झुकझुक आगीनगाडी: ८  

पंढरपूर – मिरजचे आता ब्रॉड गेजमध्ये  रूपांतर होणार म्हणून काही दिवसांनी आम्ही सर्व खातेप्रमुख   पंढरपूर-मिरज विभागात  गेलो; कारण आता तो मार्ग मीटर – गेजच्या ऐवजी ब्रॉड गेजमध्ये (सोप्या भाषेत मार्गाचे विस्तारण होणार)  रूपांतरित  

होणार होता. आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या विभागाची उपकरणे, यंत्रे काढणार होतो. ती आमची मीटर गेजवरील शेवटची यात्रा होणार होती आणि तो रेल्वे मार्ग बंद होणार होता. या मार्गावरील झालेले वारकर्‍यांचे /प्रवाशांचे  किस्से  तो  मार्ग बंद करण्याआधी आठवले. 

पु.लंनी जर ह्या गाडीने प्रवास केला असता; तर त्यांनी व्यक्ती आणि वल्लीमध्ये ‘वारकरी आणि रेल्वे’  किंवा ‘वारकरी सखाराम  गटणे’ आणि ‘Ticket Checker नारायण’ असे  हसू /आसू लेख नक्कीच लिहिले असते.  ह्या मार्गावरील मी अनुभवलेले काही किस्से.

एक महिला प्रमुख वारकरी हातात पोत (जोगतिणीच्या हातात जी कापडाची जाड गुंडाळी केली असते  त्यावर तेल टाकून पेटवली जाते तिला ‘पोत’ असे म्हणतात.) घेऊन  फक्त २०/- रुपयांमध्ये बऱ्याच वारकऱ्यांसह मिरज ते पंढरपूर आणि परत मिरज असा प्रवास करायची. ती त्यांचे तिकीट कधीच काढायची नाही आणि जर विनातिकीट वारकरी पकडला गेला तर तो  वारकरी ह्या महिलेकडे बोट दाखवायचा. स्टेशनवर/डब्यात   गोंधळ व्हायचा. ते दंडासाठी पैसे भरत नव्हते. महिला RPF कडून तपासणी केली तरी पैसे मिळायचे नाहीत. अशा महिला प्रवाशांना मग  TC उड्या मारायला लावायचे. मग काही गुप्त ठिकाणी लपवलेले पैसे खाली पडायचे  आणि दंडाची रक्कम  वसूल केली  जायची. सदर महिलेकडे  काहीही प्रकार केले तरी पैसे नाही मिळायचे. “जेलमध्ये जावे लागेल, तुला शिक्षा होईल, ” असे सांगूनदेखील त्या महिलेला जरासुद्धा भीती वाटत नव्हती; उलट तिचा हट्टच असायचा, “जेलमध्ये टाका, आम्ही बघून घेऊ!” तिचा आत्मविश्वास जरा जास्तीच दांडगा होता. त्या महिलेकडून दंड वसूल करण्याचा वाद बराच वेळ चालायचा. शेवटी तिला आणि तिच्या साथीदारांना जिथे उतरायचे आहे ते गाव यायचं आणि ते सगळे त्या गावाला उतरून जायचे. टी.सी.च्या हाती काहीच नाही लागायचं. त्यांचा हा उद्योग  बरेच दिवस  चालला  होता; मग एक दिवस ती महिला आणि तिचे साथीदार  पकडले गेले आणि “दंड भरणार नाही जेलमध्ये घाला,”असा नेहमीप्रमाणे तिचा हेका चालू झाला. कोणत्याही तपासणीत पैसे मिळाले नाहीत. अचानक एका  महिला RPFची नजर तिच्या हातात असलेल्या  पोतावर गेली.  महिला RPF ने तिला पोत पेटवायला सांगितले. ती बाई पोत पेटवण्यास नकार देऊ  लागली, “रुक्मिणीसमोर पेटवायचे असते, अशी कुठेपण पेटवता येत  नाही, तुम्हांला काय कळतंय त्यातलं, मला नका शिकवू! मी पोत पेटवणार नाही म्हणजे नाही,” अशा थापा मारू लागली.  त्या  महिला RPF ने तिच्या हातातील पोत खेचून घेतली आणि ती पोत उलगडू लागली. तिने जशी ती पोत उलगडायला सुरुवात केली तशी त्यातून  नोटा आणि नाणी पडू लागली आणि मग जमा झालेल्या रकमेतून दंड वसूल केला गेला. त्यानंतर मात्र तो प्रकारही बंद झाला. असे फसवे आणि फसवणारे  वारकरी कोणीकडे आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म! भेदाभेद भ्रम अमंगळ! म्हणणारे  वारकरी कोणीकडे! 

