
‘गुलाम काळा संताघरचा, हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम’ —– आकाशवाणीतून ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातील धून कानावर पाडली आणि मी तंद्रीतून दचकून जागा झालो. संतांनी तर सांगून ठेवले आहे वरलिया रंगा भुलू नकोस वगैरे; पण मी दचकण्याचे कारण निराळेच होते. वसाहतवादावरचे काही शोधनिबंध वाचत होतो. त्यात नमूद केले होते की वसाहतवादाची मुळे गुलामगिरीत आहेत म्हणून ‘गुलाम काळा’ हे शब्द आणि सोबतचे रंगरहस्य ऐकून गुलामगिरीचा वेध घेण्याचे ठरविले. या सूत्राने पुढे वसाहतवादापर्यंत पोचता येईल असे मला वाटले.
गुलामगिरी – एक आढावा
मानवी स्वभावाला अनेक कंगोरे आहेत. हे कंगोरे निसर्गाशी (निसर्ग म्हणजे ‘भोवताल’– अमानवनिर्मित आणि मानवनिर्मित) ‘चिवटपणे’ झगडताना मिळालेले असतात. निसर्गाचे दात आणि पंजे रक्तरंजित असतात. ‘नेचर इज रेड इन टूथ अँड क्लॉ’ असे डार्विन म्हणाला होता ते खरे आहे. मानवी वर्तनाला असलेले काटे त्यामुळे असतील; पण तेवढेच सत्य नाही. मानवी मेंदूच्या सांस्कृतिक उत्क्रांतीने या काटे-कंगोऱ्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. हे शतकानुशतके घडत आहे. मानवी स्वभावातला बोचणारा काटा म्हणजे ‘सुपीरियर’ आणि ‘इन्फीरियर’ – उच्च दर्जा आणि खालचा दर्जा, श्रेष्ठ आणि कनिष्ठ वगैरे वगैरे असे भेद मानणे आणि त्यानुसार वागणे. या वागण्यातून आणि भावातून गुलामगिरी या प्रथेचा उगम असावा. या उच्च-नीचतेचा निकट संबंध त्वचेच्या ‘रंगभूलीशी’ आहे. बॅबिलोनियन, असिरियन, पर्शियन, अरब, लोकांत गुलामगिरी होती. गुलामांना खच्ची करत असत. अरेबियन नाईट्समध्ये गुलामांसाठी ‘खच्ची’ हाच शब्द वापरलेला आहे. ‘भारतीय आर्यांत ही प्रथा नव्हती,’ असे श्री महाभारत-उपसंहार या ग्रंथात चिं. वि. वैद्य यांनी लिहिले आहे, (श्री महाभारत उपसंहार लेखक चिं. वि. वैद्य. प्रफुल्लता प्रकाशन पुणे पुनर्मुद्रण ११ ऑक्टोबर २०१६)भारतात वेठबिगार पद्धत होती. ती अजूनही चालू आहे. दोन-एक वर्षांपूर्वी भिवंडी येथे काही वेठबिगार कुटुंबांना वेठबिगारीतून सोडविल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचल्या होत्या. आफ्रिकेतून अमेरिका, वेस्ट इंडिज येथे ‘स्लेव्हरीचा’ प्रचंड आर्थिक व्यवहार दोन शतकांपूर्वीपर्यंत पाश्चात्त्य गोऱ्या मंडळींनी चालू ठेवला होता. गुलामगिरी म्हणजे फक्त ‘काम करणे’ एवढाच ‘अर्थ’ नव्हता. गुलामांच्या शरीरावर मालकाचा पूर्ण हक्क होता. ‘गुलाम’ हा मालकाच्या स्थावर जंगम मालमत्तेचा भाग होता. जेफरसन या अमेरिकी राष्ट्राध्यक्षाकडे गुलाम कुटुंबे होती. गुलाम महिलेपासून त्याला संतती झाली होती. जेफरसनची कृष्णवर्णीय पतवंडे आजही अमेरिकेत जिवंत आहेत हे डि एन ए चाचणीने सिद्ध झाले आहे.
कातडीच्या रंगावर उच्च नीच दर्जा ठरत असे. भारतीय संस्कृतीतील ‘चातुर्वर्ण्य’ म्हणजे ‘रंगावरून ठरलेल्या चार जाती.’ ‘बाहेरून येणारे आर्य व हिंदुस्थानात राहणारे दास – अनार्य यांच्यामधील महदन्तर हे होय, आर्य गोरे असून नाका-डोळ्याने सुस्वरूप व अनार्य दास हे काळे असून बसक्या नाकाचे होते,’ असे ‘श्री महाभारत उपसंहार’ यात चिं. वि. वैद्य यांनी नमूद केले आहे.
