एका अद्भुत जगात 

 राहुलला गेल्या काही वर्षांत लागलेल्या छंदामुळे नेटवरून तो  पक्षिनिरीक्षणासाठी नवनवीन  जागांच्या शोधात असतो. त्यात त्याला नंदू तांबेच्या पक्षी अभयारण्याचा शोध लागला होता. त्याचे डिटेल्स वाचून तो अगदी प्रभावित झाला होता;  परंतु जुलैमध्ये जर्मनीला जायच्या आधीपासून इच्छा असलेली नंदू तांबेकडची भेट शेवटी जानेवारीत सफल झाली. फोनवरून तो जरा अधिक शिस्तबद्ध माणूस वाटला. राहण्याचा दर थोडा जास्त आहे. “तो जंगल संवर्धनासाठीचा आहे, त्यामुळे दरात तडजोड नाही,” असेही त्याने स्पष्ट केले; शिवाय  कोकणात जाऊन मासे मिळणार नव्हते, मांसाहार व मद्यप्राशन  वर्ज्य आहे  तिकडे; कारण नंदूच्या दृष्टीने त्याचा हा परिसर म्हणजे श्रद्धास्थानच आहे; पण मला ही शिस्त आवडली आणि आम्हीही त्याच्या भावनांचा योग्य तो आदर राखला. निघायच्या दोन दिवस आधी त्याचा फोन आला की गेले काही दिवस बिघडलेल्या हवामानामुळे पक्षी जास्त दिसत नाहीयेत, तर तुम्हांला पोस्टपोन करायचे असेल तर करू शकता. राहुल म्हणाला, “फक्त पक्ष्यांसाठी नाही येत आहोत आम्ही;    तुम्ही जंगल संवर्धनाचं जे महत्त्वपूर्ण काम करताय तेही पाहायचं आहे.” त्याला बरं वाटलं असावं. अशा रितीने सकाळी पावणे आठला आम्ही घरातून निघालो आणि रमतगमत दुपारी पावणे बारा वाजता नंदू तांबेच्या जंगलातल्या घरी पोचलो. गावात शिरताना वाटेत मोटरसायकलवर एक लाल टी-शर्टमधला तरुण विरुद्ध दिशेने जाताना दिसला. राहुल म्हणाला, “हा नंदू तांबे असावा, असाच आहे त्याचा फोटो;” पण आम्ही पुढे गेलो. त्याच्या घराकडे वळणारा जो रस्ता गूगलबाई दाखवत होती, तिथे एक त्याच्या वडील/आजोबांच्या (नंतर समजलं की त्याच्या सगळ्यात मोठ्या काकांची) नावाची लहान पाटी होती व बऱ्यापैकी खोल उतारावर आत जाणारा एक अगदी कच्चा तांबड्या मातीचा  रस्ता होता. का कोणास ठाऊक पण मला तर उगाचच गाडीत बसूनदेखील हिरकणी असल्यासारखं वाटलं. पुढे गेलो, चढावर उजव्या बाजूला एक गाडी लावली होती तिथं नेऊन आमची गाडी पार्क केली. सगळीकडे सामसूम होती. डावीकडे बांबूचं एक सुरेख फाटक व थोडं आत एक कौलारू घर होतं. राहुल चौकशी करून आला व मग सामान घेऊन आम्ही आत गेलो. फाटक कसं उघडायचं हे आतून एक बाई (नंदूच्या आई) सांगत होत्या; पण आम्ही बाजूच्या मोठाल्या चिऱ्याच्या दगडांवरून चढूनच आत गेलो. खूप मोठं आवार होतं. थोडासा उतार व खाली घर होतं. घरासमोर सोपावजा प्रशस्त जागा. आता एक चौकड्याची अर्धी  चड्डी घातलेला तरुण मुलगादेखील समोर आला. तोच नंदू असावा  असा आमचा समज झाला; पण तो त्याचा भाऊ श्रीकांत होता  हे नंतर समजलं. डोक्यावर मागे केसांची तिथेच वरती गाठ मारून बांधलेली शेंडी. अलीकडे तरुण मुलांत हे दिसत नाही फारसं. स्वच्छ मराठी उच्चार! 

 सोपा छान सारवला होता. गार सावली. मस्त वाटलं एकदम. एक टेबल, ३-४ खुर्च्या व एक कॉट असं सामान होतं तिथं. आईंनी सांगितल्याप्रमाणे बूट काढून खुर्चीवर जाऊन बसलो. अंगणदेखील मस्त सारवलेले होते. बाजूला तुळशीचा कट्टा, त्यावर थोडे रानआवळे वाळत घातलेले. खाली समोर थोडी सपाट मोकळी जागा, सध्या तिथं सगळं पिवळं गवत, पण त्यापलीकडे दाट हिरवं जंगल. 

