मी माझ्या दोन काका अन् आजीबरोबर चार वर्षांचा असताना मुलतापीहून नागपूरला शिफ्ट झालो. सव्वा वर्षांचा असताना आईने मला आजीच्या झोळीत टाकले ते कायमचे. नागपूरला सुरुवातीला आम्ही इतवारी मुख्य पोस्ट ऑफिससमोरील पारखी वाड्यात राहत होतो – पहिल्या मजल्यावर. एक दिवस घराचा जिना धाड्कन कोसळला! घर बदलावेच लागले. आम्ही डांगे वाड्यात आलो. हे घर इतवारी हायस्कूलजवळ. हा जुन्या नागपूरचा व्यापारी भाग.
इथेही आम्ही पहिल्या मजल्यावर राहायचो. आगगाडीसारख्या तीन छोट्या खोल्या. लहानसे स्वयंपाकघर. तिथेच एक बाजूला उघडी मोरी – म्हणजे बाथरूम. तीही मल्टीपरपज… जुन्या नागपूरच्या बहुतेक घरांत बंद बाथरूम हा प्रकार नव्हता. मुली,बायका कसे सारे सहन करत, देव जाणे! घरासमोर बाल्कनी. हा जाण्या-येण्याचा रस्ता. रात्री ती माझी बेडरूम. एका बल्बचे कनेक्शन बाहेर घेतलेले – रात्री अभ्यास करायला. विजेचे बिल किती बल्ब वापरता यावर मालक ठरवणार! मला अभ्यासाचा बल्ब फुकट दिला कन्सेशन म्हणून डांगे आजोबांनी. त्यांचा माझ्यावर खास लोभ – हुशार मुलगा म्हणून. एरवी नागपूरचा कडक उन्हाळा प्रसिद्ध; पण आमच्या घरात पंखे नव्हते! रात्री बाहेर गॅलरीत, टिनाच्या छपरावर झोपायचे! मी पदवी घेईपर्यंतचे दिवस बिनापंख्याचे काढले. कदाचित ते ऊन सहन केले म्हणून पुढचे सगळे सोपे गेले!
पाणी खालून आणावे लागे. पायऱ्या संपल्या की टिनाचे छप्पर होते. याच छपरावर रात्री गाद्या पसरल्या की कॉमन बेडरूम – नव्हे हॉल तयार व्हायचा! या उतरत्या टिनाच्या छपरावरून कुणी मुले खाली कशी पडली नाहीत याचे आश्चर्य वाटते! या छपराखाली वाड्याच्या दर्शनी भागात पिठाची गिरणी होती. पत्ता सांगायला हा चांगला लँडमार्क!
सकाळी नळ आले की खालून वर पाणी भरणे हे एक काम असे. आधी डांगेकाकू सोवळ्यात पाणी भरत. त्यांचे झाले की मग भाडेकरूंचा नंबर. खाली कॉमन संडास होते. जुन्या पद्धतीचे… अतिशय घाणेरडे! त्यासाठी मोठ्या पिंपात खाली पाणी भरून ठेवावे लागे. पाणी भरण्यात इतके श्रम व्हायचे की वेगळा व्यायाम करण्याची गरज नव्हती.
चुलीवर स्वयंपाक व्हायचा. कोळशाच्या शेगड्या होत्या. दुपारचा चहा करायला रॉकेलचा स्टोव्ह होता. तो पेटवणे ही कला होती. मला ते जमायचे. सकाळचे अंघोळीचे पाणी भुशाच्या ( लाकडाची बारीक पावडर) शेगडीवर तापवले जायचे. शेगडीत भुसा नीट दाबून भरावा लागे. हेही मला छान जमायचे. माझे हायस्कूलपासून ते इंजिनियरिंग पदवीपर्यंतचे शिक्षण या डांग्यांच्याच वाड्यात झाले. माझी शिक्षक होण्याची मुहूर्तमेढदेखील याच वयात याच घरात झाली. सांगितले तर आश्चर्य वाटेल! दरवाजा आणि खिडक्यांचा फळा… काका नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक त्यामुळे खडू डस्टर असेच घरी. मी खिडक्यांवर गणितं सोडवत असे. तेव्हा बैठकीत गाद्या गुंडाळून भिंतीला टेकवून ठेवलेल्या असत. ते माझे काल्पनिक विद्यार्थी – ज्यांना मी छडीने मारतदेखील असे! पेपर काढणे, ते स्वतःच सोडवणे, स्वतःच तपासणे हे सारे प्राध्यापकी उद्योग मी लहानपणापासून केले आहेत. त्यामुळे पुढे शिक्षक होणे सहज सोपे झाले.
