अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.
ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :
हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिकतंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली. तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणापासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून)
काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल.
एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल.
जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननम् ’ या नावाने केले आहे. हे भाषांतर या अंकापासून क्रमशः देत आहोत – संपादक
पुनरपि जननम्
भाग १
पंख फुटताना
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही…
“अं… पपा… मला पपा पाहिजे…” तिला जागं करण्याच्या आईच्या नेहमीच्या गाण्याकडे दुर्लक्ष करून आरुषीने हट्टी सूर काढला. कुशीवर वळून तिने एकदा आईकडे पाहिले आणि “पपा पाहिजे” म्हणून हट्ट करण्यासाठी पुन्हा रडवेला चेहरा केला.
“ते बघ बिट्टू! चिमण्या केव्हाच्या बागेत गोळा झाल्यात. तुला बोलवताहेत. त्यांच्याबरोबर खेळायचं ना तुला? चल, जाऊ या आपण.”
पिटुकल्या आरुषीला हे आवडलं. “मला घे!”
आईने प्रेमाने त्या लाडोबला उचलून जवळ घेतले आणि ती झोपायच्या खोलीतून बाहेर आली. पपाने आधीच रात्रीच्या सघन भिंतींचं पारदर्शक भिंतींमध्ये रूपांतर केलं होतं आणि त्या काचांमधून सर्व बाजूंनी ऊन्ह आत आलं होतं. काचेतून पलीकडची हिरवळ आणि सुंदर झुडुपं दिसत होती. कुंपणावर फुलं तरारली होती आणि एका कडेने एक नितळ पाण्याचा झरा खळाळत होता. त्याच्या पलीकडे शेजारच्या टुमदार घराच्या भिंती दिसत होत्या. दुसर्या बाजूला झाडांचे बेट होते आणि त्यावर खरोखरच पक्ष्यांचा चिवचिवाट चालला होता.
आईच्या कडेवरून उतरून आरुषी पपाकडे धावत गेली. तो आपल्या संपर्कयंत्रात गढून गेला होता.
“पपा, चल, आपण बाहेर जाऊन खेळू या. मला उडत बागेवरून फेरी मारून आण, चल ना!” पपाच्या मांडीवर चढत आरुषीने मागणी केली.
“नंतर बेटा! आधी तयार हो आणि बाहेर उन्हात जाण्यापूर्वी आधी उषःपान करायचं,” आईने आठवण करून दिली.
“मला आत्ताच बाहेर जायचंय. मला पपाच्या पाठीवर बसून उडायचंय.”
“हो! आज आपण उडायचा सराव करू या. शाळा सुरू होण्यापूर्वी तुला नीट उडता यायला हवं,” आई आरुषीला कडेवर घेत न्हाणीघराच्या दिशेने जात म्हणाली.
अंघोळ घालून तिच्या मोत्याच्या कांतीच्या अंगावर तिने मऊसूत शुभ्र पोशाख चढवला. तिचे तांबूस सोनेरी केस विंचरून पोनीटेल बांधले. तीन वर्षांच्या आपल्या अवखळ आणि चाणाक्ष लेकीकडे आईने कौतुकाने पाहिले, प्रेमाने तिच्या कपाळाचा हलकेच पापा घेतला आणि ती स्वतः तयार व्हायला गेली. अर्ध्या तासाने सुस्नात होऊन ती बाहेर आली आणि आपल्या पंखांवरून आणि सोनेरी केसांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब तिने टिपून घेतले. तिचा मंद सोनेरी चेहरा समाधानाने झळकत होता. आपल्या शुभ्र पायघोळ झग्याची टोके खोचून ती लगबगीने प्राशनाच्या टेबलाजवळ आली.
पपाने टेबलावर आधीच ग्लास मांडून ठेवले होते. ताज्या फळांच्या रसापासून बनवलेल्या चवदार पेयाचा कुंभ तो प्राशन कक्षातून घेऊन आला. उषःपान करण्यासाठी ते तिघेही टेबलाभोवती बसले. आई आणि पपाला हात जोडून चित्त एकाग्र करताना आरुषीने डोळे किलकिले करून पाहिलं. आईने शिकवल्याप्रमाणे तिनेही प्रार्थना करण्याचा मनोमन प्रयत्न केला.
