अनंत भावे पहिल्यांदा भेटले ते दूरदर्शनच्या पडद्यावर. दूरदर्शनवर तेव्हा ते आठवड्यातून तीन दिवस बातमीपत्र वाचून दाखवायचे काम करत. गोरापान तेजस्वी चेहरा आणि मधमाश्यांच्या पोळ्यासारखी दिसणारी दाढी (तेव्हा ती काळी होती!). डोक्यावरचे केस मागे जाऊ लागले होते. आपल्या भेदक आवाजात, सुस्पष्ट, अचूक उच्चारांत ते बातम्या देत असत. ते स्वतः अभिनेतेही असल्यामुळे बातमीतला भाव त्यांच्या आवाजातही येत असे. मग तेव्हाच केव्हातरी त्यांची मुलांसाठीची पुस्तकेही हाती आली. ती मुलांनाच काय मोठ्यांनाही आवडावी अशी होती. मुलांसाठीची ठेक्यात म्हणता यावी अशी बडबड गीते आणि मुलांच्याच विश्वातली विनोदाने भरलेली नाटके.
मी त्या काळात फिल्म इन्स्टिट्यूटच्या चित्रपट आकलन वर्गाला जात होतो. तिथे प्राध्यापक सतीश बहादूर यांनी अकीरा कुरोसावाच्या ‘राशोमान’ची पारायणे केली होती. ती मी पाहिली होती आणि त्याचे चक्क मराठीत नाटक आले ‘राशोमान.’ मी ते पाहू शकलो नाही; पण त्याच्या जाहिरातीत अनंत भाव्यांचे नाव होते.
अनंत भाव्यांचे वाचनात आलेले दुसरे लेखन म्हणजे त्यांचे सदर लेखन. खुसखुशीत विनोदाने भरलेले ‘वडापाव’सारखे सदर ते लिहीत होते. त्यांच्या विनोदाची धाटणी अगदी वेगळी होती. चालू घडामोडींबद्दल लिहितानाही ते त्याला वेगळाच रंग देत. तेव्हा चालू असलेल्या परवीन बाबी आणि कबीर बेदी यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल त्यांनी लिहिले होते की, ती दोघे एकमेकांत इतकी गुंतली आहेत की त्यांचे नाव देखील ‘पकरबीवीरनबेबादीबी’ झाले आहे !
अनंत भावे यांचे नाव पुन्हा पुढे आले ते पुण्यात पु.भा.भावे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या साहित्य संमेलनात. मीही तिथे प्रेक्षक म्हणून गेलो होतो. संमेलनापूर्वी मनोहर मासिकात आलेल्या पु.भा.भावे यांच्या मुलाखतीत त्यांनी काही हिंदुत्ववादी विधाने केलेली होती. त्याचा निषेध करणारा ठराव मांडला होता अनंत भावे यांनी. संमेलनाच्या कार्यकारण समितीने हा ठराव घेतला नाही म्हणून तो ठराव घेऊन काही तरुणांनी समारोप सत्रात मोर्चा काढला. मोर्चा अडवायला पोलीस येऊ लागले तर व्यासपीठावर असलेल्या पु. ल. देशपांडे यांनी, ‘येथे साहित्याच्या उत्सवात पोलिसांचे काम नाही,’ म्हणून पोलिसांना जायला सांगितले. पोलीसही लगेच गेले; पण पुढे येणारा मोर्चा पाहून संमेलनाध्यक्ष पु.भा. भावे यांनी संमेलनच बरखास्त झाल्याचे जाहीर केले. पुढे अनंत भावे यांनी खासगीत बोलताना, “संमेलन उधळले जावे अशी माझी इच्छा नव्हती, भाव्यांच्या विधानांना असलेल्या विरोधाची नोंद घेतली जावी एवढेच मला वाटत होते,” असे सांगितले होते.
