अपूर्ण – पूर्ण
गावाकडे शेती पण कामासाठी वास्तव्य मात्र पुण्यात असणारा गणेश काही दिवसांपूर्वी भेटायला आला होता. गप्पा चालल्या होत्या. हुरड्याचा विषय निघाला. आगटीत भाजलेला कोवळा लुसलुशीत हुरडा, हुरड्यासोबत खायच्या चटण्या, दही, दही ओरपायला ज्वारीच्या कणसांचेच बनवलेले छोटे छोटे गुच्छ… रंगात येऊन आम्ही बोलत होतो, आठवणी जागवत होतो. अचानक काहीशा धारदार, कडवट स्वरात गणेश म्हणाला… “उषाताई, गेल्या सत्तावीस वर्षांत मी हुरडा खाल्लेला नाही.” आम्ही सगळेच क्षणभर गप्प झालो. हुरडा खाल्लेला नाही हे सांगतानाचे त्याचे डोळे, त्याचा स्वर, त्याचं दुखावलेपण मला एकदम जाणवून गेलं. परवा मर्ढेकरांची ‘कितीतरी दिवसांत’ कविता वाचतांना एकदम मला गणेश आठवला. का
हीतरी हरवलंय, काहीतरी निसटलंय ही खंत बोलून दाखवणारी त्याची नजर आठवली. आठवला त्याचा किंचित धारदार… किंचित कडवट झालेला स्वर. मग वाटलं…बा. सीं.ची ही कविता वरवर वाटते तशी नॉस्टॅल्जिया दाखवणारी कविता नाही. त्या पलीकडे आणखी काहीतरी आहे. जाणवेल न जाणवेलसं… दिसेल न दिसेलसं. काय आहे हे? शहरात आहे तर गावची ओढ. गावी गेलं की शहराची आठवण! इदं न मम हे विसरूनच जातो आपण! नाही ?
गावाकडचं जगणं तसं मुक्तच म्हणायचं. निसर्गाच्या तालाशी ताल जुळवून चालणारं. सूर्य – चंद्राच्या बरोबर चालणारं. माणसाचं सूर्याशी नातं कामकाजाचं; शेतीभातीत राबण्याचं; म्हटलं तर व्यवहाराचं. रात्रीचं चांदणं मात्र माणसाचं अंतरंग. खासगी – वैयक्तिक. मनावर एक वेगळीच भूल घालणारं. चांदणं अंगावर घेत सावकाशीनं मनाची एक एक पायरी उतरत आत जावं. हलक्या हाताने आपणच मनातलं टोचणारं काही बाहेर काढावं. बाहेरची शांतता अलगद अलगद आत सोडावी. पायात मोडलेल्या काट्याला कसं लोणी माखून हळूहळू बाहेर काढतात तसं चांदणं मग लोणी होतं आपल्यासाठी; माउलीची गोधडी होतं. त्या गारव्यात मन बिनघोर होऊ लागतं.
चांदणं अशी ओढ लावतं; तर नदी शीळ घालून जवळ बोलावते. चारी धारांनी जवळ घेते. तिच्या धारेत पाऊल टाकताच अंगावर काटा फुलतो पण दुसऱ्याच क्षणी तिचा उबदार पदर आपल्याला लपेटून घेतो. त्या स्पर्शाने शरीर मग हलकं होतं. मन हलकं होतं. जडत्व जातं. केवळ चेतना उरते. दिवस असेच जात असतात. काळ बदलत असतो. बदलणाऱ्या काळाची जाणीव मात्र आपल्याला होत नाही. आरसपानी मनाला कधीतरी वास्तवाचा धक्का लागतो. मनाची काच फुटते. सांधायला वेळ नसतो. मिळेल त्या एस. टी.ने मग आपण शहरात येतो; कामाला लागतो. वाहनांच्या आवाजाशी नि बिनचेहऱ्याच्या गर्दीशी कदमताल जुळवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवाती-सुरुवातीला दिव्यांच्या झगमगाटात गावचं चांदणं शोधायचा प्रयत्न करतो. यथावकाश रात्रपाळी, दिवसपाळीच्या गणितात सूर्य, चंद्र तळबंद होतात. नदीकाठ दूर जातो. मनाचं अनिर्बंध मुक्तपण चार भिंतींत बंदिस्त होऊ लागतं. कधीतरी सवड काढून गावी जाऊ, नदीत डुंबू, चांदण्यात फिरू म्हणत राहत, घोकत राहतो. हळूहळू ते घोकणंही थांबतं. चार भिंती बऱ्या वाटू लागतात. फुरफुरणाऱ्या नळाच्या आवाजात अंघोळ उरकली जाते. अंघोळीच्या वेळातच काय ते स्तोत्रमंत्र मंत्र उरकले जातात. मन वेगळं सांगत राहतं – पुटपुटत राहतं; पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. रमलो नाही तरी हेच जगणं मग अंगवळणी पडत जातं. त्यातच सुरक्षितही वाटू लागतं.
