१ एकविसाव्या शतकाच्या पहाटेची गोड बातमी
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संगणकात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजंस किंवा एआय) विकसित करून तिच्याकरवी माणसांची साधीसुधीच नव्हे तर अतिसर्जनशील आणि गुंतागुंतीची कामं करवून घेण्याची स्वप्नं पाहिली गेली. अर्थपूर्ण संभाषण करणं (कॉन्व्हर्सेशनल एआय), कविता करणं, चित्रपट दिग्दर्शन करणं ही आणि अशी ती कामं! कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करू पाहणाऱ्या हर्बर्ट सायमन, मर्विन मिन्स्की, इ. अनेक आघाडीच्या शास्त्रज्ञांनी ही स्वप्नं पाहिली. “येत्या १० वर्षांनंतर संगणक माणसांना पाळीव प्राणी म्हणूनही सांभाळणार नाहीत. आम्ही तुम्हांला हे दाखवून देऊ की मनविरहित अशा छोट्या सुट्या भागांपासून तुम्ही मन तयार करू शकाल,” इति मर्विन मिन्स्की. या दिशेने प्रदीर्घ संशोधन केलं गेलं, प्रचंड निधी आणि बरीच मनुष्यवर्षंही त्या कामी खर्ची पडली. ॲलन ट्युरिंग या गणितज्ञाने मानव आणि संगणक यांच्या वर्तनातला फरक ओळखताच येणार नाही अशी कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकात निर्माण होईल असं भाकीत केलं होतं. ते भविष्यात सिद्ध करण्यासाठी त्याने ‘ट्युरिंग टेस्ट’ही रचून ठेवली. प्रथम वीस वर्षांत, नंतर तीस वर्षांत हे शक्य करून दाखवू असे दावे केले गेले; पण प्रत्यक्षात मानवी बुद्धिमत्तेशी साधर्म्य असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करणं शक्य नाही हे अनेक अपयशांमधून हळूहळू सिद्ध होत गेलं. प्रचंड निधी खर्चून केलेल्या ६० वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर अखेर हे शहाणपण गवसलं. त्यामुळे काही वर्षं एआय संशोधनाचा निधी आटला. त्या काळाला ‘एआय विंटर’ असं म्हटलं जातं.
मानवी बुद्धिमत्तेचं मर्यादित प्रारूप (नक्कल) करणं आणि तिची संगणकात हुबेहूब पुनर्निर्मिती करणं या दोन अगदी भिन्न गोष्टी आहेत; म्हणजेच ‘सिम्युलेशन इज नॉट डुप्लिकेशन!’ हे स्पष्ट झालं. शिकाऊ वैमानिक वापरतात तो असतो जमिनीवरचा ‘फ्लाईट सिम्युलेटर’ आणि सराईत पायलट आकाशात उडवतात ते असतं खरंखुरं विमान! फ्लाईट सिम्युलेटरमध्ये बसल्यावर विमानात बसल्याचा भास होत असला तरी तो म्हणजे विमान नव्हे!!
औद्योगिक क्रांतीतून जन्मलेल्या कारखानासदृश यंत्रणांतून विसाव्या शतकाने माणसाला यंत्रवत बनवण्यात यश मिळवलं; पण यंत्राला निखळ मानवी क्षमता प्रदान करण्यात मात्र ते शतक अपयशी ठरलं! एकविसावं शतक ही गोड बातमी आणि दिलासा देणारं शहाणपण घेऊन अवतरलं.
२ मानवी बुद्धिमत्तेची कॉपी करण्यातलं अपयश कशामुळे?
कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाला मानवी बुद्धिमत्तेची संगणकात पुनर्निर्मिती करण्यात किंवा तिची बरोबरी करण्यात हे अपयश येण्याची अनेक तंत्रवैज्ञानिक कारणं होती. डोळ्यासारख्या मानवी ज्ञानेंद्रियांसारखं काम करू शकणारे स्मार्ट सेन्सर्स त्या वेळी उपलब्ध नव्हते – आजही नाहीत. हातापायांसारख्या मानवी कर्मेंद्रियांच्या क्षमतांची बरोबरी करू शकेल असं रोबोटिक्स त्या वेळी नव्हतं – अजूनही बाल्यावस्थेत आहे. मानवी बुद्धिमत्तेशी बरोबरी करणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली प्रचंड संगणन क्षमता (कंप्युटर पॉवर) त्या वेळी उपलब्ध नव्हती – आजही नाही. मानवी बुद्धिमत्तेची गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याची प्रणाली त्या वेळी ज्ञात असलेल्या प्रोग्रामिंगच्या प्रणालीतून साकारणं शक्य नव्हतं – आजही नाही. आणि आपण तयार करत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेशी मानवी बुद्धिमत्तेचं स्वरूप हुबेहूब मिळतंजुळतं असेल असं मानून पुढे जाणं मुळात बिनबुडाचं होतं! कारण मानवी बुद्धिमत्तेचं स्वरूप आपल्याला त्या वेळी पुरेसं आकळलेलं नव्हतं आणि आजही नाही!!
काय असतात या मानवी बुद्धिमत्तेची अंगभूत (इंट्रिन्झिक) वैशिष्ट्यं? ती संगणकांना का बरं नाही प्राप्त करता येत? ते पाहू या.
3 मानवी बुद्धिमत्तेची आणि क्षमतांची खास वैशिष्ट्यं आणि संगणकांच्या मर्यादा
माणूस म्हणजे मानस किंवा मन असलेला प्राणी. व्यक्तिनिष्ठता हा त्याचा स्थायीभाव. त्याला कर्तृत्वाच्या स्वातंत्र्याची आस असते. माणसांना भावना (व्यक्त स्वरूपातली फीलिंग्ज आणि व्यक्त किंवा अव्यक्त स्वरूपात अस्तित्वात असणाऱ्या इमोशन्स) असतात. त्या सकारात्मक, नकारात्मक किंवा परिवर्तनशील असतात. भीती, आश्चर्य, राग, तिरस्कार, दुःख आणि आनंद या मूलभूत भावनांचे सुमारे २७० आविष्कार माणसं करतात आणि चेहऱ्यावरच्या सुमारे ७००० भावमुद्रांमधून ते व्यक्त करतात. इतर माणसांना संकेतांनी त्यांचा अर्थ उमगू शकतो. अर्थात, मानवी बुद्धिमत्तेकडे इतक्या विविध भावभावना व्यक्त करण्याची आणि इतरांच्या इतक्या भावमुद्रा तत्काळ समजून घेण्याची संवेदनशीलता असते आणि त्यावर प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देण्याची क्षमता असते.
माणसांना उपजतच ‘भावनिक बुद्धिमत्ता’ लाभलेली असते. त्यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या भावभावना लक्षात येणं, समजून घेता येणं आणि त्यांचं व्यवस्थापन करता येणं त्यांच्या आवाक्यात असतं. आत्मानुभूती (एंपथी), सहानुभूती, अनुकंपा, करुणा, समाजात वावरतानाचा समजूतदारपणा या क्षमता माणसांच्या इतरांबरोबरच्या बोलण्या-वागण्यात महत्त्वाची भूमिका पार पडतात. मानवी बुद्धिमत्तेचं हे कळीचं अंग संगणनाच्या (कंप्युटिंगच्या) वस्तुनिष्ठतेच्या फार पलीकडचं असतं!
माणसांना बहुविध बुद्धिमत्तांचा पट उपजत मिळालेला असतो. भाषिक, गणिती-तार्किक, सांगीतिक (गायक, वादक, इ.), शारीरगती (सर्जन, नर्तक, ॲथलीट, सर्कसपटू, इ.), द्रुक्-अवकाशीय (वाहन चालक, वैमानिक, इ.), निसर्गविषयक (पक्षितज्ज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ, इ.), व्यक्तिअंतर्गत (इंट्रापर्सनल) (आध्यत्मिक साधक, इ.) आणि आंतरव्यक्ती (इंटरपर्सनल) (लोकप्रिय नेते, कर्मचारीप्रिय व्यवस्थापक, विद्यार्थिप्रिय शिक्षक, इ.) या त्या आठ बुद्धिमत्ता. कृत्रिम बुद्धिमत्तेत सध्यातरी केवळ पहिल्या दोनच बुद्धिमत्ता थोड्याफार विकसित होत आहेत.
माणसांना भाषिक बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ध्वनी आणि चित्ररूपातल्या प्रतीकांची आणि त्यांच्या उपयोगातून भाषेची आणि लिपीची सामाजिक सहनिर्मिती करता येते आणि भाषा आणि लिपीचे आकलन करून त्यातून परस्परांशी अर्थपूर्ण संवाद साधता येतो. संवादातून संघटित होता येतं आणि सांघिक कृती करून प्रगती साधता येते. माणसांना अंतःप्रेरणा असतात. इतरांचे आणि स्वतःचे प्रेरणास्रोत त्यांना बुद्धिगम्य असतात. माणसांना ऊर्मी असतात, इच्छाशक्ती असते, मनोधैर्य असतं.
