महुद ते ह्यूस्टन : लेख ४

मुंबई ते ह्यूस्टन प्रवास (२७ ते २९ ऑगस्ट १९८१)

२७ ऑगस्ट १९८१ला माझ्या घरचे व मित्रमंडळी मिळून जवळ जवळ ४० लोक मला सेंडऑफ द्यायला मुंबई विमानतळावर आले होते. ४४ वर्षांपूर्वी परदेशात जाणं हे आजच्या इतकं कॉमन नव्हतं. तो माझ्या आयुष्यातला पहिलाच विमानप्रवास होता. प्रयाणापूर्वीच्या दोन आठवड्यांतील खरेदी आणि  तयारीच्या प्रचंड दगदगीमुळे मी नुसता दमलोच नव्हतो; तर सर्दीने बेजार पण झालो होतो. मी जेव्हा पहाटेच्या पहिल्या एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानात बसलो तेव्हा मला पुढच्या दोन दिवसांत किती दिव्यांना तोंड द्यावे लागणार आहे याची पुसटशी कल्पनादेखील नव्हती. बाबांनी दिलेल्या औषधामुळे मी बहुतेक वेळ झोपलोच होतो. लंडनला उतरून टर्मिनल बदलून पुढच्या विमानात बसायला जाणार तर गेटवर घोषणा ऐकली : “एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स (ATC ) च्या संपामुळे अमेरिकेला जाणाऱ्या साऱ्या फ्लाइट्स अनिश्चित वेळेपर्यंत विलंबित झाल्या आहेत. प्रवाशांनी विमानतळातच राहावे.  क्षमस्व!”  प्रत्येकाला ६ पौंड  मिळाले; पण रेस्टॉरंटमधल्या अवाच्या सवा किमतींमुळे मी जेमतेम एक कसलंतरी बेचव सँडविच खाऊ शकलो. नशिबाने काही शिलींग व पेन्स मोड मिळाली, त्यामुळे पे-फोन वापरून माझ्या लंडनमधल्या काकांशी तासभर बोलू शकलो.

शेवटी ५-६ तासांच्या कंटाळवाण्या ब्रेकनंतर आमचं दुसरं विमान उडालं आणि जेव्हा आम्ही न्यूयॉर्कच्या JFK विमानतळावर पोचलो, तेव्हा माझी ह्यूस्टनची कनेक्टिंग फ्लाईट कधीच निघून गेली होती. एअर इंडियाने सगळ्या प्रवाशांचे दुसऱ्या दिवशीचे बुकिंग केले. (माझं सकाळी १०चं विमान होतं.) नंतर बसने सर्वांना मॅनहॅटनमधल्या एका हॉटेलात नेलं. तोपर्यंत रात्रीचे ११:३० वाजून गेले होते. सगळी रेस्टॉरंट्स बंद झालेली! मी आईने दिलेल्यातल्या दोन पुरणपोळ्या खाऊन भूक थोडीशी भागवली. झोपायचा विचारही अशक्य होता. जेट लॅग म्हणून नाही; तर माझ्या ‘कुंभकर्ण’ असल्याच्या ख्यातीमुळे मी बऱ्याचदा घड्याळाच्या गजरानेही उठलेलो नाही.  TV वर वेगवेगळे चॅनेल्स बघत होतो. बहुतांशी अमेरिकन इंग्लिश उच्चार फारसे कळत नव्हते तरी. कधीतरी ५:४५ ते ६ च्या दरम्यान मला डुलकी लागली असणार! हॉटेल ऑपरेटरचा ६:३० चा ‘wake-up’ फोन कॉल मला ऐकू आलाच नाही. जाग आली तेव्हा १०:३० झाले होते. बस व विमान तर चुकले होतेच; पण ब्रेकफास्टसुद्धा बंद झालेला.  आता मलाच नवीन reservation करावं लागलं. ते २:३० चं मिळालं.शटल बसने विमानतळावर पोचलो. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. बॅग चेक-इन झालेली. झक मारत जवळच्या २१ डॉलर कॅशपैकी अडीच डॉलर  खर्च करून स्वस्तातील स्वस्त ‘हॉट डॉग’ नामक प्रकार आयुष्यात प्रथमच खाल्ला. माझ्याजवळ फक्त एक फोन नंबर होता ह्यूस्टनच्या मित्राचा. नशिबाने तो घरी होता. (आणि आधल्या रात्रीच्या फुकट घालाव्या लागलेल्या खेपेनंतरही माझ्याशी बोलला.) त्याने मला विमानतळापासून त्याच्या अपार्टमेंटपर्यंत लिफ्ट दिली. नशिबाने पुढचे दोन दिवस शनिवार-रविवार असल्याने मला थोडी विश्रांती मिळाली व १२ तासांच्या वेळेतील बदलाला समायोजित होता आलं. रविवारी संध्याकाळी मी ह्यूस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पोचलो.   एका हॉस्टेलमध्ये खोली मिळाली. पुन्हा एकदा माझं ओरिएंटेशन हुकलं होतं आणि पहिला आठवडा मला नवीन मित्रांच्या मदतीने सर्व गोष्टी शिकाव्या लागल्या – त्या १.२ x १.२ मैल (३.६ चौ. कि. मी.) भव्य कॅम्पसवर!

युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टन मधले Ph. D. शिक्षण संशोधन (३१ ऑगस्ट १९८१ – फेब्रुवारी १९८७)

आमचे वर्ग सोमवारी ३१ ऑगस्टला सुरू झाले. पहिल्या सेमिस्टरमध्ये चार महत्त्वाच्या विषयांचे अभ्यासक्रम होते. सर्व प्राध्यापक व अभ्यासक्रमांची पातळी अत्यंत उच्च दर्जाची असल्याने माझ्या एम. टेक. शिक्षणाचा इतर     बी. टेक. विद्यार्थ्यांपेक्षा मला फार काही फायदा झाला नाही. गृहपाठ खूपच अवघड असायचे आणि सर्व परीक्षा तर (काही open-book असूनही) अत्यंत आव्हानात्मक! 

सर्वात अवघड (माझ्या दृष्टीने) कोर्स होता ‘मॅथेमॅटिकल मेथड्स इन केमिकल इंजिनियरिंग’ – ज्याचे प्राध्यापक होते डॉ.नील अमुंडसन – त्यांना केमिकल इंजिनियरिंगचे ‘पितामह’ म्हणायचे, कारण त्यांनी १९४०-५० मध्ये फक्त रसायनशात्र व भौतिकशास्त्रांतर्गत  असणाऱ्या काही शाखेत ‘लिनिअर अल्जिब्रा’ व ‘डिफरेन्शिअल इक्वेशन’ आणून या शाखेला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी सुरुवातीची ३०-३५ वर्षे युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटामध्ये शिकवलं होतं. तिथल्या केमिकल इंजिनियरिंगच्या इमारतीला त्यांचं नाव दिलं आहे. माझे आय. आय. टी. मद्रासचे सगळे मित्र त्यांना ‘ताता’ (म्हणजे तमीळमध्ये ‘आजोबा’) म्हणायचे. बाकीच्या तीनही विषयांचे वर्ग सोमवार ते गुरुवार संध्याकाळी ५:३० – ८:३० वाजता होते; कारण त्यामध्ये फुलटाइम नोकरी करून पार्ट-टाइम कॉलेज करणारे बरेच विद्यार्थी होते.

अभ्यासाव्यतिरिक्त माझ्यापुढे आणखी दोन आव्हानं होती :

१ हॉस्टेलमध्ये राहत असल्याने कॅफेटेरियामध्ये जेवणं भाग होतं. सकाळचे वर्ग ब्रेकफास्ट (७:१५-७:४५) नंतर लगेच होते आणि संध्याकाळी तर घाईघाईत ४:३०-४:५० या वेळात कसंबसं जेवण उरकून (कारण कॅफेटेरिया ७:३०ला बंद) पुढले तीन तास वर्गात. इतकं सगळं उच्च कॅलरीयुक्त खाल्ल्यावर डोळे उघडे ठेवून वर्गात एकाग्रता राखणं हे म्यां पामराला अशक्यच होतं. 

२ लंच व डिनरला बहुतेक वेळा सूप, सॅलड, सॅंडविच, फ्राईड चिकन असं सगळं बेचव (भारतातील तिखट व मसालेदार जेवणाची सवय असल्याने) जेवण, म्हणून बहुतेक वेळा २-३ आइसक्रीम  खायचो (भारतात असताना न परवडणारं.) ब्रेकफास्टला मात्र चंगळ असायची – ऑम्लेट किंवा अंडाभुर्जी, संत्र्यांचा व सफरचंदाचा रस, डोनट, बिस्किटं, पावांचे वेगवेगळे प्रकार आणि हे सगळं हवं तेवढं! ह्यामुळे माझं वजन एका महिन्यात १० किलोंनी वाढलं. अमेरिकेत कपडे महाग म्हणून नव्या शिवून आणलेल्या सगळ्या पँट्स बसेनाशा झाल्या! त्या अल्टर करून घेण्यापेक्षा नव्या पँट्स घेणं स्वस्त होतं; पण बजेट थोडंच. तेव्हा मी Wrangler ब्रँड च्या दोन जीन्स घेतल्या – प्रत्येकी $९.९९ ला आणि पुढील दोन वर्षं वापरल्या – दर दोन आठवड्यांनी लॉंड्री करत!!

