नुकतीच आळंदी पंढरपूर आणि देहू पंढरपूर पायी वारी पार पडली. ठरलेल्या वेळी निघून ठरलेल्या दिवशी ज्ञानेश्वर माउली आणि तुकोबाराय यांच्या पालख्या पंढरपूरला पोचल्या. लाखो वारकरी दोन्ही पालखी मार्गांनी चालत ‘विठ्ठल’ नामाचा आणि ‘ज्ञानेश्वर माउली तुकाराम’ नामाचा घोष करत पंढरपुरी पोचले. अनेक वर्षांपासून मला वारीत चालत जाण्याची इच्छा होती. माझे वडील नेमाने पंढरीची चैत्री वारी करायचे. अगदी लहान वयात मी आषाढी आणि चैत्री वारीला त्यांचेबरोबर गेलोय; चंद्रभागेत आंघोळ केलीय; आंघोळ करताना चंद्रभागेत संडास करणारे वारकरी पाहिलेत; त्यांच्या विष्ठा चंद्रभागेत वाहताना बघितल्यायत. कोणत्याही सुविधा आणि सुधारणा नसलेला तो काळ होता, लोक अडाणी होते, असा विचार करून आणि सांप्रत काळात काही सुधारणा नक्की झाल्या असतील असा विचार करून या वर्षी आळंदी ते पंढरपूर वारीत मी आणि माझी बायको चालत सहभागी झालो. दोनशे शहात्तर कि. मी. चाललो. अपवाद दोन दिवसांचा.
मी वडिलांबरोबर पंढरीला गेलो त्या काळी असलेली लोकसंख्या आता अनेक पटींने वाढली आहे. सश्रद्ध वारकऱ्यांचा वारी हा पांडुरंगाला भेटण्याचा आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे वरचेवर वारीत लोकांचा सहभाग वाढतच जाणार आहे. लोकांच्या त्या वाढत्या प्रमाणात गर्दी वाढणार, म्हणजे त्या मानाने अधिक सोयी-सवलती निर्माण व्हायला हव्यात – किमान स्वछतेच्या बाबतीत तरी! वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांचा इतर कोणत्याही नागरिकांना उपसर्ग लागू नये याची काळजी घेणे वारकऱ्यांसहित सरकारची आणि प्रत्येकाची जबाबदारी असायला हवी. वारीत तेरा दिवस चालल्यानंतर हे माझ्या लक्षात आले, की वास्तवात कोणालाही जबाबदारीचे भान असल्याचे कोणतेही चिन्ह नाही.
हे लक्षात आल्याने मी माझ्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली. काही प्रश्न उपस्थित केले. भक्तिरसात बुडालेल्या आणि वारीदरम्यान माउली म्हणून एकमेकांचे चरण स्पर्श करणाऱ्या विठ्ठल, माउली आणि तुकोबा भक्तांनी ती पोस्ट वाचून, माझ्या मायबापाचा डी.एन.ए. तपासण्यापासून ते माझी जात काढून, मी ‘अर्बन नक्सली’ असल्याचाही शोध लावला. काहींनी मला ब्रिगेडी म्हटले तर काहींनी आरएसएसच्या गळ्यात मारले. मनसोक्त शिवीगाळ केली. भक्तिमार्गी माणूस अभ्यासाने आणि भक्तीच्या बळावर देहातीत आणि तटस्थ अवस्थेला पोचावा अशी अपेक्षा असते. भक्तीत आकंठ बुडालेल्या भक्तिमार्गी लोकांनी इतक्या खालच्या थराला जाऊन शिव्या घातल्या याचा अर्थ त्यांना भक्तिमार्गातील बराच मोठा टप्पा गाठायचाय.
