जपान डायरीज (१)

आशिया खंडातील भारताचा अनेक वर्षांपासूनचा मित्रदेश – जपान. आपण या देशाबद्दल काही ना काही ऐकलेलं असतंच : टीव्ही, कारपासून ते पोकेमॉन, पिकाचूपर्यंत. माझीही अशीच काहीशी स्थिती होती काही वर्षांपूर्वीपर्यंत, थोडी  तोंडओळख होती जपानशी; कारण काही वर्षांपूर्वी मी जपानी भाषा थोडीशी शिकले होते.

स्टेट बँकेच्या टोकियो ऑफिसला माझी नियुक्ती झाली तब्बल चार वर्षांसाठी आणि मी २०२२ सालाच्या गुलाबी थंडीत जपानमध्ये आले – तीन  वर्षांची मुलगी आणि नवऱ्याबरोबर. भारतातील मुंबईसारख्या महानगरात ७-८ वर्षं राहिल्यानंतर त्याहून मोठ्या, अत्याधुनिक शहरात राहण्याची मानसिक तयारी करूनच इकडे पोचले होते. तशी फिरतीची नोकरी असल्याने घर बदलणं, नवीन ठिकाणी राहायला जाणं आम्हांला नवीन नव्हतं; पण कितीही तयारी केली, कितीही माहिती मिळवली असली तरी नवीन देश अनेक वेगळ्या अनपेक्षित अनुभवांचं भांडार उघडतो : कधी सुखद, कधी अचंबित करणारे; तर कधी त्रासदायक. माझ्या अशाच काही अनुभवांची गोष्ट सांगायचा प्रयत्न करणार आहे. 

जावे भूकंपाच्या देशा

जपान!! जगभरात अनेकविध गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेला देश. तंत्रज्ञानातील प्रगती, नम्र लोक, नैसर्गिक सौंदर्य, माउंट फुजी आणि अर्थात अणुबॉंबच्या भयानक परिणामांतून उभा राहिलेला देश. हे सगळे लेखाचे वेगळे विषय होऊ शकतात पण आज मी तुम्हांला सांगणार आहे एक वेगळी गोष्ट – तशी भीतिदायक; पण इथे राहणाऱ्या लोकांच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग! 

इथे आल्याच्या तिसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये असताना अचानक सगळं हलल्यासारखं वाटलं – इकडे तिकडे बघितलं तर काही सेकंद थांबून पुन्हा काहीच न झाल्यासारखे कामाला लागलेले लोक…आणि माझी ओळख झाली जपानच्या भूकंपाशी. नंतर कळलं हा एक छोटासा भूकंप होता त्यामुळे आगाऊ सूचना दिल्या गेल्या नाहीत किंवा बाकी काहीही घटना घडल्या नाहीत.  

माझ्याबाबतीत भूकंप म्हणजे शाळेत असताना ऐकलेला लातूरचा आणि मग गुजरातचा. त्यात झालेली जीवितहानी आणि मालमत्ताहानी दोन्ही तसं ऐकीव; पण ऐकलेल्या गोष्टी भीतिदायक होत्या हे नक्की. तेव्हा ऐकलेल्या, भूकंप झाल्यावर करायच्या एक-दोन गोष्टी वगळता माझी भूकंपाशी ओळख नव्हतीच. इथे आल्यावर कळलं जपानमध्ये वर्षाला हजाराच्या वर भूकंप होतात. हळूहळू इथली ओळख होत गेली आणि ह्या नैसर्गिक आपत्तीकडे अधिक सतर्कतेने बघू लागले. 

जपानमध्ये भूकंप झाल्यास काय करायचं याची तयारी खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. भूकंप-प्रवण क्षेत्र असल्याने त्यांच्या जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत ह्याचा विचार झाल्याचं जाणवतं;  मग ती घराची रचना असो, की फर्निचरची मांडणी, घराच्या पायाला दिली जाणारी मजबुती  किंवा  अशा इतर गोष्टी.  इथे भूकंपाची तीव्रता मोजायचं एक वेगळं परिमाण आहे जे एकाच भूकंपाची वेगवेगळ्या ठिकाणांची तीव्रता मोजते. जगात वापरलं जाणारं रिश्टर स्केल फक्त भूकंपाच्या केंद्रबिंदूच्या इथल्या भूकंपाची तीव्रता मोजते. 

