जपानमध्ये या वर्षीचा वसंत ऋतूचा सोहळा आत्ताच सुरू झाला आहे. इथे-तिथे, प्रत्येक ठिकाणी खूप फुले उमललेली आहेत. त्या निमित्ताने आज तुम्हांला इथल्या विविध ऋतूंची गोष्ट सांगते. जपानमध्ये चार ऋतू आढळतात. नावापुरते नाही तर अगदी प्रत्येक ऋतूचे वैशिष्ट्य जाणवते आणि बटण दाबल्यासारखा पुढचा ऋतू येऊन धडकतो. करड्या रंगाने वेढून टाकणारा हिवाळा, रंगांची बरसात घेऊन येणारा वसंत, भाजून काढणारा उन्हाळा, लाल पिवळ्या पानांनी रंगांची रांगोळी काढणारा शरद ऋतू.
सुरुवात करते हिवाळ्यापासून. हा पहिला-वहिला ऋतू मी इथे आल्यानंतर अनुभवलेला! थंडी सुरू होणार हे इथल्या दुकानातील वस्तू ओरडून सांगत असतात आणि मग हलक्या पावलाने येऊन झटका देते ती इथली थंडी – खास करून उष्ण हवामानातून आलेल्या माझ्यासारख्या लोकांना. २०२२ला जपानमध्ये आल्यावर लगेच धडकलेला हिवाळा, नवीन घर, नवीन ऑफिस, कुठल्याच प्रकारच्या मदतनिसाशिवाय घराची जबाबदारी, नुकताच भारतात परत गेलेला नवरा – अशी अनेक कारणं होतीच; पण हिवाळा खूप अवघड होता हे खरं. इथे खरंतर सगळ्या ठिकाणी – घर, ऑफिस, सगळ्या सार्वजनिक जागा (मेट्रो स्टेशन्स, मेट्रो, भुयारी रस्ते) नियंत्रित तापमानाची सोय केलेल्या असतात. ह्या पहिल्या हिवाळ्याबद्दल सांगायचं तर अगदी नकोसं झालं होतं मला! थोडी भीतीही वाटत होती – सगळ्या सुखसोयी असून हिवाळा इतका अवघड का जातोय. दुपारी ४-४.३० ला पडणारा अंधार, घालावे लागणारे अनेक लेयर्स, तरीही अंगात घुसणारा वारा, थंड पडणारे पाय, बर्फासारखं होणारं नाक, सतत वाजणारी थंडी, मधूनच दणका देणारा पाऊस ह्या समस्यांपेक्षा मनाला जाणवतो तो असा करड्या रंगाने भरून गेलेला हिवाळा, एक नकोसं दुःखी वातावरण निर्माण करणारा. सगळी झाडं सुनीसुनी, बोडकी झालेली. झाडांना पाने असणे आपण भारतात इतकं गृहीत धरतो की त्यांची कमतरता असं वातावरण निर्माण करेल हे आधी कळतच नाही. सगळी झाडं सारखी दिसतात – पर्णहीन काळ्या दांड्या, काटक्या.
Nemophilia
तीन हिवाळे बघितल्यावरही असं नकोसं, दुःखी नक्की का वाटते हे मला अजूनही सांगता येत नाहीये. ह्या पार्श्वभूमीवर एक नंतर कळलेली गोष्ट म्हणजे हा ऋतू फक्त मलाच दुःखी करणारा नसतो; तर ह्या काळात जपानमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या केल्या जातात, असं आकडेवारी सांगते. अनेकदा बाहेरगावी जाणाऱ्या काही ट्रेन्स, जिथे सुरक्षा कठडे नाहीत अशा काही ठिकाणी, उशिरा धावायचं कारण असतं ‘person on track.’ इथे असणारी एकलकोंडी माणसं हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे पण तरी थोडक्यात सांगायचं तर हा हिवाळा सगळ्यांना मानसिक दृष्ट्या कमकुवत करतो हे जाणवतं. इथे थंडीत सगळेजण बहुतेक करून पांढरे, काळे, ग्रे रंगांचे कपडे घालतात. कधी कधी वाटतं रंगीबेरंगी कपडे घातले तर जरा उत्साह वाटेल. इथे ह्या ऋतूमध्ये सगळीकडे रोषणाई केली जाते; अगदी छोट्याशा स्टेशनापासून ते भल्या मोठ्या प्रदर्शनांपर्यंत. सुकलेल्या झाडांवरून LED च्या सुंदर माळा सोडतात, एखादी संकल्पना घेऊन वेगळाच आविष्कार केलेला असतो. हे सगळं ती नकोशी दुःखी भावना घालवण्यासाठी असावं बहुतेक. ग्रे रंगाच्या पार्श्वभूमीवर ही रोषणाई फारच उठून दिसते. अगदी प्रसन्न वाटतं बघून; पण तरीही कडक हिवाळ्यात दाटून येणाऱ्या नकारात्मक भावनेवर मला तरी हमखास उपाय सापडलेला नाही.