इसाप ते अरेबियन नाईट्स
इसाप हा ग्रीक आणि रोमन संस्कृतीमधील एक गुलाम. काळा, कुरूप पण हुशार. ‘इसापचे चरित्र’ हे लीला मस्तकार रेळे यांनी मराठीत अनुवादित केलेले छोटेखानी पुस्तक माझ्याकडे आहे. (Aesop by A D Wintle). राजीव प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलेली १९९० सालची दुसरी आवृत्ती मी वाचली होती. Aesop’s Fables A new translation by Laura Gibbs Oxford World’s Classics, Oxford University Press, या २०१८ साली पुनःप्रकाशित पुस्तकाने बराच प्रकाश टाकला. पुस्तकाची प्रदीर्घ प्रस्तावना आणि टिपा त्या काळातील संस्कृती, गुलामगिरी याबाबत माहिती देतातच; पण बरेच तात्त्विक विवेचनही समजते. विलक्षण व्यासंग अनुभवता येतो. गौरी देशपांडे यांनी रिचर्ड बर्टन यांच्या ओरिजनल १६ खंडी अरेबियन नाईट्सचे तळटिपांसहित मराठीत सुरस भाषांतर केले आहे. (अरेबियन नाईट्स, सर रिचर्ड एफ् बर्टन. अनुवाद : गौरी देशपांडे. प्रकाशक रमेश विठ्ठल रघुवंशी श्रीगजानन बुक डेपो दादर मुंबई – १९७७) त्यातील तळटिपा म्हणजे मध्यपूर्व देशांतील संस्कृती, कला, प्रथा, चालीरिती या बाबतच्या माहितीचा खजिना आहे. त्या मार्मिक टिपा वाचल्यानंतर गुलामगिरीबाबत बरीच माहिती मिळाली. उदाहरणादाखल काही तपशील पाहू : अरेबियन नाईट्समध्ये बरेच गुलाम काळे असतात पण अधूनमधून ‘श्वेत गुलाम’ असाही उल्लेख येतो. गुलामगिरीचे काही नियम असतात. गुलाम स्वतः दास्य-मुक्त होण्यास तयार नसेल तर त्याला गुलामगिरीतून सोडून देता येत नाही. जेव्हा सिंधमध्ये सर चार्ल्स नेपियर यांनी फतवा काढून शिद्दी गुलामांना दास्यमुक्त केले तेव्हा गुलामांत हाहाकार माजला. अंग्रेजी दयाळूपणामुळे त्यांतले बरेच गुलाम अन्नान्न करून उपाशीपोटी मेले असणार असे रिचर्ड बर्टन यांनी नमूद केले आहे. दास्य-विमोचन हा विषय रोमन कायद्यावर आधारित असून, ‘हिदाया’ व इतर धर्मग्रंथांतून याबाबत पुष्कळ विवेचन आहे. गुलामाचा लिलाव होताना दलाल गुलामाचे गुणदोष सांगतो. गुलामाला त्याच्या गुणदोषांसकट विकत घ्यायचे असते. एकदा विकत घेतल्यानंतर त्याच्या दोषासाठी मालकाला त्याला शिक्षा करता येत नाही. एका गुलामाला वर्षातून एकदाच खोटे बोलण्याची मुभा असते; पण त्या खोट्या बोलण्याने गुलाम मालकाची कशी वाट लावतो याची ‘काफूरची गोष्ट’ही मार्मिक कथा अरेबियन नाईट्सच्या दुसऱ्या खंडात आहे. एकंदरीत गुलामगिरीची चाल वाईटच होती; परंतु पाश्चात्त्य लोकांनी केलेली आफ्रिकनांची गुलामगिरी, त्यांचे हाल आणि गोऱ्या व्यापाऱ्यांच्या क्रूरपणाला मात्र तोड नव्हती. ब्रिटिश व्यापाऱ्यांनी गुलामांचा व्यापार लिव्हरपूल या बंदरातून केला. गुलामांनी खचाखच भरलेली गलबते आफ्रिकेतून लिव्हरपूल येथे येत, तेथे गुलामांचे सौदे होत; मग गलबते अमेरिका, कॅरिबियन बेटे इकडे रवाना होत. लिव्हरपूल हे धन्याढ्य बंदर झाले होते. काही वर्षांपूर्वी लिव्हरपूलला गेलो होतो. तेथील स्लेव्हरी म्युझियम पाहिला. तेथील काळ्या गुलामांचे फोटो, त्यांचे साखळदंड, बेड्या, खंगलेली शरीरे वगैरे पाहून उबग आला, हताश झालो होतो. म्युझियममधून बाहेर पडणारे कृष्णवर्णीय स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी, मुले, रडत डोळे पुसत बाहेर पडत होते. ते दृश्य मी कधी विसरणार नाही.
