अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या अवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.
ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :
हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिकतंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली. तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल.
एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल.
जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यासंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणारी आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं ‘ या नावाने केले आहे. हे भाषांतर क्रमशः देत आहोत . या अंकात वाचू या प्रकरण तिसरे -संपादक
स्वप्न
आरुषी द्विधा मनःस्थितीत होती. तिच्या मैत्रिणीबरोबर – मिली बरोबर – खेळायला जावं का मंगळावर उतरणाऱ्या पृथ्वीच्या पहिल्या अंतराळवीरांच्या यानाची गोष्ट वाचावी? काल रात्री तिला झोपवताना आईने सांगितलेली गोष्ट! आणि त्यानंतर तिच्या स्वप्नातदेखील आलेली गोष्ट! म्हणूनच तर उठल्या उठल्या आणखी प्रश्न विचारायला ती आईकडे पळत गेली होती. मग आईने तिच्या लायब्ररीत ती गोष्टच तिला डाऊनलोड करून दिली होती. आता आरुषीकडे दोन पर्याय होते. तिने उषःपान आणि उन्ह खाण्याचा कार्यक्रम अधीरतेने आटोपला होता. तेव्हा आता लगेचच तिला ती गोष्ट वाचता येणार होती किंवा उन्हाचा ताव वाढेपर्यंत बागेत खेळणाऱ्या मुलांबरोबर खेळायचे. उन्ह वाढले की आपोआपच सगळे जण घरात जातील – मोठी माणसे त्यांच्या कामात व्यग्र होतील आणि लहान मुलं त्यांच्या शिकायच्या लायब्ररीत.
“आरुषी, तू येते आहेस का नाही खेळायला?”
“मी येतेच थोड्या वेळात वाचायला,” आरुषीने स्क्रीनला सांगितले आणि ती खेळायला पळाली. जाता जाता तिने पाहिलं की आई आणि पपा अजून उन्ह खात होते. त्यांचे जांभळे पंख पसरलेले होते, हात जोडलेले होते आणि डोळे मिटून त्यांनी आपले चित्त एकाग्र केले होते.
मुलं बागेत उडत होती, एकमेकांचा पाठलाग करत होती, लांब सळसळणाऱ्या रिबिनी एकाकडून दुसऱ्याकडे देत होती आणि या साक्षात्कारानंतरच्या काळातसुद्धा बालपणीच्या स्वाभाविक स्वच्छंदीपणे बागडत होती.
—————————————————————————————————————-
“मी आलेच बिट्टू… मी आलेच…” धापा टाकत आरुषीची आई म्हणाली आणि अचानक तिला जाग आली. तिचं शरीर घामाने डबडबलं होतं. पपा तिला हलवून जागं करण्याचा प्रयत्न करत होता. ते स्वप्न होतं हे लक्षात येताच आईला एकदम हायसं वाटलं आणि तरीपण… तिच्या मेंदूचा एक भाग अजूनही तिला पळायला सांगत होता… पळत घरी पोचायला सांगत होता.
“पुन्हा तेच स्वप्न पडलं?”
“हो,” तिचं शरीर अजूनही थरथरत होतं.
“तू मन एकाग्र करण्याचा आणखी प्रयत्न केला पाहिजेस. आपल्या मनाला बजाव की ते फक्त एक स्वप्न आहे. मनातून काढून टाक ते.”
आईने होकारार्थी मान हलवली. आपोआपच तिची नजर शेजारच्या खोलीला जोडणाऱ्या दाराकडे गेली. तिथे तिची छोटी लेक शांतपणे झोपली होती – आईला झालेल्या मनःस्तापाचा गंधही तिला नव्हता. त्या विचाराने आईला आणखी थोडं बरं वाटलं. ती अंथरुणावरून उठली, आरुषीच्या खोलीत गेली आणि तिचा चेहरा न्याहाळत उभी राहिली. मग अडखळत ती पेयकक्षापर्यंत गेली आणि तिने पाण्याचा एक घोट घेतला. अजूनही तिचे पाय थरथरत होते आणि तिच्या पंखांत पसरायचीसुद्धा शक्ती नव्हती. भिंतीला टेकून ती उभी राहिली.
“तुला बरं वाटत नाही का?” भिंतीने विचारलं.
“मी बरी आहे, थँक्यू.”
“काही मदत हवी आहे का?” भिंतीने पुन्हा विचारलं.
“नाही, मी ठीक आहे,”आई गडबडीने म्हणाली. स्वयंचलित मदतीची प्रक्रिया तिला सुरू होऊ द्यायची नव्हती. नाहीतर तिच्या तब्येतीविषयी माहिती भिंतीने आरोग्य केंद्रात पाठवली असती. आपल्याला स्वतःला सावरता येईल याची तिला खातरी होती.
ती परत झोपायला गेली तोपर्यंत पपाला गाढ झोप लागली होती. आपल्या जागेवर आडवी होऊन ती स्वप्नाचा विचार करू लागली. गेल्या चार वर्षांत चौथ्यांदा तिला हे स्वप्न पडलं होतं. दरवेळेला तोच अगतिक क्रम…
ती एका अगदी हळू चालणाऱ्या गाडीत बसली आहे. तिच्या गाडीच्या मागे आणि पुढे अनेक गाड्या. त्या वेगवेगळ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे.
“लवकर चल, प्लीज,” ती गाडीला म्हणाली.
“रस्त्यावर अडथळा आहे,” यांत्रिक आवाजात उत्तर आलं.
