कथा : कृष्णसर्प 

प्रसिद्ध कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना त्यांच्या ‘हार्ट लॅंप’ या पुस्तकासाठी २०२५ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. हे पुस्तक त्यांच्या मूळ कन्नड लघुकथा संग्रहाचे इंग्रजी भाषांतर आहे.

या पुरस्काराने  त्यांनी इतिहास रचला आहे; कारण :

बुकर पुरस्कार मिळवणारे हे पहिले ‘कन्नड’ साहित्य आहे.

लघुकथांच्या संग्रहाला हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारतीय अनुवादकाला (दीपा भाष्टी) अनुवादासाठी बुकर पुरस्कार मिळण्याचीही ही पहिलीच वेळ आहे.

‘हार्ट लॅंप’ या संग्रहात १९९० ते २०२३ दरम्यान लिहिलेल्या १२ लघुकथा आहेत. या कथा दक्षिण भारतातील मुस्लीम महिलांच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष आणि समाजातील त्यांची स्थिती अत्यंत प्रभावीपणे मांडतात. या कथांद्वारे मुश्ताक पितृसत्ताक विचारसरणी, धार्मिक निर्बंध आणि लिंगभेद यांवर प्रकाश टाकतात. बानू मुश्ताक यांनी यापूर्वी ‘लंकेश’ मासिकात वार्ताहर  म्हणून आणि बंगळूरूमधील ऑल इंडिया रेडिओमध्येही काम केले आहे. १९९९ मध्ये त्यांना कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मार्च २०१० च्या  अंतर्नादच्या अंकात त्यांच्या ‘कृष्णसर्प’ या मूळ कन्नड कथेचा  सविता दामले यांनी केलेला मराठी अनुवाद छापला होता.  या कथेची महाराष्ट्रात पहिली दखल अंतर्नाद मासिकाने घेतली याचा विशेष आनंद वाटतो. ही कथा त्यानिमित्ताने पुन्हा एकदा छापीत आहोत.

संपादक 

संध्याकाळची अगदी उशिराचीच वेळ! इशाच्या नमाजाची वेळ!

तरन्नुम आईच्या नावानं हाका मारत धावत आली. तिचे केस पावसानं ओले झाले होते. हातातलं अरबी भाषेचं पुस्तक भिजू नये म्हणून तिनं ओढणीच्या आत दडवलं होतं.

“अम्मी ए अम्मी -“

रफिया चुलीवर सुकी मासळी परतण्यात गुंतलेली होती. तरन्नुमनं धापा टाकत टाकत सांगितलं, “अम्मी, हसीना आणि तिची अम्मी मशिदीत आल्या आहेत…”

“अं! कशाकरता?” 

“त्यांनी दावा लावलाय म्हणे!” 

“हं! म्हणून आलीय होय?”

रफी अरबी मदरशात शिकायला जात असे. तिथं त्यानं मस्त झोप काढली होती आणि घरी धावत धावत परत यायच्या गडबडीत सोईस्करपणे आपली पुस्तकं तिथेच विसरून तो येत होता.

त्याची मोठी बहीण वसिमा हिनं त्याला वाटेतच पकडलं आणि ती त्याला बळे बळे  घास भरवायचा प्रयत्न करू लागली. पण आज त्याला धीर नव्हता. तिचा हात बाजूला ढकलत तो म्हणाला, “अम्मी, हसीना आणि तिची आई पुष्कळ वेळापासून मशिदीत बसलेल्या आहेत.” “एवढ्या रात्री का?”

 “त्यांनी दावा लावलाय ना!” 

“हं!”

रफियाचा मुलगा हमीद मदरशामध्ये होता. नटनट्यांची चित्रं आणि काडेपेटीवरची लेबल्स द्यायची आणि त्या बदल्यात खडूचे तुकडे घ्यायचे, ह्या कामात तो मग्न होता. त्याचे खिसे खडूच्या तुकड्यांनी भरून वाहू लागले. तेवढ्यात त्याचा दात एवढा दुखू लागला, की तो कळवळत घराकडे धावत आला. पण तसं असतानाही तो आईला सांगायला विसरला नाही – “अम्मा, हसीनाची…”

मधल्या काळात तिला बातमी लागली, की याकुब पुन्हा लग्न करणार आहे. त्याची रिक्षा चालवणारा मुलगा त्याला हवा आहे. अश्रफचं काचेसारखं तकलादू असलेलं जग तिच्या डोळ्यांदेखत पूर्ण उद्ध्वस्त झालं. ती अख्खी रात्र तिच्या डोळ्यांतलं पाणी खळलं नाही.

अशा तऱ्हेनं हसीना आणि तिच्या अम्मीची बातमी एकामागून एका मुलाकडून कळत असताना मजिदा आली. वाटेतल्या चिखलामुळे सलवार खराब होऊ नये म्हणून तिनं थोडीशी वर धरली होती आणि छातीशी कुराणाचा ग्रंथ कवटाळला होता. ती घरात शिरली. आपल्या वडिलांना आरामात पाय ताणून बसलेलं पाहताच ती एका जागी थबकली. तिनं टेबलावर कुराण ठेवलं आणि विचारलं, “अब्बा, तुम्ही मशिदीत का जात नाही?”

“अगं, आत्ता इशाची नमाज होईल. सगळे लोक गोळा व्हायला वेळ लागतो ना!” बोलता बोलता त्यांनी डोक्यावर गोल टोपी बसवली.

“मी नमाजाबद्दल नाही बोलत काही! तिथं मशिदीत हसीना आणि तिची अम्मी वाट बघत बसल्यात. आज त्यांचा निर्णय होणार आहे, असं म्हणतात लोक.”

“अं! हो, हो! ती बया बसलीच नाही का मशिदीत!  कुठं बसलीय गं ती?”

मुथवल्लीसाहेब हे त्या मशिदीचे निवडून आलेले प्रमुख होते. स्थानिक जमातीत त्यांना मान होता. त्यांनीच हसीनाच्या अम्मीला आज मशिदीत तक्रार सोडवायला बोलावलं होतं आणि ते स्वतःच त्याबद्दल विसरून गेले होते.  ‘आता काय करायचं?’ ते विचारात पडले.

“अहो अब्बाजान! ती वाट पाहतेय तिथं! दफनविधीच्या हातगाडीजवळ बसल्यात त्या! हसीना, तिची अम्मी आणि दोन छोट्या बहिणी! सगळ्या जणी तिथंच आहेत. तुम्ही लवकर चला ना अब्बा! गरीब बिचाऱ्या! थंडीनं कुडकुडत असतील.”

… पाऊस, गारवा… अशा थंडीत ऊब मिळाली तर काय बहार होईल? सिलोनी पराठा, त्यावर काळ्या मिरचीचा शिडकावा, चिकन कबाब आणि घशाला जाळत आत जाणारा मदिरेचा प्याला… आणि आणखीही ऊब हवी असेल तर नंतर कदाचित अमीना… दहा वर्षांत सात बाळंतपणं होऊनही अजून ती तरुण दिसते, तिचं शरीरही विसविशीत झालेलं नाही. मुथवल्लीसाहेबांचे विचार अमीनाच्या कपड्यांना येणाऱ्या संमिश्र वासावर येऊन रेंगाळले. लसूण, आलं आणि गरम मसाल्याचा वास! ते अजूनही आपल्याच विचारात बुडून तिथंच बसून राहिले असते; पण तेवढ्यात अमीना स्वतःच त्यांच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. आली तीसुद्धा कोंबडी झुंजायला यावी तशा आवेशात! मुथवल्लीसाहेब तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहू लागले.

