रघुनाथ पंडित भाग २
आधीच नैषधकथा नवनीत भेला
होता अलंकरणरूप इच्या जिभेला… ||१०४||
रघुनाथ पंडितांच्या काव्यपंक्तीतील हा छोटासा भाग नलदमयंती स्वयंवराचं मूळ काव्य आणि रघुनाथ पंडितांनी तिच्यावर चढवलेल्या अलंकारांचं रूप दाखवतं. लोण्याचा गोळा असावा अशी ही मृदू कथा आणि तिने परिधान केलेले अलंकार आणि आभूषणं!
अलंकार हा शब्द कसा आला? संस्कृतात अलम् हे भूषणवाचक अव्यय आहे. कृ म्हणजे करणे — अलंकृत करणे. साध्या वाक्यांना अलंकार चढवले की मूळ कल्पनेचं रूप खुलून येतं.
प्र + आस – आस म्हणजे रचना, प्र हे अक्षर प्रकर्ष म्हणजेच पुनरावृत्ती दाखवतं.
अनुप्रास हा शब्द असा घडला आहे. त्याने काव्यात नाद येतो. काव्य सादर करताना उठाव येतो. विविध प्रकारांच्या अनुप्रास आणि वृत्तांमुळे येणारी गेयता रघुनाथ पंडितांच्या काव्यात मौज आणते.
दुसऱ्या आणि १४ व्या स्थानावर ‘जी’ हे अक्षर येईल अशी मांडणी जोरकस ठरते.
(शार्दूलविक्रीडित : चाल : आजीच्या जवळी)
वाजीचें मन जाणता, सकळही राजी शिपाई जया
याजी होउनियां द्विजांसि म्हणतो ‘या जी धनें घ्यावया’
त्याजी जो धनदापरी सुकृत जें त्या जीव ऐसें गणी
गाजी तो नळभूप हूप धरुनी गा जी गुणींच्या गणीं //६//
हूप असा फारसा परिचित नसलेला शब्द वृत्तसुखास्तव योजला आहे. हूप म्हणजे उत्कंठा असा अर्थ मिळतो; पण उत्कंठाऐवजी हूप म्हणजे उर्दूतील घोडा बांधण्यासाठी असलेला लोखंडी पट्टा हा अर्थ अधिक योग्य वाटतो.
वाजिन् ( संस्कृत) म्हणजे घोडा, अनुप्रासासाठी राज़ी हा हिंदी शब्द,
नळाला ‘ग़ाज़ी’ (योद्धा) असं अरबी विशेषण!
संस्कृत, उर्दू आणि मराठी यांचा त्रिभाषा पेड वळून अनुप्रास साधत शार्दूलविक्रीडितात वरील रचना केली आहे.
हंसाशी मित्रत्व साधत दमयंतीच्या आठवणीने व्याकूळ झालेला नळराजा म्हणतो,
भला माझा तूं हंस गडी राया
विरह दुस्तर विस्तार निस्तराया||७०||
माझ्या चित्ताचं वाहन कर आणि तिच्याकडे जा अशीही तो विरहार्त आळवणी करतो.
स्त अक्षराच्या पुनरावृत्तीतून निर्माण झालेला अवघड अनुप्रास दिंडीतील गेयतेला वजन देतो. नऊ मात्रांसाठी केलेली विस् आणि तार अशी तोडफोड जाणवतही नाही. आणखी एक विशेष : निस्तरायाशी यमक जुळवताना राजाचा राया केला आहे. पंजाबीतही हा प्रकार दिसतो. यशोदा जसोदा, जसवंत यशवंत असे फरक उच्चारात दिसतात. जर्मन भाषेतही ज चा य होतो. याचं मूळ इंडोजर्मनइराणी संकुलात असावं.
हा विरहार्त नळराजा कसा होता?
एकाच उपमेयाला अनेक उपमाने असलेला!
त्याचं वर्णन करताना रघुनाथ पंडित तल्लीन होतात.
