पुस्तक परीक्षण : द लायब्ररी

‘द लायब्ररी’त जाच

‘चुकलीमाकली पुस्तकप्रेमी माणसं पुस्तकांच्या दुकानात, स्टॉलवर किंवा लायब्ररीत सापडतात,’ अशा अर्थाची एक जपानी म्हण आहे म्हणे! त्यातली वास्तव-अवास्तव बाजू सोडून द्या आणि मूळ मुद्दा लक्षात घ्या. अनेकदा पुस्तक-वाचन आवडणारी माणसं लायब्ररीत जातात, तिथंच पडीक असतात किंवा पुस्तकांचा महिनाभर पुरेल इतका साठा घेऊन घरी येतात. ग्रंथालयांचे साधी, फक्त संदर्भाचे, दोन्ही मिळून, घरातले असे आणि एवढेच प्रकार वाचकांना माहिती असतात. पण त्या पलीकडं जाऊन आभासी ग्रंथालय, घरातलं ग्रंथालय, रात्र-ग्रंथालय, नरकातलं ग्रंथालय, लघुत्तम ग्रंथालय आणि घरंदाज ग्रंथालय ही ग्रंथालयंही असतात हे केवळ ‘द लायब्ररी’ हे झोरान झिवकोविच यांच्या नीतीन रिंढे यांनी भाषांतर केलेल्या भारी पुस्तकात वाचता येतं.

पुस्तकाचा ब्लर्ब त्याच्या अंतरंगाचा अंदाज देतो आणि मोठ्या उत्सुकतेनं आपण ते वाचू लागतो. त्यात म्हटल्याप्रमाणं, सगळ्या कथा ‘पुस्तक’ या पात्राभोवती फिरत असल्या तरीही प्रत्येक कथेची चव वेगळी आहे. तिचा बाज आगळा आहे आणि तो अनुभव मुळातूनच घेण्याजोगा आहे. रिंढे यांची प्रस्तावना तितकीच वाचनीय आणि मोलाची आहे. या कथांमधला अद्भुत रसाचा वापर लक्षणीय आहे. एका कथेत आभासी जग, त्यातले कायदेकानून, वाङ्मयचौर्य, लेखकाच्या साहित्याची भविष्यवाणी इत्यादी मुद्द्यांना नेमका स्पर्श होतो. अनेकांच्या घरात पुस्तकांना जागा असते, ती खऱ्या पुस्तकप्रेमापोटी की दिखाव्यासाठी हा वादाचा विषय… पण पुस्तकांनी अवघं घर व्यापून टाकलं तर काय होईल, याचा विचार तर करून बघा… वाचनाखेरीज इतर छंदांना जीवनात किती स्थान द्यावं इथपासून ते एखादं ग्रंथालय रात्री सुरू असतं का, असलं तर त्याची खासियत कोणती, ती खरी की खोटी इथपर्यंत अनेक कोडी न पडली तरच नवल. मुळात नरक ही एक कल्पना, त्यातही ग्रंथालय असणं, अतार्किक वागणारा संगणक आणि माणसांच्या मानसिकतेचा घेतलेला उभा-आडवा छेद अगदी मुळापासून विचार करायला शिकवतो. वाचक आणि पुस्तकविक्यांची मानसिकता, पुस्तक उघडल्यावर समोर येणारं निराळं जग एका वेगळ्याच ग्रंथालयात नेतं. कुणाच्या संग्रहातलं नकोसं झालेलं पुस्तक हरएक प्रकारे घराबाहेर काढायचा प्रयत्न केला तरी ते मांजरीसारखं कुठेही नेऊन टाकलं तरीही पुन्हा संग्रहात येऊन जागा पटकावतं हेही एक अजबच…

या सगळ्या कथांची शैली चित्रमय असून, ही वास्तववादी कथनशैली रंगतदार तरीही विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या कथा कुणी अधाश्यासारख्या वाचेल किंवा कुणी एकेक कथा मुरवत सावकाशीनं पुस्तकाचा आस्वाद घेईल. पद्धत कोणतीही असली तरी पुस्तक वाचणं मस्ट.

द लायब्ररी
झोरान झिवकोविच
भाषांतर – नीतीन रिंढे
वॉल्डन पब्लिकेशन
नोव्हेंबर २०२४.
१३२ पाने, २६० रुपये

Author

Leave a Reply