एक संध्याकाळ : चेन्नईतील महाराष्ट्र मंडळात

तमिळनाडूमधील प्रवासाबद्दल बरेच लिहून झाले पण एक घटना मात्र लिहायची राहूनच गेली होती. इ-अंतर्नादच्या या मे महिन्याच्या अंकासाठी ती लिहावी असे वाटले. सुदैवाने संपादक अनिल जोशी यांनादेखील ती कल्पना आवडली. 

  एका शनिवारी संध्याकाळी चेन्नई येथील प्रसिद्ध महाराष्ट्र मंडळात माझी मुलाखत ठेवलेली होती. ‘बदलता भारत’ हा विषय होता. अनिल जोशी स्वतःच मुलाखत घेणार होते आणि त्यांनी पूर्वीच प्रश्न काढले होते, त्यावर आमची चर्चाही झाली होती. त्यामुळे तसा मी निवांत होतो. 

   या महाराष्ट्र मंडळाची स्थापना १९२६ साली झाली. ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे या संस्थेचे ब्रीद आहे. इतर शहरांतील महाराष्ट्र मंडळांप्रमाणेच इथेही गुढी पाडवा, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी असे सण इथे साजरे केले जातात. धार्मिक उत्सव हे आजही लोकांना एकत्र आणण्याचे सर्वांत महत्त्वाचे साधन आहे; विशेषतः परप्रांतात. त्याशिवाय अनेक बारीकसारीक कार्यक्रम होतच असतात. शहराच्या वेपेरी या मध्यवर्ती भागात त्यांच्या स्वतःच्या दोन इमारती आहेत. पार्किंगची उत्तम सोय आहे. एका इमारतीत प्रत्येकी अडीचशे आसनक्षमतेची दोन सभागृहे आहेत; तर दुसऱ्या इमारतीत वीस वातानुकूलित खोल्या असलेले हॉस्टेल आहे. सभागृह सांस्कृतिक कार्यक्रमांना भाड्याने दिले जाते. हॉस्टेलमध्ये दिवसाचे हजार ते दीड हजार रुपये भरून खोल्या मिळू शकतात. हॉस्टेलमध्ये तळमजल्यावर भोजनगृहदेखील आहे. चेन्नईला येणाऱ्या प्रवाशांसाठी ही उत्तम व्यवस्था आहे. महाराष्ट्र शासनातर्फे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एकदा संस्थेला काही लाख रुपयांची देणगी दिली गेली होती; पण तो एक अपवाद आहे. एरवी संस्थेला स्वतःच खर्च भागवावा लागतो. एका कुटुंबासाठी वर्षाला एक हजार रुपये वर्गणी आहे. साधारण अडीचशे कुटुंबे सदस्य आहेत असे मी ऐकले. अर्थात चेन्नईमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणतात तसे तात्पुरते वास्तव्य करणारेही अनेक असतात. ती मंडळी एखाद-दुसरे वर्ष सदस्य असतात. पण इथे काही पिढ्या वास्तव्य असलेले आशुतोष आपटेंसारखे काही मूठभर लोक आहेत आणि अशी मंडळी हाच संस्थेचा खरा आधारस्तंभ आहे.

   कार्यक्रमाच्या सुरुवातीला संक्रांतीचे हळदीकुंकू ठेवले होते. हे आधीच ठरलेले असावे कारण बहुतेक जणी बऱ्यापैकी नटूनथटून आल्या होत्या. नंतर सगळ्यांना तिळगूळ वाटला गेला. आधुनिक असूनही परप्रांतातील मंडळी परंपरा जपतात; किंबहुना महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसांपेक्षा परप्रांतातील मराठी माणसे अधिक उत्साहाने परंपरा जपतात हे नक्की. परदेशातील मराठी बांधवांच्या बाबतीतही हे खरे आहे. अंतरामुळे प्रेम वाढत असावे. 