मला शिव्या घातल्याचे वाईट वाटले नाही. मला हेही माहिती आहे की त्यांना सुधारू दिले जात नाही. माझा गाव वारकऱ्यांचा आहे. पायी वारीत ‘माउली माउली’ म्हणून प्रेमाचा पाझर फोडणाऱ्या याच वारकऱ्यांना गावोगावी जातीय आणि धार्मिक उन्मादास उत्तेजन देण्यासाठी पुढे केले जाते. जो तो आपापल्या स्वभावाने वागतो, त्यांची माउली त्यांना सद्बुद्धी देओ हीच माझ्याकडून सद्भावना. मानवी विष्ठा, अस्वछता आणि आरोग्याशी संबंधित हेळसांड यांबद्दल उघड लिहिल्यानेही कोण्याच्यातरी भावना दुखावून शकतात हा अनुभव मी पहिल्यांदा घेतला. मानवी विष्ठा शेजारी पडल्यात आणि त्यावर माती ढकलून वारकरी तिथेच जेवायला बसतात आणि ते योग्य आहे, असे त्यांना वाटत असेल तर तो त्यांच्या भावनेचा विषय असेल, माझ्या नाही. माझ्या पोस्टवर अनेक अभ्यासू लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला; त्यांच्या प्रतिसादामुळे माझे सत्य लिहिण्याचे बळ वाढले; त्यांना शतशः धन्यवाद.
मी जातिवंत शेतकरी. माझ्या आयुष्यात एक काळ असा आला, की मी तरुणपणी भक्तिरसात इतका बुडलो, की संसार हे दुःखाचे मूळ आहे हे मनावर खोलवर बिंबले. बायको-मुलं होती; तरी संन्यास घ्यावा अशी भावना प्रबळ होऊ लागली. अंघोळ करून पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत देवपूजा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, गाथा इत्यादी वाचनात वेळ घालवू लागलो. वाचून काही केल्या अर्थ कळत नव्हता तरी वाचत राहिलो. रात्री परत गावातील भजनाला जाऊ लागलो. बराच काळ असेच चालले. भजन संपल्यावर भजनी मंडळी काही आध्यात्मिक चर्चा करतील, सोप्या भाषेत अध्यात्म सांगतील, आपल्या ज्ञानात भर पडेल अशी अपेक्षा होती, तिचा वारकऱ्यांनी अपेक्षाभंग केला. कोणाच्या जागरात जेवायला काय केले यापलीकडे त्यांच्या चर्चा जाईनात.
तशात शरद जोशी यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन उभे केले. त्यात मीही पडलो. त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या विचारात कार्यकारणभाव शोधण्याची सोय दिसली. आजच्या प्रश्नांचा गुंता कुठून पडला आहे त्या कारणमालिकेचा शोध घेतल्याशिवाय योग्य उत्तर सापडत नाही हे समजले. बुद्धीला तसेच वळण पडले. संतपरंपरेतही कार्यकारणभाव शोधून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध बंडखोरी करण्याची परंपरा आहे. पुंडलीक, सावता माळी, गोरोबा काका, जनाबाई इत्यादी संतांनी, देवाला आपल्याकडे यायला भाग पाडले. कर्तव्याचे आणि भक्तीचे बळ दाखवून दिले. तुकोबाराय यांनी मंबाजीसारख्या प्रस्थापिताला भीक घातली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रस्थापित ब्राह्मण समाजाला खोटे ठरवले. निष्काम आणि निःसंग भक्तीने आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तर देव आपल्याकडे येऊन आपल्याला दर्शन देतो हे संतांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिले – ते देवाकडे गेले नाहीत. त्यामुळेच पुंडलीकासाठी पांडुरंग युगानुयुगे उभा आहे असे सांगितले जाते. असो.
