संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला : रघुनाथ पंडित भाग ३

नळराजाचं कौतुक करताना रघुनाथ पंडितांना विलक्षण काव्यस्फूर्ती येते. पुन्हा पुन्हा नळाची स्तुती करताना रघुनाथ पंडित विविध दृष्टान्त, उपमादी अलंकार गुंफत राहतात.  या अलंकारांचं आणि स्तुतीचं निधान एकच असलं, अलंकारही पुनः पुन्हा तेच वापरले असले तरी कल्पनाचातुर्यामुळे ते रंजक ठरतात – कसे ते पाहू या! 

 प्रतीप अलंकार

ज्याची उपमा द्यायची त्याचंच खुजेपण, कमीपण दाखवून देत उपमेयच कसे वरिष्ठ आहे हे दाखवत त्याचे कौतुक करणारा हा अलंकार! 

लोक-बंधू जो होय रवी ऐसा 

कुवलयाला जो सुखद चंद्र तैसा

सांग नोहे तो कुसुमचाप तैसा

निषधरायाशी तुल्यरूप कैसा ||७||

जसा सूर्य सगळ्यांना आनंद देणारा,  कु  (पृथ्वी) + वलय – तिचे  वलय म्हणजे चंद्र – उगवल्यावर  कमळ फुलते तसाच  नळराजाच्या आगमनाने  प्रजाजनांना आनंद देणारा आहे.  इथे तो कोणासारखा नाही हेही सांगतात. एखाद्या गोष्टीला नुसतं चांगलं न म्हणता दुसऱ्या गोष्टीचे वाईट गुण हेरून पहिल्या गोष्टीला चांगुलपण देण्याचा तुलनात्मक खेळही ते खेळतात. 

सांग नोहे – स+अंग नसलेला म्हणजे अनंग – मदन (कुसुमचाप) – त्याची तुलना नलाशी होऊच शकत नाही. 

नाडीज्ञान जयाचे सरोगबंधू चतुष्पद गणावे 

सुत – तेजी तुरगीचे नळसम सुंदर कदापि न म्हणावे 

(गीति वृत्त) ८

नळराजाला वैद्यकाचंही ज्ञान होतं इतकं सांगून  नळकौतुकधारा संपत नाहीत . ते पुढे म्हणतात : सरोगबंधू चतुष्पद गणावे! 

ही पंक्ती हा अत्यंतातिशयोक्तीचा आणि काठिण्याचा कहर आहे.    रघुनाथ पंडितांच्या रचनेतील अनेक सांकेतिक, पौराणिक आणि काल्पनिक कथांमुळे  आकलन अवघड होते. 

सरोग म्हणजे रोगी. 

रोगी कोण? तर चंद्र – का बरं? त्याचा क्षय होत  जातो.  सरोग बंधू – 

या रोगी चंद्राचा बंधू कोण? समुद्रमंथनातून चंद्र आणि धन्वंतरी निपजले म्हणून ते भाऊ-भाऊ! सरोग बंधू म्हणजे धन्वंतरी! धन्वंतरी हा देवांचा वैद्य. 

आता पुन्हा एक ठेच लागते… तेजीतुरगीचे सुत :

सूर्याचे तेज सहन होई ना म्हणून सूर्याच्या पत्नीने घोडीचे रूप घेतले. सूर्यानेही घोड्याचे रूप घेतल्यावर त्यांना झालेले पुत्ररत्न म्हणजे अश्विनीकुमार – तेही वैद्य. 

नळराजाच्या रोगशास्त्र ज्ञानापुढे धन्वंतरी फिका पडतोच शिवाय अश्विनीकुमार हे  पशू म्हणून फिके पडतात. 

नळराजाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी उपयोजिलेले असे नाना प्रकार काव्यात गंमत आणतात. 

मालाप्रतीप ही या अलंकाराची पुढची पायरी.  

हे वामनैकपद भूमि नसोनि जंघी

एके दिनीच दिनराज नभास लंघी

वार्राशि  वानर विलंघित होय तो कीं

लोकीं नसे नलयशस्तुलना विलोकी||१४|| 

वामनाचं एक पाऊल  भूमी पादाक्रांत करतं, एका दिवसात सूर्य अमर्याद आकाश लंघून जातो,

वार्राशि ( वारि-पाणी  त्याचा अमर्याद साठा) म्हणजे समुद्र – समुद्राला माकड (मारुती) सहज लंघून जाते…  भूमी, समुद्र आणि आकाश  लंघून जाणारे हे तिघे – या सगळ्या  आश्चर्यकारक गोष्टींच्या ‘माला’ नळराजाच्या यशापुढे क्षुद्र आहेत… कारण नळराजाचं यश उल्लंघून जाणारं कोणीही नाही. 