“प्लीज, मला लवकरात लवकर घरी पोचायला हवं. माझी लेक घरी एकटी आहे. अंधार पडायला लागला आहे. ती घाबरली असेल. प्लीज, लवकर चल.”
“रस्त्यात अडथळा आहे,” यांत्रिक आवाजाने पुन्हा तेच उत्तर दिलं.
तिने पुढे आणि मागे असलेल्या वाहनांकडे नजर टाकली. कुठे जायला जागाच नव्हती. ती अडकली होती आणि तिलादेखील काही नीट समजण्यापूर्वीच तिने गाडीचे दार उघडले आणि बाहेर उडी टाकली. मग ती पळू लागली. सुरुवातीला हळू, वाहनांच्या मधून वाट काढत. तिने मग वेग वाढवला आणि शेवटी धापा टाकत शक्य तितक्या वेगाने ती पळू लागली. आंधळ्यासारखी. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवर आपटत. त्या माराने क्षणभर वेग मंदावला तरी ती पळत राहिली – वेगात – धडपडत – धापा टाकत – तरीही पुढे जात – वेगाने पळत.
रस्ता कधी संपला आणि वाहतूक कधी मागे पडली तेही तिच्या लक्षात आले नाही. ती घरांच्या कॉलनीत शिरली. अंतःप्रेरणेने आपल्या लक्ष्याच्या दिशेने पळत राहिली.
आणि मग तिला दिसलं. दूरवर असलेलं तिचं घर. सर्व शक्ती एकवटून ती त्या दिशेने धावली. त्या कॉलनीतील इतर सगळ्या लखलखीत आणि उबदार दिसणाऱ्या घरांच्या पार्श्वभूमीवर एकलकोंडे दिसणारे आणि अंधारात असलेले एकमेव घर.
जीव एकवटून ती त्या दिशेने धावली. धापा टाकत पायरीपर्यंत पोचली. बॅगेत चाचपडत तिने किल्ली काढली आणि बटण दाबून कुलूप उघडले.
“बिट्टू, आई आली. कुठे आहेस तू?”
आणि हातात एक खेळणं धरून एका कोपऱ्यात अंग चोरून बसलेल्या आणि घाबरून पांढऱ्याफटक पडलेल्या आपल्या छोट्या मुलीकडे तिने धाव घेतली. तिला उचलून जवळ घेत तिने तिचा पापा घेतला आणि तिला समजावू लागली.
“सॉरी बेटा, आज मला उशीर झाला. वाटेत मोठ्ठा ट्रॅफिक जॅम होता. सॉरी बेटा.”
… आणि क्षणात ते चित्र नाहीसे झाले. आणि ती पुन्हा वाहतुकीत अडकली होती आणि जीव तोडून गाडीला घाई करत होती.
आणि मग काय करायचे ते तिच्या लक्षात आले आणि तिने गाडीतून बाहेर उडी मारली आणि ती पळू लागली – जिवाच्या आकांताने.
“मी येत आहे बिट्टू, मी येत आहे.”
आणि त्याच क्षणी पपाने तिला हलवून जागे केले होते. ती स्वप्नात मोठ्यानेच ओरडली असणार. तिने आपल्या लेकीच्या खोलीच्या दाराकडे नजर टाकली. तिच्या ओरडण्याने आरुषी उठली नव्हती म्हणून तिला हायसे वाटले.
—————————————————————————————————————
शास्त्रीय सभेचे वार्षिक सत्र जोमात चालू होते. एकशे वीस तरुण शास्त्रज्ञांनी आपापल्या प्रकल्पांचे प्रस्ताव सादर केले होते. आता शास्त्रीय शासकीय समितीने साधारण चाळीस प्रकल्प मंजूर करण्यापूर्वी एक शेवटचे सादरीकरण उरले होते.
संध्याप्राशन आणि सूर्यस्नान यांकरिता एक छोटेसे मध्यांतर घेऊन तैवास अधिवेशन गृहात प्रत्यक्ष उपस्थित असलेले श्रोते या शेवटच्या सादरीकरणासाठी पुन्हा एकत्र जमले. दूरस्थ प्रेक्षक पडद्यांवर पुन्हा प्रकटले. ते उत्सुकतेने आणि काहीशा आश्चर्यानेच या शेवटच्या सादरीकरणाची वाट पाहत होते; कारण वरिष्ठ शास्त्रज्ञ क्वचितच नवीन प्रकल्प समाजाची मान्यता मिळवण्यासाठी सादर करत. बहुतेक वरिष्ठ शास्त्रज्ञ मान्यताप्राप्त प्रकल्पांवरच काम करत. त्या प्रकल्पांमध्ये भर घालण्यासाठी किंवा त्यांच्या संशोधनात बदल करण्यासाठी आवश्यक ते सामाजिक समर्थन ते नियमित अहवाल आणि इतर शास्त्रज्ञांनी केलेल्या त्यांच्या प्रकल्पांच्या तपासणीतून मिळवीत. त्यांना जर एखाद्या नवीन संशोधनाची कल्पना सुचली तरी ती त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांनी मांडण्याचीच पद्धत होती.
पण आजची गोष्ट वेगळी होती. साल्चरसारख्या एका प्रतिष्ठित शास्त्रज्ञाने शास्त्रीय सभेच्या वार्षिक सत्राच्या पहिल्याच दिवशी स्वतः एका प्रकल्पाची कल्पना सादर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अधिवेशनाचे पुढचे दोन दिवस इतर शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या कल्पनांबरोबरच त्याच्याही प्रस्तावावर चर्चा व्हावी अशी त्याची इच्छा होती.