वारीहून आल्यानंतर मला जे दिसले त्याबद्दल फेसबुकवर मी लिहिलेली पोस्ट वाचकांसाठी पुढे उद्धृत करत आहे –
“मी आणि बायको आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीत आळंदीहून पायी निघालो. तेरा दिवस दोनशे शहात्तर कि. मी. चाललो. अपवाद, पायाच्या अंगठ्याने त्रास दिला म्हणून एक दिवस टेंपोत बसावे लागले तोच एका सहकाऱ्याचा हात खुब्यातून निखळला म्हणून त्याला दवाखान्यात नेण्यासाठी दोन दिवसांचं चालणं जमलं नाही. बाकी सारी वारी सामान्य वारकरी पार पाडतो तशीच पार पाडली. रस्त्यात घाणीच्या बाजूला बसून जेवलो; प्रसंगी सामान्य अन्नदात्याने दिलेले खाल्ले; शिळेपाके खाल्ले (ते घरचे नेलेले, अन्नदाते मात्र ताजे देतात.) मागायला गेलो नाही पण आवश्यक असेल तर घेतले; पालात झोपलो; पहाटे दोन-तीन वाजता उघड्यावर टँकरच्या तोटीखाली अंघोळ केली. झोप जेमतेम चार तास घेतली. धुळीने आणि वाहनांच्या कार्बनने फुप्फुसे भरून घेतली. दोन वर्षांपूर्वी दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन होऊनही मिळेल तिथे संडासला जावे लागले – गेलो. सरकारी संडासांमध्ये अपवाद सोडले तर पाण्याअभावी आणि स्वच्छतेअभावी जाण्यायोग्य परिस्थिती दिसली नाही. नरक अनुभवण्यासाठी एकतरी वारी अनुभवावी, त्यासाठी मरण्याची गरज नाही, असा अनुभव घेतला.
वारी केल्यानंतर, एवढ्या विषम परिस्थितीत वारी पार पाडणे आनंददायी निश्चित नसते हे जाणवले. मला वाटते की वारी हा शेतकरी आणि महिलांनी स्वतः आत्मक्लेश भोगून निषेध व्यक्त करण्यासाठी पत्करलेला येशू, गांधी यांचा निषेधमार्ग आहे. आत्मबळ वाढावे म्हणून त्याला भक्तिमार्गाशी जोडले गेले असावे. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत वारीच्या रस्त्यात खाण्यापिण्याला कुठेही कमी पडत नाही; मात्र झोपेचा अभाव, पावसामुळे झोपण्याची दैना, भयंकर घाण, रोज सतत सरासरी वीस कि. मी. चालणे, शिणून भागून क्षीण आणि क्लान्त झालेले जीव, मिळेल त्या ठिकाणी अंग टाकणारे वारकरी, वरून उन्हपाऊस – कशाचे भान नाही! म्हातारे-कोतारे स्त्री-पुरुष वारकरी, सत्तर टक्के महिला आणि तीस टक्के पुरुष – ही माणसे आहेत का, असा प्रश्न पडावा असे चित्र वारीत पदोपदी दिसते. खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर निघणारी आषाढी वारी म्हणजे महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी स्वीकारलेली आत्मक्लेश-वारी म्हणून आपलीशी केलीय का, असा प्रश्न माझ्यासारख्या चिकित्सक माणसाला पडतो. ‘करायचे तेवढे कष्ट केले रे देवा, आता तूच बघ रे पांडुरंगा,’ असा भरवसा टाकून आणि संकल्प करून, ‘पंढरीसी जा रे, आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग’ म्हणत शेतकरी मायमाउल्या आणि पुरुष वारकरी होऊन घराबाहेर पडतात का? कर्मयोगी असलेले शेतकरी आणि महिला, वर्षानुवर्षे कर्ममार्ग सोडून भक्तिमार्गाकडे का वळले हे कोडे सुटता सुटत नाही. निसर्गाची अनिश्चित वर्तणूक आणि पूर्वापार राजेरजवाड्यांच्या लुटालुटीचा हा परिणाम असावा. शेतीत धान्याचा गुणाकार करणाऱ्या शेतकरी आणि महिलांना त्यांचे अतिरिक्त उत्पादन लुटून नेणाऱ्या व्यवस्थेने गुलाम केले हे आता सर्वमान्य झालेय.
आजही त्या व्यवस्थेत बदल झालेला नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या लुटीसाठी तयार केलेल्या कायद्यांनी राजकीय दलाल संस्कृती तयार केली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या पोरांनी त्यास पोषक पर्यावरण निर्माण केले आहे. त्यामुळेही शेतकरी आणि महिला वारीसारख्या आत्मक्लेशी मार्गाकडे भक्तिमार्ग म्हणून वळत आहेत का? आधुनिक विज्ञानयुगातसुद्धा वारकऱ्यांची संख्या कमालीची वाढते आहे, हे कशाचे निदर्शक आहे?