जपान हा एक बेटांचा देश आहे आणि त्याचं जगाच्या नकाशावरील स्थान दोन tectonic plates वर आहे. फिलिपाइन्स ॲंड युरेशियन प्लेट जिथे जुळतात तिथे आहे जपान – हेच कारण आहे सतत भूकंप होण्याचं. तर ह्या टेक्टोनिक प्लेट जिथे मिळतात त्याला म्हणतात ‘नानकाई ट्रॉफ.’ ही जागा जपानच्या साधारण ९०० कि.मी. एवढ्या जागेच्या अगदी जवळ आहे. तो समुद्र किनारा आहे. दर ९०-१०० वर्षांत ह्या ठिकाणी एक मोठा भूकंप होण्याची शक्यता असते. त्याची तीव्रता  जास्त असल्याने सुनामी येण्याची भीती असते. 

A map of japan with a red line

AI-generated content may be incorrect.

असा भूकंप इथे १९४६ साली झाला होता. तो होता ८.१-८.४ तीव्रतेचा. त्याने ५-६ मी उंचीच्या सुनामी लाटा आल्या होत्या. त्यानंतर झालेला २०१२ चा भूकंप ७.३ तीव्रतेचा होता. तो भूकंप वेगळ्या स्थानी होता. त्याचा नानकाई ट्रॉफशी संबंध नव्हता. नानकाई ट्रॉफसंबंधित तसाच भूकंप होण्याची सध्याची शक्यता ७०-८०% आहे आणि पुढील १० वर्षांत ती ८०-९०% होईल…जर तोपर्यंत झाला नाही तर! २०१२चा अनुभव बघता ह्या वेळी २ लाखांच्या वर जीवितहानी आणि २२० ट्रिलियन येन एवढं  नुकसान असू शकतं. मग इथलं आयुष्य सतत भूकंपाच्या सावटाखाली असतं का? तर अजिबात नाही; पण इथल्या जीवनपद्धतीमध्ये भूकंपाची शक्यता इतक्या खोलवर रुजली आहे की ती रोजच्या आयुष्याचा नकळत भाग बनून गेली आहे. 

घर बांधताना लाकडाचा वापर, भूकंपाचे तीव्र धक्के सहन करू शकणाऱ्या अनेक मजली इमारती ह्या  अगदी वर वर दिसणाऱ्या गोष्टी आहेत; पण जमिनीखालील पाण्याचे पाइप्ससुद्धा असे बनवले आहेत की तीव्र भूकंपाच्या धक्क्यानेही ते तुटणार नाहीत. रोजच्या जीवनात कुठलंही फर्नीचर घेताना ते भूकंपाच्या वेळी स्टेबल कसं राहील ह्याचा आपोआप विचार केला जातो इथे. ऑफिसमध्ये सी. सी. टीव्हीचं इंस्ट्रूमेंट लावायला आलेल्या माणसाने ते वर भिंतीवर लटकवायचं आहे हे ऐकल्यावर सरळ नाही सांगितलं होतं आणि निघून गेला. ४ दिवसांनी एक वेगळ्या प्रकारची चिकटवायची पट्टी आणून मग ते लावून दिलं. जाताना सर्टिफिकेट पण दिलं की ८.५ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यापर्यंत हे माझ्या अंगावर पडणार नाही. 