शब्दांचे वर्ण सारखे असतात पण अर्थ वेगळा असतो अशा शब्दांमधून चमत्कृती निर्माण करणं हा रघुनाथ पंडितांचा आवडता शब्दखेळ आहे. 

ते शीतलोपचारीं जागी झाली, हळूंच मग बोले

औषध नलगे मजला परिसुनि जननी बरे म्हणुनी डोले   ||१३५||

श्लेषातील दोन्ही प्रकार रघुनाथ पंडितांच्या रचनांमध्ये दिसतात. 

अभंग श्लेष म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ; तर सभंग श्लेष म्हणजे पदातील अक्षरे हलवली की होणारा श्लेष. 

औषध न लगे आणि नल गे हा सभंग श्लेष आहे.

 शब्दांवर प्रभुत्व असले की अभंग श्लेषाची मजा दुणावते.    

 मी जाण देवनळही स्वकरी धराया

सांगेन काय चतुरा मज लाज जाया

काळें करूनि सुख जोंवरि होय लेखीं

हें बोलणें खग मनीं उभयार्थ लेखी ||११०||

इथे अभंग श्लेष आहे.  त्याची फोड सावकाश करायला हवी. 

देवनळ म्हणजे बोरू आणि देवनळ म्हणजे नळराजाही! (नळ हाच देव) 

देवनळ स्वकरी धरल्यावर… मज लाज जाया

इथे जायाचा ‘जास्त’मधील ‘जा’ सारखा उच्चार केला तर अर्थ पत्नी होतो,  पत्नी म्हणून लाजत आहे… 

 दुसरा अर्थ अधिक काही बोलायला लाज वाटत आहे किंवा अधिक बोलले तर लाज जाईल.

पुढे हा श्लेष  आणखी परीक्षा बघतो. 

 पत्राद्वारे मनीचं गूज पाठवावं…

 काळे  करूनि… 

एक अर्थ कालांतराने 

दुसरा अर्थ पांढऱ्यावर काळे करून

 म्हणजे लेखणीतून सुख मिळेल. थोडक्यात पत्राद्वारे मनीचे गूज सांगू. 

लेखीचेही दोन अर्थ : लिहिणे आणि लेखणे. उभयार्थ म्हणजे दोन्ही बाजूंची कथा हंस सारखीच लेखतो. 

ही गंमत इथेच संपत नाही. 

 देवनळ आणि नळराजा हे फक्त नामसाधर्म्य आहे. नळाचे गुण आणि देवनळाचे गुण यांत काहीही साधर्म्य नाही हे स्पष्ट करताना रघुनाथ पंडित एक दृष्टांत उपयोजितात. 

धत्तूर हा कनक नाम सदा धरीतो

होईल काय रसिका कनकापरी तो ||११२||

धोतऱ्याला संस्कृतमध्ये कनक म्हणतात. आधीच्या पदातील देवनळ (बोरू) आणि नळदेव या श्लेषाचंच टोक धरून हंस म्हणतो : धोतऱ्याला कनक असंही नाव आहे पण म्हणून त्याला सोन्याची सर येईल का? तद्वत देवनळ आणि नळराजा यांची तुलना होऊ शकत नाही. यात आणखी एक पीळ देत काठिण्य वाढवतात. अंतरंगाचे रूपक करून भेद स्पष्ट करतात. 

गांठ्याळ जें हृदय सांद्र न होय ज्याचे! 

देवनळाला बांबूसारख्या गाठी असतात. आतल्या गाठीच्या माणसांना मृदुता, मायेचा ओलावा नसतो तसाच हा कोरडा ठणठणीत देवनळ. नळराजासारख्या  ऋजू व्यक्तीची महती सांगण्यासाठी योजलेलं हे रूपक. हंसाचे हे काव्यबद्ध वक्तव्य  उलगडण्यासाठी फार विचार करावा लागतो, एकाच पदात अभंग आणि सभंग श्लेषाचे  कोडे सोडवताना क्लेश होत असले तरी अर्थ समजला की या क्लेशांचा लवलेश उरत नाही. 