या वाड्यात चार कुटुंबे भाड्याने राहायची. त्यांपैकी आमच्या शेजारी राहणारे कुटुंब माझ्या कायमचे लक्षात आहे : नवरा बायको, त्यांना दोन मुले होती; शिवाय या बाईंचे दोन भाऊ अन् बहीण हेही त्यांच्याजवळ राहायचे. त्यांना आई-वडील कुणीच नव्हते. त्यामुळे भावा-बहिणींची जबाबदारी या बाईवर आली होती. सख्खे बहीण-भाऊ असूनही ही बाई आपल्या भावंडांना खूप छळायची. त्यांना क्रूरपणे बेदम मारायची. त्यांना नोकरासारखे वागवायची. उपाशी ठेवायची. हा एका आई असलेल्या बाईचा हिंसाचार, अत्याचार मी लहानपणी डोळ्यांनी पाहिला. त्या लहान भावंडांचे रडणे, ओरडणे अजूनही कानात घुमते. माझ्या पहिल्याच कादंबरीत या क्रूर स्त्रीची काळी सावली सहज दिसते!
प्रत्येक परीक्षेला रोज आधी मी डांगे यांच्या देवघरात नमस्काराला जात असे. काका-काकूंना नमस्कार करून आशीर्वाद घेत असे. हातावर दह्याचा प्रसाद मिळत असे. त्या आशीर्वादावर माझी अपार श्रद्धा होती. मी बोर्डात मेरिटमध्ये आलो तेव्हा काकांनी माझ्या हातावर चांदीचे अकरा रुपये ठेवले बक्षीस म्हणून. ते कौतुक मी जपून ठेवले.
सुरुवातीला आम्ही चौघेच होतो : आजी, दोन काका अन् मी. मग काकाचे लग्न झाले. संख्या वाढली. याच घरात लग्नं झाली, इतर काकूंची बाळंतपणंदेखील झाली. घर लहान असले तरी या लहान घराने सगळ्यांना सामावून घेतले. इंजिनियरिंगच्या अभ्यासाला हे घर अडचणीचे होते. जवळच एक दूरची आत्या राहायची. ती एकटीच होती; विधवा होती; मूलबाळ नव्हते. तिचे घर चांगले मोठे… विशेष म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने सोयीचे. त्यामुळे चार वर्षे मी तिच्याकडे राहिलो. फक्त जेवायला घरी जात असे. आजी गमतीने म्हणायची, “घर म्हणजे धर्मशाळा झाली आहे!” लग्न झाल्यावर माझ्या बायकोने हे घर पाहिले तेव्हा तिला( त्याआधी तिच्या आई-वडिलांना) धक्काच बसला होता!
या वाड्याने, घराने मला सर्वार्थाने घडवले, मोठे केले. माझी पत्रांजली कादंबरी प्रसिद्ध झाली तेव्हा मी पुढील शिक्षणासाठी खरगपूरला होतो. ही कादंबरी वाचून तरुण भारत, नागपूर रविवार पुरवणीचे संपादक इतके भारावले की, ते डांगे वाड्यात माझ्या आजीला भेटायला गेले. तिच्याशी बोलले. हा तरुण लेखक या मातीत घडला कसा, वाढला कसा हे त्यांना प्रत्यक्ष बघायचे होते. त्यानंतर त्यांनी या कादंबरीवर पाऊण पानभर सुंदर परीक्षण लिहिले. या लिखाणाची तुलना त्यांनी स्टीफन झ्वाईगच्या लेटर फ्रॉम अननोन वूमनशी करून टाकली! हा वाडा, हे घर माझ्या जडणघडणीत इतके महत्त्वपूर्ण ठरले!
