ऑपरेशन सिंदूरमुळे प्रत्येक भारतीयाला जितका अभिमान वाटतो आहे त्याहीपेक्षा कितीतरी जास्त पटीने समाधान वर आकाशात डॉ. कलाम यांना वाटले असेल. त्यांना मिसाईलचे जनक म्हणतात ते उगाच नव्हे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात इस्रोमध्ये केलेल्या डॉ. कलाम यांनी साधारण ८१ /८२ च्या सुमारास हैदराबादच्या डी. आर. डी. एल. प्रयोगशाळेचे संचालक म्हणून स्थलांतर केले. त्यानंतर त्यांच्याकडे येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या रिसर्च सेंटर इमारत ( आर. सी. आय. ) या प्रयोगशाळेची स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली; त्याचबरोबर इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल्स या नव्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रकल्पाची जबाबदारी देखील. याच सुमारास म्हणजे ८३ साली माझेही आय. आय. टी. खरगपूरहून उस्मानिया विद्यापीठात प्रोफेसर म्हणून स्थलांतर झाले; त्यामुळे डॉ.कलामांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीचा साक्षीदार होता आले.
डॉ. कलाम येण्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाच्या प्रोजेक्ट्समध्ये बाहेरच्या शैक्षणिक संस्थांची किंवा खासगी उद्योग समूहांची फारशी गुंतवणूक नव्हती. थोड्या प्रमाणात दिल्लीच्या हेड ऑफिसने पाच जुन्या आय. आय. टीं.ना आधुनिक रडार प्रणालीसंबंधी काही अनुदान दिले होते. या भरघोस अनुदानातून या सर्व आय. आय. टीं.त नवी संशोधन केंद्रे उभारली गेली आहेत. सुरुवातीपासून या केंद्रात आधी संशोधक विद्यार्थी म्हणून अन् नंतर प्राध्यापक म्हणून दहा वर्षे काम करण्याचे सद्भाग्य मला लाभले. याच काळात माझा डॉ.कलाम यांच्याची प्रथम परिचय झाला; तो हैदराबादला आल्यानंतर साहजिकच वाढला.
आय. आय. टी.त निर्माण झालेल्या सेंटरमध्ये रडारसंबंधी संशोधनाबरोबर आर्मी, नेव्ही, एअर फोर्सच्या तसेच डी. आर. डी. ओ. प्रयोगशाळेतील सायंटिस्ट्सदेखील एम. टेक. साठी येत. त्यामुळे डॉ. कलाम यांच्या प्रयोगशाळेतील बरेच सायंटिस्ट्स माझे एम. टेक. चे विद्यार्थी होते. एकदा तर ते विनोदाने म्हणाले देखील, “मी ज्याला ज्याला भेटतो तो तुमचा विद्यार्थी असल्याचे सांगतो!” एका अर्थी ते खरेही होते; कारण मी शिकविलेले अर्धा डझन सायंटिस्ट्स पुढे वेगवेगळ्या डी. आर. डी. ओ. लॅब्जचे डायरेक्टर झाले आहेत. दोघे तर पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार, डी. आर. डी. ओ. चीफदेखील झाले आहेत!
कलाम यांनी आर. सी. आय. या प्रयोगशाळेत इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल्सचा प्रकल्प धडाक्याने सुरू केला. तोपर्यंत बरेच बजेट मिळूनही या संरक्षण प्रयोग शाळांचे प्रकल्प रेंगाळत असत. त्यात शैथिल्य आले होते. ही मरगळ दूर करून नवे चैतन्य निर्माण करण्याचे श्रेय निश्चितच डॉ.कलाम यांना जाते. ते स्वतः ॲकेडेमिकली तेवढे सक्षम नसले( त्याची डॉ. पदवी ही सन्माननीय) तरी उत्तम टेक्नॉलॉजी मॅनेजर होते. कुणाकडूनही वेळेत काम कसे करून घ्यायचे याची शिस्तबद्ध कला त्यांना अवगत होती. माणूस म्हणून तर ते अतिशय ग्रेट होते. कुणाला न दुखावता, त्याच्या अडचणी समजून त्याच्याकडून काम कसे करून घ्यायचे हे त्यांचे कौशल्य वादातीत होते. त्यांनी स्वतः काही मूलभूत संशोधन केले नसले तरी आपल्या हाताखालील सायंटिस्ट्सना प्रोत्साहन देऊन, संधी देऊन त्यांच्याकडून उत्कृष्ट काम करून घेतले.