माणसांपाशी छोट्या डेटासेटवरूनही निर्णय घेण्याची क्षमता असते आणि त्यांना त्या निर्णयाबरहुकूम स्वतःच पुढाकार घेऊन कार्यरत होता येतं. संगणकांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निर्मितीसाठी प्रचंड डेटासेट (बिग डेटा) लागतात. त्यावर मशीन लर्निंगद्वारे ते अल्गोरिदम्स बनवण्याचा प्रयत्न करतात. लहान मुलांना चार-पाच भिन्न आकारांच्या, रंगांच्या, निरनिराळ्या पोझेसमधल्या मांजरी किंवा त्यांची चित्रं जरी दाखवली तरी ते भिन्न प्राण्यांमधून मांजर वेगळं ओळखू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेला ही इतकीशी क्षमता हस्तगत करायला अशा लक्षावधी मांजरांच्या प्रतिमांचा लार्ज डेटासेट देण्याला पर्याय नसतो! माणसांना रोबोजसारख्या प्रगत यंत्रांमध्ये असतात त्यापेक्षाही कितीतरी प्रगल्भ अशी ज्ञानेंद्रियं आणि कर्मेंद्रियं लाभलेली असतात आणि अशा लक्षावधी वर्षांत कमालीच्या उत्क्रांत होत गेलेल्या ज्ञानेंद्रियांकडून मिळणाऱ्या संवेदनांचं त्यांना संदर्भयुक्त आकलन करता येतं, अर्थबोधन साधता येतं, वैयक्तिक प्रयत्नातून आणि सांस्कृतिक मध्यस्थनातून भ्रम किंवा संभ्रम दूर करून अधिक सम्यक अर्थाची बांधणी करता येते, अन्वयार्थ लावता येतात. दृष्टी, श्रुती, स्पर्श, रस, गंध यांसारख्या संवेदनांची माणसांच्या ज्ञानेंद्रियांना निसर्गतः लाभलेली गोचरता (पर्सेप्टिबिलिटी) या कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रदान करण्यासाठी नानाविध प्रकारच्या संवेदकांचा (सेन्सर्सचा) वेगाने विकास होत असला तरी त्यात तंत्रज्ञानाला अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. बहुप्रसवा प्रगल्भता लाभलेल्या हात, पाय, इ. कर्मेंद्रियांकडून आपली उपजत आणि अभ्यासाने कमावलेली शारीर-स्नायुविषयक मानवी बुद्धिमत्ता वापरून (कृत्रिम बुद्धिमत्तेला अवघड आणि महागडी असलेली) शेकडो कामं माणसं अगदी सहज करतात. सर्कस, योगासनं,ॲथलेटिक्स, मैदानी खेळ, नृत्य, श्रमिकांची अनेक अवघड कामं, हस्तकला-कौशल्य, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, रुग्णांची शुश्रूषा, इ. उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत.
मानवी बुद्धिमत्तेला भौतिक अनुभव, संवेदना आणि बाह्य जगाशी चाललेल्या परस्परक्रिया यांच्यापासून वेगळं काढता येत नाही. माणसांना त्यांच्या ज्ञानेन्द्रियं आणि कर्मेंद्रियं यांच्या परस्पर समन्वयातून भोवतालाचं समग्र आणि एकात्म आकलन करून घेता येतं आणि त्यानुसार कृती करता येतात. संगणकांना अशी सभोवतीच्या परिस्थितीच्या आकलनाची क्षमता लाभलेली नसते. पुरेसं प्रशिक्षण न झालेला चालकविरहित मोटारीतला ‘एआय’ नियम मोडून रस्ता ओलांडणाऱ्या माणसाचा बळी घेऊ शकतो! पण मानवी चालक प्रसंगावधान राखून हा अपघात टाळू शकतो.
माणसांना बुद्धिपुरःसर विचार न करताही काही गोष्टी आपसूक समजण्याची क्षमता असते. त्यामुळे त्यांना दैनंदिन अनुभवांतून अव्यक्त आणि अस्पष्ट (इंप्लिसिट) स्वरूपातलं व्यावहारिक ज्ञान होत असतं. ते सुस्पष्ट आणि सैद्धांतिक नसलं तरी त्यांना गुंतागुंतीच्या, अनिश्चित किंवा संदिग्ध परिस्थितीमध्ये निर्णय घेण्यासाठी आणि कृती करण्यासाठी ते मार्ग दाखवतं. अशा प्रकारचं ज्ञान सुस्पष्ट स्वरूपात व्यक्त करणं कठीण असतं. संगणकांना औपचारिक आणि निःसंदिग्ध (एक्सप्लिसिट) स्वरूपात व्यक्त केलेलं ज्ञानच स्वीकारण्याची क्षमता असते. त्यामुळे माणसांची इंप्लिसिट कौशल्यं संगणकांना आत्मसात करता येत नाहीत. माणसं विभिन्न संदर्भांशी, हावभाव, खाणाखुणा किंवा शब्दाद्वारे मिळणाऱ्या तरल सूचनांशी जुळवून घेण्यात आणि आपले प्रतिसाद त्यानुसार सुधारण्यात वाकबगार असतात. सुस्पष्ट आज्ञावली किंवा नियमावलीवर विसंबणाऱ्या संगणकांना ही क्षमता मिळवणं दुरापास्त आहे.
माणसांपाशी बुद्धिचातुर्य (इंजिनिअरींगला जन्म देणारी इन्जेन्यूइटी) असतं, गुंतागुंतीच्या समस्यांची उकल करण्याची क्षमता असते. त्यांना सतर्क जाणिवेतून प्रश्न पडतात आणि विचारता येतात, संशय आणि शंका घेता येतात, व्यक्तिनिष्ठ अनुभव घेता येतात, अनुभवातून शिकता येतं आणि पूर्वीच्या पिढ्यांचं ज्ञान आत्मसात करून नवी ज्ञाननिर्मिती करता येते. माणसं अतिशय गुंतागुंतीचे आणि त्याच वेळी व्यापक असे विचार करू शकतात, अमर्याद असे विचारव्यूह रचत राहू शकतात, गुंतागुंतीचे युक्तिवाद करू शकतात.
माणसं आपल्या विचार, भावना आणि वर्तनप्रक्रियेबद्दल आणि आपल्या मनोव्यापारांबद्दल आपल्याच मनाने तटस्थपणे चिंतन करू शकतात, त्यात योग्य काय, अयोग्य काय हे आपल्या मूल्यांच्या आधारे सारासार विचार करून ठरवू शकतात (मानवी मनाची ही क्षमता म्हणजेच जाणीव). संगणकात जाणिवेची निर्मिती करणं आजतरी अशक्य आहे.
माणसं बाह्य संवेदनांना स्वतंत्र आणि व्यक्तिनिष्ठ प्रतिसाद देतात. प्रतिसाद देताना त्यांना निवडीचं स्वातंत्र्य जपता येतं. त्यांना स्वतंत्र आणि अर्थपूर्ण विचार आणि अभिव्यक्ती करता येते, सर्जनशील निर्मिती करता येते.
माणसं जागेपणी स्वप्नं बघू शकतात, कल्पनाशक्ती लढवू शकतात, अस्खलितपणे अमर्याद कल्पनाविलास करत राहू शकतात, मनोरथं बांधत राहू शकतात. नवकल्पनांची, जुन्या समस्यांच्या नव्या उत्तरांची आणि कलाकृतींची निर्मिती करू शकतात. ‘आउट ऑफ द बॉक्स’ विचार करू शकतात. अमर्याद कल्पकतेने विचार करण्यात गढून जाऊ शकतात. संगणक मात्र पूर्वनिश्चित अशा सीमित क्षेत्रातच कार्यरत राहू शकतात.
माणसांना अमूर्त पातळीवरच्या विचार, संकल्पना आणि कल्पनांची निर्मिती करता येते, अज्ञाताचा, अद्भुताचा शोध स्वयंप्रेरणेने घेता येतो, तर्क करता येतो, अंदाज/आडाखे/अभ्युपगम (कंजेक्चर्स/हायपोथेसिस) बांधता येतात, प्रयोग रचता येतात आणि करता येतात, निरीक्षणं घेता येतात, जुजबी सहसंबंध (कोरिलेशन्स) आणि सखोल कार्यकारण संबंध (कॉझल रिलेशन्स) शोधता येतात. निष्कर्ष काढता येतात, अनुमान लावता येतं, सिद्धांत आणि प्रमेयं मांडता येतात, मांडून ती सिद्ध करता येतात किंवा खोटी ठरवता येतात, विशिष्ट वास्तविकापासून सर्वसामान्य नियम शोधता येतात, नवे शोध लावता येतात. मानवी बुद्धिमत्तेला भिन्न आणि असंबद्ध संकल्पनांचं, वस्तूंचं किंवा प्रक्रियाचं संश्लेषण करून अभिनव संकल्पना, वस्तू किंवा प्रक्रिया निर्माण करता येतात किंवा भिन्न संकल्पनांमध्ये समन्वय साधता येतो.
माणसं आजीवन शिकत राहतात, शिकण्यावर प्रेम करत राहू शकतात, त्यांना व्यक्तिनिष्ठ आकलन, बोधन, ज्ञाननिर्मिती यांत रस असतो, त्यांना ज्ञानासाठी ज्ञानाप्राप्तीची आस असते, तत्त्वचिंतनाची ओढ असते, त्यांना कलाकृतींचा आस्वाद घेता येतो. माणसांना व्यक्तिगत आवडीनिवडी आणि इच्छा-आकांक्षा असतात आणि त्यापोटी ते प्रभावित होऊ शकतात, कार्यरत होऊ शकतात. संगणकात या गुणवैशिष्ट्यांचा लवलेशही नसतो.