अनंत भावे यांची निवांत भेट झाली ती १९८२ च्या डिसेंबरमध्ये ग्रंथालीने महाराष्ट्रभर फिरून काढलेल्या ग्रंथजत्रेत. १९८० या वर्षी ग्रंथालीने काढलेल्या ‘कविता दशकाची’ या कविता संग्रहात ‘एक दशकाचा कवी’ म्हणून माझ्या कविता आल्या होत्या. या ग्रंथजत्रेसाठी ग्रंथालीने मलाही निमंत्रण दिले होते. तीन आठवडे चाललेल्या या दौऱ्यातील शेवटचा एक आठवडा मी सहभागी होऊन त्यांच्याबरोबर फिरलो. त्यात ग्रंथालीच्या संयोजकांमध्ये अनंत भावेही होते. आपल्या खादीच्या झब्बा-लेंग्यामुळे ते सर्वांत उठून दिसत होते. एकाच बसने आम्ही प्रवास करत होतो, एकत्र राहत होतो आणि वेगवेगळ्या गावांतील ग्रंथ प्रदर्शनात, दिंड्यांमध्ये, साहित्यिक कार्यक्रमांत भाग घेत होतो. मग अनंत भावे माझ्यासाठीही ‘भावे अण्णा’ झाले. बसमध्ये ग्रंथालीचे कार्यकर्ते आणि साहित्यिक दोघेही होते. प्रदर्शनांत कार्यकर्ते पुस्तके आणणे, मांडणे, विक्रीची नोंद करणे यांत व्यग्र असत आणि संयोजक एकूण दौऱ्याच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात. साहित्यिक बहुधा गावात हिंडत असत. मी ग्रंथप्रदर्शनात इकडे तिकडे करीत असे. तिथे भावे अण्णांनी मला पकडले. आमचा असा संवाद झाला :
“हेमंत, काय करतोयस?”
“काही नाही.”
“ग्रंथप्रदर्शन पाहायला येणाऱ्यांना त्यांना आवडतील अशी पुस्तके दाखव.”
मी मान डोलावली; पण मार्केटिंग ही गोष्ट मला फारशी जमणारी नव्हतीच.कधी कधी दौऱ्यातल्या कविसंमेलनात माझा कवी म्हणून सहभाग असे. एकदा भावे अण्णा सूत्रसंचालन करायला आले आणि आपल्या नर्मविनोदी निवेदनाने साऱ्या कविसंमेलनाचा त्यांनी ताबाच घेतला. प्रेक्षकांच्या हशाने प्रेक्षागृह दणाणून गेले. वासंती मुजुमदार यांना कविता वाचायला बोलावताना, भावे अण्णा म्हणाले, “कार्यक्रमाआधी वासंतीबाईंनी मला थोडे संकोचतच विचारले, ‘शृंगारिक कविता चालेल का?’ मी सांगितले ‘शृंगारिकच चालेल!”
मग वासंतीबाईंनी वाचलेल्या कवितांना श्रोत्यांची अभूतपूर्व दाद मिळाली.
माझ्या कविता भावे अण्णांना आवडत होत्याच. त्यांचेही त्यांनी आपल्या खास शैलीत प्रास्ताविक केले. भावे अण्णांच्या बालकविताही त्यांच्या तोंडून त्यांच्या खास आवाजात, तालासुरात ऐकायला मिळाल्या. मग ती ‘लालमलाल’ असो की
घोडा चाललाय टपाक टपाक
उंट चाललाय झपाक झपाक
कासव चाललंय हळू
त्याच्या पायाला झालंय गळू
असो.
केवळ पायाला गळू झाल्यामुळेच कासव हळूहळू चालते ही कल्पनाच मुलांनाच काय पण मोठ्यांनाही हसवीत असे.