त्यांच्या प्रयोगशाळेतील एक सायंटिस्ट अधिकारी माझ्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. करीत होता. तेव्हा ते सारखी त्याच्या प्रगतीची चौकशी करायचे. मी जेव्हा त्यांना सांगितले की तुमच्या ऑफिसच्या कामामुळे त्याला पुरेसा वेळ मिळत नाही; त्याचे काम रेंगाळते आहे; तेव्हा त्यांनी त्याला ताबडतोब सहा महिन्यांची पगारी रजा मंजूर केली अन् त्याची पीएच. डी. ताबडतोब पूर्ण झाली – तीही परदेशातील दर्जेदार पेपर पब्लिकेशन्ससह! हे काम मिसाईल ॲंटेना संबंधीच होते. त्यात बरीच गुप्तता असल्याने पेपर प्रसिद्ध करण्यात दिल्ली हेड ऑफिसची परवानगी लागत असे. त्याला विलंब व्हायचा. त्या वेळी डॉ. कलाम स्वतः लक्ष घालून ती अडचण दूर करायचे!
उस्मानिया विद्यापीठात भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक विभागाने एक नेविगेशन रिसर्च सेंटर उभारले होते. यात डॉ. रेड्डींसमवेत माझाही सक्रिय सहभाग होता दहा वर्षे. डॉ. कलाम या सेंटरच्या ॲडवायझरी बोर्डाचे आधी सभासद अन् नंतर अध्यक्ष होते. त्यामुळे सारख्या भेटीगाठी व्हायच्या. त्यांच्या नाग मिसाईलसाठी नेविगेशनचे सॉफ्टवेअर याच केंद्राने तयार केले. त्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी विंग्ज ऑफ फायर या सुरुवातीच्या पुस्तकात केला आहे.
मी डी. आर. डी. ओ.च्या निवड समितीवर पंचवीस वर्षे काम केले – तज्ज्ञ म्हणून,अध्यक्ष म्हणून. तेही निदेशक या नात्याने या समितीत असायचे. तेव्हा आपल्या अधिकाऱ्याचे प्रमोशन व्हावे म्हणून ते प्रयत्नशील असायचे. प्रसंगी रदबदली करायचे. त्याचे काम किती महत्त्वाचे आहे हे पटवून द्यायचे. ( मुलाखत नीट झाली नाही तर अशी गरज भासत असे त्यांना.) हा त्यांचा दिलदारपणा वाखाणण्यासारखा होता. या वेळी आम्ही एकाच गेस्ट हाऊसमध्ये राहत होतो. डिनरनंतर एकत्र फिरायला जात होतो. त्या वेळच्या त्यांच्या गप्पांतही मिसाईल प्रोजेक्ट, सॅटेलाईट लाँच हेच टेक्निकल विषय असायचे. एकदा बंगलोर येथे डिनरनंतर आम्ही गेस्ट हाऊसशेजारी असलेल्या इस्रो प्रयोगशाळेत गेलो. दोन दिवसांनी आपले रॉकेट रशियाच्या तळावरून लाँच होणार होते. त्याचे शेवटचे काम रात्रीदेखील चालले होते. तिथे ते तिथल्या सायंटिस्ट्सशी बोलण्यात, त्यांना प्रोत्साहन देण्यात इतके रमले की आम्ही गेस्ट हाऊसला परतलो तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजले होते. ही त्यांची आपल्या कामातली भावनिक गुंतवणूक होती.
माझ्या मते डॉ. कलाम यांच्यासारखा तत्त्वनिष्ठ, स्वतःला झोकून देणारा, प्रामाणिक तळमळीचा अधिकारी दुर्मीळ म्हटला पाहिजे. निवृत्त झाल्यावर त्यांनी शालेय,कॉलेज विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले. पंडित नेहरूंनंतर मुलांना आकर्षित करणारे एकमेव डॉ.कलाम! मी कुलगुरू असताना केवळ एका फोनच्या निमंत्रणाने ते पदवी-प्रदान समारंभासाठी आले होते. त्या वेळी सूचिबद्ध कार्यक्रमामुळे त्यांना विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद साधता आला नव्हता. तेव्हाच त्यांनी मी पुन्हा येईन हे कबूल केले. त्याप्रमाणे दुसऱ्या भेटीचा कार्यक्रमदेखील ठरला. आम्ही जय्यत तयारीदेखील केली; पण आदल्या दिवशी पाय घसरून पडल्याने त्यांना दवाखान्यात भरती व्हावे लागले. सोहळा रद्द झाला. सर्वांचीच निराशा झाली; पण आधीच्या भेटीत कुलगुरू निवासात त्यांच्या आवडीचे भोजन आतिथ्य करण्याचे सद्भाग्य लाभले.
आता या ऑपरेशन सिंदूरमुळे डॉ. कलाम आठवणे स्वाभाविक होते; कारण ज्या मिसाइल्सने हा पराक्रम केला त्या भारतीय मिसाईल प्रोजेक्टचे जनक डॉ. कलाम होते. मला खातरी आहे, ते निश्चित वर टाळ्या वाजवत असतील!
