संत, पंत, तंत – काव्यविषयक लेखमाला – रघुनाथ पंडित भाग ५

  

पंडित कवींचा काळ चार-साडेचारशे  वर्षांपूर्वीचा. यानंतरच्या काव्यात हळूहळू गेयतेपेक्षा अर्थाला प्राधान्य  आलं. अर्थप्रधान होण्याच्या प्रक्रियेत काही काव्यलेणी गळून पडली.  सणावाराला पणजीबाईंची नथ हौशीनं घालावी तशी एखादी कविता सवृत्त, सालंकृत दिसू लागली. पंतकवींच्या काळातही अशीच प्रक्रिया घडली होती. ओवीतून बदल घडवत संस्कृत छंद, मराठी वृत्तं, अलंकारांमधून काव्य सजत गेलं.  अलंकारांची ओढ आणि   द्व्यर्थी रचना हा बौद्धिक काव्यखेळ  झाला. रघुनाथ पंडितांची भाषाशैली, संस्कृतप्रचुर भारदस्त मराठी भाषा अशीच काव्याला वजन देणारी. त्यांनी उपयोजिलेल्या अलंकारांची मोहिनी पडते. त्यांच्या पात्र आणि प्रसंग रेखाटनात जिवंतपणा – ठाशीवपणा  आहे.  त्यामुळे वृत्तबद्ध, अलंकारांनी नटवलेलं कथाकाव्य वाचताना  घटनाही दृक्श्राव्य होतात. वाचक काव्यात रंगून जातो. मूळ संस्कृत ‘नैषध’ काव्यावरून रचलेलं काव्य असलं तरी त्यात त्यांचे जातिवंत काव्यगुण सहज जाणवत राहतात.  उपदेशाचे, सूचनांचे बाळकडू त्यांनी वरचेवर दिलेले नाही. त्यामुळे कथाकाव्यात तरलता आणि एकसंधता येते. या शेवटच्या भागात आपण आधी त्यांच्या काव्यातील नाट्याचा अनुभव घेऊ या.  

हंस धरीन ह्मणोनि मनोरथ हा मज होय विनोद तुम्हांला

हा कलहंस पिटाळवितांहि पुन्हा उडवाल तया विहगाला

जा परत्याच, तुम्ही नलगेच, असें वदुनी नृपराजसुता ते

राहविला सखिचा जन आपणमात्र तयास धरूं मग जाते||८७||

राजबिंडा हंस उडून जाऊ नये यासाठी दमयंतीचा आटापिटा चालू आहे. त्याला हलकेच पकडण्यासाठी ती प्रयत्न करत आहे. पण तिच्या सख्या तिची थट्टा करत आहेत. हा नाट्यमय प्रसंग मदिरासारख्या अवघड आणि मोठ्या वृत्तात ओवून तिचा सख्यांप्रतीचा राग आणि हंसाप्रतीचा अनुराग व्यक्त केला आहे.

हे नाट्य पुढे आणखी उत्सुकतावर्धक होते, स्वभावोक्ती अलंकारातून चित्रपटासारखे पुढे सरकत जाते. 

आणीकही पद न वाजत मंद चाले

जो चालतां पदर सांवरिला न हाले

हेही करी निजकरीं खग सांपडेसा

तोही हळू हळुच होय पलीकडेसा ||८९||

आवाज होऊ न देता चालणारी दमयंती आणि तिची चाहूल लागून हळूहळू पुढे जात राहणारा हंस हे  चित्र रघुनाथ पंडित सजीव करतात. ‘ती पदर सावरून चालत असते,’ या साध्याशा वर्णनातून तिची शालीनता,  वेशभूषा दर्शवणारा आहार्य अभिनय  सहज मनात ठसून जातो. 

मदगजगमनेनें मागुती चाल केली

विनत-तनु-लता हे तत्समीपास गेली

पुनरपि फडके तो फारसा दूर नाहीं

जवळि जवळि ऐसा भासला हंस कांही ||९०||

यातले शब्द अवघड असले तरी  बारकाईने विचार केल्यावर  नाट्य दिसू लागतं. मदगजगमना म्हणजे मदांध हत्ती जसा चालत जाईल तशी ती हळूहळू चालत गेली. नाट्यशास्त्रात आंगिक अभिनयाला फार महत्त्व आहे. देहबोलीतून भावना उलगडणारी हालचाल रघुनाथ पंडितांनी बटबटीत होऊ न देता रंगवली आहे. 