“हे ब्रह्मन! मला नवीन गोष्टी शिकण्यास मदत कर. मला प्रतिभा दे. मला सद्गुणी मानव कर.” तिने पुन्हा डोळे किलकिले करून आई आणि पपांचे प्रसन्न चेहरे पाहिले आणि पुन्हा डोळे मिटून ती आपल्या नव्या खेळण्यांचा विचार करू लागली.
आईने मग तिच्या ग्लासात पेय ओतले आणि स्वतःचा आणि पपाचा मोठा ग्लास त्या पेयाने भरला. पुढची पंधरा मिनिटं ते तिघेही मनसोक्त पेय प्याले. त्या पेयाने दिवसभर त्यांची तहान भागणार होती. स्वर्गाच्या गोल फिरण्याने जेव्हा रवीचे किरण लपून जातील आणि एडनच्या सुंदर भूमीवर रात्र अवतरेल तेव्हा संध्यापान करण्याची वेळ होईल.
———————————————————————————————————-
सह्याद्रीच्या उत्तरेकडील पहिल्या कड्यांच्या रांगेवर वारा वादळ होऊन आदळला. अडथळा आल्यामुळे चिडून तो उजवीकडे वळला, कड्याला समांतर वर उसळला आणि आता उजाड झालेल्या त्या पर्वताच्या दर्याखोर्यांतून घुमू लागला. सह्याद्रीच्या शेवटच्या निलगिरी रांगेपर्यंत पोचेतो वारा शंभर नखांत विभागाला गेला. अरुंद होत जाणार्या भूपटलावर ओरखडे ओढत त्याने गडगडत जाऊन हिंद महासागरात उडी घेतली. त्या मार्याने महासागराचे शिशासारखे जड पाणी घुसळले गेले आणि पाणी आणि वाफेचे एक उंच कारंजे त्यातून वर उसळले. समुद्राने अनिच्छेने कण्हत एक जड उसासा टाकला आणि तो पुन्हा स्थिर झाला. दूर सायबेरियाच्या बर्फाच्छादित माळावर वार्याची आणखी एक लाट तयार होऊ लागली. अटलांटिक महासमुद्रावरून येणार्या उष्ण वार्याला गिळून ती वार्याची लाट ओसाड जमिनीवरून घोंघावत पुढे जाऊ लागली.
“आई, माझा हात धर; मला उडायचंय,” आरुषी म्हणाली.
“थांब बेटा! आधी आपल्याला उन्ह खायचंय,” आईने उत्तर दिले.
“मला नाही उन्ह खायचं. मला उडायचंय,” जमिनीवर पाय आपटत आरुषी हट्ट करू लागली.
——————————————————————————————————
“मग तुला उडायला शक्ती कशी येणार? अंगात ताकद नसेल तर तू पंख कसे फडफडवणार?”
“माझ्यात खूप ताकद आहे आई, बघ…” असं म्हणत आरुषीने आपले सुंदर छोटे पंख पसरले आणि प्राशनाच्या छोट्या टेबलाभोवती ती पंख फडफडवत पळू लागली.
“बरं बरं! आधी करायच्या गोष्टी आधी,” असं म्हणत आईने तिला उचलून घेतले आणि ती घराच्या बाहेर पसरलेल्या हिरव्यागार हिरवळीवर आली. पपा आधीच तिथे पोचला होता आणि त्याने आपले डौलदार पंख पसरले होते. आई त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि तिने रवीच्या दिशेने आपले पंख नजाकतीने पसरले. आरुषीने पण एके ठिकाणी शांत बसून आपले छोटे पंख रवीच्या तेजाच्या दिशेने पसरावेत म्हणून तिने प्रयत्न केला; पण आरुषी फारच अवखळ होती. आपले पंख फडफडवत आणि हात झटकत ती बागेत पळत राहिली.