एका बाजूला नारळीची, आंब्याची झाडं, त्यावर गर्द हिरव्या पानांची  वेल, मला वाटलं मिरीची; पण आई म्हणाल्या ही नागवेल (कलकत्ता पान) आहे. सगळा परिसर खूप स्वच्छ होता. खोल्या तयार होतायत तोवर बसलो तिथेच. आईंनी मस्त  लिंबू सरबत आणून दिलं. त्या छान गोऱ्यापान होत्या. डोळ्यांत काजळ, विरळ पण कुरळे केस व स्निग्ध हसरा चेहरा. मी सोप्यात फेरी मारली. पलीकडे एक लाकडी टेबल-खुर्ची, काही कामाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व काही पुस्तके असं सामान. चिऱ्याच्या भिंतीवर फ्रेम केलेला ॐ, शिवाचे कलात्मक चित्र अडकवलेले आणि एक ब्राऊन  फिश आऊलचा  सुरेख मोठा फोटो. आवश्यक तेवढंच सामान, उगाच शोभेच्या वस्तू वगैरे काही नाही. राहणीमानातला साधेपणा अगदी भावला.

खोली तयार व्हायची होती म्हणून आम्ही तिथेच बसून होतो. श्रीकांत आणि आईशी जुजबी गप्पा करत. खोली तयार झाली तसे आम्ही खालती पायऱ्या उतरून गेलो आणि पोचलो तिकडे. इथे छान बाग होती. जाड गवताची हिरवळ आणि शोभेची झाडं होती. समोर एकमेकाला लागून असलेल्या दोन खोल्यांची बैठी देखणी कौलारू इमारत! 

संपूर्ण चिऱ्यात बांधलेली. सगळ्या भिंती लॅकर  लावून चकचकीत केलेल्या. मोठ्या लांबच्या लांब व्हरांड्यासाठी उत्तम दगडी लादी वापरलेली. व्हरांड्यासमोर चिऱ्यातलाच एक चौकोनी हौद, त्यात स्वच्छ पाणी. खांब वगैरे सगळं सागातलं लाकूडकाम. नक्षीदार दरवाजे. 

आतमध्ये दोन प्रशस्त खोल्या. खोलीत भरपूर प्रकाश यावा यासाठी दोन भिंतींना मोठ्या खिडक्या. तीन मोठ्या कॉट्सची आरामदायी रचना. जाड गाद्या स्वच्छ फिकट रंगाचे बेडशीट घातलेल्या. अद्ययावत बाथरूम. मोठे लाकडी कपाट. फॉल्स सिलिंगसाठी लॅकर लावून चकचकीत केलेले सॉफ्ट बोर्ड वापरलेले. 

सगळं काम अगदी मन लावून कलात्मकरित्या केलेलं. आम्ही अगदी खूश झालो. श्रीकांत सतत माहिती देत बोलत होता.

आवरून आम्ही परत सोप्यात जाऊन बसलो. तेवढ्यात तो मघाशी येताना दिसलेला तांबड्या टीशर्ट मधला तरुण आला. गोरापान, बांधेसूद शरीरयष्टीचा देखणा पंचविशीतला मुलगा. पहिल्या भेटीतच त्याच्या नजरेत एक वेगळंच तेज जाणवलं. अगदी प्रभावी व्यक्तिमत्त्व! म्हणाला, “मीदेखील पाहिलं तुम्हांला व तुम्हीच पवार असाल हे ओळखलं, योग्य मार्गावर आहात हे ताडलं मी आणि पुढं गेलो.” हसतमुख होता. तर हा नंदू! याचीदेखील वाणी अगदी स्वच्छ, मधाळ पण करारी वाटत होती. म्हणाला, ‘आता त्याच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढतेय व अगदी ७०%  लोक  परत परत येतात.’ तर या जागेतील निसर्गाचे संतुलन बिघडू नये म्हणून त्याने  आता जवळच माळरानावर जागा घेऊन बांधकाम सुरू केले आहे. त्याचं निसर्ग, झाडं व जंगलावरचं प्रेम अगदी आतून आणि खरं वाटलं. ‘आमची १२ एकर जागा होती. ती मी आजअखेर ४३ एकर केली. त्यातलं जंगल संवर्धनाचे काम मी करतो.’ कसं करतो, किती मेहनत असते, किती पैसा लागतो हे सगळं अगदी पोटतिडकीने सांगत होता. त्याच्या जंगलात किती आणि कोणते विविध प्रकारचे पक्षी (२३९ पेक्षा अधिक ), कीटक दिसतात, जंगलात निरनिराळी कोणती झाडे आहेत, कोणती मी आणून लावली आहेत वगैरे पुष्कळ माहिती सांगत होता… त्याची बोलण्याची व ज्ञान देण्याची पद्धतदेखील इतकी ओघवती आणि प्रभावशाली होती की आम्ही अगदी मन लावून ऐकत होतो. विविध विषयांतलं त्याचं चौफेर ज्ञान लक्षात आलं. तिकडे खाली जाऊन फिरू शकता, एक बर्ड हाईड बांधली आहे तिथे. आम्ही उतरून गेलो तर त्या हाईडमध्ये ३-४ खुर्च्या व स्टूल होते. समोरच काठ्यांचा एक उभा लाकडी टी बनवला होता व त्यावर लहान वाटीत पाणी ठेवले होते.