“थकून गेले मी अगदी! तुम्ही काहीसुद्धा ऐकत नाही माझं! ह्या वयातच म्हातारी झाले मी!”

“आता काय झालं?” 

“काय झालं? सात सात मुलांचा गाडा ओढताना एका मिनिटाची विश्रांती मिळत नाही मला! सतत आपलं घरकाम आणि घरकाम! पाठ तर एवढी सणकते आहे, की साधं उभं राहणं मुश्कील झालंय मला! जर अशीच पोरं होत राहिली ना मला, तर लवकरच ही मुलं आईविना उघड्यावर पडतील.”

“शू… गप्प! गप्प बैस! आता कशाला हे बोलायला हवंय? हे बघ, मी स्वतःच मुथवल्ली आहे. जर लोकांना कळलं, की मी तुला मुलं बंद करायचं ऑपरेशन करायची परवानगी दिली तर मी त्यांना कुठल्या तोंडाने उत्तर देऊ?”

ते आणखीही काही बोलणार होते पण तेवढ्यात दारात कुणाचीतरी चाहूल लागली. त्यामुळे अमीना आतल्या खोलीत निघून गेली.

“अस्सलाम आलेकुम् मुथवल्लीसाहेब!”

“आलेकुम् सलाम!” दारात हसीनाचा बाप याकुब उभा होता.

“अरे याकुब! किती हा उशीर ? केव्हापासून वाट पाहत बसलीय ती! काहीतरी निर्णय घ्यायला हवा आज, असं नाही का वाटत तुला?”

“तुम्ही आहात की निर्णय घ्यायला! तुमच्यापेक्षा कायदा जास्त कळतो की काय तिला? तुमचा हुकूम मला मंजूर! बरं, पण आधी आपण मस्त जेवायला जाऊ. मग जाऊ मशिदीत! घाई काय आहे आपल्याला!”

“जेवायला! नको रे!” मुथवल्ली साहेब आढेवेढे घेऊ लागले.

“चला हो! आधी जेवण, नंतर काम! चला, बसा रिक्षात!”

“हं, हं हं याकुब ! मुथवल्ली स्वतःच्या ऐषारामाची पर्वा करीत नसतो. ह्या सर्व गोष्टींचा त्याग करायला त्यानं सदैव सिद्ध असायला हवं. घर, कुटुंब, ऐषाराम – प्रसंगी सर्व काही! अगदी मध्यरात्रीसुद्धा मदतीसाठी बोलावलं तर जायला हवं त्यानं! समजलास काय तू?” ते रागीट मुद्रा करून बोलले.

“च् च्! अहो, गैरसमज करून घेऊ नका, मुथवल्लीसाहेब! आता तुम्हीच सांगा, अल्लाचा कायदा काय सांगतो ते! पुरुष एकदाच नाही, तर चार वेळा लग्न करू शकतो. मग तसं असताना ह्या बेमुर्वतखोर बाईनं मशिदीत न्याय मागायला यावंच का? तिला मुलगा होईल म्हणून मी एक नाही, दोन नाही, चांगली दहा वर्षं धीर धरला. पण ती नालायक निघाली. तिच्या वागण्याला काही ताळच उरलेला नाही. मी दुसरं लग्न केलं, त्यात काय चुकलं? आता परवाच मी वाटेत हसीनाला पाहिलं. तिला घराकडे रिक्षानं सोडलं, वर दहा रुपयेही दिले. मीसुद्धा माणूसच आहे. तेवढं त्या बाईला कळायला नको?”

दाराआडून ‘ऐकत’ असलेल्या अमीनानं त्याच्या नावानं कडाकडा बोटं मोडली. “वा वा! साखरेत घोळलेलं कसं बोलतोय पहा चुरूचुरू! सोयीचं असलं, की कसं अल्लाचं नाव घेतो, कुराणाचं नाव घेतो, पण त्या गरीब बाईला चार पैसे द्यायची वेळ आली, की मात्र मेल्याचा हात आखडतो. हाय अल्ला! कधी तू ह्या मूर्खांना अक्कल शिकवणार?” ती काहीही न बोलता तिथून हलली.

“बरं, बरं रे बाबा! तू एकदा बोलायला लागलास ना, की थांबतच नाहीस,” एवढं बोलून मुथवल्लीसाहेब उठले आणि बाहेर पडायची तयारी करू लागले. ते फाटकापाशी आले तेव्हा याकुब म्हणाला, “आपण हॉटेल प्रिन्सेसमध्ये जाऊ या. तिथे फॅमिली रूममध्ये आपल्याला कुणी पाहणार नाही.”

“हो रे बाबा! उगाच कुणी बघितलं तर नसता बभ्रा होईल. लोकांच्या तोंडी कोण लागणार? त्यातून, इथले लोक कसे आहेत, ते तुला ठाऊक आहेच! अरे बाप रे! काय हा पाऊस! वारा नुसता सणसणतोय. अगं ए अमीना, मी बाहेर जातोय. परत यायला उशीर होईल. दार लावून घे बरं!”

त्यांना प्रतिसाद म्हणून आतून मोठ्यानं पातेली आदळण्याचा आवाज आला आणि अमीनाची बडबड सुरू झाली, “मुथवल्ली, हूं! मुथवल्ली म्हणे! काय माणूस आहे हा! स्वतः मुथवल्ली आहे म्हणून दिवसाचे पाच वेळा नमाज तरी नीट पढतो का हा! सिनेमे बघण्याचं थांबवलंय का? छे! ते सोडाच, पण दारू – सैतानाचं मूत – ते पिणं तरी थांबवलंय का? आग लागो असल्या मुथवल्लीपणाला!”

पण तिची बडबड ऐकायला मुथवल्ली तिथं होतेच कुठे?

 ऑटोरिक्षाची घरघर फारच जोरात होती.

इथं रिक्षा सुरू झाली आणि तिथं त्या जीवघेण्या थंडीत ती दुर्दैवी अश्रफ मात्र भुतासारखी मशिदीतल्या त्या भयाण शांततेत बसून राहिली.

‘गरीब बिचारी! काय अपराध तिचा? तिला फक्त मुलीच झाल्या, ह्यात तिचा काय दोष? आता झाल्या फक्त मुली, तर आपण काय करू शकतो?’ अमीनाला खूप वाईट वाटू लागलं. मागच्या दारानं ती बाहेर पडली. घरामागचं परसू ओलांडून ती मशिदीच्या उंच भिंतीच्या दिशेनं चालू लागली.