शेजारच्या घराच्या बागेत आपले पंख पसरून उन्ह खाणार्या शेजार्यांना पाहून आईने हात हलवला; किंबहुना त्या सुंदर सकाळी एडन गावात ठायी ठायी हेच दृश्य दिसत होते. अनेक कुटुंबं आपापल्या घरासमोर गुडघे टेकून आणि आपले जांभळे पंख रवीच्या दिशेने पसरून बसली होती. त्या तेजोमय तार्याचा प्रकाश त्यांच्या पंखांतील रंगतत्त्व शोषून घेत होते आणि त्यांच्या चपळ शरीरांना आणि उन्नत मनांना ऊर्जा देणार्या शक्तीमध्ये त्याचे रूपांतर करत होते. हिरवळीच्या तुकड्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांची तेजस्वी सोनेरी शरीरे उठून दिसत होती आणि मोत्याच्या कांतिसमान शरीरे असलेली मुलं त्यांचे छोटे पंख फडकावीत हुंदडत होती.
दिवस जसजसा पुढे सरकू लागला, तसे एखाद्या कामासाठी सार्वजनिक इमारतीत जाण्यासाठी मोठे लोक मधून मधून आकाशात भरार्या घेऊ लागले. गावाच्या बाहेर लहान-मोठ्या वेगवान झिपर गाड्या प्रवाशांना परगावाला घेऊन जाताना दिसू लागल्या.
आरुषीचे आई-पपा हिरवळीच्या दोन टोकांना उभे राहिले आणि आरुषीला मधल्या जागेत उडायचा सराव करण्यास मदत करू लागले. थोड्याच वेळात आरुषीला जमिनीपासून थोडे वर उडता येऊ लागले. तिने आईचा हात सोडला आणि वर भरारी मारली. त्या दिवशी पहिल्यांदाच तिला आपली पिटुकली पावले जमिनीपासून वर उचलता आली आणि आकाशात पहिली छोटी भरारी मारता आली. आयुष्यभर लक्षात राहील अशी ती सुंदर सकाळ… त्या दिवशी केवळ तिचे शरीरच नाही तर मन देखील उंच भरारी घ्यायला शिकले. आता आकाशालाही गवसणी घालणे तिला शक्य होणार होते.
——————————————————————————————————-
काईजा ट्यूनन खुर्चीवरून उठला आणि त्याने एक आळस दिला. खिडकीबाहेर लक्ष जाताच त्याला जाणवले की आपण बराच वेळ टेबलाशी काम करत बसलो आहोत. दिवस मावळून अंधार पडू लागला होता आणि संध्याकाळी उशिरापर्यंत भरार्या मारणारेही कोणी आता आकाशात दिसत नव्हते. काहीतरी प्यायला हवे, काईजाला वाटले. अनेक प्रकारचे रुपेरी पडदे आणि आकडेमोड करणारी यंत्रे यांच्या पसार्याने भरलेल्या आपल्या खोलीतून तो बाहेर पडला आणि बाहेरच्या शांत पडवीतून चालू लागला.
या प्रचंड प्रयोगशाळेत एकटेच असल्याची ही काही त्याची पहिली वेळ नव्हती. घरातील आपल्या टेबलापाशी बसून काम करण्यापेक्षा त्याला इथेच काम करायला आवडायचे. इथली अद्ययावत यंत्रे, शक्तीचा मागोवा घेणारी प्रचंड डायल्स, क्वांटम प्रयोगशाळेतील स्वयंचलित वेधयंत्रे यांमुळे त्याची प्रतिभा इथे अधिक जागृत व्हायची. आपल्या या ग्रॅव्हिटॉन प्रयोगशाळेतील टेबलापाशी तो तासन्तास काम करीत बसे; किंवा आकाशगंगेच्या मध्यावर असलेल्या अतिविशाल कृष्णविवराकडे रोखून बसवलेल्या वार्प डिटेक्टरवरून येणार्या माहितीचा अभ्यास करत बसे. त्या कृष्णविवराच्या आत काय घडामोडी चालतात याचा एक दिवस तो नक्की शोध लावणार होता. त्याने अगोदरच काही अंदाज बांधले होते. काईजा कॉफीच्या यंत्रापाशी आला आणि त्याने ते सुरू केले. कॉफीच्या उत्तेजक वासाने त्याच्या चेहर्यावर स्मित उमलले. त्याने ताज्या कॉफीचा वाफाळलेला मग हातात घेतला आणि आकडेमोडीच्या आणखी एका लांबलचक सत्रासाठी तो सिद्ध झाला.
