मन वढाय वढाय: भाग ५ वा

आत्महत्या रोखू या, मिळून सारे प्रयत्न करू या! 

   आत्महत्या म्हणजे स्वतःची हत्या! या विषयावर लिहिताना नेहमीच भावनिक व्हायला होतं. काही वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध अभिनेता रोबिन्स विल्यम्सने आत्महत्या करून स्वतःचे आयुष्य संपवले ही बातमी ऐकली तेव्हाही असेच वाटले होते. प्रचंड यशस्वी, अतिश्रीमंत, अभिनयाची दैवी देणगी मिळालेला अभिनेता ज्याने त्याच्या अनेक चित्रपटांमधून आनंदी जगण्याचा संदेश दिला. त्याचा अंत नैराश्य म्हणजे डिप्रेशन या मानसिक आजाराने आणि आत्महत्येने व्हावा… किती दुर्दैव!!

 रोबिन्स विल्यम्स

गेल्या एक-दोन दशकांपासून आत्महत्या करण्याचे प्रमाण झपाट्याने  वाढत आहे; इतके की आत्महत्या ही एक दबक्या पावलाने आलेली महामारी झाली आहे म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांमध्ये आत्महत्यांच्या घटना घडतात.

आम्ही – म्हणजे मनोविकारतज्ज्ञ – आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची मानसिक तपासणी करताना आत्महत्येचे विचार, भूतकाळात केलेला आत्महत्येचा प्रयत्न किंवा त्या अनुषंगाने सध्या काही विचार येतात का अशी सविस्तर चौकशी न चुकता करतो.

गेली अनेक दशके शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी आपण त्रस्त आहोत; त्यामध्ये काही वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाणदेखील झपाट्याने वाढत आहे. आपल्या जवळच्या किंवा लांबच्या कोणत्याही व्यक्तीच्या आत्महत्येची बातमी कानावर आली की मन सुन्न होऊन जातं. मनात एकच प्रश्न येतो – त्याला / तिला आत्महत्या करण्याशिवाय इतर पर्याय नव्हता का? 

आपल्या आयुष्यातील अपयश, समस्या , अपेक्षाभंग, संकटे , दुर्धर आजार , कर्जबाजारीपणा, नातेसंबंधांतील ताणतणाव यांपैकी कोणत्याही समस्येवर आत्महत्या हे उत्तर कसं असू शकतं?

आपल्या कानावर जेव्हा एखादी आत्महत्येची बातमी येते त्या वेळी ती व्यक्ती, त्या व्यक्तीचे कुटुंबीय हे आपल्या किती परिचयातील आहेत  – जवळचे लांबचे – त्या प्रमाणे आपण काही काळ हळहळतो, चर्चा करतो आणि काही दिवसांनी आपापल्या व्यापांमध्ये गुंग होतो. रोजच्या रहाटगाडग्यात आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचा आपल्याला पूर्ण विसर पडतो. 

पण इतका  वरवर विचार करण्याइतका हा साधासुधा विषय नाही. आत्महत्या ही अतिशय गंभीर समस्या आहे; मानवी समाजाला लागलेली वाळवीच म्हणा ना!

आत्महत्या प्रतिबंध या विषयावर प्रबोधन करण्यासाठी आधी मानसिक आरोग्य, मानसिक आजार आणि त्यांवरील उपचारांविषयी जनजागृती होणे फार महत्त्वाचे आहे. सध्या या विषयावर नुसती चर्चा सुरू आहे; परंतु आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला काही मानसिक त्रास आहे,  त्यासाठी आपण मनोविकारतज्ज्ञांकडे   जाऊन व्यवस्थित औषधोपचार, समुपदेशन घ्यायला पाहिजे हेच मान्य केले जात नाही, स्वीकारले जात नाही – आणि तिथेच आपण चुकतो.

मानसिक आजारांभोवती जे अज्ञानाचं वेटोळं आहे तसाच  गैरसमजांचा वेढा आत्महत्या या विषयाभोवती आहे.