वारीत सामान्य वारकऱ्यांबरोबर वीस दिवस सतत सहभागी व्हावे, स्वतः त्यांच्याबरोबर चालावे, त्यांच्यासारखे जेवावे, त्यांच्यासारखे राहावे, उघड्यावर आणि जमेल तिथे संडासला जावे, पहाटे दोन-तीनच्या दरम्यान टँकरखाली उघड्या जागी अंघोळी कराव्या, पालात झोपावे, त्यांच्याशी हितगुज साधावे आणि मगच प्रसारमाध्यमातून वारीचे उदात्तीकरण करावे. हे काम सोपे नाही आणि झेपणारेही नाही. राजकारण्यांच्या वाढदिवसाच्या सुपाऱ्या घेऊन कीर्तन करणारे आधुनिक बुवा, महाराज आणि कीर्तनकार कर्ममार्गी शेतकऱ्यांना केवळ भक्तिमार्गाकडे वळवण्याचा आटापिटा का करत असावेत याचे उत्तर लुटारू बाजारव्यवस्थेत शोधावे लागेल. शेतकऱ्यांच्या आणि वारकऱ्यांच्या मुलांमुलींत लुटारू व्यवस्थेशी भिडण्याची, व्यवस्थेची चिकित्सा करण्याची वृत्ती आणि निर्भयपणा आहे का? की तेही या लुटारू व्यवस्थेचा भाग होऊन ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ म्हणून ‘चित्ती समाधान’ मानणार आहेत? … हे येणारा काळ ठरवेल.”
वारीत घाण होणारच, त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि भक्तिरसात बुडून गेले पाहिजे असे भावनेच्या भरात भक्त मंडळी मला सांगतात. हे सांगायला बारे वाटते हो, आपल्या घराशेजारी पाच-पन्नास लोक संडास करून गेले तर आपण काय प्रतिक्रिया देऊ हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आणि मगच त्या घाणेरड्या प्रकाराचे समर्थन केले पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या गावात त्यांच्या शेजारी राहतोय, घाण करून निघून जातोय, हे योग्य आहे का? यापुढेही वारीचा विस्तार होणार आहे, त्यात काही सुधारणा केल्या पाहिजेत असे विचार मांडले म्हणजे मग कोणाच्या भावना व्यथित कशा काय होऊ शकतात, मी वारकरीद्रोही कसा काय होऊ शकतो हे मला कळले नाही. आपले मूल मोठे झाल्यावर आपण त्याला व्हरांड्यात संडास करू देतो का? असो! सुधारणा नकोच असे ज्यांना वाटते, ज्यांना आहे त्यातच आनंद वाटतो त्यांना तो लखलाभ. मला दुःख झाले म्हणून मी लिहिले.
मुळात वारीतील घाणेरडेपणावर लिहिण्याचा माझा मुख्य हेतू नव्हता; जे दिसले ते लिहिले. मी माझ्या पोस्टच्या उत्तरार्धात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले त्यांबद्दल मात्र सर्वांनी सोयीचे मौन पाळले.
वरील पोस्टच्या उत्तरार्धात मी पुढील काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले. वारीत सत्तर टक्के ग्रामीण महिला आणि तीस टक्के शेतकरी वारकरी म्हणून सहभागी होतात. शेतकरी आणि महिला हे दोन्ही घटक सर्जनाचे काम करतात – म्हणजे वस्तूचा गुणाकार करतात. शेतकरी धान्याचा आणि महिला संततीचा गुणाकार करतात. मानवजातीचा इतिहास हा शेतीमधील अतिरिक्त उत्पादन लुटण्याचा इतिहास आहे. शेती हा निसर्गाच्या लहरीनुसार, निसर्गाशी जुळवून घेऊन उत्पादन काढावे लागणारा व्यवसाय आहे. निसर्ग शेतकऱ्यांना कशाचीही शाश्वती बाळगू देत नाही. नैसर्गिक आपत्ती हा शेतकऱ्यांपुढील पहिला संकटाचा विषय असतो; दुसरा विषय असतो तो म्हणजे राजेरजवाडे यांच्या लढायांमुळे होणाऱ्या नुकसानीचा. शेतकऱ्यांच्या जीवनात आसमानी आणि सुलतानी हे दोन घटक कायमस्वरूपी अनिश्चितता आणि अशाश्वततेची भर घालत आले आहेत. त्यात निसर्ग आणि लढाया या दोन्ही घटना शेतकरी आणि महिला यांच्या आवाक्याबाहेरच्या. त्यामुळे भीतीपोटी शेतकऱ्यांत आणि महिलांत देव या संकल्पनेचे मूळ घट्ट होऊन बसले असावे.
