
लेखन अनुभव
एका सांस्कृतिक इतिहासाची शतकोत्तर वाटचाल
पुणे भारत गायन समाज
एक सुरेल स्वरयात्रा – ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास
(भाग ३ )
आपण आपल्याच तंद्रीत चालत असावं आणि एका वळणावर अनपेक्षित मुक्कामी पोहोचावं, तसं मला या ग्रंथाचं लेखन करताना वाटलं. एक नाही, दोन नाही, अनेक दिवस. या वळणानं मला एका वेगळ्याच विश्वाची ओळख करून दिली, दुरन्वये का होईना, गुरुवर्य भास्करबुवांशी जोडलं. हा केवळ योगायोग होता, की माझं विधिलिखित! माहीत नाही; परंतु संस्थेच्या सांगीतिक पालखीबरोबर चार पावलं चालता आलं याचा आनंद आहे.
लेखनाला सुरुवात केली तेव्हा हे लेखन संस्थेच्या कार्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही हे ठरवूनच सुरुवात केली. कारण कुठल्याही क्षेत्रातील प्रतिभावंतांचं कार्यकर्तृत्व हे आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कार्याच्या आधारानंच उभं राहत असतं. संगीताचं क्षेत्रही या नियमाला अपवाद नाही. पूर्वसुरींना वाट पुसतच प्रत्येक कलाकार-पिढीनं नवनव्या दिशांचा शोध आणि वेध घेतला आहे म्हणूनच विविध नात्यांनी संस्थेशी संबंधित असलेल्या नामवंत कलाकारांची संक्षिप्त चरित्रं त्यांना लाभलेल्या पार्श्वभूमीसह देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘हिंदुओं में क्या, बल्कि मुसलमानों में भी ऐसा गवैया नही हुआ’ असे गौरवोद्गार खाँसाहेब फैयाजखाँ यांनी ज्यांच्याबद्दल काढले, ते भास्करबुवा बखले. दोन-अडीच तपांचा मोठा कालपट जणू काखोटीला मारून बुवा अशा एका स्थानावर उभे राहिले, जिथे त्यांच्या गायकीचा आकृतिबंध खास त्यांचाच होता. जेमतेम बावन्न वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. त्यांच्या चरित्र-प्रकरणापूर्वी लिहिलेली दोन प्रकरणं म्हणजे हिंदुस्थानी संगीताचा जन्म ते ख्यालगायकीपर्यंतचा प्रवास आहे. सामवेद ते ख्यालगायकी. संगीताचा उगम वैदिक काळात – वैदिक वाङ्मयात आहे. या वाङ्मयाचा मुख्य हेतू ‘यज्ञधर्म’ असल्यामुळे संगीताचा जन्म यज्ञसंस्थेत झाला. ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि सामवेद हे चार प्रमुख वेद छंदोबद्ध आहेत. त्यांतील काही ऋचांच्या एकत्रित गायनाला ‘साम’ म्हणतात. यज्ञांमध्ये देवतांची प्रशंसा, त्यांचे स्तवन या गोष्टी सामगायनपूर्वक होत होत्या. ‘वेदानां सामवेदोऽस्मि। – मी वेदांतील सामवेद आहे’ असं भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं आहे.
सामगायनकाली ‘राग’ ही संकल्पना नव्हती – तर वेगवेगळ्या चालींमध्ये ‘सामे’ गायली जात. ‘राग’ संकल्पना पुढे शेकडो वर्षांच्या काळात विकसित होत गेली. ‘प्रबंध,’ ‘ध्रुपद’ आणि नंतर ख्यालगायकी या क्रमानं रागसंकल्पनेचा विकास होत गेला. या प्रवासात अमीर खुसरू तसंच प्रमुख चार घराणी – ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर-अत्रौली आणि किराणा या घराण्यांचे आद्य प्रवर्तक व त्यांची शिष्यपरंपरा यांचा उल्लेख ग्रंथाच्या पृष्ठसंख्येच्या मर्यादेत केला आहे. काळाच्या ओघात हिंदुस्थानी संगीतात घराणी निर्माण झाली आणि घराण्यांच्या शिस्तबद्ध चौकटीत राग-गायनाचा विचार होत राहिला, विकास होत राहिला. थोर कलावंतांनी या चौकटीचाच अवकाश केला.
‘सामवेद ते ख्यालगायकी’ हा संक्षिप्त प्रवास लिहिताना अनेक थोर कलावंतांचं स्मरण झालं, काहींचा उल्लेख करता आला याचं समाधान आहे. त्यामुळे लेखनाला सहजपणे वेगळा आयाम मिळाला. लेखन एकांगी राहू नये हाही त्यामागचा उद्देश होता.
पूर्वसुरींचा मान राखत असतानाच भास्करबुवा आणि त्यांची शिष्यपरंपरा, संस्थेतील शिक्षकवर्ग, बुवांचे समकालीन कलावंत व त्यांचे शिष्य अशा अनेकांनी संगीताचा प्रसार केला. त्यांच्या प्रयत्नातून संगीत शिक्षण-संस्था स्थापन झाल्या. महाविद्यालयं, विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात संगीत विषयाला प्राधान्य मिळालं. त्यासाठी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. विष्णू नारायण भातखंडे यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. ‘समाजा’साठी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकरांनी ‘पारंगत’पर्यंतचा अभ्यासक्रम तयार केला. त्या प्रमाणे संस्थेत आणि संलग्न संस्थांमध्ये शिक्षण दिलं जातं. अर्थात नंतरच्या काळात त्यामध्ये भर पडत गेली. गेल्या काही वर्षांमध्ये शास्त्रीय नृत्य आणि सुगम संगीताचाही संस्थेच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. अशा पद्धतीनं संस्थेनं कार्याचा पैस विस्तृत केला आहे.