एकतर आपल्या घरातील कोणाच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील हेच आपल्याला मान्य नसतं आणि समजा त्या व्यक्तीने ते विचार आपल्याला धाडस करून बोलून दाखवले तरी ते फार गांभीर्याने घेतले जात नाहीत; किंवा तो विषय हसण्यावारी नेला जातो; पण यामुळे त्या व्यक्तीच्या मनाचा अधिकच कोंडमारा होतो, त्या व्यक्तीला अधिकच एकटं पडल्यासारखं वाटतं. या सगळ्यामुळे त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य वेगाने ढासळत जातं हे अनेकांच्या लक्षात येत नाही.

जगामध्ये दरवर्षी जवळपास ८ लाख लोक आत्महत्या करतात आणि त्यापेक्षा जवळपास १० पटींनी अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं; तर दर ४० सेकंदांना एक व्यक्ती आत्महत्या करून मृत्यू पावते; तर दर ३ सेकंदांना एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते. भारतामध्ये दरवर्षी साधारणपणे १ लाख लोक आत्महत्या करून स्वतःचं आयुष्य संपवतात. जेव्हा आत्महत्येची एक घटना घडते तेव्हा त्या घटनेचा परिणाम २० संवेदनशील व्यक्तींवर होतो. वय वर्षे १५ ते ३५ या वयोगटामध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक दिसून येतं.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे तर आत्महत्येने मृत्यू पावणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त दिसून येतं. महिलांनी अवलंबलेल्या पद्धती या पुरुषांनी अवलंबलेल्या पद्धतींपेक्षा जरा मवाळ असतात त्यामुळे मृत्यूचं प्रमाण महिलांमध्ये तुलनेने कमी दिसून येतं.

आपल्या समाजात मुलगा – पुरुष – हा दणकट , बळकट,निधडा असतो असे त्याच्या मनावर लहानपणापासून बिंबवलेले असते. त्यांना रडणं तर लांबच पण भावनावश होण्याचीसुद्धा परवानगी नसते. त्यामुळे नैराश्य, नातेसंबंधांतील ताणतणाव आर्थिक, व्यावसायिक अपयश या किंवा इतर समस्यांमुळे पुरुषांचं मानसिक स्वास्थ्य बिघडत, ढासळत जातं. मानसिक त्रास वेळेत व्यक्त न करता आल्यामुळे त्यांना योग्य मदत योग्य वेळी मिळत नाही.

कधीकधी व्यसनाधीनता, अनैतिक संबंध, चुकीची संगत या अनिष्ट गोष्टी होतात  आणि त्यामुळे प्रश्न आणखीनच बिकट होत जातो.

महिलांच्या बाबतीत काय होतं – बऱ्याच वेळा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांना होणारा मानसिक, भावनिक त्रास दिसून येतो; शिवाय बायकांना रडण्याची, मनातलं भडाभडा बोलून टाकण्याची मोकळीक असते; त्यामुळे त्यांचं मन मोकळं होतं आणि काही त्रास असल्यास त्यांना पट्कन वैद्यकीय मदतही मिळते. तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायकांकडे असणारी support system, मैत्रिणी, महिला मंडळ, भजनी मंडळ, बचत गट, भिशी गट इत्यादी… यामध्ये त्या आपल्या मनाला होत असणारा त्रास बोलून दाखवू शकतात. अर्थात यालादेखील अपवाद असतात.

बालपण हे आत्महत्येपासून फार सुरक्षित असतं; परंतु पौगंडावस्था ही फार धोक्याची असते. त्याच प्रमाणे वृद्ध लोकांमध्येसुद्धा आत्महत्यांचं  प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. 

मनोविकारतज्ज्ञ, मानसिक समुपदेशक या सर्वांसाठी आत्महत्या हा एक जटिल विषय आहे. याचे कारण म्हणजे आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे त्यामागचे कारण , समस्या, त्यांची सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती सगळंच वेगवेगळं असतं. आमच्या प्रत्येक थेअरीला अपवाद असतात परंतु त्यातल्या त्यात काही समान धागे शोधता येतात. प्रामुख्याने आढळणारी काही  कारणे खालीलप्रमाणे :

तीव्र नैराश्य 

एड्स, कर्करोगासारखे असाध्य रोग 

विकोपाला गेलेले नातेसंबंधांतील ताणतणाव 

एकटेपण 

आजूबाजूच्या लोकांकडून होणारे मानसिक खच्चीकरण 

दीर्घकाळापासून होणारा शारीरिक/ मानसिक /लैंगिक छळ 

आर्थिक फसवणूक, कर्जबाजारीपणा 

परीक्षेतील अपयश 

व्यसनाधीनता 

१० सोशल मिडीयावर होणारं trolling

आणखीही बरीच कारणे आहेत; खरं म्हणजे मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आत्महत्येमागचे कारण वेगळे असते.

