आकांताच्या काठावर…

सक्काळीच फोन वाजला. आजींना दचकून जाग आली. कोणाचा असेल एवढ्या सकाळी फोन? या विचारात त्यांनी उशीखाली चाचपडत चष्मा शोधला, डोळ्यांवर चढवत किलकिल्या नजरेने स्क्रीनवर बघितलं; पण झोपेचा अंमल असलेल्या डोळ्यांना धुरकट दिसत होतं. मग त्यांनी तो चष्मा काढला आणि गाऊनच्या झालरीला पुसला. तोवर फोन वाजून वाजून गप्पच झाला.

“मेल्यांनो,जर्रा म्हणून फोन उचलेपर्यंत धीर नाही,”

म्हणत त्यांनी नाव बघितलं. समोरच्या फ्लॅटमधल्या रिचर्डचा फोन होता.

‘याचं काय निघालंय काम सकाळीच म्हातारीकडे?’ असं त्या म्हणतायत तोच परत एकदा रिंग झाली.

आजींनी गडबडीने हॅलो म्हटलं. 

पलीकडून रिचर्डचा गंभीर स्वर आला, 

 “आंटी,माझी मदर ऑफ  झाली.” 

फोन कट झाला.

आजींना क्षणभरासाठी काय झालं हेच कळे ना.

रिचर्डची मदर ऑफ… म्हणजे ज्युलिता गेली?

आजी सुन्न झाल्या; पण लगेच शेजारधर्माच्या कल्पनेने भानावर आल्या; लगबगीने बाथरूमला जाऊन आल्या; कवळी सेट केली; दोरीवरचा पंचा खांद्यावर घेत त्यांनी दार उघडलं. समोरच्या घरातून हुंदके ऐकायला येतायत.

त्या रिचर्डच्या दारात पोचल्या.

रिचर्ड हातात मोबाईल घेऊन कोणाकोणाला निरोप देत होता.

ज्युलिताचा देह हॉलमधल्या दिवाणावर ठेवलेला होता. हात छातीवर बांधलेले, पावलांची जुडी दोरीने बांधलेली. ज्युलिता शांत झोपी गेल्यासारखी दिसत होती.

गेली कित्येक वर्षं बापडीला इतकं शांत झोपताच आलं नव्हतं. दुर्धर आजाराला तोंड देतादेताच ती अर्धी-अधिक संपली होती.

एव्हाना आजींना बघताच निरोप देता देता रिचर्डलाही गदगदून आलं, त्याने ओठ काढले.

“आजच पहाटे…”

“गप! सांभाळ बाबा स्वतःला. खूप केलंस तिचं. सुटली बिचारी.”

आजींनी ज्युलिताच्या पावलांना नमस्कार केला.

तोवर  एकदम पाचसहा पुरुष आणि बायका घरात शिरल्या आणि 

“मावसु गेss” करत हंबरडा फोडला.

आजींनी रिचर्डला नजरेनेच कोण म्हणून विचारलं.

“लांबचे कझीन्स,” असं म्हणत त्याने हॉलमध्ये खुर्च्या मांडायला सुरुवात केली.

बायकांनी रडण्याचा पहिला भर ओसरताच रिचर्डला विचारलं,

“रे,तू चाव तरी पिलीस? सगळा जायसर वकत लागला. वायच चाय उदीक तरी घी.”

रिचर्डच्या उत्तराची वाट न बघताच एक जण म्हणाला, 

“रव वांयच. हांव हाटेलात्सून मागवता.”

                                  *                  *                  *

 आजींनी ओळखलं, आता आपलं काही काम नाही. यांच्या सोसायटीची माणसं आता येतील. यांचे रितीरिवाज वेगळे  आपले वेगळे; शिवाय आपण आधीच दुबळ्या! म्हातारं बाईमाणूस करून करून काय करणार? रिचर्डला घोटभर चहा देणं जमलं असतं पण आता आलेत त्याचे जातभाई!

आजी परत आपल्या फ्लॅटकडे यायला निघाल्या.

रिचर्डच्या दारापासून जिन्यापर्यंत, लिफ्टपर्यंत चपला पसरल्या होत्या.

आजींनी आपल्या मजल्यावर इतके चपला बूट कितीतरी वर्षांनी पाहिले. या मजल्यावर येतच कोण होतं म्हणा! 

रिचर्ड म्हाताऱ्या आजारी आईला सांभाळत एकटाच राहायचा. कधी बाहेर जायचं झालं तर आजींकडे किल्ली द्यायचा, “लक्ष ठेवा हां आंटी घराकडे. मी मार्केटात जावन येतंय,” म्हणायचा.

आजीही सेफ्टी डोअरमधून कानोसा घ्यायच्या.

