पुनरपि जननं : प्रकरण पाचवे

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. 

ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :

हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली.  तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल. 

एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल. 

जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणारी आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’  या नावाने केले आहे. हे भाषांतर   क्रमशः देत आहोत . या अंकात वाचू या प्रकरण पाचवे    -संपादक

पुनरपि जननं : प्रकरण पाचवे

अपेक्षा

नसीमा आणि एबिओला आर एन ए प्रयोगशाळेपर्यंत चालत गेले. आत प्रवेश करून ते डावीकडे वळले आणि तळमजल्यावर म्युटेशन केंद्राच्या पलीकडे असलेल्या छोट्या परिसंवाद कक्षापाशी गेले. त्याचं दार म्हणजे काचेत एक गोलाकार भोक होतं. आत गेल्यावर नसीमाने आपल्या भ्रमणयंत्राने निर्देश देताच दार बंद झालं. त्या खोलीचे मग एका बंद मोड्यूलमध्ये रूपांतर झालं. आता त्या दोघांच्या आदेशानेच ते उघडणार होते. या मोड्यूलमुळे मीटिंग संपेपर्यंत त्यांना संपूर्ण शांतता आणि एकांत मिळणार होता. 

“माझ्या विभागाने सुचवलेल्या पर्यायांचा हा निकाल आहे,” आपल्या भ्रमणयंत्राच्या एका झटक्यासरशी टेबलावरचा रुपेरी पडदा झळकवत नसीमा म्हणाली. “आमच्या उपविभागाच्या दरमहिन्याला बैठका होत होत्या आणि मोठ्या बैठकीत साल्चरपुढे सादर करण्यासाठी आम्ही हा अहवाल निश्चित केला आहे.”

एबिओलाने एकाग्र चित्ताने तो अहवाल त्यातील स्पष्टीकरणात्मक चित्रे आणि ग्राफ यांच्यासकट काळजीपूर्वक वाचला. वाचून झाल्यावर त्याने हसतमुखाने नसीमाकडे पाहिले.

“प्रयोगांच्या बाबतीत आमच्या गटाने थोड्या वेगळ्या अंगाने विचार केला आहे,”  तिच्याकडे पाहत तो म्हणाला. “प्रकल्पाच्या संपूर्ण टीमपुढे सादर करण्यापूर्वी आपण आपल्या शिफारशींविषयी आपसांत चर्चा करावी असं साल्चरने का सांगितलं हे आत्ता माझ्या लक्षात येत आहे,” असं म्हणून त्याने नसीमाला त्याच्या गटाने तयार केलेला अहवाल दाखवला. 

पृथ्वी प्रकल्पाची चारशे बारा लोकांची संपूर्ण टीम तयार होऊन जवळजवळ एक वर्ष झालं होतं. त्या टीमचे बारा गट पडले होते. प्रत्येक गट पृथ्वीवर आवश्यक ठरलेल्या एकेका शास्त्रीय शाखेचे प्रतिनिधित्व करत होता. त्या त्या शाखेतील सर्वोत्तम शास्त्रज्ञ त्या गटांचे प्रमुख होते आणि इतर अनेक शास्त्रज्ञ समूहात किंवा स्वतंत्रपणे त्या गटांत काम करत होते. या बारा गटांच्या व्यतिरिक्त, एक प्रमुख गट होता. ज्या पाच शास्त्रज्ञांच्या पुढे साल्चरने मुळात पृथ्वीवर जाऊन प्रयोग करण्याची कल्पना मांडली होती त्यांचा या प्रमुख गटात समावेश होता. 

संपूर्ण टीमच्या शेवटच्या बैठकीमध्ये साल्चरने सर्व बारा गटांना त्यांच्या पुढील नऊ वर्षांतील कार्याचा आराखडा तयार करण्यास सांगितले होते. पृथ्वी प्रकल्पासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतील हे ठरवण्यात आणि प्रकल्पाच्या टीमची गटांत आणि उपगटांत विभागणी करण्यात पहिलं वर्ष गेलं. त्या गटांमध्ये त्यांच्या त्यांच्या कामाविषयी आणखी चर्चा झाल्या आणि आता ते संपूर्ण टीमसमोर आपल्या कामाचा आराखडा मांडण्यासाठी सज्ज होते. त्यातून मग संपूर्ण प्रकल्पाचे धोरण ठरणार होते.

मागच्या आठवड्यात एक दिवस अचानक साल्चर नसीमा आणि एबिओला यांच्या प्रयोगशाळांमध्ये गेला होता आणि त्याने त्यांना संपूर्ण टीमसमोर सादर करण्यापूर्वी एकमेकांचे अहवाल वाचून चर्चा करण्याची विनंती केली होती. नसीमा आण्विक शास्त्राच्या गटाची प्रमुख होती. साल्चरचा स्वतःचाच विषय होता तो आणि एबिओला जीवरसायनशास्त्राच्या गटाचा प्रमुख होता. पृथ्वीवर जाणाऱ्या अंतराळवीरांनी त्या दूरस्थ ग्रहावर करण्याचे प्रयोग निश्चित करण्याचे काम या दोन गटांकडे होते.

चर्चा करताना नसीमा आणि एबिओला यांच्या लक्षात आलं, की त्यांच्या गटांचे मार्ग जरी भिन्न असले तरी जो मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी पृथ्वी प्रकल्पाची योजना आखलेली होती त्यासाठी ते दोन्ही मार्ग सयुक्तिक आणि उपयोगी होते; किंबहुना कित्येक शास्त्रीय प्रमेयं पृथ्वीवरच्या प्रयोगांनी पडताळून पाहता येतील हेही त्यांच्या लक्षात आलं. वर्षभरापूर्वी अनेकांना अनावश्यक आणि व्यर्थ वाटणाऱ्या साल्चरच्या प्रकल्पाचे आता एका सच्च्या ज्ञानसाधनेत रूपांतर झाले होते आणि या साधनेला स्वर्गावरील चारशे बारा उत्तम शास्त्रज्ञांच्या प्रतिभेची बैठक लाभली होती. उत्सुकतेपोटी या साधनेची सुरुवात झाली होती आणि पुढच्या पंधरा वर्षांत जसजसा या प्रकल्पाला निश्चित आकार मिळत जाईल तसतशी ही उत्सुकता वृद्धिंगत होईल हे निश्चित होतं. 

