झुकझुक आगीनगाडी : ३

प्रशिक्षणादरम्यान माणसे  व यंत्रे यांचे खूप वेगवेगळे अनुभव आले. हे अनुभव दैनंदिन जीवनातसुद्धा खूप उपयुक्त ठरले. 

Classroom आणि Field चे सर्व ट्रेनिंग झाल्यावर आमची  वर्यताक्रम ठरविण्यासाठी साठी नाममात्र परीक्षा झाली. माझ्या दुर्दैवाने त्या वेळी महाराष्ट्रात मुंबई, नागपूर,भुसावळ आणि सोलापूर या ठिकाणी माझ्या पदाची रिक्त जागाच नव्हती. त्यामुळे  मला जबलपूर मंडलमधील NKJ ( New Katni Junction) या ठिकाणी रुजू व्हावे लागले.

आता मी शिकाऊ उमेदवार नव्हतो; तर एक जबाबदार कर्मचारी झालो होतो. गमतीची गोष्ट म्हणजे तेथील माझे वरिष्ठ एका वर्षातच निवृत्त होणार होते आणि मीच त्यांच्या जागी येणार असे वातावरण झाले होते. सगळे कर्मचारी ५०-५५ च्या पुढील होते; त्यांत मी पडलो सगळ्यात लहान – २६ वर्षांचा. २६ वर्षांच्या  तरुणाला ५०-५५ वयोगटातील स्टाफकडून कामे करवून घेणे म्हणजे मोठे आव्हानच होते आणि परत त्यांचा इनचार्ज  त्यामुळे मला अतिनम्र होऊनच त्यांच्याकडून कामे करून घ्यावी लागायची. वेळप्रसंगी त्यांची सगळी शिफ्ट ड्यूटीसुद्धा मीच करू लागलो. रोजच्या जेवणाकरता मी तेथीलच एका शुद्ध शाकाहारी जैन भोजनालयात जात होतो. इतर तंत्रज्ञांचीसुद्धा शिफ्ट ड्यूटी केल्यामुळे ते माझ्यासाठी बऱ्याच वेळा घरचा डबा आणायचे त्यामुळे माझ्या भोजनालयात दांड्या व्हायच्या. “हफ्ते में एक खाडा चलेगा,महिने के चार खाडे का पैसा हम वापस देंगे, ज्यादा हो  गया  तो पैसा नहीं मिलेगा,” असा भोजनालयाच्या मालकाचा एक ठरलेला डायलॉग असायचा. (मला हा खानावळ-मालक पु.ल दिग्दर्शित ‘गुळाचा गणपती’मधील दुकान-मालक अण्णा मोरगावकरच वाटायचा. ) माझे जेवणाचे भरपूर खाडे व्हायचे. बर्‍याच वेळा माझे तंत्रज्ञ कर्मचारी जेवण आणायचे. मला त्यांना नकारही देता येत नव्हता. खरं म्हणजे वेगळ्या चवीचे जेवणही मिळायचे. कुठल्याच कामाला नाही न  म्हटल्यामुळे त्या ठिकाणी २-३ महिन्यांतच मी पारंगत झालो आणि कर्मचारीसुद्धा म्हणू लागले, “अपना नया लडका इनचार्ज खोचडा (क्रुकेड ) नहीं,अच्छा है|” 

इकडील महाराष्ट्र मंडळामध्ये बर्वे,आपटे,देशपांडे आगाशे आणि कुलकर्णी यांनी माझी  सूचक चौकशी सुरू केली. मी सोलापूरचा पत्ता देऊन मोकळा व्हायचो आणि सगळी क्षेपणास्त्रे तिकडी वळवयाचो. त्याला आमच्या मातोश्री उत्तरे द्यायच्या.

काही दिवसांनी आमच्या  डेपोची  वार्षिक तांत्रिक  तपासणी होणार होती. मुंबईहून  मध्य रेल्वेचे आमच्या विभागाचे प्रमुख येणार होते. मी बरेच रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक तपशील, तांत्रिक माहिती, योग्य ती मॅन्युअल्स, चार्ट्स करून ठेवले होतेच. उत्तम देखभाल केल्यामुळे उपकरणेसुद्धा उत्तम स्थितीत चालत होती. वेळच्या वेळी कामे केल्यामुळे मला व माझ्या कर्मचाऱ्यांना  फारसा ताण आला नाही. तांत्रिक तपासणी ( Technical Inspection and Technical Audit ) झाली. उत्तम शेरा मिळाला आणि आमच्य यूनिटला त्या काळी(१९९२) २०००/ रुपये कॅश ॲवार्ड मिळाले. मला खूप बरे वाटले.

