महाराष्ट्र भूषण प्रकल्प :व्ही. शांताराम यांच्यावरील संकेतस्थळ.
शनिवार दिनांक २२ मार्च २०२५ रोजी ठाणे मुक्कामी सुप्रसिद्ध सिने -चित्रपट अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते व्ही. शांताराम यांच्यावरील वेबसाईटचे उद्घाटन झाले. त्या प्रसंगी डावीकडून उजवीकडे : दिनकर गांगल, संजय आचार्य, गिरीश घाटे व सुहास जोशी.
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने १९०० ते १९३० या काळात जन्मास आलेल्या आणि महाराष्ट्राच्या साहित्य, समाज व संस्कृती यांना आकार देणाऱ्या महनीय व्यक्तींची संकेतस्थळे घडवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचा आरंभ साने गुरुजींचे साहित्य कॉपीराईटमुक्त झाल्यावर त्यांच्या संबंधीच्या वेबसाईटने झाला. ती वेबसाइट मागील पंधरा वर्षांत अडीच-तीन कोटी वाचकांनी पाहिली/वाचली आहे, त्याबाबत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या प्रकल्पाची सविस्तर माहिती घेण्यासाठी खालील दुवा पहा :
या प्रकल्पांतर्गत आता व्ही. शांताराम व साने गुरुजी यांच्याखेरीज स्वामी रामानंद तीर्थ यांचेही संकेतस्थळ पाहता येते. त्याचबरोबर पु. ल. देशपांडे,
ग. दि. माडगूळकर आणि यशवंतराव चव्हाण यांची सविस्तर माहिती देणाऱ्या संकेतस्थळांची बाह्यकडीदेखील या ठिकाणी उपलब्ध आहे.
या प्रकल्पाचे दुसरे एक महत्त्वाचे अंग आहे, ते म्हणजे महनीय व्यक्तींच्या वेबसाईट घडवण्याचे काम काहींच्या बाबतीत त्यांच्या नातेवाइकांनी केले आहे. अशा वेबसाइटची लिंकही ‘महाभूषण प्रकल्पास’ देण्याचा बेत आहे. उदाहरणार्थ : भा.रा. तांबे यांचे नातू सुनील तांबे यांनी राजकवींबद्दलची वेबसाइट अलीकडेच घडवली. तिची लिंक ‘महाभूषण प्रकल्पात’ दिली आहे. त्याच प्रमाणे लेखक, पटकथाकार रघुवीर सामंत यांची वेबसाइट त्यांचे चिरंजीव दीपक सामंत यांनी तयार करत आणली आहे. तिचाही समावेश महाभूषण प्रकल्पात होईल.
२५ तारखेला झालेल्या वेबसाईट उद्घाटन समारंभाचा सविस्तर वृत्तांत खालील दुव्यावर पाहता येईल.
