जग अनेक अनाकलनीय घटितांनी, अक्रितांनी भरलेलं आहे यावर माझा लहानपणापासून विश्वास आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की मुक्ततेच्या आनंदाच्या हातात हात घालून आणखी एक आनंद यायचा तो म्हणजे आजी आजोबांकडून किस्से कहाण्या ऐकण्याचा. याची तयारी संध्याकाळपासूनच होई. तुळशीच्या अंगणात भरपूर पाणी टाकायचं. तापलेलं अंगण निवलं की बाजा टाकायच्या. गाद्याबिद्या पद्धतशीर घालून आम्ही अधीरपणे आजोबांची वाट पाहायचो… मग सुरू व्हायचा गप्पा, किस्से यांचा दौर! रात्री डोळ्यांवर झोप उतरेपर्यंत गप्पागोष्टी चालत. तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टींमध्ये अघटिताच्या गोष्टीही जागा राखून होत्या. त्या रात्री आम्माच्या…आमच्या आजीच्या माहेरची गोष्ट निघाली. तिच्या माहेरी म्हणे नात्यातल्या कोणा किश्टप्पाचा सदाशिव होता. सदाशिव तान्हा असतानाची गोष्ट… रानात येळ अमावास्येची पूजा होती. आंबील, भाजी-भाकरीचा बेत होता. पाच-पन्नास माणसं पंगतीला बसलेली. वातावरण आल्हाददायक होतं. जेवणंही रंगात आलेली होती. आंबिलीचे द्रोणच्या द्रोण रिकामे होत असतानाच एका बाजूला कोल्हाळ माजला. काय झालं म्हणता, दावं तोडून बैल उधळला होता. महामारकुटा म्हणून आधीच कुप्रसिद्ध असलेला बैल उधळला तो नेमका सदाशिवच्या दिशेने. थोडी मोठी म्हणावी अशी दोन मुलं सदाशिवाच्या दिमतीला ठेवलेली होती; पण चौखूर उधळलेल्या बैलाला पाहून मुलं बावचळली आणि पळून गेली. हवेत हातपाय उडवत सदाशिव मात्र दुपट्यावर मजेत झोपलेला. बैलाचा रोख पाहून बाळाची आई हादरली. तिच्या हातातलं आंबिलीचं पातेलं गळून पडलं. जिवाच्या आकांताने ती पुढे धावली. लोकही धावले. वेळ आणीबाणीची होती. लोक सदाशिवपर्यंत पोहोचणार तेवढ्यात अक्रीत घडलं. धूळ उडवत येणारा बैल करकचून ब्रेक लागावा तसा थांबला. उभ्या जागी झुलू लागला. झुलता झुलता डुरकू लागला. कोणत्या अज्ञात शक्तीने त्याला थांबवलं होतं कोण जाणे, पण बैल थांबला. सदाशिव वाचला. बैलाच्या खुराखाली त्याचा चेंदामेंदा झाला असता हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. पण प्रश्न आहे तो बेफाम उधळलेला बैल असा कसा थांबला? त्याला कोणी थांबवला? या विश्वात अशी कोणती शक्ती, कोणती प्रेरणा काम करते जी या अशा अघटितांची सूत्रधार असते? भूकंपात हजारो मरतील पण एखादं तान्हुलं त्यातही जिवंत राहतं. हे काय आहे? आपली मती चालेनाशी होते. मारणाराही तोच आणि तारणाराही तोच; मग ज्याचा जेवढा भाग, तेवढा तो राहतो. भाग संपला की निघावं लागतं हा आमच्या आम्माचा साधा हिशोब! मग कोण ठरवतं हा भाग? कोणते निकष? कोणते नियम? प्रश्न संपतात पण उत्तर मिळत नाही. आपला काळजाचा तुकडा यातून हाती लागला तर केवळ कृतज्ञ असावं…कारणं न शोधता – श्रेय न घेता… बस् मनात कृतज्ञता बाळगावी एवढंच आपल्या हाती!
बहिणाबाईंच्या कविता वाचताना बालपणातील ती उन्हाळ्याची सुट्टी, त्या कहाण्या आणि कधी न पाहिलेला सदाशिव, त्याचं अघटिताचं घटित आठवलं आणि मन अज्ञात शक्तीसमोर नतमस्तक झालं.
काय घडे आवगत
उचलला हारा
हारखलं मन भारी
निजला हाऱ्यात
तान्हा माझा शिरीहारी
डोक्यावर हारा
वाट मयाची धरली
भंवयाचा मया
आंब्याखाले उतरली
उतारला हारा
हालकलं माझं मन
निजला हाऱ्यात
माझा तानका ‘सोपान’
लागली कामाले
उसामधी धरे बारे
उसाच्या पानाचे
हाती पायी लागे चरे
ऐक ये आरायी
‘धावा धावा घात झाला
अरे, धावा लव्हकर
आंब्याखाले नाग आला!’