आण्विक शास्त्र आणि जैविक रसायनशास्त्र यांच्याबरोबरच मानवी जीव-अभियांत्रिकी आणि जीवशास्त्र यांवर पृथ्वीवरील प्रयोग ठरवण्याची जबाबदारी होती. गेल्या वर्षी साल्चरने या दोन्ही गटांच्या कामावर लक्ष ठेवले होते आणि या दोन्ही गटांनी त्यांच्यासमोर ठेवलेल्या आव्हानासाठी शोधलेले दोन कल्पक मार्ग त्याने जाणून घेतले होते. 

बैठकीच्या मोड्यूलमधून दोन तासांनी जेव्हा नसीमा आणि एबिओला बाहेर पडले तेव्हा पुढील कार्यासाठी तयार केलेल्या आराखड्यात एकमेकांच्या मार्गांतील कल्पना समाविष्ट करण्यावर त्यांचे एकमत झाले होते. पुढच्या आठवड्यात जेव्हा सादरीकरण सुरू होईल तेव्हा आपल्या गटाच्या अहवालात दुसऱ्या गटाच्या कल्पना कशा समाविष्ट करायच्या याबद्दल त्यांच्या मनात अनेक नवीन कल्पना तयार होऊ लागल्या होत्या. दोघांनाही त्याची उत्सुकता होती.

—————————————————————————————————————-


प्रकल्पाच्या ऑफिसमधील एक समाधानकारक दिवस संपवून आणि दमून फ्रांस्का जेव्हा घरी आली तेव्हा तारीकला त्यांच्या घरापुढच्या छोट्या बागेत काम करताना बघून तिला आश्चर्य वाटलं. हातातील खुरप्याने जमीन उकरण्यात तो इतका गढून गेला होता, की आश्चर्यचकित मुद्रेने ती त्याच्या अगदी शेजारी उतरेपर्यंत तिच्या पंखांची सळसळदेखील त्याला जाणवली नाही. तिच्याकडे पाहून तो थोडेसे ओशाळवाणे हसला पण पुढच्याच क्षणी तो उठून उभा राहिला आणि त्याने आपले हातमोजे काढले. 

“आज तुझं काम लवकर संपलं का,” त्याच्या हाताच्या विळख्यात विसावून घराच्या पायऱ्या चढताना फ्रांस्काने विचारले. 

“हो, खरं म्हणजे मी आज अर्ध्या दिवसाची रजाच टाकली,” तो म्हणाला. 

सोफ्यावर मटकन बसत फ्रांस्काने आपले पाय समोरच्या छोट्या स्टुलावर ठेवले होते. आजकाल प्रकल्पाच्या ऑफिसातलं शिगेला पोचलेलं काम तिला दमवून टाकायचं; पण त्या दमवून टाकणाऱ्या कामात तिला फार समाधान वाटायचं. 

पृथ्वी प्रकल्पात सामील होऊन तिला आणि तारीकला दोन वर्षं झाली होती. तिच्या आयुष्यातील ही दोन वर्षं अत्यंत सुखात गेली होती. वेगवेगळ्या गटांत काम करत असले तरी फ्रांस्का आणि तारीक एकत्र राहत होते. पूर्वी पालक करार करून आपल्या मुलाला वाढवताना जेव्हा ते एकत्र राहिले होते त्याहीपेक्षा काही बाबतींत ही वर्षं अधिक सुखाची होती. एकतर आता लहान मूल वाढवण्याची जबाबदारी नव्हती आणि दुसरं म्हणजे त्यांचं काम अधिक समाधान मिळवून देणारं होतं; शिवाय फ्रांस्काचा आनंद द्विगुणित होण्याचं आणखी एक कारण होतं : आता तारीक तिच्याकडे अधिकच लक्ष देत होता, एक व्यक्ती म्हणून त्याला जणू ती अधिकच आवडत होती. त्याचा प्रणय कदाचित पूर्वीइतका गहिरा नसेल पण तो आता तिला पूर्णपणे समर्पित  होता. आजूबाजूला सहकारी किंवा मित्र-मैत्रिणी असतानादेखील एक उबदार सुखावह कोष त्या दोघांनाच वेढून असावा असा फ्रांस्काला भास होई. 

तिचा बहुतेक वेळ प्रकल्पाच्या कामात जायचा. प्रकल्पातील इतर लोकांप्रमाणेच फ्रांस्कालादेखील घरात बसून काम करण्यापेक्षा प्रकल्पाचे मुख्य केंद्र असलेल्या आण्विक शास्त्र प्रयोगशाळेतच काम करायला आवडायचे. प्रत्यक्ष तिथे जाऊन काम केल्याने सगळ्यांनाच आपण एकाच ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या एका समूहाचा भाग आहोत याची कायम जाणीव असायची. दिवसागणिक त्यांचे काम अधिकाधिक मनोवेधक होत होते. या प्रकल्पासाठी लागणारे अवकाशयान तयार करणाऱ्या आकाशगंगा प्रवास केंद्रातील शास्त्रज्ञांशी फ्रांस्काचा अनेकदा संबंध येत असे. या केंद्रातील अवकाश संकुचन मोड्यूल यानाच्या गतीवर काम करत होते आणि तारीक याच मोड्यूलचा सदस्य होता.

प्रकल्पाच्या टीममध्ये खेळीमेळीचं वातावरण होतं आणि काम संपल्यावर सहकारी अनेकदा गप्पागोष्टींसाठी भेटत असत; शिवाय फ्रांस्का आणि तारीकच्या इतरही मित्र-मैत्रिणी होत्या. काही दोघांच्या ओळखीच्या तर काही त्यांच्या वेगळ्या वेगळ्या; शिवाय त्यांच्या मुलाचं कुटुंब होतं आणि आता दोन्ही पालक एकाच ठिकाणी असल्याने ते लोक त्यांना अनेकदा आभासी भेट देत. 

फावल्या वेळात तारीक आणि फ्रांस्का नदीच्या काठाने उडत जात किंवा चित्रशाळेला भेट देत; तर कधी संगीताच्या बैठकीचा आनंद घेत. अशा भटकंतीच्या वेळी फ्रांस्का भरभरून बोलत असे आणि तारीक ते समरसून ऐकत असे. त्याच्या संगतीत तिला खूप उत्साही, आनंदी आणि तरीही विश्रांत वाटत असे. त्याची सोबत तिला मनापासून आवडत होती आणि त्यालाही आपली सोबत आवडते याचं तिला भान होतं.

आतासुद्धा तो तिच्या शेजारी येऊन बसला आणि त्याने तिच्या खांद्याभोवती हात टाकला. 