माणसांना त्यांच्या बुद्धिमत्तेपलीकडे नवनिर्मितिक्षमता, प्रतिभा (जिनिअस, ब्रिलिअन्स), प्रज्ञा (इंटेलिजन्स पलीकडची इंटलेक्ट), जाणीव, शहाणपण (विज्डम), सुज्ञता, विवेक, कॉमन सेंस, निर्णयक्षमता, मूल्यनिष्ठा अशा प्रयत्नांती विकसित होऊ शकणाऱ्या अनेक अंगभूत क्षमता प्राप्त झालेल्या असतात. त्या निखळ मानवी आहेत. संगणकांमध्ये त्या निर्माण करणं अशक्यप्राय आहे.
माणसांच्या बौद्धिक क्रिया व्यक्तिनिष्ठ असल्याने त्या ‘प्रोग्रामेबल’ किंवा ‘प्रेडिक्टेबल’ नसतात, त्यांचं फलित अनपेक्षित असू शकतं. त्या क्रियांतून काय निष्पन्न होईल यासंबंधी अचूक अंदाज वर्तवता येतातच असं नाही. एकाच मुक्तोत्तरी (ओपन एंडेड) प्रश्नाला एकच व्यक्ती भिन्न वेळी आणि भिन्न व्यक्ती एकाच वेळी किती भिन्न उत्तरं देतात याचा अनुभव घेतल्यावर हे समजून येतं.
माणसांच्या कृती तीन प्रकारच्या असतात. तर्कसंगत-विचारजन्य कृती, व्यक्तिनिष्ठ-अनुभवजन्य-उत्स्फूर्त कृती आणि भावनिक उद्दीपनजन्य सर्जनशील (किंवा अतार्किक किंवा तर्कविसंगत किंवा असमंजस) कृती!! कृत्रिम बुद्धिमत्तेला केवळ पहिल्या प्रकारच्या कृती करता येतात!
संगणक कितीही प्रगत होत असले तरी मानवी बुद्धिमत्तेची आणि बुद्धिमत्तेपलीकडची अशी अनेक अफलातून गुणवैशिष्ट्यं त्यांना लाभलेली नसतात. त्यामुळे ते मानवी बुद्धिमत्तेची सहीसही पुनर्निर्मिती करू शकत नाहीत. मानवी बुद्धिमत्ता चॅटजिपीटीप्रमाणे केवळ पूर्वसंचित विशाल भाषिक आशयाचा परामर्श घेते असं नसून ती भाषिक आणि तार्किक क्षमतांपलीकडच्या वर सांगितलेल्या इतर सहा क्षमतांची जीवनातल्या बऱ्यावाईट अनुभवांमधून जडणघडण करत राहते आणि आपल्या वर्तनात त्यांची सांगड घालते. आपल्या भोवतीचं जग कसं चालतं याचं कळत-नकळतपणे आकलन करून घेते. चॅटजिपीटीला आजतरी मुख्यत्वे उपलब्ध भाषिक आशयावर संगणकीय प्रक्रिया करून माणसांच्या ठायी असलेला कॉमनसेंस प्राप्त करून घेणं आणि जगरहाटी कशी चालते हे समजावून घेणं दुरापास्त आहे. चॅटजिपीटी निर्मितिक्षम (जनरेटिव्ह) आहे; तर माणसं नवनिर्मितिक्षम (क्रिएटिव्ह) असतात!
४ मानवी जाणीव ‘कंप्युटेबल’ आहे का?
इथे मूलभूत प्रश्न असा होता की संगणकात मानवी विचारशक्ती, सर्जनशीलता, इ.ची सहीसही पुनर्निर्मिती करता येईल का? ‘मानवी मेंदू एखाद्या गुंतागुंतीच्या संगणकाप्रमाणे चालतो का आणि त्यातल्या संगणकीय प्रक्रियांमधून जाणिवेचा उगम होऊ शकतो का?’ म्हणजेच संगणकात मानवी जाणिवेची निर्मिती करता येईल का? अर्थात, मानवी जाणीव ‘कंप्युटेबल’ आहे का? मानवी मनाचं आकलन आणि मनविरहित सुट्या भागांपासून मनाची निर्मिती संगणकाच्या साहाय्याने करता येईल का?
या दिशेने संशोधन करताना हे स्पष्ट झालं की मन हे मेंदूमधलं एक स्ट्रक्चर (रचना) नसून मेंदूचं एक फंक्शन (कार्य) आहे. ते जठर किंवा आतडं यासारखं डोळ्यांना दिसणारं प्रकरण नाही. संगणक नियम आणि अल्गरिदम्सचं कठोर पालन करतात; पण मन मात्र क्लासिकल भौतिकशास्त्राच्या नियामांमध्ये सीमित नसतं. बहिणाबाईंच्या ‘मन वढाय वढाय’ या कवितेचं प्रत्येक कडवं आठवून पाहाच! सध्याच्या वैज्ञानिक आकलनानुसार हे लक्षात येतं की मानवी जाणीव ‘कंप्युटेबल’ नाही. मानवी मनाचं समग्र आकलन वस्तुनिष्ठ उपकरणांच्या किंवा संगणकाच्या साहाय्याने करता येणार नाही. (त्यासाठी दुसरं मानवी मनच हवं!) अल्गरिदम्सचं कठोर पालन करतात; पण मन मात्र क्लासिकल भौतिकशास्त्राच्या नियामांमध्ये सीमित नसतं. बहिणाबाईंच्या ‘मन वढाय वढाय’ या कवितेचं प्रत्येक कडवं आठवून पाहाच! सध्याच्या वैज्ञानिक आकलनानुसार हे लक्षात येतं की मानवी जाणीव ‘कंप्युटेबल’ नाही. मानवी मनाचं समग्र आकलन वस्तुनिष्ठ उपकरणांच्या किंवा संगणकाच्या साहाय्याने करता येणार नाही. (त्यासाठी दुसरं मानवी मनच हवं!)
५ कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआयची) खास वैशिष्ट्यं
मानवी भावभावना, कुतूहल, जिज्ञासा, सर्जनशीलता, प्रतिभा, प्रज्ञा, अंतर्दृष्टी, अंतःप्रेरणा, इच्छाशक्ती, बाह्य संवेदनेला देण्याच्या प्रतिसादातलं निवडीचं स्वातंत्र्य, चातुर्य, प्रेम, विवेक, उत्स्फूर्तता, इ. क्षमता संगणकीय अल्गरिदम्समधून निर्माण करता येणार नाहीत हे सिद्ध झाल्यावर मात्र संशोधकांनी संगणकातून मानवी बुद्धिमत्तेची सहीसही कॉपी करू पाहणारी ‘कृत्रिम’ बुद्धिमत्ता विकसित करण्यात अपयशी होत राहण्याऐवजी मानवी बुद्धिमत्तेच्या आवाक्याबाहेरची पण मानवाला उपयुक्त आणि गुणात्मकदृष्ट्या भिन्न अशी ‘नमानवी बुद्धिमत्ता’ विकसित करायला सुरुवात केली. तिलासुद्धा सार्वत्रिक संकेताने कृत्रिम बुद्धिमत्ता असंच म्हटलं जाऊ लागलं. इथे तिला नमानवी असं संबोधण्याचं कारण हे की संगणक या बुद्धिमत्तेच्या वापरातून जे व्यामिश्र वर्तन करतात किंवा गुंतागुंतीच्या समस्या ज्या प्रकारे सोडवतात आणि त्यासाठी जो तर्क विकसित करत जातात त्यात मानवी बुद्धिमत्तेने सुरुवातीला दिलेल्या प्राथमिक तर्काचा पुढे थांगपत्ताही लागत नाही.
‘डेटा x प्रोग्राम = चेंज्ड डेटा’ हे मानवी बुद्धिमत्तेने रचलेल्या पूर्वीच्या संगणनाचं स्वरूप होतं. म्हणजे प्रोग्राम किंवा अल्गरिदम वापरून आपण डेटातून नवा डेटा तयार करत होतो. याउलट आता डेटाने सुरुवात होते. डेटाचं विश्लेषण करून मशीन-लर्निंगद्वारे आपण पॅटर्न किंवा अल्गरिदम किंवा प्रोग्राम शोधून काढतो! त्याला आपण म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता.