तठे धावत धावत
आली उभी धाववर
काय घडे आवगत
कायजात चरचर!
फना उभारत नाग
व्हता त्याच्यामधी दंग
हारा उपडा पाडूनी
तान्हं खेये नागासंग
“हात जोडते नागोबा
माझं वाचव रे तान्हं
अरे,नको देऊ डंख
तुले शंकराची आन
आता वाजव वाजव
बालकिस्ना तुझा पोवा
सांग सांग नागोबाले
माझा आयक रे धावा”
तेवढ्यात नाल्याकडे
ढोरक्याचा पोवा वाजे
त्याच्या सूराच्या रोखानं
नाग गेला वजेवजे
तव्हा आली आंब्याखाले
उचललं तानक्याले
फुकीसन दोन्ही कान
मुके कितीक घेतले
देव माझा रे नागोबा
नही तान्ह्याले चावला
स्वतः व्हयीसनी तान्हा
माझ्या तान्ह्याशी खेयला
कधी भेटशील तव्हा
व्हतील रे भेटीगाठी
येत्या नागपंचमीले
आणीन दुधाची वाटी
काळजाचा थरकाप उडणाऱ्या या तीव्र अनुभवाचं वर्णन बहिणाबाई किती नेमक्या शब्दांत करतात. समुद्र शांत दिसत असतानाच एखादी प्रचंड लाट अंगावर आदळावी तसा कवितेचा घटनाक्रम आपल्या अंगावर आदळतो. खरंतर तान्हुल्याला शेतात घेऊन जाणं नेहमीचच. एखाद्या झोळीत ठेवायचं नाहीतर झाडाच्या बुंध्याशी आणि कामाला लागायचं. कोणी आयाबायाही अधूनमधून बाळाकडे डोकावत; पण अचानक कोणाला काही कळायच्या आत कुठून तरी जणू मृत्यूच बाळाशी खेळायला येतो…
तो काळाकभिन्न नाग… आपल्या लेकराच्या बाजूला असा नाग बघून एखाद्या आईच्या जिवाचा काय थरकाप उडाला असेल तो एक बहिणाईच जाणोत! नागाला पाहून काळजात चरचरून कळ उठली. त्या अटीतटीच्या क्षणी करुणाकराशिवाय कोणाची आठवण होणार? त्याची विनवणीच आधाराला. अशी पराकोटीची व्याकूळ विनवणी तो जगन्नियंता तरी कशी कानाआड टाकू शकेल? आणि शंकराची आण नागोबा तरी कशी टाळू शकेल?
खरंच केवढा जिवंत अनुभव. जिवंत कविता! वाचताना आपल्याही नकळत आपण शब्दांच्या मागून शेतात जातो. आंब्याखाली बाळाला ठेवतो. चरचरीत पानांच्या उसात शिरतो. काम सुरू करतो. कोल्हाळ ऐकताच धसकतो. नागाला पाहून पार हेलपाटून जातो. कपाळावर घामाचे बारीकसे बिंदू जमतात. हातापायांत किंचित कंप येतो आणि खरं सांगते, काळजाचे ठोकेही वाढतात. एवढ्या साध्या साध्या ओळींत, साध्या साध्या शब्दांत काय ही ताकद की बहिणाबाई आपल्याला त्यांच्या अनुभवातच सामील करून घेतात.
गुराख्याच्या पाव्यामागे नागराज निघून जातात, आई लेकराला कवटाळून घेते. कृतज्ञतेचा गहिवर आवरत नागाला दुधाची वाटी कबूल करते. अनलंकृत पण सत्त्व असलेली शब्दरचना… भाषेत कोणताही आव नाही, मी अमुकतमुक हा भाव नाही… आहे तो हृदयातून आलेला लेकराचा उमाळा. अप्रतिम चित्रदर्शी कविता. बहिणाईची प्रत्येक कविता अशी मातीशी जोडलेली. मातीच्या लेकीची मातीची भाषा.
मातीसारखीच सोशिक पण कणखर. बहिणाबाईंच्या भाषेचा खानदेशी अहिराणी गोडवा मोहवून टाकणारा आहे. निसर्ग, माणसं, परमेश्वर… सगळ्यांशी घट्ट नातं असलेली, जगण्याच्या अनुभवातून आलेलं शहाणपण शिकवणारी कवयित्री…बहिणाबाई चौधरी.