बोलण्यासाठी जेव्हा साल्चर उठला तेव्हा त्याच्या शास्त्रज्ञ सहकाऱ्यांनी उठून टाळ्यांनी त्याचे स्वागत केले. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याने त्या सर्वांच्याच आयुष्यावर प्रभाव टाकला होता. विश्वाच्या रहस्यांचा उलगडा करणाऱ्या क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यास त्यांना प्रेरणा दिली होती. त्यात आण्विक जीवशास्त्रज्ञ होते, मानवाच्या आरोग्यावर संशोधन करणारे होते, जैविक विविधतेचे ज्ञान असलेले तज्ज्ञ होते, भौतिक शास्त्रज्ञ होते, गणितज्ञ होते, रसायन शास्त्रज्ञ होते; किंबहुना साक्षात्कारी मानवाला ज्ञात असलेल्या सर्वच शास्त्रांचे तज्ज्ञ श्रोत्यांमध्ये उपस्थित होते. केवळ आण्विक जीवशास्त्रातील त्याने केलेल्या संशोधनामुळेच नव्हे तर मूलभूत ज्ञानाच्या उपासनेसाठी मानवी इच्छाशक्तीला त्याने दिशा दाखविल्याने तो सर्वांना आदरणीय होता.
साल्चर प्रेक्षकांसमोर हसतमुखाने आणि हात जोडून उभा राहिला. “मला संधी दिल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. शास्त्रसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माझा प्रस्ताव मांडण्याची संधी मला दिलीत त्याबद्दल आभारी आहे. मी मुद्दामच तशी विनंती केली होती कारण मी आता जे काही बोलणार आहे त्यावर तुम्ही सर्वांनी चर्चा करावी अशी माझी इच्छा आहे. कोणताही पूर्वग्रह न बाळगता माझ्या प्रस्तावाचा तुम्ही सर्व बाजूंनी विचार करावा. म्हणजे शास्त्रज्ञांव्यतिरिक्त इतर समाजाचे मत घेण्यापूर्वी आपण एक व्यापक चित्र त्यांच्यासमोर मांडू शकू.
थोडक्यात सांगायचं तर आपण जुन्या तारामंडळातील आपल्या पूर्वीच्या घरी, म्हणजे पृथ्वी ग्रहावर जाण्याची एक मोहीम आखावी असा माझा प्रस्ताव आहे. त्या ग्रहावर जाऊन जीवनाच्या उत्पत्तिसंबंधी काही सुगावा सापडतो का हे पाहण्यासाठी तिथे प्रयोग करू शकतील अशा अंतराळवीरांची एक मोहीम आखण्याची माझी इच्छा आहे आणि त्यातून ‘जीवन कशासाठी’ या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडेल अशी मला आशा आहे. शास्त्रीय अधिवेशनाने जर हा प्रस्ताव मंजूर केला आणि स्वर्गावरील समाजाने त्याला संमती दिली, तर माझं उर्वरित आयुष्य या प्रकल्पासाठी वाहून घ्यायला मी तयार आहे.”
तो प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणखी काही स्पष्टीकरण देईल म्हणून श्रोते वाट बघत होते; पण त्याला आणखी काही बोलायचे नव्हतेच.
मिनिटभराच्या अवघड शांततेनंतर शास्त्रीयसभेचे अध्यक्ष आदराने म्हणाले, “कोणत्या प्रकारची टीम आपल्याला पृथ्वीवर पाठवायला आवडेल आणि त्यांनी तिथे कोणते प्रयोग करावेत अशी आपली अपेक्षा आहे यावर थोडी आणखी माहिती द्याल का सर?”
” मला सात किंवा आठ जणांची टीम पाठवायला आवडेल. त्यांना बहुतेक एक वर्षभर तिथे राहून त्या ग्रहावर तगून राहिलेल्या वन्यजीवसृष्टीचे नमुने गोळा करावे लागतील; शिवाय मातीचे नमुने गोळा करावे लागतील, त्या ग्रहाच्या वातावरणाचं निरीक्षण करावं लागेल आणि कदाचित त्या अनियंत्रित वन्य वातावरणात काही सूक्ष्मजैविक प्रयोग करावे लागतील.”
प्रेक्षकांतील एका व्यक्तीने हात वर केला आणि साल्चरने संमती देताच बटन दाबून आपला मायक्रोफोन तिने सुरू केला. “असे प्रयोग तर स्वर्गावरदेखील करता येतील, नाही का? त्यासाठी इतक्या लांबचा प्रवास करून आपण अनेक वर्षांपूर्वी सोडून दिलेल्या ग्रहावर कशाला जायचे?”
“तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम, आपण हे प्रयोग इथे करू शकतो आणि आपण अनेक वर्षं ते करतो आहोत; पण त्याचं असं आहे मॅडम, स्वर्ग हा एक नियंत्रित प्रदेश आहे. हे आपलं सुंदर, प्रसन्न आणि आरामशीर घर आहे; पण कधीकधी आपल्या घराच्या आरामशीर वातावरणात बसून मूलभूत शोध नाही लावता येत. कधीकधी विश्वाची रहस्यं उलगडण्यासाठी आपल्याला वन्य निसर्गाला सामोरे जावं लागतं – आपल्या साक्षात्कारपूर्व पूर्वजांप्रमाणे.”