“मला माझं दप्तर घ्यायचंय… मला माझं दप्तर घ्यायचंय… माझ्या पाठीवर पट्ट्याने बांध ते,”आरुषी म्हणाली. शाळेच्या पहिल्या दिवसासाठी आई तिची तयारी करून देत होती. दप्तरात आरुषीचे जादाचे कपडे आणि तिची सर्व माहिती भरलेली एक इलेक्ट्रॉनिक रिबन होती. शाळा म्हणजे एका ‘शिक्षिकेच्या’ देखरेखीखाली समवयस्क मुलांबरोबर आठवड्यातून दोनदा दोन तास खेळण्यासाठी एक निमित्त होतं; पण आरुषी कमालीची उत्सुक होती. पहिल्यांदाच ती आई-पपांच्या सोबतीशिवाय एकटीने बाहेर जाणार होती. तिच्या स्वतंत्र आयुष्याची ही अगदी छोटीशी सुरुवात होती. ज्ञानाच्या नवीन कक्षा स्वतंत्रपणे धुंडाळण्यास अजून बराच अवकाश होता; पण हीच सुरुवात होती.
पूर्वी जेव्हा मानव पृथ्वीवर राहत होते तेव्हा सर्वच मुलांवर हा शाळेचा संस्कार होत असे.
एक हजार वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक काळात मुलं शाळेत शिकायला जायची. तेव्हा ठरावीक पद्धतीनेच ज्ञान दिलं जायचं आणि सगळ्या मुलांसाठी एकच अभ्यासक्रम असायचा; पण त्या काळच्या शिक्षणपद्धतीचा सर्वात चमत्कारिक भाग म्हणजे परीक्षा. मुलांनी किती ज्ञान संपादन केलं आहे हे तपासण्यासाठी त्यांची परीक्षा घेतली जायची. आरुषीच्या आईला इतिहासाची आवड असली तरी तिला प्रश्न पडे की शिकू न शकणारी आणि परीक्षेत नापास होणारी मुलं असूच कशी शकतात? तिने असंही ऐकलं होतं की त्या काळी मुलांसाठी व्यक्तिगत शिकवण्याची व्यवस्था नसे आणि पालक मुलांना ‘शिक्षकांकडून’ शिकण्यासाठी शाळेत पाठवत. नशीब, तिच्या स्वतःच्या मुलीला ‘शिकवण्यासाठी’ तिच्याजवळ अनेक वेगवेगळ्या पद्धती आणि साधने होती; शिवाय बहुतेक सगळं ज्ञान आरुषी स्वतःच संपादन करेल.
आरुषीला आपल्या मिठीत घट्ट धरून आईने निळ्या आकाशात भरारी मारली. दिवसेंदिवस आरुषी मोठी होते आहे आणि आता तिला असं मिठीत घेऊन उडणं कठीण होत आहे याची तिला जाणीव झाली. पपासारखं आरुषीला पाठीवर घेऊन उडणं तिला जमायचं नाही. आरुषीला आता स्वतंत्रपणे उडण्याचा सराव करावाच लागेल.
घरापासून दोन फर्लांग अंतरावर असणाऱ्या शाळेच्या जवळ त्या पोचल्या तेव्हा आरुषीचा उत्साह उतू चालला होता. “तिथे मला खेळायला खूप खूप खेळणी मिळतील का,” तिने आईला विचारलं. घरात खंडीभर खेळणी असूनही तिला नवीन खेळण्यांचं आकर्षण होतंच.
“होय बिट्टू! नुसती खेळणीच नव्हे; तर तिथे खेळाचं मैदानही असेल आणि घसरगुंड्या, झोके आणि मेरी गो राऊंडसुद्धा. तुला सगळं नक्कीच आवडेल आणि उडायचा सराव करायला विसरू नको.’