२०२३ च्या सुरुवातीला ऑफिसमध्ये असताना नेहमीपेक्षा थोडा मोठा भूकंप झाला आणि सगळ्या जपानी लोकांनी आपली आपली हेल्मेट्स बाहेर काढून ठेवली. बिल्डिंगमध्ये सूचना सुरू झाली (हादरे थांबल्या नंतरच्या ५ मिनिटांत,  ध्वनिवितरकावरून) :  ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला आहे, बिल्डिंग ७.५ तीव्रतेचा भूकंप सहन करू शकते. बिल्डिंगमध्ये कुठेही आग लागलेली नाही त्यामुळे धोका नाही. सुनामीबद्दल पुढील १५ मिनिटांमध्ये सूचना देण्यात येईल तोपर्यंत कोणीही बाहेर पडू नये. त्यानंतर १० मिनिटांत ऑफिसमधील स्टाफ येऊन सांगून गेली की, ऑफिसमधून बाहेर न पडता आल्यास राखीव पाणी आणि डबाबंद जेवण विशिष्ट ठिकाणी ठेवण्यात आले आहे. लगेच १५ मिनिटे झाल्यावर सूचना आली की, टोकियोमध्ये सुनामीचा धोका नाही, बाहेर पडण्यास हरकत नाही. हे सगळं घडलं तेव्हा माझ्या दृष्टीने किती आश्चर्यजनक होतं हे मी शब्दांत सांगू शकत नाही. 

ऑगस्ट २०२३ मध्ये वर उल्लेख केलेल्या नानकाई ट्रॉफ एरियामध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप झाला आणि येथील सरकारने पुढील १५ दिवसांत तीव्र भूकंपाची आणि सुनामीची शक्यता वर्तवली. ऑफिसमध्ये सूचना आली (जी आमच्या ऑफिसमध्ये अनेक बाहेरील नागरिक असल्याने सक्तीची आहे) सर्वांना सांगण्यात आले की, घरी असलेल्या किटमधील तयारी तपासा, तीन दिवस पुरेल एवढे पाणी भरून ठेवा, हेल्मेट्स झोपताना जवळ ठेवा वगैरे वगैरे. त्यानंतर दोनच दिवसांनी एक छोटा भूकंप झाला आणि ठरवलं ह्यांनी सांगितलंय तशी तयारी बघून ठेवायला हवी. झालं, मी आणि सतीश (नवरा) घरी येऊन कामाला लागलो. आम्हांला इथे आल्यावर जेवढे घरातले सदस्य तेवढ्या  बॅगा  मिळाल्या होत्या;  त्या काढल्या.  पहिल्यांदाच नीट उघडून पाहिल्या, रेन पोंचो (रेनकोटासारखा – पण मोठा), फोल्डेबल  ब्लँकेट, टोर्च, रेडिओ, बॅटरीज, खायचे पॅक्स, टिश्यू पेपर पॅक वगैरे खजिना निघाला. 

शाळेत जाणारी, ५ वर्षांची माझी मुलगी आर्या आली आणि म्हणाली “मम्मा अर्थक्वेक होणारे का?” मी आधी गोंधळले, मग ठरवलं खरं सांगू या! हळूच तिला म्हटलं, “अगं परवा झाला ना मोठा! तर इथे त्यांनी तयार राहायला सांगितलंय, तू काळजी नको करू, ऑल इज वेल.” मला वाटलं तिची समजूत काढावी, ‘सगळं ठीक आहे’ असं सांगून! पण ती लगेच शांतपणे म्हणाली, “अग मम्मा पाणी नाही घेतलंस, कंफर्टेबल शूजही ठेवू या झोपायच्या बेडजवळ.” नंतर तिने आम्हांला भूकंप झाल्यास आम्ही घरात कुठे लपायचं याच्या जागा पण सांगितल्या (तिने ठरवलेल्या)! आमचं आकारमान लक्षात घेऊन म्हणाली, ती ड्रेसिंग टेबलच्या खाली, मी बेडच्या खाली – जेणेकरून तिला मी दिसत राहीन आणि तिचा आप्पा दुसऱ्या मोठ्या टेबलाखाली. 

