दक्षिणचित्र

   चेन्नईपासून २५ किलोमीटर अंतरावर, मम्मलापुरमच्या वाटेवरच लागणारे ‘दक्षिणचित्र हेरिटेज म्युझियम’ प्रवाशांनी आवर्जून बघावे अशी शिफारस मी करेन. या म्युझियमची पूर्वी आम्हांला काहीच माहिती नव्हती. अगदी आयत्या वेळी आणि वाटेवरच असल्याने आम्ही तिथे थांबायचा निर्णय घेतला आणि मागे वळून बघताना तो अगदी योग्य होता असे वाटते.

   आंध्र आणि तेलंगणा मिळून पूर्वीसारखे एकच राज्य पकडले, तर आंध्र, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ ही विंध्य पर्वताखालची चारही राज्ये द्रविड संस्कृतीची आहेत. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत हे खरे आहे, पण त्या सर्वच द्रविड गटातील आहेत. संपूर्ण दक्षिण भारत कित्येक शतके आलटून पालटून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, पांडियन, पल्लव, चोला, चेर अशा वेगवेगळ्या राजघराण्यांच्या अमलाखाली होता. त्यांची मातृभाषा कधी तेलुगू असायची, कधी तमिळ, तर कधी कन्नड. त्या काळात त्याच भाषेत बहुतेक प्रशासन चालायचे. साहजिकच लोकांकडूनही ती भाषा अधिक प्रमाणात बोलली जायची. विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे दक्षिणी ऐक्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्या काळात तेलुगू आणि कन्नड साहित्याची खूप भरभराट झाली. या दोन्ही भाषांची लिपी थोडीफार सारखी आहे. त्याचा कालखंड हे या दोन्ही भाषांमधील साहित्याचे सुवर्णयुग मानले जाते. कृष्णदेवरायला स्वतःला तेलुगू, कन्नड, तमिळ आणि संस्कृत या चारही भाषा उत्तम येत होत्या. तमिळ भाषा ही अर्थातच सगळ्या दक्षिणी भाषांत सर्वांत प्राचीन आणि समृद्ध; तिला २००४ सालीच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण तमिळपाठोपाठ तेलुगू आणि कन्नड  भाषांनाही २००८ साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मल्याळमला तो २००९ साली मिळाला. दक्षिणेतील बहुतेक अभिनेते एकमेकांच्या भाषांतील चित्रपटांत सररास काम करतात आणि त्यांचा चाहतावर्गही सगळ्या प्रांतांत विखुरलेला आहे. या चार राज्यांची संस्कृती एकात एक कशी गुरफटलेली आहे याचेही दर्शन दक्षिणचित्रमध्ये घडते.

   इंग्रज काळात मद्रास प्रेसिडेंसीमध्येच आंध्र, कर्नाटक आणि केरळ यांचाही समावेश होता. भाषावार प्रांतरचना खूप नंतरची. त्यामुळे इथला समाजही संमिश्र बनला आहे. जेव्हा आंध्र राज्याची १९५६ साली निर्मिती झाली तेव्हा आंध्र-तमिळनाडू यांच्या सीमेजवळ असलेले आणि त्यामुळे साहजिकच तेलुगू भाषकांची बरीच वस्ती असलेले चेन्नई शहर मात्र त्यात सामील केले गेले नाही. ‘तुमचे चेन्नई आम्हांला द्या आणि त्या बदल्यात आमच्या तिरुपतीचा समावेश तमिळनाडूमध्ये करा’ अशी या आंध्र नेत्यांची मागणी होती. काही प्रमुख तमिळ नेत्यांनी प्रखर विरोध केल्यामुळे ती अदलाबदल मान्य झाली नाही. तसेच ‘लिटल इंग्लंड’ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या तमिळनाडूमधील होसूर या थंड हवेच्या शहरात कन्नड वस्ती बरीच आहे. याउलट कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधे कन्नडइतकीच तेलुगू व तमिळ वस्तीही आहे. काहीजण कन्याकुमारी केरळमध्येच आहे असे समजतात, प्रत्यक्षात ते तमिळनाडूमध्येच आहे; पण केरळपासून अगदी जवळ असल्याने साहजिकच तिथे मल्याळी वस्ती बरीच आहे. मंगलोरसारख्या ठिकाणी मल्याळी आणि कन्नडिगा वेगळे ओळखता येणार नाहीत इतके मिसळलेले आहेत. पेरियार आणि जयललिता हे दोघेही तमिळनाडूचे नेते कन्नडिगा होते; तर ‘आधुनिक कर्नाटकाचे निर्माते’ विश्वेश्वरय्या अय्यर हे मुळचे तमिळ होते. अनेक वर्षे तमिळनाडूचे मुख्यमंत्री असलेले एमजीआर मुळचे मल्याळी होते. या चार राज्यांत अशी सरमिसळ झालेली असल्यानेच बहुधा सगळ्या दक्षिण भारतीयांना खूपदा सरसकट ‘मद्रासी’ म्हटले जाते! 

