पुनरपि जननं : प्रकरण दहावे 

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. 

ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :

हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली.  तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल. 

एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल. 

जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’  या नावाने केले आहे. हे भाषांतर   क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण दहावे 

 – संपादक

पुनरपि जननं

प्रकरण दहावे

उड्डाण

 रात्रीच लावून ठेवलेल्या आणि सुरेल संगीताच्या आवाजात वाजणाऱ्या गजराने अमर जागा झाला. क्षितिजावर नुकतीच पहाट उगवत होती. अंथरुणातून उठून अमर चालत बागेत आला. इतक्या पहाटे आकाशात कुणीच उडताना दिसत नव्हतं. केंद्रीय इमारतीच्या घुमटाच्या पलीकडे अमरने नजर टाकली. त्या इमारतीत कुठेतरी एक स्क्रीन होता ज्यावर पृथ्वीवर जाणाऱ्या दलाची निवड करणाऱ्या चाचण्यांचा निकाल होता. त्याचा स्वतःचाच मुलगा मोहिमेचे प्रशिक्षण घेणारा उमेदवार असल्याने प्रकल्पाच्या केंद्रीय मंडळाचा सदस्य असूनही अमर निवड प्रक्रियेपासून पूर्णपणे अलिप्त होता. तेच योग्य होतं हे अमरला माहीत होतं; पण काल रात्री साल्चरने थोडी कल्पना द्यायला हवी होती म्हणजे रात्रभर आपल्याला एवढी काळजी वाटली नसती, असंही अमरला वाटत होतं. सकाळी  नऊ वाजायच्या आधी निकाल जाहीर होणार नाही हे अमरला माहीत होतं. आणखी तीन तास त्याला वाट पाहावी लागणार होती. 
      रवीचा लख्ख प्रकाश त्याच्या बागेत पडला तोपर्यंत अमरची आंघोळ आणि प्राशन झाले होते. तो आपल्या घरासमोरच्या हिरवळीवर आला आणि गुडघा टेकून, पंख पसरून ऊन्ह खाऊ लागला. मन एकाग्र करून प्रार्थना करण्याचा त्याने प्रयत्न केला पण त्याला ते शक्य होई ना. उन्नयनपूर्व मानवासारखे अधाशीपणे ऊन्ह खाल्ल्याबद्दल त्याला अपराधी वाटले. एका गुडघ्यावरून दुसऱ्या गुडघ्यावर स्वतःचे वजन पेलत आणखी अर्धा तास तो तसाच बसून राहिला. पंखांत शक्तीचा पुरेसा संचार झाला आहे असं वाटताच तो गडबडीने आत गेला आणि जयंतचा फोन आला की लगेच घेता यावा म्हणून त्याने कॉम जवळच ठेवला. त्याचा कामाचा रुपेरी पडदा झळकताच त्याने पृथ्वी प्रकल्पाची वेबसाइट उघडली. आता कोणत्याही क्षणी निकाल जाहीर होईल अशी त्याला अपेक्षा होती. आपण आपल्या भित्र्या काईजा मित्रासारखं वागतो आहोत हे लक्षात येऊन अमर स्वतःशीच हसला. 

      बराच वेळ गेला तरी त्याचा कॉम वाजला नाही. आणखी दहा मिनिटं झाली आणि त्याला जेव्हा काळजी सहन होई ना, तेव्हा त्याने नताशाला फोन  लावला,

    “जयंतचा फोन आला का? अजून निकाल नाही लागला का?”

    “निकाल लागला. त्याची निवड नाही झाली,” नताशाचा थंड आवाज पलीकडून आला. 

    “काय? माझ्या स्वतःच्या मुलाची निवड नाही झाली? ते कसं शक्य आहे?”

    “हा प्रश्न तू साल्चरला विचारायला हवास. जयंतने खूप मेहनत घेऊन तयारी केली होती. तो पार हताश झाला आहे.”

    “पण, एक मिनीट! तुला हे सगळं कसं माहिती आहे? तू बोललीस का त्याच्याशी? मला त्याने कॉल का नाही केला?”

    “कारण त्याला असं वाटत आहे, की आपण निःपक्षपाती आहोत असं दाखवण्यासाठी साल्चरने मुद्दामच त्याची निवड नाही केली. जयंतची जेव्हा शिकाऊ उमेदवार म्हणून निवड झाली होती तेव्हा तू प्रकल्प सोडून द्यायला हवा होतास अमर. त्यामुळे जयंतची निवड होण्याची शक्यता वाढली असती.”

     “माझ्यामुळे त्याची निवड नाही झाली असं तुला वाटतंय? या असल्या गोष्टींचं साल्चरला काहीच महत्त्व वाटत नाही. त्याला फक्त सर्वांत उत्कृष्ट असं पथक हवं आहे.”

“म्हणजे जयंत उत्कृष्ट नाही असं तुला वाटतं का? निवड करणाऱ्या समितीला तूच काहीतरी बोलला असशील.”

 “ओह, प्लीज नताशा! निवड करणाऱ्या समितीशी माझा काहीएक संबंध नाही हे तुला माहिती आहे.”

 “तरी पण तू प्रकल्पातच आहेस. राजीनामा देऊन तू त्यांच्यावर दबाव आणायला हवा होतास.”

 “नताशा, मी या प्रकल्पात गेली तेरा वर्षं काम करतो आहे. आपल्या पालक कराराचा बहुतेक काळ मी इथेच होतो. प्रकल्पाच्या आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना माझी किती ओढाताण होत होती ते तुला आठवत नाही का?”

“हो, जयंत लहान होता आणि तुझी त्याला गरज होती तेव्हा तू घरी नसायचास आणि आता केंद्रीय मंडळाचा सदस्य होऊन तू त्याच्या आयुष्यात चालून आलेली संधी वाया घालवलीस.”

किती चूक होतं हे! नताशा आपला राग त्याच्यावर काढत होती… पण कसं शक्य होतं हे? जयंत पथकात नसणार?

______________________________________________________________________________________________

  आपल्या झोपलेल्या लेकीकडे बघून आईला खोलवर खूप दुःख झालं. दोन दिवसांपूर्वी अकादमीतून आल्यापासून आरुषी फार सैरभैर झाली होती. तिची झोप उडाली होती, तिला प्राशन करण्याची इच्छा नव्हती आणि तिच्यात उडण्याची आजिबात शक्ती नव्हती. अपेक्षाभंगाचा आघात तिला सहन करता यावा म्हणून आई आपल्या परीने प्रयत्न करत होती आणि तिला शक्य तितकं प्रोत्साहन देत होती. आरुषीने कोणते क्षेत्र निवडावे यावर चर्चा करण्यासाठी संध्याकाळी त्यांची एका करियर मार्गदर्शकाबरोबर भेट ठरली होती. पपा काल येऊन भेटला होता आणि त्याचा तटस्थपणा बघून आरुषीला आणखी वैताग आला होता. तीन दिवस अस्वस्थपणा, निराशा आणि रडण्यात घालवल्यावर आता कुठे तिचा डोळा लागला होता. क्षणभर चिंता विसरून तिला पेंग येईपर्यंत आईने तिचे लांब रेशमी केस हळुवारपणे विंचरले होते. 

       तिच्या अपेक्षाभंगाच्या दुःखात सहभागी असल्याने आईलादेखील तीन दिवस जागरण झालं होतं. पण आता लेक झोपलेली असताना आई तिच्यावर मायेने लक्ष ठेवून होती. आपल्या लेकीला आयुष्यात न्याय मिळणार का नाही याचा विचार करत होती. पृथ्वी प्रकल्पासाठी आरुषी योग्य उमेदवार होती असा तिला विश्वास होता आणि तरीही तिची निवड झालेली नव्हती. अकरा वर्षं तिच्याशी ताटातूट नाही होणार एवढा एकच त्या परिस्थितीत दिलासा होता; पण ज्यामुळे आरुषीला निराशा होईल अशी कोणतीच गोष्ट आईला समाधान देऊ शकत नव्हती. कदाचित आणखी दहा वर्षांनी आरुषीला ही संधी वाया गेल्याचं दुःख इतकं होणार नाही. कदाचित तोपर्यंत ती इतर कोणत्यातरी मार्गाने यशस्वी झालेली असेल आणि आनंदी असेल. आईला तसा विश्वासच होता. ती शक्यता साकार करणं ही आई म्हणून तिची जबाबदारी होती. आताच्या या निराशेतून बाहेर येण्यास आरुषी जोपर्यंत धडपडत राहील तोपर्यंत तिला आधार देणं हे तिचं कर्तव्य होतं.

