अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.
ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :
हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला, की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली. तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल.
एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल.
जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’ या नावाने केले आहे. हे भाषांतर क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण आठवे.
– संपादक
पथक

अमरचा कॉम वाजला आणि त्याने आपल्या कामाच्या स्क्रीनवरून नजर बाजूला करून वर बघितलं. जयंतचा हसरा चेहरा त्याच्या स्क्रीनच्या खालच्या कोपऱ्यात दिसत होता. त्याच्या येणाऱ्या फोनवर अमरने फोकस करण्यापूर्वीच नताशाचा पण चेहरा कोपऱ्यात झळकला.
“झालंय तरी काय,”अमरला आश्चर्य वाटलं.
“बाबा, मी पृथ्वी प्रकल्पात आहे,” जयंतने उत्साहाने घोषणा केली.
“म्हणजे? काय म्हणायचं आहे तुला?” उच्च शिक्षण अजून सुरूदेखील झालं नाही आणि हा प्रकल्पात कसा आला?… अमरला काही कळे ना!
“मला पृथ्वीवर जाणाऱ्या दलाचा एक सदस्य म्हणून प्रशिक्षण घेण्याची संधी देण्यात आली आहे. मी जर त्यात यशस्वी झालो तर मी पृथ्वीवर जाणाऱ्या पथकात असेन.”
“जयंतच्या अकादमीत पृथ्वी प्रकल्पासाठी निवड करत आहेत हे तुला माहिती होतं का अमर?” नताशाने विचारलं.
मुलाच्या यशाचा अभिमान तिच्या स्वरात स्पष्ट दिसत होता.
“नाही. इतक्या संख्येने पहिल्या वर्षाच्या मुलांची निवड करत होते हे मला माहिती नव्हतं. निवड करण्याचे निकष मंजूर झाले आहेत हे मला माहीत होतं; पण इतक्या लहान मुलांची ते निवड करणार आहेत याची कल्पना नव्हती.”
“बाबा, मी पंधरा वर्षांचा झालो आहे. मी काही आता लहान मुलगा नाही आणि प्रशिक्षण पाच वर्षं चालणार आहे. पृथ्वीवर जाण्याची वेळ येईल तेव्हा मी वीस वर्षांचा असेन.”
“हो. पण तुझ्या शिक्षणाचं काय? त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल?” नताशाचा गोंधळ झाला होता.
“माँ, तोही प्रशिक्षणाचा भाग असेल. मी मला आवडेल त्या विषयांची निवड करू शकतो.”
“पण त्यात धोका नाही का? म्हणजे पृथ्वीवर काय परिस्थिती असेल हे अजून आपल्याला माहीत नाही.”
“मला काही होणार नाही माँ! मी एक नायक म्हणून परतेन.”
“तुझी निवड कशी झाली? परीक्षा कधी दिलीस तू?”
“काल बाबा. खरं तर काल मला सुटी होती पण मग मला इतर काही विद्यार्थ्यांबरोबर अकादमीत थांबण्याचा आणि परीक्षा देण्याचा निरोप आला. दिवसभर परीक्षेच्या अनेक फेऱ्या झाल्या.”
“तू हा प्रस्ताव मान्य करायचं ठरवलं आहेस का?”
“हो, बाबा. खूप दुर्मीळ संधी आहे ही. तुम्ही पृथ्वी प्रकल्पात काम करू लागल्यापासूनच मला त्यात रस आहे, हे तर तुम्हांला माहितीच आहे. हा एक सन्मान आहे असं मला वाटतं.”
“तू काळजी करू नकोस नताशा. हा प्रकल्प अत्यंत काळजीपूर्वक आखला जाणार आहे. सर्व प्रकारची काळजी या प्रकल्पात घेतली जाणार आहे,” अमरने तिला खातरी दिली.
अमरने नताशाला जरी आश्वासन दिले आणि जयंतच्या निर्णयाला पाठिंबा दिला तरी त्या रात्री त्याला झोप आली नाही. जयंतच्या बातमीने त्याला आनंद झाला होता का काळजी वाटत होती हेच त्याला ठरवता येत नव्हते.
—————————————————————————————————————
आरुषीने जेव्हा आईशी कॉमवर संपर्क साधला तेव्हा आईची काय प्रतिक्रिया होईल याविषयी ती साशंक होती.
“बिट्टू! मी दिवसभर तुझ्या फोनची वाट बघत होते. तू ठीक आहेस ना? का थांबवून ठेवलं होतं त्यांनी तुला?”
“आणखी काही चाचण्या घेण्यासाठी मला थांबवून ठेवलं होतं, आई!”
“आणखी चाचण्या? कशासाठी?”
“पृथ्वी प्रकल्पाच्या पृथ्वीवर जाणाऱ्या संघाची संभाव्य सदस्य होण्यासाठी आवश्यक तेवढी हिकमती मी आहे का हे तपासून पाहण्यासाठी.”
“म्हणजे तुझी पृथ्वीवर जाण्यासाठी निवड झाली आहे?” आईने अविश्वासाने विचारलं.
“त्यासाठी प्रशिक्षण घेण्याची संधी मला देण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर संघाची निवड होईल.”
“बिट्टू, तू अंतराळवीर होणार! मला किती अभिमान वाटतो आहे तुझा!” आईला तर अतिशय आनंद झालेला दिसला.
आरुषीला इतकं हायसं वाटलं, की आताच्या आता आईला मिठी मारावी अशी तिला इच्छा झाली. आईने जर पाठिंबा दिला नसता तर प्रशिक्षण पूर्ण करणं तिला फार अवघड गेलं असतं. मानसिक तणावामुळे तिची सगळी शक्ती वाया गेली असती; पण आईच्या प्रतिक्रियेने तिला सुखद धक्का दिला होता.
“माझी काळजी करू नकोस, आई. ही एक महान मोहीम होणार आहे.”
“जेव्हा वेळ येईल तेव्हा मी चिंता करेन, बिट्टू! पण मी या मोहिमेविषयी बरंच वाचलं आहे. मानवाच्या प्राचीन घराला भेट देण्याची संधी ज्या काही निवडक लोकांना मिळणार आहे त्यांत तुझा समावेश आहे याचा मला फार आनंद वाटतो आहे. पण मला सांग, तू घरी केव्हा येते आहेस? तुझ्या अभ्यासाचं सत्र केव्हा सुरू होतं आहे? आणि प्रशिक्षण केव्हा दिलं जाणार आहे?”
“प्रशिक्षण माझ्या शिक्षणाचाच भाग असणार आहे; किंवा माझं शिक्षण माझ्या प्रशिक्षणाचा भाग असेल असं म्हणणं जास्त योग्य आहे. ही सेमिस्टर संपेपर्यंत मी घरी नाही येऊ शकणार. पण पपा कुठे आहे? ही बातमी त्यालाही सांगायची आहे मला.”