त्यासाठी संगणकांना स्वतः शिकत राहणाऱ्या, स्वतःत दुरुस्त्या करणाऱ्या आणि स्वतःच स्वतःला सुधारत जाणाऱ्या प्रक्रिया अमलात आणण्याची फक्त बीज आज्ञावली माणसाने शिकवलेली असते. प्रचंड डेटावरील अशा मशीन-लर्निंगची, स्वयंदुरुस्ती आणि स्वयंसुधारणांची क्षणार्धात कोट्यवधी आवर्तनं पूर्ण करून संगणक जी उत्तरं काढतात आणि मानवाला अवगत नसलेल्या अचाट क्षमता प्रदर्शित करतात त्यांनी आजच आपण आश्चर्यचकित होत आहोत. उदाहरणार्थ : रोज अनेक वेळा कोट्यवधी लोकांना गूगल सर्चमधून क्षणार्धात कोट्यवधी अचूक निष्कर्ष देणारे ‘गूगल सर्च इंजिन’ ही नमानवी बुद्धिमत्तेची केवळ पहाट आहे. प्रत्येक नवा सर्च करताना हे सर्च इंजिन (सॉफ्टवेअर) तो सर्च पुढच्या वेळी अधिक अचूक आणि वेगवान करण्याचं त्याला प्रथम शिकवलेलं तंत्र पूर्वानुभवातून सतत सुधारत राहतं. लार्ज लँग्वेज मॉडेलच्या साहाय्याने आपल्या चौफेर प्रश्नांना ‘चॅटजिपीटी’ क्षणार्धात देत असलेली बहुतांशी अचूक, समर्पक आणि आपल्याला थक्क करणारी उत्तरं ही नमानवी बुद्धिमत्तेची पुढची सुधारित निर्मितिक्षम (जनरेटिव्ह) आवृत्ती. ती अनेक प्रसंगी ‘ट्युरिंग टेस्ट’मध्ये उत्तीर्ण होईल. म्हणजे माणसाने आणि तिने दिलेल्या उत्तरांमध्ये फरक जाणवणार नाही; पण याचा अर्थ तिला जाणीव प्राप्त झाली असा होत नाही. बुद्धिमत्ता म्हणजे जाणीव नव्हे!
गुंतागुंतीच्या मानसिक प्रक्रियांमधून माणसं निर्माण करतात तसा सर्जक विचार संगणक त्यांच्या नमानवी बुद्धिमत्तेच्या साहाय्याने देऊ शकत नसले किंवा मानवी बुद्धिमत्तेसारखा व्यापक आणि अमर्याद विचार करू शकत नसले तरी त्यांच्या नमानवी बुद्धिमत्तेचा वापर करून ते दिलेल्या माहितीवर मानवी क्षमतेपेक्षा कित्येक पटीने अधिक वेगवान, अधिक सखोल आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रक्रिया करू शकतात, प्रचंड डेटाचं सखोल पृथःकरण क्षणार्धात करू शकतात, किचकट आणि क्लिष्ट असा विश्लेषक व्यूह रचत रचत गुंतागुंतीच्या प्रक्रिया करून प्रचंड डेटातल्या अंतस्थ संरचना किंवा सहसंबंध (पॅटर्न / कोरिलेशन्स) हुडकून काढू शकतात आणि त्यातून माणसाला सहसा सुचला नसता असा अगदी मुलखावेगळा विचार करायला प्रवृत्त करू शकतात. उदाहरणार्थ : रुग्णाच्या दृष्टिपटलावरील केशरक्तवाहिन्यांच्या जाळ्याच्या विशिष्ट संरचनेवरून कृत्रिम बुद्धिमत्ता त्याच्या हृदयविकाराचं, उच्च रक्तदाबाचं आणि मधुमेहाचं निदान करू शकते. हे आणि असे माणसाला त्याच्या तर्काने सहसा सापडले नसते असे प्रचंड डेटातले कितीतरी गहन (डीप) सहसंबध कृत्रिम बुद्धिमत्ता शोधू शकते; पण त्या सहसंबंधांमागे असलेला कार्यकारण संबंध मात्र तिला अद्याप सांगता येत नाही. तिच्या क्षमतेच्या सध्याच्या या सीमारेषेवर ती मानवी बुद्धिमत्तेला कार्यकारण संबंध शोधण्याचं आव्हान देते, संधी देते आणि खाद्यही पुरवते आणि हे करताना आपल्या या क्षमता स्वतःच सुधारण्यासाठी स्वयंचलित होत राहते.
६ एआय – मानवी बुद्धिमत्तेला पुस्ती नव्हे पूरक
भावभावना असलेल्या आणि व्यक्तिनिष्ठ प्रतिसाद देणाऱ्या किंवा समान तथ्ये समोर ठेवल्यावरही निरनिराळ्या मूड (तंद्री) मध्ये निरनिराळ्या व्यक्तिनिष्ठ निवडी करणाऱ्या आणि संगणकापेक्षा फारच धिम्या गतीने माहितीवर प्रक्रिया करू शकणाऱ्या माणसाला संगणकांचे हे वेगवान, अतिसखोल, वस्तुनिष्ठ, व्यामिश्र आणि स्वसुधारक असं नवं वर्तन विशिष्ट मर्यादेपलीकडे स्वतः करता येत नाही. याचं मुख्य करण माणूस मूलतः व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे त्याची मानवी बुद्धिमत्ता दुसऱ्या माणसाला तर सोडाच पण त्याला स्वतःलासुद्धा नमानवी बुद्धिमत्तेसारखी ऑटोमेट करता येत नाही! त्यामुळे आपल्या या मर्यादेचं (किंवा बलस्थानाचं!) भान असलेला आणि आपल्या जटिल समस्यांच्या सोडवणुकीसाठी नक्की काय करायला पाहिजे याची नवी जाणीव आणि ज्ञान प्राप्त झालेला माणूस आता स्वतःला प्राप्त असलेल्या क्षमतांचीच संगणकाद्वारे आपल्या बुद्धिमत्तेला केवळ ‘पुस्ती’ जोडत बसण्याऐवजी आपल्यापेक्षा भिन्न क्षमतांनी ‘पूरक’ ठरणाऱ्या (सप्लिमेंटरी ऐवजी काँप्लिमेंटरी) अशा नमानवी बुद्धिमत्तेचा विकास करत आहे.
नमानवी बुद्धिमत्तेच्या विकासातल्या यशाचा आणि पूर्वीच्या कृत्रिम (मानवी बुद्धिमत्तेची बरोबरी करू बघणाऱ्या) बुद्धिमत्तेच्या विकासातल्या अपयशाचा फायदा असा झाला की आता यांत्रिक बुद्धिमत्तेच्या विकासाची दिशा बदलली. मानवी बुद्धिमत्तेची बरोबरी करण्यापेक्षा मानवी बुद्धिमत्ता जे नक्की करू शकणार नाही पण जे करणं आवश्यक आहे, उपयुक्त आहे ते काम करण्यासाठी या बुद्धिमत्तेचा विकास करायला सुरुवात झाली. त्यासाठी संशोधनात प्रचंड गुंतवणूक होऊ लागली आणि त्यावर २०२२ सालापासून जगभरातून आर्थिक परतावाही मिळू लागला; कारण कोट्यवधी लोक चॅटजिपीटी वापरण्यापूर्वी लायसंस फी भरू लागले!
कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मितीसाठी स्वतः शिकू शकणारं सॉफ्टवेअर सुरुवातीला माणसं लिहितात आणि मग ते सॉफ्टवेअर जसजसं वापरलं जातं तसतसं अधिक कार्यक्षम पद्धतीने समस्यापूर्ती करण्यासाठी स्वतःच स्वतःला सुधारत सुधारत आपल्या अधिक ‘बुद्धिमान’ अशा पुढच्या पिढ्या (सॉफ्टवेअर म्यूटंट्स) जन्माला घालतं. जपानी भातशेतीत पिकाच्या कापणीसाठी वापरली जाणारी अभिनव करवत जशी कापणी करण्यामुळे बोथट होण्याऐवजी (विशिष्ट पद्धतीनेच झिजत असल्यामुळे) अधिक धारदार होत राहते तसाच काहीसा हा प्रकार. कालांतराने या पुढच्या पिढ्यांच्या स्वरूपात आणि त्याची सुरुवात करून देणाऱ्या मानवी बुद्धिमत्तेच्या स्वरूपात साधर्म्य सापडणं अशक्य होत जातं. अशा बुद्धिमत्तेला मग नमानवी बुद्धिमत्ता असं संबोधतात. तिलाच आता कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रचलित नाव दिलं जातं.