भिंतीजवळच तीन-चार मोठे दगड पायऱ्यांसारखे रचून ठेवलेले होते. मशिदीत काय चाललंय ते तिथं चढून बघता येत असे. तिथली प्रवचनं घरातूनच ऐकता येत आणि वेळप्रसंगी घरात पाणी नसेल तर मशिदीतून पाण्याच्या बादल्या भरून त्या भिंतीवरून घरात आणताही येत. ती त्या दगडांवर उभी राहिली. मशिदीतल्या लोकांना दिसू नये, म्हणून तिनं चेहरा ओढणीनं झाकला. इशाची नमाज संपल्यावर एकेक करून लोक मशिदीच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडत होते. तिनं आणखी डोकावून पाहिलं. अरे बाप रे! अश्रफ उत्तरेच्या दफनविधीच्या कोपऱ्यात थंडीनं गारठून बसली होती. रंग उडालेल्या विटक्या साडीचा पदर तिनं डोक्यावरून घेतला होता. मांडीवरच्या मुन्नीला पांघरूण म्हणून तिची विरलेली साडी होती. तिच्या बाजूला बर्फासारख्या थंड जमिनीवर हसीना बसली होती आणि तीन वर्षांची हबीबा आपलं अर्धं शरीर जमिनीवर आणि अर्धं आईच्या अंगावर टाकून ऊब मिळवायचा आटोकाट प्रयत्न करीत होती.

नमाजासाठी आलेला प्रत्येक माणूस त्यांच्याकडे चौकस नजरेनं पाहत होता आणि तिथून बाहेर पडत होता. त्या प्रत्येकाला घरी जायची घाई होती. वेगवेगळ्या स्वरूपात ‘सुख’ त्यांच्यासाठी तिथं वाट पाहत बसलं होतं. एका घरात मस्त मसालेदार बिर्याणी होती, तर दुसऱ्या घरात माशांचं कालवण होतं. एका घरात नववधू पतीची वाट पाहत होती; तर आणखी एका घरात नुकताच चालायला लागलेला छोटासा मुलगा होता. सुखी, आनंदी घरांच्या दिशेनं त्या सर्वांची पावलं वेगानं पडत होती.

अश्रफ अजूनही वाट पाहत बसली होती. अठ्ठेचाळीस तास अविरतपणे कोसळणारा पाऊसही तिच्या जळजळत्या निर्धारावर पाणी ओतू शकला नव्हता. तिच्या हाडांतून आरपार जाणारी थंडीसुद्धा तिच्या निश्चयाला डळमळीत करू शकली नव्हती. भुकेची तीक्ष्ण नखं तिची आतडी फाडून काढत होती; पण तरीही तिचा निर्धार भंग करण्याची शक्ती त्यांच्यात नव्हती. अल्लाचा सतत हुलकावणी देणारा दरवाजा ती ठोठावत होती. तिला स्वतःला काही फायदा हवा म्हणून नव्हे! तिला तिच्या मुलींना न्याय मिळवून द्यायचा होता म्हणून! तिच्या मुलींना जगण्याचा हक्क होता आणि तो ती मिळवणारच होती. ती एकटीच प्रश्न घेऊन तिथं उभी होती – ‘माझी काहीही चूक नसताना का ही शिक्षा मला मिळते. आहे?’ पण – पण अल्लाचे दरवाजे तिच्यासाठी बंद असल्याचं वाटत होतं.

पण तरीही मुलींचे निस्तेज चेहरे पाहून तिचा निर्धार आणखीन दृढ होत होता.

मांडीवरच्या मुन्नीनं हालचाल केली. तिनं मुन्नीकडे पाहिलं. मशिदीतल्या मंद प्रकाशात ते आजारी बाळ काळवंडल्यासारखं दिसत होतं. चोंदलेल्या नाकानं मुन्नीनं जोरजोरात श्वास घेतला तेव्हा तिच्या फासळ्यांखालचे पोकळ खड्डे अश्रफला दिसले. तिच्या मिटलेल्या डोळ्यांना चिपाडं लागली होती, अंग तापानं फणफणत होतं – 

मुन्नी, तिची धाकटी मुलगी! तिच्या जन्मानंतरच सगळ्या अडचणींनी कळस गाठला होता. पहिल्या दोन मुलीच झाल्या, तेव्हा याकुब वैतागला असला, तरी निदान तेव्हा तो कुटुंबाची काळजी वाहत होता. त्या काळात तिनं थोडेसे पैसे बाजूला टाकले होते. चांदीची पैंजणं, सोन्याची साखळी, छोटी छोटी पदकं असे दागिनेही केले होते.

पण जेव्हा तिसरी मुलगीच झाली तेव्हा मात्र त्यानं पळच काढला. तो तिला दवाखान्यात भेटायला आला नव्हताच; पण त्यानं त्याच्या आईच्या घरीच बस्तान ठोकलं. अश्रफला अक्षरशः पालेभाजी उकडून दिवस कंठावे लागू लागले. चहाची चिमूटभर पत्तीसुद्धा तीन-तीन दिवस उकळून प्यावी लागली. आपला नवरा घरी परतावा, म्हणून तिनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तान्ह्या मुन्नीला घेऊन नवऱ्याला भेटायला ती बाजारात गेली, त्याच्या पायाशी बसून ती रडली, भेकली. “अल्ला तुला बघून घेईल,” अशी धमकीही तिनं त्याला दिली. पण तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

जेव्हा आशेचे सर्व दरवाजे बंद झाले, तेव्हा तिनं जुलेखाबेगमच्या घरी काम धरलं. कष्टाचं तिला ओझं वाटत नव्हतं; पण तिथं काम असो किंवा नसो, थांबावं लागत होतं हीच मोठी अडचण होती. जुलेखाबेगमचा नवरा कुठल्याशा ऑफिसात नोकरी करीत होता, दोन्ही मुलं कॉलेजात शिकत होती. जुलेखा दिवसभर वाचन करीत असे.

एकदा पुस्तकातून डोकं वर काढून तिनं अश्रफला विचारलं, “नवरा काय करतो गं तुझा?”

“ते रिक्षा चालवतात, आपा!” 

“मग? त्याची मिळकत तुम्हांला पुरेशी असायला हवी.”

“होय… कोणे एके काळी…” तिचं मन मुन्नीच्या आठवणींनी तळमळू लागलं. मुन्नीला घरी छोटी हसीनाच बिचारी सांभाळत होती. तिची छाती दुधानं दाटून आली. फुटलेल्या पान्ह्यामुळे ब्लाऊज ओला झाला.

‘पोर भुकेजली असेल,’ तिचं मन काळजीनं पिळवटून गेलं.

“मग तू काम का करतेस बाहेर?” जुलेखानं विचारलं आणि तिची कहाणी ऐकून ती चकितच झाली. अजूनही लोक असे वागतात, वागू शकतात हे तिच्या ध्यानीमनी नव्हतं.

“तुला ठाऊक आहे का, अश्रफ, ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात पैगंबर साहेबांचा सलाम पोचतो.”

“नको, नको, आपा ! माझ्यासारख्या दीनदुबळ्या बाईच्या घरात किती वेळा पैगंबर साहेबांचा सलाम पोचणार?”

“वेडी आहेस तू! अगं, पैगंबर साहेबांना स्वतःला फक्त मुलीच होत्या. त्यांना फक्त एक मुलगा झाला आणि खूप लहानपणीच अल्लाघरी गेला. त्यांचं किती प्रेम होतं त्यांच्या मुलींवर! तुला माहित्ये, बिबी फातिमा ही त्यांची कन्या त्यांना प्राणापलीकडे प्रिय होती. पिता आणि कन्येच्या विशुद्ध नात्याचं प्रतीक होतं ते!”