   काही तरुण जोडपीही कार्यक्रमाला आली होती. काही जण नुकतेच चेन्नईमधे नोकरीसाठी आले होते आणि शहरातील इतर मराठी माणसे कशी आहेत हे जाणून घेण्याचे कुतूहल त्यामागे असावे. मातृभाषेचे आकर्षण हा घटक असतोच; कारण सगळे जण आवर्जून मराठी बोलत होते. हल्लीच्या प्रथेप्रमाणे व्हॉट्सॲपवरच सगळी आमंत्रणे गेली होती. तरीही सत्तर-ऐंशी उपस्थिती होती. माझ्या मते ती चांगलीच होती. इथे आलेल्या अनेकांना तमिळ भाषा अवगत नव्हती हेही माझ्या लक्षात आले. तशीही ती भाषा शिकायला अवघड आहे. 

   लहानपणी मी मुंबईत माटुंगा येथे राहत असताना आमच्या फ्लॅटला लागूनच असलेल्या फ्लॅटमध्ये  एक तमिळ कुटुंब राहत होते. त्यांच्याकडून मी तमिळ भाषा शिकायचा बराच प्रयत्न केला होता. त्यांच्या मुलीला शाळेत मराठी हा एक विषय होता. मी तिला रोज एक मराठी शब्द शिकवायचा आणि तिने मला एक तमिळ शब्द शिकवायचा असे आमचे ठरले होते. इंगे वा (इकडे ये), पिनाडी पो (मागे जा), अम्मा कुपडा (आई बोलवतेय), पाल कुडं (दूध दे), कुंचम कुंचम (थोडे थोडे), इल्ले (नाही), वांडा (नको), वणक्कम (नमस्ते) असे काही फुटकळ शब्द मी शिकलो होतो पण त्यापलीकडे अधिक प्रगती होऊ शकली नव्हती. 

   अर्थात आज इथे चेन्नईमध्ये राहणाऱ्या तरुण मराठी मंडळींच्या बाबतीत तमिळ शिकण्याची काही गरजच नव्हती; कारण ते जिथे नोकरी करत होते त्या त्यांच्या कॉर्पोरेट जगात फक्त इंग्रजीचाच वापर होत होता!

    मुलाखत साधारण तासभर चालली आणि नंतर अर्धा-एक तास श्रोत्यांचे प्रश्न आणि उत्तरे यांत गेला. बोलताना दक्षता आयोगाचे माजी प्रमुख एन. विठ्ठल यांच्याबद्दल मी आवर्जून बोललो. वीस-बावीस  वर्षांपूर्वी मी त्यांची चेन्नईमधे विस्तृत मुलाखत घेतली होती. ‘बदलता भारत’ या माझ्या त्या वेळी लिहिलेल्या पुस्तकातील ‘एन. विठ्ठल : भ्रष्टाचाराशी लढताना’ हे संपूर्ण प्रकरण त्या मुलाखतीवरच आधारित आहे. त्या वेळचा एक प्रसंग मी यावेळी भाषणात सांगितला. जवळजवळ तीन तास चाललेली आमची मुलाखत संपली आणि मी उठून दाराकडे जाता जाता म्हटले, “हे सगळं अंतर्नाद या मराठी मासिकात येणार असल्याने तुम्हांला ते वाचता येणार नाही याचं वाईट वाटतं.” 

   “असं का म्हणता? छापून झाला की अंक पाठवा माझ्याकडे. मी प्रयत्न करीन वाचायचा; अहो मीपण मूळचा महाराष्ट्रातलाचा आहे,” ते हसत हसत सांगू लागले. “माझं मूळ आडनाव राव. माझ्या बायकोचं होणावळकर. आम्ही मूळचे देशस्थ ब्राह्मण. बऱ्याच पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज महाराष्ट्रातून तमिळनाडूत आले. आज तसं मराठी येत नाही मला, पण माझी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो,” असे म्हणत मला पुन्हा कोचावर बसवून त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. नंतर त्यांनी पुरवलेली माहिती मला खूप रोचक वाटली. 

