विनोबांच्या भूदान यज्ञामागील प्रेरणा

विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञ चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लिहिलेला हा विशेष लेख या ऐतिहासिक अहिंसक चळवळीचा आणि तिच्या दूरगामी परिणामांचा आढावा घेतो. भूमिहीनांना जमीन मिळवून देण्याच्या उदात्त हेतूने सुरू झालेल्या या चळवळीने सामाजिक आणि आर्थिक बदलांना कशा प्रकारे चालना दिली, हे यात विशद केले आहे. वर्तमान परिस्थितीत या चळवळीचे महत्त्व आणि प्रेरणा यांवरही लेख प्रकाश टाकतो.

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जनता महात्मा गांधीच्या प्रभावाखाली होती; परंतु अनेक मंडळींनी सत्तेच्या राजकारणाचा रस्ता धरला. गांधींच्या रचनात्मक कामामध्ये चरखा संघ, गो-सेवा, नयी तालीम इ. मध्ये अनेक मंडळी काम करत होती; परंतु स्वातंत्र्याची पहाट होऊ लागताच खादी, गोसेवा यांसारखी कामे किंवा सत्य, अहिंसा यांसारखी मूल्ये समाजपरिवर्तन कितपत घडवून आणू शकतील याबद्दल साशंकता होती. अनेकांनी या गोष्टींची उपेक्षाच केली.

गांधीप्रणीत मूल्यांची जपणूक आणि विधायक कार्य स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कसे करायचे याबाबत गांधीजींचे नेतृत्व आणि मार्गदर्शन अपेक्षित होते; पण दुर्दैवाने नेमक्या याच वेळी गांधींच्या आयुष्याची दोरी तोडली गेली. फेब्रुवारी १९४८ च्या पहिल्या सप्ताहात सेवाग्राममध्ये गांधी याबाबत बोलणारही होते; पण या सर्व कार्यकर्त्यांच्या संमेलनाला विनोबांचे नेतृत्व लाभावे असे नियतीनेच ठरविले होते. विनोबा आचार्य होते. त्यांचा पिंड आध्यात्मिक  होता. त्यांची विचारसरणी वैज्ञानिक होती. चिंतनातून प्रयोग आणि प्रयोगातून चिंतन हा त्यांचा कार्यक्रम होता.

गांधींच्या अनुयायांचे एक मजबूत संघटन बनवायला हवे, गांधींच्या नावाने निधी संकलन व्हावे असे अनेकांना वाटत होते; पण विनोबांचे मत एकदम वेगळे होते. या विचारसभेत विनोबांची तीन भाषणे झाली.त्या भाषणांनी एक नवीनच दिशा मिळाली.

विनोबांनी आपल्या भाषणात नैतिक अधःपतनाकडे सर्वांचे लक्ष वेधले. प्रांतीय भावनाही फुटीरतेकडे  नेईल की काय अशी भीती त्यांनी व्यक्त केली. विनोबांचा भर साधनशुचितेवर होता. गांधींच्या किंवा कोणाच्याच नावाने संघटना बांधणे यास विनोबांनी विरोध दर्शविला. १९४२ च्या आंदोलनातील  तुरुंगातील वास्तव्यावरून विनोबांच्या हे लक्षात आले होते की निरनिराळ्या मतप्रणाली, संघटना यांमध्ये काही मंडळी सज्जन होती तर काही दुर्जन होती. तेव्हा एकाच पक्षात राहून, एकाच संघटनेची कास धरून मला काम करता येणार नाही; उलट सज्जन लोक – मग ते कोणत्याही विचाराचे असोत – ते एकत्र आले तर अहिंसा प्रस्थापित होईल असा विनोबांचा विश्वास होता.

विनोबा म्हणाले की गांधींचे सिद्धांत आले कोठून? सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह यांना आपण यम म्हणतो. हे पूर्वीपासून आले आहेत. आपल्या वर्तनात गांधीजींनी ही तत्त्वे, मूल्ये आणली म्हणून गांधीजींना प्रतिष्ठा मिळाली. गांधींमुळे सत्याला, श्रमाला प्रतिष्ठा मिळाली नाही; उलट सत्यामुळे, शरीरश्रमामुळे गांधींना प्रतिष्ठा मिळाली. ही गांधीजींची इस्टेट नाही. हे आत्म्याचे सिद्धांत आहेत. समाजात ही मूल्ये रुजविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. विधायक कार्यक्रम राबविले पाहिजेत. विनोबांचे आचरण ह्याबरहुकूम असल्यामुळे त्यांचा प्रभाव पडला नसता तरच नवल होते.

