
कोणतेही शहर हे एका रात्रीत घडत नसते. शहरातील रस्ते, इमारती, पुतळे इतकेच काही शहराची ओळख घडवत नसतात, तर त्या शहरात घडणार्या सांस्कृतिक गोष्टीदेखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळेच जयपूरसारखे शहर आता फक्त हवामहालामुळे नव्हे तर तिथल्या लिटरेचर फेस्टिव्हलमुळेदेखील ओळखले जाते. दर दोन वर्षांनी भरणारे कोची बिएन्नेल हेतर जगभरातील कला रसिकांचे हक्काचे ठिकाण. तसेच महत्त्व आहे मुंबईच्या काळा घोडा फेस्टिव्हलचे. जगभरात असे अनेक फेस्टिव्हल भरत असतात, फक्त चित्रपट, साहित्यच नव्हे तर सगळे कलाप्रकार साजरे करणारे हे उत्सव खरोखरच नवीन उत्साह, जगण्याची शक्ती देतात.
हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे आमच्या बेंगलोरमध्ये साजरा झालेला बेंगलोर हब्बा. बेंगलोर हब्बाचे हे तिसरे वर्ष होते. कन्नडमध्ये हब्बा म्हणजे उत्सव. खरोखरीच १६ जानेवारीला सुरू झालेला हा उत्सव २५ जानेवारीपर्यंत सुरू होता. संपूर्ण बेंगलोरच्या वेगवेगळ्या भागांत दहा दिवस वेगवेगळे कार्यक्रम आखले होते. जवळपास २५० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कर्नाटक सरकार, unboxing blr आणि इतरांच्या मुख्य सहभागाने या उत्सवाचे आयोजन केले जाते. फक्त एकाच भागात कार्यक्रम करण्याऐवजी विकेंद्रीकरण करून सगळ्यांना सामावून घेण्याचा हा एक उत्तम प्रयत्न होता. त्यातही वीकेंडला लोकांनी फेस्टिव्हलला जाण्याऐवजी, फेस्टिव्हलच त्यांच्यापर्यंत पोहोचत होता, म्हणजे कसे… तर रविवारी बेंगलोरच्या महत्त्वाच्या भागातील रस्त्यांवर रस्ते हब्बाचे आयोजन केले होते. हे रस्ते हब्बा म्हणजे त्या रस्त्यांवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले होते. त्या वेळी त्या रस्त्यांवरची वाहतूक बंद करून रस्ता मुलांना खेळण्यासाठी मुक्त केलेला होता.
या दहा दिवसांत भारतभरातील उत्तम नाटके, संगीताच्या कार्यक्रमांचेदेखील आयोजन केले होते. दहा दिवसांत मी ५ कार्यक्रमांनाच हजेरी लावू शकले पण तरीही एकूण माहौलचा अंदाज येत होता. १७ आणि १८ जानेवारीला नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या प्रांगणात कल्चरोत्सवा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या दोन दिवसांत कन्नड संस्कृतीचे दर्शन आटा(खेळ), उटा(जेवण), पाठा(ज्ञान), डेटा(माहिती) अशा चार भागांतून केले होते. कन्नड संस्कृतीतील पारंपरिक खेळ, जेवण, इतिहास हे सगळे वेगवेगळ्या माध्यमांतून इथे दाखवत होते. नॉर्थ कर्नाटका, मैसूर, मेंगलोर, कारवार, कोलार अशा कर्नाटकाच्या विविध खाद्यसंस्कृतीचा परिचय इथल्या स्टॉल्सवरून करून दिला जात होता. बेंगलोरमध्ये अनेक वर्षे राहूनही कन्नड लोक फक्त इडली, दोसे खातात असे म्हणणार्यांना कन्नड खाद्यसंस्कृतीची ओळख करून दिली जात होती. तसेच कर्नाटकाच्या राष्ट्रकूट, विजयनगर ते मैसूरच्या वडेयार घराण्यापर्यंतच्या इतिहासाची माहिती या महोत्सवात दिली होती. कन्नड व्यावसायिक, कन्नड चित्रपट, स्टार्ट अप अशा विषयांवर परिसंवाददेखील भरवले होते. तिथे येणारा प्रत्येक जण जाताना नवीन माहिती घेऊन जात होता हे नक्कीच!
