मधुमेह आणि जाडेपणावरच्या औषध-शोधकांना लॅस्कर पुरस्कार
लॅस्कर पुरस्कार
आज जगभर जाडेपणाचे प्रमाण वाढत आहे आणि भारत त्यात मागे नाही. ओबेसिटी म्हणजे सुदृढता नसून ती एक विकृती आहे, असा त्या शब्दाचा आशय आहे. आज यातूनच एक नवा शब्द आकाराला येत आहे तो आहे : ‘डायाबेसिटी.’ डायबेटीस आणि ओबेसिटी या दोन्ही विकृती एकत्र असणे म्हणजे डायोबेसिटी असणे. तेव्हा या दोन्हीवर उपाय शोधण्याची गरज होती. हे संशोधन अनेक वर्षे चालू आहे त्याला आज फळे धरत आहेत. त्याचा थोडक्यात वृत्तान्त .
‘साखरेचे खाणार त्याला –’ अशी एक म्हण आहे. पण रक्तातील साखरेच्या चयापचयामध्ये (मेटॅबॉलिझम) जर काही समस्या निर्माण झाल्या तर शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. मधुमेह आणि स्थूलपणा यांवरील नवीन औषधांच्या संशोधनाकरिता जोएल हॅबनर(Joel Habener) (जन्म १९३७), स्वेतलाना मॉयसाव(Svetlana Mojsov) (जन्म१९४७) आणि लोटे नूडसन(Lotte tiBjerre Knudsen)(जन्म १९६४) या तीन वैज्ञानिकांना या वर्षीचा लॅस्कर हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार अमेरिकेत घोषित झाला. स्वेतलाना आणि लोटे या दोन महिला वैज्ञानिक त्यात आहेत हे महत्त्वाचे. https://laskerfoundation.org/
जोएल हॅबनर हे अमेरिकेतील मॅसॅचुसेट्स जनरल हॉस्पिटल येथे १९८० मध्ये एन्डोक्रायनॉलॉजिस्ट म्हणून काम करत होते. त्यांच्या संशोधनाचा विषय होता टाइप-२ डायाबीटीस. या प्रकारच्या मधुमेहात कोणती हॉर्मोन्स गुंतलेली असतात यावर त्यांचा शोधाभ्यास चालू होता. मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते याचा अर्थ स्वादुपिंड इन्सुलीन कमी प्रमाणात तयार करत असले पाहिजे किंवा तयार झालेले इन्सुलीन साखरेचे योग्य प्रकारे पचन करत नसावे असा त्यांचा कयास होता.
शरीरात ‘ग्लुकॅगॉन’ हेही एक हॉर्मोन तयार होते. या हॉर्मोनमुळे रक्तातील साखर वाढते; म्हणजे याची ‘अॅक्शन’ इन्सुलिनच्या अगदी विरुद्ध असते; तेव्हा याचाही तपास घेतला पाहिजे असे हॅबनर यांना वाटले. त्यांनी ग्लुकॅगॉन तयार करणारा जनुक ‘क्लोन’ केला. तेव्हा हाच जनुक आणखी एक हॉर्मोन निर्माण करतो असे हॅबनर आणि त्यांच्या चमूला आढळून आले. या हॉर्मोनचे नाव होते जी एल पी-१. हे हॉर्मोन स्वादुपिंडाला इन्सुलिन तयार करण्यासाठी उद्दीपित करते असेही समजले. हे हॉर्मोन मधुमेहाच्या रुग्णांना दिले तर त्यांच्या रक्तातील वाढलेली साखर कमी करता येईल असे हॅबनर यांना वाटत होते.
स्वेतलाना मॉयसाव यांनी संशोधनाचा धागा पुढे नेला. स्वेतलाना यांचा जन्म युगोस्लाव्हिया (आज सर्बिया) येथील. पण त्यांचे सर्व शिक्षण आणि वास्तव्य अमेरिकेत. त्या पदवी शिक्षण घेत होत्या तेव्हा त्यांनी Bruce Merrifield यांच्या प्रयोगशाळेत ‘ग्लुकॅगॉन्’चे रासायनिक संश्लेषण केले होते.
ब्रूस मेरीफील्ड (१९२१—२००६) हे अमेरिकन बायोकेमिस्ट – त्यांना १९६९ साली लॅस्कर पुरस्कार आणि १९८५ साली केमिस्ट्रीचे नोबेल मिळाले होते.
स्वेतलाना रसायनविज्ञानाचे उत्तम प्रशिक्षण घेऊन मॅसॅचुसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये आल्या आणि त्यांनी स्वतंत्रपणे जी एल पी-१च्या अमिनो आम्लांचा अनुक्रम शोधून काढला. यामुळे जी एल पी-१ची रचना स्पष्ट झाली. ही संशोधनातील महत्त्वाची पायरी होती. ही पायरी चढल्यामुळे जी एल पी-१ चा ‘बायोॲक्टिव फॉर्म’ प्रयोगशाळेत तयार करणे शक्य झाले. त्यांनी या हॉर्मोनचे उंदरांवर प्रयोग केले. हे जी एल पी-१ उंदरांना टोचले आणि त्यामुळे उंदरांच्या स्वादुपिंडातून इन्सुलीन स्रवले हे स्वेतलाना यांनी सिद्धच केले. हे माणसावरील उपचाराच्या वाटेतील महत्त्वाचे पाऊल होते. उंदीर हा सस्तन प्राणी आणि मानव हासुद्धा सस्तन प्राणी, त्यामुळे उंदरावरील उपचारांचे निष्कर्ष साधारणपणे मानवाला लावता येतात. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सूत्रामुळे असा विचार करणे शक्य होते हे विसरून चालणार नाही.