“पण त्यात धोका आहे. पृथ्वीला भेट देणं धोक्याचं ठरू शकतं.”
“ते ही खरं आहे. या मोहिमेत धोका आहेच; पण आपण शक्य तितकी काळजी घेऊ. आणि अध्यक्ष महाशय, मी आता तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे वळतो. कशा प्रकारची टीम पृथ्वीवर पाठवायला मला आवडेल असं तुम्ही विचारलं होतं. मी त्यावर विचार करतो आहेच आणि मला असं वाटतं की आपण अगदी तरुण मुला-मुलींना पाठवायला हवं. प्रयोग करण्यासाठी आवश्यक त्या शास्त्रांचं प्रशिक्षण त्यांना द्यायला हवं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अशा ज्या शास्त्रज्ञांची निवड करू त्यांची बुद्धी अत्यंत चौकस असायला हवी आणि ज्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतो आहोत त्याची त्यांना समज असायला हवी.
उदाहरणार्थ : त्या टीममध्ये एक आण्विक जीवशास्त्रज्ञ तर असायलाच हवा पण कोणताही आण्विक जीवशास्त्रज्ञ चालणार नाही. तिच्याकडे किंवा त्याच्याकडे स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता हवी, आवश्यकतेनुसार प्रयोगांची जुळवणी करता येण्याची आणि ते पूर्ण करण्याची क्षमता हवी. पृथ्वीवर पोचल्यावर तिथे आपल्याला काय सापडेल हे आपल्याला आताच नक्की सांगता येणार नाही; कारण आपण कधी तिथली परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही; पण समजा आपण त्या ग्रहाचं सूक्ष्म निरीक्षण केलं – आणि माणसं तिथं पाठवण्यापूर्वी आपण ते करणारच – तरीदेखील मिनिटामिनिटाला बदलणार्या तिथल्या परिस्थितीचा आपल्याला अंदाज येणार नाही; शिवाय स्पेस वार्पमुळे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या दरम्यानच्या संदेश वहनात अडथळे येणार. त्यामुळे तिथल्या वास्तव्याच्या काळात तिथे जाणार्या लोकांना स्वतःच्या जबाबदारीवरच तिथे राहावे लागेल.”
आणि अशा प्रकारे स्वर्गावरील साक्षात्कारी मानवाच्या सर्वात गुंतागुंतीच्या मोहिमेविषयी चर्चेला आरंभ झाला. त्या दिवशी आणि नंतरचे दोन दिवस चाललेल्या चर्चेत अनेक नेमके आणि महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले आणि अनेक – विषयाशी संबंध नसलेले आणि क्षुल्लक प्रश्नसुद्धा! पण आता मंथन सुरू झाले होते आणि पुढची वीस वर्षे ते चालू राहणार होते.
साल्चर त्याच्या निर्णयावर ठाम होता आणि प्रत्येक प्रश्नाचे – मग तो प्रश्न महत्त्वाचा असो किंवा क्षुल्लक असो – त्याच संयमित आणि समजूतदार वृत्तीने उत्तर देत होता. अधिवेशन संपल्यावर परत जाणार्या प्रत्येकाला त्याचा प्रस्ताव पटला होताच असे नाही; पण एखाद्या विशेष यात्रेच्या तयारीची सुरुवात करताना होणारा उत्साह त्या सत्राच्या शेवटी भरून राहिला होता. एका स्वप्नाचा उदय झाला होता!
दुसर्या दिवशी त्या ग्रहावरील सगळ्यांनाच संपूर्ण समाजाच्या विचारासाठी निवडलेले चाळीस प्रकल्प कोणते ते समजले. बहुतेक सर्वच प्रकल्पांबद्दल त्यांना कुतूहल आणि कौतुक वाटले. फक्त पृथ्वीवरील मोहिमेचा प्रस्ताव सोडून! त्याबद्दल बहुतेक लोक साशंक होते आणि तरीही ती अभूतपूर्व मोहीम संभाषणाचा आणि संदेश वाहिन्यांवरील संपादकीयांचा विषय होऊन राहिली.
—————————————————————————————————————
नव्या दिशा
आकडेमोडीची एक फिल्म बघण्यात मग्न असलेल्या आरुषीकडे तिच्या आईने शंभराव्यांदा पाहिलं. लेकीच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून मनाच्या डचमळणाऱ्या अस्वस्थतेतदेखील तिच्या अंतःकरणात उत्साहाचे कारंजे उचंबळून आले. काल रात्री ते भयंकर स्वप्न पडल्यापासून तिच्या मनात उदासीनता आणि एक अज्ञात भीती ठसठसत होती. पण मन शांत करण्यासाठी काय करायला हवं हेदेखील तिला चांगलं माहीत होतं.
“तुझ्या लेकीची तुला जरुरीपेक्षा जास्तच ओढ आहे. त्यामुळेच तुला असली अस्वस्थ करणारी स्वप्नं पडतात,” पपा म्हणाला होता आणि ते बरोबरच होतं.
“तू फारच साक्षात्कारपूर्व मानवांसारखी आहेस. जास्तच भावनावश आणि स्वतःला गुंतवून घेणारी. साक्षात्कारपूर्व काळच्या इतिहासाचा अभ्यास करून करून तू फार हळवी झाली आहेस,” तो नेहमी म्हणायचा.