     आरुषीच्या खोलीतून आई बाहेर पडत होती, इतक्यात आरुषीचा कॉम वाजला. आईने प्रतिक्षिप्त क्रियेने तो झट्कन उचलून आरुषीची झोपमोड होऊ नये म्हणून त्याचा बझर बंद केला. पण अकादमीचा नंबर स्क्रीनवर झळकताना पाहून तिला आश्चर्य वाटलं. तिला समजेना, की इतक्या उशिरा अकादमी आरुषीला कशाला फोन करते आहे? कदाचित आरुषी काहीतरी महत्त्वाची वस्तू तिथे विसरून आली असेल आणि त्यांना त्याबद्दल तिला विचारायचे असेल. त्यांचा कॉल घ्यावा का नाही अशा संभ्रमात ती पडली. 

      तिने स्क्रीन स्वाइप केला आणि पलीकडून सायबॉर्गचा असावा तसा आवाज आला. 

  “हे शामियाम अकादमीच्या संचालिकेचे ऑफिस आहे. संचालकांना आरुषी सिंग यांच्याशी बोलायचे आहे.”

 “मी आरुषीची आई बोलते आहे. तीन दिवस अस्वस्थपणे काढल्यानंतर आता कुठे आरुषीला गाढ झोप लागली आहे. फारच तातडीचं काम असल्याशिवाय तिला जागं करायला नको असं मला वाटतं.”

 “प्लीज होल्ड करा मॅडम, मी संचालिकांना विचारतो.”

 संचालिका स्वतः कॉल करत आहेत म्हणजे हा काही साध्यासुध्या कारणासाठी केलेला कॉल नाही हे आतापर्यंत आईच्या लक्षात आलं होतं. 

“फारच महत्त्वाचं काम आहे मॅडम आणि तुम्ही आपल्या लेकीला जागं करावं अशी तुम्हांला विनंती आहे. संचालिकांना आत्ताच तिच्याशी बोलायचं आहे.”

तरीपण आईला काही ते कारण पटलं नाही. इतक्या मुश्किलीने लाभलेली लेकीची विश्रांती मोडायला आणि तिला संचालकांशी बोलायला लावायला आईचं मन तयार होईना. अनेक शक्यता तिच्या मनात डोकावून गेल्या. परीक्षेसंबंधी काही काम होतं का? अकादमीतून निघण्यापूर्वी काही करायचं आरुषी विसरली होती का? किंवा तिने केलेल्या एखाद्या प्रोजेक्टविषयी त्यांना अधिक माहिती हवी होती का?

तिने पुन्हा ऑपरेटरला सांगायचा प्रयत्न केला. “संचालिका माझ्याशी बोलतील का? आरुषी उठल्या उठल्या मी तिला त्यांचा निरोप सांगेन.”

पण या खेपेस स्वतः संचालिका लाइनवर आल्या. त्यांचा आनंदी चेहरा स्क्रीनवर झळकला आणि त्यांनी हसून आईला अभिवादन केलं.

“काळजी करू नका, मॅडम, कितीही दमली असली तरी कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्याचं प्रशिक्षण तुमच्या लेकीला दिलं गेलं आहे. प्लीज जागं करा तिला. एक आनंदाची बातमी आहे आणि मला ती प्रत्यक्ष तिलाच सांगायची आहे.”

आता आईकडे इलाजच उरला नाही. तिने हळूच आरुषीच्या खांद्याला हलवून तिला जागे केले. 

      “ऊठ बिट्टू. तुझ्या अकादमीच्या संचालिकांचा कॉल आहे. त्यांना काहीतरी तातडीने तुला सांगायचं आहे.”

काहीच लक्षात न येणाऱ्या डोळ्यांनी आधी आरुषीने तिच्याकडे बघितलं, पण मग लगेचच परिस्थिती तिच्या लक्षात आली. आई खोलीतून बाहेर आली आणि आरुषीने संचालिकांना अभिवादन केलं. 

“तुझी झोपमोड केल्याबद्दल सॉरी आरुषी, पण तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. पृथ्वी प्रकल्पाने तुला त्यांच्या पृथ्वीवर जाणाऱ्या पथकाची सदस्य होण्याची विनंती केली आहे. तुला ती स्वीकारायला आवडेल?”

“काय…? आत्ता…? खरंच? अर्थातच! पण कसं काय…”

“प्रकल्पासाठी आवश्यक असे गुण विचारात घेऊन पथकाची निवड करण्यात आली होती. परीक्षेत बहुतेक सगळ्यांनीच उत्तम अंक मिळवले होते. निवड करणं फार अवघड होतं. प्रकल्पासाठी आवश्यक ते कौशल्य आणि शारीरिक क्षमता हे निकष मनात ठेवून निवड करण्यात आली होती. निवड समितीला आता असं वाटतं आहे की तुझ्यात जे कौशल्य आहे त्याची प्रकल्पासाठी आवश्यकता आहे आणि म्हणून सोळावी सदस्य म्हणून तुला पथकात सामील करण्याचं त्यांनी ठरवलं आहे.”

  “खरंच? ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे. मला तर स्वप्नात असल्यासारखं वाटतं आहे.”

“आरुषी, तुला ताबडतोब प्रकल्पाच्या केंद्रात हजर राहावं लागेल. तू कृपया केंद्रीय आण्विक प्रयोगशाळेत जाऊन डॉक्टर फ्रांस्का टोरी यांना भेट. माझ्या ऑफिसकडून तुला रीतसर संदेश आणि पुढच्या सूचना मिळतील.”

कॉम बंद झाल्याझाल्या आरुषी उडी मारून आपल्या खोलीतून बाहेर आली आणि तिने जाऊन आईला मिठी मारली. आईच्या चेहऱ्यावरही तिचा आनंद परावर्तित झालेला दिसत होता.

“काय बातमी आहे बिट्टू?”

“मी टीममध्ये आहे, आई. त्यांनी शेवटी माझी निवड केली. मी चालले पृथ्वीवर!”

त्या बातमीने आई तर भारावूनच गेली. डोळ्यांतून पाणी वाहत असतानाच तिने आपल्या लेकीला घट्ट पोटाशी धरलं. लेकीची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली म्हणून तिला फार आनंद झाला होता; पण त्याच वेळी, या बातमीचा प्रचंड आवाकादेखील तिला जाणवत होता. तिची लाडकी लेक, तिच्या पोटचा गोळा आणि तिच्याच मनाचा अंश, एका दुसऱ्या तारामंडळाच्या दूरच्या प्रवासाला जाणार, मानवाने कित्येक वर्षांपूर्वी त्यागलेल्या ग्रहावर जाणार, पूर्वी कोणीही कधीही न केलेल्या प्रवासाला जाणार… 

 तिने आरुषीचा चेहरा आपल्या ओंजळीत घेतला. 

 “तू अकरा वर्षांसाठी निघून जाणार! आणि तेसुद्धा इतक्या दूर.”

“काळजी करू नकोस आई, त्या काळात मी फक्त तीन वर्षांनी मोठी होईन आणि मी तुला संदेश पाठवत राहीन. आम्हांला सांगितलं होतं की ते शक्य आहे.”

“कधी जावं लागणार आहे तुला?”

“मला झेरुआ पर्वतावरच्या केंद्रीय आण्विक प्रयोगशाळेत असलेल्या प्रकल्पाच्या केंद्रात ताबडतोब हजर राहायचं आहे. पृथ्वीच्या प्रवासाची सुरुवात अर्थातच पुढच्या महिन्यात होणार आहे.”