“त्याला फोन कर बिट्टू. तो त्याच्या आईला भेटायला गेला आहे.”
“मग तू एकटीच आहेस का आई?”
“हो. पण मी ठीक आहे, बिट्टू. तुझी आठवण येते मला, पण मी ठीक आहे.”
“मग तू एवढी गंभीर का आहेस? तू हसत का नाहीस?”
“पण मी हसते आहे बिट्टू. तू माझी काळजी करू नको. अकादमीतल्या जीवनाचा आनंद घे.”
कॉम डिस्कनेक्ट केल्यावर आरुषीला उदास वाटू लागलं. एका आठवड्यापूर्वीच जे घर सोडून ती आली होती ते आता अस्तित्वातही नव्हतं. तिने परत कॉम उचलला आणि आपल्या वडिलांशी संपर्क साधला.
पण तिला आश्चर्य वाटलं ते तिच्या पपाच्या प्रतिक्रियेचं. पृथ्वी प्रकल्पात सामील झाल्याने तिचं आयुष्य वाया जाईल असं त्याला वाटत होतं. यापूर्वी कधी पपाने पृथ्वी प्रकल्पाची निंदा केल्याचं किंवा त्याला विरोध केल्याचं तिला आठवत नव्हतं आणि त्यामुळे पृथ्वीवर जाणाऱ्या दलात तिची निवड होण्याच्या शक्यतेवर त्याची प्रतिक्रिया कोड्यात टाकणारी होती.
“पण पपा, माझी निवड खूप कठीण परीक्षांच्या फेरीनंतर झाली आहे. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी होते; पण माझ्या अकादमीतून फक्त तिघांची निवड झाली आहे. तुला माझा अभिमान नाही वाटत?”
“त्यांना त्यांच्या प्रयोगांसाठी बळीचे बकरे पाहिजेत म्हणून ते लहान मुलांची निवड करताहेत. माझ्या मते तू अभ्यासावर लक्ष केंद्रित करावंस.”
पूर्वानुभवावरून आरुषीला माहीत होतं की तिच्या वडिलांचं मतपरिवर्तन करणं हे केवळ अशक्य होतं. सेमिस्टरच्या शेवटी प्रत्यक्ष भेटल्यावर त्याच्याशी या विषयावर बोलायचं तिने ठरवलं. पपाच्या विरोधामुळे आपला निर्णय बदलायची तिला आवश्यकता वाटली नाही. खरंतर तिला पपाचा थोडा रागच आला होता. तिला त्याच्याशी वाद घालून आपला मुद्दा पटवून द्यायचा होता. पण तिला हेही माहीत होतं, की त्याचा काही उपयोग होणार नव्हता; शिवाय, त्याने आईला असं एकटं सोडायला नको होतं. पालक करार संपला म्हणून काय झालं? तिला अजूनही दोघेही हवे होते… एकत्रपणे!
—————————————————————————————————————-
फ्रान्स्काने तिच्या निबंधाचं पुन्हा एकदा वाचन केलं आणि तो चांगला झाला आहे याची तिला खातरी वाटली. पृथ्वी प्रकल्पाच्या केंद्रीय मंडळाने केलेल्या तिच्या तुकडीच्या कामाच्या वार्षिक मूल्यमापनात या निबंधाचा समावेश होणार होता. फ्रान्स्का आता अवकाशयानाच्या संचालनाच्या तुकडीत काम करत होती आणि आकाशगंगा प्रवास केंद्रात यान तयार करणाऱ्या पथकाला ती तुकडी सहकार्य करत होती.
तिने आपला कामाचा स्क्रीन बंद केला आणि एक कळ दाबून खोलीच्या भिंती पारदर्शक केल्या. संध्याकाळचा सौम्य प्रकाश तिच्या खोलीत भरून गेला आणि पारदर्शक भिंतींतून तिला आपल्या घराचा व्हरांडा, त्यापलीकडचं स्वयंप्रकाशी झुडुपांचं कुंपण आणि त्याही पलीकडची प्रशस्त हिरवळ स्पष्ट दिसू लागली. तारीकने कायमची विश्रांती पत्करली त्याला पाच वर्षं झाली होती. तिचं घर, पृथ्वी प्रकल्पाचं केंद्र असलेल्या मध्यवर्ती आण्विक जीवशास्त्र प्रयोगशाळेचं आवार हे सगळं जसंच्या तसंच होतं. आयुष्याची शेवटची दोन वर्षं तारीकने याच व्हरांड्यात बसून काढली होती. सगळं काही तसंच होतं. फक्त एकत्र बसून संध्याप्राशन करताना तिचा हात हातात घ्यायला, रात्री मिठीत घ्यायला तारीक जवळ नव्हता. तारीक गेल्यावर स्टीव्हने दोन वर्षं तिला उत्तम सोबत केली होती; पण तारीकची जादू स्टीव्हमध्ये नव्हती आणि त्याचं जग वेगळं होतं. फ्रान्स्का काही त्याच्याशी क्वांटम मेकॅनिक्सवर चर्चा करू शकत नव्हती. सिल्व्हन प्लेन्समधल्या अकादमीत काम करण्याची संधी आली आणि स्टीव्ह निघून गेला. पण तिला तारीकची जेवढी आठवण येत होती तेवढी स्टीव्हची येत नव्हती.
फ्रान्स्का व्हरांड्यात आली आणि दिवसभराचं काम संपवून उडत घरी परत जाणारे तरुण लोक पाहत उभी राहिली. गेल्या काही दिवसांपासून फ्रान्स्का घरूनच काम करत होती. आता प्रयोगशाळेत सारखं जाण्याची आवश्यकता उरली नव्हती.
उद्याचं माहिती सत्रसुद्धा एक औपचारिक सत्रच होतं. यान जवळजवळ तयार झालं होतं. गेल्या दोन दशकांत झालेल्या सगळ्या आकाशगंगा प्रवासांत वापरण्यात आलं होतं; तसंच या प्रवासात देखील ताऱ्याची ऊर्जा आणि अवकाश आकुंचन (स्पेस वार्प) तंत्र यानाला गती देण्यासाठी वापरण्यात येणार होतं. स्वर्ग आणि पृथ्वी यांमधील जवळजवळ पाच प्रकाश वर्षांचं अंतर ते यान पाच वर्षांत ओलांडणार होतं; पण अवकाशातून प्रचंड वेगाने प्रवास केल्यामुळे यानातील यात्रेकरूंसाठी काळ आकुंचन पावणार होता. त्यांच्या दृष्टीने हा प्रवास केवळ एका वर्षाचा असणार होता.