“मी पडले तर? तू माझा हात धर.”
“तू टीचरला सांग हात धरायला. बघ, तुझ्याएवढी मुलं शाळेच्या मैदानावर आतापासूनच उडत आहेत. जा त्यांच्याबरोबर खेळायला.”
“नाही! तू पण माझ्याबरोबर ये आणि माझा हात धर”, आरुषीने हट्ट केला.
“बरं. फक्त आज मी तुझ्याबरोबर येईन; पण तुला आपलं आपण खेळायला शिकलं पाहिजे. उद्या नाही मी थांबू शकणार; पण शाळा सुटल्यावर तुला घरी घेऊन जायला येईन हं मी.”
आरुषीची आई भौतिकशास्त्रातील शास्त्रज्ञ होती – फिजिसिस्ट. एडन शहरातील प्रचंड EARTH (Emission and Radiation Technology for Health) प्रयोगशाळेत ती काम करायची; पण तिची खरी आवड खगोलशास्त्र आणि इतिहास ही होती. मानवाच्या जुन्या ग्रहाविषयी – पृथ्वीविषयी आणि मानवी इतिहासाविषयी तिला कुतूहल होतं. त्यांच्या घराच्या गच्चीवर बसवलेल्या मोठ्या दुर्बिणीतून ती अनेकदा अजूनही तेजस्वी दिसणार्या सूर्य तार्याकडे पहायची. त्या तार्याच्या जवळ कुठेतरी, दूरवरच्या थंड रिकाम्या अंतराळात एक छोटा, ओसाड गंजलेला ग्रह फिरत होता. एके काळचे सर्व मानवजातीचे घर!
जेव्हा तो ग्रह एक हिरवा निळा, विशाल महासगरांनी वेढलेला ग्रह होता, त्या आता विस्मरणात गेलेल्या फार पूर्वीच्या काळाची कल्पना करायला तिला आवडायचं. त्या ग्रहाच्या जमिनीवर तेव्हा चित्र-विचित्र प्राण्यांची आणि वनस्पतींची दाटी होती आणि मग एके काळी तिथे मानवांच्या संख्येचा स्फोट झाला… नैसर्गिक वातावरणाचा नाश झाला… आणि जीवनाला पोषक अशा हवामानाचा विनाश झाला आणि मग नैसर्गिक संपत्तीसाठी झालेले अखेरचे युद्ध. मानवांचे फोटोसिंथेसिसद्वारे ऊर्जा ग्रहण करणार्या प्राण्यांमध्ये रूपांतर होण्याच्या पूर्वीची घटना होती ती… मानवाचे पंख असलेल्या जीवात रूपांतर होण्यापूर्वीची. इतर प्राण्यांप्रमाणेच तेव्हा मानवालाही ऊर्जा मिळवण्यासाठी अन्न खावं लागायचं. तेव्हा शिजवलेल्या वनस्पती आणि प्राणी हेच ऊर्जेचे स्रोत होते – तार्याचा प्रकाश नव्हे. आतासारखं शरीरातील आर्द्रता टिकवण्यासाठी द्रवपदार्थ प्राशन करून त्यातून चवीचा अनुभव मिळण्याऐवजी जेव्हा तो अनुभव घन स्वरूपातील अन्नापासून येत असेल तेव्हा कसं वाटत असेल याची कल्पना करायचा आरुषीच्या आईने प्रयत्न करून पाहिला.
तेव्हा अन्नासाठी शेती करावी लागे आणि प्राणी पाळावे लागत… त्यामुळेच पुढे पाण्याचा अभाव निर्माण झाला. घन स्वरूपातील अन्न खाण्याचा एक अपरिहार्य परिणाम होता घन स्वरूपातील विष्ठा! त्याची नीट विल्हेवाट न लावल्यामुळे प्रदूषण निर्माण होई. शेवटी एक काळ असा आला की नैसर्गिक संपत्ती संपुष्टात आली, लोकसंख्या खूप वाढली आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यास तेव्हाची भ्रष्ट संस्कृती असमर्थ ठरली. आरुषीच्या आईला वाटले की माणूस खर्या अर्थाने तेव्हा जगतच नव्हता. कसेबसे तग धरून राहण्यातच तेव्हा माणसाचे आयुष्य संपून जाई.
