सर्जनसोहळा  

“अर्थहीन असतं भाषेचं हत्यार…

मनातले सारे उत्कट भाव पुरासारखे

थांबतात मौनाच्या उंबरठ्याशी येऊन

हिरमुसल्या पाण्यासारखे पुन्हा आत परततात

चार-दोन औपचारिक शब्दांचा आसरा घेऊन

अडखळत बाहेर पडतात, तिथे अडतात, विरतात”

शांताबाईंचे शब्द आधाराला घेऊन मनाची  उत्कटता मांडू बघते आहे. 

 “आसमन्ताचे अपार ऐश्वर्य शिरते आपल्या आत

रुजतात कोवळे हिरवे प्राण अशाश्वत मातीत

देहाचे आवरण फाटून जाते अकस्मात

क्षणभर होतो आपण  स्थलकालाच्या अतीत!”

असे स्थलकालाच्या अतीत होण्याचे क्षण आपली श्रीमंती  वाढवत नेणारे!

अशा काही क्षणांची समृद्धी सगळ्यांबरोबर वाटून घ्यावी म्हणून हा लेखनप्रपंच… सर्जन सोहळा

 सगुण निर्गुण संकल्पना स्पष्ट करताना ज्ञानेश्वरांनी ‘शाखाचंद्रन्याय’ सांगितला आहे. काय आहे हा न्याय?

 चंद्राची इवलीशी कोर एखाद्याला बघायची आहे पण त्याला दिसत नाहीये.  आपल्याला ती दिसते आहे. आपण कशी दाखवू?

“हे झाड आहे ना, त्या झाडाची अमुक अमुक फांदी दिसत्ये?” 

” हो,दिसत्ये!”

“त्याच्यावरती चंद्रकोर आहे बघा.”

या फांदीच्या आधाराने त्याला  चंद्रकोर दिसते, 

तसंच सगुणाचा आधार घेतघेत निर्गुणाची ओळखण होते.

रामदास म्हणतात, 

“द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो

तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो”

एकदा का चंद्रकोर दिसली की फांदीचा आधार लागत नाही.  तसंच एकदा निर्गुण निराकाराची भेटी झाली, की सगुणपूजेची गरज राहत नाही असं म्हणतात… 

 पण संतांचं, भोळ्या भाविकांचं मन या सगुणात रंगून जातं. त्याला पाळण्यात काय निजवतात, त्याला प्रेमानं भरवतात काय, त्याचं लग्नही लावतात. किती किती कोडकौतुकं करतात. 

कर्नाटकात पिकानं डवरून आलेल्या  शेताची ओटी भरायची पद्धत आहे.  आपली डोहाळतुली तशीच ही सृष्टीमाउली!  किती गोड आहे हे लाड करणं!

ज्या शक्तीनं, ‘एकोऽहम् बहुस्याम प्रजायेय’  या स्फुरणानं अवघं विश्व साकारलं त्या शक्तीला मूर्तिरूपात घडवणं, हाही एक भावगर्भ सर्जन सोहळाच! 

असाच  दरवर्षी अनुभवायला मिळतो तो सर्जन सोहळा 

‘नवरात्रीची अष्टमी!’

२५-३० बायका जबाबदारीनं जमलेल्या!

त्यांचे चार गट पडतात. एक गट रांगोळी साकारत आहे. कुशल हातानं रेखाटन, रंगभरणी होत आहे. रेखणाऱ्यांची  तन्मय भावावस्था नकळत आपल्यातही शिरते. कुणाच्याही काही सूचना नाहीत, बोलणं नाही. एकाकार मनानं  त्या सगळ्याजणी एकच कलाकार  होऊन आठ हातांनी रांगोळी रेखत असतात. 

एक गट फुलांची तोरणं करण्यात गर्क आहे. मातेच्या साडीला शोभतील अशी मोठमोठी तोरणं. फुलापानांची सजावट.

एक गट अंबामातेच्या साडी दागिन्यांची तयारी करतो आहे.

 ही देवी नाही…

हे मातेचं रूप आहे.  तिची साडी कोकणस्थी. 