“फ्रांस्का, मला तुला काही सांगायचं आहे. मी हे काम सोडून देण्याचा विचार करतो आहे.”

हे ऐकताच तिच्या शरीरात आलेला तणाव त्याला जाणवला आणि त्याने हलकेच तिचा खांदा दाबला. 

“का? तुला इथे कंटाळा आला का,” आपला आवाज शक्य तितका स्थिर ठेवत फ्रांस्काने विचारले.

त्याच्या सोबतीचं सुख कायम असणार नाही हे आपल्याला कळायला हवं होतं, असं तिला वाटलं. आयुष्यातील शेवटची वर्षं दोघांनी एकत्र घालवण्याचं तिचं स्वप्न खरं होणं इतकं कुठे सोपं होतं? त्यांचा मुलगा जेव्हा पुढील शिक्षणासाठी अकादमीत गेला तेव्हा नाही का तारीक ताबडतोब निघून गेला होता! 

“फ्रांस्का, मी तुला सोडून जाणार नाहीये. मी फक्त प्रकल्पातून बाजूला होण्याचा विचार करतो आहे,” तिची चलबिचल लक्षात येऊन तारीकने आश्वासन दिलं.
 

“पण का?”

“का कोण जाणे, पण मला आताशा त्यात रस वाटत नाही…” दूरवर पाहत तारीक म्हणाला. 

“तुझा या प्रकल्पावर विश्वास नाही?” फ्रांस्काने विचारले. प्रकल्पावर टीका करणारे अनेक जण होते हे फ्रांस्काला माहीत होते. खोलवर तिला हेदेखील माहीत होते की तारीकला या प्रकल्पात तिच्याएवढा रस कधीच नव्हता. 

“केवळ प्रकल्पाबद्दलच नाही म्हणत मी;  इतर कोणतेही काम करत असतो तरी मी ते आता सोडून टाकलं असतं. मला आता इतर गोष्टी करून पाहायच्या आहेत. आयुष्याकडे मला थोडं दुरून पाहायचं आहे.”

“पण मग तुझा वेळ कसा जाणार?”

“अजून नक्की काही ठरवलं नाही मी. पण एकदा का सबंध दिवस माझ्या हातात आला, की मला कळेलच.”

फ्रांस्काने त्याच्या देखण्या चेहऱ्याकडे नजर टाकली. त्याच्या मनात काहीतरी चालले होते ज्याचा तिला काहीच पत्ता नव्हता. त्याच्यासारखा निष्णात खगोल भौतिक शास्त्रज्ञ जर शास्त्रीय संशोधन करणार नाही तर तो करणार तरी काय? त्याला इतर छंद होते – नाही असं नाही – बागकाम करायला आवडायचं त्याला, फुलझाडं आणि शोभेची झाडं वाढवण्यात त्याचा हातखंडा होता; शिवाय त्याला बऱ्यापैकी चित्रकला यायची. पण गेली दोन वर्षं ते एकत्र राहायला लागल्यापासून तिने त्याला हातात ब्रश घेऊन चित्रं रंगवताना कधी पाहिलं नव्हतं.

“माझी राणी एवढी का काळजीत पडली,” तिच्या चिंतातुर चेहऱ्याकडे बघत त्याने विचारलं.

फ्रांस्काने नुसता त्याचा हात दाबला आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकलं.

“काळजी करू नकोस राणी! मी कुठेही निघून जात नाहीये. हां, तुला जर माझा कंटाळा आला असेल किंवा काही दिवस इतर कुणाबरोबर राहायचं असेल तर गोष्ट वेगळी.”

“नाही तारीक. तू जावंस असं मला वाटत नाही. मी तुझ्याबरोबर सुखी आहे.”

“मग रोज जेव्हा तू कामावरून परत येशील, तेव्हा खगोलशास्त्राशी संबंधित नाही असं काहीतरी मी करत बसलेलो असेन. माझा मेंदू किती सर्जनशील आहे ते बघशीलच तू, “हसून तिच्याकडे पाहत तो म्हणाला.

—————————————————————————————————————-

“आई, मी मोठी झाल्यावर काय होणार?” आरुषीने आईला विचारलं. तिचा नवा झगा घालायला आई तिला मदत करत होती. 

“तू माझ्यासारखी शास्त्रज्ञ होऊ शकतेस किंवा पपासारखी कॉंप्युटेशनिस्ट होऊ शकतेस, किंवा इतर काहीही. हजारो प्रकारच्या कार्यक्षेत्रांतून तू निवड करू शकतेस. तुझं पुरेसं शिक्षण झालं की तू ठरवू शकतेस. तुला काय आवडतं हे मोठी झाल्यावर तुला आपोआपच कळेल.”

“पण आई, अकादमीत गेल्यावर मला तिथली सर्वांत हुशार विद्यार्थिनी व्हायचंय आणि जेव्हा मी अकादमीतून उत्तीर्ण होईन, तेव्हा मला सगळं काही आलं पाहिजे.”

आई हसली. “तू आत्ताच खूप हुशार आहेस बिट्टू! तू जे काही करशील त्याच्यात यशस्वी होशील याची मला खातरी आहे.”

“पण आई, मी जेव्हा अकादमीत जाईन तेव्हा तू आणि पपा वेगवेगळ्या ठिकाणी राहणार का? तुमचा पालक करार तेव्हा संपणार का?”

आईने आरुषीच्या सचिंत चेहऱ्याकडे पाहिले. सगळ्याच मुलांना ही काळजी असते का? नाही, बहुतेक मुलं या गोष्टीचा विचारसुद्धा करत नाहीत. तिचं हळवं मन आरुषीत उतरलं होतं का?

“आरुषी, त्याची काळजी नको करूस. तू फक्त दहा वर्षांची आहेस आणि तू पंधरा वर्षांची होईपर्यंत पालक करार संपत नाही. तेव्हा तू मोठी झालेली असशील आणि तुला माहीत आहे, तू जेव्हा अकादमीत जाशील तेव्हा मी जवळच कुठेतरी येऊन राहीन. मला तुझी खूप आठवण येत राहील आणि नुसत्या आभासी भेटींनी माझं समाधान होणार नाही. मला असं तुला जवळ घ्यावंसं वाटेल,” आरुषीला जवळ घेत आई म्हणाली. 

“मला पण नेहमीच तुझ्या जवळच राहायचंय;” लाडात येत आरुषी म्हणाली.