ज्युलिता नेहमीच अंथरुणावर होती. तिच्या हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू असायच्या. तिला रिचर्ड हातांवर उचलूनच न्यायचा. तिच्या पायात चपला असायचं कारणच नव्हतं.

रिचर्डचे बूट दाराआड शेल्फवर. घरातल्या स्लीपर्स तेवढ्या दिसायच्या.

आजींचा चपलेचा एकुलता जोड. कधीमधी बाहेर जावं लागलं तर शू रॅकमधून बाहेर यायचा. दहा जोड मावतील एवढं शू रॅक… करायचं काय ते? पण ऑस्ट्रेलियात सेटल झालेल्या लेकाची हौस ना! आईबाबांना सगळ्या सुखसोयी द्यायच्याच असं ठरवलेलं त्यानं! 

जळल्या, पण त्या सुखसोयी आम्हांला हव्यात की नकोत हे नाही कधी विचारलंन्.

आजोबा होते तेव्हा निदान त्यांचे सँडल्स नि कोल्हापुरी वहाणा तरी होत्या शू रॅक मध्ये. आता काय? आजीचा एकच्या एक चप्पलजोड पोटाशी धरून बसतोय झालं तो रॅक.

आपल्या फ्लॅटशी येईतो आजींना चपला दिसल्याचा झालेला आनंद जाणवला आणि त्या स्वतःशीच चपापल्या.

ज्युलिताचा देह आठवून त्या खिन्न झाल्या. सवयीने किटलीत पाणी गरम करत लावलं. सवयीनंच ते फुलपात्रात ओतून पिऊ लागल्या.

मेडिटेशन करावं म्हणून खुर्चीवर बसल्या. मन काही एकाग्र होई ना. चिकाटीने डोळे बंद केले खरे पण साधे नाच! .

शेवटी टीव्ही सुरू केला. कुठल्याशा मालिकेचं शीर्षकगीत सुरू होतं. आवाज नेहमीसारखा फुल्ल होता. आजींना सवयच ती. घरात कोणीतरी आहे सोबतीला हा फील देणारा! टीव्ही आजी असाच मोठ्यांदा लावत. जळलं होतंच कोण तक्रारी करायला?

 पण समोरून हंबरड्यांचा पर्वत अंगावर कोसळला आणि आजी कानकोंड्या झाल्या. समोर शोक असताना आपलं हे वागणं बरं नाही असं म्हणून त्यांनी टीव्हीचा आवाज म्यूट करून ठेवला.

त्या कमरेवर हात धरत सेफ्टीडोअर जवळ आल्या.

हळूहळू गर्दी वाढत होती.

गर्दी?

 या अपार्टमेंटमध्ये माणूस नावाचा प्राणी दिसावा म्हणून आजी किती तळमळायच्या.

या तालुका प्लेसमध्ये अगदी गावाबाहेर या अपार्टमेंटमध्ये आजोबांनी स्वतःचा फ्लॅट  घेतला तेव्हा आजी आनंदल्याही होत्या नि नाराजही झाल्या होत्या.

“भाड्याचा का असेना पण शेजार गजबजता होता; आलं गेलं होतं; दारं उघडी असायची; सुखदुःखाला भागीदार होते; अडल्या नडल्या वेळी नातेवाइकांपेक्षा हक्काचा शेजारच धावून यायचा! इथे शेजारी कोण असतील,कसे असतील…” आजींनी आपली नाराजी आजोबांजवळ बोलूनही दाखवली.

” अगं हो बाई…, हा एरिया नवीन आहे म्हणून थोडं एकाकी वाटतंय; पण आपला बिल्डर ॲड करतोय जोरात. आता बघता बघता हे सत्तर सदनिकांचं अपार्टमेंट भरून जाईल बघ. मग सोसायटी होईल. ज्येष्ठांसाठी खास क्लब असेल, महिला मंडळ असेल, तुझ्या ओळखी होतील नवीन. लिफ्ट आहे आता दिमतीला;  मग काय, मॅडम तुरुतुरु खालीवर करून मैत्रिणींकडे जातील.” आजोबा चित्र रंगवायचे.

“ते होईल तेव्हा होईल हो. पण आत्तातर आपल्या या सतराव्या मजल्यावर आपणच दोघं एकटे…” आजी कुरकुरल्या. आजोबा सातमजली हसले.

“दोघं असताना एकटे ? अजब आहेस बुवा! चल आपण भाजी आणायला जाऊ. मी आहे ना तुला एवढा पहाडासारखा! हवंय कशाला कोणी ?”

परदेशातून सौरभही येऊन फ्लॅट बघून गेला. सोनालीही आली; पण वर्क फ्रॉम होम करायला इथे नेटवर्क मिळत नाही नि वायफाय बसवायला येणारा माणूस अजून आला नाही या सबबीवर ती माहेरी निघून गेली. सौरभही पाहुण्यासारखा राहिला आणि, “बराय, मीही निघतो. कामं आहेत एकदोन. काळजी घ्या. पैसे ट्रान्स्फर करीनच नेहमीसारखे.” म्हणत चार दिवसांनी निघून गेला.

