मन वढाय वढाय भाग ४ 

महिलांचे मानसिक आरोग्य

भारतीय संस्कृतीमध्ये ऐश्वर्य देणारी श्रीलक्ष्मी , बुद्धिदेवता सरस्वती आणि आदिशक्ती पार्वती या सर्व स्त्रीदेवता आहेत. म्हणजेच एकीकडे दगडातील स्त्रीला आपण देवत्व प्रदान करतो पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जिवंत स्त्रीला मात्र आपण दुय्यम ठरवतो, तिच्यावर अनन्वित अत्याचार करतो.आज महिलांचे मानसिक आरोग्य याविषयी लिहिताना ‘तिच्या ‘आयुष्यातील टप्पे आणि तिचे मानसिक आरोग्य यांच्यातील परस्पर संबंध आपण बघणार आहोत. भारतात एकूणच मानसिक आरोग्याबद्दल फारशी जागरुकता नाही आणि त्यातून जिथे स्त्रीचे शारीरिक आरोग्यच दुर्लक्षित आहे तिथे तिच्या मानसिक आरोग्याची दुरवस्था विचारायलाच नको. 

भारतामध्ये एकूणच स्त्रीच्या तब्येतीची काळजी खऱ्या अर्थाने फक्त गरोदरपण आणि बाळंतपण या दीड दोन वर्षांतच घेतली जाते.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या स्त्रिया स्वतःकडे मात्र गांभीर्याने लक्ष देत नाहीत. स्त्रियांमधील मानसिक आजार, जननसंस्थेचे आजार, स्तन, गर्भाशयाचा कर्करोग, रजोनिवृत्तीच्या वेळी उद्भवणारे विविध आजार यांविषयी जनजागृती होत असूनही समाजामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येते.

बालपणी सकस आहार मिळणे जितके महत्त्वाचे असते तितकेच सकारात्मक पोषक वातावरण मानसिक विकासासाठी गरजेचे असते.परंतु जिथे स्त्रीभ्रूणहत्येसारखे संकट तिच्यावर जन्माआधीच कोसळते अशा समाजात तिचा मानसिक विकास होणे हे एक आव्हानच आहे. लहानपणापासून कुटुंबामध्ये, समाजामध्ये होणारा मुलगा-मुलगी हा भेदभाव, उपेक्षा,तिरस्कार दुर्लक्ष अशा नकारात्मक अनुभवांतून जावे लागल्यामुळे नकळत्या वयातच आत्मविश्वासाची कमतरता, बुजरेपणा, शारीरिक आणि मानसिक कुपोषण यामुळे काही मुलींना भविष्यात नैराश्य, चिंतारोग अशा मानसिक आजारांचा धोका वाढतो.  डिप्रेशन या मानसिक आजाराचं भारतीय स्त्रियांमधील प्रमाण ४१.९% आहे तर पुरुषांमध्ये २९.३% आहे; चिंतारोगाचे प्रमाण स्त्रियांमध्ये ७.७% आहे तर पुरुषांमध्ये ३.०% आहे. ४६% स्त्रियांना स्किझोफ्रेनिया हा आजार होण्याचा धोका असतो तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ४८% आहे.