जो धैर्यें धरसा, सहस्र-कर-सा तेजें, तमा दूर-सा
जो रत्नाकरसा-गभीर शिर-सा भूपां
यशोहार -सा
ज्ञाता जो सरसावला नव-रसां माझारि शृंगार-सा
शोभे तामरसाक्ष तो नळ रसा-नाथ स्तवूं फार-सा ||१६||
धरसा, सहस्रकरसा, दूरसा असे ‘सा – सारखा’ हे साधर्म्यदर्शक अक्षर गुंफलेल्या विविध उपमांची माळ नळराजाला अर्पण केली आहे. धैर्यवान, सूर्यासारखा तेजस्वी, तमापासून (अज्ञान-तम) दूर असलेला म्हणजे ज्ञानी, समुद्रासारखा गहनगभीर अशा उपमांची माला घालत पूर्णोपमा अलंकार योजला आहे.
नळराजाची अशी काव्यात्म ओळख होते. दमयंती कशी आहे याचं वर्णन करताना रघुनाथ पंडितांनी योजलेले शब्द काव्याला काव्यकूटापर्यंत नेतात. कोड्यात टाकतात!
तया वनीं खेळे भूपसुतां
खेळविता बहु मेळविला सखि मेळ तया सहिता
राजस ते द्विजराजमुखी गजराजगती ललिता
ध्यात असे नळराजकथा रघुनाथ- कवींद्र- नुता||७९||
खेळ-मेळ, द्विजराज, गजराज, नळराज या अनुप्रासाने आणि मदिरा वृत्ताच्या जवळपास जाणाऱ्या छंदाने गेयता येते. चालीवर म्हणताना मजा येते पण अर्थ समजून घेताना दमछाक होते.
हे पद आहे. पदाला एक ध्रुवपद म्हणजे सामायिक क्रियापद असतं.
सख्यांचा समूह जमवून दमयंती वनात खेळत आहे.
राजस दिसणारी (राजसगुणात स्वामित्व, शृंगार या रजोगुणांचं प्रभुत्व असतं. तिच्या वर्तनात या दोहोंचं प्राबल्य आहे. ) द्विजराजमुखी – ब्राह्मणकन्या हा अर्थ इथे योग्य नाही… द्विजराजचा दुसरा अर्थ चंद्र! ही चंद्रमुखी आहे! गजराजाच्या धिम्या आणि ऐटबाज चालीची आहे आणि ती वनात खेळत आहे.
रघुनाथकवींद्रनुता — कवीन्द्र रघुनाथ पंडितांनी गायिली आहे (नुता) त्या नळराजाची कथा दमयंतीच्या ध्यानीमनी असते! अशी दमयंती खेळत आहे.
तिच्या चालीचं आणि सौंदर्याचं वर्णन पुन्हा पुन्हा करताना रघुनाथ पंडित काव्यातील गुण म्हणजे प्रसाद माधुर्य आणि ओज काव्यात ओवतात. अनुनासिके आणि कोमल वर्णांच्या रचनेमुळे काव्यात मार्दव आणि माधुर्य येतं. पुन्हा पुन्हा ‘खेळे भूपसुता’ या आवर्तनांमुळे दृश्य साकार होतं.
सुवर्णवर्णी हंसराज दृष्टीस पडल्यावर त्याला पकडायचा दमयंतीला मोह होतो.
हे मंदमंद पद सुन्दर कुन्द- दन्ती
चाले जसा मद धुरंधर इंद्र-दन्ती
हंसा धरूं जवळि जाय कृशोदरी ते
निष्कंप-कंकण-करासि पुढें करीते ८४
कुंदकळ्यांसारखे दात असलेली, कुन्द-दन्ती
आणि यमक जुळवत तिच्या चालीला उपमा दिली आहे… ‘ चाले जसा मद धुरंधर इंद्रदंती’
इंद्राचा हत्ती म्हणजे ऐरावत जसा मंद चालतो तशा चालीने ती हंसाला पकडायला जाते.
वसंततिलकेतील एका रचनेतील सहा अक्षरी यमक.
मी गुंतलों नळमहींद्रगुणौघ-पाशीं
सेवेसही मग करोनि तयाच पाशीं
आलोकुनी कवण या चतुरा न नाचे
लोकेशता विभव ही चतुराननाचे||१०२||
काही वेगळी रचना करून काव्यातील रस झरत ठेवणे हे कवीचं कार्य असतं. रसात्मकं काव्यम् ही काव्याची प्रसिद्ध व्याख्या. नळाला पाहून, त्याच्या गुणांचे ओघ रसाळ शब्दांत ऐकल्यावर कोण नाचणार नाही, असा प्रश्नालंकार मांडला आहे… अर्थ : सगळेच नाचतील!