सत्तरही सदनिका विकल्या तर गेल्याच; पण त्या अनेकांच्या सेकंडहोम होत्या. आपलं कधीमधी सुट्टीला आलं तर ठिकाण हवं म्हणूनही आणि या डेवलप होत जाणाऱ्या गावात  इन्व्हेस्टमेंट म्हणूनही.

आजींना अपार्टमेंटमध्ये मैत्रीण तर नाहीच – शेजारीही मिळाला नाही. सारा दिवस दोघंच दोघं.

पण आजोबा जॉली होते. त्यांच्या खाण्याजेवण्याची, कपड्यालत्त्याची टूक सांभाळणं हा आजींचा विरंगुळा होता; शिवाय दोघं कुठेतरी फिरायला जात. तळ्याकाठी पाय मोकळे करत.

अचानक…

आजोबांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आला. ते गेल्याचं आजींना थेट सकाळी चहाचा कप घेऊन जवळ गेल्या तेव्हा कळलं.

आत्ताही त्या आठवणीने आजींच्या हातापायांतलं बळ सरलं. त्या वेळी कसंबसं स्वतःला सावरत वॉचमनला बोलावून आणलं. तोवर आजोबांच्या देहाला एकटंच ठेवावं लागलं. वॉचमननेच डॉक्टरांना आणलं. चारचौघांना गोळा केलं… जुन्या शेजाऱ्यांना निरोप दिले.

जुन्या शेजाऱ्यांपैकी बरेच जण आपापल्या मुलांच्या नोकरीच्या गावी गेले होते. फक्त नाटेकर नाना वहिनी आले होते आणि आजोबांच्या ऑफिसमधले एक दोन सहकारी – तेही वयोवृद्ध –  अनोळखी.

डॉक्टरांनीच अँब्युलन्सची सोय करून दिली. विद्युतदाहिनीत आजोबांना निरोप दिला.

आजी बधिर होत्या. भेटायला आलेली मंडळी परतली.

आजींना जुने दिवस आठवले.

कोणी गेलं तर हंबरडा फोडून रडायला खांदे होते; पाठीवर सांत्वनाचे हात होते;  सुतकाघरी चहा – खाणं – पिठलं भात पोचवणारे शेजारी होते. “घासभर खाऊन घ्या, उपाशी झोपू नका! दुःख आवरा बघू,”  असं प्रेमाने दटावणारी माणसं होती. नात्याची, जोडलेली, शेजारची, गल्लीतली, ओळखीची… तोंडओळखीचीही… माणसं होती.

आजींनीही कित्येकांना पिठलंभाताचे डबे पाठवले होते. आग्रह करून मंडळींच्या मुखी घास घातले होते.

पण आजींना मात्र स्वतःची अंघोळ स्वतःच करावी लागली. घशाला शोष पडला होता. भांडंभर पाणी स्वतःच हाताने घ्यावं लागलं.

नाही म्हणायला वॉचमनच्या बायकोने रोटी सब्जी आणून दिली.

“खा लो आंटी. खालीपेट तबियत बिगडेगी,” असं म्हणत तिनं ताटली वाढली.

तिचीही चार घरी कामं होती. ती निघून गेली.

लेकाला लगेच येणं शक्य नव्हतं. त्यानं वॉचमनला पैसे पाठवले.

चार महिन्यांनी तो भेटायला आला.

“तुला परदेशात करमायचं नाही गं! शिवाय आम्ही ऑफिसात; मुलांना तुझी सवय नाही.” असं म्हणत त्याने आईसाठी घरात मोठा टी. व्ही. आणला. एसी बसवला. किचनमध्ये सोयी करून दिल्या. खात्यावर भरपूर पैसे भरले आणि आईची छान सोय लावल्याच्या समाधानात निघून गेला.

आजींनी एकटेपणाचं पांगळेपण सावरत कशीतरी जगायला सुरुवात केली… 

आणि अचानक रिचर्डने समोरचा फ्लॅट उघडला.

आजींनी आसुसून त्याला हाक मारली. सुरुवातीला तो बिचकला पण नंतर तोही मोकळा झाला.

बापडा तो त्याच्या त्याच्या प्रॉब्लेममध्ये गळाभर रुतलेला. त्याची आई दुर्धर दुखण्याने आजारी.

तिच्यासाठी, तिची सेवा करता यावी म्हणून त्याने हा प्रशस्त फ्लॅट  घेतला. दोन नर्स पार्टटाईम ठेवल्या.