हाच हिवाळा हवाहवासा वाटेल अशा काही जागा मला जपानमध्ये सापडल्या. माउंट फुजी, वेगवेगळी स्नो रिसॉर्ट्स, स्नो मंकीज जगात सगळ्यात जास्त बर्फ पडणाऱ्या पहिल्या तीनही जागा जपानमध्ये आहेत. बर्फाचा मुकुट चढवलेला माऊंट फुजी डोळ्यांना आणि मनाला एक वेगळीच उभारी देतो. बर्फाची चादर ओढलेले उतार, त्यावरून सहज सरकणारी (स्कीइंग करणारी) लहान मोठी माणसं आपल्या शारीरिक क्षमतेचा पुनर्विचार करायला भाग पाडतात. स्कीइंग हा खेळ खरंच आपल्या शारीरिक क्षमतेचा आणि तोल साधण्याचे कौशल्य ह्याचा कस लावणारा असतो. प्रत्यक्ष स्कीइंगच्या आधी ती सगळी इक्विपमेंट्स घेऊन, ते विशेष कपडे घालून वर पोचणे हेच मला जास्त आव्हानात्मक वाटतं. बर्फ पांघरलेले डोंगर, गोठून गेलेल्या नद्या, बर्फ अंगावर झेलून उभी असलेली झाडं बघून एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या सेटमध्ये प्रवेश केल्यासारखं वाटतं.
Sakura Passage
अशा कडक, गोठून टाकणाऱ्या हिवाळ्यानंतर, थंडी वाजते म्हणता म्हणता २१ मार्च येतो आणि विषुवदिनानंतर (२१ मार्च – Equinox day), अचानक हवामान सुधारायला लागतं आणि पर्व सुरू होत वसंत ऋतूचं. अचानक सगळीकडे एक-एक फूल, नवीन कोवळी पानं आपलं अस्तित्व दाखवायला लागतात. मुक्या झालेल्या मातीतून डोकावणारं छोटंसं हिरवं गवताचं पातं, २-३ दिवसांत कोवळ्या पानांनी भरून जाणारी झाडं, सगळं भारलेलं आनंदी वातावरण. टिचकी वाजवल्यासारखा बदलणारा ऋतू हे जपानचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. जपानमध्ये वसंत ऋतूमध्ये फुलणाऱ्या फुलांची (चेरी ब्लॉसम) चर्चा आपण सगळ्यांनी ऐकलेली असते; पण इथे वसंत ऋतू तेवढ्यापुरता मर्यादित नाहीच. नेमोफिलिया, विस्टेरिया, ट्युलिप्स, नार्सिसस, पिंक फ्लॉस आणि अशी अनेक प्रकारची फुले हजेरी लावायला तयार असतात. बहुतेक सगळ्या घराघरांतून सुंदर सुंदर फुलांची झाडे लावली जातात. बरीच घरं प्रेक्षणीय स्थळ बनून जातात.
चेरी ब्लॉसमबद्दल काय लिहू! ते हिंदी गाणं आहे ना ‘कुदरतने बनाया होगा फुरसत से तुझे मेरे यार’ हे शब्द ह्या फुलांना सही सही लागू होतात. चेरी ब्लॉसमच्या खूप वेगवेगळ्या – २००हून जास्त जाती जपानमध्ये सापडतात. फुलाचा रंग, पाकळीची रचना, संख्या ह्यावरून ह्या वेगवेगळ्या जाती ओळखता येतात. पांढऱ्या रंगाची फुलं येणारा सोमेई योशिनो, हलका गुलाबी असणारा यामाझाकुरा, लवकर फुलणारा गुलाबी असणारा कावाझू झाकुरा, खाली उलट्या दिशेने फुलणारा हलका गुलाबी शिदारेझाकुरा (weeping चेरी)… असे अनेक. वेगवेगळ्या प्रदेशांत, वेगवेगळ्या वेळी फुलणारे, पाकळ्यांचा रंग, आकार, संख्या ह्याने वेगळेपण जपणारे हे सगळे चेरी ब्लॉसम मनावर गारुड करण्यात सगळ्यात पुढे असतात. जपानमधील चेरी ब्लॉसम इतकं प्रसिद्ध का ह्याचं उत्तर त्या झाडाला फुलताना बघितल्याशिवाय मिळणं अशक्य आहे.