दौऱ्यात राहण्याची व्यवस्था कधीकधी एकत्रच असे. रात्री जेवणानंतर मी रोज नियमितपणे दात घासायला जात असे. ते पाहून भावेअण्णांनी ‘हेमंत फार गुणी आणि व्यवस्थित मुलगा आहे’ असे प्रशस्तिपत्र दिले होते. दुपारच्या जेवणानंतर भावे अण्णा एक सिगरेट ओढत. एकच आणि तीही एकाच ब्रँडची. जेवायला जो काही पदार्थ असेल त्याची भावे अण्णा तोंड भरून स्तुती करत असत आणि वेगवेगळे पदार्थ चवीने खात असत. दिवसभर भावे अण्णांची सर्वांबरोबर चेष्टा-मस्करी चाले; पण ही चेष्टा मस्करी कधीच कुत्सित नसे. त्यांच्या बोलण्यात परनिंदा कधीच येत नसे. नेहमी इतरांचे कौतुकच असे.
माझा होड्या संग्रह तेव्हा नुकताच प्रकाशित झाला होता आणि तो मौजकडे वितरणासाठी होता. तो भावे अण्णांना फार आवडला होता. त्यांनी सांगितले की, “मौजकडून विक्री झालेल्या पुस्तकांतली निम्मी पुस्तके मीच विकत घेतली आहेत. कुणालाही काही भेट द्यायची झाली की दे होड्या, कोणाचे लग्न आहे, दे होड्या. मुंज आहे दे होड्या.” त्यावर मी नुसताच हसलो होतो.
१९८६ मध्ये माझ्या होड्या कवितासंग्रहाला जेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारचा केशवसुत पुरस्कार जाहीर झाला तेव्हा योगायोगाने ते बातमीपत्र भावे अण्णांनीच वाचले होते. पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद झालाच पण या संग्रहावर प्रेम करणाऱ्या भावे अण्णांनी पुरस्कार दिला गेल्याची बातमी दिली याचाही मला आनंद झाला होता.
लहान मुलांवर वाचनसंस्कार झाले पाहिजेत हे त्यांचे ठाम मत होते. त्यासाठी त्यांनी खूप पुस्तके तर लिहिलीच पण आपल्या आवाजात सांगितलेल्या गोष्टींची ऑडिओ बुक्सदेखील काढली. पुढे भावे अण्णांच्या पुस्तकांची माझ्या मुलींनीही पारायणे केली आणि कॅसेट्सची श्रवणभक्ती केली.
ग्रंथालीच्या दौऱ्यानंतरही भावे अण्णा भेटत राहिले. ते फिल्म फेस्टिवल्सना हजेरी लावत, साहित्य संमेलनांनाही जवळजवळ दरवर्षी जात – पण तिथे मंडपात नसत, मंडपाबाहेर लोकांना भेटण्यात, चकाट्या पिटण्यात त्यांना अधिक रस असे. कुणाशीही ते अगदी सहज संवाद साधू शकत असत – मुलांपासून मोठ्यांपर्यंत.
त्यांचे वाचन दांडगे होते केव्हाही भेटले तरी तेव्हा माझ्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कविता त्यांनी वाचलेल्या असायच्या. आवडलेल्या कवितेचे कौतुक करून झाले की त्यांचे एक नेहमीचे सांगणे असे
“हेमंत, मुलांसाठी काही लिही.”
“ते फार अवघड आहे.”
ते अवघड असल्याचे भावे अण्णा कबूल करत; ‘पण तुला जमेल,’ असे त्यांचे सांगणे असायचे. मी जी वाचली पाहिजेत असे त्यांना वाटे अशी त्यांच्याकडे असलेली इंग्रजी पुस्तके ते मला आवर्जून देत.
सुमारे दहा वर्षांपूर्वी ते पुण्याला आलेले असताना मला एका कार्यक्रमात भेटले. दुसऱ्या दिवशी मी त्यांना माझ्या घरी यायचे निमंत्रण दिले. ते आले. माझ्या बायकोने रांधलेल्या पदार्थाची स्तुती करून तो खाल्ला. ती इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद करते हे समजल्यावर त्यांनी सरोज देशपांडे यांनी केलेला ‘डॅडी लॉंग लेग्स’ या पुस्तकाचा अनुवाद फार सहजसुंदर मराठीत आहे असे सांगितले. आम्ही ते पुस्तक वाचले असल्याने त्यांचे म्हणणे आम्हाला एकदमच पटले.