पण आई विचारात पडायची. इतिहास वाचल्याने एखाद्याच्या मनाची जडणघडण बदलू शकेल असं तिला वाटायचं नाही. ती फार भावनावश होती हे खरं होतं. तिची आईदेखील तेच म्हणायची अनेक वर्षांपूर्वी. तेव्हा तिने कुठलाही इतिहास अजून वाचलादेखील नव्हता. पण असं संवेदनशील असण्यात गैर काय होतं? त्यामुळेच तर तिने नैसर्गिकरित्या स्वतःचं मूल जन्माला घातलं नव्हतं का? आणि त्यातूनच तर तिला आयुष्यातील सर्वाधिक समाधान मिळालं होतं आणि लेकीच्या रूपात सर्वात मौल्यवान अशी एक देणगी मिळाली होती.
आईने एकदम उठून आरुषीला जवळ घेतलं. आरुषीदेखील हसून आईच्या कुशीत शिरली. रात्री कसलंही स्वप्न पडलं तरी वस्तुस्थिती अशी आहे की माझी लेक माझ्याजवळ सुरक्षित आहे. तिला जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा मी उडत लगेच तिच्यापाशी जाऊ शकते, आईने स्वतःच्या त्रस्त मनाला बजावलं.
________________________________________________________________________________________________
काईजाने आपल्या शोधनिबंधाचा शेवटचा परिच्छेद वाचला आणि समाधानाने मान डोलावली. त्याने आधीच तो शोधनिबंध तीनदा वाचला होता आणि वाचताना कुठे सुधारणा कर, कुठे वाक्यांचा क्रम बदल असं त्याचं चाललं होतं; पण आता मात्र इतर शास्त्रज्ञांच्या समूहाकडे पाठवण्यासाठी तो शोध निबंध तयार आहे अशी त्याची खातरी झाली. पण त्याआधी आपला निबंध तो अमरला दाखवणार होता. ते दोघं नेहमीच अभिप्रायासाठी आपलं लेखन आधी एकमेकांना दाखवत.
काईजाने त्याच्या प्रयोगशाळेतील दोन भिंतींना बोलूनच आज्ञा दिली आणि त्या पारदर्शक केल्या. संधिप्रकाश त्याच्या दालनात झिरपू लागला. दूर क्षितिजावर, गुरुत्वअणू प्रयोगशाळेच्या विस्तीर्ण आवाराच्या पलीकडे, संध्याकाळच्या गुलाबी जांभळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्याला आकाशात उडणाऱ्या व्यक्तींच्या आकृती दिसत होत्या. अमरदेखील आता कोणत्याही क्षणी उडत येईल, किंवा झिपरने रस्त्यावरून येत असेल.
दुसऱ्याच क्षणी त्याला फाटकाच्या दिशेकडून भरारी घेऊन खाली उतरणारा अमर दिसला. तरंगत जमिनीवर उतरताना आपल्याला काईजा पाहतो आहे हे लक्षात येताच अमर त्याच्याकडे पाहून हसला.
“आज महाराज अगदी आमची वाट बघत उभे आहेत! मी असं काय केलं बुवा?” आपल्या मित्राच्या पाठीवर थाप मारत अमर म्हणाला.
“उशीर केलास तू. झिपरने यायला काय झालं होतं तुला?” काईजाने त्याला जाब विचारला.
“अरे! शास्त्रज्ञांच्या बादशहाचं आज चक्क वेळेकडे लक्ष आहे म्हणायचं! मी झिपरनेच आलो आहे मित्रा! माझ्या मुलाला खेळायच्या मैदानावर सोडून इकडे आलो. झिपरने मला गेटपाशी सोडलं आणि ती पार्किंग स्टेशनकडे गेली. तुझ्या अगदी दारापर्यंत ड्राईव्ह करत येऊन तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं मला. कोण जाणे आमचा महान शास्त्रज्ञ एखादं प्रमेय सोडवत बसला असायचा!”
“तर! तुला फार काळजी आहे माझी नाही? मला माहीत आहे. तुला फक्त आमच्या कॅंपसवरच्या मुली पाहण्याची संधी हवी होती.”
“चक् चक्! तू विसरतोयस मित्रा! मी पालक करार केलेला आहे. त्याचं उल्लंघन मी कधीही करणार नाही. माझं प्रेम आहे माझ्या कुटुंबावर.”
काईजा अमरला त्याच्या अस्ताव्यस्त प्रयोगशाळेत घेऊन गेला. मग क्षणभर थबकला आणि अमरकडे वळून म्हणाला, “आपण बागेत जाऊन बसू. बाहेर किती छान वातावरण आहे.”
“म्हणजे? आपण टेनिस नाही खेळणार आहोत?” काईजाच्या मनात आज काहीतरी वेगळेच आहे याचा त्याला अंदाज आला होता तरी अमरने विचारले.
काईजाने एक इलेक्ट्रॉनिक कागद उचलला आणि आपल्या प्रयोगशाळेतून बाहेर पडून तो त्याच्या घराच्या दिशेने जाऊ लागला. त्याच्या घराच्या बागेत नीलमोहोर फुलले होते. फुलांचे जांभळे घोस लगडलेल्या झाडाखाली असलेल्या संगमरवरी टेबलापाशी तो अमरला घेऊन गेला. अमर खुर्चीवर बसल्यावर काईजा पटकन घरात गेला आणि गरम कॉफीचे दोन मग घेऊन बाहेर आला. अमरच्या समोर खुर्चीवर बसत त्याने एक मग अमरपुढे ठेवला. अस्वस्थपणे आपल्या ईपेपरवर बोटांनी त्याला टॅप करताना अमर उत्सुकतेने पण शांतपणे पाहत होता. ईपेपरवर त्याचा शोध निबंध झळकला आणि काईजाने तो अमरच्या हवाली केला.