एक ब्राऊन हेडेड बार्बेट पपईचा मजेत आणि मनसोक्त आस्वाद घेत बसला होता. इतक्या जवळून हा पक्षी आम्ही प्रथमच पाहत होतो. वेगवेगळ्या पोजमधले इतके सुरेख फोटो मिळाले त्याचे. त्याचं पोट भरल्यावर तो उडून गेला व एक कोकिळा आली. जवळून पाहता ती देखील किती देखणी असते हे दिसले. तिचा तो तांबडाभडक गुंजासारखा डोळा अगदी नीट  टिपता आला… मग त्यांना हुसकावून लावायला एक कोतवाल पक्षी आला.

वरती आल्यावर परत दोघांशी गप्पा सुरू झाल्या. १-१.३० वाजता जेवण करून विश्रांती घ्या म्हणाला, ४ वाजता चहा घेऊन आपण माळरानाकडे (ग्रासलँड) बर्डिंगसाठी जाऊ. जेवण शाकाहारी पण अतिशय रुचकर होते. आम्ही अंमळ जास्तच जेवलो.

बरोबर ४ वाजता सोप्यात आलो. तो चहाचे कप घेऊन आला. चहादेखील कमी गोड आणि छानच होता. तर मग लगेच नंदूने चहा करायची पद्धत सांगितली. तो म्हणाला, “असा केला की चहाने पित्त होत नाही.” आमचा कॅमेरा पॉईंट आणि शूट आहे व मॅन्युअल मोडवर असल्यामुळे फोकस करण्यासाठी जरा वेळ जातो असं सांगितल्यावर म्हणाला मी देईन तुम्हाला सेट करून. मी थक्कच! अरे कोणताही विषय घ्या त्यावर मुद्देसूद आणि उपयुक्त माहिती देतायत ही मुलं! मग त्याने आमच्या गाडीची किल्ली घेतली व ड्रायव्हिंग सीटवर बसला. म्हटलं, “मी वरती रस्त्यावर जाऊन उभी राहू का?” त्या उताराची भीती वाटत होती मला. “नको, मी नेतो,” म्हणाला, “एवढा काही वाईट नाहीये रस्ता” आणि खरंच त्याने अगदी सफाईदारपणे वरती काढली गाडी. बोलत  निघालो. म्हटलं, “नंदू तुला इतक्या विविध विषयांचं ज्ञान कसं, तुझं शिक्षण किती?” 

म्हणाला, “तसं माझं शिक्षण म्हणाल तर        बी. कॉम. शेवटच्या परीक्षेत एका पेपरला मी उशिरा गेलो, म्हणजे  पेपर सकाळी होता आणि मला वाटला  दुपारी. त्यामुळे तसा मी फक्त बारावी पास आहे.” 

त्याची बोलण्यातली समज पाहता तो नुसता बारावी पास नक्कीच वाटत नव्हता. त्याचा आत्मविश्वास कुठेही आगाऊ वाटत नव्हता. कॉंप्युटरमधलं मात्र जुजबी समजतं म्हणाला; पण बाकी त्याचं वाचनदेखील अफाट असावं असं वाटत होतं. हे सगळं अगदी गूढ वाटत होतं. बोलत बोलत त्याने वाळलेल्या गवताच्या  कुरणावर नेली गाडी, रस्ता सोडूनदेखील आतमध्ये तो गाडी घालत होता… एक घार-वजा पक्षी दिसला दूरवर. म्हटलं,  “थांबू या की!”

 म्हणाला, “नाही  येताना उतरू, जाणार नाही तो.” 

पक्ष्यांवरची त्याची नजर अगदी पक्की बसलेली होती. तशी ती अनेक गाईड्सची असतेच. पण हा कुठेही ‘सावकाश या, आवाज न करता  चला,’ असं म्हणत नव्हता. तो पक्षी जाणार नाही उडून अशी जणू त्याला खातरीच असायची. दुरून त्याला इंडिअन रोलर (नीलपंख) दिसला.

रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून आम्ही शेतात गेलो. दुर्बिणीतून पाहिलं त्या पक्ष्याला. फोटो झाले. राहुल म्हणाला याचा उडतानाचा हवा आहे मला कारण त्याचे पंख खालच्या बाजूला अप्रतिम असे रंगीत असतात. पण तो पक्षी एकदम विरुद्ध दिशेला उडाला व त्यामुळे उडतानाचे फोटो नाही मिळाले. मी एकदम म्हटलं, “किती हलकट आहे!” 

 हा शांतपणे म्हणाला, “त्याला जायचं असतं तिकडेच तो उडणार.” मग त्याला म्हणाला, “भेटू आपण परत.” मी शांत. तिकडेच जवळच्या झाडावर ती घार (ब्लॅक इयर्ड काईट) अजूनही बसलेली. आम्ही तिकडे चालत जाऊन त्याला दुर्बिणीतून नीट पाहिले, फोटो घेतले.

हा तसाच पुढे गेला. “पाहून येतो याची मादी असेल तिकडे लांबच्या एका झाडावर.” मग या म्हणाला. त्या घरट्यात बसलेली मादी दिसली. फक्त डोळा आणि चोच – अगदी स्तब्ध होती. म्हणाला की ती अंड्यांवर बसली आहे. त्यात अंडी उबवत बसलेली त्याची मादी दाखवली त्याने आणि म्हणाला, “तिकडे दूर बसून हा राखण करतोय तिची.”  

पुढे निघालो गाडीने. एक गरुडासारखा पक्षी समोरून उडत गेला, मग तो कोणत्या झाडावर बसला ते पाहून आम्ही त्या झाडाकडे एका खडकाळ व अवघड रस्ता असलेल्या कुरणातून जाऊन पाहू लागलो. तो तिथूनही बहुदा उडून गेलेला. पण तिथे आम्हांला जमिनीवर २-३ हुप्पो दिसले. त्यांचे पुष्कळ फोटो झाले. 

 त्यांचे फोटो आणखी जवळून आणि नीट घेता यावेत म्हणून तो गाडी पुढे घेऊ लागला, तर ते कुंपणावरून दूर उडून गेले. 

मी म्हटलं, “किती बदमाश आहेत!” 

आता मात्र तो म्हणाला, की पक्ष्यांशी प्रेमानं बोलावं, त्यांना समजतं. मी नेहमी बोलतो पशुपक्ष्यांशी. त्यांना म्हणाला, “भेटू नंतर.’”

 परतीच्या वाटेवर खरोखरच तो मघाचा नीलपंख  बसला होता कुंपणावर! जणू नंदूला दिलेला शब्द पाळण्यासाठी आल्यासारखा. परत छान पोजेस दिल्या त्याने.

आणखी एके ठिकाणी जाऊ म्हणाला – तिथं एक घुबड दिसू शकेल. तिथे मात्र मी त्याला शेवटी विचारलं की  इतकी सगळी माहिती आहे तुला विविध विषयांतली, तुझं वय किती? 

म्हणाला, “विश्वास बसणार नाही पण मी चाळीस वर्षांचा आहे.” लोकपण विश्वास ठेवत नाहीत. माझं वय जास्तीत जास्त २९ सांगितलं आहे आजवर. खरंच तो काही चाळिशीचा वाटत नव्हता. त्याच्या गुरुजींचे आशीर्वाद म्हणा किंवा त्याचा आत्मविश्वास म्हणा! रात्री परत गप्पा मारत बसलो. तो त्याच्याकडची प्रचंड माहिती सांगत होता आणखी कितीतरी विषयांतली. त्याच्या सखोल ज्ञानाची प्रचिती येत होती. आम्ही जेवून आलो तर हा  पुस्तक वाचत बसला होता. म्हणाला, “मी लवकर झोपतो आणि ३-४ वाजता माझी झोप पूर्ण होते. मग मी वाचन करतो. उद्या सकाळी ९ वाजता नाश्ता करून आपण माझ्या जंगलात जाऊ.”

दुसरे दिवशी सकाळी लवकरच जाग आली आम्हांला. ७ वाजता त्याने चहा पाठवला. ९-९.३० वाजता त्या समोरच्या जंगलात निघालो आम्ही. हा अर्ध्या चड्डीत आणि पायात साधे फ्लोटर चप्पल घालून. त्याने लावलेल्या अरेका पामच्या झाडाची लागवड  होती तिथं गेलो. दोन वर्षांत ही ८-१० फूट उंच झाली आहेत. खाली खूप पालापाचोळा होता. तो म्हणाला, ‘पानगळ आवश्यक असते व  मी अंगण झाडून पालापाचोळा गोळा करून  इथे आणतो व तो मल्चींगसाठी उपयोगी असतो. मला ही जमीन सुपीक करायची आहे.’  अनेक ठिकाणी मुंग्यांनी जमीन भुसभुशीत केली होती. त्यादेखील जमीन सुपीक करण्यासाठी हात भार लावत असतात म्हणाला. झाडे असली की पक्षी येतात व त्यांच्या विष्ठेतून मग सदाहरित झाडे आपोआप  येतात.  तिथे ही झाडं मी का लावली, ती कशी पाणी उत्सर्जित करतात व आपापली पाण्याची गरज भागवतात ते दाखवलं त्याने.