Kawazu-Zakura
सगळा भूप्रदेश वेगवेगळ्या रंगांची उधळण करत मनावर गारुड करायला तयार होतो. रंग तर असतातच पण ह्या दिवसांत येता जाता नेहमी साध्या सरळ वाटणाऱ्या रस्त्यावर नकळत सुगंधाचीही लयलूट जाणवते. करड्या रंगाच्या हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर रंगाने आणि सुगंधाने न्हाऊ घालणारा वसंत मनावर उठलेले हिवाळ्याचे ओरखडे पूर्णपणे पुसून टाकतो. खूप थंडीचे कपडे घरात धुऊन (किंवा ड्राय क्लीन होऊन) दडी मारून बसतात. एवढंच कशाला, दुकानातसुद्धा थंडीचे कपडे जाऊन सगळा नवीन माल मिळायला लागतो. जपानी लोकांच्या शिस्तीचा एक मजेदार नमुना इथेपण आहे : साधारण जानेवारी संपताना, वसंत ऋतूचे आगमन कधी होणार, चेरी ब्लॉसम कुठे कधी फुलणार ह्याचे अंदाज यायला सुरुवात होते. ते अगदी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत येत असतात. अगदी कुठल्या भागात कधी पूर्ण फुललेला साकुरा बघायला मिळेल हे सांगणारे खूप स्रोत आहेत. जपानी लोक ह्यावर एकमेकांशी खूप चर्चाही करतात आणि दरवर्षी न चुकता तो साकुरा बघायला गर्दी करून जातातसुद्धा. आणखी एक गमतीशीर गोष्ट गवर्नमेंट अधिकृतपणे जाहीर करतं, ‘चेरी ब्लॉसमचा ऋतू सुरू झाला’ अशी. त्यासाठी एका विशिष्ट बागेतील झाडांना पहिला बहर आला की ही जाहीर सूचना येते की चेरी ब्लॉसम सुरू झाला.
थंडीचे कपडे पळवून मोकळा श्वास घेणारी, निसर्गाने केलेल्या रंग आणि सुगंधाच्या उधळणीचा आनंद घेणारी माणसं ही वेगळीच पर्वणी असते. ही सुंदर सुंदर फुलं बघायला हजारोंनी गर्दी करणारे परदेशी पर्यटक तर असतातच; पण दरवर्षी तितक्याच उत्साहाने जमणारी जपानी माणसं मनात एक कुतूहल जागं करून जातात आणि जाणीवही करून देतात की आपल्या इथे असणाऱ्या सौंदर्याचा आपण आदर ठेवला तरच बाहेरून येणाऱ्यांना त्याचं कौतुक वाटतं. इथला वसंत मला थेट माझ्या मनात जपलेल्या आपल्या गुलमोहर आणि पळसापाशी घेऊन जातो. रानात वणवा पेटलाय असं वाटावं असा फुलणारा पळस आणि वेगवेगळ्या रंगांत रंगून निघणारा गुलमोहर वसंत ऋतूचा तितकाच आल्हाददायक आविष्कार आहेत.
Narcissus
इथे जाणवणारी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ह्या नैसर्गिक आविष्काराला लोकांच्यासाठी, पर्यटन उद्योगाचा विकास करण्यासाठी इतकं सुंदर प्रकारे वापरलंय की आपण निःशब्द होतो. अशी एकही गल्ली नसते जिथे काहीच छान फूल उमललेले नाही. ही सौंदर्यदृष्टी सार्वजनिक जागांसाठी असणं, त्याचा तसा विकास करणं आणि नंतर सांभाळणं हे शिवधनुष्य इथल्या प्रशासनाने फार सहज पेललं आहे. अर्थात, एकही फूल न ओरबाडणाऱ्या, लांबून बघून हसणाऱ्या, फोटो काढून खूश होणाऱ्या जपानी माणसांचा ह्यात खूप मोठा हात आहे. अर्थात फक्त प्रशासन नाही; तर इथे प्रत्येक घरात असेल तेवढ्या जागेत जी जमतील ती झाडे सगळेजण लावतात आणि जोपासतात. आमच्या गल्लीत एक अगदी सर्वसाधारण वाटणारं घर आहे. एरवी ते घर लक्षतही येत नाही; पण वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर, त्यांच्या घराच्या दारावर सोडलेला एक वेल इतका छान फुलतो, की प्रत्येक पानागणिक पिवळं, नाजूकसं फूल असतं. ह्या दिवसांत त्या वेलाला निदान २००-३०० छोटी छोटी फुलं येतात. ह्या दिवसांत ते घर आजूबाजूच्या सगळ्या घरांत उठून दिसतं. निसर्ग ह्या ऋतूमध्ये जपानला सौंदर्य अगदी भरभरून देतो. माणसाची सौंदर्याने भरलेली ही ओंजळ अशीच भरलेली राहो आणि जपानमध्ये ह्या दिवसांत येणाऱ्या सर्व लोकांना ह्याची अनुभूती मिळो ही सदिच्छा.
सध्या इथेच थांबते. उन्हाळा आणि शरद ऋतूबद्दल पुढच्या वेळी सांगेन.