   एकोजी राजे यांनी १६७५ मध्ये तंजावर येथे स्वतःची गादी स्थापन केली आणि १८५५ साली ब्रिटिशांनी त्यांचे राज्य ताब्यात घेतले. दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणावर मराठी भाषक तमिळनाडूत स्थायिक झाले. तमिळ जनतेनेही त्यांचा मनापासून स्वीकार केला. १६७५ पासूनच्या साडेतीनशे वर्षांत ‘त्यांनी महाराष्ट्रात परत जावे,’ असे म्हणणारी कुठलीही ‘तमिळ सेना’ निर्माण झालेली नाही. कर्नाटकी संगीत टिकवण्यासाठी तंजावर घराण्याने मोठे योगदान दिले आहे. एक विशेष म्हणजे ३ ऑक्टोबर १६७७ रोजी शिवाजी महाराजांनी चेन्नईच्या थंबू चेट्टी रस्त्यावरील कालिकाम्बिका देवळाला भेट दिल्याची कागदोपत्री नोंद आहे. अनेक मूळ मराठी बांधवांनी तमिळनाडूत मानाचे स्थान प्राप्त केले आहे –  विशेषतः शासकीय सेवेत. एक वेळ अशी होती की बहुसंख्य उच्च शासकीय अधिकारी महाराष्ट्रातून इथे आलेल्या समाजातीलच असायचे. तमिळ सिनेमातील सर्वश्रेष्ठ कलाकार मानला गेलेला अभिनेता शिवाजी गणेशन हा मूळचा मराठीच. त्याने वठवलेली शिवाजीची भूमिका पाहून खूष झालेल्या पेरियार यांनी त्याला सर्वप्रथम शिवाजी गणेशन म्हणायला सुरुवात केली. तमिळ सिनेमाचा आजचा सुपरस्टार रजनीकांत हादेखील मूळचा कोल्हापूरचा. त्याचे खरे नाव ‘शिवाजी गायकवाड.’ शेवटी मी निघालो तेव्हा विठ्ठल यांनी मला त्यांनी लिहिलेले ‘Maharashtrians in Tamil Nadu’ हे पुस्तक त्यांच्या सहीसह भेट दिले. ते वाचल्यावर तमिळनाडूमधील मराठी बांधवांविषयी मला खूप अभिमान वाटला होता. 

   आपण परप्रांतीयांवर खूपदा टीका करतो, आपल्या नोकर्‍या ते हिरावून घेतात म्हणून आपल्याला राग येतो; पण जेवढे परप्रांतीय महाराष्ट्रात राहतात त्याच्यापेक्षा अधिक मराठी माणसे परप्रांतांत राहतात हे या पुस्तकात विठ्ठल यांनी सरकारी आकडेवारी देऊन दाखवून दिले आहे. नोकरीसाठी एके काळी मोठ्या प्रमाणावर तमिळ तरुण मुंबईत येत. त्यांतले बरेच जण टायपिस्ट-स्टेनोग्राफर असत. मद्रास-दादर एक्सप्रेसला बाळासाहेब ठाकरे ‘स्टेनोग्राफर एक्सप्रेस’ म्हणायचे! तमिळ लोकांचा उल्लेखही कधीकधी ‘यंडू-गुंडू’ किंवा ‘लुंगीवाले’ असा उपमर्दकारक केला जायचा. आज मात्र तमिळनाडूचा चांगला विकास होत असल्याने तमिळ तरुणांना कनिष्ठ स्तरावरील नोकरीसाठी बाहेर कुठे जायची आवश्यकता उरलेली नाही. उच्चपदावरील नोकर्‍यांसाठी मात्र कुठलेही तरुण जगभरात कुठेही जाणार हे स्वाभाविक आहे. 

   भाषण आणि प्रश्नोत्तरे संपल्यानंतर तिथेच जेवणही ठेवले होते. त्या वेळी काही जणांशी गप्पा मारायची संधी मिळाली. त्यांच्यातील एक तर चक्क आयपीएस अधिकारी होते. तेही कमिशनरच्या हुद्यावरचे. मुळचे नागपूरचे पण त्यांनी तमिळनाडू कॅडर मागून घेतले होते. अर्थात इथे केवळ एक मराठी माणूस या नात्याने ते आले होते. ते तसेच त्यांचा ड्रायव्हरदेखील साध्या कपड्यांतच होता. मोटारीवरचे हुद्दा दर्शवणारे स्टारही झाकलेले होते. कसलाच बडेजाव नाही, उगाच मिरवणे नाही. 

