यत्नेंविना इष्ट फलप्राप्ती होते|
प्रहर्षणालंकृति जाण बा ते||
काहीही कष्ट न घेता ईप्सित सहजसाध्य होतं त्या योगायोगाला प्रहर्षण म्हणतात.
दमयंतीच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून विरहार्त झालेल्या नळराजाला दमयंतीचं कौतुक सांगणारा राजहंस अचानक भेटतो. नळराजाची विरहावस्था आणि अचानक भेटलेला सुवर्णहंस यांचं वर्णन करताना प्रहर्षण अलंकारासह विरहांधकाराचं रूपकही ते गुंफतात. चक्रवाक पक्ष्यासारखाच रात्रीच्या ताटातुटीने तळमळत मी फिरलो असतो ही विरहार्त उपमा चपखल आहे.
वेल्हाळ ते न दिसतां विरहांधकारी
चालून मी हळुंच चांचपतां पुढारी
चक्रापरीच सजलो असतो फिराया
हंसा तुझा उदय होय सुखी कराया
||६५||
या पंक्ती ‘च’ चा अनुप्रास, उपमा अशा अलंकारांनी सजवल्या आहेतच; शिवाय विरहाच्या अंधकारात होणारा हंसाचा उदय आणि चक्रवाक पक्ष्यांची गाठ घालून देणारा सूर्याचा उदय असं रूपकही योजलं आहे.
विरहाची व्यथा व्यक्त करताना रघुनाथ पंडित नवनवीन कल्पना लढवतात.
दूताची भूमिका स्वीकारून राजहंस विदर्भात दाखल झाला. समुद्रसुद्धा लपू शकेल असे खंदक बघून थक्क झाला. प्रसंग रंगवण्यासाठी, नाट्यपूर्ण करण्यासाठी इथे राजहंसाचा फेरफटका दाखवला आहे. भटकताना त्याला वाण्याचं दुकान दिसतं. वाण्याचं दुकान हा काही रसिकतेने वर्णन करण्याचा विषय नव्हे; पण रघुनाथ पंडितांच्या हंसाला त्याचंही कुतूहल वाटून तो दुकानात डोकावतो. त्याला काय दिसतं?
कोणी वणिग्जन विकी तुळिता तराजे
कस्तूरिका तिजसवें अलिनी विराजे
दोनी समान निरखी विकणार देतो
घेणार तो न समजोनि उगाच घेतो ||७७||
कस्तुरीची देवघेव चालू असते. सर्वसामान्यांच्या दृष्टीने कस्तुरी फक्त ऐकीव गोष्ट! पण इथे बघावं तर कस्तुरीच्या किमतीसाठी घासाघीसही होत नाही. एवढंच नाही; तर गिऱ्हाईकही कस्तुरी पारखूनही घेत नाही. कस्तुरी देणारा देतो घेणारा घेतो… देणाऱ्यावर इतका विश्वास की तो योग्य तेवढं देईलच. यात आणखी एक वळसा भ्रांतिमान अलंकाराचा! कस्तुरी देताना त्यात कस्तुरीच्या रंगाची अलिनी म्हणजे मधमाशी लपली आहे. ती मधमाशीही कस्तुरी म्हणून दिली जाते.
उत्कर्षेण आदीयते — गृह्यते असं
अतिशय समृद्धीचे वर्णन करणारा उदात्त अलंकार इथे योजला आहे. इथे आर्थिक समृद्धीइतकीच मनाची समृद्धीही अभिप्रेत आहे. ‘देई वाणी घेई प्राणी’ ही म्हण आपण उपरोधाने वापरतो. पण इथे ‘फसवणूक संभवत नाहीच’ म्हणून न बघता मधमाशीसकट कस्तुरी खरेदी केली जाते.
जलक्रीडा करणाऱ्या सुवर्णहंसांपैकी एकाला पकडल्यावर बाकीचे सगळे उडून गेले. त्यांचाच आप्त संकटात सापडला असूनही ‘त्याजपाशीं नसे तो,’ असं सांगून ते म्हणतात
कठिण समय येतां कोण कामास येतो||४०||
मालिनी वृत्तातील आर्तता आणि प्रश्नालंकारातून घातलेली अर्थान्तरन्यासाची वैश्विक सांगड यांमुळे संकटात आपले कोणीही नसते हा अर्थ मनात खोलवर बिंबतो.
गजेंद्रमोक्षातही याच अर्थाची शिकवण शिखरिणीतून देताना ते म्हणतात :
विचारी तैं हस्ती दृढ मज जयांचे भरवसे
तसे हि गेले कीं विषम समयीं सोडुनि कसें||३३||
गजेंद्रमोक्षात विविध वृत्तांच्या उपयोजनांसह अलंकारही घातले आहेत.