मोठी झाल्यावर आपली हुशार लेक कोणतं कार्यक्षेत्र निवडेल याचा आईने अनेकदा विचार केला होता. आरुषीने अंतराळवीर होऊन विश्वात प्रवास करावा असं तिला मनातून वाटे. पण आरुषी सगळ्यातच पटाईत होती. ज्ञानाच्या सगळ्याच शाखांत तिला गती होती. दिवसागणिक तिची सर्जकता वेगवेगळ्या माध्यमांतून उमलत होती. लहानपणापासूनच तिने वाचनात रुची दाखवली होती. एखादी गोष्ट वाचण्यात ती मग्न असली तर तिच्या वाचनाच्या पडद्यापासून तिला दूर करणं केवळ अशक्य व्हायचं. कधीकधी तर तिने आरुषीला साक्षात्कारपूर्व साहित्याची भाषांतरे वाचताना पाहिलं होतं. तिला रस असलेल्या विषयांत ती किती खोल जाऊन वाचन करत होती हे उघड होतं. ज्ञानभांडाराच्या पाच पातळ्या ओलांडल्यावरच साक्षात्कारपूर्व ज्ञानापर्यंत पोचता येत असे. मोठी माणसंसुद्धा एखाद्या विषयाचा अभ्यास करताना आजकाल क्वचितच इतक्या खोलात शिरत. आपल्या लेकीच्या ग्रहणशक्तीचं तिला कौतुक वाटलं. 

“चल, आपण बागेत जाऊ या. रवी अस्त होईपर्यंत तिथे उडता येईल,” आई म्हणाली आणि माय-लेकी हातात हात घालून घराजवळच्या बागेच्या दिशेने उडत निघाल्या.

रात्री आईने आरुषीला उबदार पांघरूण घालून निजवले आणि तिच्या शेजारी आडवी होऊन ती तिला गोष्ट सांगू लागली. नेहमीपेक्षा लवकरच आरुषीला गाढ झोप लागली आणि तिने मगाशी विचारलेल्या प्रश्नाचा आई विचार करू लागली. आरुषीच्या वडिलांबरोबर केलेल्या पालक कराराची दहा वर्षं पूर्ण झाली होती. करार संपल्यानंतरच्या आयुष्याबद्दल तिने कधी फारसा विचार केला नव्हता. तिला स्वतःला पक्कं ठाऊक होतं की तिची लेक शिक्षणासाठी जिथे जाईल, तिथेच तीदेखील लेकीच्या मागोमाग जाईल. लेकीपासून दूर आपण राहू शकणार नाही हे तिला माहीत होतं; पण आरुषीच्या पपाचं काय? तिच्याबरोबरच्या आयुष्याची त्याला जणू सवय झाली होती. करार संपल्यानंतर त्याने काय करायचं ठरवलं आहे हे तो कधी बोलला नव्हता. पण आपल्या मनातलं तो कधी फारसं बोलतच नसे. असू दे. त्या गोष्टीला अजून पाच वर्षं अवकाश होता. 

तिने आपल्या लेकीच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या वयाच्या इतर मुली आताच मोठ्या दिसायला लागल्या होत्या पण आरुषीच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा अजून टिकून होता – तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात जरी ती सर्वात हुशार असली तरी! तिच्या केसांवर थोपटून आई हलकेच खोलीतून बाहेर पडली आणि आपल्या खोलीत झोपायला गेली. 

—————————————————————————————————————


पृथ्वी प्रकल्पाच्या संपूर्ण टीमसमोर करण्याच्या  भाषणाचा विचार करत साल्चर आपल्या खोलीत बसला होता. प्रकल्प सुरळीत चालू होता आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीने त्याचे बऱ्यापैकी समाधान झाले होते. मोहिमेच्या मूळ संकल्पनेचा आराखडा जवळजवळ तयार झाला होता. अवकाशयानाच्या संरचनेचा आराखडाही तयार झाला होता आणि आकाशगंगा प्रवास केंद्रात ते तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पंधरा अंतराळवीरांना त्यातून प्रवास करायचा असल्याने दुसऱ्या सौरमंडलांना जाणाऱ्या यानांपेक्षा हे यान अधिक प्रशस्त असणार होतं आणि त्याची संरचना अधिक गुंतागुंतीची असणार होती. ताऱ्यांच्या प्रकाशाने या यानाला गती मिळणार होती आणि त्याच्या प्रचंड वेगामुळे आपोआप तयार होणारं गुरुत्वाकर्षण त्या वर्षभराच्या प्रवासाला आवश्यक अशी शक्य तितकी सुखकर परिस्थिती निर्माण करणार होतं.

पण साल्चरला अशा तांत्रिक बाबींची काळजी नव्हती. आकाशगंगा प्रवास केंद्राने ती जबाबदारी घेतली होती. पृथ्वीवर करायच्या प्रयोगांची आखणी आणि या प्रवासाला जाणाऱ्या अंतराळवीरांची निवड या प्रक्रियांसाठी मार्गदर्शन करणं हे त्याचं मुख्य काम होतं. पृथ्वीवर करण्याच्या प्रयोगांची आखणी करण्याचं काम मुख्य पाच गटांनी वेगाने सुरू केलं होतं. पृथ्वी प्रकल्प सुरू होऊन दोन वर्षं पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले प्राथमिक प्रस्ताव सादर केले होते. ते प्रस्ताव अनेक स्तरांवराच्या चाळणीतून जाणार होते आणि त्यात सुधारणा होऊन दहा वर्षांनी अंतिम आराखडा तयार होणार होता. अंतराळवीरांची निवड तेव्हाच केली जाणार होती आणि त्यांना हे प्रयोग करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार होतं. त्याचबरोबर, पृथ्वीवरच्या वातावरणात स्वतःचा बचाव करण्याचं शिक्षणसुद्धा. 

या अंतराळवीरांना पृथ्वीवर पोचेपर्यंत पाच वर्षं अंतराळयानात काढावी लागणार होती. त्यानंतर एक पूर्ण वर्ष पृथ्वीवर राहून, पुन्हा पाच वर्षांचा प्रवास करून ते स्वर्गावर परतणार होते. अर्थात हे स्वर्गावर राहणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास. अंतराळवीरांच्या दृष्टिकोनातून पाहता त्यांच्या प्रवासाला एकच वर्ष लागणार होतं कारण तारामंडलांच्या मधल्या अवकाशातून प्रचंड वेगाने प्रवास करताना त्यांच्यासाठी काळाची गती मंदावणार होती. पृथ्वीवर जाणाऱ्यांसाठी संपूर्ण मोहिमेचा अवधी केवळ तीन वर्षांचा असणार होता – एक वर्षाचा पृथ्वीपर्यंतचा प्रवास, एक वर्ष तिथे वास्तव्य आणि एक वर्षाचा स्वर्गाकडे परत येण्याचा प्रवास.