“हे पहा, मी हा पेपर खगोलशास्त्राच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवणार आहे. पण त्याआधी मला त्यावर तुझं खरंखरं मत हवंय.”
अमरने आपल्या मित्राच्या हातातून तो पेपर घेतला आणि कॉफीचे घोट घेत तो वाचू लागला. थोड्याच वेळात तो वाचनात इतका गढून गेला की आपला मित्र शेजारीच अस्वस्थपणे हात चोळत बसला आहे आणि तसं बसून राहणं अशक्य झाल्यावर तो उठून बागेच्या कडेपर्यंत केव्हा चालत गेला आणि पंख पसरून अंधारणाऱ्या आकाशात त्याने केव्हा भरारी घेतली हेदेखील त्याला कळले नाही.
________________________________________________________________________________________________
घरातून निघण्यापूर्वी फ्रांस्का टोरीने एकदा शेवटचं आरशात बघून घेतलं. तिचं श्वेत वस्त्र अगदी व्यवस्थित नेसलेलं होतं, त्याच्या निऱ्या तिच्या कमरेभोवती समान अंतरावर खोचलेल्या होत्या. त्याच्या काठावर कळतनकळत किंचितशी जर होती. आपल्या तेजस्वी पण सौम्य रूपाकडे समाधानाने पाहून फ्रांस्काने आपलं भ्रमणयंत्र उचललं, खिडकीच्या तावदानांना हाताच्या इशाऱ्याने उघडण्याचा आदेश दिला आणि आपल्या बेडरूमच्या खिडकीतून उडत ती बाहेर आली. गॅरेजमधून नुकत्याच बाहेर येऊन थांबलेल्या झिपरच्या दिशेने ती निघाली. तिच्यामागे खिडकीची तावदाने आवाज न करता बंद झाली. फ्रांस्काच्या भ्रमणयंत्राच्या एका इशाऱ्यासरशी तिच्या घराच्या भिंती अपारदर्शक झाल्या. तपमान, आर्द्रता, प्रकाश, संगीत आणि सुगंध नियंत्रित करणारी स्वयंचलित प्रणाली बंद होऊन ते घर आता निद्रावस्थेत जाणार होतं.
आकानिष्ठाच्या उत्तर द्वाराकडे जाणाऱ्या महामार्गावरून झिपर वेगाने प्रवास करू लागली तसं फ्रांस्काने खिडकीच्या काचेवर डोकं टेकलं. हजार किलोमीटरचा प्रवास करून झेरुआ पर्वतावरील जीवशास्त्र संशोधन केंद्रात पोचायला तिला साधारण पाच तास लागणार होते. तिथल्या इच्छित पदावर तिची नियुक्ती होईल याची फ्रांस्काला खात्री होती. तारिकचीदेखील नियुक्ती व्हावी असं तिला वाटत होतं आणि तिला जितकं ते पद हवंहवंसं वाटत होतं तितकंच त्यालादेखील त्याच्या पदाचं आकर्षण वाटावं अशी तिची इच्छा होती. तारिकचा सहवास पुन्हा मिळाला तर ते छानच असणार होतं आणि पालक करार करून, एक मुलगा वाढवल्यानंतर अनेक वर्षांनी अशा अभूतपूर्व मोहिमेवर एकत्र काम करणं खूप अर्थपूर्ण ठरणार होतं. कदाचित दोघांच्याही करिअरचं हे शेवटचंच कार्य ठरेल.
या पदासाठी अर्ज करण्याचं ठरवल्यावर लगेचच फ्रांस्काने तारिकला व्हिडिओ-कॉन्फरन्सचं आमंत्रण पाठवलं होतं.
त्या घटनेच्या काही दिवस आधी, आकाशगंगा संशोधन संस्थेतील तिचं दिवसभराचं काम संपवून स्क्रीन बंद करण्याआधी फ्रांस्काने माहिती केंद्रात लॉग-इन केलं होतं. प्रथितयश शास्त्रज्ञांना उद्देशून असलेला, पृथ्वी मोहिमेशी संलग्न होण्याचा, साल्चरचा तो संदेश तेव्हा तिने पाहिला होता. पृथ्वी प्रकल्पाच्या तयारीसाठी झेरुआ पर्वतावर असलेले जीवशास्त्र संशोधन केंद्रशास्त्रज्ञांच्या एका समूहाची नियुक्ती करणार होते. पृथ्वीवर करायचे प्रयोग निश्चित करण्यासाठी आण्विक जीवशास्त्रज्ञ, पृथ्वीची सद्यःस्थिती तपासण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञ, अंतराळवीरांना देण्याच्या प्रतिकारशक्तिवर्धक रसायनांची रूपरेषा ठरविण्यासाठी जीवशास्त्र संशोधक, पृथ्वीवर बांधायच्या तात्पुरत्या घरांचा आराखडा ठरवण्यासाठी इंजिनीअर्स, प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी भौतिकशास्त्रज्ञ, अंतराळवीरांना द्यायच्या समुपदेशनाचा आराखडा ठरवण्यासाठी मानसशास्त्रज्ञ, त्यांच्या निवडीचे निकष ठरवण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ, गणितज्ञ, तर्कशास्त्रज्ञ… ज्ञानाच्या बहुतेक सगळ्याच शाखांतील तज्ज्ञ या मोहिमेसाठी हवे होते; शिवाय आकाशगंगा संचारकेंद्र जे आकाशयान बांधणार होतं, ते वेगळंच.