त्यात इतर कीटक, बेडूक कसे राहतात ते दाखवलं. त्याचा झाडांसंबंधीचा आणि निसर्गाचा अभ्यास हा स्व-निरीक्षणातून होता हे जाणवलं. इतकंच नाही तर त्याचं सजीवांवरचं निरपेक्ष प्रेम! तो सतत सांगत होता की  निसर्गातून शिकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत, आपला दृष्टिकोन  व समज तशी हवी.  पाऊस कसा पडतो  असं त्याने विचारलं. आम्ही आपण जे शिकलो ते बाष्पीभवन वगैरे उत्तर दिलं. म्हणाला, “पाऊस पडण्यासाठी झाडांची नितांत गरज आहे,”  आणि ती सविस्तर प्रक्रिया सांगितली. हे आपल्याकडे शिकवले जात नाही. अमाप जंगलतोड थांबवणं कसं आवश्यक आहे हे तो पोटतिडकीने सांगत होता.

सर्वसाधारणपणे आपल्याला मुंग्याचे उभे वारूळ माहिती असते. (म्हणजे मीतरी लहानपणापासून त्या उंच वारुळाला मुंग्यांचं वारूळ समजायचे; पण हा म्हणाला की ते वाळवीचं असतं.) तिथे एक सुरेख पसरट  वारूळ होते.

म्हणाला हे आपण जंगलात हरवलो तर दिशादर्शक म्हणून काम करते, कारण याचा उतार उत्तर-दक्षिण असा असतो. पाऊस नेहमी पूर्व- पश्चिम पडतो. उत्तरेकडे प्रवेशद्वार  असते वारुळाचे. समोरच एक झाड होते त्याच्या मुळांवर  व खोडावर काटे होते मोठाले. म्हणाला हे स्वसंरक्षणासाठी  येतात. काटे मोठे असल्यामुळे गुरे किंवा जंगली जनावरं झाडाच्या जास्त जवळ येत नाहीत व खोडावर अंग घासू शकत नाहीत, यामुळे झाडाची होणारी हानी टळते.  नंतर अपोआप जातात हे काटे.  

त्याच झाडावर त्याला एक कोळी दिसला (Argiope Keyserlingi- सिग्नीचर स्पायडरचा  एक प्रकार )  जाळ्याच्या मधोमध एक्स (X) आकार बनवणारा. पुढे त्याने आम्हांला अनेक प्रकारचे कोळी दाखवले, त्यांची नावं (सिग्नीचर स्पायडर, सॅक स्पायडर)  ते कसे राहतात, त्यांच्या स्वसंरक्षणाच्या सवयी वगैरे. 

एकात एक त्याला काय काय दिसत होतं. म्हणाला, “नशीबवान आहात, एक गंमत दाखवतो.”

मग झाडाभोवती  वेगवेळ्या कोनांतून फिरल्यावर एक व्हर्टिकल स्पायडर  वेब दिसलं. त्यातला कोळी खोडाशी बेमालूमपणे मिसळला होता. त्या कोळ्याने नेहमीसारखं जाळं बनवलं नव्हतं, फक्त मोठ्या स्पॅनमध्ये कडा दिसत होती जाळ्याची आणि तो कोळी गायब होता. मग  त्याने भलतीकडेच एक चॉकलेटी  ठिपका कोळी म्हणून दाखवला, याचं नाव ऑर्नामेंटल ट्री ट्रंक स्पायडर!  तो हे किडे जाळ्यात पकडण्यासाठी  करतो.  तो प्रात्यक्षिक करून  समजावून सांगत होता. निसर्गानं प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी आवश्यक अशा क्षमता दिल्या आहेत, सारं अद्भुतच वाटतं.