 इथे पुन्हा आणखी एक रूपकही मांडलं आहे :

‘विनत- तनु – लता’ एखादी लवलेली वेल असते तशी तिची तनुलता! तिचं नाजूकपण आणि नम्रता – आंगिक अभिनयाचे वर्णन आणि कोमल मृदू शब्दांमुळे तिची अलवारता अगदी नाट्यमय रितीने  या साहित्यप्रतलावर जिवंत दिसू लागते.  कथेतील वळणे वळसे वाढत जात उत्सुकता ताणली जाते. दमयंतीचं अपहरण करून नळासमोर तिला उभी करावी ही चित्रपटात शोभेल अशी एक कल्पनाही रघुनाथ पंडितांचा हंस लढवतो. 

बसवुनि निजपाठीं तूज नेईन तेथें||

परि चुकुर तुझे हे लोक होतील येथे

||१२२||

इकडे दमयंतीची उत्सुकता तर तिकडे  आतुरतेने वाट पाहणारा नळ. हंस दृष्टीस पडताच प्रश्नांची सरबत्ती करतो… साठच्या जमान्यातल्या चित्रपटांसारखंच रेखलेलं हे नाट्य! 

काय वदली तुजसवे हंसराया

मान्य झाली कीं ती मला वराया

कधीं भेटे ती निजकरीं धराया

विरह-बाधा मज नये आंवराया ||१२५||

दमयंतीच्या भेटीसाठी अधीर झालेला हा नायक अशी हंसाच्या बोलण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. काव्यप्रतलावरील उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या कथेत दुसर्‍या बाजूला चित्रपटासारखाच दमयंतीच्या सख्यांचा मेळा जमतो. त्या तिला ‘सौधशाळेंत’ नेतात.  दमयंतीला नळाचा विरह सोसवत नाहीये. विरहदशा तिला भाजून काढत आहे. यात उपमा अलंकार आणि अतिशयोक्ती असा मजेदार संकर करत रघुनाथ पंडित म्हणतात, 

‘नळविरहभरानें पोळली गुप्तरूपें ||

नवल कनकसी ते गौरही तप्तरूपे’ ||१३२||

आता इथेही एक कोडे पडते :

विरहार्ता दमयंती खरंतर विरहज्वराने लालबुंद व्हायला हवी होती… पण ती शुभ्रवर्णी होती – चांदी  तापल्यावर जशी पांढरी होते तशी ती फिकट पांढरी दिसू लागली होती. गुप्तरूपे आणि तप्तरूपे असे यमक आणि   रूपे (सौंदर्य) आणि रूपे ( म्हणजे चांदी! चांदी तापल्यावर पांढरी पडते) असाही शब्दखेळ केला आहे. 

या पंक्तींतून नाट्याचा सूक्ष्म अभ्यास,  नायिकेला केंद्रस्थानी ठेवून नाट्यशास्त्रातील वैवर्ण्यासारख्या सात्त्विक अभिनयाचे दर्शन रघुनाथ पंडित घडवतात. सात्त्विक अभिनय म्हणजे पात्राच्या मनात उमटलेल्या भावना चेहऱ्यावरून दृग्गोचर होताना दिसतात. नळाच्या विरहाची स्थिती तिच्या अंतर्मनात आहे… पण तिचा पांढराफटक पडलेला चेहरा तिची मानसिक स्थिती सहज उघड करून दाखवत आहे. नाट्यप्रतलावर काव्याच्या माध्यमातून अशी स्थिती वाचकांच्या समोर उभी करणं हा निःसंशय मोठा काव्यगुण आहे. 

या नाट्यात काही वळणे असावीत या हेतूने कळीच्या नारदाचा प्रवेश होतो. 

तया प्रासादीं जाय ऋषी पाहे||

सभा केली देवेंद्र बैसलाहे||१४०||

नारदाच्या वाचिक अभिनयातूनच इंद्राला दमयंतीच्या सौंदर्याची भुरळ पडते. 