७ एआयचे विलक्षण उपयोग – आजचे आणि उद्याचे
या बुद्धिमत्तेचा वापर माहितीच्या प्रचंड महाजालातून वेगवान आणि किचकट गूगल शोध करून नेमकेपणाने लक्षावधी अचूक निष्कर्ष काढणं, ‘चॅटजिपीटी’ या ‘सर्वस्पर्शी सर्वज्ञा’च्या (!) साहाय्याने अवघड प्रश्नांची चपखल उत्तरं, गृहपाठ, निबंध, पुस्तकं, ललित साहित्य, इमेल्स, इमेल्सची उत्तरं, इ. लेखन, पुस्तकांचे सारांश, अनुवाद, अनेक विषयांवरच्या केवळ एकोत्तरीच नव्हे तर मुक्तोत्तरी प्रश्नमंजूषांची तत्काळ निर्मिती, संगणकीय कोड्सचं लेखन, माणसांनी लिहिलेल्या कोड्समधल्या चुकांचा शोध, दुरुस्त्या आणि सुधारणा, आभासी मानवी संवादाद्वारे ग्राहक-साहाय्य, ‘रिप्लीट’ वापरून संगणक आज्ञावली-लेखन, ‘चॅटजिपीटी’ किंवा ‘कोपायलट’च्या साहाय्याने संगणक आज्ञावलींचं अचूक भाषांतर, बँकिंग क्षेत्रातल्या फसवणुकीचा तपास, रोगनिदान, ‘स्लाईड एआय’ वापरून दिलेल्या मजकुरावरून पॉवरपॉइंट स्लाईड्सची निर्मिती, दिलेल्या वर्णनात्मक मजकुरावर व्हिज्युअल प्रोसेसिंग करून ‘डॉल-इ’ किंवा ‘मिडजर्नी’ किंवा ‘स्टेबल डिफ्युजन’ किंवा ‘लिओनार्डो’च्या मदतीने अपेक्षित दृश्य-कलाकृतींची निर्मिती आणि त्यांचे जगप्रसिद्ध कलाकारांच्या शैलीत तत्क्षणी रूपांतर, ‘रेमिनी’ वापरून चित्रकृतींवर संपादकीय संस्कार, फोटोशॉपवर तासन्तास न घालवता क्षणार्धात असली चेहऱ्यांचे नकलीत रूपांतर, ‘सिंथेसिया’ वापरून दिलेल्या विषयावरच्या व्हिडिओची निर्मिती, त्यांचे हव्या त्या भाषेत सबटायटलिंग व डबिंग, ‘साउंड्रॉ’ किंवा ‘गुगल म्युझिक मॉडेल’ वापरून एकाच गाण्याची विविध वाद्यावरची संगीतनिर्मिती, ‘फ्लिकी’ वापरून टिकटॉक निर्मिती, ‘स्टारीटार्स’ वापरून अवतारनिर्मिती, स्मार्टफोनवर विविध भाषांमध्ये व्हॉईस टायपिंग, स्मार्टफोनवर संभाषण चालू असताना त्याचे अचूक टंकलेखन किंवा त्याचं तत्क्षणी इतर भाषांमध्ये जवळजवळ अचूक भाषांतर आणि हव्या त्या ॲक्सेंटमध्ये आणि विशिष्ट स्त्री किंवा पुरुषाच्या आवाजात त्याचं सादरीकरण या आणि अशा असंख्य कामांसाठी होतो. मानवी आवाजात आणि नैसर्गिक भाषेत दिलेल्या आज्ञा घेऊन त्याबरहुकूम अचूक काम करून देणारी कृत्रिम बुद्धिमत्ता हा यातलाच पुढचा प्रकार!
व्हिडिओ आणि फोटो स्वरूपातला कच्चा ऐवज दिला असता नवे ‘बुद्धिमान’ सॉफ्टवेअर, त्यातून उत्कृष्ट गुणवत्तेच्या व्हिडीओज भावनिक संदर्भाला मिळतंजुळतं पार्श्वसंगीत योग्य ठिकाणी घालून आणि दिलेल्या ऐवजातल्या मूळ कथानकाचं अनुमान लावून त्याला पुष्टी देणाऱ्या ॲनिमेशन आणि स्पेशल इफेक्ट्ससह तत्काळ तयार करून देत आहेत. कच्चे फोटो किंवा व्हिडिओज समजा प्रवासासंबंधी असतील तर ही एआय सॉफ्टवेअर त्यांना परस्पर गूगल नकाशांशी कायमचं जोडून त्यातल्या वेळोवेळी बदलत राहणाऱ्या भौगोलिक तपशिलासह आपोआप बदलणारा पक्का व्हिडिओ वापरकर्त्यांना क्षणार्धात देत आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे मुख्यतः तीन टप्पे आहेत : पहिल्यांदा ‘बिग डेटा,’ मग बिग डेटाच्या विश्लेषणाधारे होणारं ‘डीप लर्निंग’ आणि ‘मशिन लर्निंग’ आणि त्यातून विकसित होत राहणाऱ्या ‘अल्गरिदम्स’मधून निर्माण होणारी कृत्रिम बुद्धिमत्ता. केवळ अंक आणि अक्षरंच नव्हे; तर प्रतिमा, ध्वनी आणि चलच्चित्र रूपातल्या अतिप्रचंड माहिती साठ्यांचा (बिग डेटाचा) अतीखोलवर (डीप / गहन) शोध घेऊन त्यातून आपल्याला थक्क करणारे त्याच माहिती साठ्यातल्या घटकांचे अगदी अनोखे आणि वरकरणी त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना खूप विचारांतीही लक्षात येणार नाहीत असे गुंतागुंतीचे परस्परसंबध, सहसंबंध, आराखडे (पॅटर्न), कल, अन्वयार्थ, त्यांच्या विषयीचे अनपेक्षित आणि आश्चर्यकारक अंदाज, भविष्यवेध, विचाराच्या, अन्वेषणाच्या, संशोधनाच्या किंवा समस्यांची उकल करण्याच्या अनोख्या दिशा, प्रचंड माहितीच्या ढिगाऱ्यातून अमूर्त संकल्पना किंवा सूक्ष्मदृष्टी आणि मर्मदृष्टी ही विलक्षण भिन्न बुद्धिमत्तेची सॉफ्टवेअर क्षणार्धात तज्ज्ञांसमोर आणत आहेत. अशा तंत्रज्ञानामुळे नियोजन आणि निर्णय-प्रक्रियेत आमूलाग्र बदल होत आहेत. उदाहरणार्थ : विशिष्ट करदात्यांच्या आर्थिक व्यवहारविषयक माहितीच्या प्रचंड साठ्यातून ते भविष्यात कर चुकवण्याचे कुठले मार्ग चोखाळण्याची शक्यता आहे याचा अंदाज बांधणं, देशाच्या अर्थव्यवस्थांचा भविष्यवेध, साथीच्या रोगांचा फैलाव कुठे, कधी आणि किती होऊ शकतो याचा अंदाज, नव्या रोगप्रतिबंधक लशींचा शोध, वाहतुकीतल्या खोळंब्याचे अंदाज, लोकसंख्येच्या, रोजगारांच्या, आर्थिक भांडवलाच्या स्थलांतराचे अंदाज, बाजारातल्या चढ-उताराचे अंदाज, गुंतवणुकीतल्या परताव्यांचे अंदाज, संभाव्य त्सुनामीचे अंदाज, हवामान बदलांचे अंदाज इ.इ.
नमानवी बुद्धिमत्तेचे भविष्यात अनेक उपयोग संभवतात. उदाहरणार्थ : वास्तव अशा वास्तवापेक्षा अधिक वास्तव भासेल असे आभासी वास्तव (रिअल रिॲलिटीपेक्षा अधिक रिअल वाटेल अशी (‘व्हर्चुअल रिॲलिटी!) निर्माण करणं, परिणामकारक ई-शिक्षण, ई-प्रशासन, ई-कॉमर्स, इ. ‘ईंसाठी’ अशा आभासी वास्तवाचा वापर, चित्रपटांसाठी न भूतो असे भन्नाट स्पेशल इफेक्ट्स, समूहाच्या छायाचित्रातले मानवी चेहरे अचूक ओळखणे आणि त्यांच्या भूत आणि भविष्यकाळातल्या स्वरूपाची हुबेहूब निर्मिती, त्यांच्या विविध मूड्समधल्या प्रतिमांची हुबेहूब निर्मिती, अतिविशिष्ट कामं करणारे रोबो (उदा. किरणोत्सर्गी अपघातातले बचावकार्य, मंगळावर मानवी वस्ती स्थाईक करण्यापूर्वी त्यांच्यासाठी सुरक्षित आणि अनुकूल असं अंतर्गत पर्यावरण असलेली घरं बांधणं), नवी प्रतिबंधक औषधं, अर्भकांसाठी सर्व साथीच्या रोगांना प्रतिबंध करणारी एकच सर्वसमावेशक लस, जनुकांच्या विश्लेषणातून असाध्य रोगांवरच्या नव्या औषधांचा शोध, दरमहा दुप्पट होणाऱ्या जिनोम साखळ्यांच्या प्रचंड आंतरराष्ट्रीय साठ्यांचं व्यवस्थापन, नवी प्रथिनं आणि त्यातून जीवाच्या आणि जीवनाच्या निर्मितीचे प्रयोग, अणू-विभाजनाच्या सिम्युलेशन्सद्वारे विश्वाच्या उत्पत्तीचं आकलन, विभिन्न सेन्सर्सच्या साहाय्याने नैसर्गिक परिसंस्था (इकॉलॉजीज), हवा, नद्या, सरोवरं, महासागर, जंगलं, जीवजाती, इ.चं बेकायदेशीर मानवी हस्तक्षेपांपासून ऑनलाईन संरक्षण आणि व्यवस्थापन, इ. इ. इ.
