‘महाकवी जी. शंकर कुरूप’

गेल्या महिन्यातील लेखात आपण विविध साहित्यिक पुरस्कार आणि विशेषकरून ‘ज्ञानपीठ पुरस्कारां’ची माहिती घेतली. ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे अशा सतरा साहित्यिकांचा यापुढील लेखांतून आपण परिचय करून घेणार आहोत.
तसे पाहता आतापर्यंत एकूण ६५ लेखकांच्या गळ्यात ज्ञानपीठ पुरस्कारांची माळ पडली आहे. त्या सर्वांचाच परामर्श घेणे शक्य नाही आणि मुळात त्याची आवश्यकतादेखील नाही. आपणांपैकी बरेच जण प्रामुख्याने मराठीतील साहित्यच वाचतो, काही प्रमाणात इंग्रजीदेखील(मूळ स्वरूपात वा मराठी भाषांतर). आपल्या देशातील बावीसहून अधिक भाषांमध्ये अत्यंत सकस साहित्य निर्मिती होत असते, परंतु तिच्याविषयी आपण अनभिज्ञ राहतो. या लेखमालेच्या माध्यमातून विविध भारतीय भाषांमधील साहित्यप्रवाहांची माहिती घेऊन आपल्या जाणिवांच्या कक्षा रुंद करण्याचा उद्देश आहे. एकदा का हा हेतू सफल झाला, की इतर पुरस्कारप्राप्त लेखक आणि त्यांच्या साहित्याचा परिचय तुम्ही करून घ्यालच.
प्रस्तावित लेखमालेमध्ये १४ भारतीय भाषांमधील साहित्यिकांबद्दल आपण काहीशा विस्ताराने जाणून घेणार आहोत. एका प्रकारे देशाच्या जवळपास सर्व प्रदेशांतील भाषांचा यात समावेश असेल. लेखकांची निवड करताना पुरस्कारप्राप्त ८ लेखिकांपैकी सहांची जाणीवपूर्वक निवड केली आहे आणि आपल्या मायबोलीचे ऋण स्वीकारत चारीही मराठी लेखकांचा समावेश केला आहे, या सर्व लेखकांबद्दल कालानुक्रमानुसार लिहिणार आहे. १९६५ ते २०२२ असा जवळपास ६० वर्षांचा दीर्घ कालपट यातून उलगडेल.
ज्ञानपीठ पुरस्कारांना १९६५ मध्ये प्रारंभ झाला. पहिल्याच वर्षीचे मानकरी होते मल्याळी साहित्यिक जी. शंकर कुरूप. त्यांच्याविषयी जाणून घेण्याआधी ते ज्या राज्याचे आणि भाषेचे प्रतिनिधित्व करतात त्याविषयी थोडक्यात.
केरळ राज्य, मल्याळी भाषा आणि तिचे साहित्य
भारताच्या नैऋत्य कोपऱ्यात वसलेल्या केरळ राज्याची लोकसंख्या ३.५ कोटींच्या आसपास आहे. सर्वाधिक नागरीकरण आणि साक्षरता, सर्वोच्च मानवी विकास निर्देशांक, कथकली, मोहिनीअट्टम यांसारख्या नृत्यशैलींचे माहेरघर असणारे हे राज्य. केरळात हिंदू बहुसंख्येने असले तरी एकूण लोकसंख्येच्या ५५% इतकेच. मुस्लीम २६% आणि ख्रिश्चन १८% असा तेथील बहुपेडी समाज आहे. आदिशंकराचार्यांचा जन्म आणि बालपण इथलेच. एके काळी संख्येने अल्प असणाऱ्या नम्बुद्री ब्राह्मण या कर्मठ समाजाचा मोठा प्रभाव होता. मात्र काळाच्या ओघात ती परिस्थिती आता राहिलेली नाही.