बदलते जग
गुलामगिरी काही शतके टिकली; पण अशा चालीरिती सतत टिकून राहत नाहीत, कारण त्यांच्या विरोधात विचार करणारे समाजात असतात. गुलामगिरी नष्ट व्हावी म्हणून अमेरिकेत यादवी युद्ध झाले. ब्रिटिश तसेच युरोपीय समाजात विचारधुरीणांनी गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला हा इतिहास आहे. गुलामगिरीचे तिखट आणि तीव्र प्रकार जवळ जवळ नाहीसे झाले. हा बदल जरुरीचा होता; पण ज्या मानवी काटेकंगोऱ्यांवर गुलामगिरी रुजली होती, ते काही पूर्णपणे गेले नाहीत. जगात जे पुढारलेले आहेत, जे स्वतःला उच्च मानतात त्यांनी जे मागास आहेत – मग ती व्यक्ती, समाज, वा देश असो – त्यांचा फायदा उठवणे, त्यांचे शोषण करणे चालूच राहिले. विचारांचा गाभा बदलत नाही पण मानवी वर्तनाचे रूपडे बदलते. वसाहतवाद हा असाच प्रकार होता म्हणून वसाहतवादाची मुळे गुलामगिरीत आहेत असे संशोधकांनी म्हटले आहे.
सांस्कृतिक उत्क्रांती
गुलामगिरीच्या मूळ बिंदूपासून वसाहतवादाचा उगम आहे असे मानले तरी तो मानवी मेंदूच्या उत्क्रांतीचा भाग आहे. या व्यापक नजरेने त्याकडे बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणूस या प्राण्यात सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन उत्क्रांती असतात असे आपण म्हणतो तेव्हा हे दोन भाग स्पष्टीकरणासाठी असतात. या दोन्ही गोष्टी मानवी उत्क्रांती म्हणून सरमिसळ करत होत असतात. सांस्कृतिक म्हणजे विचार आणि वर्तन यांची उत्क्रांती. याच्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे स्वभावाचे आणि वागण्याचे काटे-कंगोरे बोथट करणे, सुसह्य करणे हा असतो. यालाच समाजाचा विकास, वाढ असेही आपण म्हणतो. मानव प्रजातीची विकास-वाढ अनेक मार्गांनी होत असते; त्यांतील दोन महत्त्वाच्या वाटा समाजवैज्ञानिकांनी सांगितल्या आहेत.समाजाच्या विकासवाढीची एक पद्धत म्हणजे ‘बागकाम पद्धती’ – माळ्याच्या मायेने, मुलायम हातांनी विचारांचे खत घालत सामाजिक उत्क्रांती साधायची. हे करत असताना ज्ञानवृद्धीच्या काही भागात म्हणजे शिक्षण संस्थांमध्ये ‘देवराई’ पद्धत वापरायची, म्हणजे ज्ञाननिर्मितीला मुक्त वातावरण देऊन त्याची वाढ होऊ द्यायची. ही बागकाम-देवराई पद्धत उदारमतवादी, सर्वसमावेशक असून याचे परिणाम सूक्ष्म व धिम्या गतीने होत असतात. अशी पद्धती लोकशाहीला धार्जिणी असते.