खूप वर्षांनी एकदा गावी गेलो होतो. रानातच झोपायचं ठरलं. रानातल्या भल्या थोरल्या झाडाखाली अंथरुणं टाकली. छान गारवा सुटला होता. आभाळभर चांदणं सांडलं होतं. झोप येत नव्हती. आनंदाने झोप येत नाहीये असं आधी वाटलं पण हळूहळू लक्षात आलं की आपलं अवकाश इतकं आकुंचित झालेलं आहे की खुल्या आकाशाखाली जीव गुदमरतो आहे. हे मोकळेपण अंगावर येत आहे. मन काहीसं घाबरलं आहे. माझं मलाच नवल वाटत राहिलं की हे काय आहे? जेव्हा आकुंचित जगात असते तेव्हा खंतावते की मोकळं आकाश कधी भेटेल आणि हात पसरून असं निरामय मोकळं आभाळ भेटायला येतं तेव्हा त्याचं धड स्वागतही करता येत नाही. एके काळी जे जिवापाड होतं ते आता दूरस्थ झालेलं आहे. हे काय आहे? नेमकं काय हवं असतं माणसाला? आत्ता हे आहे समोर तर ते हवं असतं. ते मिळालं की हे असतं तर किती छान झालं असतं ही उलघाल. हे द्वंद्व मर्ढेकरांना सांगायचं आहे का? की कशाची ना कशाची जीवनव्यापी खंत तडजोडीच्या पांघरुणाखाली दडवणं म्हणजेच खरं जगणं ही आधुनिक जगाने दिलेली माणसाला दिलेली शिकवण आहे हे सांगायचं आहे? की आयुष्य हा केवळ एक प्रवास नाही तर एक शोधयात्रा आहे? खरं सांगायचं तर स्वतः मर्ढेकरांचे जीवनही शोधयात्रेपेक्षा वेगळं नव्हतंच.
बा. सी. मर्ढेकर… लहानपण खानदेशातील एका खेड्यात गेलेले. निसर्गाशी जवळीक तिथलीच. पण पुढे फर्ग्युसन कॉलेज पुणे, मग मुंबई, नंतर विदेशगमन… अशी भटकंती. दोन महायुद्धे पाहिलेले, झपाट्याने यंत्रयुगाकडे जाणाऱ्या आणि त्यामुळे आमूलाग्र बदलणाऱ्या जगाचे साक्षीदार. बदलाच्या या प्रभावातून मराठी कवितेला आधुनिक वळण देणारे, नव्या जाणिवांची, नव्या प्रतिमांची वाचकांना ओळख करून देणारे मराठी, इंग्रजी, संस्कृत भाषांवर प्रभुत्व असणारे एक विलक्षण प्रतिभावान कवी अशी त्यांची मराठी साहित्यक्षेत्रात दृढमूल झालेली ओळख.
किती तरी दिवसांत
किती तरी दिवसांत
नाही चांदण्यांत गेलों;
किती तरी दिवसांत
नाही नदींत डुंबलों.
खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच;
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच.
केव्हा तरी चांदण्यांत
पुन्हा जाईन निर्भय;
गावाकाठच्या नदींत
होईन मी जलमय.
आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी;
आणि नदीचा प्रवाह
अंगावर कांटा काढी.
बरा म्हणून हा इथे
दिवा पारवा पाऱ्याचा;
बरी तोतऱ्या नळाची
शिरीं धार, मुखी ऋचा.
उषा कुर्डुकर

मस्त लिहीलंय!