स्वागत – आम्ही पुस्तकप्रेमी सातारकर समूह

वाचन चळवळ वाढावी, ‘समव्यसनी’ मित्रमैत्रिणी यांनी एकत्र यावे ह्या हेतूने अनेक समूह आजकाल व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर स्थापन झालेले असतात. अशाच एका ‘पुस्तकप्रेमी’ समूहाचा मी सभासद झालो, त्या समूहातील सदस्यांचे ग्रंथप्रेम आणि वाचनाचा आवाका बघून मी थक्क झालो, ठरवले, की असाच एखादा समूह आपण सातारकर पुस्तकप्रेमींसाठी सुरू करायचा. त्यातूनच स्फूर्ती घेत आम्ही सातारकर साहित्यप्रेमी मंडळींनी ‘वाचू आनंदे’ हा उद्देश ठेवून हा समूह २३ ऑगस्ट २०२१ रोजी स्थापन केला. काही दिवसांतच त्याचा प्रसार हा सातारा जिल्ह्याच्या सीमा ओलांडून थेट परदेशातदेखील झाला. अर्थात सातारा जिल्ह्याशी नाळ न तुटलेली मंडळी बहुसंख्येने एकत्र जमली.

सजीवांमध्ये मानवजात ही  सर्वांत प्रगत आहेच. तिचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भाषा, लिपी आणि लिखित वाङ्मय. सर्वात प्राचीन ‘लिखित’ वाङ्मय हे धूळपाटी, शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्रे यांच्यावर लिहिले गेले. परंतु कागदाचा शोध लागणे, छापखान्याचा वापर होणे हा त्यातील मोठा क्रांतिकारी टप्पा आहे. जगात मुद्रणकला आल्यापासून आजवर विविध विषयांवरील विविध भाषांत अंदाजे पंधरा कोटी ग्रंथ लिहिले गेले असावेत. साहित्य प्रकारांचा आवाका पहिला तर आपल्याला थक्क व्हायला होते. तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, त्या विषयी माहितीची देवाणघेवाण ही पुस्तकरूपात झालेली असते. काव्य, कथा, कादंबऱ्या, नाट्य, चरित्रे, ललित आदि ढोबळ प्रकारांच्या पलीकडे साहित्यसंपदा आहे. त्यात समीक्षा आहे, टीका आहे, शास्त्र-विज्ञान तसेच उपदेश, इतिहास, भूगोल, प्रवास, आदी कितीतरी विषय आहेत. 

 लेखक हा लिहीत असतो, वाचक हा वाचत असतो. लेखक आणि वाचक यांचे नाते एखाद्या लंबकासारखे असते. वाङ्मयसंस्कृतीमधील ह्या लंबकाची दोन्ही बाजूंची टोके म्हणजे लेखक आणि वाचक आहेत. त्यांच्यामध्ये दरम्यान संपादक, प्रकाशक, वितरक आदी मंडळी असतात. लहान-मोठी ग्रंथालये असतात. लेखक आपल्या हातून लिहिलेले लेखन ‘पुस्तक’रूपाने ह्या लंबकामध्ये सोडतो, वाचक ते वाचून लंबक पुन्हा लेखकाच्या दिशेने टोलवतो, त्याच प्रतिक्रियांची लेखक अधाशीपणे वाट बघत असतो! पण ह्या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो वाचक. ‘यथा राजा तथा प्रजा,’ ह्या धर्तीवर ‘यथा वाचक, तथा लेखक’ असे म्हणावेसे वाटते. सकस साहित्य निर्मिती होण्यासाठी कठोर आणि साक्षेपी वाचक तयार व्हायला हवा. आमच्या समूह स्थापनेचा हा एक मोठा उद्देश आहे!

पुस्तके वाचकाला घडवतात, बिघडवतात – दोन्ही खरे आहे; परंतु एक सत्य मात्र आहे की जगात जेवढे लोक उपासमारीने मेले आहेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक न वाचल्यामुळे मेले आहेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातून संपत्ती निर्माण होत असते. प्रसंगी अखंडित वाचीत जावे, हेच खरे. 

वाचन असेल तर विचार येतात, विचार आले की स्वातंत्र्य येते, स्वातंत्र्य आले की स्वाभिमान येतो आणि त्यानंतर वैभव येते. ह्या साहित्य-सागरामध्ये इतके प्रचंड वाङ्मय आहे, इतकी विषय-विविधता आहे, की त्यांचा आस्वाद घ्यायला शेकडो मनुष्यजन्म एका व्यक्तीला पुरणार नाहीत. मग त्यावर तोडगा काय? त्यावर पुस्तकप्रेमींनी एकत्र येणे हा मोठा उपाय! आपापल्या आवडीची पुस्तके निवडावीत, त्यांची मोजक्या शब्दांत सुयोग्य ओळख इतरांना करून द्यावी, इतरांनी त्याच विषयावर आपली मते लिहावीत – भले ती इतरांना पटणारी असोत अथवा नसोत – व्यक्त होणे महत्त्वाचे. आपल्याजवळचा ग्रंथसंग्रह हीच आपली संपत्ती असते, तिचे योग्य प्रदर्शन म्हणजे आमचा हा समूह. 

