सातारा- वाई जवळील, कृष्णेकाठी वसलेल्या लिंब गावावर, ‘लिंब आणि परिसर : सांस्कृतिक परिचय ‘ हे अनिता आगाशे यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
लिंब या गावाशी विनोबांचा व भावे कुटुंबाचा संबंध राहिला आहे. विनोबांचे पणजोबा कृष्णराव भावे हे, लिंब येथील कोटेश्वराचा मुखवटा, दरवर्षी कार्तिक शुद्ध अष्टमीला वाई येथील घरी आणून तीन दिवस मोठा उत्सव करीत. पुढे विनोबांचे आजोबा शंभुराव भावे यानी १८७० च्या सुमारास वाई येथे कोटेश्वराचे मंदिर बांधले.
२१ जानेवारी १९१७ रोजी विनोबा म. गांधींच्या आश्रमातून स्वास्थ,स्वाध्याय व सेवा हा त्रिसुत्री कार्यक्रम घेऊन आपल्या मूळ गावी वाईला वर्षभरासाठी आले असता, लिंब येथील घाटावर प्रवचन केल्याची नोंद त्यानी १ मार्च १९१७ च्या पत्रात केली आहे. अशा प्रकारे लिंब येथील कोटेश्वर व वाई येथील विनोबांचे कोटेश्वर मंदिर यांचा निकटचा संबंध आहे.
अनिता आगाशे यांनी दहा वर्षांच्या पुरातत्त्वीय अभ्यासातून लिंब गावातील सर्वत्र विखुरलेल्या ऐतिहासिक वास्तू, मूर्ती, शिलालेख, नाणी तसेच उत्खलनातून मिळवलेल्या पुरावशेषांची तपशीलवार मांडणी करून हे पुस्तक लिहिले आहे.
लिंब म्हणजे केवळ कोटेश्वर मंदिर आणि बारा मोटेची विहीर; एवढीच ओळख असलेल्या या लिंब गावाला, अनिता आगाशे यांनी पुस्तक लिहून नवी ओळख प्राप्त करून दिली आहे. पुस्तक वाचल्यावर आता पर्यटक लिंब-गावाकडे नव्या दृष्टीने पाहतील व त्यांनाही वाटेल की अशी ‘अनिता आगाशे’ महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला मिळावी!
अनिता आगाशे या मुळात चित्रकार आहेत. काही काळ त्यांनी बारामती व सावर्डे (चिपळूण) येथे चित्रकला महाविद्यालयांमध्ये अध्यापन केले आहे. पुढे डेक्कन कॉलेज पुणे येथून, लिंब उत्खलनात मिळालेल्या खापरांचा अभ्यास या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पुरातत्वशास्त्रात एम.फिल. पदवी संपादन केली. सध्या त्या, महाबळेश्वर ते कराड येथील कृष्णेकाठावरील गावांचे आर्किऑलॉजिकल इन्वेस्टीगेशन या विषयावर Phd करीत आहेत.
‘लिंब आणि परिसर: सांस्कृतिक परिचय’
-अनिता आगाशे
पृष्ठ १०६ + आर्ट पेपरवर ८ पृष्ठे छायाचित्रे
किंमत १५० रु.
मोबा.८६०५५१३४८०