पृथ्वी प्रकल्पाच्या टीमसमोर भाषण देण्यासाठी साल्चर उठला. हे त्याचं सहावं वार्षिक भाषण होतं. संपूर्ण टीम मनापासून आणि उत्साहाने या प्रकल्पात सामील आहे याची त्याला आता पुरेपूर खातरी होती. जसजसे महिने जात होते, तसतसं काम अधिकाधिक आकर्षक वाटत होतं. टीमच्या प्रत्येक सदस्याला नावीन्य आणि आव्हान वाटेल असंच काम होतं ते… फक्त तारीक सोडून… तेवढा आश्चर्यकारक अपवाद वगळता. 

—————————————————————————————————————-

आपल्या घराच्या व्हरांड्यात तारीक पाऊस बघत बसला होता. ऑगस्टचा महिना होता आणि त्या महिन्यात सरासरी वीस दिवस पाऊस पडणार हे ठरलेलं होतं. झाकोळलेल्या आकाशातून पडणाऱ्या धारांकडे तो पाहत राहिला. आपण गेल्यावरसुद्धा दरऑगस्टमध्ये असा पाऊस पडतच राहील, त्याच्या मनात विचार आला. मग त्या पावसाकडे असं कोण पाहत बसेल? फारुक? त्याचा मुलगा? पण आपलं अस्तित्वच जर उरलं नसेल तर पाऊस पडला काय, न पडला काय, काय फरक पडणार आहे? 

हे असले विचार करता कामा नयेत, त्याने स्वतःला बजावलं. पण आजकाल हे असलेच विचार त्याच्या मनात घोळत असत. आता वेळ जवळ आली होती हे त्याला माहीत होतं. त्याला आता कशातच रस वाटेनासा झाला होता. दिवस कंटाळवाणे आणि रात्री रिकाम्या झाल्या होत्या. झोप येत नसल्यामुळे विश्रांतीचादेखील त्रास होऊ लागला होता. पण फ्रांस्काला कसं सांगायचं? फार भावनिक गुंतवणूक झाली की असे पेच पडतात. तिला तिच्या कामातच समाधान शोधावं लागेल. पुढची दहा वर्षं ती त्यात व्यग्र राहील… पण त्याचं स्वतःचं काय? आज ना उद्या त्याला निर्णय घ्यावाच लागणार. आपलं व्यक्तिमत्त्व डाउनलोड करायचं का नाही हेदेखील त्याला ठरवावं लागणार होतं. फ्रांस्काने जर फारच आग्रह केला, तर त्याची तशी तयारी होती.

—————————————————————————————————————-

बैठकीच्या गोलाकार कक्षात साल्चरने प्रवेश केला. त्याच्या वार्षिक भाषणासाठी पृथ्वी प्रकल्पाची अख्खी टीम तिथे उपस्थित होती. काही क्षण त्याने त्या सर्वांचं निरीक्षण केलं, त्यांचे चेहरे निरखून त्यांच्या भावना टिपल्या. 

“मित्रांनो,” त्याने आपल्या नेहमीच्या शैलीत सुरुवात केली, “गेल्या पाच वर्षांत आपल्या टीमने केलेली प्रगती पाहून मला फार समाधान वाटले आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे एक तृतीयांश काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल मी माझ्या टीमच्या प्रत्येक सदस्याचं अभिनंदन करतो. एखाद्या यंत्रात चपखलपणे बसलेल्या भागाप्रमाणे तुमच्यापैकी प्रत्येकाने या प्रचंड प्रकल्पातील आपापले काम चोखपणे बजावले आहे. 

पुढची पाच वर्षं याहीपेक्षा रोचक असतील. भौतिक शास्त्रज्ञ आकाशगंगा प्रवास केंद्राच्या सहकार्याने अंतराळयानाच्या निर्मितीवर देखरेख करतील. आण्विक जीवशास्त्रज्ञ पृथ्वीवर करायच्या प्रयोगांची पूर्वतयारी करतील. ग्रह विज्ञान तज्ज्ञ पृथ्वीवर उभे करण्याच्या निवाऱ्यांचे आराखडे तयार करतील. जीवशास्त्रज्ञ प्रवाशांसाठी फुग्यांची आवरणं तयार करतील आणि एक दिवस या प्रकल्पाचे अंतराळवीर होणाऱ्या तेजस्वी मानवांचा शोध शिक्षणतज्ज्ञ सुरू करतील. 

तुमचे काम नीट आखून दिलेले आहे. पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या कडीत आपण प्रवेश करतो आहोत; तेव्हा मी तुम्हां सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुमची मने प्रतिभेने उजळून निघावीत अशी कामना करतो. नेहमीप्रमाणेच, माझं दार तुम्हां सर्वांसाठी कायमच खुलं आहे. तुमच्यापैकी कोणालाही एखाद्या विषयावर किंवा एखाद्या कल्पनेवर चर्चा करायची असेल, किंवा मुख्य मंडळाच्या एखाद्या निर्णयावर टीका करायची असेल, तर तुमचं स्वागत आहे. 

धन्यवाद आणि आता संध्याकाळच्या कार्यक्रमाचा आनंद घ्या.”टाळ्यांचा कडकडाट त्याने वाकून आणि मान झुकवून स्वीकारला. 

—————————————————————————————————————-

काईजाने स्क्रीन बंद करून तो पारदर्शक केला. बाहेर अजूनही प्रसन्न उजेड होता. टेनिस खेळायला अगदी योग्य वातावरण होतं. पण अमर येणार नाही हे त्याला माहीत होतं. आजकाल आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यायलादेखील त्याला फुरसत नव्हती. एखाद्या कृष्णविवराप्रमाणे पृथ्वी प्रकल्पाने त्याला गिळंकृत करून टाकले होते. काईजाने खेदाने मान हलवली. ज्याच्याबरोबर त्याला केवळ टेनिसच खेळता येत होते असे नव्हे; तर स्वतःच्या नवनवीन कल्पनादेखील पडताळून पाहता येत होत्या असा त्याचा एकुलता एक मित्र सध्या कामात व्यग्र होता. 