नंदू सगळीकडे तशीच उघडी बोटं आणि हात लावत होता, कुठे काही चावेल वगैरेची भीती नव्हती त्याला. त्याच्या एकूण जगण्याचा पायाच हा अध्यात्मावर रचला आहे. त्याच्या मूलभूत संकल्पना अगदी स्पष्ट आहेत व त्याचा  स्वतःवरती अतोनात विश्वास आहे असेच  यातून  प्रतीत होते. हे मला खूप भावले. प्रत्येक झाड हे अनेक कीटकांचे मदर प्लांट असते. एक झाड बायोडायव्हर्सिटीकल कंडिशनमध्ये यायला अंदाजे ९० वर्षं लागतात. म्हणजे काय? तर त्या झाडावर निसर्गचक्राप्रमाणे सगळे कीटक, कवक येतील तेव्हाच ते पूर्णत्वाला पोचतं. कवक, बुरशी व  एकपेशीय वनस्पती (अल्गी) यांच्यातील फरक आणि संबंध काय तेही सांगितलं. पुढे त्याने त्याच्या जंगलातली अनेक  तऱ्हांची झाडं दाखवली. आंबे, पेरू, फणस, काजू यांबरोबरच कॉफी, रुद्राक्ष, तिरफळ, कोको, जंगली जायफळ, केवडा, सुंदर वासाचा  जंगली मोगरा इ.  काही रोपं त्याने आणलेली, काही तिथलीच पण त्याने जोपासलेली आणि पेरू पपईसारखी – ही आपोआप पक्ष्यांच्या विष्ठेमधून येतात.  गुरं येतात चरायला तीदेखील अनेक नवीन रोपं खाऊन टाकतात. एवढ्या जंगलाला कुंपण करणं अशक्य आहे म्हणाला. पण त्याबरोबरच  गुरांनी इथं चरायला येणंदेखील कसं आवश्यक आहे वगैरे. 

एके ठिकाणी फिश टेल पामच्या बिया दिसल्या. म्हणाला, “याचं बेट तयार होईल आता.”  एक पांढरट खोडाचं व त्यावर काटे असलेलं झाड दाखवलं आणि ओळखा म्हणाला… ते तिरफळाचं झाड होतं. पुढं जागोजाग ही झाडं पुष्कळ प्रमाणात दिसली. मोठ्या झाडांवर मोठे आणि अधिक काटे, म्हणून हे   क्रोकोडाईल बार्क ट्री!  

रुद्राक्षाची तर  ७-८ झाडं आहेत तिथं. वेताची झाडं होती, मोहाची, दक्षिण मोहाचं व शिवलिंगीचं  झाड पाहिलं. शिसम,  रक्तचंदनाचं झाड होतं. त्यानं एका झाडाच्या लहान बिया दिल्या, त्या तळव्यावर घासल्यावर तांबडा रंग  झाला. ते शेंदरीचं (खायचा रंग) झाड होतं. ओवळी, चेरी, पांगाऱ्याची झाडं होती.  नोनीची फळं, त्याचं स्क्वॉश बनवतात म्हणाला. एके ठिकाणी जमिनीवर लहान पिवळी फुलं पडलेली, ती खाऊन पहा व ओळखा म्हणाला, ते कोकमाचं झाड होतं, नर जातीचं. ते १.५ एकरातल्या  मादी कोकमांची  फलधारणा होण्यासाठी उपयुक्त असतं म्हणाला. डिंक, ऊद-धुपाची झाडं होती.  थोडा डिंक काढून खाल्लादेखील आम्ही.

नागचाफ्याचं झाड दाखवलं, ते हवेतलं रेडिएशन शोषून घेतं व त्यावरही  जगतं, अशी ३००च्या आसपास व १६० प्रजातींची झाडं आहेत त्याच्या जंगलात.  ‘मी फक्त जनजागृती करतोय’ म्हणाला. ‘मला किमान १०० एकर जंगल करायचं आहे. सगळ्या पश्चिम घाटात काम करायचं आहे,’ ही त्याची दुर्दम्य मनीषा. एका झाडाला वेटोळा घातलेली एक जाड वेल होती, ही खूप उपयुक्त असते म्हणाला, म्हणजे ५-७  फुटांच्या लांबीच्या तुकड्यातून  साधारण १-१.५ लिटर पाणी मिळते, तेदेखील खूप पौष्टिक. म्हणजे जंगलातही अशी कठीण वेळ आली तरी माणूस उपाशी राहू शकत नाही इतकी. 

उंबराचं पाणीदेखील खूप थंड गुणधर्माचं असतं. म्हणाला, “एकदा माझ्याकडे  वनस्पतिशास्त्रातली ५-६ तज्ज्ञ मंडळी येणार होती.  मी अगोदर थोडा अभ्यास केला; पण मी सांगत होतो ते बरंच काही नवीन होतं त्यांच्या दृष्टीने. म्हणाला, “जंगलातल्या ६० -८० मीटरच्या अंतरासाठी आम्ही ४:३० तास फिरत होतो. त्यांच्या भेटीनंतर माझा आत्मविश्वास अधिकच वाढला.” 