मल्याळम भाषा तमिळची भाषाभगिनी, मोठ्या प्रमाणात संस्कृत शब्दांनी समृद्ध झालेली. मलय(पर्वत) आणि आलय(प्रदेश), म्हणजेच पर्वतीय प्रदेशातील भाषा. १२ व्या शतकातील ‘रामचरितम्’हा उपलब्ध असलेला सर्वात जुना साहित्यिक ग्रंथ मानला जातो. त्यावरतमिळचा मोठा प्रभाव आहे.(मराठीतील मुकुंदराज यांचा ‘विवेकसिंधु’ त्याच सुमाराचा.) १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला मल्याळम साहित्यात पाश्चात्त्य साहित्याचा प्रभाव जाणवू लागला. (मला वाटतं, मराठीसह अन्य काही भारतीय भाषांमध्येदेखील हीच गोष्ट घडली.)या काळात कविता, कादंबरी, नाटक आणि लघुकथा अशा विविध प्रकारांत साहित्यनिर्मिती झाली.
कुमारन आशान, बल्लतोल नारायण मेनन आणि उल्ळूर एस. परमेश्वर अय्यर या तिघांना आधुनिक मल्याळी कवितेची त्रिमूर्ती म्हटले जाते. त्यांनी सामाजिक सुधारणा, राष्ट्रप्रेम आणि अध्यात्म या विषयांवर लेखन केले. हे तिघे कुरूप यांच्या २५-३० वर्षे आधीचे. ‘इंदुलेखा’ या मल्याळममधील पहिल्या महत्त्वाच्या कादंबरीचे लेखक ओ. चंदू मेनन तर त्याही आधीचे.
विसाव्या शतकात जन्म घेतलेल्या महत्त्वाच्या मल्याळी साहित्यिकांमध्ये जी. शंकर कुरूप हे सर्वात ज्येष्ठ आणि अर्थातच पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मानकरी. त्यानंतर १९८० मध्ये हा पुरस्कार मिळवणारे एस.के.पोट्टेकट्ट हे एक चतुरस्र लेखक होते – कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह, नाटके, आत्मचरित्रात्मक लेखन यांसह प्रवासवर्णनांची पुस्तके यासाठी ते ओळखले जातात. चारच वर्षांनी ताकाशी शिवशंकर पिल्ले या आणखी एका मल्याळी साहित्यिकाला हा पुरस्कार मिळाला. प्रागतिक साहित्य चळवळीतले हे एक प्रमुख नाव. चेम्मीन या त्यांच्या कादंबरीवरील त्याच नावाचा चित्रपट – राष्ट्रपती-सुवर्णपदक मिळवणारा, दक्षिण भारतीय भाषांमधील सर्वप्रथम ठरला. १९९५ मध्ये एम.टी. वासुदेवन नायर यांना हा पुरस्कार मिळाला. आधुनिक मल्याळी साहित्यावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. कादम्बरी, कथा, पटकथा असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. आणखी एक ‘कुरूप’ २००७ मध्ये पुरस्कार विजेते ठरले. ते कवी आणि गीतकार, प्रागतिक आणि मानवतावादी साहित्यासाठी ओळखले जाणारे. सर्वात अलीकडे म्हणजे २०१९ मध्ये विजेते ठरलेले अक्कितम अच्युतम नम्बुद्री हे प्रामुख्याने कवी आणि निबंधकार. साध्या, सरळ भाषेतील त्यांच्या लेखनात प्रेम आणि करुणा या भावनांचा शोध आढळतो.
ज्ञानपीठ पुरस्कार (अद्याप तरी) न मिळालेल्या लेखकांमध्ये दोन महत्त्वाच्या लेखिका – ललितांबिका अंतर्जनम(यांनी नम्बुद्री समाजातील स्त्रियांचे संघर्ष, त्यांची वैफल्ये, आंतरिक जीवन यांचे प्रत्ययकारी चित्रण केले. ) व कमला दास(स्पष्ट, रोखठोक, अनेकदा प्रक्षोभक आणि स्त्रियांच्या लैंगिकतेचा सखोल शोध घेणारे लेखन करणाऱ्या).
पुरुष लेखकांमध्ये ओ. व्ही. विजयन – व्यंगचित्रकार, प्रयोगात्मक लेखन शैली, वास्तव – कल्पिताचे मिश्रण असणारे लेखन (आपल्या श्याम मनोहरांची आठवण होते?) आणि एम. मुकुंदन – आधुनिक साहित्य चळवळीतले एक महत्त्वाचे नाव – त्यांच्या सुरुवातीच्या लेखनात माहे या पूर्वीच्या फ्रेंच वसाहतीमधील चित्रण आहे.