   मद्रास क्राफ्ट फौंडेशन नावाच्या एका चेन्नईस्थित विश्वस्त निधीने इस्ट कोस्ट रोडवर बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या दहा एकर जमिनीवर हे संग्रहालय उभारले आहे. दक्षिण भारताच्या प्रेमात पडलेल्या आणि पुरातत्त्वशास्त्र (अँथ्रोपोलॉजी) या विषयात अमेरिकन विद्यापीठातून पीएच.डी. केलेल्या डेबोरा त्यागराजन नावाच्या एका मूळ तमिळ-अमेरिकन महिलेने दक्षिण भारताचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने हे फौंडेशन १९८४ साली मुख्यतः स्वतःच्या निधीतून स्थापन केले आणि बारा वर्षे अथक परिश्रम घेऊन १९९६ मध्ये हे संग्रहालय लोकांसाठी खुले केले. अर्थात पुढे इतरही मदतीचे हात पुढे आले. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट लॉरी बेकर यांनी प्रत्यक्ष उभारणी केली आणि विशेष म्हणजे ते सर्व काम त्यांनी काहीही आर्थिक मोबदला न घेता केले. संग्रहालयात प्रवेश केल्यावर लगेचच एक सतरा मिनिटांचा परिचयपट दाखवायची सोय आहे. त्यामुळे आत काय बघायला मिळेल याचे सम्यक चित्र अभ्यागतांपुढे सुरुवातीलाच उभे राहते. भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रवासी आणि अभ्यासक इथे येत असतात. 

डेबोरा त्यागराजन

   चारही दक्षिणी राज्यांतील लोकसंस्कृतीचे इथे दर्शन घडते. त्यांच्या घरांचे वेगवेगळे नमुने इथे बघायला मिळतात. हे नमुने कृत्रिमरीत्या उभारलेले नाहीत. त्या-त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षातील घरेच फौंडेशनने संबंधित व्यक्तींकडून बाजारभावाने विकत घेतली, जवळजवळ उचलून इथे आणली आणि लोकांना व्यवस्थित बघता येतील अशा प्रकारे मांडली. या सगळ्यासाठी बराच खर्च आला असेल हे उघड आहे. विणकर, शेतकरी, कुंभार, व्यापारी, कोळी, भटजी, सुतार, मिस्त्री वगैरे व्यावसायिक कसे राहतात, त्यांचे काम कसे करतात हे इथे प्रत्यक्ष बघता येते. हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान अशा वेगवेगळ्या धर्मांच्या, वेगवेगळ्या सामाजिक स्तरांवरच्या लोकांची राहणी कशी असते हेही इथे बघायला मिळते. त्यांची भांडी, घरातले सामानसुमान, कपडे हे सगळे जसेच्या तसे इथे प्रदर्शित केलेले आहे. गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही प्रकारच्या घरांचे नमुने इथे आहेत. बांबूपासून टोपल्या विणणाऱ्या बुरूड समाजातील एकाचे मातीचे घर चेंगलपट्टू जिल्ह्यातून आणले आहे, तसेच एका चेट्टीयार व्यापाऱ्याचे प्रशस्त दुमजली घर पुडूलकोट्टा जिल्ह्यातून आणले आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील सिरियन ख्रिश्चन शेतकऱ्याचे घर आहे, तसेच कर्नाटकमधील चिकमगलूरच्या मुसलमान दुकानदाराचेही घर आहे. धान्याचे कोठार, वाण्याचे दुकान, गुरांचा गोठा, देवळातील रथ, विणकराचे माग, ग्रामपंचायतीची चावडी हे सारे इथे दिसते. ऐतिहासिक घडामोडी, लढाया वगैरेंचा आपल्या जडणघडणीवर होणारा परिणाम आपल्याला बऱ्यापैकी ठाऊक असतो; पण डोंगर, नद्या, हवामान, जमिनीचा कस वगैरे भौगोलिक घटकांचादेखील आपल्या दैनंदिन जगण्यावर किती खोलवर परिणाम होतो ते इथे स्पष्ट होते. भारतातील पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान वगैरे राज्यांना समुद्रकिनारा नाही; परंतु दक्षिणेतील चारही राज्यांना समुद्रकिनारा आहे आणि त्याचाही येथील लोकसंस्कृतीवर प्रभाव पडला आहे.   

   याव्यतिरिक्त विविध व्यावसायिक कामांची प्रात्यक्षिकेही इथे दाखवली जातात. बाहुल्या बनवण्यापासून दगडावर कोरीव काम करण्यापर्यंत आणि पितळेची भांडी बनवण्यापासून वाद्ये तयार करण्यापर्यंत तऱ्हेतऱ्हेच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्यासाठी काही कारागीर इथे नोकरीवरदेखील ठेवलेले आहेत. अनेक कलाकार विशिष्ट कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले जातात. त्यांच्या व येणाऱ्या अभ्यासकांच्या राहण्याची इथे सोय केलेली आहे. मी तिथे असताना एक पॉटरी वर्कशॉप सुरू होते आणि मडकी किंवा भांडी यांच्या वेगवेगळ्या घाटांवरून आणि दर्जावरून तत्कालीन संस्कृती कितपत प्रगत होती याचा अंदाज कसा बांधता येतो याची माहितीही तिथे लिहिलेली होती.