अमेरिकेतील केमिकल इंजिनियरिंगच्या सर्वोत्तम १० पैकी एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकताना पहिली गोष्ट लक्षात आली की येथे IIT मुंबईपेक्षासुद्धा आणखी कठीण जाणार आहे; कारण आमच्या वर्गात एकूण १३ विद्यार्थी होते ते पुढीलप्रमाणे : ५ IIT मद्रासचे बी. टेक. (सगळे त्यांच्या बॅचमधल्या पहिल्या दहांत), ६ तैवानच्या सर्वोत्तम युनिव्हर्सिटीमधले (सगळे त्यांच्या बॅचमधल्या पहिल्या दहांत), मी IIT मुंबईचा एम. टेक. टॉपर, आणि एकमेव अमेरिकन लान्स लोब्बन (जो त्याच्या युनिव्हर्सिटीचा टॉपर). पहिल्या सेमिस्टरच्या अखेरीस मला दोन विषयांत A, एकात A- व एकात B+ अशा ग्रेड्स मिळाल्या.

येताना आणलेले $५०० फी, पाठ्यपुस्तकं (प्रत्येकी $४०-५०), हॉस्टेलचं भाडं, कॅफेटेरियाचे महिन्याचे ॲडव्हांस आणि बँकेत खाते उघडणे इ.मध्ये संपून गेले. आम्हांला दरमहा $६०० छात्रवृती मिळत होती (महिना संपल्यावर). मी बाकी खर्चाबरोबर माझ्या कर्जाचे $१०० पण फेडत होतो (तेव्हा विनिमय दर १$ ला फक्त ८.५ रु. होता). ते कर्ज संपल्यानंतर पुढील ३ वर्षांत मी माझ्या आई-वडिलांच्या डोंबिवलीच्या ब्लॉकचे कर्जपण फेडले. त्यामुळे बाहेर खाणे किंवा काही चैन करायला पैसेच नव्हते. नाही म्हणायला दर गुरुवारी रात्री आम्ही ५-६ मित्र कॅंपसवर ‘युनिव्हर्सिटी पिझ्झा’मध्ये आठवड्याचा शीण घालवायला एक पिझ्झा (ज्यावर कांदा व हालापिनो ही टॉपिंग्स असायची), प्रत्येकी २-२ पिसेस खायचो. माझ्या मते ते आठवड्यातील सर्वोत्तम जेवण असे. शुक्रवारी फक्त एक सेमिनार असायचा – सकाळी ११-१२. त्या वातानुकूलित सभागृहात दिवे बंद झाले की बहुतेक वेळा (विषय कंटाळवाणा असल्यास) मी चक्क मागच्या रांगेत बसून झोप काढायचो.

जरी एका नव्या देशात व एका नव्या संस्कृतीच्या वातावरणात आम्ही होतो, तरी आमचे बरेच सिनियर (बहुतांशी IIT मद्रासचे) तेथे ३-४ वर्षांपासून असल्याने त्यांच्या अनुभवातून आम्हांला बऱ्याच गोष्टी लवकर शिकता आल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीजणांकडे सेकंडहॅंड गाड्या होत्या व ते आम्हांला महिन्यातून १-२ वेळा खरेदीला न्यायचे. ते सुंदर (बिन-खड्ड्यांचे) हायवे (एकही सिग्नल नाही), त्यावरून ६०-७० मैलांच्या वेगाने धावणाऱ्या सुंदर गाड्या, उंच पुलांची जाळी, मोठी दुकाने व शॉपिंग मॉल्स.  महुदसारख्या खेड्यात वाढलेल्या व पंढरपूरसारख्या छोट्या शहरात शिकलेल्या मला ते एक ‘जादुई जग’ होते सवय होईपर्यंत!