वास्तविक देव अथवा भूत यांची निर्मिती भीतीपोटी जन्माला येते. त्यातूनच माणसाने देव-देवळे निर्माण केली. नाही म्हणायला माणसाचे बरे चाललेले असते तेव्हा देवाची तो जुजबी पूजा करतो; पण संकट कोसळले की मात्र भली-भली माणसे देवाचा तीव्र धावा करतात, संकटकाळी नवससायास इत्यादी बोलतात. शेतकऱ्यांवर तर आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटांची टांगती तलवार कायमची आहे. त्यामुळेच शेतकरी आणि महिलांनी पांडुरंगाचा धावा केला असेल का? खरिपाच्या पेरण्यांच्या मागेपुढे येणारी आषाढी पायी वारी त्यांनी अगतिकतेतून स्वीकारली असेल का? ‘आगा पांडुरंगा, माझ्याकडे जे होते ते काळ्या आईच्या उदरात टाकले. आता तूच त्याचा रक्षणकर्ता’ अशी आर्त हाक घालून ही मंडळी वारीत सहभागी झाली असतील का? शेतकरी आणि स्त्रियांची पायी वारी आत्मक्लेशवारी म्हणून स्वीकारली असेल का? या माझ्या प्रश्नांना प्रतिसाद द्यावा असे कोणालाही वाटले नाही.
तुकोबारायांनी सांगितले, की ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी.’हे तुकोबांचे वचन प्रमाण मानले तर शेतीपेक्षा शुद्ध आणि उत्तम व्यवहार दुसरा आणिक नाही; मग तो नुकसानीत का जातो याचा विचार संतपरंपरेच्या वंशजांनी करायला नको का? निसर्ग जे दान देईल ते देईल; तो काही आपला गुलाम नाही. त्यामुळे तो विषय निसर्गावर सोडू या. पण सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंगाला साकडे का घालावे? सुलतानाला का पकडू नये? तुकडोजी महाराजांनी
‘कच्चा माल मातीच्या भावे; पक्का होताच चौपटीने घ्यावे | तरी ग्रामजन कैसे सुखी व्हावे; पिकऊनी ते उपवासी ||’
असे सांगून शेतकऱ्यांच्या दैनेचे कारण सांगितले. पुढे शरद जोशी यांनीही सप्रमाण शेतकऱ्यांना त्यांचा शत्रू दाखवून दिला; आंदोलनाची हाक दिली. तरी सुलतानाच्या माथी काठी हाणण्याचे धाडस शेतकऱ्यांनी का दाखवले नाही? ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी; नाठाळाचे माथी हाणू काठी’ हे तुकोबांचे वचन वारकऱ्यांना आपल्या शत्रूवर वार करण्यासाठी का आठवत नाही?
याचे उत्तर भक्तिसागरात बुडालेल्या अथवा जाणीवपूर्वक बुडवण्यात आलेल्या शेतकरी असलेल्या वारकऱ्यांना शोधावे लागेल. शेतकरी कर्ममार्गी आहेत, त्यांना केवळ भक्तिमार्गाकडे वळवून त्यांच्यात संभ्रम तर निर्माण केला जात नाही? कर्ममार्गी शेतकऱ्यांना भक्तिमार्गाकडे वळवण्यात बाजारव्यवस्थेचे हितसंबंध गुंतले आहेत हे उघड आहे. शेतकऱ्यांचा कच्चा माल स्वस्त विकायला भाग पाडून पक्का माल त्यांना महाग विकत घ्यायला लावणारी बाजारव्यवस्था सरकारने अंगीकारलेली आहे. तिचे पितळ उघडे पडू नये म्हणून तर कर्ममार्गी शेतकऱ्यांना भक्तिमार्गाची गुटी पाजली जात नाही? याची चिकित्सा संतसाहित्य अभ्यासकांनी आणि बुवा, महाराज, कीर्तनकारांनी केली पाहिजे; कारण शेतकरी आणि वारकरी एकच आहेत.