जुलेखा काय बोलत होती त्यातलं एक अक्षरही अश्रफला समजलं नाही. तिचे विचार फक्त मुन्नीच्याभोवती गरगर फिरत होते. सरतेशेवटी जुलेखा म्हणाली, “हा तर धडधडीत अन्याय आहे. तू मशिदीत एक अर्जच का दाखल करीत नाहीस?”

“अरे! हे मला आधीच कसं नाही सुचलं? आपा, तुम्हीच मला एक अर्ज लिहून द्या ना!” ती म्हणाली.

त्यानंतर तिनं तो अर्ज देण्यासाठी मुथवल्लींच्या घरी कितीतरी चकरा मारल्या. पण ते घरीच नसत. शेवटी एके दिवशी घराबाहेर पडतापडताच त्यांना तिनं गाठलं. तिनं दिलेला कागद त्यांनी खिशात खुपसला आणि तिच्याशी एक अक्षरही न बोलता ते निघून गेले.

रस्त्यावर चालताना सगळीकडे गडबड दिसत होती. सकाळच्या वेळी नळाला पाणी येत असल्यामुळे बायका खूपच कामात असत. हनिफामावशी अंगण झाडत होत्या. झाडता झाडता त्यांचा झाडू रस्त्यावर पोचला. मुथवल्लींना पाहून त्या अदबीनं मागे झाल्या. रफिया नळावरती पाणी भरायला आली होती पण मुथवल्लींना बघून ती मागे घरात शिरली. मुथवल्ली येताहेत हे कळल्यावर सगळ्याच स्त्रियांनी बाजूला होत त्यांना वाट दिली. अशा तऱ्हेनं सन्मान मिळाल्यामुळे मुथवल्लीसाहेब खुशीत आले. आसपास इतर कुणाचं आपल्याकडे लक्ष आहे का, हे त्यांनी निरखून पाहिलं.

पंधरा दिवस उलटले तरी मुथवल्लीसाहेबांकडून काहीच कळलं नाही. तेव्हा अश्रफ पुन्हा त्यांच्या घरी गेली. नेहमीप्रमाणे ते घरात नव्हते. वाट पाहत बसलेल्या अश्रफला अमीनानं विचारलं, “जर एखाद्या बाईनं आणखी मुलं न होण्यासाठी ऑपरेशन करून घेतलं, तर तिला स्वर्गात जायला मिळत नाही, हे खरं आहे का?”

“मला नाही ठाऊक! पण जुलेखाला नक्की ठाऊक असेल. ती मोठमोठी बुकं वाचत असते.”

मग अमीना तिच्या कानाशी लागून म्हणाली, “मग तिला तू विचार ना, माझ्याकरता! आणि पुढच्या वेळी येताना मला सांग.”

“बरं! अहो, ती मला किती किती काय काय सांगत असते. पण मीच अशी एक बुद्दू आहे ना की मला त्यातलं काहीच कळत नाही.”

ती एवढं बोलतेय, तोच मुथवल्लीसाहेबांचा घरात प्रवेश झाला.

अश्रफला पाहताच त्यांचा चेहरा त्रासिक झाला.

“हं! तो अर्ज हरवला कुठे तरी ! आता हवंच असलं तर दे दुसरा !” ते म्हणाले. 

“हवंच असलं तर, म्हणजे काय? अं? नवरा नकोय मला! पण –  पण – ह्या भुकेल्या पोरी ! त्यांचं काय करू?” अश्रफनं खूप काळजी घेऊनही हल्ली मुन्नी खंगत चालली होती. तिचे हातपाय बारकुडे दिसत होते, पोटाचा नगारा झाला होता. तिच्या वाहत्या नाकानं, राक्षसी भुकेनं आणि कळवळून रडण्यानं तर अश्रफ पुरती बेजार होऊन गेली होती. पण तरीही, ‘मुन्नीचा काय हा त्रास’, असं चुकूनसुद्धा तिच्या मनात कधी आलं नव्हतं. उलट ती अधिकच प्रेमानं आणि निगुतीनं तिचं सगळं करत होती. पण – पण – मुन्नीला मुळात औषधांची गरज होती. पण त्यासाठी 

पैसे कुठून मिळणार? इंजेक्शनं, गोळ्या, टॉनिक, डॉक्टरची फी, नंबर लागावा म्हणून लावलेली रांग ! मधूनच केव्हातरी ती तापाची एखादी गोळी कुटून मुन्नीला भरवत असे. पण त्याचा काडीचाही उपयोग होत नव्हता. आजार जलदगतीनं वाढत होता. मुथवल्लीसाहेबांना देण्यासाठी अश्रफने दुसरा अर्ज तयार केला तोवर तिला एक भयंकर बातमी कळली – याकुब शहरातून फरार झालेला आहे. ‘तो पुरुष आहे, तो काहीही करू शकतो, त्याला कोण विचारणार? त्याला कुणाला जाब द्यायचा आहे? त्याला भूतकाळाची चिंता नाही, वर्तमानकाळ सतावत नाही, भविष्यकाळ भेडसावत नाही. आहे ती परिस्थिती चालवून द्यायची की नाही, हे तो ठरवू शकतो. त्याला कुणाला उत्तर द्यायची गरज नाही, कुणाची क्षमा वगैरे मागण्याच्या पलीकडे तो आहे; कारण मुळात त्याचे दोष हे दोषच नाहीत.’ अश्रफ मनाशी खूप बडबडली आणि तिनं मुन्नीला उराशी कवटाळलं. पण मुन्नीला केवळ आईचं प्रेम पुरेसं नव्हतं. तिला डॉक्टरी उपचार हवे होते. आणखी सहा महिन्यांत तर ती अगदी हडकुळी झाली.

याकुब शहरात परतला आहे ही बातमी अश्रफला समजली, त्यासरशी तिनं रिक्षा स्टॅंडकडे धाव घेतली. तिला याकुबनं पाहिलं मात्र, तो तिथून गायब झाला. मग पुढच्या वेळी तिनं धूर्तपणा दाखवला. ती हळूच दबकत दबकत मुलींना घेऊन मागच्या बाजूने रिक्षात येऊन बसली. त्यानं तिच्या खोपटापर्यंत रिक्षा नेली आणि थांबवली. मग जबरदस्तीनं दोन्ही मुलींना खाली उतरवून तो जमिनीवर थुंकला. अश्रफही गोंधळून खाली उतरली तेव्हा तो तिला म्हणाला, “पोरींना घेऊन कुत्रीसारखी गावभर काय फिरतेस? लाजलज्जा काही आहे की नाही?”

एवढं ऐकवून रिक्षा सुसाट पुढं गेली. 

अश्रफ अवाक् होऊन पाहतच राहिली. तिचे डोळे पाण्यानं भरून आले. तिनं आपल्या रडणाऱ्या मुलींना कवटाळलं.

तिच्यापुढचं भविष्य अंधकारमय होतं. मशिदीच्या कमिटीपुढे आणि मुथवल्लीकडे तिनं आपल्या मुलींना न्याय मिळावा म्हणून अर्ज दाखल केला. आजारी मुलीच्या औषधासाठी याकुबने पैशाची मदत करावी अशी मागणी त्यात होती. पण तिला एकच उत्तर कायम मिळालं, “नंतर या! आता जा तुम्ही! परत केव्हातरी या.”