आईने आरुषीच्या कपाळाचा पापा घेतला. आतापर्यंत जी केवळ एक आकर्षक शक्यता होती तिचं गेल्या काही क्षणांतच एका प्रचंड वास्तवात रूपांतर झालं होतं. गेली पाच वर्षं जरी आईने आरुषीच्या पृथ्वी प्रकल्पात सहभागी होण्याचं समर्थन केलं असलं तरी आता प्रत्यक्ष ती वेळ येऊन ठेपल्यावर तिला स्वतःच्याच त्या निर्णयाची खातरी वाटेना. आरुषीचा पपा आता काय म्हणेल? लेकीला अज्ञातात उडी घेऊ दिल्याबद्दल तो तिलाच दोष देईल…  

         पण आता त्या बातमीने सुरू केलेली प्रक्रिया आपोआप वेग घेऊ लागली होती. ज्या गतीने पुढच्या घटना घडत होत्या त्यावर तिचा काहीच ताबा नसल्याने आईला असहाय वाटू लागलं. 

         आरुषीच्या झेरुआ पर्वताच्या प्रवासाची तयारी करण्यात पुढचा अर्धा तास गेला. आरुषी इतक्या उत्साहात होती, की तिचे पंख एकसारखे फडफडत होते आणि आपल्या वस्तू गोळा करत ती एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सारखी पळापळ करत होती. वाटेत आई आली तर तिला मिठी मारत होती आणि आईने तिचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला तर नुसती हसत होती. तिची गेल्या तीन दिवसांची मरगळ आणि निराशा कुठच्या कुठे पळून गेली होती. प्रवासाची तिकिटं काढून आणि अकादमीकडून आलेल्या सूचना वाचून झाल्यावर शेवटी आईचा निरोप घेण्याची वेळ आली. 

 तिन्हीसांज झाली होती आणि आरुषी झेरुआ पर्वतावर पोचेपर्यंत मध्यरात्र उलटून जाणार होती. डॉक्टर फ्रांस्का टोरी यांच्यासाठी निरोप ठेवून पुढच्या सूचनांसाठी तिला सकाळपर्यंत वाट पाहावी लागणार होती. शेवटी सगळी तयारी झाल्यावर आईने आरुषीला प्राशनाच्या टेबलाशी बसवलं आणि तिच्या आवडीच्या पेयाचा एक मोठा ग्लास भरला. 

“बिट्टू, हे तुझं घरातलं शेवटचं प्राशन आहे. पुढची अकरा वर्षं, तू माझ्याकडे परत येण्याची मी वाट पाहीन. यशस्वी हो आणि आनंदात राहा. तब्येतीची हेळसांड करू नको आणि कुणाचं मन दुखवू नको. एक चांगली मानव हो. तुझं उड्डाण होण्यापूर्वी मी आणि पपा प्रकल्पाच्या मुख्यालयात येऊन तुला भेटू. आम्ही कधी यावं ते कळव.”

आरुषी घटाघटा आपलं पेय प्यायली, तिने आईला शेवटची मिठी मारली आणि झिप्परमध्ये बसून विमानतळाकडे निघाली. 

_____________________________________________________________________________________________

 ध्वनीपेक्षा वेगाने जाणारं जेट विमान आकाशातून एखाद्या प्रकाशमान उल्केसारखं चाललं होतं आणि आरुषी इतक्या उत्साहात होती, की तिला झोप येणं शक्यच नव्हतं. अवकाशातून प्रवास करताना घालायचा अंगाबरोबर असणारा स्पेस सूट घालून आपण फुग्यात प्रवेश करतो आहोत अशी ती कल्पना करत होती. अवकाशयानाच्या प्रतिकृतीत आणि फ्लाईट सिम्युलेटरवर केलेली अनेक प्रशिक्षण सत्रं तिला आठवली. वर्षभर चालणारा अवकाशातून होणारा प्रवास कसा होईल याचा ती विचार करू लागली. तो एक वर्षाचा कालावधी ती  अवकाशयानाच्या अत्यंत मर्यादित जागेत पथकाच्या इतर पंधरा सदस्यांबरोबर घालवणार होती. बहुतेक इतर सदस्यांशी तिची जुजबी मैत्री होती. निवडलेल्या पथकाच्या यादीतील सगळी नावं आठवायचा तिने प्रयत्न केला. शेवटच्या क्षणी जयंतला पण पथकात सामील होण्याचं निमंत्रण मिळालं असेल का? नसेल बहुतेक. ती स्वतः पथकाची सोळावी सदस्य म्हणून सामील होणार असं संचालिका म्हणाल्या. जयंतची पण जर निवड झाली असती तर संचालिका त्याबद्दल काही बोलल्या असत्या. जयंतला फोन करून या सगळ्या नव्या घडामोडींबद्दल सांगायला हवं. पण काय सांगणार? दोन दिवसांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा निकाल जाहीर झाला तेव्हा त्याची किती निराशा झाली होती… आणि तिचीही निराशा झाली आहे हे त्याच्या गावीही नव्हतं. त्याच्या तशा विचित्र वागण्याने तिच्या निराशेचं दुःख अधिक बळावलं होतं. 

            झेरुआ पर्वताच्या विमानतळावर पोचल्यावर ती झिप्पर मधून आण्विक प्रयोगशाळेत पोचली. प्रयोगशाळेच्या उत्तुंग कमानीतून झिप्पर जेव्हा आत शिरली तेव्हा ती शांत, विस्तृत आणि स्वयंप्रकाशी झुडुपांनी पदपथ उजळलेली बाग पाहून आरुषीला प्रसन्न वाटलं. झाडांच्या वर रात्रीचे दिवे तरंगत होते आणि ती झिप्परमधून उतरताच त्यांनी तिच्या डोक्यावर दाटी केली. ती स्वागत कक्षाच्या दिशेने चालू लागली आणि तिची सूटकेस तिच्यामागून येऊ लागली. 

           ड्यूटीवर असलेल्या सायबॉर्गला तिचं येणं अपेक्षितच होतं. त्याने तिला मायटोकॉनड्रिया गेस्टहाऊसमध्ये तिची राहण्याची व्यवस्था केली असल्याचं सांगितलं. खोलीत जाऊन स्थिरस्थावर झाल्यावर तिने आपण पोचल्याचा आईला आणि पपाला संदेश पाठवला आणि मग जयंतला फोन करावा का याचा ती विचार करत बसली. तो कदाचित अजून जागा असेल. पण मग तिने सकाळपर्यंत तो कॉल टाळायचं ठरवलं. आपण अखेर पृथ्वीवर जाणार या वस्तुस्थितीचा आज आनंद घ्यायचं तिने ठरवलं. पृथ्वीवर जाणाऱ्या पथकाची ती सदस्य होती! तो प्राचीन ग्रह ती प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहणार होती…

_____________________________________________________________________________________________

 “तूच का पथकात सामील होणारी नवीन मुलगी?” सकाळी आपल्या ऑफिसात आरुषीचं स्वागत करत फ्रांस्का म्हणाली. “पथकातील बाकी मुलं तीन दिवसांपूर्वीच इथे आली आणि त्यांची स्वागत आणि माहिती देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मी तुला पटकन ते सगळं सांगते म्हणजे तू बाकीच्यांच्या बरोबरीने येशील.”

        मग फ्रांस्का आरुषीला पृथ्वी प्रकल्पाच्या सगळ्या ऑफिसांत घेऊन गेली आणि प्रकल्पावर काम करणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांची तिने ओळख करून दिली. त्यांपैकी काही जण यापूर्वी शिकाऊ दलाला प्रशिक्षण देण्यासाठी तिच्या अकादमीत आणि आकाशगंगा प्रवास केंद्रात येऊन गेले होते आणि आरुषी त्यांना भेटली होती. त्यानंतर फ्रांस्का तिला प्रकल्पाच्या केंद्रीय मंडळाला भेटायला घेऊन गेली.

       “हा अमर, आमचा प्रमुख आण्विक शास्त्रज्ञ,” फ्रांस्काने जयंतच्या वडिलांची ओळख करून दिली, 

“आणि ही आपल्या दलाची सोळावी सदस्य आरुषी सिंग.”

       आरुषीला अर्थातच ही भेट अपेक्षित होती. 

       “आरुषीला मी चांगलं ओळखतो. मी एडनमध्ये राहत होतो तेव्हा तिचे आई-वडील माझे मित्रच होते,” अमर फ्रांस्काला म्हणाला. 

“जयंतची निवड नाही झाली याचं वाईट वाटतं,” आरुषी अवघडून म्हणाली.

“मला ही त्याचं वाईट वाटलं,” त्याचे वडील म्हणाले. “हा निर्णय स्वीकारणं अवघड जातं आहे त्याला.”