पूर्वसुरींनी निर्मिलेले अलंकार, त्यांचं उपयोजन हा सखोल अभ्यासाचा विषय आहे. श्लेषाचा आणखी एक प्रकार म्हणजे अर्थश्लेष. 

दमयंती नळालाच वरेल या भीतीने इंद्र, अग्नी, यम, वरुण सगळेच नळाचे रूप धारण करून स्वयंवराला उपस्थित राहतात.  शारदा ही तिची सखी (बुद्धीची देवता) त्या चौघा तोतयांची ओळख करून देताना श्लेषातून त्यांचं सत्यस्वरूपही सांगते. 

होतील नंदविलास जयास तो हा

आहे धनंजयहि धर्महि जाणितो हा

रत्नाकर तुज विराजविता विहारी

हा पाहिजे  तरि वरी नलरूपधारी ||२०८||

 याचे विविध अर्थ :

१)नंदनवनातले विलास अनुभवणारा – इंद्र  किंवा

नंदनविलास नळराज

२)धनंजय – धनंजय अग्नी/

 शौर्याने शत्रूचे धन जिंकणारा (नळराजा) 

३)धर्म – यमधर्म/

धर्माने वागणारा नळ

४)रत्नाकर म्हणजे समुद्र  किंवा रत्नाचा आकर – रत्नजडित भूषणे देणारा – 

हे चार विवाहोत्सुक! पण ते चौघे मिळून  जे सुखोपभोग देतील ते एकटा नळराजा देईल. 

हा अर्थश्लेष आहे. शब्द एकच पण त्यातून द्व्यर्थ निघतो. 

शुद्ध परंपरित श्लिष्ट रूपक हेही समजायला अवघड; पण अर्थ कळल्यावर त्यातील श्लेषानं थक्क व्हावं असा अलंकार. 

 ( दिंडी) 

तुझा करपंजर होय मला थारा

तुझ्या वचनांचा ओघ दुग्धधारा

तुझें मानस बहु थोर गा उदारा

सत्यलोकेशहि तूंचि गुणागारा ||५५||

तुझ्या हाताने केलेला पिंजरा हेच माझं घर, तुझे बोल या दुधाच्या धारा असं रूपक योजलं आहे. नीरक्षीरविवेकानुसार दूध आवडणारा राजहंस आणि नळाचे दुधाच्या धारांसारखे मधुबोल असा तरल श्लेषही वाचकाचं मन प्रसन्न करतो.  

सुवर्णहंस नळाला सांगतो ‘तुझं मानस  मोठं आहे,’ हे म्हणताना योजलेला मानस आणि मानससरोवरावरील श्लेष काव्यात मौज आणतो. 

 नलदमयंती आख्यानाच्या सुरुवातीलाच दुसऱ्या पंक्तीत 

 इंद्रादिक वर असतां कशी नलसतीच होय दमयंती |

सुंदर सकल वधूंतें कशी न लसतीच होय दमयंती ||

लसतिचा संस्कृत अर्थ शोभादायी

असा लसती आणि नलसती वर श्लेष साधला आहे. 

इंद्राला नळ-दमयंती  परस्परप्रेमाची कल्पना देताना श्लेषातूनच नळराजा म्हणतो –  (मालिनी वृत्त, चाल : अनुदिनि अनुतापे) 

मज निज सुमनाची घातली माळ तीनें

हृदय तरि तियेचें सांद्र झालें सुवासें ||१५६||

नळाच्या गळ्यात सुमनहार, मग तिच्या हृदयात वास कसा? श्लेष सोडवल्यावर यातली मजा उलगडते… 

माळ ही सुमनांची असेल, सुमनाची – एकाच फुलाची नसेल! 

सु मन म्हणजे चांगले मन त्याला दिले, त्याच्या मनात तिचे मन वसले म्हणजेच मन तिथेच राहिले – मनाने तेथेच वास केला. ‘सु’ वास’  चांगले निवासस्थान लाभले. 