   दक्षिण भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक मानता येईल अशा कर्नाटकी संगीताचे प्रयोगही दक्षिणचित्रमध्ये सतत होत असतात. कर्नाटक संगीतातील एक खूप मोठे नाव म्हणजे संतकवी त्यागराज. त्यांनी तंजोरजवळच कावेरी नदीच्या काठी समाधी घेतली होती. कर्नाटकी संगीतातील हजारो गीते तेलुगू भाषेत आहेत, त्यांचे संवर्धन करण्यात तमिळनाडूतील तंजावरच्या भोसले राजघराण्याचा मोठा वाटा आहे आणि त्याला म्हणतात मात्र कर्नाटकी संगीत! आंध्र, तमिळनाडू आणि कर्नाटक इथे जोडले गेले आहेत. या कर्नाटक संगीताच्या संदर्भात मराठी माणसाचे भोसले राजघराण्याव्यतिरिक्त आणखी एक मोठे योगदान आहे. या संगीतप्रेमींच्या जागोजागी ‘सभा’ असतात आणि त्या ‘सभे’समोर वेगवेगळे गायक आपले संगीत सादर करतात. अशी पहिली ‘सभा’ म्हणजे मद्रास ज्युबिली गायन समाज आणि तिची स्थापना १८८७ साली बळवंत त्रिम्बक सहस्रबुद्धे यांनी केली होती. त्यांच्या रेल्वेतील नोकरीमुळे ते काही वर्षे मद्रासमधे राहत होते आणि त्यापूर्वी पुण्यात असताना पुणे गायन समाज या संस्थेशी ते संबंधित होते. त्याच धर्तीवर त्यांनी मद्रास ज्युबिली गायन समाज स्थापन केला. दक्षिणेतील सांस्कृतिक वारशात आपल्या मराठी बांधवांचादेखील वाटा आहे! (काही विचारवंतांनी महाराष्ट्रासह पंचद्रविड ही संकल्पना मांडली आहे. मराठी भाषा संस्कृतप्रमाणेच तमिळ भाषेशी जोडलेली आहे असेही विश्वनाथ खैरे यांच्यासारखे काही विद्वान मानतात.)    

   दक्षिणचित्रमधील खुल्या रंगमंचावर विविध गायक-वादक आपली कला सादर करण्यासाठी येतात. तमिळनाडूतील भरतनाट्यम, आंध्रमधील कुचीपुडी, तसेच केरळमधील कथकली आणि मोहिनीअट्टम या चार प्रमुख शास्त्रीय दक्षिणी नृत्यांचे सादरीकरणदेखील सतत चालूच असते. भारतात शास्त्रीय नृत्याच्या ज्या सात मुख्य परंपरा आहेत त्यांपैकी चार दक्षिण भारतातील आहेत हे विशेष आहे. (उर्वरित तीन म्हणजे मणिपुरी, ओडिसी आणि उत्तर प्रदेशातील कथक.) जगभरातून गोळा केलेले लाखाच्या जवळपास फोटो, पुरातन वस्तू आणि चित्रांची आर्ट गॅलरी, दक्षिणी संस्कृतिविषयक सुमारे चौदा हजार पुस्तके असलेले वाचनालय, कारागिरांच्या वस्तू विकत घ्यायची सोय हे सगळे इथे आहे. मेदूवडा, इडली, डोसा, उत्तप्पा, इडिअप्पम, पोंगल, सांबार, रस्सम, पायसम वगैरे दक्षिणी पदार्थ सगळ्यांनाच ठाऊक असतात, पण प्रत्येक राज्यात त्यांची पाककृती थोडी-थोडी वेगळी असते; शिवाय वेगवेगळ्या प्रांतांची वेगवेगळी खासियत असतेच. केरळचे पुट्टू आणि मलबार परोटा किंवा हैदराबादी बिर्याणी या साऱ्यांचा आस्वाद इथल्या रेस्टोरंटमधे आपण घेऊ शकतो. 

   फौंडेशनचे व्यवस्थापन एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेत असावे तसे अतिशय कार्यक्षम आहे. सगळा परिसर अगदी स्वच्छ आहे, जागोजागी मार्गदर्शक फलक आहेत. अनेक संस्कृतीप्रेमी स्वयंसेवक इथे आपली सेवा देण्यासाठी येत असतात. तमिळनाडूला भेट देणाऱ्यांनी दक्षिण भारताच्या लोकजीवनाचे आकर्षक आणि खरेखुरे दर्शन घडवणाऱ्या आणि त्यांच्यातील साम्यस्थळे समोर आणणाऱ्या या संग्रहालयात आवर्जून जावे. 

Author

Leave a Reply