ज्ञानेश्वर माउली  म्हणतात, “एक तरी ओवी अनुभवावी!”  तसे मी म्हणेन,  “एक तरी वारी अनुभवावी.” पंढरपूर वारीमध्ये सर्व  प्रकारच्या मनुष्य प्रवृत्तींचे दर्शन घडतेच.  

आम्ही प्रत्येक स्टेशनवरील  उपकरणे काढून  घेत होतो. आमची तांत्रिक वारी  पंढरपूरहून मिरजेकडे चालली होती. मला ह्या मार्गावरील रेल्वेचा मजेशीर इतिहाससुद्धा मिळत गेला.

पंढरपूर मिरजचे Gauge Conversion ( Meter Gauge to Broad gauge) चालू झाले होते. प्रवासी वाहतूक बंद होती. काम करणाऱ्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक खास ट्रेन चालू ठेवली होती. प्रत्येक खाते  आपापली कामे करत होते.  प्रत्येक स्टेशनला स्टेशन मास्तर जुनी रद्दी, रजिस्टर्स, महत्त्वाचे रिपोर्ट्स  संग्रहित  करत होते,प्रत्येक रजिस्टर त्या  त्या खात्याला देत होते. मी उत्सुकतेपोटी सर्व दैनंदिन रजिस्टर्स आणि इतर जुनी मॅन्युएल्स पाहत होतो. 

त्या वेळचे वेळापत्रक, सुरक्षाविषयक Circulars वाचताना मला गंमत वाटत होती. जुनाट असा खाकी कागद  आणि फर्राटेदार इंग्लिशमध्ये लिहिलेले काही कागद… उदा. : Degree certificate इ. अशा कामांसाठी त्या वेळी स्टेशन मास्तर लेखनिक ठेवत  असत. त्या वेळची उपकरणे आणि त्यांच्या देखभालीचे प्रत्येक खात्याचे रजिस्टर, त्या  तारखा  वाचताना जुन्या काळात गेल्यासारखे वाटत होते. तिकिटावरील  किमतीसुद्धा पैसे आणि आणे  यांमध्ये होत्या. अशा खूप गोष्टी सापडल्या. आम्ही त्या संग्रहालयाकरिता मुंबईला पाठविल्या.

.मला  तेथे काही गमतीशीर दंडात्मक कारवायांचे कागदपत्र आणि परिपत्रके मिळाली. त्या वेळची भाषा आणि  भाषाशैली यांचा कृपया आनंद घ्या.

  गाडी स्टेशनमध्ये उशिरा आणली होती म्हणून एका इंग्रज अधिकार्‍याने चालकावर दंडात्मक कारवाई केली होती. कारवाईला उत्तर म्हणून त्या चालकाने दिलेले स्पष्टीकरण  त्याच्याच शब्दांत :

“Cow’s husband came in front of engine so I stopped the train. when Cow’s husband gone. I started train and  I arrived at station with the train.” हे वाचल्यावर त्या इंग्रज अधिकाऱ्याची तळपायाची आग मस्तकात गेली. असा कोण हा Cow’s husband आहे आणि कोण ही इथली काऊ? त्या इंग्रज अधिकाऱ्याने आपला ताफा घेतला आणि ज्या ठिकाणी हा तथाकथित Cow’s husband आहे त्या ठिकाणी हा लवाजमा पोहोचला. Where is Cow’s husband? हा इंग्रज जोरात खेकसला, बिचार्‍या चालकाने शांतपणे रुळावर चरणाऱ्या ‘Cow’s husband’कडे  अर्थात बैलाकडे बोट दाखवले मग  खरा प्रकार लक्षात आला आणि  त्याची शिक्षा माफ झाली. मग एक नवीन  परिपत्रक (Circular) निघाले, “ रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या  शेतकऱ्यांनी जनावरांच्या गळ्यातील दोरी  – मोजक्याच लांबीची –  झाडाला/खुंटीला बांधावी जेणेकरून शेतकर्‍यांची जनावरे रेल्वे रुळावर येणार नाहीत. अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींसाठी नियम बनविणारे परिपत्रकांचे मोठे जग सुरू झाले. काही गमतशीर  परिपत्रके (Circulars) पुढे वाचनात येतीलच. 