हे सगळं ऐकून आम्ही हैराण झालो…  हे सगळं काय होतं? तिने हे सगळं कधी ठरवलं? आणि तिला इतकी माहिती कशी. तिला विचारलं तर म्हणाली, “स्कूलमध्ये शिकवलंय काय काय करायचं, सगळ्या मुलांना ना, सांगावं लागतं, भूकंप झाला तर शाळेत किंवा घरी कुठे लपणार ते.” नंतर तिने जवळ ठेवायच्या वस्तूपण सांगितल्या पटापट आणि शांतपणे खेळायला निघून गेली. हे सगळं ऐकून आम्हांला कळलं की ५ वर्षांच्या आमच्या मुलीला बहुतेक आमच्यापेक्षा हे सगळं जास्त चांगलं माहीत आहे; कारण शाळेत खूप चांगल्या प्रकारे तिला शिकवलंय : काय करायचं, कसं करायचं! घाबरून न जाता  शांतपणे सूचना लक्षात ठेवणे तिने चांगलंच आत्मसात केलं होतं. मला गमक कळलं होतं इथल्या लोकांच्या शांत राहण्याचं, त्यांच्या तयारीचं. 

मग एक नवीन अनुभव आला फायर ड्रिलचा, मुंबईमध्ये असताना वर्षातून एकदा तिथेही व्हायचा हा सोपस्कार, तसंच काही असेल असा साहजिक विचार होता मनात. सुरुवात झाली ती नोटीस आली तेव्हा. तब्बल २ महिने आधी नोटीस आली होती. त्यात प्रत्येक ऑफिसमधून एक प्रतिनिधी निवडायचा होता. त्याच्यानंतर ४-५ लोकांचे गट करायचे होते. त्या गटांचा एक गट प्रमुख असणार होता. हे सगळे सोपस्कार पार पडले काही दिवसांत आणि ड्रिलचा दिवस उजाडला. आम्ही सगळे हेल्मेट्स काढून (काहीजण शोधून) तयार होतो. ठरलेल्या वेळी अनाउंसमेंट सुरू झाली “ — तीव्रतेचा भूकंप झाला आहे, बिल्डिंगला धोका नाही. पुढील सूचना देण्यात येईल,” मग सांगितलं गेलं की ९ व्या मजल्यावर आग लागली आहे, आम्ही एका-एका मजल्यावरील लोकांना खाली नेणार आहोत, तयार राहून पुढील सूचनेची वाट पाहावी. जेव्हा आमच्या मजल्याची वेळ आली तेव्हा कुठलीही ढकलाढकली न होता, गोंधळ न होता (पूर्ण शांततेत – आवाज फक्त सूचनेचा येत होता) साधारण ७०-८० माणसं प्रत्येक मजल्यावरून  – असे १३ मजले रिकामे होत होते हे मी बघितलं. सगळ्यांच्या डोक्यात हेल्मेट्स होती आणि सगळे खाली ठरलेल्या ठिकाणी जमले. मग त्या गटप्रमुखांनी आपआपले लोक सुखरूप खाली आल्याच कळवलं आणि मग हा एपिसोड संपला. जपानच्या पद्धतशीर काम करायच्या सवयीची चांगलीच ओळख असूनसुद्धा मी आश्चर्यचकित झाले होते. दर सहा महिन्यांतून एकदा तितक्याच गांभीर्याने आणि पद्धतशीरपणे ड्रिल करणारे लोक आता मला सवयीचे झाले आहेत.  

दुसरा असाच गंमतशीर किस्सा :  रात्री १-१.३० च्या सुमारास माझा सायलेंटवर असलेला फोन वाजायला लागला, “अर्थक्वेक इज कमिंग, अर्थक्वेक इज कमिंग.” झोपेतून जाग आल्यावर मी फक्त आर्याला (माझ्या मुलीला) उचलून घेऊन इकडे तिकडे बघत राहिले.  ही आहे इथली वॉर्निंग सिस्टीम. भूकंप व्हायच्या काही मिनिटे अगोदर सगळ्या मोबाईल डिव्हाइसेसवर ॲलर्ट येतो की भूकंप होणार आहे. प्रत्येक एरियामध्ये जागा ठरलेल्या असतात : भूकंप झाला आणि सुनामी आली तर त्या ठिकाणी जमायचं (इव्हॅक्यूएशन साइटस) कुठेही नवीन राहायला गेलं की तिथे नोंदणी करावी लागते. नोंदणी केली की ते तुम्हांला ह्या जागेपर्यंत जायचे रस्ते सांगतात. ऑफिस किंवा घर सगळीकडे ह्याचा नकाशा असतो. एवढंच कशाला कितीतरी हॉलिडे रेंटल अपार्टमेंट्समध्येसुद्धा हा नकाशा लावलेला सापडेल.  एकदा असाच ॲलर्ट आला तेव्हा आम्ही एका स्टेशन परिसरात होतो. आम्ही इकडे तिकडे बघितलं, खूप फोन होते आजूबाजूला! सगळे मुख्यतः जपानी पण तुरळक इंग्रजी, स्पॅनिश अशा भाषांत वाजत होते. सगळे लोक काही मिनिटे स्तब्ध होते, होते तिथे थांबले. शांतता होती काही मिनिटे. एखादं मूल ओरडण्याचा आवाज सोडला तर ५००-७०० माणसांनी गजबजलेला परिसर शांत होता; पुढील घटनेसाठी तयार होता. आम्ही काही न सुचून इतरांना बघून तिथेच थांबलो, ३-३.३० मिनिटांनी  भूकंप जाणवला पण खूप मोठा नव्हता. हादरे थांबल्यावर लोक आपआपल्या मार्गाला लागले. 