माझ्यासाठी हे कुरुक्षेत्र होते. संघर्ष,लढाईचे क्षेत्र अन् कृष्णाच्या गीताईने विचार समृद्ध होण्याचे क्षेत्र. केवळ लढाईचे कौतुक नको. लढा देताना आपण काय शिकलो, विचाराने किती मोठे झालो, संपन्न झालो हे जास्त महत्त्वाचे. १९७० साली माझे नागपूर सुटले. डांग्यांच्या वाड्यातले स्थायी वास्तव्य संपले. एम. टेक.साठी खरगपूरला जाताना मी नेहमीप्रमाणे डांगे यांच्या देवघरात नमस्कार करायला, काका-काकूंचा आशीर्वाद घ्यायला गेलो, तेव्हा का कुणास ठाऊक हुंदका दाटून आला. डोळे पाझरायला लागले. दोघांचेही वय झाले होते. यांची पुन्हा भेट होते की नाही अशी दुष्ट शंका दाटून आली. दुर्दैवाने ती खरी ठरली. काही महिन्यांनी एका यात्रेला गेले असताना तिकडेच पुण्यस्थळी त्यांचे निधन झाल्याचे कळले. डोक्यावर प्रेमाचा आशीर्वाद देणारे दोन नव्हे एकदम चार हात माझ्या आयुष्यातून गेले!
७० साली नागपूर सुटले ते कायमचे. पुढे अनेक वर्षांनी मी कुलगुरू झाल्यानंतर पुणे येथे एका ग्रंथालयात कार्यक्रमासाठी गेलो होतो. समारंभ संपल्यानंतर एक तरुण स्त्री भेटायला आली, म्हणाली, “तुम्ही मला ओळखणे शक्य नाही; पण मी तुम्हांला चांगली ओळखते.तुमच्याविषयी पेपरात काही बातमी छापून आली की माझी आई म्हणते, “हा मुलगा आमच्या वाड्यात राहायचा, खूप हुशार होता. आई बाबांना याचे फार कौतुक. ते म्हणायचे, ‘हा नाव कमावणार’!” ती डांगे आजोबांची नात होती. मला ते ऐकून जुन्या आठवणींनी भरून आले.
दोन वर्षांपूर्वी नागपूरला गेलो होतो. तेव्हा एका शाळेतल्या जुन्या मित्राबरोबर मुद्दाम ऑटोने जुन्या इतवारी, महाल, संती रोड, अयाचित मंदिर या जुन्या भागांत हिंडलो. जिथे डांग्यांचा वाडा होता त्या संती रोडचा सगळा जुना भाग हायवे रस्ता रुंदीकरणात गेला. काहीच ओळखीचे उरले नाही. चार पदरी भल्या मोठ्या भंडारा रोडखाली सारे पुसले गेले, नाहीसे झाले. देवळे गेली…उरल्या सिमेंट काँक्रीटच्या उंच इमारती. उंच असूनही डांगे वाड्याच्या तुलनेत खुज्या वाटणाऱ्या! डोळ्यांत न मावणाऱ्या! डांगे वाड्याने काळजात घर केले होते कायमचे!

सुंदर आठवणी, सुंदर लेख..जुन्या काळात घेऊन जाणारा! माझ्या सारखेच इतर अनेकांचे लहानपण अशाच वाड्यात गेले. आता काळाच्या ओघात हे वाडे नामशेष झाले आहेत. मागे उरल्या त्या केवळ आठवणी!
फार छान लेख. अगदी जुना काळ डोळ्यासमोर उभा राहिला. सगळेच अशा वातावरणात रहायचे म्हणून की काय, पण तेव्हांही गैरसोय वाटत नसे आणि आजही मागचे आठवताना फार हालात होतो असे वाटत नाही.