आता या तंत्रज्ञानाची पुढची दिशा काय, याचा आपण विचार करू. पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून आता पाचव्या औद्योगिक क्रांतीपर्यंत आपण अतिशय गुंतागुंतीची सभ्यता (सिव्हिलायझेशन) निर्माण करत चाललोय. त्यामुळे तिच्यातले प्रश्न अतिशय जटिल होऊन बसले आहेत. उदाहरणार्थ : रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न, प्रदूषणाचा प्रश्न, ऊर्जेच्या तुटवड्याचा प्रश्न, हवामान बदलाचा आणि वैश्विक तापमानवाढीचा प्रश्न, दहशतवादाचा प्रश्न, अण्वस्त्रांच्या संभाव्य गैरवापराचा प्रश्न, अविकसित आणि निराधार राष्ट्रांतल्या कोट्यवधी लोकांच्या भूकमारीचा प्रश्न, महानगरातल्या कचर्याच्या ढिगांचा प्रश्न असे अनेक जटिल प्रश्न आहेत. म्हणजेच जसं तंत्रज्ञान आलं, औद्योगिकीकरण झालं, तसं त्याचा परिपाक म्हणून अतिशय गुंतागुंतीची सभ्यता तयार झाली आणि तिच्या समस्या अधिकाधिक जटिल होऊ लागल्या. या समस्यांची गुंतागुंत इतकी वाढायला लागली की त्यावर माणसाला वर्षानुवर्षं प्रयत्न आणि संशोधन करूनही उत्तरं सापडत नाहीयेत. नुसत्या मानवी बुद्धिमत्तेने अशा प्रश्नांची सोडवणूक होणं अशक्य बनलंय. त्यामुळे बराच काळ आपली चाचपडल्यासारखी अवस्था झाली होती.
या परिस्थितीवर अलीकडच्या काळात काही प्रमाणात उत्तरं सापडू लागली आहेत – तीही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि नव्या बुद्धिमत्तेच्या उपयोजनातून. अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला तेवढ्याच ताकदीच्या तंत्रज्ञानाचा विकास करणं, त्या गुंतागुंतीची उकल करू शकणाऱ्या प्रगत ज्ञानशाखांचा विकास करणं आणि ही गुतागुंत हाताळू शकेल अशा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास करणं भाग पडलं. असाच एक भयंकर प्रश्न म्हणजे ‘सिंगल युज प्लॅस्टिक’ हे प्लॅस्टिक जगभर पसरलंय. समुद्राच्या तळाशी साचलंय. ते अनेक जीवजातींचा बळी घेत आहे. मानवाच्या अस्तित्वालाही धोका निर्माण करणार आहे; शिवाय ते यापुढेही साठत जाणार आहे. हे प्लॅस्टिक किमान चारशे ते हजार वर्षांपर्यंत विघटित (डिकंपोझ) होणार नाही, असे अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहेत. मात्र हाच प्रश्न जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे सोडवायला घेतला गेला तेव्हा तिने काही दिवसांत लक्षावधी आभासी प्रयोग करून पाहिले आणि या ‘सिंगल युज प्लॅस्टिक’चं विघटन करणारं एन्झाइम सिन्थेसाइज करायला साहाय्य केलं! त्यामुळे विघटनासाठी आता केवळ एक आठवडा लागणार आहे. किती आश्चर्यकारक आहे हे! अर्थात म्हणून आता अधिक प्लॅस्टिक वापरायला आपण मोकळे झालो असा गैरअर्थ काढणं ही घोडचूक ठरेल.
आता तर मानवी बुद्धिमत्तेचं स्वरूप समजून घेण्यासाठी ‘ब्रेन मॅपिंग’ व्हायला लागलंय. त्यातून माणसाला ज्ञान कसं प्राप्त होतं? मानवी बुद्धिमत्तेचं स्वरूप कसं आहे? याचं ज्ञान मिळवण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाऊ लागली आहे. मानवी बुद्धिमत्तेचं स्वरूप मुळात अतिशय व्यामिश्र असल्याने आजवर त्याचा थांग लागत नव्हता; म्हणूनच ते समजून घेण्यासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आवश्यक होतं, जे आता उपलब्ध होतंय.
पृथ्वीवरच्या जीवजातींच्या रक्षणासाठी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि हवामान बदलाच्या अरिष्टाला तोंड देण्यासाठी, निसर्गाचं शोषण करण्याऐवजी आपल्या गरजांची परिपूर्ती करण्यासाठी त्याचं संयमी आणि संवेदनशील दोहन व्हावं, इ. साठी सांस्कृतिक प्रबोधन आणि संघर्ष अटळ आहे; पण त्याचबरोबर यासाठी पळवाटा नसलेले कायदे करण्यासाठी आणि त्याच्या काटेकोर आणि मानवविरहित अंमलबजावणीसाठी नव्या बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मिळणारी उत्तरं कदाचित लाभदायी ठरू शकतील. किमान तसा सकारात्मक, आशावादी दृष्टिकोन ठेवायला वाव आहे. त्या दिशेने विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचं सर्वांकडून स्वागत आणि स्वीकार होईल अशी अपेक्षा करू या!
८ एआयचे दुरुपयोग, धोके आणि ‘सत्यग्राही आणि सत्याग्रही एआय’ची गरज
मनुष्य हा अवजारे बनवणारा प्राणी आहे (मॅन इज अ टूल-मेकिंग ॲनिमल); पण तो अवजारांचा विवेकी वापर करणारा प्राणी आहेच असं मात्र नाही (मॅन इज नॉट नेसेसरिली अ वाईज टूल-युजिंग ॲनिमल). त्यासाठी उचित शिक्षण आणि समाज-प्रबोधन यांचं सातत्य राखावं लागतं. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग जर स्कॅम्स (घोटाळे) आणि फ्रॉड्स (फसवणुकी) साठी, युद्धपिपासा, सत्ताकांक्षा आणि नफेखोरीपोटी संहारक शस्त्रास्त्र निर्मितीसाठी, हव्यासापोटी पर्यावरणाच्या अनिर्बंध शोषणासाठी अर्थात, ‘विकासखोरी’साठी किंवा संपत्तीचं पराकोटीचं केंद्रीकरण करून विषमता वाढवण्यासाठी किंवा लोकशाही हक्कांची पायमल्ली करण्यासाठी (‘डीप स्टेट’ दृढ करण्यासाठी), लक्षावधी नागरिकांच्या सोशल मिडिया प्रोफाईल्सचं सखोल विश्लेषण करून, त्यांच्या आवडीनिवडी हुडकून काढून, त्यांचे कल शोधून काढून त्यांना संमोहित करून सत्याचा आभास निर्माण करणारा धादांत खोटा राजकीय प्रचार करण्यासाठी, निवडणुका ‘हॅक’ करण्यासाठी होणार असेल तर त्याविरुद्ध व्यापक प्रबोधनाला, लोकजागृतीला आणि संघटित जनआंदोलनांना पर्याय राहणार नाही. उपहासानं म्हणतात, की ‘एआयने आधीच लोकशाही उद्ध्वस्त केली नसेल तरच तो ती वाचवू शकेल!’
तंत्रज्ञानाला मर्यादा घालण्याबाबत कितीही ठरवलं तरी ते कठीण असतं. त्याऐवजी त्याचा अधिक समुचित वापर कसा करता येईल, हे पाहणं जास्त गरजेचं आहे. विकासाचा मानवी चेहरा जपणं म्हणजे राजनीतीला, विकासनीतीला, अर्थनीतीला विवेकी आणि सुसंस्कृत दिशेने वळवणं. ही गोष्ट लोकांमध्ये किती प्रखर जागृती होते, त्यांचं प्रबोधन किती परिणामकारक होतं, निःस्पृह असे वैज्ञानिक, तंत्रवैज्ञानिक, विचारवंत, साहित्यिक, कलावंत, आध्यात्मिक उपदेशक, समाजसुधारक, इ. समाजहितैषी मंडळी लोकांना कसं संघटित करतात, व्यक्तिस्वातंत्र्य, समाजस्वास्थ्य आणि पर्यावरण संतुलन साधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं उचित नियमन करण्यासाठी नव्या कायद्यांचा आग्रह ते कसा धरतात, अभ्यासू असे प्रभाव गट आणि दबाव गट कसे संघटित करतात आणि लोक त्यांना किती सक्रिय साथ देतात यावर अवलंबून आहे. हे तंत्रज्ञान वापरून मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रचलित भांडवलशाहीचं टिकऊ आणि पारदर्शक नियमन अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी समतेचा लढा निकराने लढावा लागेल. ती विचारवंत किंवा समाजसुधारकांवरची मोठी जबाबदारी असेल.
दुरुपयोगाच्या परिस्थितीत लोकांना संघटित होण्याशिवायही पर्याय राहणार नाही; कारण एकाधिकारशाही आणि अविवेकी भांडवलशाहीच्या युतीतून कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर करून लोकांना असंघटित ठेवण्यासाठी आणि त्यांच्यात ध्रुवीकरणाने फूट पाडण्यासाठी सततच्या भ्रामक प्रचारातून (आणि व्हॉईस क्लोनिंगसारखी एआय पॉवर्ड फसवणूक तंत्रं वापरून त्यांच्या आप्तेष्टांच्या, नेत्यांच्या, रोलमॉडेल्सच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून) त्यांच्या मेंदूंची धुलाई (ब्रेन वॉश) केली जाईल. त्याद्वारे त्यांचे फक्त क्रेडिट कार्ड, ई-मेल अकाउंट, बँक अकाऊंट किंवा मोबाईल फोन्स हॅक होणार नाहीत; तर त्या सर्वसामान्य लोकांच्या जाणिवा, त्यांची फ्री-विल आणि सदसद्विवेकबुद्धी हॅक होतील! म्हणजे मेंदूधुलाईच्या आहारी जाऊन केलेलं वर्तन आपण आपल्या मुक्त इच्छास्वातंत्र्याचा उचित वापर करून आणि सदसद्विवेकबुद्धी शाबूत आणि जागृत ठेवून केलं आहे असं त्यांना मनोमन वाटेल! इतकंच नव्हे तर ते इतरांना तसंच वर्तन करायला प्रभावित करतील!! तुम्ही कसा विचार करावा? कुठल्या वस्तू विकत घ्याव्यात? कुठे गुंतवणुक करावी, कोणाशी लग्न करावं? कोणाला मतदान करावं? हे अशा तंत्रज्ञानाच्या गैरवापरातून हॅकिंगद्वारे ठरवलं जाऊ शकतं. माणसांच्या जाणिवा, त्यांची फ्री-विल आणि सदसद्विवेकबुद्धी हॅक करण्यासाठी एआयला स्वसंवेदना किंवा ‘स्व’ची जाणीव असण्याची गरजच नाही हे इथे लक्षात घ्यायला हवं.