आजींना त्याच्या समोर असण्याचीच अपूर्वाई वाटली. त्यांनी एक-दोनदा त्याला चहाला बोलावलं. तो आला; पण तेवढाच. जाता येता कधी दार उघडं दिसलं तर आजींना हात दाखवायचा नि लिफ्टमध्ये दिसेनासा व्हायचा.

मग आजी बळेच त्याच्या घरी गेल्या.

त्याची आई ज्युलिता कोमात होती… नर्सने आजींना तुटक उत्तर दिलं नि मोबाईलमध्ये तोंड खुपसलं.

रिचर्डने आईसाठी लग्नही नव्हतं केलं असं त्यानंच बोलता बोलता सांगितलं. आजींच्या मनाला चिमटाच बसला तेव्हा; पण त्यांनी तो दडपला.

रिचर्डचे बरेचसे नातेवाईक गावात होते म्हणे; पण कोणाला वेळ आहे कोणासाठी?  कधीतरी त्यांच्यातले कोणी येऊन जातही. पण आजींशी कशाला कोण बोलतंय?

नर्स आपापसांत बोलताना त्यांनी ऐकलं, की आई आहे तोपर्यंत रिचर्ड इंडियात राहणार. मग तो ॲब्रॉडमध्येच सेटल होणार.

त्या दिवसापासून संध्याकाळी समई उजळून प्रार्थना करताना आजी ज्युलितासाठी दीर्घायुष्य मागू लागल्या…!

आता रिचर्डच्या दारासमोर चपलांचा डोंगर होता. लिफ्टला विश्रांती नव्हती. काळी, गोरी,जाड, बारीक,तरुण, म्हातारी – माणसंच माणसं… आजींना ती माणसं बघून हुरूप वाटला. गजबजलाय मजला नुसता. पॅसेजमध्येपण खुर्च्या ठेवल्यायत. आतून मधूनच हंबरड्याची माळ फुटत होती.

संध्याकाळी ज्युलितावर अंत्यसंस्कार होणार होते.

आता धावपळीला वेग आला.

आजी सेफ्टी डोअर उघडून खुर्ची घेऊन बसल्या माणसांना न्याहाळू लागल्या. आलेल्या माणसांना उगाचच हात हलवून दाखवू लागल्या. ओढणीने डोळे टिपू लागल्या. त्यांच्याकडे अनोळखी नजरेने पाहत माणसं ज्युलिताचं दर्शन घेऊन येत होती.

आजींना आज माणसात असल्याचा फील होता. त्यांनी कुकरमध्ये मऊभात शिजवला. किचनमध्ये बसून तो तूप मेतकुटाबरोबर चवीने खाल्ला. परत दाराशी येऊन बसल्या.

माणूस मेल्यावर एवढी तरी गर्दी हवीच बाई! कोणी हळहळतंय, कोणी मुसमुसतंय, कोणी आठवणी काढून हुंदके देतंय… याला म्हणतात शोकातलं घर… 

याला म्हणतात जपलेली नाती! 

आजींना आठवेतनाच त्यांची नाती…! सासर माहेर सगळे नोकरी धंद्याच्या निमित्ताने पांगलेले.

आजींना आठवले विद्युत दाहिनीतून गुपचूप भस्म झालेले आजोबा! आजींच्या हंबरड्याला कोणाचीही साथसंगत नव्हती.

निदान आपला हंबरडा तरी आजोबांबरोबर होता.

आपल्याला कोणाचा ? वॉचमनचा? त्याच्या नेपाळी बायकोचा ?

छेः! आपण मेल्याचं कोणाच्या लक्षात तरी कधी येईल?

आजींच्या पोटात कालवाकालव झाली.

एवढ्यात समोर फ्यूनरलसाठी मरणवाद्यं वाजू लागली.

तो आवाज थेट आजींच्या पोटात शिरला. आत जाऊन त्याने  आजींना भोसकलं.

आजी ओठ घट्ट मिटून आतला लोंढा परतवत राहिल्या.

समोर शवपेटी पॅसेजमध्ये आणली. प्रेयरचे सूर चढत चढत गेले… फादरनी क्रूस उचलला.

कोणी लिफ्टने कोणी जिन्याने जाऊ लागले.

वाद्यांचा आवाज टिपेला पोचला… आजींवर त्या आवाजांनी  सपासप घाव घालायला सुरुवात केली… आजी कळवळल्या… तोंडात ओढणी कोंबून त्या ढसढसून फुटत राहिल्या.

वाद्यांच्या आवाजाने आता अंतराळ व्यापलं… आजींच्या डोळ्यासमोर रिचर्डचं ॲब्रॉड… वॉचमनची केबीन गरागरा फिरली.

त्या लटपटत घरात आल्या. सोफ्यावर स्वतःला ढकलत त्यांनी आकांत मांडला…ज्युलितासाठी?

की स्वतःसाठी?

Author

Leave a Reply