अहिंसेची प्रतिष्ठा 

विनोबांना क्रांती हवी होती. हिंसेने सत्ता बदलते पण मूल्यबदल होत नाही. क्रांती अहिंसकच असते. हिंसा हे क्रांतीचे साधन कधीच होऊ शकत नाही. विनोबांनी ‘भूदान’ ‘ग्रामदान’ यांद्वारे अशी अहिंसक क्रांती घडवून आणली. अहिंसेचा एवढा व्यापक प्रयोग आजवर जगात झाला नव्हता. अहिंसा या शब्दाचा, ‘हिंसा न करणे’ इतका नकारात्मक अर्थच आपण घेतो. निर्भयता, प्रेम आणि सहकार तसेच रचनात्मक आणि विधायक कामावर निष्ठा म्हणजे अहिंसा हे विनोबांनीच लक्षात आणून दिले. सर्वोदयाच्या मंत्रातील हा विचार लोकांना पटला आणि विनोबांकडे आपोआप नेतृत्व चालून आले.

विनोबांची पदयात्रा.

अगोदर हृदय परिवर्तन, मग विचार परिवर्तन आणि मग समाज परिवर्तन हा सोपान विनोबांना अभिप्रेत होता. विचारशोधनानेच हे शक्य झाले असते म्हणून विनोबांनी ‘पदयात्रा’ करण्याचे ठरविले आणि ७ मार्च १९५१ ला सर्वोदय संमेलनाला जाण्यासाठी पायी निघाले. संमेलन हैद्राबादजवळ शिवारामपल्ली येथे होणार होते.  वर्ध्याहून हे अंतर तेव्हाच्या हिशोबाने ३५० मैल होते. विनोबांचे वय तेव्हा ५५ वर्षांचे होते. एक महिन्याच्या पदयात्रेनंतर विनोबा हैद्राबादला पोहोचले. या मधल्या काळात खेड्यातील परिस्थिती विनोबांनी जवळून पहिली. समस्या समजावून घेतल्या आणि विनोबांचे विचारचक्र गतिमान झाले.

सामाजिक सेवेत आध्यात्मिक मूल्यांचा प्रयोग झाला नाही तर त्यांचे मुख्य प्रयोजनच संपते. भौतिक सुधारणा शासन करू शकते परंतु मूल्ये रुजविणे आणि ती समाजात प्रस्थापित करणे हे राजसत्तेचे काम नाही. ह्या सतत चिंतनातून भूदान चळवळीचे धोरण आणि आयोजन विनोबांनी केले. प्रयोजनच आयोजनाला जन्म देते.

हैद्राबादच्या मुक्कामात विनोबा तुरुंगातील कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना भेटले. जमिनीचे न्याय्य वाटप व्हावे हा त्यांचा विचार चांगला होता; पण लाठी आणि लूट याचा अवलंब त्यांनी केला होता. श्रीमंत जमीनदारांनी लाखो एकर जमिनी आपल्या ताब्यात ठेवून खऱ्या भूसेवकाला उपेक्षित ठेवले होते. अपहरणाचा हा प्रकार अतिशय घृणास्पद होता. साम्यवादी कार्यकर्ते या जमीनदारांना लुटत होते. त्यांची घरे जाळत होते. एक अपहरणकर्ता दुसऱ्या अपहरणकर्त्याला लुटत आहे असेच चित्र होते. विनोबांनी श्रीमंत जमीनदारांनाही सांगितले की तुम्ही गरिबांच्या सेवेला कधी लागता याची परमेश्वर वाट बघत आहे. अशा तऱ्हेने गरिबांना आत्मोद्धाराची आणि श्रीमंतांना आत्मशुद्धीची प्रेरणा विनोबांकडून मिळत होती. त्यामुळे हा मनुष्य सर्वांचे भलेच करू इच्छित आहे असा लोकांचा विश्वास होता.

अहिंसेचे सामाजिक उपयोजन 

अहिंसा हे तत्त्व सांगते की पापाचा प्रतिकार अवश्य करावा पण पापासाठी प्रतिपाप करू नये. पापाच्या प्रतिकाराची सुरुवात स्वतःपासून आणि शेवट शत्रूशी व्हावा.

संत एकनाथ यांचे आदर्श उदाहरण आहे. एकनाथ महाराज गंगेवर स्नान करून आले की एक व्यक्ती त्यांच्यावर थुंके. एकनाथ काहीही न बोलता पुन्हा स्नान करून येत. असे अनेक वेळा झाले. शेवटी त्या माणसाला आपली चूक कळून आली आणि त्यांनी नाथांची क्षमा मागितली. एकनाथांच्या या प्रतिक्रियेत अहिंसेचेच तत्त्व दडलेले आहे. एकनाथांच्या जीवनातील ही गोष्ट आपण अभिमानाने सांगतो. म्हणजे वैयक्तिक जीवनात अहिंसेचे तत्त्व लोकांना पटले आहे पण सामाजिक जीवनात अहिंसा  प्रस्थापित करता येईल का आणि ती कशी करता येईल याबाबत लोक साशंक आहेत. विनोबांनी भूदान चळवळीतून नेमके हेच दाखवून दिले.

