कविता : जुलै २०२५  

इतकीच प्रार्थना

मी प्रार्थना करीत नाही देवा

की माझी नौका सुखरूप ठेव

वादळवाऱ्यात ती उलटीपालटी नको होऊ दे

अचानक एखाद्या खडकावर आदळून

तिचा चक्काचूर न होऊ दे

सुसाट धारदार वाऱ्याने

शिडाची लक्तरे नको होऊ देत

तिच्यातील आम्ही सारे

मजेत, आनंदात, सुखा-समाधानात

प्रवास करू देत

विशाल सागर, लखलखती रात्र आणि रमणीय किनारे

यांचा आनंद लुटू दे 

काय करायचे ही तुझी मर्जी देवा

तार किंवा मार

बुडव किंवा पैलतीरी ने

माझी फक्त इतकीच प्रार्थना की

या साऱ्या प्रवासात

माझे मन निःशंक असू दे 

माझ्या मनी तुझे रूप 

अम्लान, अढळ राहू दे

Author

Leave a Reply