काईजा आपल्या प्रयोगशाळेतून बाहेर पडला आणि समोरच्या बागेत फेऱ्या मारू लागला. दिवसभराच्या कामानंतर गुरुत्वकण प्रयोगशाळेतील विद्यार्थी आपापल्या वसतिगृहांत परतत होते. त्याची प्रयोगशाळा ही पृथ्वी प्रकल्पाच्या धामधुमीने अबाधित राहिलेली अशी एकमेव शास्त्रीय संस्था होती. गुरुत्वाकर्षणावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचा साल्चरला काही उपयोग नव्हता. इतर सर्वच संशोधन संस्थांचे पृथ्वी प्रकल्पात योगदान होते – संशोधनासाठी केलेल्या सहकार्यातून किंवा पृथ्वीप्रकल्पात कनिष्ठ संशोधक म्हणून रुजू झालेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांमार्फत.

त्याची प्रयोगशाळा याला अपवाद होती याची आठवण होऊन काईजाला बरं वाटलं. त्याच्या स्वतःच्या ज्ञानकणांविषयीच्या संशोधनावर इतर शास्त्रज्ञांनी उत्तम प्रतिक्रिया दिल्या होत्या. एक ना एक दिवस आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराकडे यंत्रमानवचलित यान पाठविण्याची मोहीम आखता येईल या आशेवर त्याने आपले शोधकार्य चालू ठेवले होते. त्याच्या स्वतःच्या सिद्धांतातून उत्पन्न झालेल्या अनेक विस्मयकारक प्रश्नांची उत्तरं त्याच्या हयातीत सापडतील अशी त्याला आशा होती. 

पुन्हा त्याला अमरची आठवण आली. काय म्हणाला होता तो? ज्ञानकण हे चेतनेचे, जाणिवेचे लघुत्तम अंश असतात. त्याबद्दल काईजाला फारशी खातरी नव्हती. संशोधनाच्या त्या क्षेत्राशी त्याचा संबंध नव्हता. गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आणि गुरुत्वाकर्षण क्षेत्र यांत त्याला रस होता. आणि कृष्णविवरांच्या सभोवती असलेलं प्रचंड आणि अद्वितीय गुरुत्वाकर्षण क्षेत्र. गुरुत्वाकर्षण ही कसली शक्ती होती? गुरुत्वकण आणि ज्ञानकण यांच्यात काय परस्परसंबंध आहे? विश्वात भरून राहिलेल्या प्रचंड प्रसरण शक्तीच्या उपस्थितीत मुळात गुरुत्वाकर्षण शक्ती कशी काय असू शकते? काईजा विचारात इतका गढून गेला होता की त्याची वाट अडवून उभ्या असलेल्या फ्लोकडे तिच्याशी जवळ जवळ टक्कर होईपर्यंत त्याचं लक्षही गेलं नाही. 

“तू माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो आहेस,” लटक्या रागाने ती म्हणाली.

काईजा ओशाळवाणे हसला. गेल्या काही वर्षांपासून फ्लोने त्याच्याशी मैत्री केली होती. त्याच्या ज्ञानकणांविषयीच्या शोधनिबंधाने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली तेव्हापासूनच. ती गुरुत्वकण प्रयोगशाळेची विद्यार्थिनी होती आणि आता तिथे शास्त्रज्ञ म्हणून संशोधन करत होती. तिचं आणि काईजाचं कार्यक्षेत्र जरी सारखं असलं तरी त्यांचं व्यक्तिमत्त्व एकमेकांच्या अगदी विरुद्ध  होतं. फ्लोने त्याच्या आयुष्यात आपणहून प्रवेश केला नसता तर काईजा आयुष्यभर एकलकोंडा आणि ब्रह्मचारी राहिला असता. फ्लो अतिशय उत्साही आणि बोलक्या स्वभावाची होती आणि काईजाच्या स्वभावातील भिडस्तपणा आणि अवघडलेपणाचा तिच्यात लवलेशही नव्हता. पण त्याच्या सौम्य स्वभावावर आणि लाजाळू व्यक्तिमत्त्वावर ती फिदा होती. 

“तू कामात फार गढून गेला होतास का? तसं असेल तर आज रात्री मी तुला त्याहून जास्त काम करायला लावेन,” ती डोळे मिचकावत म्हणाली. 

“काही  वस्तू आणायला मला बाजाराच्या चौकात जायचं आहे. पण मी तासाभरात तुझ्या गुहेत येईन. माझ्या स्वागतासाठी तयार राहा. पूल गरम करून ठेव. आपण पाण्यात मजा करू,” असं म्हणून तिने आकाशात भरारी घेतली. तिचे लांबसडक रेशमी केस तिच्यामागे डौलदार पसरले. 

कबूल केल्याप्रमाणे तासाभरात ती काईजाच्या घरी पोचली. गेल्या काही वर्षांत तिने त्याच्या प्रयोगशाळेचाच वाढीव भाग असलेल्या त्याच्या अस्ताव्यस्त घराचे एका रंगमहालात रूपांतर केले होते. तिला आयुष्याचा उपभोग घ्यायला आवडत असे आणि काईजानेदेखील त्याच्या आयुष्याचा आनंद घ्यावा याबद्दल ती दक्ष असे. ती दारातून एखाद्या वाऱ्याच्या झोतासारखी आत शिरली तेव्हा काईजा सोफ्यावर लोळत होता. तिने प्राशनाच्या टेबलावर हातातल्या पिशव्या ठेवल्या आणि काईजाने तिच्यासाठी तयार ठेवलेला द्राक्षाच्या रसाचा उंच ग्लास उचलला. दोन तीन घोट घेऊन ती काईजाच्या शेजारी येऊन बसली. 

“मी पटकन शॉवर घेऊन येते. तू पूलमध्ये उतर. मी आलेच,” रेशमासारख्या मऊ आवाजात ती म्हणाली. आपला झगा सोडून ती शॉवरच्या दिशेने डौलदारपणे चालत गेली. न्हाणीघराच्या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर काचेवर उमटलेली तिच्या शरीराची डौलदार छायाकृती काईजा पाहत राहिला. त्याने एक सुस्कारा सोडला आणि उठून, कपडे काढून, त्याच्या दालनाच्या मध्यावर असलेल्या गरम पाण्याच्या पूलमध्ये शिरला. पाचच मिनिटांत फ्लोदेखील आली आणि थोड्याच वेळात केवळ संवेदनांच्या विश्वात त्याला घेऊन गेली. त्याचं बहुतांश आयुष्य ज्या बौद्धिक पातळीवर तो घालवत असे त्यापासून दूर. काईजाला जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा फ्लो निघून गेली होती. अशा एखाद्या उत्कट रात्रीसाठी ती येईल तोपर्यंत कदाचित अनेक महिने निघून जातील. तो तिचा एकमेव प्रियकर नव्हता हे काईजाला माहीत होतं. तिची वाट बघणं एवढंच त्याच्या हातात होतं.