 इंद्राला नळ-दमयंती  परस्परप्रेमाची कल्पना देताना श्लेषातूनच नळराजा म्हणतो –  (शार्दूलविक्रीडित चाल :  या कुन्दे) 

रामातें जनकक्षमापतिसुता रामा जसी रेवती |

कामारीस नगाधिराजतनया कामासि जैसी रती |

या मानूनि तसी विदर्भदुहिता रामा मनीं भाविते |

हा माझा हृदयाब्जसूर्य म्हणुनी त्या मानिनी बोलते ||१७४||

यात एकाच शब्दाच्या विविध अर्थांचा खेळ आहे. पहिला राम म्हणजे जानकीपती, दुसरा रेवतीचा राम म्हणजे बळराम. तिसऱ्या ओळीत कामारी  म्हणजे शंकराची पार्वती  आणि पुढे 

विदर्भदुहिता रामा मनीं भाविते

ही पंक्ती धक्कादायक नव्हे का? आत्तापर्यंत नळराजाची आठवण काढणारी अचानक रामाचं चिंतन का करायला लागली? रघुनाथ पंडित काव्यातील एकसुरीपणा घालवण्याच्या वेगवेगळ्या युक्ती योजतात; त्यांतली ही एक. 

रामाचा अर्थ पत्नी. आता पुन्हा वरची ओळ वाचली तर लक्षात येईल या वरच्या आदर्श जोड्यांप्रमाणेच ती स्वतःला नळराजाची – तिच्या  हृदयाब्जसूर्याची पत्नी मानते. 

आणखी एक मजेदार अलंकार म्हणजे परिकर. 

 “टिळक आहेत का?” यावर 

“पगडी दिसत नाही” हे सांगणं! या प्रकारासारखा हा अलंकार

परिकर अलंकार म्हणजे आडवळणाने सांगणे.. 

ज्याची पदे धरिति देव शिरो ललामीं

स्वाराज्य जो मिरवतो गजराज-गामी

जो वज्रबाहु बहुलोचन कांतिधारी

हा पाहिजे तरि वरी नळ रूप-धारी ||२०४||

नळरूपधारी हा शब्द थेट सूचना देणारा आहे. नळाचा वेश धारण केलेला रूपधारी  आणि नळराजा यांच्यातला भेद या शब्दांतून सहज स्पष्ट होतो. 

नळराजाचं प्रजेवरचं प्रेम  आणि  दमयंतीची कीर्ती ऐकून तिच्यावर जोडलेलं विलक्षण प्रेम! बाकी नाती, संबंध घट्ट असले तरी भेटीची ओढ लागून  विव्हलता येत नाही… प्रेमात पडल्यावर होणारा रोग म्हणजे विरहबाधा! रघुनाथ पंडित या विरहाचंही सालंकृत वर्णन करतात. प्रियतमेशिवाय सगळं सुनंसुनं वाटत आहे हे विरह रसात गुंफत रघुनाथ पंडित म्हणतात, 

मानी मनोजशर हार तुरे फुलांचे

कंदर्प कोपवचने ध्वनि कोकिलांचे

राकाशशि मदन-दर्पण भाविलाहे

नेघेचि तो न परिसे न तयासी पाहे ||१२५/२४||

नाजूक फुलांचे हार, कोकिळेचे कुहूगान, पौर्णिमेचा उत्फुल्ल चंद्र यांनी मन प्रसन्न होतं. पण विरहातल्या माणसाचं मन मात्र या मृदू  मार्गांनी शांतावत नाही. ते पोळून निघत असतं. फुलांचे हार त्याला बाणांसारखे टुपतात,  कोकिळाची कुहू त्याला मदनाच्या संतापासारखी वाटते, प्रेमाचं प्रतीक असलेला पूर्णचंद्र त्याला प्रेमाचा आरसा दाखवतो म्हणून त्याला तो आवडत नाही. त्याची व्याकूळ अवस्था यथासंख्य अलंकारात ओवली आहे. हा अलंकार शाळेतल्या जोड्या लावा प्रश्नासारखा असतो. म्हणजे पहिल्या तीन ओळींचा संबंध अनुक्रमे शेवटच्या ओळीतील शब्दांशी असतो. कसं ते बघू या :

१)हार तुरे फुलांचे… नेघेचि 

कारण ते मदनाचे बाण आहेत. 

२)कंदर्प कोपवचने… न परिसे

कंदर्प म्हणजे  मदनच. त्याचे मधुबोल ऐकवत नाहीत; कारण त्याची प्रियतमा तिथे नाही. 

