माझे सोलापूर आणि रेल्वे
अशा अनेक सुधारणा करत करत मी सोलापूरच्या बदलीसाठी वाट पाहत होतो आणि तो एक दिवस आला.
सोलापूर हे मध्य रेल्वेचे दक्षिण आणि उत्तर जोडणारे म्हणून आणि पेट्रोल/ डिझेल/मालवाहतूक आणि सिमेंटसाठीचे प्रसिद्ध असे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे इथे सर्वच खात्यांवर इतर ठिकाणी असलेल्या खात्यांपेक्षा जरा जास्तीची जबाबदारी असते; त्यामुळे दळण-वळण ठप्प होणे परवडणारे नव्हते. या गोष्टीचा मला चांगलाच फायदा झाला. कामाचा विस्तार पाहून एक नवीन जागा निर्माण करण्यात आली होती. ते माझ्या अगदीच पथ्यावर पडले. माझी बदली झाली आणि फायनली मी सोलापुरात आलो. प्रमोशन बाबतीतील वाद आता आटोक्यात आला होता. माझ्यावर खार खाऊन असणारी मंडळी आता बरीच शांत झाली होती त्यामुळे मीही जरा खूश होतो. त्यात सोलापूरची बदली म्हणजे ‘चेरी ऑन द केक.’ मी आता एक अनुभवी अभियंता झालो होतो. त्यामुळे माझ्या नोकरीत एक सहजता आली होती आणि वैयक्तिक आयुष्यपण आता स्थिरावलं होते.
नाना प्रकारची उपकरणे हाताळण्यापेक्षा माणसे आणि त्यातून सरकारी कर्मचारी हाताळणे अवघड असते हे एव्हाना कळून चुकले होते. अशा वेळी मला कायम बायबलमधील एक वचन आठवायचे, “आपला वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी आपण निवडू शकत नाही.” आणि या वचनाने कायम माझ्या मनाची समजूत काढली.
सोलापुरात आल्यावर मला शिफ्ट-इनचार्ज केले गेले. कधीकधी कामाच्या आधिक्यामुळे आणि स्टाफच्या कमतरतेमुळे मला शिफ्ट ड्युटीसुद्धा करावी लागत होती. रात्रपाळीमध्ये कधी कधी वाचायला आणि पडायलाही मिळायचे. कर्णपिशाच्च (Mobile फोन) आणि इंटरनेटचा प्रादुर्भाव नव्हता.
जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन निकोप असेल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला आनंद मिळतोच याचा अनुभव हळूहळू मला येत होता. माझ्या कार्यशैलीवर मीच खूश होतो आणि वरिष्ठसुद्धा!
सोलापुरात आल्यामुळे माझा दिनक्रम चांगलाच सुरू झाला होता. एक नवीन उपकरण ‘7GHz Harris Farinon U.S.A’ (रेल्वेच्या सर्वच प्रकारच्या अंतर्गत दळणवळणासाठी वापरले जाणारे उपकरण) मुंबई ते मद्रास या लिंकवर (लिंक म्हणजे प्रत्येक ४०/५० कि. मी.वरील स्टेशनची लाईन जिथे अशी उपकरणे लावलेली असतात) तिथे लावले होते. त्यामुळे भारतभर होणारे रेल्वेचे अंतर्गत दळणवळण आणि रेल्वे आरक्षण आणि इतर दळणवळण्याच्या सुविधा उत्तम चालू झाल्या होत्या. सदर उपकरण वापरण्यासाठीचे एक Technical Manual होते. त्याचा आकार म्हणजे आपल्या वीरकर यांचे तीन इंग्लिश-मराठी शब्दकोश एवढा होता. त्यामुळे ते कोणी वाचत नसत. उपकरणात काही गडबड झाली तर दुरुस्तीसाठी मुंबईला जावे लागायचे किंवा विचारावे लागायचे. हे सततचे मुंबई Repair Centre वर अवलंबून राहणे माझ्या मनाला काही पटत नव्हते. त्यामुळे सारखे मुंबईला फोन करणे, त्यांच्या सोयीप्रमाणे वेळ राखून ठेवणे मला असह्य होऊ लागले; कारण मुंबईचे कर्मचारी नेहमीच रुबाब दाखवायचे आणि त्यांच्या तालावर नाचण्यात दिवस-दिवस फुकट निघून जायचे म्हणून त्या Technical Manual चे मी पारायण चालू केले आणि नोट्स काढू लागलो. बघता-बघता मी त्या अगडबंब Technical Manual चे दोन महिन्यांतच बोन्साय केले. साधारणतः १२० पानांमध्ये मी त्याचे सार बाळबोध भाषेत लिहिले. एकदा एका काही तांत्रिक कामाकरता मी मुंबईला गेलो असताना मी माझे हस्तलिखित पुस्तक सहजच त्या अमेरिकन इंजिनिअरला (उपकरण ज्या कंपनीचे आहे त्या कंपनीचा भारतात नेमलेला भारतीय इंजिनिअर त्याला मुंबईमध्ये अमेरिकन इंजिनिअर म्हणायचे) दाखवले. त्याला नवल वाटले, कोणीतरी सोलापूरचा अभियंता इतक्या मोठ्या पुस्तकाचा अभ्यास करून इतक्या सहज भाषेतील नोट्स काढतो हे सुरुवातीला त्याला झेपलेच नाही. २ ते ४ वेळा मला उलट-सुलट प्रश्न विचारून त्याने मनाची खातरी करून घेतली आणि मग तो म्हणाला, “अरे वाह कुलकर्णी साहब आपने तो कमाल कर दिया, मेरा काम बहुत हलका किया, कोई सरकारी नोकरी करनेवाला इतना डेडिकेशन दिखायेगा कभी लगा नहीं था|” आणि मग त्याने ते माझे हस्तलिखित पुस्तक/नोट्स Harris Farinon U.S.A रेल्वे प्रशिक्षण विभागासाठी समाविष्ट केले. आता सोलापूर मंडळाला मुंबई Repair Centreवर अवलंबून राहावे लागणार नव्हते.