संध्याकाळी जयंतला फोन करायचा असं आरुषीने लगेच ठरवून टाकलं. आणखी चालढकल करणं योग्य होणार नाही. तिची निवड झाली आहे हे त्याला त्याच्या वडिलांकडून समजणारच. 

उड्डाणापूर्वीच्या शेवटच्या महिन्याच्या सूचनांचं पत्रक फ्रांस्काने आरुषीला दिलं. त्यात उड्डाणापूर्वीची काउंट डाउन प्रक्रिया, शेवटचे काही दिवस पथकाच्या सदस्यांनी इतरांशी न मिसळता वेगळं राहण्याविषयीच्या सूचना आणि तत्संबंधी इतर माहिती एका छोट्याशा इलेक्ट्रॉनिक कागदावर होती आणि मग ती तिला पथकातील इतर सदस्यांना भेटायला घेऊन गेली. 

        “उरलेला दिवस तुझ्यासाठी मोकळा आहे. आण्विक प्रयोगशाळेचं आवार तू फिरून पाहू शकतेस. इथे आमच्या बागा खूप सुंदर आहेत. उद्या सकाळी साल्चर विंडार पथकाच्या सगळ्या सदस्यांसमोर भाषण देईल. तो स्वतः इथे उपस्थित असेल. त्यापुढचे सतरा दिवस तुम्ही सगळे पत्रकात दिलेली दिनचर्या पाळाल. मग तुम्हांला आपल्या कुटुंबातील लोकांना भेटायला एक दिवस मोकळा मिळेल. त्यानंतर तुम्हांला वेगळं राहावं लागेल आणि तुम्हांला प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधांचे शेवटचे डोस दिले जातील. तुम्हां सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्हांला इथलं वास्तव्य आवडेल अशी आशा आहे,” एवढं बोलून फ्रांस्का निघून गेली आणि पथकाच्या इतर सदस्यांनी आरुषीचं अभिनंदन करून स्वागत केलं. उरलेली संध्याकाळ प्राशन करण्यात आणि एकमेकांच्या ओळखी करून घेण्यात गेली. त्या आठ मुलांशी आणि सात मुलींशी आरुषीचं चांगलं जुळलं. पुढची तीन वर्षं ते सगळे एकत्र काम करणार होते, अवकाशाचे यात्रेकरू असणार होते, ते तारामंडळ ओलांडून एका अनोळखी स्थानाकडे प्रवास करणार होते. एकत्र प्राशन करताना त्या संध्याकाळी मैत्रीचे धागेदोरे घट्ट झाले. त्या पथकात आण्विक शास्त्राचे चार तज्ज्ञ होते, ऊर्जा आणि चुंबकीय क्षेत्राचे विशेष ज्ञान असणारे तिघेजण होते : दोन मेकॅनिकल इंजिनियर, खगोलशास्त्र आणि रेडिओ लहरींवरून संदेश पाठविण्याच्या शास्त्रात तज्ज्ञ असणारे दोघे होते, दोन जीवशास्त्रज्ञ होते, ग्रहशास्त्रात पारंगत असणारी एक व्यक्ती होती, दळणवळणाच्या क्षेत्रात पारंगत एक व्यक्ती होती आणि ती स्वतः कॉंप्युटेशनिस्ट होती. ती संध्याकाळ खूप खेळीमेळीत आणि प्रकल्प आणि त्यातील अनिश्चितता यांची चेष्टा करण्यात गेली. त्या दिवशी संध्याकाळी उशिरा आरुषीने जयंतच्या कॉमवर फोन लावला. या वेळेस त्याच्या आवाजात तिला तितका विषाद नाही जाणवला, फक्त निराशा मात्र होती. 

“मला प्रकल्पामधून बोलावणं आलं जयंत, त्यांनी मला पथकात सामील होण्यास सांगितलं.”

“काय सांगतेस, आरुषी! अभिनंदन! मला नेहमीच वाटायचं, की तुझी निवड होईल.”

        “थँक्स! तू पण पथकात असायला हवा होतास.”

        “तू कुठे आहेस आता?”

        “मी प्रकल्पाच्या मुख्य केंद्रात आहे. काल रात्री आले इथे.”

        “चला, छान झालं! तू नशीबवान आहेस. काल मी इतका वैतागलो होतो त्याबद्दल सॉरी. म्हणजे, माझी खूपच निराशा झाली आहे, पण कदाचित त्यासाठी मी माझ्या वडिलांना दोष देणं योग्य नाही.”

        “मी भेटले आज त्यांना आण्विक प्रयोगशाळेत.”

        जयंतने संभाषण आवरतं घेतलं. “मी येऊन भेटेन तुला कधीतरी आरुषी, तू निघण्यापूर्वी. बाय!”

        पण जयंत आलाच नाही, आरुषी मात्र रोज त्याची वाट बघत राहिली.

______________________________________________________________________________________________

 सकाळच्या प्रार्थनेसाठी जेव्हा पथकाचे सदस्य गोळा झाले तेव्हा काल संध्याकाळच्या चेष्टेच्या आणि गमतीच्या वागण्याचा मागमूसही उरला नव्हता. पथकाचे गणवेश घातलेली आणि केस व्यवस्थित विंचरून मागे वळवलेली वीस वर्षांची ती मुलंमुली आपल्या वयापेक्षा जास्तच मोठी वाटत होती. तयारीचा शेवटचा टप्पा सुरू झाल्याने, जे ध्येय साकारण्यास ते निघणार होते त्याला साजेसं गांभीर्य त्यांच्या ठिकाणी भासत होतं आणि ती जबाबदारी पेलण्यास ते समर्थ दिसत होते. 

        आण्विक प्रयोगशाळेच्या हिरवळीवर ते सोळा जण गुडघे टेकून वर्तुळाकार बसले. हात जोडून आणि पंख पसरून ते ताऱ्याचा प्रकाश शोषून घेऊ लागले. विश्वात अगणित रूपांनी प्रकटलेल्या आद्य शक्तीवर त्यांनी मन एकाग्र केलं. ज्या शक्तीने त्यांचा तारा, त्यांचा ग्रह आणि स्वतः त्यांना निर्माण केलं होतं आणि दूरच्या भविष्यकाळात कधीतरी हा विश्वाचा पसारा नष्ट होईपर्यंत ते विश्व कार्यरत ठेवणारी ती शक्ती! प्रत्येक उन्नत मनुष्य याच शक्तीची प्रार्थना करत असे. त्याचा विश्वास होता, की हीच शक्ती त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि प्रतिभेला चालना देत होती. 

        अर्ध्या तासाने प्रकल्पाच्या केंद्रीय मंडळाबरोबर साल्चर तिथे आला. त्याने या प्रकल्पाची कल्पना मांडली त्याला आता वीस वर्षं झाली होती आणि तो प्रकल्प मंजूर होऊन त्यावर काम सुरू झाले त्याला सतरा वर्षं झाली होती. पृथ्वीपर्यंतचा तो लांबचा प्रवास करणारं पथक प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याचं हृदय आनंदाने उचंबळून आलं. त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. अर्धवर्तुळाकार करून उभ्या राहिलेल्या पथकाच्या सदस्यांना उद्देशून ते म्हणाला :

       “मुलांनो, पृथ्वी प्रकल्पाच्या पथकात तुमची निवड झाल्याबद्दल अभिनंदन! माझ्यासाठी पुढची अकरा वर्षं आणि तुमच्या दृष्टीने तीन वर्षं, तुम्ही माझे डोळे आणि कान व्हाल. तुमच्या पंखांवर तुम्ही माझा हा प्रकल्प पेलून धराल आणि पृथ्वीवर तुम्ही ज्या क्षणी उतराल तेव्हापासून या प्रकल्पाला तुम्ही आकार द्याल. या प्रकल्पाचं उद्दिष्ट तुम्हां सर्वांना ठाऊक आहे आणि तुमच्या चाचणी परीक्षेतील तुमची कामगिरी पाहता तुम्हांला सगळ्यांना त्यात किती रस आहे आणि प्रकल्पावर तुमची किती निष्ठा आहे हे उघड आहे. तुमच्यापैकी प्रत्येकावर सोपवलेल्या कार्यासाठी तुम्हांला शुभेच्छा आणि हा प्रकल्प ज्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधेल अशी आशा आहे ती शोधण्यात तुम्हांला यश लाभो. 