या रसमय काव्यदुनियेत शृंगार रस राजा! सौंदर्य, रागानुराग, विलास यांचं तलम चित्रण यात केलेलं असतं. एखादा शब्द जरी अश्लील झाला तरी त्याचं सौंदर्य काळवंडतं. विठ्ठल कवीच्या रचनेत हे दिसून येतं. रघुनाथ पंडितांची शैली वर्णन करताना कधीही अतिधीट होत नाही.
दमयंतीच्या सौंदर्याचं वर्णन करणारी शृंगार रसातील एक रचना
चांपेकळी परिसही सरलत्व नाकीं
जीचा धरी अधर- विद्रुमभावना कीं
भासे मनांत बिंब-फल-भ्रमानें
कीं सत्य चंचु-पुट वोढविले शुकानें ||६१||
कळण्यासाठी अतिशय अवघड असलेली व्यतिरेक आणि उपमा अलंकारांनी सजलेली ही वसंततिलकेतली रचना.
चाफेकळीसारखं सरळ नाक असलेली दमयंती, तिचा खालचा ओठ पोवळ्यासारखा (विद्रुम) लालचुटुक आहे.
पहिल्या दोन ओळींत हे सांगून पुढे म्हणतात,
ओठ हे बिंबफल म्हणजे पिकलेलं तोंडलं आहे असं वाटून तिचं पोपटासारखं तरतरीत नाक पुढे आलं आहे; ओठांचं लालचुटुक तोंडलं खायला सरसावलं आहे. नाक म्हणजे पोपटाची चोच (उत्प्रेक्षा) अशी अलंकारांची ही मांदियाळी. हे वाचताना अक्षरशः थक्क व्हायला होतं. कविता म्हणजे आकाशीची वीज म्हणतात. रघुनाथ पंडितांचा कल्पनाविलास या विजांच्या तांडवनृत्यासारखा आहे असंच म्हणावं लागेल.
सुवर्णहंसाला पाहून दमयंती चकित होते. असा पक्षी तिने कधीच पाहिला नव्हता. तिची ही भावना व्यक्त करताना रघुनाथ पंडित म्हणतात,
असा पक्षी लक्षी बहुविहगलक्षीं न मिळता
सुवर्णी जो वर्णी वद कवण वर्णी कवयिता…
क्षी चा छेकानुप्रास आणि लक्षी म्हणजे ‘बघ’ आणि बहुविहगलक्षीं मधल्या लक्षीचा अर्थ ‘लाख’ अशी अर्थवाही गुंफण पहिल्या ओळीत! पुढच्या ओळीत वर्णी या शब्दाचा खेळ – सुवर्णी जो वर्णी – सोन्याच्या रंगाचा
कवण वर्णी – यातही दोन अर्थ निघतात कोणत्या वर्णांनी ( कोणत्या शब्दांचे उपयोजन) किंवा कसे वर्णन करेल!
तुल्ययोगिता अलंकारात हंसाचा दमयंतीशी संवाद गुंफला आहे. यातच प्रश्नालंकारही आहे आणि दृष्टान्तही आहे.
भूमिभागीं फिरणार तूं तुला मी
कसा सांपडेन सांग गगनगामी
बाळ बाळे जरि होय चंद्रकामी
हस्त त्याचा लागेल काय सोमी|| ९३||
“अगं, दमयंती तू भूमीवर विहार करणारी आणि मी तर आकाशविहारी! आपली तुलना कशी होऊ शकेल?… अर्थात तुला मी सापडणार नाही. पुढे एक छानसा दृष्टान्त :
“तो बघ चंद्र, असं म्हणताच बाळं चंद्राला पकडायला हात पसरतात, ते शक्य आहे का? तसाच तुझ्या हाताला मी लागणं अशक्य आहे.
रघुनाथ पंडितांचं काव्य हा भूलभुलैया आहे. एखाद्या अर्थाच्या शोधात जाताना नव्या अलंकाराची खूण मिळते, कधी द्व्यर्थ लक्षात येतो, कधी नवीन शब्दाची ओळखण होते आणि त्याच पंक्तीवर कितीतरी वेळ काव्यरसिक रेंगाळत राहतो.
विप्रलंभ शृंगारातील उत्कटता महत्त्वाची!