फ्रान्स्काला वाटून गेलं की साक्षात्कार पूर्व मानवाला स्वर्गापर्यंतचा प्रवास किती कठीण वाटला असेल. त्यांची संस्कृती तेव्हा केवळ पहिल्या स्तरावरची होती. आताच्या मानवाप्रमाणे त्यांना तेव्हा ताऱ्यांची ऊर्जा वापरण्याचं ज्ञान अवगत नव्हतं. त्यांच्या यानांना गती देण्यासाठी ते पूर्णपणे अणुसंलयनाच्या (फ्यूजन) शक्तीवर अवलंबून असत. अर्थात या दोन ग्रहांमधील पाच प्रकाश वर्षांचं अंतर त्यांनी एका टप्प्यात पार केलं नव्हतं. तो एक अनेक पिढ्या चाललेला, अनेक ग्रहांवरच्या टप्प्याटप्प्यांनी केलेला संथ प्रवास होता. जुन्या तारामंडळात मंगळावर सुरू झालेल्या आणि रवीच्या ग्रहमालिकेत स्वर्गावर येऊन संपलेल्या या दूरच्या प्रवासात कधीतरी मानवाचं उन्नयन झालं होतं.
आता उलट दिशेने होणाऱ्या प्रवासात माणसाला काय गवसेल याचा फ्रान्स्का विचार करू लागली. पृथ्वी प्रकल्पाच्या नेमणूक तुकडीने कसून तपासणी करून चाळीस तरुण विद्यार्थ्यांची निवड केल्याची बातमी गेल्या आठवड्यात बातमी फलकावर झळकली होती.
फ्रान्स्काच्या मनात विचार आला, केवळ पंधरा वर्षांची कोवळी मुलं! प्रकल्पाविषयी काय माहीत असणार त्यांना? आता कुठे त्यांनी अकादमीत प्रवेश केला आहे. लहानच आहेत ती! पण पृथ्वीपर्यंतचं अंतर काटून तीच जाणार आहेत आणि प्रश्नांची उत्तरं घेऊन परतणार आहेत. तरुण मुलांच्या मानसिक शक्तीवर साल्चरचा फार विश्वास होता. हा प्रकल्प काही सोपा नव्हता. सर्वांनीच हे मान्य केलं होतं – विशेषतः पृथ्वीवरचं वास्तव्य. अकरा वर्षांनी परतणार होते हे प्रवासी. एकदा का अवकाशयान प्रवासाला निघालं; की प्रकल्पाच्या आताच्या कार्यकारिणीचं काम संपणार होतं. पृथ्वीवर उतरणारे अंतराळवीर तिथे जे प्रयोग करतील त्यांच्या निकालांचा अभ्यास करण्यासाठी साल्चर बहुतेक नव्या संघाची निवड करेल. पृथ्वीवर जाणाऱ्या दलाची निवड करण्यासाठी नेमलेल्या टीमपेक्षा त्याचं काम पूर्णतः वेगळं असेल. केंद्रीय मंडळ तेच राहील बहुधा; पण अंतराळवीर पृथ्वीवर गेल्यानंतर अकरा वर्षांपर्यंत किती जणांचा या प्रकल्पात रस कायम राहील हा एक प्रश्नच होता. अंतराळवीरांचे पालक, मित्र-मैत्रिणी आणि सहकारी यांनीसुद्धा तोपर्यंत आयुष्याच्या दुसऱ्या पर्वात प्रवेश केलेला असेल.
आपणसुद्धा तेव्हा वयाच्या शहात्तराव्या वर्षी काय करत असू कोण जाणे, फ्रान्स्काच्या मनात विचार आला.
—————————————————————————————————————-
फ्रान्स्काने तिच्या निबंधाचं पुन्हा एकदा वाचन केलं आणि तो चांगला झाला आहे याची तिला खातरी वाटली. पृथ्वी प्रकल्पाच्या केंद्रीय मंडळाने केलेल्या तिच्या तुकडीच्या कामाच्या वार्षिक मूल्यमापनात या निबंधाचा समावेश होणार होता. फ्रान्स्का आता अवकाशयानाच्या संचालनाच्या तुकडीत काम करत होती आणि आकाशगंगा प्रवास केंद्रात यान तयार करणाऱ्या पथकाला ती तुकडी सहकार्य करत होती.
तिने आपला कामाचा स्क्रीन बंद केला आणि एक कळ दाबून खोलीच्या भिंती पारदर्शक केल्या. संध्याकाळचा सौम्य प्रकाश तिच्या खोलीत भरून गेला आणि पारदर्शक भिंतींतून तिला आपल्या घराचा व्हरांडा, त्यापलीकडचं स्वयंप्रकाशी झुडुपांचं कुंपण आणि त्याही पलीकडची प्रशस्त हिरवळ स्पष्ट दिसू लागली. तारीकने कायमची विश्रांती पत्करली त्याला पाच वर्षं झाली होती. तिचं घर, पृथ्वी प्रकल्पाचं केंद्र असलेल्या मध्यवर्ती आण्विक जीवशास्त्र प्रयोगशाळेचं आवार हे सगळं जसंच्या तसंच होतं. आयुष्याची शेवटची दोन वर्षं तारीकने याच व्हरांड्यात बसून काढली होती. सगळं काही तसंच होतं. फक्त एकत्र बसून संध्याप्राशन करताना तिचा हात हातात घ्यायला, रात्री मिठीत घ्यायला तारीक जवळ नव्हता. तारीक गेल्यावर स्टीव्हने दोन वर्षं तिला उत्तम सोबत केली होती; पण तारीकची जादू स्टीव्हमध्ये नव्हती आणि त्याचं जग वेगळं होतं. फ्रान्स्का काही त्याच्याशी क्वांटम मेकॅनिक्सवर चर्चा करू शकत नव्हती. सिल्व्हन प्लेन्समधल्या अकादमीत काम करण्याची संधी आली आणि स्टीव्ह निघून गेला. पण तिला तारीकची जेवढी आठवण येत होती तेवढी स्टीव्हची येत नव्हती.
फ्रान्स्का व्हरांड्यात आली आणि दिवसभराचं काम संपवून उडत घरी परत जाणारे तरुण लोक पाहत उभी राहिली. गेल्या काही दिवसांपासून फ्रान्स्का घरूनच काम करत होती. आता प्रयोगशाळेत सारखं जाण्याची आवश्यकता उरली नव्हती.