स्रग्धरा ( चाल : ध्याये नित्यं महेशम्)
कोठें वैकुंठ कोठें गजपतिस बळें नक्र वोढी तटाकीं…
तो स्वामी स्मर्तृगामी निरवधिकरुणासिंधु बंधु प्रणामी||१||
आठवण काढल्याबरोबर धावून येणारा या अर्थी स्मर्तृगामी हा शब्द चपखल बसवला आहे. सुसरीने पाय धरला हे शार्दूलविक्रीडितात लिहिताना सुसरीला तोयचर( पाण्यात राहणारी) असे संबोधून
कैसा तोयचरें गजेंद्र धरिला अशी सहज रचना साधली आहे. ही कथा आम्ही ऐकू हे शार्दूलविक्रीडितात मांडताना त्यांनी चक्क परीक्षित+अवनीनाथ असा संधी करून
‘हें आम्ही परिसूं परीक्षिदवनीनाथें असें बोलता’ ||२||
असा चरण रचला आहे.
अलंकारांबरोबरच रसनिर्मिती हा रघुनाथ पंडितांच्या काव्याचा आणखी विशेष आहे.
भाविक अलंकार आणि करुण रस हा एक अनोखा प्रकार. आधी घडून गेलेल्या गोष्टी किंवा पुढे घडणाऱ्या गोष्टींचा अदमास घेऊन हा काव्यालंकार गुंफला जातो.
सखे माझे परतोनि घरा येतां
तुवां सजणे हा समाचार घेतां
तया शोकें घायाळ हृदय होतां
कशी होशिल तें आठवितों आतां||४७||
थोर होतील बाळकें तुझी बाळे
तुला कामा येतील वेल्हाळे (दिंडी वृत्त एक मात्रा कमी)
माय माझी बैसेल शोक-शाळे
मला आठवितां हृदय तिचें पोळे||४८||
नळराजाने हंसाला पकडल्यावर हंस सुटकेसाठी विविध प्रकारे आळवतो. तो आपल्या पत्नीचा आठव काढून तिच्याशी शोकयुक्त स्वगत करत असतो, ‘मी घरी न परतल्याने तुला किती धक्का बसेल…’ हे झालं वर्तमानकालीन दुःख! पुढे तो तिच्या, पिलांच्या आणि आईच्याही भविष्यकालाचं कल्पनाचित्र रंगवतो… साता दिवसांच्या या ओल्या बाळंतिणीची पिलं मोठी होतील, बायकोला मदत करतील; पण आईचा शोक काही सरणार नाही. हे दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं. करुण रसातील भावदर्शनामुळे नळराजारूपी दयारसाचा समुद्र हेलावून जातो. या व्यतिरिक्त रघुनाथ पंडितांच्या काव्यात करुण रस फारसा नाही; पण आत्मनिवेदनातून म्हणजे स्वतःच्या हलाखीतून आलेले असे एक काव्य त्या काळातील बहुतांश कवींची ओढगस्त दाखवणारे ठरते.
म्हातारा बहु जाहलों कवणही त्राता नसे भेटला|
भाताची तजवीज तेच उदरीं भाता गमे पेटला|
हातामाजि नसेच एक कवडी हा ताप आता हरी|
दातारा मज वांचवी सदय हो माता पिता तूं हरी||१५४||
या करुण काव्यातही हरी या शब्दावरील श्लेष ( श्रीकृष्ण आणि हरण करणे) हा मोह त्यांना टाळता आलेला नाही.
या विषण्णतेतूनच कदाचित भक्तिमार्गात लागून रामदास वर्णनही लिहिले गेले असावे;
रामदासांचं आश्वासन ते काव्यातून सांगतात :
आम्हां तुम्हांस भववारिधिमाजी तारू
जे वाचितां परिसतां मग होय तारू||१||
भवार्णवात बुडत जाताना तारणारा समर्थांचा कळकळीचा उपदेश वाचकांसमोर ठेवताना तारू शब्दाचाही खेळ करतात. या भक्तिपर रचनेतही अलंकारांची आणि शब्दखेळाची हौस सुटत नाही.
रामदास वर्णनात दामयमकाची रचनाही केलेली दिसते.
श्रीरामदास गुरु शांतिवधूस अंगी
अंगींकरून मिरवे स्वसुखांत रंगी
रंगी उभा कर उभारुन वंदनाचे
नाचे मुखीं गुणवदे रघुनंदनाचे||३||
याच रचनेत ते दासबोधाच्या दोनशे समासांचा उल्लेख करत
शोभे शतद्वय समास समास भारीं
जो दासबोध निजबोध सुखा उभारी
त्या सेवटीं दशक जोडिते जो विसावा
श्रीरामदासगुरु तो अमुचा विसावा||६||
विसावा शतक जोडणारा रामदास आमच्या मनीचा विसावा आहे असे त्यांच्या इतर रचनांच्या तुलनेत कृत्रिम यमकालंकारही आढळतात.
काव्य-रसरंगात शृंगार रसाचे आध्यात्मिक उपयोजनही केलेले दिसते.