मधल्या काळात तिला बातमी लागली, की याकुब पुन्हा लग्न करणार आहे. त्याची रिक्षा चालवणारा मुलगा त्याला हवा आहे. अश्रफचं काचेसारखं तकलादू असलेलं जग तिच्या डोळ्यांदेखत पूर्ण उद्ध्वस्त झालं. ती अख्खी रात्र तिच्या डोळ्यांतलं पाणी खळलं नाही. सकाळी ती मुथवल्लीसाहेबांच्या घरी गेली. ते वैतागलेल्या चेहऱ्याने बाहेर आले – “काय आहे?”

अश्रफनं आपली समस्या त्यांच्यापुढे मांडली. मुथवल्ली खाकरले आणि बाजूला जाऊन त्यांनी घशातला कफ थुंकून टाकला.

“त्यानं काय चुकीचं केलं? दुसरं लग्न करणं ह्यात विशेष वेगळं असं काय आहे ? तो काही कुणाला पळवून घेऊन गेलेला नाही. करू दे त्याला लग्न! तुला माहित्ये का, शरियतच्या कायद्याप्रमाणे एक पुरुष चार लग्नं करू शकतो ते! मग तुला कशाला मत्सर वाटायला हवा? खरोखर, सगळ्या बायका सारख्याच ! सवतीवर खार खाणाऱ्या!” एवढं बोलून मुथवल्लींनी डोळ्यांच्या कोपऱ्यातून अमीनाकडे पाहिलं.

अमीना बाळाला दूध पाजण्यात मग्न होती. तिच्या मनात आलं, ‘काय माणूस आहे हा!’ आपल्याही मुलांवर अशीच अश्रफसारखी याचना करण्याची वेळ येण्याचा दिवस फार लांब नाही.

अश्रफ अगदी खोल गेलेल्या स्वरात म्हणाली, “अहो, त्यांना दुसऱ्यांदा काय हजारदा लग्न करू द्यात. मला कसलाही लोभ नाही. ते सुखी असू देत. मी त्यांना कसलाही त्रास देऊ इच्छित नाही. पण मुथवल्लीजी, ही माझी पोरगी मरायच्या वाटेवर आहे. तिच्या औषधासाठी तरी…”

पण तिचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच मुथवल्ली कडाडले, “मूर्खासारखं बोलू नकोस. मरण हे अल्लाच्या हातात आहे. डोक्यावर दगड पडला तरी एखादा माणूस मरत नाही. का? कारण अल्लाच्या मनात त्याला जीवन मिळावं असं असतं म्हणून! त्याप्रमाणेच, त्याची इच्छा असेल तर तुझी मुलगी जगेल, नाहीतर मरेल! मग तू त्याला का छळतेस त्यासाठी?”

अश्रफकडे त्यावर उत्तर नव्हतं. ठीक आहे, तिनं स्वतःचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, ‘सगळं काही घडतं ते अल्लाच्या इच्छेनं!’

पण जेव्हा त्या पोरीला अतिशय तीव्र असे जुलाब होऊ लागले, तेव्हा मात्र तिला नुसतं गप्प बसून राहणं शक्य झालं नाही. पण मदत घ्यायची तरी कुणाकडून? याकुब तर तिच्या जागेवर आणलेल्या नव्या बायकोसोबत राहत होता.

पुढच्या वेळी तिनं त्याला पाहिलं, तेव्हा त्याची नखं मेंदीनं रंगवलेली होती, हातातलं घड्याळ नवं असावं तसं चमकत होतं. चांगलेचुंगले कपडे अंगावर होते, पायातले बूटही नवे होते. केसांच्या नव्या स्टाईलमुळे तर याकुब एकदम कोणीतरी अनोळखीच माणूस आहे, असं वाटलं तिला!

अश्रफच्या मनात स्वतःच्या जगण्याबद्दल कडवटपणा दाटून आला.

मुन्नीची जीवनमरणाची धडपड पाहून तर ती अगदी निकराला येऊन पोचली. जुलेखाबेगम तिला म्हणाली, “हे बघ, चार लग्नं करण्यासाठी पुरुषाला तेवढंच सबळ आणि खरंखुरं कारण लागतं. लढाईच्या वेळेला – युद्धात वगैरे पुष्कळ पुरुष मरतात तेव्हा एखादा पुरुष एकापेक्षा जास्त लग्न करू शकतो किंवा एखाद्याची बायको असाध्य रोगाने आजारी असली तर किंवा तिच्यात वंध्यत्वाचा दोष असला तर किंवा मग त्याची शारीरिक भूक भागवण्यास ती असमर्थ असेल तर…” पण जुलेखाबेगमचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत अश्रफ संतापानं म्हणाली, “पण मी ह्यातल्या कुठल्याच गटात बसत नाही. मला मुलं नाही का झालेली? मग मला असं टाकून द्यायचं हे चुकीचं नाही का? माझ्यापासून झालेल्या मुलींना रस्त्यावर सोडून देणं चुकीचं नाही का?”

“हे बघ, शरियतचा कायदा काय सांगतो, की जेव्हा पुरुष दुसरं लग्न करतो तेव्हा त्यानं दोन्ही पत्नींशी न्यायानं वागलं पाहिजे.”

“म्हणजे कसं? मला नाही कळलं.”

“म्हणजे त्यानं तुझ्यासाठी घर बांधलं, तर तसंच दुसरं घर तिलाही बांधून द्यायला हवं. तुझ्याकरता साडी घेतली तर तिलाही घ्यायला हवी. तुझ्या सहवासात एक रात्र घालवली तर तिच्याही सहवासात एक रात्र घालवायला हवी. “

अश्रफचे डोळे पाण्याने भरून आले, “मला ते सगळं काही नको आहे हो! त्यानं फक्त माझ्या लेकराचा जीव वाचावा म्हणून थोडंसं पाकीट उघडावं. मग मी त्याला कसलाही त्रास देणार नाही. हेदेखील तो करीत नाही, तर ते चुकीचं नाही का?”

“हो तर! शंभर टक्के त्याचं वागणं चुकीचं आहे.”

“पण मग आपले मुथवल्लीसाहेब त्याला काहीच कसं सांगत नाहीत?”

“बघ, तिथंच तर सगळं घोडं अडतंय! अगं, आपले बरेचसे मुथवल्ली लोक – ह्यांनी कायद्याचा नीट अभ्यास केलेला नसतो. दुसरं म्हणजे, ते कायद्याची अंमलबजावणी करू शकत नाहीत आणि तिसरं म्हणजे, कुणी त्यांचं ऐकत नाही. शरियतच्या कायद्यातला सोयीस्कर भाग तेवढा पाळला जातो. आता सांग, शरियतचा कायदा पूर्णपणे पाळतात का लोक? जर पाळला असता, तर तुझ्या मांडीवरच्या मुन्नीवर हा प्रसंग आला असता का?”

“आपा, ह्यावर काही तोडगा नाही का?” 