महत्त्वाचं म्हणजे एआयच्या गैरवापरातून असत्यनिर्मिती करायला काही सेकंद पुरेसे असतात; पण त्याचा पर्दाफाश करायला खूप वेळ, चिकाटी आणि तज्ज्ञता लागते. म्हणूनच या गोष्टी पराकोटीला जाऊ नयेत यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या हितरक्षणासाठी सत्याची कास न सोडणाऱ्या शास्त्रज्ञांनी ‘सत्यग्राही आणि सत्याग्रही कृत्रिम बुद्धिमत्ता’ विकसित करत राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ती सत्यग्राही आणि सत्याग्रही कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हांला तथ्यांविषयी, ‘माहिती’च्या, शिफारशींच्या सत्यतेविषयी, त्यांचे उगम किंवा मूलस्रोत या विषयी व त्यांच्या हेतूंविषयी, त्यांच्या नैतिक ग्राह्यतेविषयी सजग करेल. अशी कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हांला एखादी वस्तू घेण्याची, एखादी व्हिडिओ पाहण्याची शिफारस कुठल्या कारणास्तव किंवा हेतूने केली जात आहे हे सांगेल. औषधांच्या वेष्टनावर कायद्याप्रमाणे त्यातले घटक आणि संभाव्य जोखीम किंवा धोके दर्शवलेले असतात तसंच काहीसं. मग निवडणुकीत ट्रंप जिंकले की एआय असा संभ्रम लोकांना पडणार नाही. आता निर्माण होत असलेले ‘ट्रांसपरंट व एक्सप्लेनेबल एआय,’ ‘फेअर व इंपार्शल एआय’, ‘सेफ व सेक्युअर एआय’, ‘रिस्पॉंसिबल व अकौंटेबल एआय’ ही या दिशेने जाण्याची सुरुवात आहे. मात्र ते तंत्रज्ञान अद्यापि बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचं लोकशाहीकरण, आंतरराष्ट्रीय सामंजस्य, अण्वस्त्रांच्या बाबतीत असतात तशा नियामक यंत्रणा आणि कायद्यांच्या आधारे नियमन, पारदर्शकता राखण्यासाठी आचारसंहिता इ. गोष्टी लवकरात लवकर व्यवहारात आणाव्या लागतील; अन्यथा लोकांना हॅक केलं जाईल व त्याचे व्यक्तींवर आणि समाजावर गंभीर व दीर्घकालीन दुष्परिणाम होतील आणि हॅक झालेले बेदखल लोक संघटित होऊ शकणार नाहीत. व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेली लोकशाही ही मुळातच लोकहितासाठी योग्य व्यवस्था नाही असं त्यांना मनोमन पटवलं गेलं तर ते त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कधीच पुढे येणार नाहीत. त्यांना कदाचित असंही वाटेल की पूर्वजन्मीच्या पापांमुळे आता ते बेदखल होत आहेत. त्यामुळे पुढचा जन्म घेऊन त्यात पुण्य केल्याशिवाय आपली सुटका नाही हे त्यांना मनोमन पटेल आणि ते त्या व्यवस्थेत अडकून राहतील. आपल्याला हे हवंय का?
९ मानवी बुद्धिमत्ता आणि एआयची भागीदारी
युवाल हरारी यांनी ‘होमो डेअस’ – ‘उद्याचा संक्षिप्त इतिहास’ या ग्रंथात असा भविष्यवेध मांडला आहे की औद्योगिक क्रांतीने जसा ‘वर्किंग क्लास’ निर्माण केला तसा कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांतीतून एक ‘अन्-वर्किंग क्लास’ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अल्गरिदम्सच्या उपयोगातून माणसांची आजची बरीच कामं हिरावून घेणं किंवा कालबाह्य करणं दिवसेंदिवस अधिकाधिक सोपं होणार आहे. पण ते अल्गरिदम्स अधिकाधिक चलाख होत आहेत म्हणून नव्हे; तर माणसं यंत्रवत, साचेबंद ‘व्यावसायिक’ होत आहेत म्हणून. माणसं पराकोटीच्या स्पेशलायझेशनच्या मागे लागून मशीनसारखी तुकडेबंद, एसओपी-नियंत्रित आणि प्रेडिक्टेबल कामं करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला त्यांची तशी नियमबद्ध कामं शिकून घेणं उत्तरोत्तर सोपं होत आहे. माणसं गांधीजींना अभिप्रेत असलेल्या ‘बी ते फळ’ किंवा ‘पेरणी ते कापणी’ अशा सर्जनशील, परिपूर्ण आणि फलदायी (होलसम) कामापासून दूर भरकटत आहेत. आपली साधीसुधी कामं आउटसोर्स करत आहेत. त्यामुळे आधुनिक काळातली बहुतांश माणसं, त्यांची बहुतांश कामं करतांना, त्यांच्या बहुतांश निखळ मानवी क्षमतांचा वापरच करत नाहीयेत. त्या अस्तंगत होत आहेत. माणसांची यंत्रं होत आहेत. पण एआय हे त्यांच्यापेक्षा अफाट क्षमतेचं यंत्र आहे. त्याच्यापुढे यंत्रवत माणसांना टिकाव धरणं कठीण आहे.
आता वापरात न राहिलेल्या आणि म्हणून अस्तंगत होत असलेल्या या निखळ मानवी बुद्धिमत्तेच्या व्यवच्छेदक वैशिष्ट्यांचा आणि क्षमतांचा पुनर्शोध घेणं माणसांना भाग पडेल आणि तसं केलं तरच येत्या दशकांमध्ये येऊ घातलेल्या ‘अन्-वर्किंग क्लास’च्या आणि भीषण बेरोजगारीच्या नव्या संकटावर त्यांना मात करता येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे २०३० सालापर्यंत ८.५ कोटी रोजगार प्रभावित होतील पण माणसांनी त्यांच्या अंगभूत मानवी क्षमतांचा परिपोष केला तर एआयमुळे त्यांना १३.५ कोटी नवे रोजगार मिळतील.
कदाचित असाही काळ येईल की यंत्रांनी केलेल्या उत्पादनांऐवजी ‘मेड बाय ह्यूमन्स’ अशा उत्पादनांची मागणी वाढत जाईल! त्याच्या किमतीवर ‘ओव्हर अँड अबाव्ह’ असा ‘ह्युमन प्रीमियम’ही कमावता येईल!!
विसाव्या शतकाने औद्योगिक क्रांतिद्वारे माणसाला यंत्रवत करण्याचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे यंत्रांकडून मानवी बुद्धिमत्तेची कामे करवण्याचा प्रयत्न केला. पण एकविसाव्या शतकाने मात्र आपल्याला योग्य दिशा दाखवली ती अशी की ज्या कृती वस्तुनिष्ठतेतून यंत्रांना उत्तम जमतात त्या यंत्रांना करू द्या आणि ज्या व्यक्तिनिष्ठतेतून केवळ माणसांनाच जमू शकतात त्या माणसांनाच करू द्या. मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता परस्परभिन्न पण परस्परपूरक असल्याने त्या परस्परांच्या शत्रू, वैरी, विनाशक, विरोधक वा प्रतिस्पर्धी नाहीत. त्यातील कोणतीही एक हा दुसऱ्याचा गुलाम, नोकर किंवा मालक नाही. त्या परस्परांच्या घनिष्ट भागीदार होऊ शकतात. त्यामुळे मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्तांमध्ये श्रेष्ठ कोण किंवा वर्चस्व कोणाचं हे प्रश्नच गैरलागू ठरतात. त्या दोन बुद्धिमत्तांमध्ये भविष्य कोणाचे तर त्या दोन बुद्धिमत्तांच्या घनिष्ट भागीदारीचे!
मानवी समजाच्या हितासाठी त्या मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्तांचा समुचित विकास करणं आणि त्यांची निकोप आणि टिकाऊ अशी भागीदारी यशस्वी करणं अपरिहार्य आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणाचा हा नवा कालसुसंगत अजेंडा आणि आशय आहे. जे मानवी बुद्धिमत्तेला जमत नाही ते कृत्रिम बुद्धिमत्तेला चांगलं जमतं. तसंच जे कृत्रिम बुद्धिमत्तेला जमत नाही ते मानवी बुद्धिमत्तेला चांगलं जमतं. त्यामुळे माणसाला अधिक चांगला माणूस होऊ दिलं पाहिजे आणि ‘एआय’ला अधिक चांगला एआय होऊ दिलं पाहिजे. दोघांच्या भागीदारीतून समाजाच्या जटिल समस्यांचं निराकरण, सर्वांसाठी आणि सर्वत्र दर्जेदार जीवनमान, नैसर्गिक पर्यावरणाचं संवर्धन, जागतिक स्तरावर शांततापूर्ण सहजीवन अशा गोष्टी मग पुढे नेता येतील.