देवाला भेटण्यासाठी पंढरपूरला मोठे मोठे संत गेले नाहीत; देव त्यांना भेटण्यासाठी आतुर झाला आणि संतांच्या दारी गेला.
‘ज्ञानदेवा गोडी, संगती सज्जनी; हरि दिसे जनी, वनी आत्मतत्त्वीं.’
सज्जनांच्या संगतीत देव कोठेही अवतरू शकतो; त्यासाठी योग, याग, विधी असले दंभ, धर्म करण्याची काहीही गरज नाही हे ज्ञानोबा महाराजांनी स्पष्ट सांगितले आहे. भक्तिमार्ग हा एक मार्ग आहे, जो ज्यांना जसा भावेल तसा त्यांनी अनुभवावा; तो त्यांचा व्यक्तिगत मार्ग आहे; पण इतरेजनांना त्याचा उपसर्ग लागू नये याचीही चिंता करावी. माउली त्यांना सद्बुद्धी बुद्धी देओ.
वारकरी संप्रदाय हा मुळात बंडखोर संप्रदाय आहे, त्यामुळे त्याची धार बोथट करण्यासाठी, त्यात शिरकाव करण्यासाठी हरएक प्रवृत्ती उत्सुक असते. पुरोगामी लोकांना एक सॉफ्ट देव हवा असतो, त्यामुळे ते पांडुरंगाकडे आणि वारीकडे आकर्षित होतात. तर कट्टरतावाद्यांना तर वारकरी आपलाच प्रांत वाटत असतो. या सर्व सत्तेच्या अवसरवाद्यांना दूर ठेवून वारकरी संप्रदायाला आपले अस्तित्व सुरक्षित ठेवावे लागेल. आपल्यात घुसलेले दोष काढून वाटचाल करावी लागेल. ही फार मोठी जबाबदारी वारकऱ्यांवर पडली आहे. भारतीय भूमीवर निरीश्वरवादापासून ते अनेकेश्वरवादापर्यन्त विविध विचारधारा सुखाने नांदतात. इथे वैदिक, वेदांती, चार्वाक, जैन, बौद्ध, शीख इत्यादी दर्शने निर्माण झाली; त्यांचा आदर केला गेला. सध्याचा काळ मोठा कठीण आहे. ‘माझी विचारधारा माना, नाही तर परिणाम भोगा,’ असे धमकावण्याचा हा काळ आहे. वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांनी त्यापासून दूर राहिले पाहिजे.
मी शेतकरी चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे. एखाद्या विचारवंताच्या विचाराची त्याचे अनुयायी कशाप्रकारे वाट लावतात ते मी अनुभवलेले आहे. शरद जोशी यांनी ‘भीक नको घामाचे दाम मिळू द्या,’ अशी शेतकरी-स्वातंत्र्याची मागणी केली. त्यांच्या अनुयायांनी शेतकऱ्यांना पुन्हा हमीभावासारख्या भिकेकडे वळवले. संतपरंपरेत ‘बमबम भोले’ विचारधारेपेक्षा संतांच्या ज्ञानमार्गी विचारधारेचा धागा मजबूत आहे. तुकोबा म्हणतात त्या प्रमाणे,
“गाजराची पुंगी| तैसे झाले नवे जोगी|
काय करोंनी पठण| केली अहंता जतन|
अल्प असे ज्ञान| अंगी ताठ अभिमान.”
अहंता, दुरभिमान यांपासून शेतकरी मुक्त होऊन कर्ममार्गी आणि सुखी होओ हे पसायदान मागतो आणि थांबतो.
अनंतराव देशपांडे हे शेतकरी संघटना न्यासाचे विश्वस्त आहेत.