वरील यादीमध्ये नमूद केलेल्या समस्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आत्महत्येचा धोका असतोच असे नाही; परंतु अशी एखादी कठीण समस्या किंवा दीर्घकाळ चालणारे संकट जर आपल्या जवळच्या, ओळखीच्या व्यक्तीच्या आयुष्यात असेल तर मात्र आपण त्या व्यक्तीला आत्महत्येचा धोका आहे हे नीट लक्षात ठेवून त्या व्यक्तीचे मनोधैर्य वाढवण्यासाठी काय करू शकतो याचा जाणीवपूर्वक विचार आणि प्रयत्न केला पाहिजे.

पण मग हा प्रश्न उपस्थित होतो, की मुळात समोरच्या व्यक्तीच्या मनात असे काही आत्महत्येसंबंधी विचार चालू असतील हे ओळखायचे कसे?

सर्वसामान्य माणसाला ओळखता येतील अशी लक्षणे मी खाली नमूद करते;  तेवढी जरी आपण लक्षात  ठेवलीत तरी बरीच मदत होईल. 

सतत समस्यांचा विचार करणे / चर्चा करणे.

मूळ स्वभावापेक्षा विचित्र किंवा विरुद्ध वागणे.

अनपेक्षित भावनिक उद्रेग होणे.

निद्रानाश किंवा अतिझोप 

भूक मारणे किंवा अति आणि सतत खाणे 

बेदरकार वागणे (मूळ स्वभावाच्या विरुद्ध) 

मित्रांना टाळणे; सामाजिक कार्यक्रमात सहभागी न होणे 

दारू किंवा इतर अमली पदार्थांचे सेवन करणे

मी मेलो तरी कोणाला काही फरक पडत नाही; माझ्या असण्या-नसण्याने काही फरक पडत नाही अशी वक्तव्ये करणे

१० असुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे

११ आत्महत्येविषयी बोलणे / धमक्या देणे /आत्महत्येची चिठ्ठी लिहिणे/आत्महत्येची तयारी करणे इ. 

ही काही लक्षणे इथे नमूद केली आहेत. यांपैकी काही लक्षणे आपल्या निदर्शनास आली तर मग पुढे काय? आपण काही धड्कन जाऊन त्या व्यक्तीला विचारू शकत नाही,

 ‘की काय रे, / काय गं, तुझ्या मनात आत्महत्येचे विचार तर नाही येत नं ?’ 

मग काय करायचे ?


आत्महत्येचा धोका असणाऱ्या व्यक्तीस आपण खाली सांगितल्याप्रमाणे मदत करू शकतो :
 
१) धोक्याचे इशारे/ लक्षणे लक्षात घेणे

२) अशा व्यक्तीला बोलते करावे; तिचे संपूर्ण बोलणे आपण शांतपणे मध्ये काहीही लुडबुड न करता ऐकणे
३) अशा व्यक्तीबद्दल मनात कोणतेही गैरसमज / दूषित पूर्वग्रह ठेवू नये.
४) अशा व्यक्तीस सकारात्मक भावनिक आधार आणि दिलासा द्यावा 
५) मला तुझी काळजी वाटते / तुला मदत करण्याची माझी इच्छा आहे अशी जाणीव करून द्यावी.
६) सध्याच्या संकटामधून बाहेर पडण्यासाठी इतर पर्यायसुद्धा असतात असा आशावादी दृष्टिकोन द्यावा.
७) अशा व्यक्तीच्या सतत संपर्कामध्ये राहावे.
८) अशा व्यक्तीबद्दल खूप काळजी वाटली तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा  मानसिकरीत्या खचलेल्या व्यक्तीला आधार देणं आणि तिचं म्हणणं शांतपणे लक्षपूर्वक ऐकणे या दोन सोप्या आणि बिनखर्चीक गोष्टी आपल्या जवळच्या /ओळखीच्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतात.
आपलं ध्येय हे त्या व्यक्तीच्या मनातलं ये दुनिया ये मेहफिल मेरे काम की नहींहे गाणं पुसून टाकून झिंदगी  गुलझार है !असं गुणगुणायला लावणे हे आहे.