ह्यूस्टनची हवा उन्हाळ्याच्या मोसमात (मे ते सप्टेंबर) मुंबईसारखीच उष्ण व दमट असते. हेमंत ऋतूत (ऑक्टोबर-नोव्हेंबर) व वसंत ऋतूत (मार्च -एप्रिल) बहुतेक वेळा सुंदर व आनंददायी, कमी दमट असते. हिवाळ्यात मात्र खूपच थंड – कधीकधी गोठवणारी पण असू शकते. मी ४४ वर्षांत हिमवर्षाव २-३ वेळाच पाहिलाय (सर्वात नजीकचा जानेवारी २०२५ मध्ये  झालेला). पण गोठलेला पाऊस किंवा बर्फ दरवर्षी एकदा तरी असतंच. मला आठवतंय की १९८३ च्या डिसेंबरमध्ये सलग ४ दिवस (१०० तास) ह्यूस्टनचं तापमान गोठणबिंदूखाली होते. आम्ही सर्व मित्र जवळच्या हर्मन उद्यानात गोठलेला तलाव पाहायला गेलो होतो, मोठे कोट घालून. (त्यातल्या बर्फावर उभा राहून मी फोटो पण काढला होता.)  कारंजातील उडालेल्या पाण्याच्या थेंबांनी काठावरच्या झाडांवर बनवलेली iciclesची अप्रतिम कलाकुसर अजूनही डोळ्यांसमोर आहे.

ह्यूस्टनमध्ये आल्यापासून दरवर्षी अनुभवायला मिळणारा एक चित्तथरारक (किंवा रोमांचक) अनुभव म्हणजे जून ते ऑक्टोबर दरम्यान अटलांटिक महासागर, कॅरिबियन समुद्र व गल्फ ऑफ अमेरिका (किंवा मेक्सिको) मधून येणारी ‘हरिकेन’ नामक चक्रीवादळे. भारतात यांनाच ‘सायक्लोन’ म्हणतात; तर जपान व कोरिया भागात ‘टायफून.’ ७५ ते १५०+ मैलांच्या (१२० ते २४०+ कि. मी.) वेगाने फिरणारी व २ ते २० मैलांच्या (३ ते ३२ कि.मी.)  वेगाने पुढे जाणारी! पूर्वी त्यांचं ट्रॅकिंग अनिश्चित असायचं. गेल्या १०-१५ वर्षांत उपग्रहांमुळे आता शेवटच्या १-२ दिवसांत अंदाज ९५% बरोबर असतात. वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान होऊ शकतं; पण कधी-कधी खूप पाऊस पडून भयानक महापूर येतात. हा फटका समुद्रकिनाऱ्यांवरील राज्यांना जास्त बसत असला; तरी अंतर्गत राज्यंही वाचत नाहीत पावसाच्या तडाख्यातून. माझ्या ह्यूस्टनमधल्या ४४ वर्षांच्या वास्तव्यात ॲलिसिया (१९८३), ॲलिसन (२००१, ३०” पाऊस), ब्रेट (२००४), रिटा (२००५), आइक (२००८), हार्वी (२०१७, ३५ ते ६०” पाऊस) व बेरील (२०२४) यांचा धुमाकूळ व विध्वंस मी अनुभवला आहे.

पुन्हा वळू या १९८२कडे. आम्हांला कॅफेटेरियातील जेवणाची ना किंमत आवडली, ना दर्जा. म्हणून दुसऱ्या वर्षी आम्ही ४ मित्र कॅंपसजवळील एका २-बेडरूम अपार्टमेंटमध्ये राहायला गेलो. आम्ही भाडे चौघांत व जेवणाचा (ग्रोसरी) खर्च  पाच जणांत वाटून घेतल्याने(कारण एक सिनियर पण यायचा.) आमच्या पहिल्या वर्षातील हॉस्टेल व कॅफेटेरियापेक्षा खर्च कमी झाला. दोघांनी गाड्या घेतल्या. यामुळे आमची सोय झाली. आम्ही आयांना विचारून किंवा स्मरणशक्ती आणि ट्रायल-एरर वापरून लवकरच छान स्वयंपाक करू लागलो. प्रत्येकाची पाळी – स्वयंपाक करण्याची व दुसऱ्या दिवशी भांडी घासायची, ५ दिवसांतून एकदाच.