‘लावणी के रंग’ हा भूषण कोरगावकर यांनी लिहिलेल्या, बसवलेल्या कार्यक्रमाचे दोन प्रयोग दोन वेगवेगळ्या जागी होते. त्यांतल्या एका कार्यक्रमाला मी गेले होते. कार्यक्रमात मराठी, हिंदीतल्या जुन्या आणि नवीन लावण्या होत्या. लावण्यांचा ठेकाच असा असतो, की बघता बघता आपले पाय पण थरकायला लागतात. गौरी जाधव, अक्षय मालवणकर आणि सोपीनाथ पाटोकर हे तिघे तास-सव्वा तास आपल्यासमोर इतक्या ताकदीने लावण्या सादर करतात, की आपण कुठे आहोत याचादेखील विसर पडतो, तोंडातून आपसूक शिट्टी बाहेर पडते. अनेक अमराठी लोकांसाठी हा खूप वेगळा अनुभव होता. त्यामुळेच सभागृहातील अमराठी लोक या सगळ्याचा मनापासून आनंद घेताना बघून मलाही छान वाटत होते.
अगदी धावतपळत जाऊन मी पाहिलेला पुढचा कार्यक्रम होता कर्नाटकाची वस्त्रगाथा दाखवणारा फॅशन शो! माझ्या आयुष्यातला पहिला फॅशन शो! पहिला फॅशन शो आणि तो ही साड्यांचा असल्याने मला विशेष आनंद झाला होता. पवित्र मुदया आणि प्रसाद बिडपा या टेक्स्टाइलमधल्या नामवंत लोकांनी सादर केलेला हा शो खासच होता. पवित्रा या गेली पन्नास वर्षांनहून अधिक वर्षे जुनी डिझाईन जपण्याचे, पुन्हा तयार करण्याचे, हातमागाला प्रतिष्ठा देण्याचे काम करत आहेत; तर प्रसाद बिडपा फॅशन गुरू म्हणूनच ओळखले जातात. दीपिका पडुकोण, अनुष्का शर्मा, जॉन अब्राहीम, अर्जुन रामपाल यांच्यासारख्या अनेकांना प्रकाशझोतात आणण्याचे श्रेय प्रसाद बिडपा यांचे आहे. या कार्यक्रमात कर्नाटकाच्या वेगवेगळ्या भागांतील साड्या, त्यांवरील मोटिफ यांचे दर्शन घडवत असतानाच पवित्रा त्यामागचा इतिहास, आठवणी सांगत असल्याने हा कार्यक्रम खूपच रंजक झाला होता.
या उत्सवात मी पाहिलेला पुढचा कार्यक्रम म्हणजे शांता गोखले लिखित, पर्ण पेठे दिग्दर्शित नाटक समथिंग लाइक ट्रूथ. चार स्त्रिया त्यांच्या सत्याचा तुकडा आपल्यासमोर उभा करतात. दोन फ्रांसमधील स्त्रिया, एक श्रीलंकेतील पत्रकार आणि एक भारतात दंगलीत होरपळलेली स्त्री. या चौघी त्यांच्या अंदाजात त्यांची गोष्ट सांगतात आणि सत्य नेमके काय याचे उत्तर शोधण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकून मोकळ्या होतात. पण मुळात तसेच तर असते ना, हेच सत्य असे आपण मानतो पण खरेच तेच फक्त सत्य असे असते का? सत्य कटू असले तर ते स्वीकारण्याची आपली तयारी असते का? किंबहुना सत्य शोधण्यासाठी घ्याव्या लागणार्या परिश्रमाची आपली तयारी असते का? या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे यातले संगीत. पूर्ण लाईव्ह गाणी या नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. हे जरी स्त्रीने लिहिलेले, स्त्रीने दिग्दर्शित केलेले आणि स्त्रियांनी अभिनय केलेले असले तरीही हे नाटक फक्त स्त्रियांसाठी मुळीच नाही; किंबहुना पुरुषांनी बघण्याची गरज कांकणभर जास्तच आहे.
या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतभरातून बोलावलेली उत्तम नाटके. हिंदी, मराठी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी अशा भाषांमधील नाटके सादर केली होती. अनेक नामवंत संस्था त्यांचे प्रयोग इथे घेऊन आल्या होत्या. या सगळ्यांसाठी देणगी मूल्य असले तरी ते अगदी नाममात्र म्हणजे २५० रुपये होते. अधिक क्षमतेच्या प्रेक्षागृहांमध्येतर देणगी मूल्य नाही दिले तरीही उपलब्ध जागांवर प्रवेश सहज मिळायचा.