खरं आहे कारण त्याच्याकडे केवळ पुस्तकी ज्ञान नाही; तर तो अनुभवातून, प्रयोगातून, निसर्गाशी एकरूप होऊन जगतोय आणि शिकतोय आणि तेच त्याच्या माहिती सांगण्यातून प्रतीत होत असतं.  फर्नचे  (नेच्याचे) अनेक प्रकार दाखवले त्याने. झाडावर फर्न, मॉस, ऑर्किड, लायकेन  असणे हे झाड निरोगी असल्याचे चिन्ह असते. लायकेनचे तिन्ही प्रकार – क्रुस्टोस, फोलिओस आणि फ्रुटिकोस त्याने त्याच्या जंगलात दाखवले. त्यांतले फ्रुटिकोस हे सर्वांत उपयुक्त.

चॉकलेटी फर्न होते, ते कसे सुप्तावस्थेतले असते ते सांगितले. त्याच्या निरनिराळ्या अवस्था समजावून सांगितल्या. त्या जंगलात जमिनीवरदेखील मॉस होते, अगदी गुबगुबीत. ते सकस आणि परिपूर्ण जमिनीचे द्योतक असते. अनेक ठिकाणी पांढरे लायकेन होते, ते खाली पडलेल्या फांद्या कुजण्याच्या प्रक्रियेत मदत करते. अल्बिनो-मेलॅनोसिस या गोष्टींचे अर्थ त्याला माहिती होते. त्यावरून ‘ब्लॅक पँथर’ असा वेगळा प्राणिप्रकार नसतो, तो मेलॅनिन जास्त असलेला बिबट्याच असतो वगैरे सांगितलं. कर्करोग म्हणजे काय व तो कसा होतो याची कारणे व  मूळ कोठे याचेही त्याला बरेच ज्ञान होते.

तो दरवर्षी अंदमानला अशी अभ्यासू इच्छुकांची सहल घेऊन जातो. तिथे सगळ्या प्रकारच्या स्थानिक व स्वदेशी झाडांच्या जाती आहेत. त्याच्याकडे त्यांतलीपण काही झाडं होती.

त्याच्या जंगलात विंचवांची बिळं  तर जागोजाग होती. पुढे खेकड्यांची जमिनीवरची ओबडधोबड वारुळांसारखी घरं  दिसली. पुष्कळ खेकडे आणि काळे विंचू आहेत म्हणाला या जंगलात .

 पुष्कळ फुलपाखरं दिसली. अनेक प्रकारचे मॉथ दाखवले त्याने. त्यांतले काही बेमालूमपणे लायकेनसारखे दिसणारे असतात असे सांगितले. काही देखणे दिसणारे  – सुरवंट निघून गेलेले – कोष  दाखवले. त्यांच्यावर दव पडल्यामुळे ते अगदी देखणे दिसत होते. 

असंख्य प्रकारचे पक्षी त्यांच्या कॉलवरून ओळखून तो सांगत होता. ब्लॅक हुडेड ओरिओल, ऑरेंज  मिनिवेट, व्हाईट चीक बार्बेट वगैरे. 

बी आणि बीज यांतला फरक व त्याचे जंगलासाठी व निसर्ग-संवर्धनासाठी असलेले महत्त्व  सांगितले त्याने. नुसतेच पाणी साठवून उपयोग नाही; तर जंगले वाढवणे गरजेचे आहे, त्यांचं संवर्धन करणे हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अंतिम मार्ग आहे  असं म्हणाला. कोविडसंबंधी बोलताना एक अफलातून विधान केलं त्याने! म्हणाला, की कोविड हा व्हायरस नसून, ते माणूस नावाच्या व्हायरसवरची लस आहे. ते ऐकून हतबुद्धच  झालो आम्ही. आपण पृथ्वीचा विध्वंस करतोय आणि निसर्गाला समजून न घेता त्याच्यावर मात करायचा प्रयत्न करतोय हे खूप वाईट आहे आणि आपल्या विनाशाला कारणीभूत आहे. भविष्यकाळात पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आपत्ती येणार आहेत व आपली लोकसंख्या खूप कमी होईल  असं धाडसी विधानही केलं त्यानं. जवळ जवळ दोन तास आम्ही तिथे फिरत होतो ज्याच्यामुळे ज्ञानात भर पडली पुष्कळ. आम्ही यासाठीच गेलो होतो. नवनवीन ठिकाणं, तिथल्या अशा अवलिया माणसांबरोबर वेळ घालवला की समृद्ध वाटतं अगदी. एरवीच्या आपल्या शहरी जगण्यात आपण आपल्या मूळ गोष्टींपासून किती फारकत घेतली आहे हे अगदी प्रकर्षानं जाणवतं.

दुपारी आमच्या बाजूच्या खोलीत आणखी दोघे उत्साही बर्डर्स आले पुण्याहून. त्यांना घेऊन नंदू फिरायला गेला.  आम्ही श्रीकांतसोबत आणखी एका जंगलात गेलो. तिकडे जाताना या मुलांनी जंगलाला पाणी  देण्यासाठी बांधलेल्या विहिरी पहिल्या.