घरापासून शाळेपर्यंत अनेक स्तरांवर लढत लढत मुली पौगंडावस्थेत पोहोचतात.वयात येणं म्हणजे मासिक पाळी सुरू होणं, प्रजननाच्या दृष्टीनं शरीरात आवश्यक बदल निर्माण होणं म्हणजेच मुलीचं बालवयातून तारुण्यात पदार्पण. या वेळी तिला मासिक पाळीबद्दल काळजीपूर्वक योग्य शास्त्रोक्त माहिती देणे, पाळीच्या वेळची शारीरिक स्वच्छता, शारीरिक वाढीतील बदल सांगितले जाणे अपेक्षित असते; पण दुर्दैवाने तिच्यावर अनेक बंधने घातली जातात. पारंपरिक प्रथांच्या नावाखाली त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यास चिरडले जाते. तसेच सध्या लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार,अवैध मानवी तस्करी यांसारख्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण बघून अनेक पालक काळजीपोटी आपल्या मुलींवर अनेक कडक बंधने घालतात. तरुण मुलींशी योग्य शब्दांत मोकळा संवाद साधून चालू घडामोडींची माहिती देणे स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि सावधगिरी बाळगण्यास सांगणे हे आधुनिक काळातील पालकांचे कर्तव्य आहे; परंतु याचे प्रमाण तुरळक असल्याचे आढळते. मुलींना घाबरवणे, शिस्तीच्या नावाखाली धाक घालणे, व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने घालणे, शिक्षण बंद करणे, अल्पवयात लग्न लावून देणे अशा चुकीच्या निर्णयांमुळे मुलींचे मानसिक आरोग्य ढासळत जाते. व्यक्तिमत्त्व विकास होत नाही आणि विविध मानसिक आजारांची लागण होण्याचा धोका वाढतो. न कळत्या वयात लग्न होणे, शारीरिक संबंधाबद्दल माहिती नसणे यामुळे अशा स्त्रीचे वैवाहिक जीवन हे मानसिक कुचंबणा सहन करतच सुरू राहते. अशा स्त्रियांमध्ये मासिक पाळी आणि शारीरिक संबंधाबद्दल घृणा निर्माण होते; OCD, नैराश्य, चिंतारोग, अंगात येणे असे गंभीर मानसिक आजार निर्माण होतात. लैंगिक इच्छा कमी होते किंवा नष्ट होते; त्यामुळे नवराबायकोंमध्ये भांडणे, कौटुंबिक अस्वस्थता अशा समस्या निर्माण होऊन घरातील वातावरण दूषित होते. अशा स्त्रीमध्ये नैराश्य निर्माण झाले तर स्वतःकडे, मुलांकडे, घराकडे तिचे दुर्लक्ष होऊन अनेक पातळींवर नुकसान होते.

लग्नानंतर कौटुंबिक कामे, नोकरी व्यवसाय यामुळे अशी तारेवरची कसरत सुरू असते. काही स्त्रिया आत्मविश्वास, कामाचे योग्य नियोजन, पोषक आहार आणि घरच्यांचे योग्य सहकार्य या जोरावर सगळे व्यवस्थित सांभाळतात. परंतु जर आत्मविश्वासाची कमतरता असेल, निर्णयक्षमता नसेल, घरच्यांचे सहकार्य नसेल किंवा खच्चीकरण होत असेल; घरगुती मानसिक/शारीरिक छळ होत असेल , नवऱ्याचे दुर्लक्ष / व्यसनाधीनता / बेरोजगारी/ विवाहबाह्य संबंध/ नवऱ्याचे शारीरिक मानसिक आजार किंवा संकुचित मानसिकता, आर्थिक समस्या यांपैकी एखादा किंवा अनेक घटक त्या स्त्रीच्या मानसिक अस्वास्थ्यासाठी कारणीभूत ठरतात. स्त्रियांमध्ये चिंतारोग , नैराश्य , स्किझोफ्रेनिया यांसारखे गंभीर मानसिक आजार निर्माण होण्याचा धोका वाढतो.

भारतीय स्त्रियांमध्ये मनोकायिक आजारांचे प्रमाणही जास्त आहे. उदा. जुनाट डोकेदुखी, पोटदुखी, कंबरदुखी, पित्ताचे आजार, डोळे पांढरे करून बेशुद्ध पडणे इत्यादी.