इंडियन ओसियन, एम डी पल्लवी, वासु दीक्षित, शंतनु मोईत्रा, कौशिकी चक्रवर्ती, महेश राघवन यांच्यासारखी माझ्या ओळखीची नावे तर होतीच पण त्याचबरोबर नवीन पिढीतील प्रयोग करणारे जगभरातील अनेक संगीतकार, नाट्यकलाकारदेखील होते.
पंडित झाकीर हुसेन यांचा शक्ति बँड माहीत नसलेला संगीत रसिक विरळाच. त्याच शक्ति बँडची आठवण जागवणार्या ‘एकोज ऑफ शक्ति’ या कार्यक्रमाला मी गेले होते. कोणे एकेकाळी जेल असलेल्या बेंगलोरमधील फ्रिडम पार्क इथे या संगीत मैफिलीचे आयोजन केले होते. तरुण मुलांनी सादर केलेला हा प्रयोग अगदी वाखणण्यायोग्य होता. जाझ आणि हिंदुस्थानी संगीत यांचा झकास मिलाफ या कार्यक्रमात केलेला आहे. मोकळ्या हवेत हलक्या गारव्यात संगीताच्या तालावर झुलण्याचा हा आनंद दिल्याबद्दल बेंगलोर हब्बा समितीचे अभिनंदन केले पाहिजे. मी तर फक्त एक दिवस हा अनुभव घेतला, पण ही सांगीतिक समिधा दहा दिवस घातली जात होती. केवळ एकोज ऑफ शक्तिसाठी म्हणून मी तिथे गेले होते. त्या कार्यक्रमानंतर असेच फिरत बाकीचे प्रदर्शन बघत असताना अचानक गिटारचे सूर कानावर पडले आणि माझ्या पंधरा वर्षांच्या लेकाने तत्क्षणी सांगितले हे काय वाजत आहे, आपण लगेच जाऊन बघू या. म्हणून आम्ही पुन्हा स्टेजकडे बघितले तर काही परदेशी गिटार वाजवत होते सोबत ड्रम आणि मृदुंगपण होते. बी. सी. मंजुनाथ हे कर्नाटिक मृदुंगम वादकांमधील आजघडीचे मोठे नाव आहे. त्यांनी मॅटीस एकलंड या गिटारिस्टचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहिले आणि त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर जन्माला आला एक नवीन प्रयोग ‘रेझिस्ट द एरोजन’ नावाचा अल्बम! फ्रिक ऑडिओ लॅबमार्फत झालेल्या या प्रयोगात चक्क रॉक, मेटल संगीतावर कोण्णकोलचा (म्हणजे तालाचे बोल तोंडाने गायचे) साज चढवला होता. अनपेक्षितपणे हा समोर आलेला सांगीतिक अनुभव घेताना किती ऐकू काय साठवू असेच वाटत होते.
https://blrhubba.in/events इथे जाऊन बघितले तर लक्षात येईल प्रत्येक कार्यक्रम वेगळा होता, प्रत्येक कार्यक्रमावर भरभरून लिहिता येईल पण मी जे कार्यक्रम अनुभवले त्याबद्दल फक्त लिहिले. सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी हे असे उत्सव अत्यावश्यक असतात. त्यातही जेव्हा हे असे कार्यक्रम अत्यल्प शुल्कात किंवा मोफत सामान्य जनतेपर्यंत पोहोचतात, लहान, तरुण मुलांच्या कानांवर हे पडते, त्यांना काहीतरी वेगळे दिसते, तेव्हा ती नवीन संवेदनशील माणूस घडण्याची नांदी असते असे मला वाटते. मग अशाच संवेदनशील वर्गातून कलाकार घडतात. कलाकार नाही घडले तरी रसिक नक्कीच तयार होतात. अगदी या प्रमाणावर नाही पण सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक गावात, शहरात घडलेच पाहिजेत. विचारमंथन होत राहिले पाहिजे. सशक्त समाजासाठी हे आवश्यक असते आणि हे इतर कोणी करण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच छोटी सुरुवात केली तर त्याची चळवळ व्हायला वेळ लागणार नाही!!!
मानसी होळेहोन्नूर