 तिकडे एक देवराई होती. तिथं अगदी पाचशे वर्षांपासूनची झाडं होती.

श्रीकांतनेपण पुष्कळ माहिती दिली. म्हणाला, “झाडांशी चांगलं वागावं, ती आपल्याला सकारात्मक  ऊर्जा देतात.” अर्थात या मुलाचादेखील पाया हा आध्यात्मिकतेवरच आधारलेला. तो सांगत होता, ‘मी नंदूला सांगतोय  की इथल्या झाडांच्या काही हायब्रीड जाती लावू या, इथं येणाऱ्या लोकांना जेवणात देता येतील.’ पण नंदू अशा उत्पादनांच्या अगदी विरोधात आहे. त्याचे कारण दुसरे दिवशी नंदूने सांगितले. म्हणाला हॉर्मोन्स देऊन सगळ्या झाडांची वाढ करणे हे खूप भयावह आहे. उद्या आपण माणसाची अशी वाढ केली तर ते किती अयोग्य होईल कल्पना करा. त्याने जी उदाहरणे दिली ती थोडी कटू वाटली तरी सत्य होती. 

त्या रात्री आम्ही वस्तीबाहेर काही रात्रीचे पक्षी पाहायला गेलो आणि चंद्रप्रकाशात मस्त नाहून आलो.

  जेवण  झाल्यावर त्याने विंचवाची बिळं पाहायला नेलं आणि काळे विंचू, काही कोळी आणि लहानगे रंगीत बेडूक दाखवले. विंचवाची  नांगी प्रथमच पाहायला मिळाली.

दुसरे दिवशी सकाळी त्याच्या आणखी एका जंगलात गेलो आम्ही सगळेच. तिथे ३-४ ठिकाणी त्याने अभ्यासासाठी  लावलेले कॅमेरे होते ..

खालती एक ओढा होता व हे त्याचे ध्यानाला बसण्याचे ठिकाण. तिथे तो ध्यानाला कोणत्या दगडावर बसतो ते दाखवलं त्याने. तिथे अगदी नीरव शांतता होती – नुसता वाहणाऱ्या पाण्याचा आवाज.  

आणखी एक ज्ञानात भर पडली म्हणजे एका झाडाचं  मूळ बाजूची माती ढासळल्यामुळे  बाहेर  दिसत होतं व त्याच्या एका भागाभोवती मुंग्यांचं  वारूळ झाल्यासारखा  गठ्ठा होता मातीचा. राहुलने विचारल्यावर घेऊन गेला तिकडे व खाली बसून त्याला हात लावून ते कसं मऊ आहे ते पाहायला सांगितलं. म्हणाला, “मुळाला झालेला आजार (गॅंगरीन) हे किडे दुरुस्त करताहेत.” ते उलगडून आत मूळ कसे पूर्ववत होतेय ते दाखवलं. (regeneration). खरंतर असं किती ठिकाणी पाहिलं होतं लहानपणीदेखील; पण त्याचा अर्थ आत्ता समजला. हे खूपच छान वाटलं. हा मुलगा निसर्गाशी किती जवळचं नातं ठेवून आहे याची परत एकदा जाणीव झाली.

 या जंगलांमध्ये वन्य जनावरंदेखील आहेत आणि दिसतात म्हणाला. इथेदेखील काही पक्षी पाहता  आले.  हीदेखील एक मोठीच २ तासांची रपेट झाली. 

    तिथून परत  आल्यावर त्या साऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही बरीच नवीन माहिती व ज्ञान संपादन करून  परतीच्या मार्गावर निघालो. नंदू तांबे या जंगल-संवर्धनाच्या ध्येयाने भारलेल्या, आध्यात्मिक प्रवृत्तीच्या, निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या, सळसळत्या उत्साहानं भरलेल्या तरुणाची भेट हा आमच्या दृष्टीने एकूणच एक खूप वेगळा व संस्मरणीय  अनुभव होता आणि असा अनुभव हा तिथल्या आणखी नवीन गोष्टी पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी त्याच्याकडे बऱ्याच भेटी द्याव्या लागतील आम्हांला. खरंतर आणखी अनेक माहितीपूर्ण गोष्टी सांगितल्या त्यानं,  पण ब्लॉग लिहिण्याची मर्यादा पाहता त्या सगळ्या इथं नमूद करणे अवघड  आहे आणि त्याहीपेक्षा प्रत्यक्ष  नंदूच्या तोंडून ही  सगळी माहिती ऐकणे खरोखरंच वेगळा आनंद देते आणि तेच अधिक सयुक्तिक ठरेल!!

नंदू तांबे ध्वनी क्रमांक – ९९२२५८७००१

Author

Leave a Reply