कविता : मे २०२५ 

सोहळा…

छायाचित्र : वंदना बाजीकर. 

प्रत्येक माणूस जगत असतो

आयुष्याचा अद्वितीय सोहळा

तरीही असतो प्रत्येकाचा

जगण्याचा ताल वेगळा वेगळा

सापडत नाहीत कोणा कोणाला

अचूक उत्तरे जगण्याची

म्हणून काही संपत नाही

लढाई त्यांच्या अस्तित्वाची 

ओघळून जातात पानावरून थेंब

इतक्या सहज रितं झालं पाहिजे

प्राजक्तासारखं न तुटता

हलक्याने मन सुटलं पाहिजे

ध्यास हवा मना मनाला

आभाळाला गवसणी घालण्याचा

जगला पाहिजे खरा आनंद

जमिनीशी नाते जोडण्याचा

कठीण आहे सारं काही

असं पण कधी वाटू शकतं

निराशेच्या गर्तेत कधीतरी

मन खोल रुतून बसतं

या साऱ्या चिंतेला गुंडाळून

चित्ताशी संवाद साधला पाहिजे

आणि चितेवरच्या गोष्टी सोडून

जगण्याचा सोहळा केला पाहिजे

Author

Leave a Reply