फोन आला, ‘मी, दीपक पळशीकर, दीपा देशमुख, ज्ञानेश्वर मोळक, नितीन हांडे, महावीर जोंधळे दहाच्या दरम्यान तुला भेटायला येतोय. भरपूर गप्पा मारू, नंतर बाराच्या सुमारास सांगलीला तारा भवाळकर यांना भेटायला जायचंय. त्यांना एका चर्चासत्रात प्रमुख म्हणून या अशी गळ घालणार आहे.’ जाताना तो म्हणाला, ‘आज या सर्वांना घेऊन तुझ्याकडे येण्याचे कारण वेगळं. माझ्या मनात एक विचार नक्की आहे. ‘रंग याचा वेगळा’ हे भानू काळे यांनी संपादित केलेले आणि ‘कॉन्टिनेंटल प्रकाशन’ यांनी तुझ्यावर केलेले पुस्तक प्रसिद्ध होऊन दहा वर्षे झाली. आता पूर्णपणे नव्याने ते पुस्तक प्रसिद्ध करायचे आहे. ते पुस्तक पूर्ण करून एक मार्चला या सर्वांना घेऊन येणार; मग तू आम्हांला मटण आणि सुरमईचे जेवण दिले पाहिजेस.’ मी हसलो. मी म्हटले, “अरविंद, तू आता प्रकाशक म्हणून मुरला आहेस. ‘भेटला लेखक लाव मधाचे बोट!’ ही सध्या तुझी प्रतिमा आहे. तू काही माझ्यावर पुस्तक लिहिणार नाहीस, काढणार नाहीस, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आता मलाच तुझ्यावर काहीतरी लिहावे लागेल!” या शेवटच्या मजेशीर चर्चेला हे पाचजण साक्षी आहेत.

***

पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक साधना

Author

Leave a Reply