        या मोहिमेत तुम्हांला जे कष्ट होतील त्यांची मला पूर्ण कल्पना आहे. तारामंडळाच्या पलीकडे प्रवास करणं आपल्या संस्कृतीला काही नवीन नाही; तरीदेखील असा प्रत्येक प्रवास अंतराळातील संकटांवर मात केल्यामुळे एक मोठी यशस्वी कामगिरी असते. मानवी शरीर नाजूक असतं; पण मानवी बुद्धीची कार्यशक्ती असीमित असते. तुमची शरीरं सुरक्षित ठेवण्यासाठी आकाशगंगा प्रवास केंद्रातील शास्त्रज्ञांनी तुम्हांला शक्य तितकं उत्तम तंत्रज्ञान दिलं आहे. प्रकल्पाच्या मुख्यालयातील शास्त्रज्ञांनी तयार केलेले पृथ्वीवर करण्याच्या प्रयोगांचे आराखडे तुमच्या बुद्धीला मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधण्यास मदत करतील.

        ही अशी पहिलीच मोहीम आहे, ज्यात माणूस आपल्या प्राचीन जगाकडे परत जातो आहे. पृथ्वीवर तुम्हांला कसलं वातावरण मिळेल ते निश्चितपणे सांगता येत नाही. स्वतःची काळजी घ्या माझ्या बाळांनो आणि निसर्गाच्या नियमांचा आदर करा. तुमचे आईवडील आणि मित्रपरिवार ज्या आतुरतेने तुमची वाट पाहतील त्याच आतुरतेने मीदेखील तुमची वाट पाहीन. विश्वातील परम शक्ती संकटात तुमचे रक्षण करो आणि तुम्हांला यशाचा मार्ग दाखवो. तुम्हां सर्वांना शुभेच्छा!”

       पथकासमोर केलेल्या साल्चरच्या या भाषणाने काउंट डाउनपूर्वीच्या तयारीच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात झाली. पथकाचे सदस्य रोज स्पेस सूट आणि पृथ्वीवर सुरक्षा कवच म्हणून वापरायचे फुगे घालून सराव करत होते. अवकाशयानातील अडचणींचा सराव करण्यासाठी आणि आपापली साधनसामग्री नियोजित कप्प्यांमध्ये व्यवस्थित लावून ठेवण्यासाठी ते दिवसाचा बराच वेळ यानात घालवत होते. पंखांचा व्यायाम करण्यासाठी ते अनेक तास उडत होते कारण प्रवासाच्या संपूर्ण एक वर्षाच्या काळात त्यांना उडण्याची संधी मिळणं शक्य नव्हतं. पृथ्वीवर प्रत्येकाने करायच्या कामांची आणि प्रयोगांची रंगीत तालीमदेखील करण्यात आली. त्यांच्यापैकी जे इंजिनियर्स होते त्यांना पृथ्वीवर राहण्यासाठी निवासस्थाने बांधायची होती आणि घड्या घालून बरोबर नेलेले भाग वापरून जमिनीवर चालणाऱ्या गाड्या आणि एक विमान तयार करायचं होतं. खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीवर वापरण्यासाठी आणि अवकाशातून पाठवायच्या संदेशांसाठी यंत्रणा उभी करायची होती. जीवशास्त्रज्ञांना मोहिमेच्या संपूर्ण अवधीत पथकातील सदस्यांच्या आरोग्याचं नियंत्रण करायचं होतं आणि आण्विक जीवशास्त्रज्ञांना अर्थातच पृथ्वीवरील अंतिम युद्धातून वाचलेल्या किंवा त्यानंतर निर्माण झालेल्या प्राण्यांवर आणि वनस्पतींवर संशोधन करायचं होतं. सूक्ष्म जीवाणूंचे नमुने गोळा करून पृथ्वीवर उभारलेल्या तात्पुरत्या प्रयोगशाळांमध्ये त्यांवर प्रयोग करायचे होते. 

          पृथ्वी मोहिमेच्या पथकात तिची निवड का झाली त्याचं खरं कारण आता आरुषीला कळलं. एक कॉंप्युटेशनिस्ट म्हणून नव्हे तर तिच्या प्राचीन इतिहासाच्या ज्ञानामुळे पथकात तिला स्थान मिळालं होतं. पृथ्वीवरील वास्तव्यात त्यांना प्राचीन इतिहासाचे जे अवशेष सापडतील त्यांचा अभ्यास करण्याचं काम तिच्याकडे होतं. हे जरी पृथ्वी प्रकल्पाचं मूळ उद्दिष्ट नव्हतं तरी केंद्रीय मंडळाच्या काही सदस्यांना असं वाटत होतं, की मानव जातीच्या विनाशाचा जो काही पुरावा सापडेल त्याचा अभ्यास करणं आवश्यक होतं. स्वर्गावरच्या अनेक लोकांच्या मते प्राचीन संस्कृतीच्या काही खुणा मानवाने त्याग केलेल्या त्या ग्रहावर अजूनही सापडू शकतील आणि त्या प्रत्यक्ष पुराव्यावरून विनाशाच्या शेवटच्या वर्षांचा अभ्यास करून त्या निष्कर्षाची तुलना पृथ्वीचा त्याग करून जे लोक इतर ग्रहांवर किंवा त्यांच्या चंद्रांवर वस्ती करून राहिले त्यांनी लिहून ठेवलेल्या वृत्तांताशी करायला हवी. ही केवळ भूतकाळात केलेल्या चुकांवरून धडा शिकण्याची संधी होती असं नाही; तर मानवाचं उन्नयन कसं आणि केव्हा झालं यावरदेखील त्यामुळे प्रकाश पडेल अशी त्यांना आशा होती. हा पुरावा शोधण्याचं काम आरुषीकडे होतं. 

          प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या या विशेष कामांव्यतिरिक्त, सगळ्या सदस्यांना अवकाशयानाच्या नियंत्रणाच्या प्रशिक्षणाची, आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये करायच्या दुरुस्त्यांची, मूलभूत जीवशास्त्राची आणि स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाची उजळणी करावी लागली. हाडांची घनता आणि स्नायूंची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना प्रवासाच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या व्यायामाचादेखील त्यांनी सराव केला.

         बघता बघता चोवीस दिवस घाई-गर्दीत निघून गेले. त्यादरम्यान आरुषी रोज संध्याकाळी आई आणि पपाशी बोलत होती आणि त्यांनी पंचविसाव्या दिवशी तिला येऊन भेटायचं असं ठरलं होतं. पथकातील सगळ्या सदस्यांसाठी तो आपल्या नातलगांना भेटण्याचा दिवस होता. 

____________________________________________________________________________________________

 ऑक्टोबर महिना संपत आला होता तरी अजून हवेत थोडा उष्मा होता. सकाळी  विमान समुद्राकाठच्या शामियाम विमानतळावर उतरताच आईने आरुषीला फोन केला. त्या रात्री आरुषीला झोप लागलीच नव्हती. आई आणि पपाला काय काय सांगायचं याचे विचार सारखे तिच्या डोक्यात घोळत होते. पहाट होताच उठून, अंघोळ करून तिने सकाळचं प्राशन केलं होतं. आईचा फोन येताच, ती तिच्या घराच्या गच्चीवर आली आणि तिने सकाळच्या मोत्याच्या कांतीप्रमाणे उजळलेल्या आकाशात भरारी मारली. अजून रवी उदय झाला नव्हता आणि आकाशगंगा प्रवास केंद्राच्या आवरालगतच्या समुद्र किनाऱ्यावरून गार वारा वाहत होता. अवकाशयानात प्रवेश केल्यानंतर ती या नैसर्गिक वातावरणाला मुकणार याची तिला तीव्रतेने जाणीव झाली. पृथ्वीवर त्यांना कसलं विषारी वातावरण मिळेल हे कोणालाच माहिती नव्हतं.

       अजूनही निद्राधीन असलेल्या केंद्राच्या आवारावरून आरुषी गोलाकार उडत होती आणि विमानतळावरून आई आणि पपाला घेऊन येणाऱ्या झिप्परकडे लक्ष ठेवून होती. पथकातील दोन सदस्य तिला खाली हिरवळीवर जाताना दिसले. दहा मिनिटांनी तिने आई आणि पपाला एका झिप्परमधून उतरताना पाहिलं. एक झोकदार वळण घेऊन ती आपल्या उजळलेल्या उंचीवरून खाली आली आणि आईच्या मिठीत शिरली. 