भास्करबुवांच्यानंतर संस्थेचे जे जे अध्यक्ष झाले – सरदार आबासाहेब मुजुमदार, मास्तर कृष्णराव, रावसाहेब केळकर, विश्वनाथ दाबके, पं. राम मराठे, स्वरराज छोटा गंधर्व, IAS अधिकारी सुधाकरराव जोशी, अणि विद्यमान अध्यक्षा शैला दातार यांच्या वैयत्तिक कार्याचा आढावा घेताना संस्थेचं कार्य सहजपणे एका व्यापक सांस्कृतिक कालखंडाशी जोडलं गेलं. उदाहरणार्थ : शैलाताईंनी लिहिलेलं ‘देवगंधर्व’ पुस्तक, तसंच अनेक ध्वनिचित्रफिती, संकल्पनात्मक कार्यक्रमांचं लेखन-निर्मिती…
भास्करबुवांचे शिष्य बालगंधर्व, गोविंदराव टेंबे, विलायत हुसेनखाँ, बापूराव केतकर यांची संक्षिप्त चरित्रं लिहिताना ठसठशीतपणे लक्षात आलेली गोष्ट म्हणजे, संस्था कुणा एकाची न राहता अनेकांची होत गेली. ‘व्यक्तीपेक्षा संस्था मोठी’ या विचाराप्रमाणे दृश्य-अदृश्य अनेक हात मदतीला येत गेले – ते काही रुजवण्यासाठी आणि रुजवलेलं टिकवण्यासाठी.
देहूच्या संत तुकारामांनी आपलं ईप्सित कार्य ओळखलं आणि ठामपणे बोलून दाखवलं –
आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासाठी।
बोलिले जें ऋषि, साच भावे वर्ताया|
भास्करबुवांचं ईप्सित यापेक्षा वेगळं कुठे होतं! फरक आहे तो कार्याचा आणि काळाचा. ‘समाजा’च्या स्थापनेपासून संगीत प्रसाराचा विचार करता ‘पेरलं ते उगवलं’ असं म्हणता येईल. १९४४ च्या सुमाराला संस्थेत फक्त स्त्रियांसाठी दिलरुबा आणि फिडल वाद्यवादनाच्या ‘लक्ष्मीबाई रानडे’ स्पर्धा सुरू झाल्या. याहीपूर्वी १९३७ साली संस्थेतील मुलींचा ‘भास्कर ऑर्केस्ट्रा’ सादर झाला होता. सर्वसाधारण घरांतील स्त्रिया, मुली घराचा उंबरठा ओलांडून संस्थेची वाट चालू लागल्या होत्या. त्या काळाचा विचार करता, ही क्रांतिकारी घटना होती. अर्थात संस्थेच्या पटावर मुलांची संख्या लक्षणीय होती.
सर्वसाधारण घरांतून कलेचा झालेला स्वीकार, स्त्री-कलाकारांचं पदार्पण, बोलपटांचा उदय, आकाशवाणी-दूरदर्शन माध्यमांचं आगमन, विज्ञान-तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या शिक्षणाच्या नव्या वाटा (CD, Online पद्धत), जागतिकीकरणामुळे जीवनाला आलेली गती… अशा परिवर्तनशील घटनांची हे ‘वर्तमान’ आहे हे जाणून , याची नोंद ग्रंथात घेतली आहे.
तर महाराष्ट्रातील या अग्रगण्य संस्थेचा प्रवास एका सरळ रेषेतला नाही. एका मुक्कामी सारं काही संपलं असं वाटत असतानाच पुन्हा संस्थेनं झेप घेऊन मजल-दरमजल करत शतकोत्तर वाटचाल केली आहे. त्यामध्ये भास्करबुवांच्या कन्या प्रमिलाताई दातार, नातू सुहास आणि सुधीर दातार, सुना वंदनाताई, शैलाताई यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. या साऱ्यांनी भास्करबुवांची गायकी, परंपरा जपली आणि पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवली. बुवांची चौथी कलाकार पिढी शिल्पा आणि समीर पुणतांबेकर, हृषिकेश-दीपिका दातार, संगीता दुगल, सावनी कुलकर्णी पूर्ण जबाबदारीनं संस्थेत कार्यरत आहेत. लेखनासाठी २०२० ची लक्ष्मणरेषा घालून घेतली होती. परंतु संस्था अजूनही वाटचाल करत आहे आणि करणार आहे.
कविवर्य केशवसुतांनी लिहिलं आहे –
‘प्राप्तकाळ हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा…’
भास्करबुवा नावाच्या वटवृक्षाच्या छायेत सर्वांनाच प्राप्तकाळाचं काय करायचं ते समजलं. यातूनच या ‘स्वरयात्रेला अखंडतेचं’ वरदान लाभलं आहे.
समाप्त.