—————————————————————————————————————-

“आरुषी, संध्याप्राशनाची वेळ झाली, घरी ये. मी दहा मिनिटांपूर्वीच तुला हाक मारली. आम्ही थांबलोय तुझ्यासाठी,” आरुषीच्या आईने तिला पुन्हा हाक मारली पण आरुषीने उत्तर दिलं नाही. 

“मी जाऊन तिला घेऊन येतो. पण मला अजूनही हे कळत नाही की आपण तिघांनी एकत्रच प्राशन केलं पाहिजे, असा तुझा का हट्ट असतो?” खुर्चीवरून उठत पपा म्हणाला आणि आरुषीच्या अभ्यासाच्या खोलीकडे गेला.

“कारण आणखी पाच वर्षांनी आपण सगळे कुठे असू कोण जाणे. आत्ता आपण एक कुटुंब आहोत आणि आपण कुटुंबासारखं राहायला हवं. कालांतराने आरुषी अकादमीत जाईल आणि आपण दोघे कुठे असू कोण जाणे.”

पण पपाचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. तो आरुषीच्या खोलीत पोचला तेव्हा ती तिचा अनुभव घेण्याचा स्क्रीन बंद करण्याच्या बेतात होती पण तिचं भ्रमणयंत्र अजूनही तिच्या हातात होतं आणि ती जो काय अनुभव घेत होती त्यात ती अजूनही गुंतली होती. त्याची चाहूल लागताच आरुषीने तिचा तीन मिती असलेला अनुभव स्क्रीन बंद केला आणि ती प्राशनाच्या खोलीकडे जाण्यासाठी वळली. 

“काय वाचत होतीस तू बिट्टू,” ती खोलीत येऊन प्राशनाच्या टेबालाशी बसल्यावर आईने विचारले. 

“ओह, ती साहसकथा इतकी एक्सायटिंग होती आई! आपण काल संध्याकाळी ब्राउझिंग करत असताना आपल्याला जी मालिका सापडली त्यातली होती ती. आपल्याला नाही का ती साहस कथांची पूर्ण मालिका सापडली आणि मी म्हटलं की मला ही पुस्तकं वाचलीच पाहिजेत! तू मला बोलवत होतीस तेव्हा मी त्यातल्या दुसऱ्या पुस्तकाचा अनुभव घेत होते. फारच विलक्षण होतं ते. झोपायच्या आधी मला ते संपवायचं आहे.” आरुषीचा उत्साह ओसंडून जात होता. 

तिचे लकाकणारे डोळे आई बघत राहिली. साधं पुस्तक वाचण्याच्या छोट्याशा अनुभवाने आपली लेक इतकी आनंदी झालेली पाहून तिला आश्चर्य वाटलं. तिच्या स्वतःच्या आयुष्यात, कधीतरी तिने स्वतःच आनंदाच्या व्याख्या इतक्या उंचावून ठेवल्या होत्या की आत्ता आरुषी जितकी आनंदात होती तेवढा आनंद आपल्याला कशाने होईल हे तिला सांगता आलं नसतं. 

पण आरुषीचा स्वभाव मुळातच आनंदी होता. तिला मिळालेली ती निसर्गदत्त देणगी होती. अनेकदा ती आईला हसवायला मुद्दाम काहीतरी विनोदी किंवा चमकदार बोले. खरंच! आधी कसं आपल्या लक्षात नाही आलं, आईला वाटलं. तिची लेकच तिचा सर्वात मोठा आनंदाचा ठेवा होती. आपल्या उंच ग्लासातून  पेय पीत असलेल्या आपल्या लेकीकडे बघून आई हसली. 

—————————————————————————————————————-

त्या दिवशी कामावरून घरी परत आल्यावर फ्रांस्काने करमणुकीच्या चौकात जाण्याची कल्पना मांडली. 

“आपण संध्याप्राशन तिथेच करू आणि मग एखादं नाटक किंवा सिनेमा पाहू किंवा कोणता तरी अनुभव घेऊ,” थोड्याशा साशंकतेने तारीककडे पाहत ती म्हणाली. त्याचं वागणं आजकाल बदलत चाललं होतं, जणूकाही त्यानं हार मानली होती. बऱ्याचदा तिने त्याला तासन्‌तास  काहीही न करता बसून राहिलेलं पाहिलं होतं. तो फक्त शून्यात पाहत बसे. त्याचं हे वागणं त्याच्या स्वभावाच्या इतकं विरुद्ध होतं की त्याचा काय अर्थ लावावा हे तिला कळत नव्हतं. त्याचा अजूनही तिच्यावर जीव होता – उघडच होतं ते. तिला आनंदी ठेवण्यासाठी तो अधिकच जागरूक होता; पण तो स्वतःच हरवून बसल्यासारखा वाटत होता.

तिचं म्हणणं ऐकून तो सावकाश उठून तिच्याजवळ आला.

“कसे जाणार आहोत आपण? उडायची शक्ती नाही माझ्यात.”

“आपण आपल्या झिप्परने जाऊ शकतो.” त्याच्याकडे जास्तच काळजीने पाहत फ्रांस्का म्हणाली. 

करमणुकीचा चौक फक्त फर्लांगभर अंतरावर होता आणि तारीक पट्टीचा उडणारा होता. आता मात्र तिला एखाद्या जीवशास्त्रीय तज्ज्ञाला भेटायची गरज जाणवू लागली. तारीकची ही अवस्था पाहून तिला आता काही समजेनासं झालं होतं.

“तुला कसली काळजी वाटते आहे का तारीक?” त्याचा हात हातात घेत तिने विचारलं.

“छे गं! मी जरा दमलो आहे, इतकंच. थोडी करमणूक करून घेतली की बरं वाटेल मला,” तो उत्साहाने म्हणाला.

करमणुकीच्या भागात इतर लोकांशी बोलताना तारीक थोडासा हरवल्यासारखा असला तरी नेहमीप्रमाणेच उमदेपणाने वागत होता. एका अभिरुचिसंपन्न आणि आरामशीर बारमध्ये विशेष प्रकारचे संध्याप्राशन करून ते एका बर्फाळ हिमनद्यांनी आच्छादलेल्या चंद्राचा अनुभव घ्यायला गेले. रविमंडळातील स्वर्गाचा शेजारी असलेल्या आयसिस ग्रहाच्या एका खऱ्या चंद्रावरील वातावरणाचे सिम्युलेशन होते ते. 