त्या अतिप्राचीन काळाबद्दल वाटणार्या उत्सुकतेमुळेच आरुषीच्या पपाबरोबर तिची मैत्री झाली होती. तो एक कॉम्प्युटेशनिस्ट होता; पण त्याने अनेक वर्षं इतिहासाचा अभ्यास केला होता. तो आकाशगंगा संशोधन केंद्रात नोकरीला होता. क्षीरसागर आकाशगंगेच्या निरीक्षणातून उत्पन्न होणारी प्रचंड माहिती या केंद्रात गोळा केली जाई. या माहितीचे आकलन करून घेण्यासाठी मानवाने निर्माण केलेली क्षमता पाहून आरुषीच्या पपाला समाधान वाटत असे. निरीक्षण कक्षेच्या आत असलेल्या सगळ्या आकाशगंगांचा अभ्यास करणं आता शक्य झालं होतं. आकाशगंगा संशोधन केंद्राने गोळा केलेल्या माहितीचा अभ्यास करून शास्त्रज्ञ या विश्वातील रहस्यांचा नित्य उलगडा करत असत. खरंतर अनेक शतकांपूर्वी – म्हणजे मानवाने जेव्हा पृथ्वीशेजारच्या मंगळ ग्रहावर पहिल्यांदा वस्ती केली तेव्हाच – या संशोधन केंद्राची स्थापना झाली होती. या केंद्राला महान आणि कीर्तिमान इतिहास होता. मानवाचे अस्तित्वच बदलून टाकणारे अनेक शास्त्रज्ञ या केंद्रात तयार झाले होते.
खर्या ज्ञानाचे स्फुल्लिंग मंगळाच्या जमिनीखाली असलेल्या प्रयोगशाळांमध्येच कुठेतरी प्रगट झाले होते. जुन्या सूर्यमालेत पृथ्वीच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी वस्ती झाली होती; तरी मंगळावरील आकाशगंगा संशोधन केंद्रातच खर्या ज्ञानाची क्रांती घडून आली होती. अखेरचे युद्ध आणि भ्रष्ट संस्कृतीला कंटाळून पृथ्वीवरील शास्त्रज्ञ आणि प्रयोगशील मानवांनी चंद्र, मंगळ, आणि जुन्या सूर्यमालेतील इतर उपग्रह किंवा उल्का यांच्यावर वस्ती केली होती. मंगळ आणि युरोपा यांच्यावरील वस्ती हळूहळू स्थिरावली पण चंद्र आणि टाइटनवरील वसाहती सोडून देण्यात आल्या.
पृथ्वीवरील माणसं जेव्हा उरल्यासुरल्या नैसर्गिक संपत्तीसाठी चाललेल्या भीषण युद्धात गुंतली होती तेव्हा मंगळ आणि युरोपावरच्या वसाहतीतले लोक एका ध्येयाने प्रेरित झाले होते. तिथल्या कठीण परिस्थितीत खडतर आयुष्य जगतानादेखील हे धाडसी लोक माणुसकी जपण्यासाठी धडपडत होते. त्यांनी साहित्य आणि कलेचे उत्कृष्ट नमुने तर जतन केलेच; शिवाय जीव आणि विश्व यांच्याशी निगडित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी मूलभूत संशोधनदेखील केले.