ह्या सर्व घटना, अभ्यास व परीक्षांचा ताण असताना माझ्या सुदैवाने मला IIT मुंबईचे दोन मित्र (अनिल दिवाण व दीपक ढमढेरे) मिळाले. माझ्यापेक्षा लहान व १-२ वर्ष मागे; पण मी एम. टेक. केल्याने माझ्या आधी किंवा बरोबरच ह्यूस्टनमधील एका दुसऱ्या प्रसिद्ध Rice युनिव्हर्सिटीमध्ये होते. आम्ही ३-४ मैलांवर राहत होतो; पण मी बसने जाऊ शकायचो. अनिलकडे गाडी होती. आम्हांला शहरातील बरीच मराठी (नोकरीवाली) कुटुंबं शुक्रवारी आणि शनिवारी रात्री जेवायला व गप्पा मारायला बोलावू लागली. आम्ही त्यांची करमणूक करायचो, मराठी गाणी म्हणायचो आणि त्यांना नॉस्टॅल्जियापण मिळायचा. आम्ही १९८२-८३ च्या मराठी मंडळाच्या कमिटीवर गेलो. वर्षातून होणाऱ्या ४-५ महत्त्वाच्या समारंभांपूर्वी वृत्तपत्र लिहिणे, त्यासाठी जाहिराती मिळवणे, शब्दकोडी बनवणे इ. 

आम्ही तिघांनी रत्नाकर मतकरी लिखित ‘बिऱ्हाड बाजलं’ या नाटकात कामं केली. दीपक संगीत दिग्दर्शकपण होता. मला काही वर्षानंतर कळलं, की ते जॅक लेम्मोन व शर्ली मॅकॅलेन या जगप्रसिद्ध अभिनेत्यांच्या ‘द अपार्टमेंट’ या सिमेनावर आधारित होतं. आम्ही तिघे स्वयंपाकात वाकबगार झालो व आत्मविश्वास दांडगा! १९८३ ला दीपक मास्टर्स संपवून कॅलिफोर्नियाला नोकरीला जाण्यापूर्वी आम्ही ह्यूस्टनमध्ये ‘न भूतो न भविष्यति’ अशी गोष्ट केली. ४० मराठी कुटुंबांना (८०-८५ प्रौढ व १५-२० मुलं) आम्ही २ दिवस स्वयंपाक करून साग्रसंगीत जेवण घातलं. बेत होता : बासुंदी-पुरी, मसालेभात, बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर, टोमॅटोचं सार, चटणी,पापड, इ. काही बायकांनी – स्वयंपाक न येणाऱ्या, आम्हांला चक्क पाककृती विचारल्या. 🙂

१९८२ मधली आणखी एक महत्त्वाची घटना – ज्ञान व घोकंपट्टीमधील फरक दर्शविणारी. जुलै अखेरीस ज्यांना Ph.D. करायची होती त्यांच्यासाठी ‘पात्रता परीक्षा’ होती. १३ पैकी ८-९ जण देणार होते. त्याच्या आधीच्या दोन्ही शनिवारी व रविवारी (म्हणजे एकूण ४ दिवस) ह्यूस्टनमध्ये ‘मराठी चित्रपट महोत्सव’ होता. १९५० ते १९८० मधील ७ अप्रतिम चित्रपट पाहण्याची संधी. मी एकपण पूर्वी पाहिला नव्हता. मी साधा विचार केला.  १९७६ पासून ते १९८२ पर्यंत मी केमिकल इंजिनियरिंगचे २०-२५ कोर्सेस व १.५ वर्ष संशोधन केलेलं. त्यामध्ये मी जर मूलभूत गोष्टींचं चांगलं ज्ञान मिळवलं हा आत्मविश्वास नसेल, तर आणखी ४ दिवसांच्या घोकंपट्टीने असे काय मोठे दिवे लावणार होतो? मी सर्व चित्रपट समरस होऊन पाहिले. सैद्धांतिक परीक्षेनंतर उत्तीर्ण झालेल्या तिघांत मी होतो. बाकीच्यांना एक संशोधन पेपर वाचून रचनात्मक टीका करायला लागली व काहींना आणखी तोंडी मुलाखतसुद्धा.

