कायद्यापेक्षा न्याय श्रेष्ठ

न्यायाधीशाला कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायनिवाडा करावा लागतो; परंतु एखादा संवेदनशील न्यायाधीश न्यायदानाला कायद्यापेक्षा जास्त महत्त्व देऊन न्यायनिवाडा करतो.
पुणे शहरात घडलेली ही सत्यकथा आहे. वासंती आणि अजय या दोघांचा शुभविवाह विवाह मंडळाने दिलेल्या माहितीच्या आधारे कुटुंबीयांच्या संमतीने जमवण्यात आला होता. दोन्ही कुटुंबे सुशिक्षित असल्यामुळे नियोजित वधूवरांना मोकळीक देण्यात आली होती. एकमेकांचा परिचय होण्यासाठी दोघेही विवाहपूर्व काळ आनंदात घालवत होती. लग्नाच्या याद्या, साखरपुडा, बस्ता, खरेदीच्या निमित्ताने गाठीभेटी होत होत्या. दोघेही आय. टी. कंपनीत इंजिनीयर होते; भावी आयुष्याची स्वप्ने पाहण्यात दंग झाले होते.
विवाहाची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तशी दोन्ही कुटुंबीयांच्या घरी नातेवाइकांची वर्दळ वाढू लागली; मेहंदी, संगीत इ. कार्यक्रमाची तयारी यावर चर्चांच्या फैरी झडू लागल्या; नातेवाइकांना निमंत्रणे गेली; हळूहळू लग्नासाठी येणारे नातेवाईक जमू लागले.
प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी सर्व गोष्टींनी वेग घेतला. मंगलाष्टके झाली. वातावरण हळूहळू गंभीर होऊ लागले कारण बिदाईचा कार्यक्रम जवळ येऊ लागला. बिदाई पार पडल्यानंतर नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले.
सर्व कार्य सुरळीत पार पडल्यामुळे दोन्ही कुटुंबीय खुशीत होते.
लग्नापूर्वी अजय आणि वासंती यांनी सर्व कार्य सुरळीत पार पडावे म्हणून सारसबागेतील तळ्यातील गणपतीला नवस बोलला होता; त्यानुसार नवीन दांपत्य गणपतीच्या दर्शनासाठी उपस्थित झाले. त्यांनी पाच नारळांचे तोरण, दूर्वांची जुडी,मोदक गणपतीला अर्पण केले. गुरुजींनी नवदांपत्यास आशीर्वाद देऊन प्रसाद दिला.
अजय आणि वासंती दोघेही गणपतीस प्रदक्षिणा घालून क्षणभर विसावा घेण्यासाठी बाकावर बसले व भावी आयुष्याची स्वप्ने रंगवू लागले.
एवढ्यात सोसाट्याचा वारा आला व मुसळधार पावसास सुरुवात झाली; विजा चमकू लागल्या; ढग गर्जू लागले. दोघेही एका गुलमोहराच्या झाडाखाली आडोशासाठी आले. झाडाच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. पावसाचा वेग वाढत होता. एवढ्यात काड्कन आवाज आला, झाडाची मोठी फांदी तुटून अचानक अजयच्या डोक्यावर पडली. वासंती गांगरून गेली. तिला काही सुचे ना. तिने नातेवाइकांना व अँब्युलंसला फोन केले. नातेवाईक त्वरित धावून आले. त्यांनी अजयला रुग्णवाहिकेत ठेवून ससून हॉस्पिटल येथे दाखल केले. अजयच्या डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली होती. मेंदूला मार लागला होता. त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले गेले. डॉक्टर, नर्ससेची धावपळ चालू होती. कुजबुजल्या आवाजातील संभाषणे व घड्याळाची टिक -टिक वातावरणातील गांभीर्य वाढवत होती. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. प्रयत्नांना अपयश आले. अजयची प्राणज्योत मालवली. हॉस्पिटलमध्ये शोककळा पसरली. डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय सर्वांचे चेहरे काळवंडले. त्यांनाही खूप दुःख झाले. वासंतीच्या दुःखाला तर पारावार उरला नाही.
घरातील मंगलमय वातावरण क्षणार्धात बदलून गेले. एका प्रसंगाने वासंतीचे अवघे आयुष्य उद्ध्वस्त झाले. वास्तविक पाहता यामध्ये दोष कोणाचाच नव्हता. नियतीने तिच्यावर कुठल्यातरी जन्माचा सूड उगवला होता.
दिवसामागून दिवस जात होते. उन्हाळा,पावसाळा हिवाळा – निसर्गचक्र चालूच होते. या प्रसंगाने वासंतीचे जीवन नीरस झाले होते.
तिला काही दिवस बदल म्हणून माहेरी पाठवले. तिचे कामात लक्ष लागत नव्हते. बरेच दिवस नोकरीवर गैरहजर राहिल्याने तिला नोकरी गमवावी लागली.
अशा वेळी तिला जवळची नातेवाईक ॲडव्होकेट वसुंधरा भेटावयास आली. अजयचा मृत्यू हा अपघाती मृत्यू होता. त्यामध्ये वृक्षाची देखभाल करणाऱ्या महानगरपालिकेचा अक्षम्य दोष होता. महानगरपालिकने वेळेवर झाडांच्या फांद्यांची छाटणी केली असती तर ही दुर्घटना घडली नसती व वासंतीला वैधव्यास सामोरे जावे लागले नसते.