केरळ आणि मल्याळी साहित्याच्या या धावत्या ओळखीनंतर मुख्य विषयाकडे वळू या.
जी. शंकर कुरूप
आधुनिक मल्याळी साहित्यिकांमध्ये जी. शंकर कुरूप यांचे मानाचे स्थान आहे. केरळमधील अलुवा जवळील नायतोड या गावी १९०१ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या बालपणी त्यांचे काका गोविंद कुरूप यांनी शंकर यांना संस्कृत भाषेची ओळख करून दिली. त्यांच्याविषयीच्या आदरभावनेतून शंकर यांनी ‘गोविंद’चे आद्याक्षर ‘जी’ स्वतःच्या नावाला जोडले.
शाळेत असतानाच त्यांची पहिली कविता – ‘निसर्गाला अभिवादन’ – प्रसिद्ध झाली. वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते शिक्षकी पेशात राहिले. शाळाशिक्षक म्हणून सुरुवात करून नंतरच्या काळात महाराजा कॉलेज, एर्नाकुलममध्ये मल्याळी भाषेचे प्राध्यापक होते आणि तेथूनच निवृत्त झाले.वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘कौतुकम’ प्रकाशित झाला. २५ काव्यसंग्रहांसह त्यांनी एकूण ४० पुस्तके लिहिली. कवितेव्यतिरिक्त त्यांनी निबंध, नाटके आणि समीक्षादेखील लिहिली. १९४८ मध्ये मल्याळम भाषेतील पहिले चित्रपट गीत त्यांच्याच लेखणीतून उतरले. त्यांनी चित्रपटांसाठी मात्र फारसे गीतलेखन केले नाही.
त्यांचा सर्वात प्रसिद्ध काव्यसंग्रह ‘ओडक्कुझल’ (बासरी) १९५० मध्ये प्रसिद्ध झाला. ६०हून अधिक कविता असलेल्या या संग्रहात संगीत, निसर्ग आणि तात्त्विक चिंतन यांचा सुरेख संगम आहे. याच काव्यसंग्रहासाठी त्यांना १९६५ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. (केरळ साहित्य अकादमीने त्या वर्षी पाठविलेल्या लघुयादीत कुरूप यांचे म्हणे नावच नव्हते!) बासरी हे प्रतीक कुरूप यांनी अतिशय कल्पकतेने वापरले आहे. बासरी ही पोकळ असते; परंतु जेव्हा ईश्वरी चैतन्य किंवा कवीचा श्वास तिच्यातून वाहतो तेव्हा मधुर संगीत निर्माण होते. जिच्यातून सृष्टीचे आणि ईश्वराचे संगीत प्रवाहित होते अशा बासरीचे रूप म्हणजे कवी असे ते मानतात.
या काव्यसंग्रहाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. ‘बांसुरी’ या नावाने हिंदीत झालेला अनुवाद अतिशय लोकप्रिय ठरला. इतर द्रविडी भाषांमध्ये आणि इंग्रजीमध्येदेखील ( The Flute) त्याचे अनुवाद झाले. मात्र त्यांच्या काव्यातील संस्कृतप्रचुरता, तिच्यात असलेली लय आणि नाद आणि भारतीय तत्त्वज्ञानावर आधारलेल्या प्रतीकांचा वापर यांमुळे त्याचा अनुवाद करणे – विशेषतः विदेशी भाषांमध्ये – आव्हानात्मक आहे.
कुरूप यांच्या कवितांमध्ये आध्यात्मिक चिंतन, सामाजिक जाणिवा, प्रतीकात्मकता आणि काव्यात्मक सौंदर्य प्रकर्षाने दिसून येते. वेदान्त व बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्या लिखाणावर होता. जीवन, मृत्यू, दुःख, करुणा आणि मानवाच्या अंतर्मनाचा शोध हे त्यांच्या कवितेतील प्रमुख विषय होते. भारतीय संस्कृती व परंपरांशी त्यांचे दृढ नाते होते. त्यांच्या साहित्याचा प्रवास प्रारंभीच्या स्वच्छंदतावादाकडून(romanticism) हळूहळू मानवतावाद आणि विश्वबंधुत्वाकडे वळलेला दिसतो. केवळ अध्यात्मच नव्हे, तर तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि तत्कालीन सामाजिक जाणिवा त्यांच्या साहित्यात उमटल्या आहेत. गरिबी, विषमता आणि शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या लिखाणातून आवाज उठवला. त्यांची भाषा अत्यंत समृद्ध, नादमय संस्कृतप्रचुर आणि प्रवाही आहे. उपमा आणि रूपकांचा ते मोठ्या प्रमाणात वापर करत. (मराठीत वि. स. खांडेकर यासाठी ओळखले जातात.)