उद्याचं माहिती सत्रसुद्धा एक औपचारिक सत्रच होतं. यान जवळजवळ तयार झालं होतं. गेल्या दोन दशकांत झालेल्या सगळ्या आकाशगंगा प्रवासांत वापरण्यात आलं होतं; तसंच या प्रवासात देखील ताऱ्याची ऊर्जा आणि अवकाश आकुंचन (स्पेस वार्प) तंत्र यानाला गती देण्यासाठी वापरण्यात येणार होतं. स्वर्ग आणि पृथ्वी यांमधील जवळजवळ पाच प्रकाश वर्षांचं अंतर ते यान पाच वर्षांत ओलांडणार होतं; पण अवकाशातून प्रचंड वेगाने प्रवास केल्यामुळे यानातील यात्रेकरूंसाठी काळ आकुंचन पावणार होता. त्यांच्या दृष्टीने हा प्रवास केवळ एका वर्षाचा असणार होता.
फ्रान्स्काला वाटून गेलं की साक्षात्कार पूर्व मानवाला स्वर्गापर्यंतचा प्रवास किती कठीण वाटला असेल. त्यांची संस्कृती तेव्हा केवळ पहिल्या स्तरावरची होती. आताच्या मानवाप्रमाणे त्यांना तेव्हा ताऱ्यांची ऊर्जा वापरण्याचं ज्ञान अवगत नव्हतं. त्यांच्या यानांना गती देण्यासाठी ते पूर्णपणे अणुसंलयनाच्या (फ्यूजन) शक्तीवर अवलंबून असत. अर्थात या दोन ग्रहांमधील पाच प्रकाश वर्षांचं अंतर त्यांनी एका टप्प्यात पार केलं नव्हतं. तो एक अनेक पिढ्या चाललेला, अनेक ग्रहांवरच्या टप्प्याटप्प्यांनी केलेला संथ प्रवास होता. जुन्या तारामंडळात मंगळावर सुरू झालेल्या आणि रवीच्या ग्रहमालिकेत स्वर्गावर येऊन संपलेल्या या दूरच्या प्रवासात कधीतरी मानवाचं उन्नयन झालं होतं.
आता उलट दिशेने होणाऱ्या प्रवासात माणसाला काय गवसेल याचा फ्रान्स्का विचार करू लागली. पृथ्वी प्रकल्पाच्या नेमणूक तुकडीने कसून तपासणी करून चाळीस तरुण विद्यार्थ्यांची निवड केल्याची बातमी गेल्या आठवड्यात बातमी फलकावर झळकली होती.
फ्रान्स्काच्या मनात विचार आला, केवळ पंधरा वर्षांची कोवळी मुलं! प्रकल्पाविषयी काय माहीत असणार त्यांना? आता कुठे त्यांनी अकादमीत प्रवेश केला आहे. लहानच आहेत ती! पण पृथ्वीपर्यंतचं अंतर काटून तीच जाणार आहेत आणि प्रश्नांची उत्तरं घेऊन परतणार आहेत. तरुण मुलांच्या मानसिक शक्तीवर साल्चरचा फार विश्वास होता. हा प्रकल्प काही सोपा नव्हता. सर्वांनीच हे मान्य केलं होतं – विशेषतः पृथ्वीवरचं वास्तव्य. अकरा वर्षांनी परतणार होते हे प्रवासी. एकदा का अवकाशयान प्रवासाला निघालं; की प्रकल्पाच्या आताच्या कार्यकारिणीचं काम संपणार होतं. पृथ्वीवर उतरणारे अंतराळवीर तिथे जे प्रयोग करतील त्यांच्या निकालांचा अभ्यास करण्यासाठी साल्चर बहुतेक नव्या संघाची निवड करेल. पृथ्वीवर जाणाऱ्या दलाची निवड करण्यासाठी नेमलेल्या टीमपेक्षा त्याचं काम पूर्णतः वेगळं असेल. केंद्रीय मंडळ तेच राहील बहुधा; पण अंतराळवीर पृथ्वीवर गेल्यानंतर अकरा वर्षांपर्यंत किती जणांचा या प्रकल्पात रस कायम राहील हा एक प्रश्नच होता. अंतराळवीरांचे पालक, मित्र-मैत्रिणी आणि सहकारी यांनीसुद्धा तोपर्यंत आयुष्याच्या दुसऱ्या पर्वात प्रवेश केलेला असेल.
आपणसुद्धा तेव्हा वयाच्या शहात्तराव्या वर्षी काय करत असू कोण जाणे, फ्रान्स्काच्या मनात विचार आला.
_______________________________________________________________________________________________
घराच्या गच्चीवर बसवलेल्या दुर्बिणीशेजारी बसून आरुषीची आई विचार करत होती. याच गच्चीवर आपल्या लेकीसोबत ताऱ्यांनी खच्चून भरलेल्या आकाशाकडे पाहत तिने कित्येक तास घालवले होते. आता पाच वर्षं आरुषी अकादमीत प्रशिक्षण घेणार होती. तो काळ सोपा असणार होता. तिच्या आईला स्वतःचं काम होतंच आणि ती आरुषीला रोजच आभासी भेट देऊ शकत होती. आठवड्यातून एकदा ती अजूनही आरुषीच्या वडिलांना भेटत होती आणि ते करमणुकीच्या आवारात जात होते आणि प्रत्येक सेमिस्टरच्या शेवटी जेव्हा आरुषी भेटायला येणार होती तेव्हा ते कुठेतरी एकत्र प्रवास करणार होते.
…पण आरुषी जेव्हा अंतराळाच्या प्रवासाला जाईल तेव्हा कसं होणार? ती अकरा वर्षं कशी काढणार? त्यादरम्यान आरुषीशी क्वचितच संपर्क होऊ शकेल. तिच्याकडून आलेला एखादा छोटासा निरोपदेखील पोचायला कित्येक महिने लागतील. त्याची वाट पाहत बसणं खूप कठीण होईल. छे! ते काही बरोबर होणार नाही. कदाचित तिला एखादा मित्र शोधायला हवा. आपल्या बाळाचं संगोपन करण्याची अत्यधिक आवड आता कमी करणं गरजेचं होतं. ते बाळ आता मोठं झालं होतं. आता स्वतःसाठी दुसरा काहीतरी छंद जोपासणं आवश्यक होतं.
————————————————————————————————————–
आजच्या इतका उत्साह काईजाला गेल्या कित्येक महिन्यांत वाटला नव्हता. शास्त्रीय परिसंवाद नुकताच संपन्न झाला होता आणि त्याच्या विद्यार्थ्याने प्रस्तुत केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. अर्थात सर्वांनाच माहीत होतं, की तो काईजाचा आवडता प्रकल्प होता. गेली कित्येक वर्षं त्याने पाहिलेलं स्वप्न होतं ते. काही जणांचा अजून त्यावर विश्वास नसला तरी सर्वात जवळच्या कृष्णविवराकडे एक शोधयान पाठविण्याच्या प्रस्तावाला परिसंवादात मान्यता मिळाली होती. यानंतर आकाशगंगा प्रवास केंद्राला ते यान तयार करण्यास पाच वर्षं लागणार होती. त्यावर बसवलेली उपकरणं गुरुत्वकण प्रयोगशाळेकडे माहिती पाठवत राहतील – स्वर्गावरून उड्डाण केल्यापासून ते कृष्णविवराच्या घटना क्षितिजावर नष्ट होईपर्यंत… किंवा त्यापेक्षा काही वेगळं घडेपर्यंत.