मने जोडण्याचे मिशन 

सर्व समस्या अहिंसेने सुटू शकतात मात्र त्यासाठी हृदयशुद्धीची गरज आहे हा विनोबांचा विचार अमलात आणण्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे हृदय परिवर्तन, मग विचार परिवर्तन आणि मग समाज परिवर्तन हा सोपान विनोबांनी निश्चित केला. विनोबा लोकांना विचार पटवून देत.

 “महाभारत युद्ध का झाले? पांडव किती होते?”

 याचे उत्तर येई पाच. 

विनोबा म्हणत पांडव सहा होते. कर्ण हा त्यांचा भाऊ.  त्याच्यावर अन्याय झाला म्हणून युद्ध झाले. मला तुमचा भाऊ समजा आणि जमिनीचा सहावा  हिस्सा भूमिहीनांना द्या असे विनोबा सांगत.परमेश्वर सर्वांचा पिता आहे आणि जमीन ही माता आहे म्हणूनच तिला आपण भू-माता म्हणतो. मग तिच्या लेकरांवर असा अन्याय का? श्रीमंतांना विनोबा म्हणत की मी भिक्षा मागायला आलेलो नाही – दीक्षा द्यायला आलो आहे. आजवर आपण आपल्याच बांधवांना त्यांच्या मातेपासून हिरावून घेतले. आता ही चूक सुधारण्याची संधी आहे. लोक जेव्हा म्हणत की तुम्ही सरकारला कायदा करायला का सांगत नाही? तेव्हा विनोबांचे म्हणणे तर्कशुद्ध असे. ते म्हणत की जनता मालक आहे आणि सरकार नोकर. तेव्हा हा विचार मी जनतेला समजावून सांगत आहे. विनोबांना अगदी ५ -१० एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनीही भूदान केले. मग खरी मनाची श्रीमंती कोणाजवळ आहे? उद्या कमाल जमीन धारणा कायद्यामुळे समजा २५  एकर जमीन असणारी व्यक्ती काय म्हणेल? या कायद्याच्या मर्यादेत असणारी जमीन माझ्याकडे  आहे मग मी त्यातून दान का करावे? याचा अर्थ असा की प्रश्न कायद्याने सुटतातच असे नाही. जे सदसद्विवेकबुद्धीने होते, हृदयशुद्धीने होते तिथे कायद्याचे प्रयोजन उरत नाही.

भूमिदानाचे फलित .

परमेश्वर कल्पतरू आहे आणि आपण जशी कल्पना करतो तसे रूप तो प्रकट करतो याचा पुरेपूर अनुभव विनोबांनी घेतला. वानगीदाखल एक उदाहरण बघा :  एका तरुणाने ५ एकर जमीन दान दिली आणि आईची नाराजी ओढवून घेतली. आई म्हणाली विनोबा १/६ भाग मागतात. आपल्याकडे तर ६० एकर जमीन आहे. दुसऱ्या दिवशी  ८ मैलांचे अंतर पायी चालून  १० एकरांचे दानपत्र तो तरुण देऊन आला. विनोबांना फिरवणारी वस्तू ना त्यांचे ज्ञान, ना त्याग, ना फकिरी बाणा. विनोबांना १३ वर्षे पदयात्रा करायला लावणारी प्रेरणा तर करुणेची होती. तळागाळातल्या माणसाचे दुःख दूर करण्यासाठी विनोबा हिंडत राहिले. एक पृथ्वीप्रदक्षिणा होईल एवढे फिरणे झाले तरी हा माणूस निरहंकारी राहिला. संतांनी ही भारतभूमी आपल्या कर्म, ज्ञान, भक्तीने नांगरून ठेवली. भूदान, ग्रामदानाची  लोकांना मिळालेली प्रेरणा हा संतांचा आशीर्वाद आहे असे विनोबा म्हणत. एकट्या बिहार राज्यात २५ लाख एकर जमीन भूदानात मिळाली  आणि ती ५-६ लाख भूमिहीनांना वाटली गेली. अहिंसेने सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांत एवढी अभूतपूर्व क्रांती होऊ शकते.  म्हणूनच म्हणावेसे वाटते की भूदान, ग्रामदान ही चळवळ नाही, तो मोर्चा नाही, ते आंदोलन नाही, ती वारी नाही, तो एक प्रजासूय यज्ञ होता. ज्ञानवन्तांची प्रज्ञा, भक्तांची उपासना, वैज्ञानिकांची प्रयोगशीलता आणि कर्मयोग्याची कर्मनिष्ठा असलेल्या विनोबांनाच हे धनुष्य पेलता आले. विनोबांनी हा प्रश्न आईच्या मायेने आणि गुरूच्या कौशल्याने सोडविला. विनोबांच्या भूदान यज्ञाला १८ एप्रिल २०२५ रोजी ७४  वर्षे पूर्ण होतील. आता भूदान यज्ञाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत  आहे. त्यातील आध्यात्मिक प्रेरणा सदैव स्मृतीत राहील.

                                     

                                    

Author

Leave a Reply