   दुसरे एक गृहस्थ मूळ मंचरचे होते. गेली पन्नास-एक वर्षे चेन्नईत राहत आहेत. फळांचे मोठे व्यापारी आहेत. त्यांच्या तोंडी ‘अय्या’ शब्द दोन-तीनदा ऐकला तेव्हा नवल वाटले होते; आपल्याकडे मुलींच्या तोंडी तो शब्द असतो! पण नंतर कळले की तमिळमधे ‘अय्या’ हा शब्द ‘साहेब’ या अर्थाने वापरला जातो! ते सांगत होते, “माझा मार्केटमधे खूप लोकांशी सतत संबंध येत असतो. इथे आपल्याप्रमाणे नाव आणि आडनाव असा प्रकार नाही. आडनाव हे खूपदा गावाचे किंवा पंथाचे नाव असते. पहिले नाव आणि इनिशियल्स एवढेच असते; पण पहिल्या नावाने हाक मारताना मला खूप अवघडल्यासारखे वाटते म्हणून मी सर्वांना ‘अय्या’च म्हणतो.” दैनंदिन अडचणींतून मार्ग कसा काढायचा ते व्यापाऱ्यांकडून शिकावे! 

   बघता बघता आमचे दहा दिवस संपत आले. शेवटच्या दिवशी अगदी आवर्जून अण्णांचा म्हणजे आपटे यांचा कारखाना बघायला गेलो. इतके दिवस बाकी सगळे करताना ते राहूनच गेले होते. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या या कंपनीची काही खास रबर उत्पादने आहेत, ज्यांना फारशी स्पर्धा नाही. कारखाना बघताना अण्णा सांगत होते, “आमच्याकडचे सर्व दहा-बारा कामगार हे ओरिसाचे आहेत. एकही स्थानिक कामगार नाही. स्थानिक कामगारांच्या कटकटी फार. हे परप्रांतातले कामगार जास्त चांगलं काम करतात. त्यांच्या मागण्याही कमी असतात. मी इथेच त्यांची राहण्याचीदेखील सोय केलेली आहे.” हे ऐकताना मला एकदम माझ्या मुंबईतील प्रिंटिंग प्रेसची आठवण झाली. आमच्याकडे तीन तमिळ कामगार होते आणि इतर सर्व स्थानिक मराठी कामगारांपेक्षा ते अधिक चांगले काम करत. कधी उशिरा थांबावे लागले तरी कुरबुर न करता थांबत; वरचेवर दांडी मारत नसत. मुंबईत तमिळ कामगार अधिक चांगले काम करत होते, पण तेच तमिळ कामगार चेन्नईमध्ये मात्र कामचुकार होते! स्थानिक कामगारांपेक्षा परप्रांतातून आलेले कामगार अधिक कष्टपूर्वक काम करतात हेच खरे असावे! 

   इथे व्यवसाय करताना मराठी असल्याचा काही त्रास होतो का असे विचारले असता अण्णांचे उत्तर ‘अजिबात नाही’ असे होते. “अगदी शिवसेना ऐन भरात असतानाही आम्हांला आमच्या मराठीपणाचा कधीच त्रास झालेला नाही. एकतर मी चांगलं तमिळ बोलतो. माझे पार्टनर तमिळच आहेत; शिवाय धंदा करताना भाषेचा मुद्दा महत्त्वाचा नसतो. तुम्ही योग्य किमतीत चांगला माल देता की नाही हेच बघितलं जातं.” मी इथे अनेक मराठी लोकांना भेटलो पण त्यांच्यापैकी एकालाही ते मराठी असल्याचा चेन्नईमधे काही त्रास झाला नव्हता. 

   आपले मराठी भाषेवर प्रेम जरूर असावे पण ते प्रेम करताना इतर कुठल्या भाषेचा किंवा ती भाषा बोलणाऱ्या लोकांचा द्वेष करू नये कारण सगळ्यांनाच त्यांची-त्यांची भाषा प्रिय असते. तमिळनाडूतील मराठी भाषकांचा अनुभव या बाबतीत चांगला होता. 

Author

2 thoughts on “एक संध्याकाळ : चेन्नईतील महाराष्ट्र मंडळात

Leave a Reply