ही मोहीम जाहीर झाल्यापासूनच फ्रांस्काला तिच्याविषयी कुतूहल होतं. तिने जेव्हा साल्चरचा संदेश पाहिला तेव्हा आपल्यासारखे, सगळं करिअर खगोल भौतिकशास्त्रात घालवलेले, लोक या मोहिमेच्या कामासाठी अगदी योग्य आहेत हे तिने ताबडतोब ताडलं; शिवाय साल्चरसारख्या, तिच्या पिढीतील सर्वात मान्यवर शास्त्रज्ञाबरोबर काम करण्याची ती अभूतपूर्व संधी होती.
त्या रात्री झोपी जाईपर्यंत तिचा निर्णय जवळजवळ पक्का झाला होता. पुढचे दोन आठवडे तिने तिच्या सध्याच्या आकाशगंगा संशोधनकेंद्रातील संशोधकाच्या पदाचा त्याग करून उर्वरित कार्यरत आयुष्य पृथ्वी मोहिमेवर काम करण्यात घालवण्याचे फायदे आणि तोटे यांचा विचार करण्यात घालवले. शेवटी खऱ्याखुऱ्या अवकाश मोहिमेविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचा विजय झाला होता आणि त्याच रात्री फ्रांस्काने आपल्या मुलाच्या घरी आभासी भेट देऊन त्याला आपला निर्णय सांगितला होता.
त्याच वेळी आपला मुलगा फारुक याच्या वडिलांशी संपर्क साधून त्यालादेखील या मोहिमेच्या कामात सहभागी होण्याविषयी आग्रह करावा असं तिच्या मनात आलं. त्याने जेव्हा तिने पाठवलेलं व्हिडिओ-कॉन्फरन्सचं आमंत्रण स्वीकारलं तेव्हा इतक्या वर्षांनंतर त्याचा चेहरा बघून तिला फार आनंद झाला. तिने सुचवलेल्या कल्पनेवर विचार करण्याचं त्याने वाचन दिलं आणि मग थोडा वेळ त्यांनी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. या गोष्टीलादेखील दोन आठवडे होऊन गेले पण या सगळ्या अचानक घडून आलेल्या घटनांमुळे फ्रांस्का भलतीच उत्साहात होती.
तिच्या पुढील आयुष्याच्या अनेक शक्यता तिला दिसत होत्या. पृथ्वीच्या मोहिमेवर काम करणाऱ्या समूहासाठी जर तिची निवड झाली तर तिला नेमकं कोणतं काम सोपवलं जाईल? तिला प्रत्यक्ष साल्चरबरोबर काम करण्याची संधी मिळेल, का एखाद्या भौतिक शास्त्रज्ञांच्या गटात तिला सामील करतील? तारिकला खरंच या मोहिमेत रस वाटेल का? मोहिमेची सुरुवात कधी होईल? ग्रीनवुडचा सपाट प्रदेश वेगाने पार करून तिच्या झिपरने अलकनंदा आणि प्रचंड झांगपो नद्यांची खोरी ओलांडली आणि मग ती झेरूआ पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्या चढू लागली.
झिपरच्या एकसारख्या आवाजाने फ्रांस्काला गुंगी येत होती आणि तिच्या डोळ्यांसमोर चित्रविचित्र स्वप्नांची साखळी तयार होत होती.
तिच्या गंतव्य स्थळी पोचण्यास दहा मिनिटे असताना जेव्हा झिपरच्या प्रॉंप्टरने तिला सावध केलं तेव्हा आपण कुठे निघालो आहोत हे आठवायला तिला एक मिनिट लागला. “एवढा विसर पडायला इतकी काही तू म्हातारी नाही झालीस,” तिने स्वतःच्या मनाला बजावलं. तिने आपल्या भ्रमणयंत्राकडे पाहिलं. तारिकचा संदेश आला होता,
“झेरूआ पर्वतावर शनिवारी पोचतो आहे. तेव्हा तू तिथे असशील याची मला खातरी आहे.”
फ्रांस्का स्वतःशीच हसली. भावनेच्या आवेगात निर्णय घेऊन कृती करण्याची तिची सवय तारिक विसरला नव्हता.
________________________________________________________________________________________________
आरुषीची आई दमली होती. आज प्रयोगशाळेसाठी तिनं बरंच काम केलं होतं. उद्या तिला सेंट्रल प्लाझामध्ये असलेल्या प्रचंड EARTH प्रयोगशाळेत प्रत्यक्ष जाऊन काही प्रयोगांचे निष्कर्ष तपासायचे होते आणि त्यानंतर स्वास्थ्य शास्त्रज्ञांबरोबर एक बैठक घ्यायची होती. पण आजच्या दिवसाचं तिचं काम आटोपलं होतं. तिने आपला कामाचा रूपेरी पडदा बंद केला, खोलीतल्या अंधाराचा सराव व्हावा म्हणून डोळ्यांची उघडझाप केली आणि मग आपल्या भ्रमणयंत्राची एक कळ दाबून खोलीच्या भिंती पारदर्शक केल्या. तिच्या खोलीत सर्व बाजूंनी संधिप्रकाश आत झिरपू लागला तशी ती खोलीतून बाहेर आली आणि लेकीच्या अभ्यासकक्षाकडे वळली.