वाचनाची आवड असल्याचा असाही एक फायदा झाला. आता अशी मोठी-मोठी उपकरणे मी सोलापुरातच दुरुस्त करू लागलो आणि इतरांना पण शिकवू लागलो. कधीकधी मुंबई Repair Centre मधून मुंबईची उपकरणे बिघडल्यावर ते मला “आम्हांला मार्गदर्शन करा,” म्हणून फोन करायचे. तसा रुबाब दाखवण्याचा मला चांगला चान्स होता पण मी तसे केले नाही. ह्या उपकरणाचे प्रशिक्षण देण्यासाठी मला दोन-तीन वेळा मुंबईला बोलावले गेले. माझी कॉलर अभिमानाने ताठ व्हायची.
सदर घटनेमुळे परत मला काहींचा रोष ओढवून घ्यावा लागला, कारण काही कर्मचार्यांचे नातेवाईक, मित्र मुंबईला होते. आता त्यांना उपकरण दुरुस्तीचे कारण चिकटवून मुंबईला जाता येणार नव्हते आणि सरकारी खर्चातून मुंबई-दर्शन होणार नव्हते. दुरुस्ती आता सोलापुरातच होऊ लागली त्यामुळे मुंबईचा जाण्या-येण्याचा वाहतूक भत्ताही आता बंद झाला होता. त्या वेळी मुंबईचा वाहतूक भत्ता इतर शहरांपेक्षा जास्तच होता.
साधारणतः शनिवारी आणि रविवारी दुपारी ०४:०० ते रात्री १२:०० आणि रात्री १२:०० ते सकाळी ०८:०० या शिफ्टमध्ये आमची सर्वच खाती Relax मोड मध्ये असायची. अशा वेळी कोणीतरी वरिष्ठ अधिकारी रेल भवन दिल्ली किंवा इतर लांबच्या ठिकाणाहून आपल्या नातेवाइकाशी फुकट बोलायचे असल्यास टेलीफोन ऑपरेटरचे अतिशय बोअरिंग काम आम्हांला करावे लागायचे. सरकारी सेवेचा दुरुपयोग कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ अधिकारी. घरातील रेल्वे टेलिफोनवरून तेथील स्थानिक रेल्वे Microwave ऑफिसशी संपर्क साधून सांगायचे की त्याला सोलापुरातील (किंवा भारतातील कोणतेही शहर ) अमुक एका BSNL टेलीफोनने जोडून देणे. मग तो तेथील शिफ्टमधील कर्मचारी मला (सोलापूर असल्यास) विनंती करायचा, “हमारे बडे साब को ये BSNL टेलीफोन कृपया जोडकर दीजिए.” मी तो BSNL चा दूरध्वनी क्रमांक ऑफिसमधल्या सरकारी फोनवरून डायल करून त्यांना जोडून देत असे आणि ते लोक तासन्तास फुकट गप्पा मारत असत. अधूनमधून त्यांचं बोलणं आमच्याही कानावर पडायचं. बोलण्याच्या ओघात ते कितीतरी नाही-नाही त्या गप्पा मारायचे त्या ऐकून इकडच्या ऑफिसमध्ये मात्र चांगल्याच गप्पा रंगायच्या आणि “असो , आपल्यला काय करायचं आहे,” या वाक्याने बंद पडायच्या. आम्हांला मानवी स्वभावाचे एक-एक पैलू दिसून यायचे.
मी मुंबईत होतो तेव्हा काही अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझा संपर्क यायचा. अशाच प्रकारे त्यांचे संभाषण आम्ही Speaker लावून ऐकत होतो. आमची हसून हसून पुरी वाट लागली…
कधी कधी ह्या अधिकार्यांना वाटायचे Duty वरील कर्मचारी आपले बोलणे ऐकतोय म्हणून ते संभाषणामध्ये कार्यरत कर्मचाऱ्याचे नाव घ्यायचे; पण आम्ही ऐकूनसुद्धा त्यांना उत्तरसुद्धा देत नसू. मग ते दुसऱ्या टेलिफोनवर सांगत की त्यांचे बोलणे झाले आहे, धन्यवाद.
Microwave अर्थात सूक्ष्म तरंग दळणवळण कसे असते ते आपणांस खालील लिंकवरून कळेल. आता रेल्वेत सद्यस्थितीत मायक्रोवेव्ह तंत्रज्ञान कमी झाले आहे. त्याची जागा फायबर ऑप्टिक्सने घेतली आहे. पुढील लेखात ते तंत्रज्ञान कसे असते हे सांगेनच. तूर्तास पुरे.
———————————————————————————————