चिद्बोध सेज अरुवार नव्या फुलांची
सायुज्यमुक्ति ललना असतां जयाची
तो रामदास अकलत्र असें गणावें
अज्ञान होत जन, काय तयां म्हणावें
|| ७||
रघुनाथ पंडितांच्या काव्यातील काही गमती-जमती
उपरि सकंटक सांचे परंतु सांचे जयांत सुरसाचे
घोंस असे फणसाचे षण्मासांचे कितेक वरसाचे ||३१||
गीतिमधील या रचनेत सांचे या शब्दाचे सुंदर पुष्पक यमक योजले आहे. त्याचबरोबर काटेरी असूनही आतून रसाळ असलेल्या गऱ्यांचेही वर्णन करत विरोधाभास अलंकाराचा रंग दिला आहे; पण ‘उपरि सकंटक’ असं संस्कृतप्रचुर वर्णन केल्यानंतर सुरसाचेला यमक म्हणून वरसाचे हा अगदी साधा शब्द ‘साच्यात’ बसावा म्हणून योजलेला आहे.
रामदास वर्णनातही शब्दखेळाची मौज बालिश वाटते.
जेणें प्रशिष्य निजशिष्य अनेक केले
देतां प्रसाद कफनी कफ नीट झाले||१०||
प्रसादाची कफनी देताच कफ प्रवृत्ती नीट झाली असा खेळ हे प्रतिभेला गालबोट लागल्यासारखे वाटते.
गजेंदमोक्षात छेकानुप्रासाची लयलूट त्यांनी केली आहे.
जोपा झरे-जल-तृणें करितो मृगांची
जो पाझरे निजतटाक तटांत सांची
सकळिकां कळिकांस विकासवी
मधु सुवास निवास विकासवी||८||
जो काननीं विचरला चरला तृणातें
धुंडीतसे तृषित चिल्लर थिल्लरातें||२२||
दाता असा शठ कसा ठकसा कदापि
रुचति मधुर जैसीं चांगलीं तूप केळें
सुरुचिर रुचि तैसीं लागलीं तूपकेळें ||१०||
सुरुचिर रुचि असा छेकानुप्रास लक्षात येतो पण तूप केळें आणि तूपकेळें यमकात का बसवलं असावं?
गूगल महाशयांनी ‘दुर्मीळ झाडे’वर नेलं. तेव्हा कळलं तूपकेळे याला मराठीत कलापेंद्र म्हणतात. त्याचा अपभ्रंश पेंडरू किंवा पेंडारी झाला असावा. याच्या फुलांची आणि फळांचीही चविष्ट भाजी करतात. इतर रसांसह रघुनाथ पंडितांच्या असा लेखणीतून खाद्यरसही झरला आहे.
अलंकार, वृत्तं, कथा, मानवी स्वभाव अशा वैविध्याने समृद्ध होत गेलेल्या काव्यांमधून तत्कालीन शकुन अपशकुनाचे ठोकताळेही गुंफलेले आढळतात. कोणाचं तोंड पाहिलं की, मांजर आडवी गेली की, कुत्रं रडलं की वाईट घडतं हा समज होता. त्यामुळे कामासाठी जाताना शकुन बघणं त्या काळी फार महत्त्वाचं होतं. शकुनांच्या कथांमधील उपयोजनामुळे कथेला कधी सकारात्मक कधी नकारात्मक दिशादर्शक आयाम मिळतो. राजहंस दमयंतीला भेटण्यासाठी झेपावला आणि…
उडुनि जातां बहु शकुन तया झाले…
पवनचंचळ मधुबिंदुमुखीं आले
वाम-भागीं उभयतां गरुड गेले
हंस नळाचा निरोप घेऊन विदर्भ नगरीकडे उडत जात असताना अचानक फुलांमधले मधाचे बिंदू त्याच्या तोंडात पडले. तोंड आधीच गोड झाले आणि डाव्या बाजूने गरुड उडत गेले. विष्णूचे वाहन असल्याने तो शुभशकुन मानला जात असावा.
रघुनाथ पंडितांच्या रचना त्यांतील कथाप्रवाहाप्रमाणे न उलगडता अलंकार वैविध्याप्रमाणे उलगडत असताना त्यांच्या अल्पाक्षरी ‘वृत्तरसी’ काव्याचं सौंदर्य उलगडत जातं… ज्यांना भिडतं त्यांना ते सुमधुर वाटतं. तत्कालीन काव्य आधुनिक दृष्टिकोनातून बघणाऱ्यांना ते अट्टाहासी वाटतं.
याचं वर्णन मालिनी वृत्त आणि छेकानुप्रास यांची गुंफण घालून करायचा प्रयत्न :
( मालिनी)
रुचिर चिरकथांनी जीव संतोषवीला
मधुरचि रस साहित्ये वसंतोत्सवाला
कवि रचि रसना ही गाउनी तृप्त होई
अरसिक रस नाही गा, म्हणे झोपी जाई||
अर्थ
रुची वाढवणाऱ्या चिरतरुण कथांनी जीव सुखावून गेला. या रसाने साहित्यात वसंतोत्सव सुरू झाला. या कवीच्या रचना गुणगुणल्याने मन तृप्त होतं. अरसिकाला मात्र हे सौंदर्य भिडत नसल्याने तो चक्क झोपून जातो.
संदर्भ
नलदमयंती स्वयंवराख्यान
सिताराम विष्णु सरवटे
अलंकार चंद्रिका
गणेश मोरेश्वर गोरे