समुद्रोद्भवा अप्सरा साठ कोटी

जयांची द्युती ते रतीलाही लोटी

विधीनें तशा त्या तुळूं पाहिजेल्या

जियेशीं हळू जाहल्या उंच गेल्या ||१४१|| 

एका पारड्यात दमयंती आणि एका पारड्यात अप्सरांना ठेवलं. पण अप्सरांचं पारडं हलकं झालं. सौंदर्यनिदर्शक वचनांमधून नाट्यात ताण आणण्याच्या दृष्टीने नारदाने वाचिक कौशल्य पणाला लावले  आणि वेगवेगळ्या ठिकाणांचे राजे महाराजे दमयंतीच्या आशेने येऊ लागले. यांत वरुण, पावक, यम आणि इंद्रही निघाले.  

आता कथेतला आणखी मोठा पेच म्हणजे, इंद्र नळराजाला सांगतो, “गुप्तरूप प्राप्त करून दमयंतीकडे जा आणि सुरेंद्राची पत्नी होण्याची तिला गळ घाल.” 

पुढे सगळं छान छान होईल हे माहीत असूनही ते कधी? कसं? हा प्रश्न  वाचकांसमोर उभा राहतो. कथेतला ताण  सुतासुताने वाढत जातो. 

नायक दमयंतीकडे  त्याचं स्वतःचं प्रेम लपवून इंद्रासाठी मागणी घालायला जातो. आता पुढे काय…

नळाचे दर्शन होताच दमयंतीला वाटते, 

निजहृदय निवासी काय बाहेर आला ||१७२||

ज्याचं चिंतन करत होती तोच समोर दिसला… पण पुढे खूप घडायचं आहे… 

नळावरचं प्रेम स्पष्ट केल्यानंतरही एक मोठा तिढा निर्माण होतो…  सर्वजण नळाचंच रूप घेऊन येतात! कथा चित्रपटासारखी उलगडताना  गर्तेत रुतत जाते की काय असा ताण! 

अर्थातच दमयंती – तिची सखी शारदा – हिच्या साहाय्याने त्यांचा मुखवटा ओळखते. पुढे एक मजेदार वळसा देत

दमयंती थेट इंद्रादिकांना वंदन करून म्हणते

माझा  भीम जैसा पिता तैसे तुम्ही जी तत्त्वतां ||

करा कन्यादान आतां नळनाथाचें करीं’||२११||

जे तिच्याशी लग्नाच्या आशेने आले असतात ते अचानक  पितृपद पावतात.

 हा विनोदी प्रसंग काव्यातून अनुभवताना नकळत ओठांवर हसू येतं.  

विलक्षण सुखावलेली दमयंती अत्यानंदात आईवडिलांनाही विसरते. 

मावेचना सुख मनीं कमनीय बाला

मायेसही विसरली न पुसेचि बाला

बाला आणि बा ला (वडिलांना) अशा शब्दखेळाची उधळण चित्ररूप सजवते. 

दूर्वादळीं कदलिबंधमधूकमाळा

तीनें अलंकृत करी नळकंठनाळा

केळीच्या सोपटाने ती नळाचा कंठनाळ म्हणजे कंठ हाच जणू कमळाचा देठ आहे त्या कंठाला माला घालते. 

नाट्यपूर्ण रचना असलेलं हे काव्य समजून घेताना शब्दकोशाचा आधार घ्यावा लागतो.  आताच्या मराठीत उपयोगात नसलेले शब्द वारंवार चकवतात. 

भूपाळ जो मम मनोमुकुरीं उभासे ||१८१||

मुकुर म्हणजे आरसा.  मन हाच आरसा! त्यात उभासे… उभा असे!  त्याचं बिंब माझ्या मनात सदैव असतं. वसंततिलकेचा बंध सांभाळून व्यक्त केलेली ही नाजूक भावना! 

नळराजाच्या आतिथ्याने भारावून गेलेले याचक फिरत फिरत विदर्भ नगरीत गेले. विदर्भराजा भीमकानेही त्यांचे आगतस्वागत केले, कुठून आलात विचारले… 

तुम्हीं आला कोठून अशा बोलें

द्विजीं निषधा पासाव म्हणीजेले

आधुनिक मराठी भाषेला पासाव हा शब्द माहीत नसला तरी पासून किंवा कडून हा अर्थ लक्षात येतो.   ‘द्विजांनी   म्हटले निषधाकडून’ ३+६+१० अशा दिंडीच्या कोंदणात चपखल बसवलेला हा शब्द! 