“आहे की! का नसेल?” जुलेखाबेगम उसळून म्हणाली, “हे एवढे मोठमोठे विद्वान लोक – जे स्त्रियांसाठी कायदे बनवतात – ते आता का गप्प आहेत? स्त्रियांना काय सहन करावं लागतं, हे त्यांना समजत नाही? आता जग बदललं आहे, असं मला वाटतं. स्त्रियांचं थोडं तरी भलं व्हावं, असं जगाला निदान आता वाटू लागलेलं आहे. हे जे लोक, कुराणावर त्यांची मालकी आहे असं समजतात, त्यांनी तर त्यात जे लिहिले आहे त्याचं आचरण करावं. मुलांना शिक्षण द्यावं. नुसतंच मदरशामधलं धार्मिक शिक्षण नव्हे, तिला नेहमीच्या शाळा-कॉलेजांत पाठवावं, स्वतःचा नवरा स्वतः निवडण्याचा हक्क द्यावा. हे – हे षंढ पुरुष! हुंड्यावर जगण्यापेक्षा तिला ‘मेहर’ द्यावा आणि लग्न करावं. आईबापांनीही तिला मालमत्तेतील योग्य वाटा द्यावा. जर पतिपत्नी एकमेकांना पूरक नसतील तर पतीला घटस्फोट देण्याचा अधिकार तिलाही असावा. घटस्फोटित स्त्रीशी, विधवेशी लग्न करायला इतर पुरुष तयार असले पाहिजेत. “

“आपा आपा,” जुलेखाच्या सरबत्तीने अश्रफ एकदम गार झाली.

“मी बोलतेय ते बरोबर आहे, अश्रफ! इस्लाम धर्मात स्त्रीला हे सर्व अधिकार आहेत. ती शाळेत जाऊ शकते, दुकानात जाऊ शकते, काम करू शकते, घराबाहेरच्या जीवनात भाग घेऊ शकते. पण – पण फक्त एक हुकूम पाळला पाहिजे – ते म्हणजे शरीरप्रदर्शन करता कामा नये.”

जुलेखाचे शब्द भावनावेगाने भरले होते. अश्रफने निराशेनं मान हलवली. तिला ते काही नको होतं. “मी माझ्या लेकरांसाठी – मुन्नीसाठी काय मागू शकते?”

“काय? मग, तुझा रोजचा खर्च, तुझ्या मुलांचा खर्च, डोक्यावर छप्पर, त्याच्यासोबत एक दिवसाआडची रात्र घालवणे – हे सगळे तुझे हक्क आहेत. त्यानं ते तुला दिलेच पाहिजेत. जर तो नाही म्हणाला तर सरळ चार लोकांत जाऊन त्याची कॉलर पकड आणि तुझे हक्क माग आणि त्या मुथवल्लीला तर चपलांनी बडव. गयावया करू नकोस, न्यायाची मागणी कर. तुला ठाऊक आहे, न्याय कुणाला मिळतो? जो आग्रहाने मागतो, त्याला न्याय मिळतो. तुझ्यासारख्या मुळमुळीत लोकांना न्याय मिळत नाही. मुळमुळीतपणा सोड. मशिदीच्या अधिकाऱ्यांना लिही, पंचायतीची बैठक बोलाव, मलाही सांग. मी तुझ्या नवऱ्याला आणि त्या मुथवल्लीला ‘शरियत’चा अर्थ शिकवते, न्यायाचा अर्थ शिकवते. कुराण आणि हदीसचे कायदे सोयीस्करपणे भोळ्याभाबड्या  बायकांच्या विरुद्ध वळवणं म्हणजे न्याय नव्हे.”

अश्रफ खूपच घाबरली. तिचे हातपाय गार पडले. ती एकटी असती तर ह्या कसल्या लफड्यात पडलीच नसती. तिनं अल्लावरच सगळं सोडून दिलं असतं… पण… मुन्नी… आत्ता ती म्हणूनच तर मशिदीत होती. न्यायासाठी गयावया करायला नव्हे, तर तो हिसकावून घ्यायला ती आली होती. तिच्या मांडीवरची मुन्नी कण्हू लागली. तिच्या श्वासावरोवर वेगळीच घरघरही ऐकू येऊ लागलो. तिच्या कपाळावर घाम तरारला, मानही ओली झाली. अश्रफने तिचं अंग पुसलं. ताप आहे का बघायला कपाळाला हात लावला. ताप नाही हे बघून तिला वरं वाटलं. मग तिनं हसीना कुठे आहे ते पाहिलं. एका मिनिटापूर्वीच ती भूक लागली म्हणून रडत होती. दफनविधीच्या चटईवर तिला पाहून अश्रफच्या हृदयाचा ठोका चुकला. तिनं चटईत स्वतःला गुंडाळून घेतलं होतं आणि हबीबा जमिनीवर मुटकुळं होऊन पडली होती.

पाऊस

हिरव्या प्रकाशाची शांत पोकळी, थंडगार वारा आणि अविरत बसणारा पाऊस – मशिदीत असूनही तिला घाबरायला झालं. एक विचित्र भय तिच्या मनात दाटून आलं. किती वाजले तेदेखील तिला ठाऊक नव्हतं.

अचानकपणे साऱ्या जगाचं गाडं स्तब्ध झालं आहे, अशी तिला भीती वाटू लागली. तिच्या तोंडात शब्द आले, ‘बिस्मिल्लाह हिरांमनीर्रहीम’. प्रत्येक मुसलमान दिवसरात्र ही प्रार्थना उच्चारतो. करुणाकर, दयाळू अल्लाचं हृदय तिची प्रार्थना ऐकून विदीर्ण झाले असेल. मुन्नी तिच्या मांडीच्या उबेत तरी होती. पण इतर दोघीच्या अंगावर फक्त पातळ कपडे होते. तिच्या पोटात हजारो कात्र्या कुरतडत होत्या. तिनं एक उसासा सोडला, “हे अल्ला!”

पण अल्लानं उत्तर दिलं नाही. तो खूप दूर होता – उबेत – शांत! तिचं पोट थंड पडलं होतं, रक्त थंड पडलं होतं, थंडीनं ती मरायला टेकली होती. कुणीतरी तिला हाक मारत होतं. तो आवाजही तिला ओळखता आला नाही. शेवटी कसाबसा अमीनाचा आवाज अस्पष्टपणे तिच्या कानावर पडला. अमीना भिंतीच्या पलीकडे हातात थाळी घेऊन उभी होती.

“अश्रफ, ये, रोटी आणलीय तुझ्यासाठी. ये लवकर! घे!”

अश्रफ हळूहळू खऱ्या जगात परतली. ह्या निर्दय जगाचा कायदा अविरतपणे पाऊस पाडत होता आणि त्या पलीकडे… रोटी… तिच्या अंगात राक्षसी शक्ती संचारली. मुन्नीला घट्ट कवटाळून ती उभी राहिली – आणि –  मशिदीचं दार करकरलं. मुथवल्ली आणि याकुब हळूच आत शिरले. ते दोघंही आनंदाच्या शिखरावर होते. मुथवल्लींनी पोटावर हात फिरवला. हलकेच ढेकर दिली आणि तंबाखूच्या पानाची पिचकारी मारली. त्यांचे ओठ लाल झाले होते. मशिदीच्या पायरीवर ते उभे राहिले. याकुबही आरामात आत शिरला. “काय बाई आहे! अजूनही इथेच आहे ती!” तिच्या इच्छाशक्तीचं त्याला आश्चर्य वाटलं. अमीनाची थाळी हलकेच परत गेली.