आरुषी आपली खेळणी घेऊन खेळण्यात मग्न होती. तिने सगळ्या बाहुल्या आणि खेळण्यांतले प्राणी ओळीने सोफ्यावर मांडून ठेवले होते आणि ती त्यांच्याशी बोलत होती.
आत प्रवेश करत आई म्हणाली : “काय करताहेत हे सगळे?”
“आम्ही खेळतोय आई. ये, बस इथे.”
मरगळ झटकून टाकून आई म्हणाली : “आरुषी, आपण बाहेर जाऊन थोडी भरारी मारून यायचं का? फार अंधार पडायच्या आत परत येऊ.”
“हो sss”
मग माय लेकी त्यांच्या बागेवर उडू लागल्या आणि मग शेजारच्या छोट्याशा राखीव वनातील झाडांच्या वरून. आरुषी मजेत हसत खिदळत होती. अर्ध्या तासाने संधिप्रकाश मावळला आणि खाली पसरलेल्या गावातील रस्ते उजळले. भोपळ्याएवढे प्रकाशगोल बागांवर, चौकांवर आणि मैदानांवर तरंगू लागले तेव्हा आईने परत फिरण्याचे ठरवले; पण आरुषी कुठली ऐकायला!
“नाही, इतक्यात नको. मला अजून थोडा वेळ उडायचंय.”
“राणी, अंधार पडला. आपल्याला घरी परतायला हवं. तुझी शक्तिपेय पिण्याची वेळ झाली.”
पण आरुषीला मुळीच परतायचं नव्हतं. शेवटी आईला तिला बळेच कडेवर घेऊन, तिचे पंख मिटून घरी आणावं लागलं.
पण आता आरुषीच्या अंगात ऊर्जा संचारली होती. उभा दिवस अभ्यासकक्षात एकटीने घालवल्यावर जेव्हा आपापलं काम संपवून तिचे आई वडील तिच्याशी खेळायला मोकळे होत तेव्हा तिला भलताच उत्साह चढे. आतासुद्धा ती हसत, धडपडत पेय पिण्याच्या टेबलाभोवती पपाचा पाठलाग करत होती. तिच्याकडे पाहून आपण किती भाग्यवान आहोत याची आईला जाणीव झाली. तिची लेक बुद्धिमान, हसतमुख आणि गोड होती. आईला नेहमी वाटे की आरुषी जणू तिचीच प्रतिकृती होती – एक अधिक तेजस्वी, अधिक हुषार आणि अधिक कोमल प्रतिकृती! जणू तिचीच सुधारित आवृत्ती! तिला वाटे आपलं अस्तित्व एकाच वेळी दोन ठिकाणी आहे – एक आपण स्वतः म्हणून आणि एक आरुषी म्हणून. साक्षात्कारपूर्व मानवांना आपल्या मुलांबद्दल असंच वाटत असेल का? त्या वेळी बहुतेक सगळी मुलं नैसर्गिक रित्याच जन्मायची. असंच वाटत असेल त्यांनाही, अखेरच्या युद्धात मानवाचं पशूत रूपांतर होईपर्यंत.
______________________________________________________________________________________________
पेरू देशाच्या उत्तर किनाऱ्याच्या खाली खोलवर प्रथम गडगडाट सुरू झाला. एखाद्या थकलेल्या सांध्याच्या करकरण्यासारखा आवाज. पृथ्वीने उसासा टाकून आपली थकलेली पाठ सरळ केली असावी. अगदी खोलातून आलेल्या कण्हल्यासारख्या त्या आवाजाचे तरंग पृष्ठभागावर येऊन बहिर्मुख होत गोलाकार पसरले, वेदनेच्या आवर्तनांसारखे, घरघर आणि थरकाप यांच्या लाटांमागून येणार्या लाटांसारखे. तो गडगडाट पृष्ठभागावर येताच, जमीन प्रचंड जोराने हलली, ठिकठिकाणी दुभंगली. माती आणि खडकांतून वाकड्यातिकड्या भेगा पडल्या. शतकानुशतके एका जागी स्थिर असलेल्या शिळा स्थानभ्रष्ट झाल्या. टेकड्या डोलल्या आणि पर्वतांचे कणे हादरले. पृथ्वीच्या पोटात आणखी काहीतरी काडकन मोडले आणि महासागराच्या तळातून आणखी एक गडगडाट वर पसरला. कोट्यवधी गॅलन पाणी स्थलांतरित झाले. त्याच्या राक्षसी लाटा तयार झाल्या आणि आसुरी संतापाने जमिनीवर आदळल्या. त्यातून निर्माण झालेल्या हादऱ्याच्या लाटांचे तांडव मिनिटभर चालू राहिले. किनारपट्टीचा आकार बदलून गेला. पाणी आणि जमीन यांच्यातील संघर्ष चालू राहिला. सांधे करकरले. दूरवरच्या प्रदेशांचा भीतीने थरकाप उडाला. महासागरांतून तो गडगडाट वेगवेगळ्या भूखंडांमध्ये पसरला. जेव्हा सर्व शांत झाले आणि एक उसासा टाकून पृथ्वी पुन्हा झोपी गेली तेव्हा वाऱ्यानेदेखील श्वास रोखून धरला आणि तरंग विरून जाण्याची तो वाट पाहू लागला.
________________________________________________________________________________________________
प्रकरण तिसरे समाप्त…