लोटे नूडसन ह्या डच वैज्ञानिक. टेक्निकल युनिवर्सिटी ऑफ डेन्मार्क येथून नूडसन यांनी केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली आणि कोपेनहेगन येथे नोव्हो नॉर्डिस्क या फार्मा कंपनीत संशोधक म्हणून रुजू झाल्या. त्यांनी या संशोधनाचा पुढचा धागा विणला. जी एल पी-१ याचा ‘बायोॲक्टिव-फॉर्म’ शरीरात इंजेक्शनने दिल्यानंतर तो रक्तात फार काळ टिकत नाही, लगेच ‘मेटॅबोलाईज’ होऊन जातो. त्यामुळे हे हॉर्मोन औषध म्हणून वापरणे शक्य नव्हते. नूडसन आणि त्यांच्या चमूने याचे औषधात रूपांतर करण्याकरता शोधप्रयत्न केले.
जी एल पी-१ हे औषध म्हणून वापरण्यासाठी ते रक्तात जास्त काळ टिकले पाहिजे हाच त्यांच्या संशोधनाचा उद्देश होता. त्यांनी एका स्निग्धाम्लाचा रेणू (फॅटी ॲसिड) जी एल पी-१ ला चिकटवला आणि त्याचे औषधात रूपांतर झाले. त्यानंतर जी एल पी-१च्या औषधांची मालिकाच तयार झाली. कोणतेही औषध निदानीय चाचण्या झाल्याशिवाय बाजारात आणता येत नाही. १९९२ साली या औषधांच्या निदानीय चाचण्या मणसांवर सुरू झाल्या. म्हणजे अठरा वर्षे अशा अनेक चाचण्यांची शर्यत पार करत गेल्यानंतर २०१० साली अमेरिकन फूड अँड ड्रगॲडमिनिस्ट्रेशनने हे औषध टाइप-२ डायाबेटीससाठी वापरण्याची परवानगी दिली. या औषधाची अनेक रूपे तयार झाली. निदानीय चाचण्या चालूच होत्या. हे औषध टाइप-२ डायाबिटीसमध्ये येत असलेला जाडेपणा कमी करण्याकरताही उपयुक्त ठरत आहे असे दिसून आले. २०१४ साली अमेरिकेच्या एफ. डी. ए. ने हे औषध ‘मधुमेह-जाडेपणा’-‘डायबेसिटी’ कमी करण्यासाठी उपयोगात आणण्याची परवानगी दिली. औषध तयार करण्याचे संशोधन फार्मा कंपनीत झाले होते. ‘फार्मा कंपनीतसुद्धा उत्तम संशोधन करता येते हे तरुण संशोधकांनी लक्षात घ्यावे’ असे महिला वैज्ञानिक नूडसन यांनी सांगितले आहे.
मेटॅबॉलिक डिसऑर्डर्स
आज जगभरात ‘इन्फेक्शन्स’मुळे म्हणजे जिवाणू-विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. पण मेटॅबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे चयापचयाच्या विकृतींचे प्रमाण वाढते आहे. याला ‘डिसीज बर्डन’ – ‘मानवतेवरचे रोगांचे ओझे’ – असे म्हणतात, ते मात्र वाढते आहे. मधुमेह, जाडेपणा, हृदयविकार, अथेरोस्क्लेरॉसिस – रक्तवाहिन्या जाड होणे हे रोग मेटॅबॉलिक डिसऑर्डर्स – चयापचयाच्या विकृतीमध्ये मोडतात. भारत हा आर्थिक दृष्ट्या ‘मिडल इनकम’ आणि विकसनशील देश आहे. भारतात मधुमेह, जाडेपणा, हृदयविकार, यांचे प्रमाण वेगाने वाढते आहे. तरुणाईचा यात भरणा आहे. ही धोकादायक बाब आहे. चयापचयाच्या विकृतीत आहार, व्यायाम या दोन गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. याचा अर्थ या रोगात जीवनशैली महत्त्वाची असते. ‘जंक-फूड,’ तणावपूर्ण जीवन आणि व्यायामाचा अभाव अशा जीवन-वर्तनामुळे हे रोग वाढतात. नवीन औषधे निघाली तरी जीवनशैलीतील आमूलाग्र बदल हा अत्यंत महत्त्वाचा असतो असे वैज्ञानिकांनी मुद्दाम सांगितले आहे. औषधांचा नवीन वर्ग
या संशोधनात विकसित देशांतील अनेक संशोधकांनी भाग घेतला आणि या प्रकारच्या औषधांची अनेक रूपे तयार केली. याला ‘न्यू क्लास ऑफ ड्रग्ज’ म्हणजे ‘नवीन औषधांचा वर्ग वा समूह’ म्हणतात. या औषधांच्या विविध विकृतींवर निदानीय चाचण्या झाल्या. अथेरोस्क्लेरॉसिस – रक्तवाहिन्या जाड होणे, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, मेंदूच्या काही विकृती, अशा विविध विकृतींवर ही औषधे गुणकारी ठरण्याची शक्यता आहे. औषधांचे प्रभाव असले म्हणजे त्याचे उपप्रभाव – साइड इफेक्ट्स असणारच, ते उपप्रभाव कमी करण्याचे संशोधन-प्रयत्न चालूच असतात. या औषधांनी चयापचयाच्या विकारांवर – मेटॅबॉलिक डिसऑर्डर्सवरील उपचारात ‘उत्क्रांती’ घडवून आणली आहे असे वैज्ञानिकांचे मत आहे. १९४५ पासून जी नोबेल मिळाली त्यांतील ९५ संशोधकांना आधी लॅस्कर पुरस्कार मिळाला होता म्हणून तर या तीन वैज्ञानिकांना मिळालेल्या पुरस्काराला जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