ज्ञानपीठ पुरस्कारांसोबत कुरूप यांना इतरही अनेक सन्मान प्राप्त झाले. १९६८ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. साहित्य अकादमी पुरस्कार(१९६३), केरळ साहित्य अकादमी पुरस्कार(१९६०), Soviet Land Nehru Puraskar(१९६७), केरळ साहित्य अकादमी फेलोशिप(१९७०) हे त्यांतले काही महत्त्वाचे.
विशेष गोष्ट म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कारातल्या रकमेचा बराचसा भाग त्यांनी ‘ओडक्कुझल पुरस्कारां’साठी राखून ठेवला. १९६८ पासून मल्याळम भाषेतील उत्तम साहित्य रचनेसाठी हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. (कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनीदेखील अशाच प्रकारे ‘जनस्थान पुरस्कार’ सुरू केले याची इथे आठवण येते.)
बंगाली साहित्याने – विशेषतः रवींद्रबाबूंच्या लिखाणाने – अनेक भाषांतील लेखकांना भुरळ पाडली. जी. शंकर कुरूप यांनी निवृत्तीनंतर बंगाली भाषेचा अभ्यास सुरू केला. त्यांनी ‘गीतांजली’चा मल्याळममध्ये अनुवाद केला. (पु.लं.नीदेखील काही महिने शांतिनिकेतनमध्ये राहून बंगालीची तोंडओळख करून घेतली व ‘अभंग गीतांजली’ नावाने भावानुवाद केला होता.) शंकर यांनी ओमर खय्यामच्या रुबाया आणि कालिदासाचे मेघदूतसुद्धा मल्याळममध्ये आणले.
जी. शंकर कुरूप केरळ साहित्य अकादमीचे अध्यक्ष, केरळ शास्त्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि त्यांच्या मुखपत्राचे संपादक होते. ‘तिलकम’ या मासिकाचेदेखील त्यांनी संपादन केले. १९६८ ते १९७२ ते राज्यसभेचे सदस्य होते. १९७८ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा साहित्यिक वारसा आजही मल्याळम साहित्याला समृद्ध करत आहे. आधुनिक केरळच्या आध्यात्मिक व बौद्धिक जागृतीचा आवाज म्हणून ते कायम स्मरणात राहतील. केरळच्या जनतेने त्यांना प्रेमाने आणि आदराने ‘महाकवी जी.’ हे नामाभिधान दिले आहे. एका साहित्यिकाला याहून अधिक काय हवे?

एखाद्या साहित्यकृतीमधील content आणि लेखकाची शैली ( या ठिकाणी नादमय संस्कृतप्रचुरता) त्या साहित्यकृतीला थोर आणि लोकप्रिय बनवत असते. त्या दृष्टीने अनुवादकाराला दोन्ही भाषांचे उत्तम ज्ञान आणि स्वतःमधे उत्तम साहित्यनिर्मिती करण्याची ताकद असणे आवश्यक असते. साहाजिकच लगतच्या प्रांताची भाषा किंवा हिंदी-इंग्रजी अश्या भारतात सर्वत्र वापर होत असलेल्या भाषातील साहित्याचा अनुवाद शैलीसकट करणे तुलनेने सोपे असते. मराठी साहित्यिकांपैकी कोणाला मल्याळम भाषेचे एवढे ज्ञान असणे कठीण. तेव्हा प्रथम मल्याळम मधून इंग्रजीत अनुवाद आणि इंग्रजीतून मराठीत या प्रक्रियेत मूळचा रस उतरणे जवळजवळ अशक्य वाटते.