(कोकणस्थांत ही पद्धत आहे म्हणून जातीय उल्लेख.) नऊवारी साडीची घडी मोडली जाते. रेखीवपणे नऊवारी साडी नेसवण्याची तयारी सुरू होते. दागिन्यांचं कौतुक चढवलं जातं. दागिनेही तसेच बेतशीर. तिला दैवी झगमगाट नको. मुकुट नको. ती वात्सल्यरूपिणी…

तिचं हे वात्सल्य साकारणारा  आणखी एक गट…

‘उकडीला हात लावा गं,’ ज्येष्ठ भगिनींची हाक येते. चुलीला हळदीकुंकू वाहायचं. हळदीकुंकू हेही सर्जनाचं प्रतीक. मोठी पातेली आधण ठेवायचं. त्यात किंचित हळद कुंकू.  साडेतीन किलो आंबेमोहर आणि सुरती कोलम तांदुळाची पिठी वैरायची… उकडीला न्यहार रंग येतो किंचितशा पिंजरेचा. पिठी लुसलुशीत मळायची. तेल पाण्याचा समतोल साधत दोन गुळगुळीत गोलाकार करायचे… एक मुखवट्यासाठी, एक अंबाड्यासाठी.

एकीकडे श्रीसूक्ताचं मंद पठण!  कुठेही गडबड गोंधळ नाही. 

कारण सोहळा आहे  

जिनं आपल्याला घडवलं त्या शक्तीला आपण घडवण्याचा…

मुखवटा घडवायचा… 

तिचा साजशृंगार करायचा… 

तिला मातारूपात बघायचा! 

उकड झाली की आता सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी.

एक कलाकार… डोळे मिटून घेते क्षणभर. 

सगळ्यांना एकवार नमस्कार करते आणि मग बंद खोलीत चालते मातेच्या रूपाची आराधना..

हळूहळू उकडीतून डोळे रेखाटले जातात, चाफेकळी नाक उमलतं,  

अस्फुट आश्वासक हसणारे ओठ प्रकटतात…

हलक्या हातानं ती करत असते विश्वमातेचं सर्जन. घडवत राहते पावित्र्य, मांगल्य आणि वात्सल्याची मूर्ती! 

रंगकाम सुरू होतं. अंगावर येणारे घारे नाहीत आणि काळेही नाहीत, मृदू तपकिरी छटा असलेले, सौम्य हसणारे डोळे. मध्ये इटुकला पांढरा ठिपका… 

हा ठिपका दिला, की चेहरा जिवंतच होतो एकदम. 

हसरं मातृत्व प्रकटतं त्याच्या ठायी!

हलका करारीपणा पण आढ्यता नसलेलं नाक, हसरे ओठ, मधोमध रेखलेलं कुंकू 

आणि…

ज्या शक्तीनं आपल्याला घडवलं ती 

 ‘आपलंच बाळ आहे कौतुकाचं,’ 

या भावनेनं लावलेलं गालबोट…

नको दृष्ट लागायला हिला…

मग काळाभोर अंबाडा… केस मोकळे नाही सोडायचे. कारण ती माता आहे. ती उग्ररूपिणी नाही. तिचं दिसणं आईसारखं!!

हलक्या हातानं हा मुखवटा चढवायचा. नाकात पाणीदार मोत्यांची नथ, अंबाड्यावर भरगच्च वेणी घातली जाताच अंबामातेचा उदेकार होतो. या मातेची मीठमोहऱ्यांनी दृष्ट काढली जाते. आरती होते आणि या सात्त्विक रूपाचं दर्शन घ्यायला एकच गर्दी होते. भक्तांबरोबर कलाप्रेमीही असतात.

 उकडीतून शिल्प घडताना,  हलक्या  रंगभरणीमुळे क्षणोक्षणी जिवंत होत जाणारी भावगर्भ  मूर्ती सगळ्यांना बघता येत नाही. त्यामुळे  उत्सुकता  ताणली जाते. भव्य मंचावर उभी असलेली नितांतसुंदर अंबामाता पाहताच  तिच्या प्रसन्न रूपानं भाववश होतो आस्तिक आणि कलासौंदर्यानं नास्तिकही! 

 प्रसन्न मुखवटा  आणि समोर रेखलेली भव्य रांगोळी डोळाभर साठवत दर्शनाला आलेले जन बसून राहतात.    

हळूहळू उकड कोरडी पडते तसतशा किंचित सुरकुत्या पडत जातात मुखवट्याला!

भक्तांना वाटतं, ‘आधी ती तरुणी होती, मग प्रौढा झाली आणि आता… 

आई थकली उभं राहून’ 

म्हणजे मुखवटा उतरवायची वेळ झाली…आरती होते… 

सर्जनाचं विसर्जन होतं… पुन्हा पुढच्या वर्षीच्या सर्जनासाठी

Author

Leave a Reply