संपादकीय एप्रिल २०२५ 

रोखठोक भाषण  संपले… 

बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रभावशाली सार्वजनिक सेवा प्रसारण  संस्था आहे. १८ ऑक्टोबर १९२२ साली या संस्थेची स्थापना झाली. ती एक स्वायत्त संस्था आहे.  गेली अनेक  दशके बीबीसीने निष्पक्ष आणि उच्च दर्जाचे कार्यक्रम, बातम्या आणि माहिती देऊन जगभरातील लोकांचा विश्वास संपादन केला आहे. मात्र, अलीकडच्या काळात बीबीसीला अंदाजपत्रकीय तरतुदीत घट आणि आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या घटीचे बीबीसीच्या कार्यावर आणि भविष्यावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. 

अंदाजपत्रकीय घटीचा सर्वात मोठा परिणाम बीबीसीच्या कार्यक्रमांवर होईल. कमी निधीमुळे नवीन आणि महत्त्वाकांक्षी कार्यक्रम तयार करणे कठीण झाले आहे. अनेक लोकप्रिय मालिका आणि माहितीपट यांच्या निर्मितीमध्ये घट झाली आहे, तर काही कार्यक्रम बंदही करण्यात येत  आहेत.

बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) चालवण्यासाठीची आर्थिक तरतूद प्रामुख्याने खालील पद्धतीने होते :  

दूरदर्शन परवाना शुल्क (Television Licence Fee): बीबीसीच्या सार्वजनिक सेवा प्रसारणासाठी हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निधीचा स्रोत आहे. युनायटेड किंगडममध्ये (UK) जे लोक लाईव्ह टीव्ही पाहतात किंवा रेकॉर्ड करतात किंवा बीबीसी आयप्लेअर (BBC iPlayer) वापरतात, त्यांना वार्षिक दूरदर्शन परवाना शुल्क भरावे लागते. या शुल्कातून जमा झालेला पैसा बीबीसीच्या टीव्ही, रेडिओ आणि ऑनलाइन सेवांसाठी वापरला जातो.

व्यावसायिक उपक्रम (Commercial Activities): बीबीसीची एक व्यावसायिक शाखा आहे, जी ‘बीबीसी स्टुडिओज’ (BBC Studios) या नावाने ओळखली जाते. ही शाखा जगभरात बीबीसीचे कार्यक्रम विकते आणि इतर व्यावसायिक उपक्रमांमधून पैसे कमावते. यातून मिळणारा नफा पुन्हा बीबीसीच्या कार्यक्रमांमध्ये आणि सेवांमध्ये गुंतवला जातो.

सरकारी अनुदान (Government Grants): बीबीसी वर्ल्ड सर्विस (BBC World Service), जी जगभरात बातम्या आणि माहिती प्रसारित करते, तिला काही प्रमाणात युके सरकारकडून अनुदान मिळते.

इतर स्रोत (Other Sources): याव्यतिरिक्त, बीबीसीला काही प्रमाणात मालमत्तेचे भाडे किंवा वस्तूंची विक्री अशा इतर मार्गांनीही उत्पन्न मिळते.

 यांपैकी दूरदर्शन परवाना शुल्क हे बीबीसीच्या सार्वजनिक सेवा कार्यासाठी सर्वात महत्त्वाचा  आर्थिक आधार आहे.

  आर्थिक कारणांमुळे बी बी सी चे जे अनेक चांगले कार्यक्रम बंद होणार आहेत त्यांमध्ये ‘हार्ड टॉक’  या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमाचा समावेश आहे. स्टीव्हन सॅकर हे या कार्यक्रमांतर्गत जगातील अनेक मान्यवर व्यक्तींची मुलाखत घेत असत. हार्ड टॉकची ओळख त्याच्या निर्भीड आणि परखड शैलीमुळे आहे. मुलाखतकार कोणत्याही दबावाला बळी न पडता, जनसामान्यांच्या मनात असलेले प्रश्न थेट विचारत. त्यामुळे हा कार्यक्रम अनेकदा वादग्रस्त ठरला असला तरी तो माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारा असतो

या कार्यक्रमात  जागतिक स्तरावरील अनेक नेते, विचारवंत आणि प्रभावशाली व्यक्ती सहभागी झाले आहेत. त्यांच्या मुलाखतींमधून अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला गेला. प्रेक्षकांना जगातील घडामोडी अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली. हार्ड टॉकने अनेक वर्षांपासून आपली गुणवत्ता आणि लोकप्रियता टिकवून ठेवली होती.   या मुलाखतींत नेमके व भेदक प्रश्न विचारून  व्यक्ती किंवा  तिच्याशी निगडित एखादा प्रश्न यांची उकल करण्याचा प्रयत्न होत असे. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पूर्वतयारी केली जायची.  प्रश्नांना व्यापक अभ्यासाचे पाठबळ असल्याने हे प्रश्न व उत्तरे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने महत्त्वाची होती.   गेली १९  वर्षे अव्याहत  चालू  असलेला हा कार्यक्रम युनायटेड किंगडमशिवाय देशोदेशी पाहिला जायचा.  सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांची नुकतीच या कार्यक्रमांतर्गत झालेली मुलाखत आपण सर्वांनी  पाहिली. हा कार्यक्रमआहे.

  कार्यक्रम बंद करण्याचा व्यवस्थापनाने निर्णय घेतल्यामुळे  स्टीवन हे उद्विग्न झाले आहेत आणि आपण ते समजू शकतो. आपला कार्यक्रम खर्चीक  कार्यक्रमांपैकी नव्हता आणि त्यातून बी बी सी ला मिळणारी लोकप्रियता व विश्वासार्हता पाहता हा निर्णय अनाकलनीय आहे असे त्यांचे मत आहे. कार्यक्रमाचे यश माझे एकट्याचे नाही तर आमच्या संघाचे आहे. माझ्यापूर्वी अनेक चांगले मुलाखतकार या कार्यक्रमात भाग घ्यायचे हेही त्यांनी आवर्जून नमूद केले. हल्ली लोकांना लाईव्ह अँड ब्रेकिंग पाहण्याची सवय झाली आहे आणि तेच आवडते असा बीबीसी व्यवस्थापनाचा गैरसमज आहे.  विचारपूर्वक तयार केले गेलेले अभ्यासपूर्ण कार्यक्रम लोकांना हवे आहेत याचा विसर पडतो आहे असे त्यांचे म्हणणे विचार करायला लावणारे आहे.  या कार्यक्रमात वस्त्रहरण होण्याची शक्यता असतानादेखील जगातील अनेक हुकूमशहा या कार्यक्रमात का भाग घेतात? हा त्यांना विचारलेला प्रश्न व  या प्रश्नाला “त्यांचा अहंकार त्यांना हे करायला लावतो”  हे त्यांचे उत्तर दोन्ही अद्भुत!  

Author

Leave a Reply