        “ओह बिट्टू, गेले तीन आठवडे मला किती आठवण येत होती तुझी. आता पुढची अकरा वर्षं मी तुझ्याशिवाय कशी काढू?” लेकीला मिठीत घेऊन आई रडू लागली. आयुष्यात पहिल्यांदाच आरुषीला जाणवलं, की आई किती हळवी आहे. आईकडून तिला नेहमीच शक्ती मिळायची; पण आज तिच्या दुःखात ती किती श्रांत आणि शक्तिहीन वाटत होती. आईपेक्षा आता दोन इंच उंच झालेल्या आरुषीने आईला प्रेमाने जवळ घेतलं. संपूर्ण जगात तिच्यावर एवढं प्रेम करणारी दुसरी कोणीही व्यक्ती नव्हती हे आरुषीला पूर्णपणे माहीत होतं. 

        “पण आई, मी प्रत्येक मिनिटाला तुझी आठवण काढत असेन आणि त्यामुळे मी तुझ्या जवळच असेन. तू तर माझी शक्ती आहेस. धाडसीपणा मला तूच शिकवलास आणि जितक्या वेळेला शक्य होईल तितक्या वेळेस मी तुला संदेश पाठवेन.”

        आरुषीने पपाकडे पाहिलं. भावनेच्या अशा जाहीर प्रदर्शनामुळे तो नेहमीप्रमाणेच अस्वस्थ होता. दोघांनाही ती घरी घेऊन आली. आरुषीचा प्रवास, आईच्या कामाचा नवा प्रकल्प यांवर चर्चा करण्यात आणि केंद्राच्या आवारातील आकर्षक गोष्टी पाहण्यात त्यांचा वेळ मजेत गेला. 

        “तुझ्या वाढदिवसासाठी काय भेट आणावी ते मला सुचेचना ना, बिट्टू. तू आता लवकरच प्रवासाला निघणार, तेव्हा तुला इथेच सोडून जाव्या लागतील अशा वस्तू मला आणायच्या नव्हत्या म्हणून मग शेवटी मी तुझ्यासाठी हे आणलं,” गुलाबी कागदात गुंडाळलेली एक चौकट तिच्या हातात देत आई म्हणाली. 

        “काय आहे हे?” आईच्या हातातून ती भेट घेत आरुषीने विचारलं.            

 मोहिमेवर आपल्याबरोबर नेता येईल अशी कोणती वस्तू आईने तिच्यासाठी आणली असेल हे आरुषीला कळेना. गुंडाळलेला कागद उलगडून बाजूला केल्यावर तिला एक काच बसवलेली धातूची चौकट दिसली आणि त्या चौकटीत कसल्याशा विचित्र पृष्ठभागावर तिचे फोटो छापलेले होते. एकात ती आईने कडेवर घेतलेलं बाळ होती, एकात तिच्या लहानपणीच्या घराच्या हिरवळीवर खेळणारी छोटी मुलगी होती, आणखी एकात ती खेळण्यातल्या विमानाच्या मागे उडत होती आणि चौथ्या फोटोत पंधरा वर्षांची ती अकादमीत निघाली होती. पण हे फोटो इलेक्ट्रॉनिक नव्हते. ते स्थिर होते आणि कायम तसेच राहणार होते. त्यांचं प्रयोजन न समजून आरुषीने आईकडे पाहिलं. 

         “हे तुझ्या फोटोंचे प्रिंट्स आहेत, बिट्टू. मी ते छापून फ्रेम करून आणले. फोटो जतन करून ठेवण्याची ही फार जुनी पद्धत आहे. पृथ्वीवर लोक असे फोटो जवळ ठेवत. यानाच्या तुझ्या भागात आणि नंतर पृथ्वीवरच्या तुझ्या घरात ही फ्रेम तू कशावर तरी लटकवून ठेवू शकशील असं मला वाटलं; म्हणजे मला आणि पपाला तू नेहमी या फोटोत बघू शकशील. तुझा कॉम आणि इतर वस्तू चार्ज करायला पृथ्वीवर जरी ऊर्जास्रोत मिळाला नाही तरी हे फोटो असेच राहतील कारण ते घन वस्तूच्या स्वरूपात आहेत.”

         “हे तर फारच छान आहे, आई. मी नक्कीच ही चौकट माझ्याबरोबर घेऊन जाईन. पण तू हे कसं करून घेतलंस?”

         “करमणुकीच्या चौकात मागच्या बाजूला एक दुकान आहे. स्पेशल इफेक्ट्समध्ये त्यांची खासियत आहे. फोटोंचे प्रिंट्स मी त्यांच्याकडे घेऊन गेले आणि मला काय हवं आहे ते त्यांना सांगितलं. त्यांनी वेळेत काम करूनही दिलं. तुला ही चौकट बरोबर नेण्याच्या दृष्टीने पुरेशी हलकी आहे ना?”

         “हो, आहे. काही वैयक्तिक वस्तू बरोबर नेण्याची आम्हांला परवानगी आहे आणि मी ही चौकट नक्कीच नेईन. थँक्यू आई, ” आईला मिठी मारत आरुषी म्हणाली. निघण्याचा दिवस आता खूप जवळ आल्याने आईला तिची प्रचंड काळजी वाटत होती हे तिला माहीत होतं. 

        “स्वतःची काळजी घे बिट्टू आणि शक्य असेल तेव्हा मला संदेश पाठवत राहा,” तिच्या केसांवरून हात फिरवत आई म्हणाली. 

        आरुषीने आईच्या चेहऱ्यावरून हलकेच हात फिरवला. 

        “तुला अजूनही ते स्वप्न पडतं का, आई?” तिने विचारलं.

        “हो, सारखं पडतं.”

         “पण तू काळजी करू नको, मी आता मोठी झाले आहे आणि म्हणून आता मला स्वतःची काळजी घेता येते. मी तशी काळजी घेईनच.  मी परत येईपर्यंत तू अशीच राहा. म्हातारी होऊ नकोस,” हसत आईकडे पाहत आरुषी म्हणाली आणि रडता रडतासुद्धा आई हसली.

        आई आणि पपाचा आरुषीने शेवटी निरोप घेतला तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. झिप्परमध्ये बसून ते विमानतळाकडे निघाले तोपर्यंत आरुषी त्यांना बघत उभी होती. पुन्हा कधी दिसतील ते? तीन वर्षांनी? अकरा वर्षांनी? काळ जर इतका सापेक्ष असेल तर त्याचा अर्थ तरी काय? खरा वर्तमानकाळ अस्तित्वात तरी असतो का? किंवा भूतकाळ अथवा भविष्यकाळ?

————————————————————————————————————–

पुढचे दोन दिवस सामानाची बांधाबांध करण्यात गेले. आकाशगंगा प्रवास केंद्राच्या उड्डाण मंचावर दिमाखात उभ्या असलेल्या रॉकेटच्या मध्यावर अवकाशयान होतं आणि पथकातील सदस्यांचं सगळं सामान त्यात चढवण्यात आलं. मग शेवटचे चार दिवस पथकाच्या सदस्यांना इतरांपासून वेगळं ठेवण्यात आलं. प्रतिकार शक्ती वाढवणारे शेवटचे बूस्टर डोस त्यांना मिळाले आणि विशेष शक्तिवर्धक पेयांचं त्यांनी प्राशन केलं. पृथ्वीवर असू शकतील अशा जीवाणूंपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी शक्य तितकी काळजी त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या दलाने घेतली होती. 