दुसऱ्या वर्षी माझे Ph.D. चे संशोधन सुरू झाले. प्रा. जेम्स टी. रिचर्डसन (JTR ) हे माझे मार्गदर्शक होते. त्यांच्याकडे एका ‘सोलर ऊर्जा’ प्रकल्पासाठी निधी होता; पण त्यांचे २-३ विद्यार्थी आधीच्या वर्षात नोकरी मिळाल्यामुळे कामं अर्धवट टाकून गेले होते. मला पुढल्या ३-४ वर्षांत खूपच काम करावे लागणार होतं. त्या प्रकल्पासाठी ३ वेगवेगळी करून दाखविण्याजोगी आव्हाने (deliverables) होती : 

अ) मोठ्या ‘पायलट प्लॅंट’स्केलवरील प्रयोग,

 ब) छोट्या स्केलवरील गतिज प्रयोग (मी M.Tech. च्या संशोधनात केले होते तसे)

 आणि 

क) त्याचे ‘गणितीय मॉडेल’ बनवणे – ज्या योगे त्या प्रक्रियेचे अचूक सिम्युलेशन करून आमच्या भागीदार ‘इस्राएल युनिव्हर्सिटी’ला एक खराखुरा व्यावसायिक  प्लॅंट बनवता येईल.

मी M.Tech.मध्ये तोंड  दिलेल्या आव्हानांपेक्षा   Ph.D. ची आव्हानं दसपट मोठी होती! त्यांतील काही महत्त्वाची – व मी त्यांच्यावर मात कशी केली – हे थोडक्यात खाली सांगतोय :

  • मी मागच्या एका लेखात सांगितलं होतं की माझं यांत्रिक बाबतींत ज्ञान फार कमी होतं. एका post-doc संशोधकाच्या मदतीने मी पायलट प्लँटची जुळवणी पूर्ण केली.
  • मला ‘कंट्रोल्स’ व ‘डेटा संपादन (acquisition)’ यामध्ये काहीच गती नव्हती. JTR नी त्यांच्या एका जुन्या विद्यार्थ्याला (J. C. शेन) आमिष दाखवलं : त्याने मला हे सगळं करायला मदत करायची, ज्याला ७-८ महिने लागले. नंतर ३-४ प्रयोग करून सर्वकाही व्यवस्थित आहे हे सिद्ध करायचं, म्हणजे  डेटा गोळा करणे, उत्पादने गोळा करणे आणि जीसी (गॅस क्रोमॅटोग्राफ) द्वारे उत्पादनांचे विश्लेषण पूर्ण झाले आहे याची खातरी करणे; व तेवढ्यावर (माझ्या २५% काम करून) त्याला Ph.D. मिळाली.
  • तरीसुद्धा माझे प्रयोग सुरू झाल्यावर लक्षात आलं की बऱ्याच समस्या गुंतागुंतीचं होतं सगळं पुढे  — जेव्हा मी ते १२ तासांचे प्रयोग करू लागलो. मला ते सर्व सोडवून चांगल्या गुणवत्तेचा डेटा मिळवायला आणखी एक वर्ष लागलं.
  • तोपर्यंत माझा ३ वर्षांचा व्हिसा संपला होता. त्यामुळे निघताना ठरवलेल्या – भारतात १ महिना सुट्टीवर जायच्या बेतावर – मला पाणी सोडावं लागलं. व्हिसाचं नूतनीकरण न होण्याचा धोका मी पत्करू शकत नव्हतो.
  • प्रत्येक प्रयोग १० ते १२ तास चालायचा. मी ‘निशाचर (night owl)’ असल्याने ते संध्याकाळी ५-६ ला सुरू करून सकाळी ६-७ ला संपवायचो. पुन्हा एकदा कॅंपसच्या बाहेर (पण सुदैवाने अपार्टमेंटपासून २ मिनिटांवर) एका मोठ्या इमारतीत मी रात्रभर – कुणी सोबतीला नाही – काम केलं. पुढील वर्षात असे जवळ-जवळ ६०-७० प्रयोग केले.
  • माझ्या पूर्वानुभवाच्या आधारे मी छोट्या स्केलवरील प्रयोगांसाठी उपकरणं जुळवू शकलो; पण एक नवीन आव्हान : माझ्या उत्प्रेरकाचं (catalyst) फार जलद गतीने निष्क्रियीकरण होत होतं. पुन्हा वेगवेगळ्या variables मध्ये बदल करत-करत तो प्रश्न सोडवायला आणखी ६ महिने गेले.
  • माझं ४थं वर्ष संपताना माझ्या आई-वडिलांना भेटायला बोलावलं. दुर्दैवाने रात्रीच्या प्रवासात आमच्या गाडीला अपघात होऊन माझ्या मानेतील ५व्या मणक्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झालं. नशीबाने ऑपरेशन करावं लागलं नाही; पण मला ३ महिने गळ्याभोवती एक कॉलर लावून विश्रांती घ्यावी लागली.
  • १ जानेवारी १९८६ रोजी मी राधिकेशी (माहेरची प्रभुदेसाई) लग्न केलं. आमची ह्यूस्टनमद्ये २-३ वर्षांपासून ओळख होती. जरी छात्रवृत्ती दरमहा $८४० झाली होती, तरी दोघांना खूपच काटकसरीत २ वर्षं काढावी लागली.
  • ह्याच सुमारास JTR ना आणखी एका प्रकियेचं संशोधन करण्यासाठी अनुदान मिळालं. मग काय, ‘चीप लेबर’ तत्त्वावर माझी Ph. D. आणखी वर्षभर लांबली.
  • पुढील गोष्टींना त्यानंतर ६-७ महिने लागले : मॉडेल फिटींग, डेटा विश्लेषण, २०० पानांचा Ph. D. प्रबंध लिहिणे, माझ्या मार्गदर्शकांच्या अभिप्रायावर आधारित अनेक सुधारणा करणे, सर्व रेखाचित्रे (सुमारे ७० आकृत्या) ग्राफ पेपरवर काढून ‘अमोनिया प्रिंट्स’ बनवणे आणि सारण्या (सुमारे ७०) तयार करणे व आमच्या सेक्रेटरीकडून टाईप करून घेणे (नशिबाने तिच्याकडे कंप्युटर असल्याने चुकांची दुरुस्ती करणे सोपं झालं; पण तिला $४०० द्यावे लागले.).
  • त्याशिवाय याच काळात मी JTR बरोबर माझ्या प्रबंधावर एक ‘संशोधन पेपर’ही लिहिला. तो एका मोठ्या जर्नलमध्ये स्वीकारला गेला.
  • मी माझ्या प्रबंधाचा यशस्वी ‘डिफेन्स’ फेब्रुवारी १९८७ मध्ये केला. दोन संस्मरणीय गोष्टी: १. मला टाय (कंठलंगोट) ची गाठ माझ्या शेजारच्या मित्राने लावून दिली होती. २. मी डिफेन्सपूर्वी २ आठवडे JTR ना माझ्या आडनावाचा बरोबर उच्चार कसा करायचा हेच शिकवीत होतो. 🙂
  • युनिव्हर्सिटीचा पदवीदान समारंभ मे १९८७ मध्ये झाला. आमच्याबरोबर राहणाऱ्या मित्राचे (मिलिंद देव) आई-वडील भारतातून आले होते व आमच्याबरोबर २ महिने राहिले होते.
  • मला हे सांगण्यात खूप अभिमान वाटतो की मी Ph. D. ला ३.९३/४ GPA मिळवून आमच्या बॅच मध्ये दुसरा आलो (पहिल्या IIT मद्रास च्या सीताराम ला ३.९८ होते).