हर हर सांपडलो असा शोक व्यक्त करत हंस स्वगत करत राहतो. 

इतर नदी जळटाकीं

टाकुनि आलों याच तटाकीं ||४५||

टाकी म्हणजे पाण्याचं कुंड – ते टाकून याच तटाकी का बरं आलो? तडाग या संस्कृत शब्दाचं तद्भव रूप तटाक. ‘टाकी टाकून तटाकी’ असे समान वर्णांचे तीन शब्द योजून गेयतेसह भाषाप्रभुत्वही सिद्ध करत रघुनाथ पंडित पुढे म्हणतात, 

सोडुनि मानस केली ||

कापुन घ्याया आलों शेली ||४५||

संस्कृत आणि मराठी शब्दांचा संकर करून उपयोजिलेलं हे यमक. 

मानस सरोवरातील ‘केली’ (म्हणजे क्रीडा) सोडून इथे शेली कापायला आलो म्हणजे  मान कापून घ्यायला आलो.  जाता जाता 

‘सोडवि मज रघुनाथा असं म्हणत  वृत्त, यमक, कठीण शब्दांचा वापर यांसह रघुनाथ शब्दावर श्लेष अलंकारही ते गुंफत आहेत असं वाटतं. या मृत्युलोकात मान कापून घ्यायला आलो आहे, सोडवि रघुनाथा – म्हणजे मला… 

८-८-८-६ मात्रांची स्वर्गंगा वृत्तातील एक रचना 

रूपवती ते भूपसुता अनुरूप नसे दुसरी वनिता

हूप धरूनि वरीं तिजला अनुरूप पयोधि जशी सरिता.. ||६२||

दमयंतीच्या सौंदर्याचं असं भरभरून वर्णन करत सुवर्णहंस पुढे म्हणतो

नूतन-नीरज-नूत-मुखी पुरुहूत-वधूसि सखी निरखी

हे कोडं कसं सोडवायचं? 

नुकत्याच उमललेल्या कमलपुष्पाप्रमाणे(नीरज) मुख असलेली, पुरुहूत म्हणजे इंद्र (पुरु म्हणजे स्वर्ग) त्याची वधू म्हणजे इंद्राणी तिची सखी… याचा अर्थ इथे तिच्या सौंदर्यासारखंच सौंदर्य असलेली.

 दमयंती कशी घडली आहे हे सांगताना अतिशयोक्ती अलंकाराचा मनमुराद शिडकावा रघुनाथ पंडितांनी केला आहे  आणि  चट्कन कळणार नाही अशी तिच्या घडणीची प्रक्रिया दिली आहे. 

धाता करींच करिता मृदु हे न होती

या कारणास्तव मनोमय मूस ओती

तेथें भरोनि पहिला रस पूर्ण केली

ओतीव हे न घटिताकृति बोलिजेली ||६३||

 धातृ म्हणजे कर्ता –  धाता – म्हणजे ब्रह्मदेव, त्यानं स्वतःच्या हातानं तिला घडवायचा प्रयत्न केला तरी मृदुत्व आलं नाही.  आता अतिशयोक्तीचा आणखी पुढचा स्तर : शरीरातील पाच कोशांपैकी मनोमय कोशाचा आधार त्याने घेतला.  मनाचा मऊपणा घेऊन त्या साच्यातून तिची  मूस घडवली.  सौंदर्याचं आणि मार्दवाचं  वर्णन करण्यासाठी थेट मनोमय कोशाकडे वळणारा ब्रह्मदेव हा अतिशयोक्ती अलंकाराचा अत्युच्च नमुना असावा. 

  हंस दमयंतीला म्हणतो, तू मला पकडलंस तरी नंतर सोडशील यावर मी विश्वास कसा ठेवू? 

कसा पातेजूं बाळबुद्धि तूझी ||९४||

पातेजूं याचा अर्थ विश्वास कसा ठेवू?

पत राहिली नाही वाक्यप्रयोगातून पत पातेजणे हे क्रियापद झाले असावे. विश्वास कसा ठेवू? या अर्थी इथे उपयोजिलेले आहे. 