बरं, वाचकहो हा विषय इथेच संपत नाही बरं का!

ज्या दुर्दैवी लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला आत्महत्येमुळे गमावलं त्यांचं काय ?

खरं म्हणजे मनाच्या जखमा भरण्यामध्ये, मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत करण्यामध्ये कुटुंबाची भूमिका, आधार फार महत्त्वाचा असतो; परंतु  कौटुंबिक कलह आणि बिघडलेले, दुरावलेले नातेसंबंध यांचा घरातील संवेदनशील व्यक्तीच्या मनावर फार खोलवर दुष्परिणाम होतो.

तरीही जेव्हा कधी आपल्या जवळपास आत्महत्येची घटना घडते, तो एक अनैसर्गिक पण अपघाती मृत्यू असतो हे आपण – समाजाने – लक्षात ठेवले पाहिजे.

अशा वेळी आत्महत्येमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीबद्दल आणि त्याच्या कुटुंबीयांबद्दल मनात सहानुभूती असावी .

अशा वेळी आपण कसे वागायला हवे त्याची काही मार्गदर्शक तत्त्वे  खालील प्रमाणे 

आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी जवळच्या नातेवाइकांवर प्रश्नांची सरबत्ती करू नये.

उगाच मोठमोठ्याने रडून छाती पिटून शोक करू नये. 

आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न झाला असेल म्हणजे मृत्यू झाला नसेल तर त्याचा उगाच गाजावाजा  करू नये. 

खातरीलायक पुरावे नसताना घरातील  कोणालाही घाईघाईने  आत्महत्येस दोषी ठरवू नये. 

ज्या घरात आत्महत्येची घटना घडली आहे त्यांच्यावर फार मोठा मानसिक भावनिक आघात झालेला असतो. त्यांना त्या वेळी धीर द्यावा 

आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांवर : उदा. नवरा, बायको, मुले, आई-वडील यांच्यावर विनाकारण ठपका ठेवू नये; तसेच त्यांना वेगळी वागणूक देऊ नये. 

आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या आणि  त्याच्या कुटुंबीयांच्या बाबतीत पायरी सोडून किंवा चुकीची चर्चा करू नये. 

आत्महत्या केलेल्या व्यक्तीशी भावनिकरित्या जवळची असणारी व्यक्ती मनाने खचलेली असते तिला आधार द्यावा. 

आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल, की आत्महत्या हा विषय किती गहन आहे; तरी आणखी बरेच मुद्दे राहिले आहेत; उदा : आत्महत्येविषयक कायदे, आत्महत्येचा प्रयत्न करणारे परंतु मृत्यू नको असणारे काही जण; त्यांच्या मानसिक स्थितीचा आढावा इत्यादी… ते पुन्हा कधीतरी.

तूर्तास इतकेच लक्षात ठेवा

परिस्थिती कितीही बिकट असू दे; काळोख कितीही गडद असू दे; नुकसान कितीही भयंकर असू दे; पण त्यावर आत्महत्या हा पर्याय नसतो.  ऋजुता उत्पात
म्हणजे स्वतःची हत्या! या विषयावर लिहिताना नेहमीच भावनिक व्हायला होतं. काही वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध अभिनेता रोबिन्स विल्यम्सने आत्महत्या करून स्वतःचे आयुष्य संपवले ही बातमी ऐकली तेव्हाही असेच वाटले होते. प्रचंड यशस्वी, अतिश्रीमंत, अभिनयाची दैवी देणगी मिळालेला अभिनेता ज्याने त्याच्या अनेक चित्रपटांमधून आनंदी जगण्याचा संदेश दिला. त्याचा अंत नैराश्य म्हणजे डिप्रेशन या मानसिक आजाराने आणि आत्महत्येने व्हावा… किती दुर्दैव!!

Author

One thought on “मन वढाय वढाय: भाग ५ वा

Leave a Reply