त्या विचाराने काईजाला खूप समाधान वाटलं. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा त्याने त्याचा क्रांतिकारी शोधनिबंध सादर केला होता आणि माहिती कणांच्या शोधाबद्दल जेव्हा त्याला अपार प्रसिद्धी मिळाली होती तेव्हा जितके आपण नर्व्हस झालो होतो तितके आता आपण भित्रे नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं. काही वर्षांनी प्रसिद्धी ओसरली होती आणि त्याच्या मैत्रिणींनी त्याला त्याचं गणितं आणि समीकरणांचं एकलकोंडं आयुष्य जगायला सोडून दिलं होतं. फ्लो निघून गेल्यावर तो परत त्याच्या साध्या जीवनशैलीकडे वळला होता. त्यांच्या एकत्र आयुष्यासाठी फ्लोने तयार केलेलं ऐषारामाचं घर त्याने सोडून दिलं. केवळ सवय म्हणून किंवा समाज ज्याला प्रौढ आयुष्याचे विशेष अधिकार समजतो त्याप्रमाणे वागण्यासाठी त्याने एक दोन स्त्रियांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता; पण ते मैत्र कधीच फार वेळ टिकलं नाही. स्त्रियांना त्याच्या भिडस्त स्वभावाचा लवकरच कंटाळा येई आणि फ्लोबरोबरचं आयुष्य ज्या बौद्धिक चकमकींनी भारलेलं होतं त्याची सर इतर कोणत्याच नात्याला आली नाही. काही काळानंतर काईजाला त्याच्या आयुष्यात कोणी स्त्री नसल्याचं काही वाटेनासं झालं. तो एकटाच मजेत होता. मनुष्यांबरोबर होणारा त्याचा संपर्क फक्त त्याच्या विद्यार्थ्यांपर्यंतच मर्यादित होता. आणि त्यात त्याला अतिशय समाधान मिळत होतं. त्यांच्या मनात फुलणारे बुद्धिमत्तेचे स्फुल्लिंग विचारपूर्वक केलेल्या शोधयात्रेत वृद्धिंगत करणं त्याला आवडायचं. त्याचे अनेक विद्यार्थी सैद्धांतिक भौतिक शास्त्रात संशोधन करणारे आघाडीचे शास्त्रज्ञ होते. गुरुत्वकण प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याव्यतिरिक्त काईजा सगळ्या – बारा अकादमींमध्ये शिकवायला जात असे.
पण आता शिकवण्याची ती सगळी कामं थोडी मागे सारावी लागणार होती. आता त्याला कृष्णविवर प्रकल्पावर काम करायचं होतं – प्रयोगांची आखणी करायची होती आणि आकाशगंगा प्रवास केंद्राबरोबर काम करायचं होतं. त्याचं स्वप्न शेवटी पूर्ण झालं होतं. आणखी पाच वर्षांनी ते यान उड्डाण करणार होतं आणि त्यानंतर सहा वर्षांनी जवळच्या कृष्णविवराच्या सर्वात जवळच्या सुरक्षित टप्प्यावर पोचणार होतं. त्यानंतर वर्षभर ते यान कृष्णविवराच्याभोवती एका मोठ्या वर्तुळात प्रदक्षिणा घालणार होतं आणि सरते शेवटी ते कृष्णविवराच्या घटना क्षितिजात उडी घेणार होतं.
कृष्णविवरांबाबत काईजाच्या मनात एक सिद्धांत होता. त्याच्या मते, एखादी वस्तू जेव्हा कृष्ण विवरात पडते तेव्हा नष्ट झालेली माहिती विश्वात कुठेतरी पुन्हा प्रकट होते. या माहितीच्या नष्ट होण्यात आणि पुन्हा प्रकट होण्यामधील दुवा शोधण्यात तो आपलं संपूर्ण आयुष्य घालवत होता. माहितीचं माहिती कणांत (infotons) विघटन होतं हे त्याला माहीत होतं. एका माहिती कणात एक प्लँक बाईट माहिती साठवलेली असते. (1.616 x 10-35 m by 1.616 x 10-35 m म्हणजे एक प्लँक. हे क्षेत्रफळ विश्वातील सूक्ष्मातिसूक्ष्म मानलं जातं. एवढ्या क्षेत्रफळात ln(2)/4 bits इतकी माहिती साठवता येते.) एका कृष्णविवरात नष्ट झालेले माहिती कण इतरत्र कसे प्रकट होतात किंवा त्यांच्यातील माहितीचे इतर माहिती-कणांत कसे संक्रमण होते हे अजून ज्ञात नव्हते. काईजाच्या मते, अवकाशयानासारखी एखादी नियंत्रित वस्तू जवळच्या कृष्ण विवराकडे पाठवणे हा ती प्रक्रिया तपासून पाहण्याचा एक मार्ग होता. कृष्णविवराच्या कल्पनातीत प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे नष्ट होईपर्यंत ते यान प्रयोगशाळेकडे नियमितपणे संदेश पाठवत राहील. आता केवळ सैद्धांतिक समीकरणांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष प्रायोगिक तपशिलांवर काम करण्यासाठी काईजा खूप उत्सुक होता. त्याने आपला कॉम उचलला आणि आपल्या मित्राशी – अमरशी – संपर्क साधला.
“काईजा, अरे मी तुलाच फोन लावत होतो. अभिनंदन! मी ऐकली बातमी.”
“थॅंक्स! शेवटी एकदा मला काहीतरी ठोस प्रयोग करायला मिळणार.”
“तू गुरुत्व प्रयोगशाळेतूनच काम करणार, का तुला आकाशगंगा प्रवास केंद्रात जावे लागेल?”
“हो. काही महिन्यांसाठी मला आकाशगंगा प्रवास केंद्रात जावे लागेल. तिथे किती दिवस राहावे लागेल ते सांगता येत नाही. तिथे माझी गरज संपली, की परत माझ्या प्रयोगशाळेत यायलाच मला आवडेल. मला इथेच बरं वाटतं हे तर तुला माहीतच आहे.”
“आकाशगंगा प्रवास केंद्रात जाण्यापूर्वी तू दोन दिवस इथे येऊन जा.”
