स्थलांतरित

विंदांच्या कवितेत ‘किती कठीण परदेशात पोहोचणे स्वदेशाचा त्याग केल्याशिवाय’ ही ओळ वाचली आणि ती विंदांनी माझ्यासाठीच लिहिली आहे असे मला वाटले. स्वदेश कधीतरी कुणी सोडतं का?…दिवाळीच्या पणतीकडे बघता-बघता माझ्या मनात विचार आला. ही पणती लागली होती माझ्या मैत्रिणीच्या घरी जिथे आम्ही नेहमीप्रमाणे दिवाळी पहाट साजरी करायला जमलो होतो. अर्थात आमच्या घरांमधली अंतरं बघता पहाटे येणं म्हणजे कसरतच झाली असती. म्हणून ‘दिवाळी पहाट’ आम्ही सगळे अतिशय साळसूदपणे सकाळी नऊ वाजता साजरी करीत होतो… निदान सकाळी तरी भेटतोय ना… असा एकमेकांना मिश्कील दिलासा देत!

अमेरिकेतले मराठी लोक का बरे  आपले सण उत्साहात साजरे करतात? ह्या प्रश्नाचे  उत्तर मला  गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या एका विधानात नकळत सापडले. ते विधान असे,  की 

 ‘मातीच्या बंधनातून मुक्ती म्हणजे झाडासाठी स्वातंत्र्य नव्हे!’ ( Emancipation from the bondage of soil is no freedom for the tree!) ह्या वाक्याचे प्रतिसादच जणू आमच्या ह्या वर्तनात उमटले आहेत. 

एक परदेशी स्थलांतरित झालेली व्यक्ती म्हणजे इमिग्रंट म्हणून माझ्या मनात एक खंत असे, शंका असे; ती अशी की आम्ही आमची मुळे  भारतातून येथे आणली आहेत  पण ज्या मातीत आपण रुजलो, वाढलो  ती  देशाकडची माती आपण सोबत आणली नाही. ही माती म्हणजे आपल्या  भारतीय समाजात असणाऱ्या सद्भावना, आपुलकी, दुसऱ्याला प्रोत्साहन देण्याची वृत्ती, एकमेकांच्या  सुखदुःखात सामील होणे, उच्च अभिरुची इत्यादी. ही खंत हळूहळू नाहीशी होण्याचे कारण म्हणजे आमच्या छोट्याशा मराठी गावात भरणारी आमची छोटीशी स्नेहसंमेलनने! गावात अनेक वर्षे स्थायिक झालेल्या मंडळींनी जणू काही हा वसाच घेतला आहे, सर्वांना एकत्र आणून स्नेहाची ज्योत तेवत ठेवण्याचा !

पारंपरिक सण साजरे करण्याबरोबरच येथे काही नवीन परंपरा पण निर्माण होताहेत – 

या परक्या देशात असूनही वाढदिवस, केळवण, डोहाळजेवण अतिशय उत्साहाने  व प्रेमाने  साजरी करण्याच्या! अशा प्रत्येक समारंभाच्या वेळी सज्ज होतं  एक सुंदर आणि रसिकतेने सजवलेलं, पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यास आतुर असलेलं घर, मित्रमंडळींच्या हास्यविनोदाने  भरलेलं  घर, एक अमेरिकेतलं  मराठी घर ! 

ह्या स्नेहसंमेलनाचं दृश्य जर शंभर वर्षांनंतर कुणी इतिहासाच्या अभ्यासकानं इलेक्ट्रॉनिक आर्काईवजमध्ये पाहिले तर त्यांना काय दिसेल? उत्तर अमेरिकेतील शांतताप्रिय, कलाप्रेमी, बुद्धिमान, समृद्ध अशा मराठी समाजातील लोक सुंदर पोशाख परिधान करून लगबगीने एका अभिरुचिपूर्ण सजावटीच्या घरात जाताहेत. प्रत्येकाच्या हातात ह्या संमेलनासाठी खास तयार केलेला पदार्थ आहे. घरातला सोहळा दारात रेखलेल्या आकर्षक रांगोळीपासून सुरू होत आहे. घरात पाहुण्यांची उत्तम सोय केलेली आहे. स्वयंपाकघरातील मेजावर विविध प्रकारच्या पारंपरिक आणि आधुनिक  खाद्यपदार्थांची आरास मांडलेली आहे. ते दृश्य शब्दांत वर्णन करणे कठीण असल्यामुळे पाहुणे मंडळी त्याचे फोटो घेऊन आप्तेष्टांना पाठवताहेत. मागील अंगणात अतिशय रसिकतेने लावलेल्या बगीच्यात पाहुण्यांसाठी बसण्याची, खाण्याची, गप्पा मारण्याची व्यवस्था केलेली आहे आणि हे गप्पिष्ट पाहुण्यांच्या पथ्यावरच पडले आहे. 

जगात या काळात गदारोळ आणि हिंसा चालू असताना हे आनंदाचं कारंजं बघून 

त्या इतिहासकारांना आपण परिकथा पाहतो आहोत, असे वाटेल. 