       दोन शतकांपूर्वी शोधून काढलेल्या प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या तंत्रांमुळे संसर्गजन्य रोगांचं स्वर्गावर जरी उन्मूलन झालं असलं तरी पृथ्वीवरच्या वास्तव्यात पथकातील सदस्यांच्या शरीरांवर जीवाणूंचा घातक हल्ला होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या शरीरांत जीवाणूंना खाणाऱ्या कोट्यवधी सूक्ष्म अशा पेशी इंजेक्शनने सोडल्या होत्या. स्वर्गावर जेव्हा मानवाने वास्तव्य केलं तेव्हा तिथल्या सर्व घातक जीवाणूंचा नाश करण्यात आला होता. त्यामुळे उन्नयन होण्यापूर्वी हजारों वर्षांच्या उत्क्रांतीच्या काळात ज्याप्रमाणे मानवी शरीराला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत रोगांचा प्रतिकार करावा लागत असे तसा प्रतिकार आता करावा लागत नसे; शिवाय आधुनिक जीवशास्त्राने शोधून काढलेल्या प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या प्रक्रिया रोगांपासून संरक्षण तर देतच असत; पण त्याचबरोबर म्हातारं होण्याची प्रक्रियादेखील पूर्वीपेक्षा हजार पटीने संथ करत. त्यामुळे सर्वसाधारण माणसाच्या मनाचे साधारण शंभराव्या वर्षी विघटन होईपर्यंत मानवी शरीर कायम सुदृढ राही. 

           पण ही मोहीम वेगळी होती. इतर अवकाश यात्रांप्रमाणे हे पथक एखाद्या जीवनरहित ग्रहावर, चंद्रावर किंवा उल्केवर निघालेलं नव्हतं. जीवनाचा आधार असलेल्या – किंबहुना जीवन जिथे निर्माण झालं त्या ग्रहावर  – हे पथक जाणार होतं. आणि तिथे सध्या कोणते जीव आहेत हे स्वर्गावरील कुणालाच माहिती नव्हतं. मिथेन वायूचा स्पष्ट संकेत केवळ एवढेच सांगत होता, की अंतिम युद्धाने तिथलं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त केलं नव्हतं. 

         आकाशगंगा प्रवास केंद्रातील एकांतवासाची जागा अनाकर्षक आणि कंटाळवाणी होती. तिथे राहत असताना पथकातील सदस्यांनी मोहिमेतील त्यांच्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावं आणि शरीराला आणि मनाला स्थैर्य देण्यासाठी ध्यान करावं अशी अपेक्षा होती. उड्डाणापूर्वी काही तास आधी यानात प्रवेश करेपर्यंत इतर लोकांशी फारसा संबंध येणार नाही अशी व्यवस्था केली होती. आरुषीने बहुतेक वेळ मनातल्या मनात तिला नेमून दिलेल्या कामांची उजळणी करण्यात, ध्यान करण्यात आणि कॉमवरून आई आणि पपाशी आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्यात घालवला. आई आता सावरली होती आणि तिने आरुषीला तब्येत उत्तम राखण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी सूचना दिल्या. 

        “उन्नयनपूर्व मनुष्यांनी पृथ्वीचं वर्णन एक सुंदर ग्रह असं केलं आहे बिट्टू. अखेरच्या युद्धांमुळे तो ग्रह किती बदलला आहे ते आपल्याला माहीत नाही; पण त्यानंतरही एक हजार वर्षं होऊन गेली आहेत. त्या ग्रहाचे काही भागतरी पूर्ववत झाले असतील. पृथ्वीवरच्या मूळ रहिवाशांच्या दृष्टिकोणातून तो ग्रह पाहण्याचा अवश्य प्रयत्न कर.”

        आई नेहमीच फार आशावादी असते असं आरुषीला वाटलं. अनेक वर्षं चाललेल्या युद्धाने आणि पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याने उद्ध्वस्त झालेल्या ग्रहात आई सौंदर्याची कल्पना कशी काय करू शकते? शिवाय युद्धात जी अस्त्रं वापरली गेली त्यांच्या किरणोत्सर्गाचाही परिणाम झाला असणार. 

        पपानेही सूचना दिल्या,  

        “मोहिमेच्या संपूर्ण कालावधीसाठी आपली शक्ती राखून ठेव. फार उत्साहात येऊन ठिकाणावर पोचल्या पोचल्या महिनाभरातच दमून जाऊ नको. सगळा ग्रह पालथा घालायची काही आवश्यकता नाही. जिथे राहणं आवश्यक आहे तिथेच राहा आणि कायम फुग्याच्या कवचातच राहा.” 

        तिच्या मित्रमैत्रिणींनी मोहिमेची चेष्टा केली, तिची गंमत केली आणि पृथ्वीवरून त्यांच्यासाठी कशाकशाचे नमुने आणायला बजावले. 

        “मी परत येईपर्यंत तुम्ही सगळे दहा वर्षांनी मोठे झालेला असाल! मला विसरूनही गेला असाल!” आरुषी त्यांना म्हणाली.

        ही एवढी गोष्ट मात्र तिच्या मित्रमैत्रिणींना आवडली नव्हती. 

____________________________________________________________________________________________

   स्वर्गावरच्या रहिवाशांच्या दृष्टीने ही मोहीम अकरा वर्षांची होती; पण पृथ्वीवर जाणाऱ्या पथकासाठी त्या अवधीत फक्त तीन वर्षं उलटणार होती. याचं कारण म्हणजे प्रचंड वेगाने प्रवास केल्यामुळे त्यांच्यासाठी काळाची गती कमी होणार होती. 

         दोन तारामंडळांच्या मधल्या अवकाशातून प्रवास करण्यासाठी ताऱ्यांच्या ऊर्जेचा उपयोग कसा करून घ्यायचा याचा शोध लागल्यापासून अवकाश प्रवासाचं हे तथ्य सगळ्यांना माहीत झालं होतं. आधुनिक अवकाशयानांचा वेग प्रकाशाच्या गतीच्या फक्त काही अंशानेच कमी असल्याने त्या यांनांमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी काळ संथ वाहत असे. पण आतापर्यंत त्याचा फारसा परिणाम लक्षात आला नव्हता; कारण क्वचितच एखाद दुसरा अंतराळवीर तारामंडळाच्या पलीकडे प्रवास करत असे. अशा प्रवासाला बहुतेक मानवविरहित यानेच पाठवली जात. मानवांचा प्रवास बहुधा रवीच्या मंडळाच्या दुसऱ्या एखाद्या ग्रहावर किंवा त्यांच्या चंद्रांवर होई आणि असे प्रवास बहुतेक व्यापारासाठी केले जात. 

           स्वर्गावरील मानवाच्या इतिहासात प्रथमच तब्बल सोळा मानव एका दुसऱ्या तारामंडळाच्या प्रवासाला निघाले होते आणि हा प्रवास एका मार्गे पाच वर्षांचा होता. पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यावरील काळ समांतर असल्याने, पृथ्वीवरील एक वर्ष हे जवळजवळ स्वर्गावरील एक वर्षाइतके होते. त्यामुळे स्वर्गावरील रहिवाशांच्या दृष्टीने, अवकाशयानाला पृथ्वीवर पोचायला पाच वर्षं लागणार होती. 

          पृथ्वीवरचं वास्तव्य एका वर्षाचं होतं आणि परतीच्या प्रवासाला आणखी पाच वर्षं लागणार होती; पण मोहिमेच्या पथकातील सदस्यांच्या दृष्टीने पृथ्वीवर जातानाचा आणि तिथून परतण्याचा पाच वर्षांचा प्रवास एकेका वर्षात झाल्यासारखा भासणार होता. पृथ्वीवरील एक वर्षाचं वास्तव्य धरून, संपूर्ण मोहिमेचा कालावधी त्यांच्या दृष्टीने तीन वर्षांचा होता.

         तरीदेखील, वीस वर्षांच्या त्या युवक युवतींना स्वर्गावरील त्यांच्या नेहमीच्या आयुष्यापासून तीन वर्षं दूर राहणं हेच एक आव्हान होतं. त्यात भर म्हणून पृथ्वीवर कोणत्या परिस्थितीशी सामना करावा लागेल याबद्दलची अनिश्चितता होती. आणि एक अस्वस्थ करणारी जी भावना त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात राहणार होती ती ही, की ते परत येईपर्यंत स्वर्गावर एक दशक उलटून गेलं असणार. 

        पण तारुण्याचा सकारात्मक दृष्टिकोण आणि शक्तिवर्धक बूस्टरमुळे शरीरात सळसळणारी प्रचंड शक्ती यांमुळे पथकातील सदस्यांच्या मनात मोहिमेविषयी कोणतीही धाकधूक वाटत नव्हती. ते मजेत आपल्या कुटुंबीयांशी आणि मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत होते आणि अवकाश यात्रेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शास्त्रज्ञांशी माहितीची देवाणघेवाण करत होते. 