बाळंतपणानंतर  उद्भवणारे postpartum depression, postpartum psychosis अशा आजारांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. २२% स्त्रिया या आजाराने पीडित असल्याचे दिसून येते. शहरी भागात सिगारेट्स,  दारू, इतर अमली पदार्थांच्या सेवनाची सवय किंवा व्यसन स्त्रियांमध्ये, तरुण मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये विड्याचे पान , मशेरी किंवा तंबाखू या पदार्थांचे व्यसन थोड्याफार प्रमाणात दिसून येते. लैंगिक समस्या किंवा लैंगिक आजार फक्त पुरुषांमध्येच दिसून येतात असे नाही. स्त्रियांच्यासुद्धा लैंगिक समस्या असतात – उदा. शारीरिक संबंधांची इच्छा कमी होणे, समाधान न मिळणे , संबंधांच्या वेळी किंवा नंतर ओटीपोटात दुखणे योनीमार्गामध्ये जळजळ होणे इत्यादी प्रकारचे लैंगिक आजार स्त्रियांमध्ये आढळून येतात; परंतु या विषयावर स्त्रिया मोकळेपणाने बोलत नाहीत त्यामुळे निदान होत नाही. ५०% हून जास्त स्त्रियांना लैंगिक त्रास जाणवतो परंतु या विषयावर बोलायचे, उपचार घ्यायचे यासाठी त्या टाळाटाळ करतात.

 हळूहळू तिची जीवनाची अडथळ्यांची शर्यत राजोनिवृत्तीपर्यंत येऊन पोहोचते. रजोनिवृत्तीचा काळ फार नाजूक आणि भावनांच्या हिंदोळ्यांवर स्वार असतो. नवरा त्याच्या नोकरी/व्यवसायात गुंतलेला असतो मुले मोठी होऊन आपापल्या शिक्षण/नोकरी किंवा लग्नामध्ये व्यग्र असतात. अशा वेळी रजोनिवृत्तीच्या वेळी होणारे हार्मोन्समधील उतारचढ आणि घरातील एकटेपण यामुळे empty nest syndrome सारखा नैराश्याचा आजार उद्भवण्याचा धोका असतो. साधारणपणे २० % स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या वेळी शारीरिक त्रास होतात. अशा स्त्रियांमध्ये डिप्रेशन,चिंतारोग या मानसिक आजारांचा धोका जास्त प्रमाणात दिसून येतो.

परंतु घरच्यांकडून योग्य आदर, प्रेम आणि भावनिक आधार मिळाला तर अशी स्त्री आत्मविश्वासाने आणि समाधानाने स्त्रीत्वाचं शेवटचं परिवर्तनसुद्धा स्वीकारते.

या लेखात आपण स्त्रीच्या आयुष्याचा मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून  अथपासून इतिपर्यंतचा संक्षिप्त रूपात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुरुषप्रधान भारतीय समाज हा मातृभक्त आहे; परंतु त्याच समाजात स्त्रीचे खच्चीकरण होते हा विरोधाभास सामाजिक विकासासाठी घातक आहे. प्रपंचाच्या वर्तुळाचा स्त्री हा केंद्रबिंदू असतो आणि तिच्या भोवती सारे कुटुंब आपापल्या परिघात सुरळीत फिरते. त्यामुळे स्त्री शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सशक्त, सक्षम असणे हे महत्त्वाचे आहे.

मानसिक आरोग्य जपणे फार सोपे आहे. घरी सुसंवाद असणे सकारात्मक वातावरण , योग्य मानसिक आधार आर्थिक स्वावलंबन शिक्षण सकस आहार योग्य व्यायाम यासोबतच निखळ विश्वासू मैत्री आणि एखादा छंद हे सर्व योग्य प्रमाणात असले की मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते.

दगडाच्या मूर्तीमधील देवीला आदिशक्ती म्हणायचे आणि जिवंत स्त्रीला मात्र कमी लेखायचे हे चुकीचे आहे. नववर्षाच्या सुरुवातीला स्त्री  म्हणून स्वतःचे आणि पुरुष म्हणून घरातील स्त्रीचे मानसिक, शारीरिक आरोग्य जपण्याची प्रतिज्ञा करू या आणि प्रार्थना करू या 

सर्वेपि सुखिनः सन्तु

सर्वे सन्तु निरामयाः

सर्वे भद्राणि पश्यन्तु 

 मा कश्चित् दुःखभाग् भवेत्

Author

Leave a Reply