ध्यानी धरूनि तिजला मन हे निरीक्षी
दृष्टीपुढे दिसतसे मग हे मृगाक्षी
आहे जणों जवळिं हे गजराजगामी
ऐसाच भाव तंव बोलतसे तिला मी||६६||
प्रियतमेचं अस्तित्व हृदयाजवळ जाणवणं यातली उत्कटता — ध्यानी मनी तिचा आठव असतो, ध्यास असतो – यातून – – दिसून येते. हा विप्रलंभ शृंगार. याशिवाय मृगा‘सारखे’ डोळे असलेली हत्ती‘सारखी’ चाल असलेली अशा उपमांचा मृगाक्षी, गजराजगामी यांत अक्षी, गमन यांचा लोप झाला आहे म्हणून यात लुप्तोपमा अलंकारही आहे.
रसवत्ता हा काव्यगुण आणि स्वभावोक्ती अलंकार रघुनाथ पंडितांच्या काव्यात अगदी सहज स्फुरत गेलेले जाणवतात.
म्हातारी उडतां नयेचि तिजला माता मदीया असी
कांता काय वदो नव प्रसव ते सातां दिसांची तसी
पाता त्या उभयास मी मज विधी घातास योजीतसे
हातामाजि नृपा तुझ्या गवसलों आतां करावे कसें||४४||
अशी म्हाताऱ्या आईची करुणावस्था वर्णन करून, पत्नी सात दिवसांची ओली बाळंतीण आहे हे सांगत प्रेमरसाचाही फुटलेला पान्हा शब्दांतून साकारला आहे.
यात रसांसह, भावनावश करणारं
शार्दूलविक्रीडित वृत्त आणि २ आणि १४ व्या अक्षरांवर ‘ता’ ची आवृत्ती असा पुष्पक यमकाचा अलंकार चढवून दृश्य स्वभावोक्ती अलंकाराने यथातथ्य रेखलेले आहे.
शिखरिणी वृत्तात पुष्पक यमक सजवताना काही कठीण शब्दांचा चपखल वापर करत रघुनाथ पंडितांनी हंसाचं परत नळराजाकडे येणं रंगवलं आहे.
विसावा घे कांहीं उडुनि लवलाहीं परतला
नृपाळाच्या स्कंधीं बसुनि मणिबंधीं उतरला
म्हणे हंस क्षोणीपतिस तुज कोणी सम नसे
दयेचा हा ठेवा तुजजवळिं देवा वसतसे
कधी अनेक वर्णांची आवृत्ती एकदाच होते तिथे छेकानुप्रास होतो.
न रंजे कारंजे निरखुनि फणीतें फणफणी
मुदेनें मोदे ना नल-गुण-गणी जे गुणगुणी
न बैसे जे सेजेवरि न परिसे जे शुक-गिरा
न नाहे माना हें न धरि ललना हेतु दुसरा||१३३||
दमयंतीच्या विरहवेदनेचा उद्रेक अस्वस्थतेत, त्रागा करण्यात होतो.
केस विंचरायची फणी बघूनही ती वैतागते, केसांच्या मूद म्हणजे मोदकाच्या आकाराचा केसांचा दागिनाही तिला आनंद देऊ शकत नाही.
न नाहे – ती अंघोळही करत नाही.
छेक म्हणजे विद्वान. या विद्वानांना आवडणाऱ्या अवघड अनुप्रासाचं वर्णन स्वभावोक्तीचाही अलंकार ल्यायलेलं आहे.
रघुनाथ पंडितांनी संस्कृतातील अलंकारांचा सखोल अभ्यास करून असे वेचक अलंकार रसिकांपुढे ठेवले आहेत. यमकातील आणखी एक मौज…
सुर समस्त इच्या वर-निश्चयें
सु-रस मस्त असें वदले स्वये
नळ वराशि वरोनि सुखी असे
तुज नको जन कोण म्हणे असे||२१२||
पहिल्या आणि दुसऱ्या चरणात सुरुवातीलाच सुर समस्त
सुरस मस्त
असं आदियमक आहे — त्याला ‘मुख यमक’ असेही म्हणतात. वर्ण सारखेच आहेत; पण अर्थ वेगळा अशी ही कलाकुसर काव्याच्या मुखाशीच केली आहे म्हणून मुख यमक.
हे यमक साधण्यासाठी वर संस्कृतप्राचुर्य आणि खाली सुरस मस्त – मध्येच उर्दू अशी द्विभाषिक तडजोड केली आहे. पण तडजोडीपेक्षा ही कलाकुसर मनाला अधिक भावते.