हे एकत्र येणे फक्त खाणे आणि गप्पा एव्हढ्यासाठीच नव्हे; तर अशा प्रसंगी कल्पकतेने योजलेले काही खेळ खेळले जातात. सामान्यज्ञान जोखणारे किंवा गुंतागुंतीच्या प्रश्नांचे आव्हान देणारे असे हे खेळ असतात. ‘Share your Inspiring thoughts’ अशी एक नवीन कल्पना प्रत्यक्षात आणली गेली अशाच एका स्नेहसंमेलनात. उत्साहवर्धक, संस्कारदायी, मनोबल वाढवणारे विचार मांडा, त्याच्यावर ऊहापोह करा असे आवाहन यजमान दांपत्याने  पाहुण्यांना केले  होते. याबाबत पूर्वसूचना  दिल्यामुळे बहुतेक लोक याविषयी विचार करुन आले होते. प्रत्येकाने समोर येऊन आपले विचार शब्दांतून, कवितांमधून, गाण्यांतून मांडले. सर्वांचीच मनःस्थिती यामुळे अधिकच उल्हसित झाली. प्रत्येकाला लोकांशी बोलण्याची संधी मिळाल्यामुळे ही केवळ एक नेहमीसारखी सामान्य पार्टी न राहता ह्या एकत्र येण्याला अर्थपूर्णता आली आणि हे संमेलन त्यामुळे जास्त संस्मरणीय झाले, ह्यात शंका नाही. 

फीनिक्समधील जुनी मराठी घरं स्थानिक लोकांसाठी तन-मन-धन खर्च करून ह्या आणि अशा अनेक छोट्यामोठ्या स्नेह-संमेलनांचे आयोजन करीत असतात. ह्या एकत्र येण्यात स्थलांतरितांचे स्मरणरंजन आहे, मैत्रीची ऊब आहे, लहानपणी भावंडांबरोबर साजऱ्या केलेल्या विविध सणांचे प्रतिबिंब आहे, नवीन परंपरांची चाहूल आहे, जुन्या-नव्यांचा संगम आहे. 

ह्या सर्व सुबत्तेत आपण जिथून आलो, त्या मातीचं आपण देणं लागतो याचंपण भान आहे. बहुतेक सर्व मंडळी सतत महाराष्ट्रात चांगल्या सार्वजनिक कामांसाठी मदत  पाठवत असतात. त्याचबरोबर ज्या भूमीला कर्मभूमी मानलं आहे त्या भूमीशीपण जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये रोग्यांसाठी पाठवलेल्या उबदार टोप्यांमुळे सिद्ध होतं. ह्या रंगीबेरंगी, सुंदर टोप्या पाठवण्याचा उपक्रम knotty knitters हा विणकामात कुशल अशा स्थानिक मराठी ललनांचा ग्रुप गेली अनेक वर्षे राबवत आहे. ह्या छंदाचा मकरंद गडचिरोलीपर्यंत पोचला आहे. तेथील डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्या SEARCH या ख्यातनाम संस्थेलाही अशाच रंगीबेरंगी टोप्या पाठविण्यात आल्या. तसेच गावातील अनेक संस्थांना ह्या सेवाभावी आणि प्रसिद्धिपराङ्मुख  अशा व्यक्तींकडून टोप्यांसकट सुंदर ब्लँकेट्स, शाली, सेलफोनची आवरणे इत्यादी अनेक उपयोगी गोष्टी कुठलाही गाजावाजा न करता पाठवल्या जातात. आमच्या मराठी गावात  कुणी आजारी आहे, एकटे आहे असे कळल्याबरोबर त्या व्यक्तीला मदत करणाऱ्यांची साखळीच तयार होते. असे हे उत्साहाने सळसळणारे फीनिक्स शहरात वसलेले एक मराठी गाव…अमेरिकेतील मराठी गावांचे प्रतिनिधित्व करणारे!

हा जगण्याचा उत्साह, सरस्वती आणि लक्ष्मीचा अनोखा मेळ, समाजात असणारा एकमेकांना व गरजवंतांना मदत करण्याचा एक अलिखित करार, आजूबाजूच्यांना  आपल्या आदर्श वर्तणुकीमुळे दिला जाणारा शांततामय व समंजस सहअस्तित्वाचा संदेश आणि शैक्षणिक क्षेत्रात चमकणारी नवी पिढी… मराठी माणसाला ही एक नवीन प्रकारची श्रीमंती गवसली आहे, यात शंका नाही.

विदेशात मेहनतीने मिळवलेली कृतार्थ संपन्नता हीच आमची पोषक माती! याच अमेरिकेतल्या ‘मराठी’ मातीत आता कित्येक मुळे रुजली आहेत, कित्येक झाडे  आत्मविश्वासाने  बहरली आहेत… आणि आता स्थलांतरित हा शब्दप्रयोग  अंधुक होत चालला आहे. 

.

Author

Leave a Reply