अनेक शतकांनी त्यातूनच खर्या ज्ञानाची प्राप्ती झाली आणि माणसाची एका अधिक दयार्द्र आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या प्राण्यात उन्नती झाली. अनेक शतके जनुकांवर प्रयोग करून (genetic engineering) माणसाने स्वतःचे एका सौर ऊर्जा ग्रहण करणार्या प्राण्यात (photosynthetic being) रूपांतर करून घेतले आणि अन्नाची गरज कायमची मिटवून टाकली. अन्न पिकवण्यात आणि शिजवण्यात घालवायला लागणारा वेळ आणि ऊर्जा वाचल्यामुळे अधिक मूलभूत संशोधन करण्यासाठी माणूस मुक्त झाला. स्वतःच्या शरीरावर पंख उगवण्यात मानवजात यशस्वी झाली आणि भोवतालच्या गुरुत्वाकर्षणातून माणूस मुक्त झाला. प्रवास करण्यासाठी त्याने अनेक नव्या साधनांचा शोध लावला आणि तो सूर्यमालिका भेदून अंतराळात प्रवास करू लागला. थोडक्यात म्हणजे, माणूस त्याच्या भोवतालापासून मुक्त झाला. आता त्याच्यासमोर नवी क्षितिजे आणि नवी आव्हाने होती.
“बघ पपा, आता मी तुझा हात सोडून आपली आपण उडू शकते,” आपल्या बागेतून शेजार्यांच्या बागेत झेपावत आरुषी मजेत ओरडून म्हणाली.
“आरुषी, मागे फिर. आपल्या बागेच्या बाहेर जाऊ नको,” पपा तिला वरवर रागाने म्हणाला; पण त्याचा आनंद त्याच्या स्वरातून छोट्या आरुषीला समजलाच.
‘पालक करार’ केलेल्या बहुतेक जोडप्यांप्रमाणेच आरुषीचे आई आणि पपादेखील त्यांचा बहुतेक रिकामा वेळ आरुषीच्या सोबत घालवत. अनेकदा ते रविअस्त बघायला टेकडी चढून जात. टेकडीच्या पायथ्याशी ते आपली झिपर गाडी उभी करत आणि उडत टेकडीच्या माथ्यावर पोचत. वार्याच्या मंद झुळुकांचा आनंद घेत ते तिथे हिरवळीवर बसत. तिथून दूरवर पसरलेली हिरवी कुरणं आणि फुलांचे ताटवे दिसत. हळूहळू रवीचे बिंब केशरी दिसू लागे आणि दूरवरच्या क्षितिजाच्या खांद्यावर ते आपले डोके टेकीत असल्याचा भास होई. आकाशात शेकडो रंगांची उधळण होई – सोनेरी, केशरी आणि तांबड्या छटा एकमेकांत मिसळून जात.
आरुषीला टेकडीवर जायला खूप आवडायचे. विशेषतः आता तिला आपले आपण टेकडीच्या वरपर्यंत उडत जाता येत होते. आरुषी चाणाक्ष होती. स्पंज जसा पाणी शोषून घेतो तशी ती नवनव्या गोष्टी शिकत होती. घरातली तिची शाळेची खोली तर मस्त मजेदार होती. तिच्या वयाला सुसंगत असणारे सगळे व्हिडिओ आणि संगीत तिथे होते. ती जेव्हा या खोलीत प्रवेश करी तेव्हा खोलीच्या एका भिंतीचं रुपेरी पडद्यात रूपांतर होई आणि बोटांच्या स्पर्शाने किंवा आवाजाच्या निर्देशानुसार तिच्या संग्रहातील कोणताही व्हिडिओ किंवा संगीत तिला चालू करता येत असे. खोलीत दिवे आपोआप योग्य तो प्रकाश निर्माण करत आणि खोलीचे तापमान सुखावह होई. मुळातच हुषार असल्याने, आरुषीला या खोलीत कधी एकटीने तर कधी आई-पपांसोबत तासन्तास घालवायला आवडे आणि एकीकडे स्वतःची करमणूक करून घेत असतानाच ती शिकतही असे. कधीकधी तिच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत, कितीतरी अधिक.
कोणे एके काळी
“बघ आरुषी, तो तारा दिसतो का तुला? तो छोटासा, अगदी कडेला आहे बघ… तो सूर्य आहे. आपण सगळे तिथूनच आलो. सगळे मानव त्या तार्याच्या भोवती फिरणार्या एका ग्रहावर राहायचे.”
आरुषी आईच्या मांडीवर बसून त्यांच्या गच्चीत चांदण्यांनी खच्चून भरलेल्या आकाशाकडे तोंड करून बसवलेल्या दुर्बिणीतून पहात होती.