 स्त्रियांचा स्वभाव कोणत्याही युगात सौंदर्याची ओढ असलेला! हंसाची सुवर्णकांती बघून तिचे कुतूहल जागृत होते. ती विचारते, तुला हा वर्ण कसा प्राप्त झाला? त्यावर हंसही तिला त्याच्या रंगाचे रहस्य सांगतो.  अवघड शब्दातील रहस्य असे :

मंदाकिनीमधिल जीं कनकारविंदें

तीं जेवितों मृदुलनालमृणालकंदें ||१००||

मंदाकिनी म्हणजे गंगा. गंगेतील सोनकमळे (कनक+अरविंद) त्या कमळाचे मऊ देठ (नाल)  हाच आमचा आहार आहे. रोज सोनकमळांचं बीज खाल्ल्यामुळे मी सुवर्णरंगी आहे. 

अवघड कोड्यांच्या या मांदियाळीत मेंदूला आणखी एक खुराक 

जो मानसी विहरतो विहरो परी तो

कां आमुची कुलसती असती करीतो

राखीं नळा निजयशोमय हंसराया

आलो महीवर फिराद अशी कराया ||१०१||

आपल्या येण्याचे कारण हंस सांगतो, मी पृथ्वीवर फिर्याद करायला आलो आहे. फिर्यादीचं कारण काय… नळाचे दिगंत यश हाच झगमगणारा हंस. 

यात कसली फिर्याद? 

स्पर्धेची… 

ही स्पर्धा कोठून आली? मानससरोवरातील हंसांच्या वर्णातून.  

नळाच्या यशोमय हंसाने आमच्या मानससरोवरात क्रीडा करू नये. मानसी म्हणजे स्वर्गातील मानससरोवरात. तिथवर नळाच्या यशाची कीर्ती पोहोचली आहे. त्यामुळे आम्हां सुवर्णहंसांची कीर्ती कमी झाली आहे. यात कीर्तीला पतिव्रता म्हणजे कुलसती संबोधले आहे. ही कीर्ती पळवून नळानं तिला बाटवलं आहे –  ‘अ’सती केलं आहे. याची फिर्याद करायला मी पृथ्वीवर आलो आहे असं हंस म्हणतो. 

अलंकार संकरातूनही काठिण्य निर्माण केलंय रघुनाथ पंडितांनी. वरवर वाचताना त्यातला श्लेष समजतोच असं नाही. 

नैषध कथा लोण्याच्या गोळ्यासारखी आहे असं रघुनाथ पंडित म्हणतात 

आधीच नैषधकथा नवनीत भेला

होता अलंकरणरूप इच्या जिभेला ||१०४||

भेलाचं यमक जुळवून लोण्याचा गोळा आणि त्याचं जिभेशी नातं प्रस्थापित करून ते पुढे म्हणतात, 

हंसोदयें विघरतां अधरीं धरी ते

हंसोदयाचे दोन अर्थ इथे जाणीवपूर्वक उपयोजिले आहेत आणि त्यातून श्लेष निर्माण केला आहे. 

हंस या शब्दाचा पक्षी या अर्थासह  सूर्य हाही अर्थ होतो. 

हंसोदयें विघरता… 

सूर्याच्या – हंसाच्या – उष्णतेने लोण्याचा गोळा विघुरतो… घट्टपणा सोडतो… तद्वत आजवर दडवलेला, ओठांच्या आड लपवून ठेवलेला नळराजाविषयीचा आदर  या हंसाच्या आगमनाने आता तिच्या ओठांतून पाझरू लागला आहे… ती त्याच्याविषयी बोलू लागली आहे. 

नळाविषयी जाणून घ्यायला उत्सुक असलेली दमयंती बघून हंस मनातून आनंदला आहे. त्याच्या मनातले विचार

‘हे जी’ च्या अनुप्रासातून मांडत शब्दखेळ करतात. 

निषधराजीं हे फार दिसे राजी

असें हंसें जाणोनि मनामाजी

बोलिजेली नळराजकथा हे जी

भला हेजीब तीशि म्हणे हे जी! 

हेजीब म्हणजे वकिली करणारा, दूत. 