अमेरिकेत शिकताना आलेले काही मनोरंजक अनुभव

अर्थातच ह्या ६ वर्षांत व्याख्यानं, अभ्यास, परीक्षा, संशोधन, लेखन यांशिवाय इतरही काही आयुष्य होतंच. काही ठळक आठवणी :

  • अमेरिकेत क्रिकेट नावालापण नव्हतं. लायब्ररीमध्ये लंडन टाइम्स यायचा – १ आठवडा उशिरा – नशीबाने भारतीय क्रिकेट संघाचा १९८३ विश्वचषक अंतिम सामना व वेस्ट इंडीसवरील अविस्मरणीय विजय आम्ही BBC च्या रेडिओ कॉमेंटरीतून ऐकू शकलो.
  • TV वर पाहायला मिळणारे (दररोजच काहीतरी चालू असतं ) खेळ म्हणजे : बेसबॉल, बास्केटबॉल, अमेरिकन फुटबॉल, आईस हॉकी, टेनिस, इ.टेनिस सोडल्यास इतर प्रत्येक खेळ समजून आनंद घ्यायला काही महिने ते १ वर्षपण लागलं.
  • १९८४ च्या लॉस अँजेलिसमधील ऑलिंपिक स्पर्धा १६ दिवस दररोज कित्येक तास TV वर पाहू शकलो; मात्र खऱ्या फुटबॉलची फक्त फायनल ३ मिनिटं दाखवली.
  • आमच्या युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टनची कॉलेज बास्केटबॉल टीम अमेरिकेत १ नंबरावर होती. १९८४-८५ मध्ये; पण दुर्दैवाने (किंवा ऐन वेळी चुका केल्याने) दोन्ही वर्षी चॅंपिअनशिपमध्ये हरली. हाच अनुभव पुन्हा ४० वर्षांनंतर ८ फेब्रुवारी २०२५ ला आला.
  • माझ्या मते अमेरिकेने जगाला दिलेली सर्वोत्तम भेट म्हणजे त्यांचे नॅशनल पार्क्स (१८७२ मध्ये जगातला पहिला वायोमिंग-मोंटाना राज्यांमध्ये ‘यल्लोस्टोन’), जे आता एकूण ६४ आहेत व माझे जवळ-जवळ ४० बघून झाले आहेत; पण सर्वांत आवडता आहे मी १९८४ च्या ऑगस्ट महिन्यात कॅलिफोर्निया राज्यात पाहिलेला ‘योसेमिटी.’ कदाचित ‘लव्ह ऍट  फर्स्ट साईट’ चा परिणाम.

युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टनमधील पोस्टडॉक्टरेट संशोधन आणि शेल कंपनीत मुलाखत (मार्च १९८७ – सप्टेंबर १९८८)

Ph. D. संपल्यानंतर मला ‘व्यावहारिक प्रशिक्षण’ असं १८ महिन्यांसाठी F-१ व्हिसाचं एक्स्टेंशन मिळालं. खनिज (crude) तेलाचे जागतिक भाव १९८६ पासून घसरलेले होते. त्यामुळे ह्यूस्टनमध्ये नोकरी मिळणं खूपच कठीण होतं. सुदैवाने JTRकडे अनुदानं होती व मी त्यांच्याकडेच post-doctoral संशोधन करण्याचा निर्णय घेतला. माझा वार्षिक पगार झाला $२४,०००. माझं काम होतं त्यांच्या दोन Masters व एका Ph. D. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. त्याबरोबरच आम्ही आणखी दोन पेपर्स लिहीत होतो, ज्यामध्ये माझ्या संशोधनावर आधारित व्यावहारिक अनुप्रयोगांचं वर्णन व इस्राएलमधील अनुभव होता. दोन्ही चांगल्या जर्नल्समध्ये स्वीकारले गेले.

एका वर्षानंतरसुद्धा कंपन्यांमध्ये नोकऱ्या नव्हत्याच व बरेच ले-ऑफ होत होते. सुदैवाने माझा मित्रपरिवार खूप मोठा होता. एकीच्या शिफारशीवर मला जगप्रसिद्ध व तेव्हाच्या तेल आणि वायू कंपन्यांत १ नंबरच्या ‘शेल’मध्ये काही वर्षं नोकरी करत असलेल्या एका Ph. D. इंजिनियरला (अजय माडगावकर) भेटता आलं. मी त्याच्या ऑफिसमध्ये मे १९८८ अखेरीस गेलो. त्याने माझ्या CV मध्ये काही सुधारणा सुचवल्या व त्यानंतरच्या १-२ महिन्यांत त्याच्या ओळखीच्या ४-५ मॅनेजर्सकडे माझा अर्ज पोचवला. त्यांतील एक (जॉर्ज हार्पर) हा तंतोतंत माझ्याच अनुभवाचा उमेदवार शोधत होता. मला १५ ऑगस्टच्या सुमारास एक दिवसाच्या मुलाखतीसाठी बोलावणं आलं. मी माझ्या संशोधनाच्या सादरीकरणासाठी Ph. D. च्या डिफेन्ससाठी केल्याच्या दसपट प्रॅक्टिस केली (बिचारी राधिका! दोन आठवडे ऐकत होती घरात!!). गट-चर्चा व १-on-१ मुलाखतींमध्ये मी सर्व व्यवस्थापक आणि ४-५ इंजिनीयर्स वर (त्यातील एक JTR चाच विद्यार्थी होता – ७ वर्षांपूर्वी) छान  छाप पाडली. दोन आठवड्यांनंतर मला नोकरी मिळाल्याचा फोन आला एका उच्च व्यवस्थापकाकडून. माझा वार्षिक पगार होता $४७,०००. ज्या कंपनी व नोकरीचं मी २ वर्षं स्वप्न पाहत होतो, ते फळास आले. म्हणतात ना, “I  was in the Right place at the Right time.”

एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली. माझ्या Ph. D. संशोधनावर आधारित पेपरला १९८८ मध्ये अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीयर्स जर्नल (AIChE J. ) च्या southwest रिजनमध्ये ‘सर्वोत्तम तांत्रिकी पेपरचं’ पारितोषिक मिळालं.

आगामी आकर्षण : माझी शेल कंपनीतील कारकिर्द (पूर्वार्ध)

Author

Leave a Reply