आतापर्यंत इतक्या अनुभवांनंतर मला प्रश्न पडला होता… मी माझ्या ऑफिसमध्ये विचारलं, “तुम्हांला ही इतकी माहिती कुठे मिळते?” माझ्या डोळ्यांसमोर ‘लाइव रिपोर्टिंग’ करणारे, ओरडणारे पत्रकार येत होते. हेही आहे इथे; पण NHK म्हणून एक राष्ट्रीय प्रसारण आहे. त्यांचं आपत्तीबद्दल माहिती देणारं एक वेगळं ॲप आहे. इथे पूर्ण देशात कुठेही भूकंप झाल्यास, १०-१५ मिनिटांमध्ये त्या ॲपवर कुठल्या प्रिफेक्चर (जिल्हा)मध्ये, कुठल्या सेंटरला, किती तीव्रतेचा भूकंप झालाय ते सांगतात. सुनामी येण्याचा धोका असेल तर साधारण किती उंचीच्या लाटा असू शकतात आणि त्या कुठे किती वेळात पोचण्याची शक्यता आहे, हेही त्यात सांगितलं जातं. एका बाजूला आपल्या देशातील टी.आर.पी.साठी वाटेल त्या प्रकारे बातम्या दाखवणारे आणि दुसरीकडे हे आवश्यक माहितीचं सहज प्रसारण, मला अगदी अवाक् करून गेलं. 

A map of the world with numbers and symbols

AI-generated content may be incorrect.

(साधारण असाच नकाशा आणि खूप माहिती ह्या ॲप्लीकेशनवर सहज उपलब्ध होते.)

आपल्या देशाचं स्थान बघता तिथेही भूकंपाचा धोका आहेच, जपान इतका नक्कीच नाही; पण आहे. इथले हे असे अनुभव मला नक्कीच समृद्ध करून गेले, ते तुम्हांलाही सांगण्यासाठी हा लेखाचा खटाटोप. आता इथेच थांबते, आणखीही असेच काही अनुभव सांगायचा  यत्न असेल. 

अमृता बागाईतकर 

Author

2 thoughts on “जपान डायरीज (१)

  1. खूप सुंदर लिहिले आहे. जपान नेहमीच विस्मयात टाकतो.

  2. काय म्हणू कळत नाही…तू म्हणतेस हा तुझा पहिला प्रयत्न आहे…पण तसे अजिबात वाटत नाही….शब्द संपदा A1, ओघवती शैली, very clear thinking आणि भूकंप या विषयावर लिहिणे, सांगणे अधिकच कठीण…ते ही तू छान केले आहेस….लेखामध्ये सतीश व आर्या आल्यामुळे भावनापुर्णता ही आली आहे.
    एकूण भट्टी फारच छान जमली आहे असं वाटतं….

    जपान बद्दल आदर होताच, तो अजून वाढला.
    तुझ्याबद्दल आदर होताच, तो अजून वाढला 😊
    Waiting very anxiously for your next one….
    आता तुला लिहावेच लागेल…

Leave a Reply