तुझ्या एका शब्दाने दमयंती माझ्याशी विवाहबद्ध होईल हे इंद्राचे म्हणणे ऐकल्यावर यमक आणि दृष्टान्त यांच्या जोडीतून इंद्राला स्वतःची असमर्थता दर्शवत नळराजा  म्हणतो 

बाळ तान्हें उचलील काय जाते |

बोलणाराचें मोल फोल जाते ||१६२||

जातेचा द्व्यर्थ आणि दृष्टान्त अशी जोडी चपखल बसली आहे. 

काव्यार्थापत्ती अलंकार या भारदस्त नावाच्या अलंकारात सहजता असते. त्याशिवाय दुसरं काही घडूच शकत नाही ही खातरी असते. याचं मजेशीर उपयोजन करताना रघुनाथ पंडित एक दृष्टान्तही देतात. 

नळरहित वराशीं तूज योजूनि पाहे  

तरि मग विधि ऐसा कोण तो मूढ आहे 

नळाव्यतिरिक्त तुझा पती दुसरा कोण?… अर्थात कोणी नाही… असा कोणी निघालाच तर तो मूर्ख आहे… अगदी गावंढळ माणूससुद्धा दूध आणि ताक एकत्र करणार नाही 

शुभ्रांशूवंशजावतंस (१२०) असा ९ अक्षरी बहुब्रीही समास वापरून रघुनाथ पंडित कोड्यात टाकतात. शुभ्र+अंशु+वंशज+अवतंस

पांढरे शुभ्र किरण असलेल्याच्या वंशातील  (चंद्राच्या) अवतंस (तुरा) म्हणजे नळराज! हे असं वाचलं की वाटतं,  हे त्यांना सुचलं तरी कसं असेल! 

स्वयंवराची सिद्धता झाली. दमयंतीच्या मनात नक्की कोण आहे हे तिने कोणालाही सांगितले नव्हते. या गुपिताविषयी रघुनाथ पंडित म्हणतात, 

दृढतरनिजलज्जागव्हरी गुप्त केला’ (नवनीत पाठभेद – सिंह केला) 

स्वतःची लज्जा तिनं कठोरपणे गव्हरात म्हणजे गुहेत – अर्थात मनाच्या संपुटात लपवून ठेवली. 

काही संधीही विलक्षण अवघड वाटतात. वृत्तसुखार्थ या रचना केल्या असल्या तरी त्या  आत्ताच्या काळातील वाचकांना अवघड वाटू शकतात. 

त्वद्दूतता हा असाच एक शब्द 

त्वत् + दूतता तुझं दूतत्व या अर्थी योजलेला हा शब्द त च्या अनुप्रासासाठी मात्र योग्य ठरतो. 

अति सर्वत्र वर्जयेत् सर्वच ठिकाणी लागू होतं. या हौशीचा सोस व्हायला वेळ लागत नाही आणि त्यातून काही चुका किंवा दोषही निर्माण होतात. 

नवल मज न भासे चंद्रवंशैकशाली |

नल तरि वनमाळी भीमकी हेचि झाली ||१८ ||

इथे वडाची साल पिंपळाला लावून ओढून ताणून साधर्म्य दाखवायचा प्रयत्न केला आहे. 

जर नलाला वनमाळी म्हणजे कृष्ण मानलं तर दमयंती रुक्मिणी होईल. रुक्मिणी ही भीमक राजाची कन्या म्हणजे भीमकी. दमयंतीच्या पित्याचे नावही तेच. असा हा वडाची शेंडी पिंपळाला बांधून शब्दचमत्कृती करण्याचा केविलवाणा आटापिटा दिसतो. 

रघुनाथ पंडितांच्या आवडत्या दिंडी वृत्तातही क्वचित मात्रेच्या चुका  आढळतात. पहिल्या ९ मात्रा आणि नंतर दहा असं १९ मात्रांचं हे वृत्त.

पक्ष झळकती वीज जसी नाचे||३६||

पहिल्या ८ मात्रांमुळे क्ष च्या पुढे अवग्रह चिन्ह गृहीत धरावे लागते. 

थोर होतिल बाळकें तुझीं बाळे|

तुला कामा येतील वेल्हाळे||४७||

इथेही दिंडी वृत्तात शेवटच्या ओळीत एक मात्रा कमी पडते. त्याचबरोबर तुझी बाळे मोठी होतील, तुझ्या मदतीला येतील असा कारुण्यतूनही येणारा आशावाद मांडतानाच, माझी आई शोकशाळेत बसून माझी आठवण काढत बसेल ही पंक्ती पत्नी पिलांबरोबर असेल… म्हणजे दुःखी असणार नाही अशी छटा दर्शवून जाते. 