‘सुतारकाम पद्धती’ ही दुसरी पद्धती. येथे विचारांच्या करवतीने चौकटी करून त्यात समाजाला बसवून त्याची वाढ करावयाची. सगळे ‘इझम्स’ या सुतारकाम पद्धतीत मोडतात. इतिहास पाहिला तर बहुतेक वेळेला अशा विचारांच्या ‘इझम’ चौकटी फार काळ टिकत नाही असे दिसते. याला एक कारण इमॅन्युएल कांट (१७२४-१८०४) या जर्मन तत्त्ववेत्त्याने म्हटल्याप्रमाणे ‘नथिंग स्ट्रेट कॅन एव्हर बी मेड फ्रॉम क्रूकेड टीम्बर ऑफ ह्युमॅनिटी’ = मानवी स्वभावाच्या वाकड्या तिकड्या लाकडातून सरळ साधे काही तयार करता येत नाही.’ सुतारकाम पद्धती ही निसर्गविरोधी आहे म्हणून इझम्सच्या चौकटी कालांतराने मोडतात. अशा प्रकारचा विचार टि. एस. इलीयट (१८८८-१९६५) या नोबेल विजेत्या कवीने तिखट शब्दांत मांडला आहे – ‘नो प्रिन्सिपल इज सेफ फ्रॉम स्टुपिडिटी ऑफ इट्स फॉलोअर्स’ = ‘कोणतेही तत्त्व हे ते तत्त्व अनुसरणाऱ्या अनुयायांच्या मूर्खपणापासून सुरक्षित नसते.’ चांगल्या तत्त्वांचे झालेले विकृत स्वरूप आपण समाजात पाहत असतो. असे असूनसुद्धा व्यक्तीची तसेच समाजाची वैचारिक उत्क्रांती होत असते. त्याचे उत्क्रांतिवादी जैववैज्ञानिकांनी आणि समाजवैज्ञानिकांनी जे स्पष्टीकरण दिले आहे ते असे :
सु-संस्कृती
संस्कृती सुसंस्कृती व्हावी म्हणून निसर्गही प्रयत्नशील असतो हे दाखवण्याकरता संशोधकांनी अनेक प्राणी-प्रजातींचा आणि मानवी प्रजातीचा ‘डेटा’ गोळा केला, काही प्रयोग केले त्याचा अर्क पुढे देत आहे. उत्क्रांतीतील महत्त्वाची ‘तंत्रणा’ = मेकॅनिझम म्हणजे ‘नैसर्गिक निवड’ = नॅचरल सिलेक्शन.’ उत्क्रांतीत ही तंत्रणा सतत काम करत असते. (तंत्र या शब्दाचा अर्थ = दोन किंवा अधिक गोष्टी घडवून आणणारे एकच कारण व साधन. या अर्थानुसार तंत्रणा हा शब्द गुंफला आहे) उत्क्रांतीत नैसर्गिक निवड दोन स्तरांवर काम करते. ‘इंडिव्हिजूअल सिलेक्शन’ ‘व्यक्तीची निवड’ आणि ‘ग्रुप सिलेक्शन’ ‘समूहाची निवड.’ कसे ते पाहू.
‘स्वार्थ’ हा व्यक्तीला जीवनात तगून राहण्याकरिता जरुरीचा असतो. समूहातील स्वार्थी माणसाची नैसर्गिक निवड ही तंत्रणा ‘निवड’ करते. अशी व्यक्ती जीवन संघर्षात तगून रहाते. या समूहात परोपकारी माणसांचे प्रमाण कमी असते. त्याच समाजातील दुसऱ्या एका समूहात स्वार्थी माणसांचे प्रमाण कमी आणि परोपकारी माणसांचे प्रमाण जास्त असते. जेव्हा उत्क्रांतीत ‘समूहाची निवड’ होत असते तेव्हा ज्या समूहात परोपकारी माणसे जास्त असतात त्या समूहाची नैसर्गिक निवड ही तंत्रणा ‘निवड’ करते. याचा अर्थ दुसरा समूह हा जीवन संघर्षात तगून राहण्याकरता जास्त सक्षम असतो; कारण उत्क्रांतीत फक्त व्यक्ती नाही; तर सगळी मानव प्रजाती निसर्गसंघर्षात कशी तगून राहील यावर लक्ष केंद्रित केलेले असते. ‘व्यक्तीची निवड’ आणि ‘समूहाची निवड’ यांची सरमिसळ करत सामाजिक उत्क्रांती घडत असते. ‘सु-संस्कृती’ च्या उत्क्रांतीमागची ही संकल्पना महत्त्वाची आहे. मानवी इतिहासाचा विस्तीर्ण पट डोळ्यांसमोर आणला तर जगातील विविध समाज कसे तगून राहिले आणि काही कसे लयास गेले याची अनेक कारणे आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यात सु-संस्कृतीची उत्क्रांती हेसुद्धा एक कारण आहे हे दिलासादायक आहे. वसाहतवादाची पाळेमुळे पाहिली, आता वसाहतवादाचा शोध घेतला पाहिजे असे वाटत राहिले.

छ. संभाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात कायदा करून गुलामगिरी बंद केली असे WhatsApp विद्यापीठात वाचले होते. वस्तुस्थिती काय आहे?
प्रसन्न दाभोलकर