मशिदीच्या आसपासच्या बहुतेक घरांतली रात्रीची जेवणं पार पडली होती. पुरुष एक तर टीव्ही पाहत होते नाहीतर झोपले होते. स्त्रिया मात्र काहीतरी लंगड्या सबबी काढून जाग्या होत्या आणि मशिदीच्या भिंतीपलीकडे येऊन उभ्या होत्या. मशिदीत डोकावण्यासाठी दगड रचले होते त्यावर त्या उभ्या राहिल्या होत्या. अश्रफने मुन्नीला कडेवर घेतलं. तिच्या मनात बंडाचा अंगार फुलला होता. त्या दोघांच्या दिशेनं ती चालू लागली. मुथवल्ली सर्वांत वरच्या पायरीवर बसले. त्यांच्या डाव्या बाजूला एक पायरी खाली याकुब उभा होता. त्याच्या खाली तीन-चार पायऱ्या ती उभी राहिली. तिच्या डोक्यावर छत होतं, त्यामुळे पाऊस पडत नव्हता, पण थंडगार सणसणत्या वाऱ्यामुळे शक्तिपात झाल्यासारखं होत होतं. याकुब मात्र बैलासारखा फुरफुरत होता. तेवढ्यात छपरावरून पाण्याच्या पागोळ्या तिच्या पाठीवर टपटपू लागल्या. ‘पाऊससुद्धा पुरुषांच्या अंगावर पडत नाही, पार्श्यालिटी करतो,’ तिचं मन फणकारलं..

मुथवल्लीसाहेबांना बोलणं अवघड झालं, कारण तोंडात पुन्हा तंबाखूचा रस जमला आणि त्या पवित्र पायऱ्यांवर ते पिंकही टाकू शकत नव्हते. पिंक टाकण्यासाठी ते उठणार, एवढ्यात याकुबनं गर्जना केली, “मुथवल्लीसाहेब, ही रांड इथं का आलीय?”

त्याचा आवाज ऐकून मुथवल्ली एकदम दचकले आणि त्यांनी मुखरस गिळला. त्या तंबाखूच्या रसामुळे त्यांना एक मिनिट चक्करल्यासारखं झालं. त्यांना एकदम स्वतःच्या पदाची आठवण झाली. सभोवतालचं वातावरण, मशिदीची भिंत आणि त्या भिंतीला बिलगलेल्या स्त्रीरूपातील पाली – त्या सगळ्यांची त्यांना एकदम जाणीव झाली. त्यांना पूर्ण खातरी होती, की त्या पालींमधली अमीना नावाची एक पाल भिंतीला घट्ट चिकटून उभी असेल आणि त्यांच्याकडे रोखून पाहत असेल. स्वतःच्या अस्तित्वालाच ठेच पोचतेय हे पाहताक्षणी त्यांच्यातला विवेक जागृत झाला. याकुबनं त्यांना खाऊ घातलेलं जेवण त्यांच्या घशाशी येऊन अडकलं, “ऐक याकुब! ही भाषा इथं नको,” ते म्हणाले. पण याकुब काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. ह्या बयेनं त्याचं आयुष्य नरकमय केलं होतं. पायाला घाण चिकटावी तशी ती चिकटून होती. “तीन तीन पोरींना जन्माला घालून हिनं माझा सत्यानाश केला. मला माझी रिक्षा चालवायला मुलगा  पाहिजे, म्हणून मी दुसरं लग्न केलं, पण ही मला सुखाने राहू देत नाही. भुतासारखी माझ्यामागे लागली आहे. गफूर, नासीर, इद्रिस –  साऱ्यांनी दुसरी लग्नं केली. ते आनंदानं राहत आहेत. त्यांच्या बायका कुठे त्यांना छळतात? त्या एकतर स्वतः कुठेतरी काम करू लागल्या, नाहीतर माहेरी निघून गेल्या. पण ही – ही कुत्री गेली दोन वर्षं माझा पाठलाग करते आहे. एवढंच नव्हे तर मशिदीत येऊन माझा न्याय करते ही अवदसा! ‘अगं, तू बसून मुततेस तरी एवढी हिंमत! मी उभ्याने मुततो तर माझ्यात केवढी हिंमत असेल, बोल! आहे का तुझ्यापाशी उत्तर?” तो ओरडला.

अश्रफला एक अक्षर सुधरे ना. ती स्तंभित झाली. असल्या बेलगाम बोलण्यावर काय उत्तर द्यायचं हे जुलेखाबेगमनं तिला शिकवलं नव्हतं आणि अशा प्रश्नांची तिनं कल्पनाही केली नव्हती. ती गोंधळली. तिनं मुन्नीला नीट कडेवर बसवलं पण तोपर्यंत संतापाने खदखदत असलेला याकुब तिच्यापर्यंत पोचला होता आणि त्यानं सर्व शक्तीनिशी तिला लाथ मारली. त्या हल्ल्यामुळे अश्रफ खाली गडगडली. तिनं हातातल्या मुन्नीला सावरायचा प्रयत्न केला पण तिचा निरुपाय झाला. मुन्नी तिच्या कडेवरून खाली फेकली गेली आणि तिचं कपाळ जमिनीवर आपटलं. मशिदीच्या अवकाशात वेदनेनं भरलेली एक किंकाळी घुमली. त्या किंकाळीनं तिच्या झोपलेल्या दोन्ही मुली दचकून उठल्या. दफनविधीच्या गाडीत हसीना झोपली होती. तीसुद्धा जागी झाली. ज्या गाडीनं आतापर्यंत हजारो प्रेतं वाहिली असतील तीसुद्धा त्या किंचाळीनं उठली असती पण – पण अश्रफ मात्र बेशुद्ध होऊन पडली होती.

मुथवल्ली आश्चर्याने थक्क झाले. दारूची नशा खाडकन उतरली. मग अंधाराचा बुरखा फाडत, डोकं झाकून घेतलेल्या असंख्य स्त्रिया आल्या. त्यांतल्या काहींनी अश्रफला उचललं, काही जणी मुन्नीकडे गेल्या, मुन्नीचा ताप गेला होता. जड श्वासही थंडावला होता. यातना, दुःख काही उरलं नव्हतं. ह्या जगातल्या सगळ्या यातनांच्या पलीकडे ती निघून गेली होती.

मुथवल्ली मती गुंग झाल्यासारखे बसले होते. हनीफामावशीनं अश्रफला आपल्या घरी नेलं. मुन्नीचं शव जमिनीवरच राहिलं. मशिदीतले सर्व दिवे जळत होते.

मशिदीमागच्या पिंपातलं पाणी उकळू लागलं. झोपलेले पुरुष उठले. कपड्यांचे दुकानदार माथीन मिया ह्यांनी हळूच दुकान उघडलं आणि लाल आलवण कापून बाहेर आणलं. मुन्नीला आंघोळ घालून लाल कापडात गुंडाळलं. तिच्या अंगावर अत्तर शिंपडलं आणि दफनभूमीकडे नेलं.