“तूच इथे ये असं मी सुचवणार होतो. आपण टेनिसच्या मॅचेस खेळू आणि प्राशन करू. अवकाशयानातील प्रयोगांच्या काही कल्पनांविषयीदेखील मला तुझं मत हवं आहे.”
अमरला अर्थात कल्पना होतीच; की त्याच्या मित्राला त्याच्या गुहेतून बाहेर काढणं केवळ अशक्य होतं. म्हणून त्याने काईजाला भेट देण्याचं मान्य केलं. ॲनाबरोबर ठरलेली भेट त्याला रद्द करावी लागणार होती; पण ती वाईट वाटून घेणार नाही हे त्याला माहीत होतं. ती जिथे काम करते त्या केंद्रीय वाचनालयातील तिच्या एखाद्या प्रियकराबरोबर बहुतेक ती वीकेंड घालवेल. आणि काईजाबरोबर दोन दिवस घालवल्यानंतर कदाचित त्याला आणखी उत्तरेकडे जाऊन नताशाबरोबर एखाद-दुसरा दिवस घालवता येईल. नाहीतरी केंद्रावर्ती खजिनामंडळाची उपसंचालक म्हणून ती जिथे काम करत होती त्या नीबो गावापर्यंतचं निम्मं अंतर तो प्रवास करून जाणार होताच. त्याचा पालक-करार संपून सहा महिने झाले होते आणि त्या काळात त्यांच्या फक्त एक दोन आभासी भेटी झाल्या होत्या. अमरने आपल्या कॉमला नताशाशी संपर्क साधण्याचा तोंडी आदेश दिला.
________________________________________________________________________________________________
आरुषीच्या आईने आपल्या मैत्रिणीचा – वीणाचा निरोप घेतला आणि ती झिप्परमध्ये बसली. झिप्पर घराच्या दिशेने वेगाने जाऊ लागली आणि तिच्या मनात विचारांची गर्दी उसळली. आरुषीची पृथ्वी प्रकल्पात शिकाऊ सदस्य म्हणून निवड झाल्याचे तिने वीणाला सांगितले होते. वीणाला ती बातमी ऐकून अतिशय आनंद झाला होता. अकादमीत शिकायला जायच्या आधीपासून त्या दोघी मैत्रिणी होत्या आणि आरुषीच्या आईला वीणाचं मत महत्त्वाचं वाटे. जेव्हा तिच्या आयुष्यात अनिश्चितता आणि नैराश्य वाट्याला आले होते तेव्हा वीणानेच तिला आधार दिला होता. दोघीही एकाच अकादमीत शिकल्या होत्या. पुढे वीणाने जीवशास्त्रात उच्च शिक्षण घेतलं आणि आता ती प्रथिनांची कार्यशीलता वाढवण्याच्या एका प्रकल्पावर काम करत होती. तिने स्वतः जरी कधी कुठल्या पुरुषाबरोबर पालक करार करून स्वतःची मुलं वाढवली नव्हती; तरी तिचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि आश्वस्त करणारा होता.
आरुषीने पृथ्वी प्रकल्पासाठी तिची निवड झाल्याची बातमी सांगितल्यापासून तिच्या आईला आरुषीच्या पपाच्या भूमिकेचं नवल वाटत होतं. पृथ्वीवर जाणाऱ्या दलाची एक संभाव्य सदस्य म्हणून आरुषीने प्रशिक्षण घेण्यास त्याचा का विरोध होता हे तिला समजत नव्हतं. प्रकल्पात सामील झाल्याने तिचं आयुष्य वाया जाईल असं त्याला का वाटावं हे तिला कळत नव्हतं. तिने त्याला समजवायचा प्रयत्न केला होता. प्रत्यक्ष पृथ्वीवर जाण्यासाठी होणार्या शेवटच्या परीक्षेनंतर जरी आरुषीची निवड नाही झाली तरीदेखील तिला अंतराळवीर होण्याचं प्रशिक्षण मिळालेलं असेल आणि ती अंतराळातील इतर मोहिमांवर जाऊ शकेल. इतर शिकाऊ अंतराळवीरांना ती प्रशिक्षण देऊ शकेल आणि आकाशगंगा प्रवास केंद्रात काम करू शकेल आणि समजा त्या कठीण प्रशिक्षणाचा किंवा अंतराळातील मोहिमांचा तिला कंटाळा आला; तरी ती भौतिकशास्त्र किंवा उड्डाण शास्त्रासारखा संबंधित विषय निवडून त्यात आयुष्यभर काम करू शकेल; पण यांपैकी काहीही ऐकायला पपा तयार नव्हता. ती आरुषीच्या निर्णयाला जेवढा अधिक पाठिंबा देत होती, तेवढा तो तिच्यावर जास्त रागावलेला दिसत होता.
त्याच्या आईच्या घरून तो परत आलाच नाही आणि आरुषी अकादमीत गेल्यावर सहा महिन्यांतच त्याचं संभाषण खूपच कमी झालं. शेवटी आरुषीच्या आईने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि आपल्याच अंतःप्रेरणेने वागायचे ठरवले. ती जवळजवळ रोजच आपल्या लेकीशी बोलत होती. दर आठवड्याच्या शेवटी त्यांच्या आभासी भेटी होत आणि पुढच्या महिन्यात तिची सेमिस्टर संपल्यावर आरुषी प्रत्यक्ष भेटायला येण्याची ती वाट पहात होती.
तिला माहीत होतं, की आरुषी आता अकादमीत रुळली होती. पहिली दोन वर्षं तिचं प्रशिक्षण मुख्यतः पुस्तकीच होतं. फक्त आठवड्यातून एकदा शरीर मजबूत करण्यासाठी आणि दम वाढवण्यासाठी कवायत होती. अनिवार्य असलेले गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आण्विक शास्त्र हे विषय आणि तिचे आवडते विषय – मानवाचा इतिहास आणि कॉंप्युटेशन – हे सगळं आरुषी शिकत होती. लवकरच ती तिच्या आई आणि वडिलांच्यापेक्षा अधिक सुशिक्षित होईल याचा आईला अत्यंत अभिमान होता.