  हा समूह आता तीनशे सदस्यांना सामावून घेत मोठा झाला आहे. त्यामध्ये लेखक, कवी, संपादक आणि वाचक मंडळी आहेत. ह्या समूहात रोज सकाळी सात वाजता एक पुस्तक-परिचय पोस्ट केला जातो, फक्त त्याच पुस्तकाचा विषय आणि लेखकाबद्दल चर्चा दिवसभर चालते. दुपारनंतर विविध साहित्यिक उपक्रम चालतात. एक परिचयकर्ता सलग एक आठवडा सात पुस्तक-परिचय लिहितो. आजपर्यंत (मार्च २०२५) असे गेली १९० आठवडे अखंड चालू आहे. १९०० पेक्षा जास्त पुस्तक परिचय आजपर्यंत करून दिले गेले आहेत.

अर्थात कोणत्याही संस्थेला, समूहाला काही नियम पाळावे लागतात. त्याशिवाय सुसूत्रता येत नाही. एका व्यक्तीला सलग सात दिवस सात पुस्तक परिचय करायला संधी देणे, हे त्या व्यक्तीचे वाचन किती समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे, ह्याचे द्योतक असते. दररोज वेगळ्या व्यक्तीने पुस्तक परिचय लिहिणे, हे सहज शक्य असले तरी त्यातून त्या व्यक्तीच्या ग्रंथप्रेमाची सर्वांगीण ओळख होऊ शकत नाही. 

दुपारी दोन वाजेपर्यंत त्या दिवशीच्या पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चा व्हायला हवी… हा त्या परिचयकर्त्याला तसेच लेखकाला आणि पुस्तक-विषयाला द्यायचा सन्मान असतो; म्हणून हा नियम. त्यानंतरदेखील उर्वरित दिवसामध्ये फक्त साहित्यविषयक उपक्रम यांच्या बाबतीत पोस्ट असाव्यात, त्यामध्ये कोणताही वैयक्तिक प्रचार, प्रसार आणि धर्म-जात-राजकारण ह्यांचा एकांगी, अतिरेकी विचार नसावा, ही महत्त्वाची अट आहे. ती कटाक्षाने पाळली जाते आणि न पाळणाऱ्या सदस्यांना ह्या समूहातून काढून टाकले जाते.

गेल्या साडेतीन वर्षांत आमच्या समूहात अनेक सदस्य आपणहून आले. एकाला दुसरा जोडला गेला आणि ‘कारवा बनता गया!’ लवकरच ह्या समूहामध्ये मोबाईलवरील पुस्तक परिचय चर्चा, शिवाय अनेक उपक्रम सुरू केले गेले. म.सा.प. – पुणेचे कोषाध्यक्ष श्री. विनोद कुलकर्णी, पुणे शाखेचे प्रतिनिधी श्री. शिरीष चिटणीस आणि जनवाचक चळवळीचे श्री.श्रीराम नानल यांच्या सहकार्याने आम्ही अनेक उपक्रम ‘आम्ही पुस्तकप्रेमी’ समूहातर्फे सुरू केले. त्यामध्ये ‘लेखक तुमच्या भेटीला,’ ‘साहित्यिक गप्पा,’ ‘ग्रंथप्रदर्शन,’ ‘पुस्तक आदान-प्रदान,’ ‘दिवाळी अंक परिचय,’ ‘चित्रपट रसग्रहण,’ ‘नाट्य रसग्रहण,’ ‘कविता रसग्रहण,’ ‘वार्षिक स्नेह (साहित्य) संमेलन,’ साहित्यिकांच्या जयंती आणि पुण्यस्मरण असे विविध कार्यक्रम (काही प्रत्यक्ष, काही आभासी) स्वरूपात घेतले जातात. त्यामध्ये सर्वश्री डॉ. सुनीलकुमार लवटे, शरद तांदळे, अश्विनी धोंगडे, गौरी देशपांडे, दिलीप कुलकर्णी, दीपक करंजीकर, माधव जोशी, चंद्रशेखर टिळक अशा कितीतरी साहित्यिकांनी भाग घेतला आहे. ह्यासाठी आम्हांला सातारा येथील दीपलक्ष्मी पतसंस्थेचे वातानुकूलित  असे सभागृह श्री.शिरीष चिटणीस यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिले. सातारा शहराचे थोरले प्रतापसिंह महाराज नगर वाचनालय यांचेदेखील सहकार्य असते. सातारा शहरात आजपर्यंत आमची दोन स्नेहसंमेलने उत्साहात पार पडली.  

आणखी एक फायदा असा झाला की मान्यवर लेखक, कवी, साहित्यिक आणि त्यांच्या कलाकृतींची ओळख करून देताना आमच्या समूहातील कित्येक सदस्य लिहायला लागले, त्यांच्या स्वतःच्या साहित्य कलाकृती प्रकाशित होऊ लागल्या. मोठ्या साहित्यिकांची ओळख होता होता आमच्यामधील दडलेले मोठे मोठे साहित्यिक आता प्रकट होऊ लागले!  

शेवटी समर्थांच्या ओवीमध्ये बदल करून, असे म्हणता येईल,   

 ‘जे जे आपण वाचले, ते ते वर्णावे ऐसे, सहयात्री करोनी सोडावे, सकल वाचक.’ 

Author

Leave a Reply