यमकाचा आणखी एक सूक्ष्म प्रकार म्हणजे पुच्छ यमक. तिसऱ्या आणि चौथ्या चरणात येणारं — म्हणजे काव्याच्या शेपटावर येणारं ते पुच्छ यमक.
अमृतही पयही म्हणवीतसे
उभय होय तसी रुचि वीतसे
मधुर सारस तें जल गा तसें
मधुर सारस यास्तव गातसे||३३||
म्हण वीतसे, वीतसे
जल गा ( अहो) तसे आणि गातसे
ही शेपटावरील शब्दकरामत मजेशीर वाटते.
एकेक शब्द वाचताना बारकाईने वाचणं, त्यात काही द्व्यर्थ आहे का हे बघणं हा भाषिक खेळ रंगत जातो. एकेक अलंकार ओवताना त्यांनी केलेला विचार, वैविध्य थक्क करणारे आहे.
अलंकारांतला उत्सुकता निर्माण करणारा अलंकार म्हणजे भ्रांतिमान. लालचुटूक फळ समजून भुकेल्या मारुतीने उगवत्या सूर्याचा गोळ्याकडे झेप घेतली… ही भ्रांती किंवा भ्रम!
कवी याचंही अलंकारात रूपांतर करतात.
हंसा विलोकुनि सुधाकर अष्टमीचा
म्यां मानिला निटिल देश तिचाच साचा
शंख-द्वयीं धरुनि कुंकुम कीर-वाणी
लावावया तिलक लांबविला स्वपाणी ||६८||
चंद्राला बघून ते दमयंतीचं तेजस्वी कपाळ आहे असा नळाला भास झाला. त्यानं झट्कन कपाळावर कुंकू लावायला हात पुढे केला. चंद्राचा आणि दमयंतीचा शुभ्रवर्ण यांचं साम्य आणि मनात घोळत असलेलं दमयंतीचं रूप, तिच्याशी विवाहबद्ध होण्याची इच्छा, आपल्या नावाचं कुंकू तिच्या कपाळावर असावं ही ओढ या भावनेतून निर्माण झालेला भ्रांतिमान अलंकार इथे उपयोजिला आहे.
साकीतील अशीच सुंदर रचना
सरसद्युतिपद फुल शिरसांचें फुललें मृदुस्वभावें
चालवाल किति दूर तयातें अदय हृदय मज भावे||१८२||
शिरसीचे फूल म्हणजे नक्की कोणते हे कळले नाही; पण कालिदासाने लिहिले आहे शिरीषाचं फूल इतकं नाजूक असतं – ते फक्त भुंग्यांच्या पायांचे वजन सहन करू शकतं. रघुनाथ पंडितांनी बहुतेक याच नाजूक फुलांचे रूपक योजून दमयंतीच्या मनातील नलाविषयीची काळजी, प्रेम व्यक्त केले आहे. ती त्याला म्हणते, ‘तुमच्या श्रमांमुळे तुमचा चेहरा शिरसाच्या फुलाप्रमाणे लालबुंद झाला आहे. पायांना किती चालवाल! तुम्ही अगदी कठोर मनाचे आहात! शिरीष फुलाचे रूपक आणि ‘चालवाल किती दूर’ ही व्यक्त केलेली काळजी अशी ही गुंफण.
उपमानापेक्षा उपमेय महत्त्वाचे ठरते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो.
पीतां मरंद उदरं-भर बंभराचे
जें होय मंदिरहि सुंदर इंदिरेचें
ते पद्म तेथिल सहस्र दळां धरीतें
प्रत्यक्ष सूर्य किरणांस विसाववीतें ||३४||
वसंततिलकेतील या पदात मरंद, उदरंभर असे अनुनासिक योजून नादनिर्मिती केली आहे; याचबरोबर बंभर (भ्रमर) हा संस्कृत शब्द योजून अनुनासिकामुळे नाद आणि भर बंभर असा छेकानुप्रासही सहज ओवला आहे. अर्थाच्या दृष्टीनेही यात मौज आहे.
भुंगे मधपान करत आहेत… कशातून? त्याचं उत्तर खालच्या पंक्तीत ओवलं आहे –
इंदिरेचं मंदिर – इथे मंदिर सुंदर इंदिरेचे असं मधुरा वृत्ती अनुप्रासाचं सिंचन केलेलं आहे. इंदिरा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचं निवासस्थान असलेलं कमळ! ते आहे हजार पाकळ्यांचं. इथे कमळासाठी स्वभावोक्ती गुंफला आहे. हजार पाकळ्यांनी ते उमललं आहे… कशासाठी? ते पुढची ओळ सांगते : सूर्याच्या प्रखर किरणांना विसावा मिळावा म्हणून या पाकळ्या सज्ज झाल्या आहेत. शेवटी अर्थ काय निघतो? इतकी कमळं फुलली आहेत की सूर्याचे किरण आत रिघत नाहीत. तिथे सावली आहे. अतिशयोक्ती अलंकारातून असं फुलत गेलेलं हे कल्पनेचं बीज मनोवेधक ठरतं.
प्रश्नालंकार आणि अंत्यानुप्रास आणि प, ह या अक्षरांची दिंडी वृत्तातली वैविध्यपूर्ण वीण वाचत राहावी अशी आहे.
तया कासारीं राजहंस पाहे
राजहंसाचा कळप पोहताहे
तयांसाठीं हे वापिकाच पोहे…
नळें केली हें कोण म्हणे नोहे||३५||
पाहणे पोहणे यासह पाण्याची पोय अथवा पोह हा शब्द अंत्यानुप्रासासाठी चपखल योजला आहेच; शिवाय राजहंस पाहे म्हणजे हंसासारखा देखणा राजा (नळ) आणि राजहंसांचा कळप अशीही रंगत साधली आहे. शेवटात त्यांचा आवडता प्रश्नालंकार लेववला आहे… नळें केली हें कोण म्हणे नोहे? नळाशिवाय कोण करेल हे?
विविध अलंकारांतून आणि वृत्तांतून नळाचं गुणगान रघुनाथ पंडित करत राहतात. व्यतिरेकाचा अतिरेक करत ते चंद्र, गंगा, मोती यांचं उपमान घेऊन नलाशी तुलना करतात. नळराजा किती श्रेष्ठ होता, हे सांगत राहतात.
चंद्रासि लागति कळा उपराग येतो
गंगेसि भंग बहु पाणउतार होतो
जें चूर्ण होय तरि मौक्तिक तें कशाला
नाहीं समान नलराज महाशयाला
चंद्रासारखा शीतल, शुभ्रकीर्तिमान म्हणावं; तर चंद्राचा क्षय होत जातो, चंद्राला ग्रहणही (उपराग) लागतं. त्याचा शुभ्रवर्ण कायमचा राहत नाही.
गंगेसारखा उत्फुल्ल, पवित्र म्हणावं; तर गंगेला ओहोटी लागते, पाणउतार असा शब्द योजत पाण्याची कमी होणारी पातळी आणि त्यामुळे होणारा गंगेसारख्या नदीचा पाणउतारा म्हणजे अपमान असाही वळसा दिला आहे. नळाच्या वर्तनाला मात्र कधीही ओहोटी लागत नाही.
मोत्यासारखा शुभ्र, तेजस्वी म्हणावं; तर शुभ्र मोत्याचं चूर्ण होऊन जातं. नळराजाचं तेज मात्र कशानेही कमी होत नाही.
नळराजा आणि दमयंती यांचे गुण पराकोटीच्या आदर्श तत्त्वात ओवण्याचा रघुनाथ पंडितांचा अट्टाहास त्या काळाचा विचार करता हास्यास्पद वाटत नाही. आदर्श तयार करणे, आदर्शांनुसार चालणे ही तत्कालीन तत्त्वे होती. नळराजा, हंस हे आदर्श आताच्या परिभाषेत नायक ठरवत रघुनाथ पंडितांनी कथेतून संस्कारांचे धडेही दिले आहेत. रघुनाथ पंडितांची प्रवाही शब्दकळा गुंग करते, चढवलेल्या अलंकारांमुळे बौद्धिक सुख देते त्याचबरोबर वृत्तबद्धतेमुळे गुणगुणताही येते. त्यामुळे ती केवळ पंडिती काव्य न राहता सर्वसामान्यांचीही होते.
क्रमशः
संदर्भ
संदर्भ :
१) अलंकार चंद्रिका (गणेश मोरेश्वर गोरे)
२)नल- दमयंती स्वयंवराख्यान
(सिताराम विष्णु सरवटे)