अश्रफच्या रडण्यात कटुता होती पण तिच्या मनात कुठेतरी सुटकेच्या समाधानाचा एक धागाही होता. ‘मुन्नी – ती स्वतः सुटली आणि तिनं मलाही मोकळं केलं. आता ह्यानंतर मला त्याच्यामागं विनवण्या करीत फिरायला नको, की ह्या मुथवल्लीसमोर दातांच्या कण्या करायला  नकोत. आता ह्या दोन पोरींना घेऊन माझं आयुष्य मी कंठीन! बाई गं! माझी मुन्नी, गरीब बिचारी! पोरीला कधी नवा कपडा अंगाला लागला नाही की खेळायला बाहुली मिळाली नाही. जन्मापासून बिचारीनं औषधांचे कडू घोटच गिळले.’

तिच्यातली आई अविरतपणे रडत राहिली. मुथवल्लीसाहेबांना रात्रभर झोप लागली नाही. अमीना तर त्यांच्या जवळपास फिरकलीसुद्धा नाही. ते सकाळच्या नमाजाला गेले; पण कुणाशीही बोलण्याची त्यांना इच्छाच नव्हती. ते मशिदीच्या पहिल्या पायरीवर बसले. रात्री घडलेली घटना – खरी की स्वप्न, की एखादा चित्रपट, हेच त्यांना समजत नव्हतं. खूप वेळानं ते मशिदीचं दार उघडून घराकडे वळले. सकाळची वेळ! एरवी मोहल्ल्यातील स्त्रिया मशिदीचं दार वाजलं की हातातलं काम सोडून अदबीनं बाजूला होत, पण आज कुणीही त्यांची दखल घेतली नाही.

मुथवल्ली मंद गतीनं चालत होते. हनीफामावशी केर काढत रस्त्याच्या मध्यावर पोचल्या होत्या. त्या अधिकच जोरजोरात, चेव आल्यासारख्या झाडू मारू लागल्या. मुथवल्लींवर चिखल उडाला तरीही त्यांना त्याचं काहीही वाटलं नाही. उलट त्यांनी उजव्या हातात झाडू धरून त्याचं टोक डाव्या तळव्यावर आपटलं आणि हवेला उद्देशून त्या बोलल्या, ‘अल्लाचा शाप तुझ्यावर पडो. आज सैतानाचं तोंड दिसलं मला!’

रफियाही तेवढ्यात बादली घेऊन नळावर आली. तिनं एक दगड उचलला आणि गटारात फेकला. दगड फेकताना तिथं नसलेल्या अदृश्य कुत्र्याला उद्देशून ती म्हणाली, “हूं! कुत्रा कुठला !”

नसीमानं तिच्या कोंबड्याकडे सुडाच्या जळजळीत नजरेनं पाहिलं. तिचा कोंबडा हमीदाच्या कोंबडीमागे लागला होता. कोंबडी आपल्या आखूड पायांवर तुरतुरत होती. तिच्या पाठीवरची पांढरी पिसं डौलानं फुलारली होती. नसीमानं कोंबड्याच्या नावानं बोटं मोडली, “हे अल्ला! ह्या कोंबड्याच्या वंशाचं तळपट होवो. काही लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही, अल्लाची भीती नाही. अरे, खाऊन खाऊन माजणार आणि दफन झाल्यावर जमिनीतल्या किड्यामुंग्यांची धन करणार! गाढवतोंड्या कुठला! शिरा पडोत तुझ्यावर!”

कोपऱ्यावर काजीसाहेबांचं घर होतं. त्यांची सून लग्न झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत कधी फाटकापाशी दिसली नव्हती. तिचा नवरा स्कूटरवरून गेला त्याला सोडायला ती दाराशी आली होती. जेव्हा तिनं मुथवल्लींना पाहिलं तेव्हा कडेवरच्या बाळाला उद्देशून ती म्हणाली, “गोरिला बघायचा का तुला? हा बघ गोरिला!”

जेव्हा मुथवल्लीसाहेब तिच्या दिशेनं वळले तेव्हा कुचेष्टेनं हसून तिनं त्यांच्या तोंडावर दार खाडकन बंद केलं.

गल्लीच्या पार टोकाला जमीला आपा कुणावर तरी ओरडत होती, “तुझं काही चांगलं व्हायचं नाही. कयामत होईल त्या दिवशी डुकराचं तोंड घेऊन पैदा होशील, तुझ्याभोवती काळे नाग वेढा घालतील आणि मरताना तुला कालिमासुद्धा पढता येणार नाही.” फटाके फुटावेत तसा तिचा तळतळाट त्यांच्या कानापर्यंत तडतडत आला.

असिफा हातात कचऱ्याची बादली घेऊन बाहेर आली. तिच्या डोक्यावरचा पदर खाली पडला; पण तिनं तो वर ओढण्याची तसदी दाखवली नाही. तो कचरा कचऱ्याच्या पेटीत फेकून ती सर्व शक्तीनिशी थुंकू लागली – थू! थू!

ती  थुंकी आपल्याला स्पर्शून गेली का, त्यांना खातरी नव्हती. मुथवल्लीसाहेबांच्या  स्मरणातून मुन्नीचा चेहरा हलतच नव्हता…लाल  आलवणात गुंडाळलेला! तिचे डोळे मिटलेले होते, तरी ती आपल्याकडे जळजळीत नजरेनं पाहत आहे, असा त्यांना भास झाला.

त्यांची छाती जडशीळ झाली,

कानात कोलाहल भरून आला. पाय चालेनासे झाले. त्यांनी खाल्लेल्या बिर्याणीचा एकेक दाणा जणू लोखंडी गोळा होऊन त्यांच्या पोटात धक्के मारू लागला. त्यांनी प्यायलेली दारू अमीना म्हणायची तशी सैतानाच्या मुतासारखी त्यांना वाटू लागली. त्यांच्या पोटात मळमळून आलं. अतिशय कष्टानं ते घराच्या पायऱ्या चढले. त्यांनी पाहिलं, तर अमीना कुठंतरी जायच्या तयारीत दिसत होती. तिची आईही सोबत होती. कोरड्या पडत चाललेल्या गळ्याने, मेलेल्या आवाजात त्यांनी घाम पुसत पुसत तिला विचारलं, “कुठं चाललीस?”

“दुसरीकडे कुठं?” तो चवताळून उठली. “एवढी मुलं दिली तुम्हांला! आता तरी मला ऑपरेशन करू दे.”

तिला थांबवण्याचं बळ त्यांच्यात नव्हतं. तिला उत्तर देण्यासाठीचे शब्द त्यांच्यापाशी नव्हते. निर्जीव झाल्यासारखे मुथवल्लीसाहेब पायरीवरती बसून राहिले. अमीना अगदी त्यांच्याच शैलीत बोलली, “हे बघा, दार लावून घ्या आणि मुलांवर लक्ष ठेवा – मला परतायला एक आठवडा किंवा त्याहून जास्त वेळसुद्धा लागणार आहे. “

मूळ कन्नड लेखिका : मुश्ताक बानू 

मराठी अनुवाद : सविता दामले

याच कथेवर गिरीश कासारवल्ली यांनी ‘हसीना’ नावाचा चित्रपट केला. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.  ज्यांना हा चित्रपट पाहायचा असेल त्यासाठी खालील दुवा पाहावा. 

Leave a Reply