पण तिच्या मनात खोलवर एक गोष्ट तिला खटकत होती. पृथ्वी प्रकल्पात सामील होण्याच्या आरुषीच्या निर्णयाला दुजोरा देण्यात तिने काही चूक तर नव्हती ना केली? या प्रकल्पात आरुषीला त्यांच्या तारामंडळापासून दूर असलेल्या एका ग्रहापर्यंत प्रवास करावा लागेल. तिच्यावर काही संकट आलं तर? म्हणजे प्रवासात ती सुरक्षित राहील पण सर्वात भयंकर अशा महायुद्धानंतर त्याग केलेल्या ग्रहावर राहणं कितपत सुरक्षित असेल? तिथे ती एक संपूर्ण वर्ष अनोळखी सहकाऱ्यांबरोबर राहणार. पृथ्वीच्या इतिहासाचा त्यांच्या वर्तनावर काही परिणाम तर नाही ना होणार? पृथ्वीवर गेल्यावर आपला उत्क्रांत मानवाचा स्वभाव सोडून ते हिंस्र पशूंसारखे वागतील का? पृथ्वीवरील जीवांचं काय? अखेरच्या युद्धाच्या शेवटी विनाशकारी अण्वास्त्रांनी मनुष्य जात नष्ट केली त्या घटनेला हजार वर्षं लोटल्यावर आता तिथे जीवन आहे की नाही हे कोणालाच माहीत नाही. मनुष्यांना अजूनही हानी पोचवू शकतील असे सूक्ष्म जीवाणू किंवा किरणोत्सर्ग तिथे असेल तर? अशा परिस्थितीत तिची लेक कोणत्याही मदतीपासून कोट्यवधी मैल दूर असेल.
पण गेल्या सहा महिन्यांत तिने पृथ्वी प्रकल्पाविषयी बरंच वाचलं होतं आणि या सगळ्या शंकांचा विचार प्रकल्पातील लोक करत होते हे तिला माहीत होतं. तरी… तरीपण… अज्ञाताचं भय होतंच. पण ही भीती ती जेव्हा आरुषीला बोलून दाखवायची, तेव्हा प्रकल्पातील धोक्यांपेक्षा त्याचे फायदे जास्त आहेत हे आरुषी तिला पटवून द्यायची आणि तिचा उत्साह आणि आवड बघून आईला ते कबूल करणं भाग पडायचं. पण एकटी असल्यावर तिच्या मनात खोलवर ही भीती रेंगाळायचीच.
_______________________________________________________________________________________________
“त्यांनी एकमेकांची हत्या केली, इतरांचा छळ करण्याच्या हजारो तऱ्हा त्यांनी शोधून काढल्या, अगदी लहान मुलांनादेखील त्यांनी सोडलं नाही. लैंगिक खेळणी म्हणून ते त्यांना विकत घेत आणि त्यांच्या वेदना बघून त्यांना विकृत आनंद होत असे. संस्कृतीच्या ऱ्हासानंतर जेव्हा मनुष्याला जीवनात कोणताच आनंद उरला नाही, तेव्हा मनुष्य अत्यंत हिंस्र झाला. भविष्यकाळाची आशा नष्ट झाली आणि आयुष्याची शाश्वती क्षणभंगुर उरली, तेव्हा नातीगोती जोपासायला माणसापाशी वेळच उरला नाही. अगदी आठ वर्षांच्या मुलांच्या हातातही बंदुका आल्या. त्याहीपेक्षा लहान असलेली आणि स्वतःचं संरक्षण करू न शकणारी मुलं इतरांच्या वासनेला बळी पडली. हातात शस्त्र धरल्याने सामर्थ्यवान झालेले लोक काही क्षणांसाठी विकृत समाधान मिळवू लागले आणि मग स्वतःच त्यांच्यापेक्षा सामर्थ्यवान असलेल्या लोकांची शिकार होऊन मानवी विकृतीच्या रंगमंचावर नाचवले जाणारे बाहुले बनले.
पृथ्वीच्या वर्षगणनेच्या पंचविसाव्या शतकात जेव्हा अखेरचे युद्ध सुरू झाले त्यानंतर जीवनावश्यक सामग्री झपाट्याने संपुष्टात येऊ लागली. सुरुवातीला वेगाने संपत चाललेल्या तेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी युद्ध होऊ लागले. त्या काळी जमिनीच्या पोटातील तेल हेच ऊर्जा मिळवण्याचे प्रमुख साधन होते. केंद्रीय सत्तेच्या आधिपत्याखाली असलेल्या भूमीनुसार पृथ्वी वेगवेगळ्या देशांत विभागलेली होती आणि प्रत्येक देशात या केंद्रसत्तेचे स्वरूप वेगळे होते. या कृत्रिम सीमारेषांनी निश्चित केलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना त्या देशांचे नागरिक म्हणत. ज्या देशांमध्ये तेलाचे साठे होते तिथले लोक फारसे शिकलेले नव्हते आणि त्यांची अर्थव्यवस्था मागासलेली होती. या देशांतील काही दांडगट लोकांनी या संपत्तीचा ताबा घेतला होता आणि तेलाचा व्यापार करून नफा कमावला होता. हे लोक बहुतेक पुरुष होते आणि ते इतरांना – विशेषतः बायकांना – आपल्या आधिपत्याखाली ठेवत आणि त्यांच्यावर अनेक प्रकारची बंधने घालत. तेलाचा साठा जसजसा कमी होऊ लागला, तसे प्रगत देश ऊर्जेचे नवे स्रोत शोधू लागले.
पण तेलाच्या साठ्यांवर नियंत्रण करण्यासाठी पेरलेली युद्धाची बीजं वेगाने अंकुरित झाली आणि त्याचं मोठ्या युद्धांत परिवर्तन झालं. थोड्याच दिवसांत पाण्याचाही तुटवडा पडला आणि युद्धं आणखी भडकली. त्याचा शेतीवर परिणाम झाला. रोगाच्या साथी आणि प्रदूषण यांचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आणि त्यामुळे अणुयुद्धाला सुरुवात झाली. पृथ्वीचे मोठमोठे प्रदेश वसतीसाठी निरुपयोगी झाले आणि मृत्यू लाखो लोकांच्या मानगुटीवर बसला. पूर्वी कधीही पाहिलं नसेल असं क्रौर्य पृथ्वीच्या सुरक्षित भागांत खेळू लागलं. ज्या थोड्या देशांकडे प्रगत तंत्रज्ञान होतं ते देश इतर भागांतल्या आजारी आणि मरणोन्मुख जनतेवर आसुरी सत्ता गाजवू लागले. जेव्हा अन्नाचा आणखी तुटवडा पडला आणि पिकवलेलं अन्न अपायकारक झालं, तेव्हा माणूस माणसाला खाऊ लागला.
पृथ्वीवर विनाशाची अखेरची घंटा वाजली होती. मानवजात संपूर्ण विनाशाकडे वाटचाल करत होती.