३)राकाशशी म्हणजे पौर्णिमेचा उत्फुल्ल चंद्र

न तयासि पाहे

कारण त्याला वाटते तो मदनाचा आरसा आहे आणि त्यातून आधीच पोळलेल्या मनाला मदनाची बाधा असह्य होईल. 

अलंकारांच्या विविध प्रकारांत दृष्टान्त हा महत्त्वाचा अलंकार. एखादी गोष्ट स्पष्ट करण्यासाठी तशाच आशयाचं एखादं उदाहरण दिलं जातं. 

राजहंसाला सोडून दिलं तरी राजहंस परत नळाकडे येऊन  बोलू लागतो.  त्याची विरहव्यथा  जाणून एक दृष्टांत देतो. 

हें पांखरूं मजसि येइल काय कामा

ऐसे नृपा; न वद पूरित- लोक कामा

मोलें उणें व्यजन तें धरितां पुढारी

छाया करी तपनदीप्तिसही निवारी||५७|| 

क्षुल्लक किमतीचा पंखा, त्याचा इवलासा जीव! तोही उन्हापासून संरक्षण करतो, तसाच मीही क्षुद्र असलो तरी तुझ्या  कार्यात माझी नक्की मदत होईल असं सांगत सुवर्णहंसाने दिलेला हा दृष्टान्त!  काव्याच्या भारदस्त स्वरूपापुढे असा दृष्टान्त केविलवाणा वाटतो; याशिवाय 

ऐसे नृपा; न वद  पूरित – लोक – कामा|

 ‘ज्याने लोकांचे काम पूर्ण केले आहे अशा तू’ या अर्थाने योजलेला हा यमकाचा अट्टाहास हास्यास्पद वाटतो. काव्य न राहता अशा वेळी ती शब्दबंबाळ कसरत वाटते. 

चूर्णिका हे मुक्तपद्यही शब्दांशी खेळणारे! 

सकल-भुवन-ललामायमाना

मानाधिक-विभव-धनिक-सदन-शत-विराजमाना

कलश-जनित-मुनि-चकित-जलधि-शरणाति- विस्तृत- परिखांतरीपायमाना… ||७६||

हे काव्य आहे की कोडं? एक एक शब्दार्थ उलगडत चला तर मग कोडं सोडवू या! 

मानाधिक म्हणजे अगणित, कलशजनित म्हणजे मडक्यातून जन्मलेला – म्हणजे अगस्त्य – त्याच्यापुढे सागर शरणागत आहे. एका घोटात अगस्ती पिऊन टाकेल म्हणून त्याला घाबरलेला समुद्र, अगस्तीमुनींपासून त्याचे रक्षण करण्यासाठी आखलेल्या परिखा म्हणजे खंदक… यातून सांगायचं आहे : विदर्भनगरीच्या भोवताली इतके मोठे खंदक होते की त्यात समुद्रही लपला असता. हाही अतिशयोक्तीचा कहर असावा! 

विमाना, स्तंभचि माना, निजमाना, कमाना

अशी ‘मानावली’ अनुप्रासासाठी योजली असली तरी अतिरेक काव्याला मारक ठरतो. तरीही रघुनाथ पंडितांची कविता नटण्याच्या आहारी फारशी जात नाही. अलंकारांचं सढळ हस्ते उपयोजन हा त्या काळाचा विशेष होता; त्याला आत्ताच्या काळातील दंडक लावू नयेत. 

सकस अनुवादातून रघुनाथ पंडित हे कथाकाव्य फुलवत नेतात.  संघर्ष, ताण, प्रीती आणि प्राप्ती या पायऱ्या काव्यरंगाने रंगवतात. वाचकही या नाट्यात रंगून जातो. 

पंचचामर वृत्तात हे रघुनाथ पंडितांचं हे वैशिष्ट्य गुंफून म्हणावसं वाटतं…

 (जरजरजग -चाल : रावणरचित शिवतांडव –  जटाटवी गलज्जल) 

अलंकरोनि गुंफिले विदर्भकन्यका नळा

उदंड साथ देइ त्यांस राजहंस कोवळा

कथा सुरेख शब्दबद्ध वृत्तबद्ध मंजुळा

समग्र दाविती जनांस नाट्यरंग आगळा 

काव्य आणि नाट्यातून फुलत जाणारे हे कथाकाव्य… क्रमशः

संदर्भ :

नवनीत

अलंकार चंद्रिका (कै.गणेश मोरेश्वर गोरे) 

Author

Leave a Reply