      आणखीन एक किस्सा : मुंबईहून एका व्यापाऱ्याने मिरजेला एका मालगाडीतून  केळी पाठवली होती. मिरजेला वेळेत मिळाली नाहीत तर तो व्यापारी रेल्वेकडून दंड वसूल करणार होता.( विमा उतरवला होता.) मुंबईत सर्व वाघिणींमध्ये(त्या काळी  रेल्वे मालवाहतुकीच्या डब्यांना वाघिणी म्हणत.)  केळी भरली व चालक आणि गार्ड यांना योग्य त्या सूचना (Memo) दिल्या गेल्या आणि गाडी मुंबईहून सुटली आणि कुर्डूवाडीत सर्व केळी उतरवली आणि मिरजेकडे जाणार्‍या गाडीत भरली. काही अंतर गेल्यावर चालकाच्या लक्षात आले, की  त्या मार्गावरील एका स्टेशन  मास्तरने लाल झेंडा दाखवला होता. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. पुढच्या स्टेशनवर गाडी थांबवण्यात आली चालक आणि गार्ड खाली उतरले आणि गाडीचे निरीक्षण केल्यावर त्यांच्या लक्षात  आले, की (Hot Axel) झाले आहे. ( खूप घर्षणाने चाके फिरून, त्यांना जोडणारे Axel लालबुंद होतात आणि त्याचा व्यास वाढतो आणि चाके गोल फिरायच्या ऐवजी ओढली जातात  आणि रुळाला घासली जातात आणि गाडीला धोका निर्माण होतो. अशा वेळी नियंत्रण कक्षातून योग्य त्या सूचना दिली जाते आणि गाडी मार्गस्थ होते.) हे सर्व होण्यास वेळ लागेल म्हणून चालक आणि गार्ड यांनी एका डब्यातील केळी काढली आणि कुस्करून प्रत्येक Axel ला वंगणासारखी लावली. गाडी नियंत्रित झाली आणि  मिरजेला योग्य वेळी पोहोचली. समयसूचकता दाखवल्याबद्दल  त्या दोघांचा नंतर सत्कार केला  गेला.

त्या काळी मिरज हे सर्व Gauge अस्तित्वात असणारे स्टेशन होते. 

१)मिरज पुणे आणि मिरज कोल्हापूर…Broad Gauge

२)मिरज बेंगलोर…Meter Guage

३) मिरज पंढरपूर लातूर …Narrow

कालांतराने पंढरपूर ते मिरज  Gauge बदलणे ( दोन रुळांतील  अंतर Narrow Gauge…762mm आणि  Broad Gauge…1676mm )   हे काम झाले. CRS (Commissioner Of Rail Safety )  यांचे निरीक्षण झाल्यावर हा मार्ग राष्ट्राला समर्पित केला गेला. त्या वेळेला काही  स्टेशनांवर ग्रामस्थांनी इंजिनांची पूजा केली, मिठाई वाटली. चाकाखाली लिंबे ठेवली आणि आमची ब्रॉड गेजची  रेल्वे मिरजेकडे मार्गस्थ झाली.

मिरज स्टेशनवर पोहोचल्यावर गंमत  झाली. जशी आमची गाडी मिरज स्टेशनावर पोहोचली तशी स्टेशनाबाहेर ढोल-ताशे बँड  वाजू लागले. आम्हांला वाटले, जनता आमचे स्वागत करीत आहे; पण कारण दुसरेच होते – तृतीय पंथीयांचा कोणतातरी सण होता तो ते साजरा करत होते आणि त्याची  ती मिरवणूक होती.  आम्ही  सर्वजण खूप हसलो.

त्या काळी टपावरून प्रवास करणारे  प्रवासी /वारकरी 

———————————————————————————————–

Author

Leave a Reply