       आरुषीने दोनदा जयंतला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याने उत्तर दिलं नाही. त्याने असं तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने तिला फार दुःख झालं. त्याला जाऊन भेटावं आणि पृथ्वीवर जाणाऱ्या पथकात तिची निवड होणं आणि त्याची निवड न होणं हे तिच्या हातात मुळीच नव्हतं हे त्याला समजून सांगावं असं तिला फार वाटत होतं. ती जर उड्डाणापूर्वीच्या शेवटच्या एकांतवासात नसती तर ती नक्कीच त्याला जाऊन भेटली असती. मागच्या वर्षी याच काळात ते एकमेकांच्या किती जवळ होते. तिचा वाढदिवस त्याने किती उत्साहाने साजरा केला होता. त्याने एकदा तरी तिच्याशी बोलायला हवं होतं, निदान शेवटचा निरोप घेण्यासाठी तरी. नाही म्हटलं तरी, किती दूर चालली होती ती! 

       तिची काळजी आणि अस्वस्थता तिच्या आवाजात थोडी जाणवली असणार!  एका संध्याकाळी आई म्हणाली, “आरुषी, तू फार लहान आहेस. तुला आणखी खूप मित्रमैत्रिणी मिळतील आणि तुला काही खरेखुरे प्रियकर पण भेटतील. तुला इतक्या सहजासहजी विसरणाऱ्या लोकांबद्दल इतकी चिंता करू नकोस.”

      आईने जयंतबरोबरच्या तिच्या नात्याला इतकं वरवरचं समजावं याचा जरी तेव्हा आरुषीला राग आला, तरी आईचे शब्द तिला नंतर आठवत राहिले. तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात बसून राहिले… तिच्या नैराश्यात आणि हतबलतेत!  

      उड्डाणाचा दिवस जवळ आला तसं केवळ आकाशगंगा प्रवास केंद्राच्या आवारात आणि प्रकल्पाच्या टीममध्येच नव्हे तर सामान्य लोकांतही उत्साहाचं वातावरण पसरलं. त्या चैतन्यमय वातावरणात फार वेळ उदास राहणं शक्य नव्हतं. दररोज माहिती वाहिन्यांवर मोहिमेच्या असंख्य बातम्या येत. पथकातील सदस्य पुन्हा पुन्हा प्रकाशझोतात येत होते आणि मोहिमेचा तपशील सगळ्यांना माहीत झाला होता. 

      पृथ्वीवर जाणाऱ्या पथकाला तिथे काय आढळेल यावर सर्वसाधारण कयासांपासून ते अविश्वसनीय कल्पनांपर्यंत बरेच तर्क केले जात होते. काहींच्या मते पृथ्वी आता एक शुष्क आणि नापीक ग्रह होता – जुन्या तारामंडळातील पहिल्यावहिल्या प्रवाशांना मंगळ जसा आढळला असावा तसा. काहींना तिथे प्राणघातक जंतूंची फौज असेल असा संशय होता, तर काही जण चित्रविचित्र रानटी श्वापदं आणि डायनोसॉर पृथ्वीवर परतले असतील अशी कल्पना करत होते. अक्राळविक्राळ प्राणी पथकावर हल्ला करण्यासाठी तिथे दबा धरून बसले असावेत असंही बोललं जात होतं. अंतिम युद्धातून वाचलेल्या आदिम मानवांची वस्ती गुहांमध्ये असावी असंही म्हटलं जात होतं. अर्थातच या सगळ्या बहुतेक कल्पनाच होत्या; कारण नक्की माहिती जरी कुणाकडेच नव्हती तरी पृथ्वी प्रकल्प सुरू झाल्यापासून गेल्या पंधरा वर्षांत जी मानवरहित यानं पृथ्वीवर उतरली होती त्यांनी गोळा केलेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या काही भागांत झाडं आणि कीटक आढळले होते आणि बाकीचा ग्रह म्हणजे बर्फ आणि वाळूचा नापीक प्रदेश होता. ते काही असलं तरी पथकाचे सदस्य कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार होते – मग ती सर्वाधिक शक्यतेची परिस्थिती असो किंवा सर्वात अनपेक्षित असो. 

        यानाच्या उड्डाणाला आता दोनच दिवस उरले होते आणि उड्डाणाच्या वेळेस त्यांनी पूर्णपणे ताजंतवानं आणि जागरूक असावं म्हणून पथकातील सदस्यांना बारा तासांच्या दीर्घ अवधीची झोप घेण्यास सांगितलं होतं. गेल्या आठवड्यातील घडामोडी आणि धावपळीनंतर आरुषीला अगदी गाढ झोप लागली.
          ताजेतवाने झालेले पथकातील सदस्य उड्डाणापूर्वीच्या स्वर्गावरील त्यांच्या शेवटच्या सकाळी जेव्हा उठले तेव्हा त्यांना निरोप द्यायला आकाशगंगा प्रवास केंद्राजवळ जमलेले हजारो लोक त्यांना दिसले. उड्डाणाच्या मंचाबाहेर एखाद्या सहलीसारखं वातावरण होतं. रात्रीपासूनच लोक तिथं जमले होते आणि सकाळी ऊन्ह खात बसले होते. रवीच्या कोवळ्या किरणात आकाशयान तळपत होतं. 

           उड्डाणासाठी यात्रेकरूंनी स्पेस सूट अंगावर चढवले आणि कॉमवरून आपल्या नातेवाइकांचा शेवटचा निरोप घेऊन ते यानात चढले. आरुषीला आई एकाच वेळी हसताना आणि रडताना दिसली. 

        “मी तुझी वाट बघेन, बिट्टू! स्वतःची काळजी घे आणि लवकर परत ये,” ती पुन्हा पुन्हा सांगत राहिली. 

        उड्डाणापूर्वी एक तास आधी सगळे जण यानात आपापल्या जागेवर बसले आणि नियंत्रण कक्षाने उलटी मोजणी सुरू केली. एकोणसाठ, अठ्ठावन्न, सत्तावन्न… एकेक मिनीट संपू लागलं. जमिनीवरच्या नियंत्रण कक्षाने यानाच्या यंत्रणेची ठरावीक तपासणी आणि फेरतपासणी केली. इंजिनाच्या आणि यंत्रांच्या एकसारख्या होणाऱ्या आवाजाचं पार्श्वसंगीत सुरू झालं. 

       तेहेतीस, बत्तीस… आरुषीने आपले दोन्ही हात एकमेकांत गच्च गुंफले होते आणि तिच्या छातीत धडधडत होतं. आता अर्ध्या तासात ते केवळ घराचा ओळखीचा प्रदेशच नव्हे तर संपूर्ण ग्रह आणि आतापर्यंत माहीत असलेलं जीवन सोडून जाणार होते. 

       एकोणतीस, अठ्ठावीस, सत्तावीस… आरुषीने मन एकाग्र करण्याचा आणि विश्वातील आद्य शक्ती आठवण्याचा खूप प्रयत्न केला. अवघ्या विश्वाप्रमाणेच ती त्याच शक्तीचा एक अंश होती… संध्याप्राशनाच्या पूर्वी करायच्या प्रार्थनेचे अनेकदा ऐकलेले आईचे शब्द तिला आठवले… ती लहान असताना आणि आईच्या मांडीवर बसून आकाशातील तारे बघण्यात ज्या वयात तिला अत्यानंद वाटत असे, त्या वयात ऐकलेले. 

        सोळा, पंधरा… तिला मन एकाग्र करणं मुळीच जमेना. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. मोहिमेवर जाण्याची तिची इच्छाच नाहीशी झाली. तिला घरी जावसं वाटू लागलं – आईकडे – मग सगळं काही ठीक होईल.

        नऊ… आठ… सात… थांबा! उलट मोजणी ताबडतोब थांबायला हवी होती. आपल्या खुर्चीचा पट्टा सोडून, उठून बाहेर पडून यानापासून लांब पळून जायचं होतं तिला. 

       तीन… दोन… एक… तिच्या पोटातून गोळा उठला… जोराने गर्जना करत आणि ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणातून सुटका होईल इतक्या गतीने रॉकेटने उड्डाण केलं. ते निघाले होते! पृथ्वीकडे. त्या प्राचीन घराकडे… 

_______________________________________________________________________________________________

प्रकरण दहावे समाप्त

Author

Leave a Reply