चला पेंसील वापरू या
आधी पाटी-पेंसील आणि नंतर शिसपेंसील यांनी आपल्या बालपणातल्या अनेक आठवणींत रंग भरले. पेंसील – तिच्या साधेपणात एक विलक्षण शक्तिशाली आणि बहुमुखी सर्जनशील साधन आहे. एका प्रकारे या दोन गोष्टींचे बोट धरून किंवा या दोन गोष्टी बोटांत धरून आपण मोठे झालो. आपल्या मनातले कागदावर किंवा पाटीवर उठवणे, ते इतरांना दाखवणे आणि त्यातून आपल्या भावभावना आपले मित्र, शिक्षक, पालक यांच्याशी वाटणे हा आपल्या बालपणाचा व एक माणूस म्हणून घडण्याच्या आपल्या प्रक्रियेचा अविभाज्य घटक होता. तंत्रज्ञान, त्याची सहज उपलब्धता आणि त्याच्या वापराने सहज साध्य झालेली झालेली आभासी माध्यमे आपल्या सध्याच्या जगाचा शब्दशः घास घेऊ लागली आहेत. याच्या अतिवापरामुळे आपली सर्जनशीलतासुद्धा कमी कमी होते आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता एकीकडे दार ठोठावत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जिवंत माणूस यांच्यात साम्य आणि फरक काय आणि कोणत्या क्षणी ही कृत्रिम बुद्धिमत्ता माणसावरती विजय मिळवेल या विचाराने भल्याभल्यांची झोप उडाली आहे. याबाबत एम .के. सी .एल या संगणक साक्षरता वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक काम करणाऱ्या कंपनीचे मार्गदर्शक विवेक सावंत यांचा एक विशेष लेख आपण गेल्या अंकात प्रसिद्ध केला होता.
माणसाला असलेली जाणीव आणि सारासार विचार हा अंतिमतः तारक ठरेल. कृत्रिम बुद्धिमत्ता – ज्याला विवेक सावंत सर ‘न मानवी बुद्धिमत्ता’ म्हणतात – त्याच्याशी स्पर्धा करण्याची वेळ आली तर माणूस या दोन गोष्टींच्या वापराने त्यातून पार होईल असे सावंत सरांचे आशादायक भाकीत आहे.
तंत्रज्ञान माणसाला नेमक्या याच दोन गोष्टींपासून दूर नेऊ पाहते आहे. सर्जनशीलता, पंचेंद्रियांचा यथायोग्य वापर यांचे स्थान अधोरेखित करण्यासाठी अमेरिकेत एक अभिनव उपक्रम चालवला जात आहे. तेथे संपूर्णपणे हस्तलिखित असे ‘पेंसील मॅगझीन’ निघते. हा साशा विझान्स्की यांचा प्रकल्प आहे.
साशा विझान्स्की
या प्रत्येक अंकाला एक आशयसूत्र असते. त्या आशयसूत्रावर आधारित चित्रे, कथा, लेख, कविता लिहिल्या जातात. हे सर्व पेंसिलीचा वापर करून हाताने लिहिले जाते आणि मग ते अंक रीतसर प्रसिद्ध होतात. प्रत्येक अंकासाठी कलाकार आणि लेखकांना एक विषय दिला जातो, ज्यावर ते दृश्यकला, लेखन किंवा दोन्हीच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात. पेंसील मॅगझीनचा मुख्य उद्देश हा कलाकार आणि लेखकांना सर्जनशील अभिव्यक्तीच्या एका दुर्लक्षित आणि मूलभूत साधनाशी – पेंसिलीशी – पुन्हा एकदा जोडले जाण्याची संधी देणे आहे. तसेच, वाचकांनाही अनुरूप (ॲनालॉग) अनुभवांसाठी वेळ आणि स्थान निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणे हाही उद्देश आहे. विविध शास्त्रीय संशोधनांतून हे स्पष्ट झाले आहे की परस्पर संवादासाठी आणि विविध माध्यमं वापरण्यासाठी इंटरनेटवर चालणाऱ्या डिजिटल साधनांवरचे आपले वाढते अवलंबन आपल्या लक्ष देण्याच्या क्षमतेवर, एकाग्रतेवर आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत आहे. पेंसील मॅगझीन ही सर्जनशील कलाकार, लेखक व वाचकांसाठी अनुरूप माध्यमांचा – पेंसील आणि कागदाचा – वापर करत आपले लक्ष पुन्हा एकदा एखाद्या विषयाकडे नैसर्गिकरित्या केंद्रित करत नवनिर्मिती करण्याची एक संधी आहे.






संपादकीय फार आवडले pencil magazin idea मस्त आहे सर्जनशील याला वाव मिळतो ज्याचा मानसिक आणि शारिरीक दोन्ही च्या strength सुदृढ राहतील
The concept is very good. कुणीतरी असा विचार करत आहे हे सुखावह आहे.
पेन्सिली मासिक ही कल्पना आवडली..
स्मॉल इज ब्युटीफूल
लेस इज मोअर..
थोडे मागे जावू, शांत, सर्जनशील होऊ..