पुण्यातच एक मराठी कवितेवर चर्चेचा कार्यक्रम होता. मी ऐकायला गेलो होतो. भावे अण्णा पुण्यात होते आणि तेही श्रोत्यांत होते. एका वक्त्याने माझ्या कवितेचा गौरवपर उल्लेख केला. कार्यक्रम संपल्यावर भावे अण्णा मला भेटले. म्हणाले, “मला त्या वक्त्याचे भाषण आवडले, कारण त्याने तुझा कवितेला चांगले म्हटले. तुझ्या कवितेला मी नेहमीच डोक्यावर घेणार.”
मी कधी मुंबईला गेल्यावर सुबोध जावडेकर, अवधूत परळकर आणि भावे अण्णा यांच्याबरोबर जेवायला जात असे. गप्पा रंगत. कधी माझ्या कवितांचा विषय निघाला तर भावे अण्णा हेमंतच्या कविता इरोटिक आहेत असे म्हणत असत. त्याला ते ‘गाथा सप्तशती’चाच आधुनिक अवतार म्हणायचे. मी माझ्या स्वभावानुसार त्याचा कधी प्रतिवाद केला नाही.
स्वतःच्या मराठीच्या प्राध्यापकीवर बोलताना ते म्हणाले होते, “मी काय रे मराठी कविता शिकवणार? गुरुनाथ धुरीसारखा माझा विद्यार्थी मलाच कविता शिकवू शकला असता.”
त्यांच्या पत्नी पुष्पाबाई मात्र मराठीच्या नावाजलेल्या प्राध्यापिका होत्या. त्यांच्या शिकवण्याची आणि समीक्षेची सर्वांनी वाखाणणी केलेली आहे. भावे अण्णांना त्यांच्या विद्वत्तेचे , सामाजिक कार्याचे आणि स्वयंपाकातील सुगरणपणाचे कौतुक होते. पुष्पाबाईंचे सामाजिक कार्यही मोठे होते. आणीबाणी विरोधी चळवळ असो, पाण्यासाठीचे आंदोलन असो की किणी खूनखटला लढवणे असो; पुष्पाबाई नेहमीच हिरिरीने आघाडीवर राहिल्या. भावे अण्णा कायम त्यांच्या पाठीशी राहिले.
पुष्पाबाईंनाही भावे अण्णांच्या बाल वाङ्मयाचे कौतुक होते. भावे अण्णांना बाल वाङ्मयासाठीचा साहित्य अकादमीचा २०१४ चा पुरस्कार मिळाला. तो स्वीकारताना भाषणाऐवजी भावे अण्णांनी चक्क आपल्या बालकविता गायल्या होत्या.
पुष्पाबाईंच्या विद्वत्तेमुळे बाहेर त्यांचा एक दरारा असे. भावे अण्णा मात्र कोणालाही जवळचे वाटत. भावे अण्णाही बुद्धीने कुशाग्र होते, दूरदर्शनवरील दर्शनामुळे लोकप्रिय झाले होते पण कोणीही त्यांच्याशी गप्पा मारू शकत असे आणि भावे अण्णांना तेच हवे असे. आपल्या मित्रमंडळींसाठी भावे अण्णा म्हणजे उत्साह आणि आनंदाचा धबधबा होते. खाण्यापिण्यापासून सर्व गोष्टींत त्यांना रस होता. त्यांची बुद्धी कुठल्याही गोष्टीतील विनोद शोधत असे – मग व. पु. काळे यांची पत्नी वसुंधरा त्यांच्या लेखी ‘वपुंधरा’ होत असे. त्यांचे दिलखुलास हसणे इतरांवर ठसत असे. ठणठणपाळांनी ललितच्या एका दिवाळी अंकात साहित्यिकांच्या एका पार्टीची काल्पनिक एकांकिका लिहिली होती. त्यात भावे अण्णांना ड्रिंक्स बनवून देण्याचे काम दिले होते आणि ठणठणपाळांनी नाट्यसूचना दिली होती : या पात्राला संवाद नाहीत फक्त हसणे आहे.