या भागीदारीचं स्वरूप कसं असेल? तर मानवी बुद्धिमत्ता खऱ्या अर्थाने आपली नसलेली कामं करायला नमानवी बुद्धिमत्तेला तिचा अधिक विकास करून भाग पाडत राहील आणि जर माणसं अशी काही ‘त्यांची नसलेली’ कामं करत राहिलीच तर नमानवी बुद्धिमत्ता ती त्यांच्यापासून हिरावून घेत राहील आणि माणसांना आपल्या निसर्गदत्त सर्जनशीलतेचे परमोच्च शिखर गाठण्यासाठी आव्हान देत राहील.
माणसं ‘आश्चर्यकारकरित्या’ मंद वेगाची, चुका करणारी पण बुद्धिमान (सर्जनशील) आहेत! संगणक ‘आश्चर्यकारकरित्या’ वेगवान, बिनचूक काम करणारे पण मठ्ठ (असर्जनशील) आहेत!! मात्र भविष्यात माणसं आणि संगणक एकत्रितपणे ‘आश्चर्यकारक’ गोष्टी करू शकतील!!! हे विसाव्या शतकात हळूहळू उमगत गेलेलं भान ‘आश्चर्यकारकरित्या’ अचूक आणि दूरदृष्टीचं आहे.
आता या नव्या जगाला सामोरं जाण्यासाठी आणि त्यात नेतृत्व करण्यासाठी आपल्या मुलांचं शिक्षण घोकंपट्टी आणि पोपटपंची या वस्तुनिष्ठ यांत्रिकतेऐवजी वर उल्लेखिलेल्या सर्व व्यक्तिनिष्ठ अशा निखळ मानवी क्षमतांच्या विकासावर केंद्रित करायला हवं. वर्तनवादी शिक्षणाकडून सर्जनशील ज्ञानरचनावादी शिक्षणाकडे त्वरित जायला हवं. उदा. इंजिनिअरिंग कॉलेजेसचं रूपांतर आता ‘इमॅजिनीअरिंग’ कॉलेजेसमध्ये करायला हवं. विद्यार्थ्याचं केवळ कोणासाठीतरी नोटा छापणारं यंत्र न बनवता त्याचा अत्याधुनिक तंत्रविज्ञानाशी सुयोग्य आणि समुचित भागीदारी करणारा असा अधिक परिपूर्ण, सर्जनशील, विवेकी, सुसंस्कृत आणि पर्यावरणस्नेही माणूस बनवणं आता श्रेयस्करच नव्हे तर अपरिहार्यही आहे. बेरोजगारीमुक्त शिक्षणाचं कालसुसंगत उद्दिष्ट हेच असायला हवं.
१० समारोप: मानवी बुद्धिमत्तेचं सम्यक आकलन आणि विकास कसा होईल?
अनेक जटिल प्रश्नांचा अभ्यास आणि सोडवणूक करण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेला नमानवी बुद्धिमत्तेची मदत लागणार आहे. आपलं नादुरुस्त होत असलेलं पर्यावरण तंदुरुस्त करण्यासाठीही प्रगत नमानवी बुद्धिमत्ता वापरावी लागणार आहे. आपला बिघडलेला ग्रह आपण दुरुस्त करू शकू या आशावादाला या बुद्धिमत्तेच्या विकासातून वैज्ञानिक शक्यतेत रूपांतरित करता येणार आहे. एआयचे दुरुपयोग आणि धोके लक्षात घेता सर्व काही केवळ मानवी बुद्धिमत्तेनं केलेलं बरं, ती सर्व आव्हानं पेलायला सक्षमच आहे. त्यात कृत्रिम/नमानवी बुद्धिमत्तेची लुडबूड आवश्यक नाही असा एककल्ली, अहंकारयुक्त आणि तिरस्कारयुक्त दृष्टिकोन सोडून दिला पाहिजे. अनेक गुंतागुंतीचे प्रश्न मानवी बुद्धिमत्तेनेच निर्माण केले आहेत आणि त्या बुद्धिमत्तेला ते सोडवता येत नाहीयेत हे आपण बघतो आहोत. मानवी बुद्धिमत्तेचं सम्यक आकलन हाही मानवी बुद्धिमत्तेला पडलेला असाच एक जटिल प्रश्न आहे. ब्रेन मॅपिंगद्वारे हे कोडं उलगडण्यासाठी एआयचीच मदत घेणं अनिवार्य आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
या संदर्भात एक मार्मिक किस्सा सांगून हा लेख संपवतो.
पॅरिस शहरामध्ये भरणाऱ्या एका जागतिक अभियांत्रिकी ट्रेड फेअरच्या निमित्ताने आर्किटेक्ट गुस्ताव आयफेलने ‘आयफेल टॉवर’ बांधायचं ठरवलं. फ्रांसचं श्रेष्ठत्व केवळ कलाक्षेत्रात नसून अभियांत्रिकीतही आहे हे त्याला जगाला दाखवायचं होतं; पण त्याच्या या मुलखावेगळ्या प्रकल्पामुळे पॅरिस शहरातले सुमारे ३०० अभिजन त्याच्यावर भारी नाराज झाले. ‘पॅरिस या आमच्या रम्य नगरीत मध्येच कुठे हा असा लोखंडी राक्षसी सांगाडा बांधताय तुम्ही!’ अशी टीका ते आयफेलवर करायचे. ट्रेड फेअर जवळ जवळ येत राहिली. तिच्या उद्घाटनापूर्वी हा मनोरा पूर्ण होणं आवश्यक होतं. तो मनोरा हेच ट्रेड फेअरचं प्रतीक होतं. या अभिजनांचं नेतृत्व होतं गाय दि मोपासा (Guy de Maupassant) या प्रसिद्ध फ्रेंच लघुकथा लेखकाकडे. तो गुस्ताव आयफेलच्या मनोऱ्याचा कट्टर विरोधक होता. तो आयफेल टॉवर या कल्पनेच्या इतकं विरोधी लेखन प्रसिद्ध करत असे की आयफेल कधी त्याला उत्तर देण्याचं धाडस करत नसे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही आयफेलच्या प्रयत्नाअंती आयफेल टॉवर अखेर वेळेत उभा राहिला. आयफेल टॉवरच्या सर्वात वरच्या मजल्यावर एक कॉफी बारही बांधण्यात आला. असं म्हणतात की ट्रेड फेअर आटोपल्यावर मात्र गाय दि मोपासा नेहमी आयफेल टॉवर चढून जायचा. आजच्यासारखी लिफ्टची सुविधा त्या वेळी नव्हती. तरीही तो चढून जायचा म्हणे. तिथं बारमध्ये कॉफी पीत पीत आयफेल टॉवरविरोधी लेखन करायचा आणि ते ‘आयफेल टॉवरवरून’ अशा मथळ्याखाली वृत्तपत्रात प्रकाशित व्हायचं. पॅरिसमधले लोक ते मोठ्या चवीने वाचायचे. शेवटी लोकांनी एकदा मोपासाला विचारलं की, तू आयफेल टॉवरच्या शिखरावर बसून त्या टॉवरवरच टीकास्त्र सोडणारं लेखन करतोस, हे विसंगत नाही का? त्यावर मोपासा उत्तरला, “काय करणार? आता अख्ख्या पॅरीस नगरीत अशी एकमेव जागा शिल्लक राहिली आहे की जिथून मला न आवडणारं आयफेल टॉवर अजिबात दिसत नाही आणि माझी रम्य पॅरिस नगरीच फक्त दिसते, ती जागा म्हणजे आयफेल टॉवरचं शिखर!”
कृत्रिम बुद्धिमत्तेचा तिरस्कार करणाऱ्या मित्रांना एवढंच सांगायचंय की यापुढे मानवी बुद्धिमत्तेच्या रम्य नगरीचं सम्यक दर्शनही तुम्हांला प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उंच टॉवरवरूनच दिसणार आहे!! मानवी बुद्धिमत्तेने नमानवी बुद्धिमत्तेला जन्म दिला आणि आता नमानवी बुद्धिमत्ता अतिव्यामिश्र अशा मानवी बुद्धिमत्तेचं आकलन आणि त्यातून तिचा विकास यासाठी उपयुक्त होणार आहे! परस्परांशी भागीदारीचा या बुद्धिमत्तांचा दुहेरी गोफ भविष्यातही सतत विणला जाईल आणि मानवाला न उकललेली गहन कोडी सोडवताना या बुद्धिमत्ता एकमेकींनाही समृद्ध करत रहातील.


आयफेल टाॅवरचे उदाहरण अप्रतिम !
माहितीपूर्ण लेख. आवडला. आयफेल टॉवर चे उदाहरण एकदम fit बसते आहे.