तोवर पृथ्वीबाहेर अनेक वसाहती कार्यरत झाल्या होत्या. विशेषतः मंगळ आणि युरोपावरील वसाहतींनी चांगली प्रगती केली होती. तिथे राहणारे बहुतेक लोक शास्त्रज्ञ होते. अखेरच्या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात, जेव्हा मानवी संस्कृतीचा विनाश अटळ आहे हे स्पष्ट झालं, तेव्हा मंगळावरच्या अनेक शास्त्रज्ञांनी मानवी संस्कृतीचे उरलेसुरले अवशेष वाचवण्याचे भगीरथ प्रयत्न केले. युद्धाने ग्रस्त असलेल्या पृथ्वीवर त्यांनी गुपचूप वाऱ्या केल्या आणि तिथल्या प्रमुख शास्त्रज्ञांना, कलावंतांना, लेखकांना, तत्त्वज्ञानी व्यक्तींना, शिक्षणतज्ज्ञांना, डॉक्टरांना त्यांनी वाचवलं. कलेचे नमुने आणि साहित्य, संगीत, उत्तम शिल्पं आणि हस्तकलेचे नमुने त्यांनी वाचवून मंगळावर नेले; तरीदेखील, पृथ्वीवरील एके काळी नांदणारी विस्तृत, विविधतेने नटलेली, समृद्ध आणि बहुरंगी संस्कृती शेवटच्या मानवांबरोबरच बव्हंशी नष्ट झाली.
या विनाशातून सावरून एका उन्नत वंशात त्यांचे रूपांतर होण्यास, दुसऱ्या श्रेणीची प्रगत संस्कृती (Type II civilization) होण्यास आणि स्वर्गाचा शोध लागण्यास मानवाला आणखी पाच शतके लागली. या ग्रहावर मानवांच्या पहिल्या तुकडीने पाऊल ठेवल्यानंतर आणि मानवी वसाहतीसाठी त्यावर अभियांत्रिकी प्रयोग केल्यानंतर पुन्हा एक संपन्न आणि विविधतेने नटलेली संस्कृती निर्माण व्हायला आणखी पाचशे वर्षं जावी लागली; मग शांतता परतली, सगळ्या शारीरिक गरजा यथोचित भागविण्याची क्षमता निर्माण झाल्याने माणूस आता त्याच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष देऊ लागला. आता पृथ्वीवर परत जाण्याची वेळ आली होती आणि मानव कुठे चुकला होता हे समजून घेण्याचीही.”
प्राचीन संस्कृतीच्या विनाशावर लिहीत असलेला निबंध आरुषीने संपवला आणि एक आळस दिला. तिच्या लक्षात आलं की आपण निबंध लिहिण्यात इतके गुंग होऊन गेलो होतो की तिन्हीसांज झाल्याचंही आपल्या लक्षात आलं नाही. रविअस्त केव्हाच होऊन गेला होता आणि आई तिच्या फोनची वाट बघत असणार. तिने पट्कन ध्वनिआदेश दिला आणि आईशी संपर्क साधला.
“हॅलो बिट्टू. अभ्यास चालला होता वाटतं.”
“हो, आई. प्राचीन संस्कृती नामशेष झाली त्यावर मला निबंध लिहायचा होता. तोच लिहीत बसले होते आणि आत्ताच लिहून संपवला. तुझा दिवस कसा गेला?”
“छान! ऑफिसमध्ये बरंच काम होतं आज. मग घरी आले. बागेवरून उडत थोडा वेळ भरारी मारली. रविअस्त बघितला. आत्ताच संध्याप्राशन केलं. तू केलंस का?”
“नाही. आता करेन.”
“तब्येतीची हेळसांड करू नको बिट्टू. अंतराळाच्या प्रवासासाठी तुला तब्येत अगदी ठणठणीत ठेवावी लागेल. दिवसातून दोनदा ऊन्ह खा आणि वेळच्या वेळेला प्राशन कर.”
“अर्थातच, आई. माझ्या तब्येतीची काळजी करू नको. सगळ्या शिकाऊ दलातील व्यक्तींच्या तब्येतीचं निरीक्षण त्यांनी चालू केलं आहे. आम्हांला विशेष शक्तिवर्धक पेयंपण दिली जातात. पुढच्या महिन्यापासून आमची विशेष रोगप्रतिकारक औषधं सुरू होतील.”
“रोगप्रतिकारक औषधं? म्हणजे काय?”
“आमची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खास बूस्टर डोस. पृथ्वीवर जर काही सूक्ष्म जीवाणू उरले असतील तर त्यांच्यापासून संरक्षण म्हणून. आम्ही जरी बहुतेक वेळ आमच्या फुग्यांच्या आतच राहणार असलो, तरी तब्येतीवर परिणाम होईल अशा कोणत्याही जीवाणूचा प्रतिकार करण्याची क्षमता आमच्या शरीरात असायला हवी. तुला माहीत आहे, पूर्वीच्या काळी या जीवाणूंमुळे माणसं आजारी पडायची. आता आपली शरीरं जरी अधिक प्रतिकारक्षम असली तरी पृथ्वीवर जाणाऱ्या दलातील प्रत्येक व्यक्तीला देण्यात येणाऱ्या बूस्टरमुळे त्यांची शरीरं कोणत्याही जंतूंचा प्रतिकार करायला समर्थ असतील.”
“ठीक आहे. तू काळजी घे. तुला काही हवं असलं तर मला सांग.”
“ठीक आहे, आई.”
आई अजूनही दुसऱ्या कोणाबरोबर राहत नव्हती हे आरुषीला एका दृष्टीने बरंच वाटलं. तिला जरी नव्यानेच मिळालेलं स्वातंत्र्य आणि मोठे झाल्याची जाणीव आवडत होती, तरी तिला आपल्या आईशी आणि पपाशी अजूनही सारखं बोलायला आवडायचं. पपा आता स्टारव्हिलेमध्ये राहत होता. ते गाव एडनच्या जवळच होतं आणि त्याच्या कामाच्या जागेच्या लगतच होतं.
पहिल्या सेमिस्टरच्या शेवटी जेव्हा आरुषी आईला आणि पपाला भेटायला गेली होती तेव्हा त्या तिघांनीही एका कुटुंबासारखं वागण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण तो एक प्रयत्नच होता हे तिघांनाही कळून चुकलं होतं. आरुषी आता मोठ्या माणसासारखी वागत होती. तिचा पूर्वीचा लहान मुलासारखा स्वच्छंदी स्वभाव आता बदलला होता आणि आईला तो बदल जाणवत होता. पपा आपल्याला तसा काही फरक जाणवलाच नाही असं दाखवत होता. तरीदेखील बापलेकीच्या मध्ये आरुषीच्या पृथ्वी प्रकल्पाच्या सदस्यत्वाचा न सुटलेला प्रश्न होताच. त्यावर जेव्हा ते चर्चा करत तेव्हा त्याचा आईलाच जास्त त्रास होई.
—————————————————————————————————————-