उदाहरणार्थ :
(अनंत भावे विद्याधर पुंडलिकासाठी पेला भरू लागतात.)
विद्याधर पुंडलिक : काय हे भावे ? मला अल्सर आहेत आणि ही गोष्ट विनोबा भाव्यांपर्यंत सर्वांना माहीत आहे.
भावे : हा हा हा हा हा हा हा हा हा हा
अर्थात ही ठणठणपाळांची कल्पना आहे पण भावे अण्णांचे हसणे असे सर्वांना माहीत होते. ठणठणपाळांच्या भाषेत म्हणायचे झाले तर अगदी विनोबांनाही!
भावे अण्णांची आणि पुष्पाबाईंची राहणीही अगदी साधी होती. त्यांनी जन्मभर खादीचे कपडे वापरले पण तेही अगदी झोकात.
पुष्पाबाईंच्या निधनानंतर मात्र भावे अण्णा काहीसे एकाकी पडल्यासारखे झाले. मुंबई सोडून ते पुण्यात अथश्रीमध्ये राहायला आले.
पुण्यातील निवडक साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांना मग भावे अण्णा येऊ लागले. आता हातात आधारासाठी काठी असे. साधनाने आयोजित केलेल्या दिवसभराच्या कार्यक्रमांना भावे अण्णा येत. आले की आधी बाहेर कट्ट्यावर बसत. मीही त्यांच्या शेजारी जाऊन बसे. येणारे जाणारे भावे अण्णांना पाहून त्यांना अभिवादन करीत. भावे अण्णाही त्याचा स्वीकार करीत. कार्यक्रम सुरू झाला की शेवटच्या रांगेत बसत. पुढे जाऊन बसू या, असे म्हटले तर त्याला तयार होत नसत. इथून उठून जायला मला सोपे पडते असे त्यांचे म्हणणे असे.
पुण्यात एकदा ‘अथश्री’मध्ये मला कविता वाचनाला बोलावले होते. भावे अण्णा दुसऱ्या ‘अथश्री’त राहत होते पण त्या कार्यक्रमाला ते आले. कार्यक्रमानंतर ते आले याबद्दल मी आनंद व्यक्त केला तर ते म्हणाले, “तुझ्या कविता वाचनाचा कार्यक्रम आणि मी येणार नाही असे कसे होईल?”
त्यांची तब्येत म्हणावी तेवढी साथ देत नव्हती पण त्यांचे रुटीन चालू असे. वाचलेले काही आवडले तर त्या लेखकाला आवर्जून तसे कळवत. पत्नीवियोगावरच्या माझ्या कविता वाचून त्या आवडल्याचे त्यांनी फोन करून सांगितले होते.
अगदी अलीकडे अमोल पालेकरांचे ‘ऐवज’ हे आत्मकथन प्रसिद्ध झाले ते भावे अण्णांनी स्वखर्चाने अनेक मित्रांना पाठवले. ही त्यांची लेखकाचे कौतुक करण्याची आणि आपल्या सुहृदांप्रती आत्मीयता दाखवायची पद्धत होती.
२३ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचा आत्मा परमात्मा स्वर्ग अशा गोष्टींवर विश्वास नव्हता – माझाही नाही – तरी त्या कल्पनांचा आधार घेऊन असे म्हणावेसे वाटते की, यम त्यांना जेव्हा घेऊन जात असेल तेव्हा त्यांनी रेड्याशीही गप्पा मारल्या असतील. स्वतः मनमुराद हसले असतील आणि यमालाच काय रेड्यालाही हसवले असेल!
अशी गोष्ट रचून सांगताना माझ्या डोळ्यांच्या काठांवर मात्र अश्रू येऊन थबकले आहेत.