तो चंद्र गोठलेल्या नायट्रोजन वायूने तयार झालेला होता आणि त्याच्यावर निळ्या बर्फाचे उंच डोंगर आणि खोल हिमनद्या होत्या. त्या बर्फाळ चंद्राच्या अनुभवामध्ये प्रेक्षकांतील प्रत्येक व्यक्तीला त्या चंद्रावर चालण्याचा आभास अनुभवता येत असे आणि प्रत्यक्ष त्या उपग्रहावर वाहणारा बर्फाळ वारा त्यांच्या अंगाला झोंबत असे. त्या अनुभवात दहा मिनिटे घालवल्यावर आपण खरं म्हणजे स्वर्गावरील एका अनुभवकक्षाच्या काचेच्या जमिनीवर आपली आभासी चालण्याची दिशा ठरवणारी जॉय स्टिक हातात पकडून फक्त उभे आहोत यावर विश्वास ठेवणे कठीण जात असे. त्या अनुभवात भाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण गोठलेल्या खोल दऱ्यांवरून तरंगत जात आहोत आणि त्या चंद्राच्या निळ्या बर्फाळ प्रदेशातून चालता चालता त्यात पडलेल्या भेगांतून अचानक खालच्या दडलेल्या खोल दरीत कोसळतो आहोत असे वाटे. 

अनुभव कक्षातून ते बाहेर पडले तेव्हा फ्रांस्का तारीकच्या दंडाला बिलगली होती. त्या आभासी साहसाच्या थराराने ती अजूनही कापत होती. ते दोघे रस्त्यावर पोचले तशी त्यांची झिप्पर त्यांच्या शेजारी येऊन उभी राहिली. इतर प्रेक्षक त्यांच्या जवळपास असलेल्या घरांकडे उडत निघाले होते. त्यांना निरोप देऊन फ्रांस्का झिप्परमध्ये तारीकच्या शेजारी बसली आणि ते जवळच असलेल्या त्यांच्या घरापर्यंत गेले. 

दुसऱ्या दिवशी रेडिओ फिजिक्सच्या प्रयोगशाळेतील तिचे काम आटोपल्यावर फ्रांस्काने घाईघाईने आपला कामाचा स्क्रीन बंद केला आणि ती उठली. ती झिप्परने जीवशास्त्रीय चौकात जाऊन तिथल्या एका कॅफेमध्ये एका तज्ज्ञाला भेटणार होती. झिप्परमधून जेव्हा ती चौकात उतरली तेव्हा एका सायबोर्गने तिचं स्वागत केले आणि  जीवशास्त्र तज्ज्ञ मानवी तिची जिथे वाट पाहत बसली होती त्या प्राशनाच्या बारमध्ये तो तिला घेऊन गेला.

“मी फ्रांस्का टोरी,” तिने स्वतःची ओळख करून दिली.

“अभिवादन फ्रांस्का! दिवसभर प्रयोगशाळेत काम करून तू दमली असशील. मी तुझ्यासाठी कोणतं पेय मागवू?”

“कॉफी चालेल,” फ्रांस्का म्हणाली. आपण येण्याचा निर्णय घेतला ते बरं झालं असं तिला वाटलं.

“तुझ्या साथीदाराविषयी कसली काळजी वाटते आहे तुला,” मानवीने हळुवारपणे विचारलं.

मग फ्रांस्काने तिला तारीकने पृथ्वी प्रकल्पातून अकारणच दिलेल्या राजीनाम्याबद्दल सांगितलं. तिच्याबरोबर पुन्हा राहण्याच्या त्याच्या इच्छेविषयी सांगितलं, सर्वच बौद्धिक कामापासून हळूहळू त्याने घेतलेल्या संन्यासाविषयी सांगितलं, आयुष्यातील कोणत्याही गोष्टीविषयी आता त्याला रस उरला नाही हे सांगितलं आणि त्याच्या डोळ्यांत दिसणाऱ्या त्या दूर, एकाकी दृष्टीविषयीदेखील सांगितलं. 

“तारीकने तुला स्पष्टपणे काही सांगितलं आहे का? या गोष्टींमध्ये त्याला आता रस का वाटत नाही, हे सांगितलं?” मानवीने विचारलं.

“नाही; पण मला जाणवतं आहे की त्याला काहीतरी सांगायचं आहे, पण तो ते टाळतो आहे.”

“फ्रांस्का, ही स्पष्ट लक्षणं आहेत. मला हे आता तुला सांगितलंच पाहिजे. तारीक बहुधा त्याच्या आयुष्याच्या शेवटाकडे पोचला आहे. लवकरच तो कायमच्या विश्रांतीसाठी जाण्याचा निर्णय घेईल.”

“पण अजून त्याचं तेवढं वय झालेलं नाही. त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे असलेल्या लोकांनीही अजून जाण्याचं ठरवलेलं नाही हे मला माहिती आहे.”

“कधीकधी ते लवकर होतं. जर एखाद्या व्यक्तीचा आयुष्यातील रस संपून गेला तर तसंच काळ कंठणं फार अवघड होऊन बसतं. प्रत्येक क्षणाचं मग ओझं वाटू लागतं. तू जे मला सांगितलंस त्यावरून तारीक त्या अवस्थेला पोचला आहे असं मला वाटतं. अजूनही तुझ्यावर जीव असतानाच जावं असं ठरवेल तो कदाचित. त्याचं मन विरघळायला लागल्यावर त्याने अनंतात विरून जाणं तुलादेखील आवडणार नाही.”

” छे छे, ते भयानक होईल. तुझं म्हणणं जर बरोबर असेल तर बहुतेक तो माझ्यासाठीच थांबला आहे,” फ्रांस्का गंभीर होत म्हणाली. त्याची द्विधा मनःस्थिती आता तिच्या नीट लक्षात आली होती.

“त्याने जर ती इच्छा बोलून दाखवली, तर तू त्याला थोपवू नको.”

त्या दिवशी फ्रांस्का जड अंतःकरणाने घरी आली आणि तारीकला मिठी मारून झोपली. कसे कोण जाणे पण तिच्या लक्षात आले आहे हे त्याला कळले. मनाची तयारी करायला तिला अवधी मिळेल हे पाहून त्याला बरं वाटलं. 

———— प्रकरण पाचवे समाप्त ——————

Author

Leave a Reply