सोलापूरची आठवण यायची. माझ्या मुंबईतील त्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  माझ्याकडून बदलीसाठी अर्ज लिहून घेतला आणि कर्नाटकातील वाडी ( सोलापूरहून १४८ कि.मी. ) या ठिकाणी  समन्वय  निरीक्षकाची     (Zonal Coordination Inspector) जागा आहे  असे सांगितले. वाडी या ठिकाणी मध्ये रेल्वेची हद्द संपते, सोलापूर मंडल संपते आणि सिकंदराबाद मंडल सुरू होते आणि नवीन झोन म्हणजे दक्षिण मध्य रेल्वे सुरू होते. मला आनंद झाला. मी लगेच अर्ज दिला. २०/२५ दिवसांनी माझ्या बदलीची  ऑर्डर मुंबईहून निघाली. आनंदाने आणि दुःखाने मी NKJहून जबलपूर आणि जबलपूरहून इटारसी आणि इटारसीहून कर्नाटक एक्सप्रेसने सोलापूरला  निघायची तयारी केली.आमच्या यूनिटमधील लोकांना खूप खूप वाईट वाटले; कारण अडीअडचणीला तेथील शिफ्ट ड्यूटी आणि इतर तांत्रिक/अतांत्रिक कामे आता त्यांनाच करावी लागणार होती; कारण त्यांचा पसारा आवरायला मी  नसणार होतो. स्टेशनवर सोडायला सगळा स्टाफ आला. 

एवढी गर्दी पाहून स्टेशन मास्तर लगेच व्यवस्थित युनिफॉर्म  घालून मला येऊन विचारू लागला, “सरजी, कोई बडा साब आय क्या?सब ठीक तो है? कुछ गडबड तो नहीं? 

“मी त्याला हसून म्हणालो, “सब ठीक है, मेरा ट्रांसफर मेरे गांव के नजदीक हो गया,” त्याने आनंदाने मिठी मारली कारण तोही भुसावळहूनच त्याच्या घरी (Home Town) आला होता.

तेवढ्यात घाईघाईने जैन भोजनालयाचा मालक तीन छोटीशी खोकी घेऊन आला आणि मला म्हणाला, “आप ये जबलपूर में खाईये और ये इटारसी या सफर में खाईये|”

 माझ्या जेवणाची काळजी करणारी आईनंतर  ही पहिलीच व्यक्ती होती. मला गहिवरून आले. त्याला मी ‘पाय लागो’ पद्धतीने वाकून नमस्कार केला, त्यानेही “खुश रहो हमेशा बेटा” असा आशीर्वाद दिला. त्याने माझ्यासाठी जेवण आणि मिठाई आणली होती. सगळ्यांशी जुळवून घेतल्याचा, मिळून-मिसळून वागल्याचा मला फायदा झाला होता. माझ्यामुळे त्याला तिथे फायदाच होत होता. छोट्या स्टेशन आणि गावांमध्येच खरी माया,ओलावा  असतो. प्रेम, माया आणि दुष्मनीसुद्धा अगदी ठासून भरलेली असते. (NKJ हे स्टेशन साधरणपणे आपल्याकडील कुर्डूवाडी प्रमाणे होते.) कॉर्पोरेट कल्चर  ऑफिसमधील कुटुंबात कोरडेपणा असतो. 

ट्रेन आली. स्टेशनवरील गर्दी पाहून  टीसीपण चक्रावला. साध्या  पॅसेंजर ट्रेनला एवढी गर्दी! मी गाडीत बसलो. टीसीला  गर्दीचे कारण सांगितले आणि जबलपूर (म. प्र. ) हून मी सोलापूर ला निघालो. 

पुढच्या लेखात पाहू या, माझे सोलापूर आणि रेल्वे.

एक  सांस्कृतिक   एकांकिका आहे. कृपया ऐका. 

गेल्या वेळी आपण ‘उदयपूर की ट्रेन’ ऐकली त्याचेच व्यासपीठावरील सादरीकरण आहे

 




Author

Leave a Reply