राजहंस दमयंतीच्या दिशेने उडाला. आजूबाजूला  कावळ्यासारखे पक्षी उडत होते त्यांच्यात तो ससाण्यासारखा वेगवान म्हणून उठून दिसत होता.

नभा मानुन कीं निकष पाषाणा |

स्वर्णरेखातें तेज मनीं आणा ||७३||

निकष पाषाण म्हणजे सोन्याची सत्यता पडताळून पाहणारा दगड. इथे आकाशाला निकष पाषाण मानले आहे आणि कसोटी आहे एका रेघेत उडत जाणाऱ्या सुवर्णहंसाची.  विमानाची रेघ जशी उमटत जाते तशी निळ्या आकाशात त्याची सोनसळी काया चमकत राहील. दिंडीतील या वृत्तात नभा मानुन या पंक्तीत एक मात्रा कमी पडते. त्यामुळे गेयतेत दोष निर्माण होतो.

 गंवसलाच असा खग भासला | 

तंव तदीय सखीजन हांसला ||८५||

यात सखीजन हांसला ही चूक वाटते. तत्कालीन मराठीत जन हा शब्द पुल्लिंगी चालत होता. त्यामुळे सखीजन पुल्लिंगी वापरणं हा आता दोष वाटतो.

देवांच्या राजा इंद्राने मागितलेले द्यायचे तर मी दमयंतीला देऊ शकेन का? हा प्रश्न नळाला पडला आहे. इंद्र म्हणतो, 

समज आम्ही तुजजवळि याचनेला |

करूं आलों मनिं धरुनि कामनेला ||१५१||

हा काय विचारेल याची कल्पना त्याला आहे… 

देवेंद्र दे जरि म्हणेल कदापि भैमी |

ते देववेल मज काय? करीन गै मी ||१५३||

‘काय’ हा शब्द मला देववेल  काय आणि मी ‘गै’ करीन काय यासाठी योजला आहे. भैमीच्या अंत्यानुप्रासासाठी गय करणेचा 

‘गै मी’ हा अट्टाहास  हास्यास्पद ठरतो.

अनुप्रासाच्या हौशीपायीही क्वचित निकृष्ट रचना केलेली आढळते. 

पोहे पसाभर करी तुज दे सुदामा

पोहे तयास्तव तया सदनी सदा मा (१६३/४५)

मूठभर पोहे दिल्याने सुदाम्याच्या घरी अक्षय लक्ष्मीचा वास आहे हे सांगताना ते चक्क पोहे म्हणजे पोहते अशा अर्थाने आदियमक जुळवतात. 

चुका शोधून काढणे हा या लेखमालेचा उद्देश नाही. जरी तो असला तरी दोषदिग्दर्शनासाठी काळाचा विचार करणेही महत्त्वाचे आहे.  संस्कृत साहित्यात काव्यनिर्मितीची  तीन कारणे सांगितली आहेत. 

१)उपजत असलेली प्रतिभाशक्ती

२) व्युत्पत्ती. ही व्यावहारिक बाब. 

३) वरील दोन्ही गोष्टींसह काव्यशास्त्राचा अभ्यास हीदेखील महत्त्वाची गोष्ट मानली जात असे. आताच्या काळात काव्य सगळ्याच बंधनांतून मुक्त झाले आहे. मुक्तकाव्याची   अभिव्यक्ती आनंददायी आहेच; परंतु पंतकवींच्या रचनेतील गेयता, अलंकारांचे नक्षीकाम यांची मौजही विलक्षण आहे. अलंकार शास्त्राला व्याकरण शास्त्राचे शेपूट म्हटलं आहे.  हे शेपूट उचित उपयोजनामुळे काव्याचा दर्जा उंचावून जातं हे रघुनाथ पंडितांच्या रचनांमधून स्पष्ट होतं. 

संदर्भ : नलदमयंती स्वयंवराख्यान 

कै. सिताराम विष्णु सरवटे 

अलंकार चंद्रिका 

कै. गणेश मोरेश्वर गोरे 

Author

Leave a Reply