ॲडव्होकेट वसुंधरा नवीन असली तरी उत्साही होती. तिने शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा,इनक्वेस्ट पंचनामा, खबरी जबाब इत्यादी कागदपत्र जमा केले, मुंबई महानगरपालिका कायद्यानुसार पुणे महापालिका आयुक्तांस नोटीस पाठवली. महानगरपालिकेने वकिलामार्फत नोटिशीला उत्तर दिले व नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. सरतेशेवटी ॲडव्होकेट वसुंधरा हिने वासंतीच्या वतीने पुणे महानगरपालिकेविरुद्ध दावा दाखल केला व २५ लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली. सदरचा दावा फेटल ॲक्सिडेंट कायद्याच्या तरतुदीनुसार दाखल करण्यात आला..
महानगरपालिकेच्या वतीने ॲडव्होकेट झुंजारराव खोपर्डे या विख्यात वकिलाने वकीलपत्र दाखल केले. मुदतीवर मुदती घेऊन त्यांनी लेखी कैफियत दाखल केली. सदर घटनेमध्ये महानगरपालिकेचा कोणत्याही प्रकारे सहभाग नाही; ही नैसर्गिक आपत्ती आहे; ही एक दुर्दैवी घटना आहे; महानगरपालिकेस मयत अजयच्या विधवेबद्दल सहानुभूती आहे; परंतु महानगरपालिका कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. त्याच प्रमाणे प्रस्तुतचा दावा मुदतबाह्य आहे. तो चालवण्यास पात्र नाही असा बचावात्मक पवित्रा महानगरपालिकेने घेतला.
दोन्ही बाजूंची कथने, कागदोपत्री पुरावे यांचा विचार करून न्यायाधीशांनी वादाचे मुद्दे निश्चित केले. त्याच प्रमाणे दोन्ही पक्षांचे तोंडी पुरावे नोंदवण्यात आले. जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कोर्ट कमिशनरची नेमणूक करण्यात आली. कमिशनरने जागेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. जागेच्या परिस्थितीचा पंचनामा, नकाशा व अहवाल दाखल केला. न्यायाधीशाने दोन्ही वकिलांचे युक्तीवाद ऐकले. कागदपत्रांचा व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास केला.
न्यायाधीशांच्या डोक्यात विचारांची खळबळ माजली. पुराव्यांची बारकाईने छाननी केली असता अजयच्या मृत्यूस महानगरपालिका जबाबदार आहे असे न्यायमूर्तींचे मत झाले. महानगरपालिकेचे वकील झुंजारराव खोपर्डे यांनी लिमिटेशन ॲक्टच्या तरतुदीकडे लक्ष वेधले. फेटल ॲक्सिडेंट कायद्यानुसार घटना घडल्यापासून दोन वर्षांच्या आत नुकसान भरपाईचा दावा दाखल करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन करण्यात आले. दावा दाखल करताना झालेला विलंब माफ करण्याची तरतूद लिमिटेशन्स ॲक्टच्या (मुदतीच्या) कायद्यातील तरतुदीमध्ये नाही. न्यायमूर्तींच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले. त्यांचे संवेदनशील मन त्यांना स्वस्थ बसू देई ना! दावा नामंजूर करावा तर एका अबला विधवेवर अन्याय होईल; मंजूर करावा तर मुदतीच्या कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन होईल असे विचाराचे द्वंद्व डोक्यात सुरू झाले.
संवेदनशील वृत्तीच्या न्यायाधीश महोदयांनी निर्णय देताना असे जाहीर केले की पुराव्यांच्या आधारे सिद्ध होते की अजयच्या मृत्यूसाठी पुणे महानगरपालिकेचा अक्षम्य निष्काळजीपणा जबाबदार आहे. असे असले तरी कायद्याच्या चौकटीप्रमाणे वादीचा दावा मंजूर करणे शक्य नाही; तथापि महानगरपालिकेने सदसद्विवेक बुद्धी वापरून अजयच्या विधवेला पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी.
असा निकाल ऐकल्यानंतर न्यायालयाच्या दालनात खळबळ उडाली आणि उपस्थित वकील आणि पक्षकारांमध्ये चर्चा होऊ लागल्या. काही दिवसांनी सर्व काही शांत झाले.
एवढ्यात या निर्णयाची बातमी एका वृत्तपत्रात आली. ही बातमी वाचून महानगरपालिकेच्या सदस्यांनी ठराव मंजूर केला व सदर नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले
संवेदनशील न्यायाधीशांनी Rules should not Strangulate Justice ( नियमाने किंवा कायद्यातील तरतुदीने न्यायाचा गळा आवळू नये या न्यायतत्त्वाचा अवलंब केला व न्याय हा कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे याची जाणीव करून दिली. अशा संवेदनशील न्यायाधीशांचे नाव आहे कै.एस.के.बिनवडे . त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक पक्षकारांना न्याय मिळवून दिला.
विनय पांडुरंग उत्पात
निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे
