झुकझुक आगीनगाडी  : लेख क्र.२ 

  

रेल्वेमध्ये नोकर भरतीचे विविध प्रकार आहेत :

१ रेल्वे भरती मंडळ (RRB) / भारतीय प्रशासनिक सेवा (UPSC)  यांच्याद्वारे 

२ कला/खेळ  विशेष प्रावीण्यप्राप्त खेळाडूंची थेट भरती  

३ अनुकंपा तत्त्वावर भरती  

 ४ SCOUTआणि GUIDE यांत प्रावीण्य मिळवलेल्या मुलांना प्रवेश 

५ इतर सक्षम अधिकारान्वये

जेव्हा  सरळ क्र. १ द्वारे भरती होते तेव्हा पात्र उमेदवाराला  त्या खात्याबद्दल काही महिने/वर्षे  प्रशिक्षण  दिले जाते आणि मगच खातेनिहाय परत परीक्षा घेऊन भरती केले जाते.   Electronics /Electronics &Communication  मधील विषय असलेले  पदवीधारक   असेल तर सिकंदराबाद, Electrical  असेल तर नाशिक, Mechanical असेल तर जमालपूर, Medical असेल तर मद्रास किंवा ,भायखळा, Civil असेल तर पुणे आणि प्रशासनासाठी बडोदा या ठिकाणी.  

इतर खात्यांसाठी अगदी महाविद्यालयाप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते. या कालावधीमध्ये त्याला त्या- त्या  झोनमध्ये (मध्य-रेल्वे,पश्चिम-रेल्वे, दक्षिण-रेल्वे आणि इतर)  फिल्डमध्ये ट्रेनिंग दिले जाते. माझे खाते संकेत आणि दूरसंचार (Signal&Telecom) होते. मला मध्य रेल्वेच्या झाशी,जबलपूर,भोपाळ,मुंबई, भुसावळ,नागपूर आणि सोलापूर या ठिकाणी  प्रॅक्टिकल/फील्ड ट्रेनिंग दिले गेले व त्यानंतर पोस्टींग केले गेले.

मला फील्ड ट्रेनिंग मध्ये आलेले काही अनुभव.

१.मी जेव्हा सिकंदराबाद इरीसेट (Secunderabad,IRISET ,Indian Railways  Institute of Signal Engineering and Telecommunication) क्लासरूम ट्रेनिंग संपून    जबलपूरला होतो, तेव्हा मला माझ्या वरिष्ठाने   फील्डवर जाताना अतिशय गबाळा ड्रेस घालायला सांगितला आणि साधी चप्पल घालून यायला सांगितले.   आम्ही रेल्वे रुळाच्या बाजूने निघालो. चंबळचे खोरे रुळाच्या दोन्ही बाजूंना आहे. माझे वरिष्ठ आम्हांला कामाची माहिती सांगत  होते.  आम्ही टिपण घेत  होतो. हा  विभाग   खूपच छान आणि निसर्गरम्य   होता. (Section  किंवा Block म्हणजे दोन स्टेशनांमधील रेल्वेच्या अधिकारातील प्रदेश.) काही अंतर चालून गेल्यावर अचानक दोन डाकूसदृश  माणसे आमच्या समोर आली आणि म्हणाली, “निकालो पैसा.”

आमच्या सिनिअरने त्यांना  सांगितले, “नये बच्चे हैं Training दे रहा हूँ, ” तरी त्यांनी आमची बॅग आणि खिसे तपासले, थोडेफार पैसे होते  ते घेऊन निघून गेले. नंतर बॉसने  सांगितले, “चांगले कपडे असते तर अपहरण  करून पैसे मागितले असते.” 

असाच  आणखी एक प्रसंग Eastern रेल्वेमधील   लुमडुंग (आसाम/ म्यानमार जवळील प्रदेश) माझ्या  सहाध्यायीने सांगितलेला.

प्रत्येक छोट्या स्टेशनवर तिथे काम करणारे  कर्मचारी आणि  अधिकारी यांची नावे आणि त्यांचे खाते लिहिलेले फलक  असतात. जेव्हा कर्मचारी स्टेशनावर कामासाठी येतो आणि त्याला विभागात   जावे लागते तेव्हा तो  कर्तव्यावर असलेल्या स्टेशन मास्तरला रिपोर्ट  करतो,   पासवर्ड विचारतो आणि सेक्शनमध्ये निघतो.  ज्या वेळी  माओवादी /समाजकंटक  भेटतो आणि कामाला प्रतिबंध करतो त्या वेळी आमचा कर्मचारी त्याला पासवर्ड सांगतो. पासवर्ड जुळला तरच त्याला त्रास दिला जात नाही आणि रेल्वे  रूळ आणि इतर उपकरणांची, भूमिगत केबल्सची  देखभाल करू दिली जाते. 

 याबद्दलची माहिती अशी की,  Black  Widow नावाची अतिरेकी संघटना रेल्वे रुळावर स्फोटके, मोठे दगड आणि लाकडी ओंडके  ठेवून देशाला त्रास देत असे. तसे करू नये आणि आपल्या जिवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून तेथील स्टेशन मास्तर आणि सर्व कर्मचारी मिळून  एक ठरावीक रक्कम त्या माओवादी संघटनेच्या नेत्याला देत असत आणि मासिक पासवर्ड दिला जात असे. हळूहळू हे  कमी झाले आहे. मिझोरम आणि मणिपूर   येथील अशा बऱ्याच  संघटना असेच  काम करत होत्या. 

आणखी एक  मला आलेला अनुभव : सोलापूर जवळ असल्यामुळे मी शनिवार-रविवारी जोडून सुट्टी आली तर सोलापुरी यायचो. त्या वेळेला आताची हुसैन सागर एक्सप्रेस मिनार एक्स्प्रेस  म्हणून ओळखली जायची. मी सिकंदराबाद स्टेशनला  घाईघाईत आल्यामुळे सामान्य डब्यात साधारणतः दुपारी ३ च्या  सुमारास  चढलो. एकाने मला जागा दिली. तो म्हणाला, “कुणी विचारलं तर ड्रायव्हर म्हणून सांगा.” मला कळले नाही.  मी विचारले, “का?”  

तो म्हणाला, “नंतर सांगतो.” 

गाडी सुरू  झाली होती आणि वेग  पकडला होता. अचानक तीन-चार  गुंडप्रवृत्तीची तरुण मुले हातात चाकू घेऊन पैशांची मागणी करत फिरू लागली. माझ्यापाशी आल्यावर मी ड्रायव्हर आहे असे म्हणालो. ठीक आहे म्हणून पुढे गेली. दोन – अडीच तासांनी तांडुर नावाचे स्टेशन आले. तिथे ही गँग चालत्या गाडीतूनच उतरली. मी त्या मित्राला विचारले,  “हा ड्रायव्हर  प्रकार काय आहे?”

त्याने सांगितलेली माहिती रंजकच होती. 

मुंबईहून महिंद्र ॲंड महिंद्र आणि अशोक लेलँडचे आणि इतर कंपन्यांचे ओपन ट्रक म्हणजे फक्त ड्रायव्हरची केबीन असलेले ट्रक, हे ड्रायव्हर, ट्रकच्या बॉडी बिल्डिंग करता हैदराबादला आणतात आणि ट्रक  पोहचवून मिनार एक्स्प्रेसने मुंबईला निघतात. असेच ७-८ ड्रायव्हर, ट्रक पोहचवून मुंबईला निघाले असताना ही गँग त्यांना  या गाडीत भेटली. गाडीतच मारामारी झाली.  ड्रायव्हर लोकांनी त्यांच्या एका लुटारूला चालत्या गाडीतून ढकलून दिले आणि बाकीच्यांना बेदम मारले. ज्याने मला ही गोष्ट सांगितली ते तिघेच होते. मराठी बोलल्यामुळे त्याने मला सांगून ड्रायव्हर  म्हणून गाडीत असलेल्या लोकांची  संख्या  वाढवली आणि आमचा प्रवास निर्धोक झाला. आता प्रवास खूपच  बिनधोक झाला आहे. ही घटना १९९० ची आहे. 

————————————————————————————–

 नवीन रेल्वे कर्मचारी आणि भारतीय प्रवासी यांच्यातील ‘चौकशी’  खिडकीवरील सुसंवाद.(विनोदी, पूर्ण ऐका ) https://youtu.be/M3UI3YKCf08?si=Dkl4d197mHzFm04Q

Author

Leave a Reply