“सगळे मानव? तू आणि पपा, आणि मी पण?”
“नाही, आपण नाही. आपले पूर्वज. अनेक शतकांपूर्वी त्यांनी पृथ्वी सोडली; मग ते सूर्याभोवती फिरणार्या दुसर्या ग्रहावर स्थायिक झाले. त्या ग्रहाचं नाव मंगळ; पण मंगळावरचं वातावरण वाईट होतं. तिथे हवा आणि पाणी नव्हतं, म्हणून त्यांनी त्यांची घरं जमिनीखाली बांधली होती आणि मग ते इथे स्वर्गावर आले.”
“स्वर्ग! हो, मला माहिती आहे. स्वर्ग रवीभोवती – आपल्या तार्याभोवती – प्रदक्षिणा घालतो.”
“बरोबर. रवीभोवती फिरणार्या सात ग्रहांपैकी एक.”
“पण ते स्वर्गावर का आले?”
“कारण हा ग्रह मनुष्यांना राहण्यासाठी अगदी योग्य आहे. इथे भरपूर ऊन्ह आहे आणि इथलं तापमान अगदी बेताचं आहे; पण मुख्य म्हणजे इथलं वातावरण आपल्यासाठी अगदी योग्य आहे. इथे श्वास घ्यायला प्राणवायू आहे आणि प्यायला पाणी आहे.”
“पण त्यांना स्वर्ग सापडला कसा?”
“त्यांनी दुर्बिणीतून शोध घेतला. या दुर्बिणीपेक्षा खूप मोठ्या, आकाशात फिरणार्या दुर्बिणींतून. एखाद्या योग्य अशा तार्याचा आधी शोध घेतला आणि त्यांना रवी सापडला आणि मग त्यांचं नशीब जोरावर, म्हणून त्यांना स्वर्गासारखा ग्रह सापडला. माणसांना राहण्यासाठी अगदी योग्य प्रकारचा ग्रह होता हा. या गोष्टीलापण पाचशे वर्षं होऊन गेली. मग इथे पहिल्यांदा जे लोक राहायला आले त्यांनी इंजिनीअरिंगचं शास्त्र वापरून हा सुंदर ग्रह वसाहतीसाठी बांधून घेतला. त्यांनी झाडं लावली, फुलं आणि हिरवळीची कुरणं वाढवली आणि घरं, बाजार आणि प्रयोगशाळा बांधल्या. मग त्यांची पुढची पिढी जन्माला आली आणि ती मुलं त्यांच्यापेक्षा आणखी बुद्धिमान निपजली. मग त्यांनी आणखी बांधकाम केलं, नवीन शोध लावले आणि त्यांना जी मुलं झाली ती शास्त्रज्ञ झाली, संगीतकार झाली, चित्रकार, लेखक आणि विचारवंत झाली.”
“मला पृथ्वीबद्दल सांग. पृथ्वीवर असताना माणसं कशी राहत होती?”
“माणसं तेव्हा फार वेगळी होती. त्यांना पंख नव्हते आणि त्यांची त्वचा वेगवेगळ्या रंगांची होती.”
ही आरुषीची आवडती गोष्ट. मायलेकी तासन्तास या विषयावर बोलायच्या. “अनेक शतकांपूर्वी” म्हणजे ‘किती पूर्वी?’ असा आरुषीला प्रश्न पडायचा. पृथ्वीवर असताना माणसांचं जगणं कसं असेल याची कल्पना करायला आरुषीला आवडायचं. पंख नाहीत म्हणजे कसं वाटत असेल! सगळीकडे चालत जायचं आणि आई सांगते ते लोक दूरचा प्रवास हळू चालणार्या ‘गाड्यां’मधून करायचे. झिपर गाड्या नव्हत्या तेव्हा आणि त्यांची विमानं पण आकाशातून सावकाश प्रवास करायची. एका शहरातून दुसर्या शहरात जायला अनेक तास लागायचे.
पण सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे ऊर्जा मिळवण्यासाठी त्यांना ‘अन्न खाणं’ का काय करावं लागायचं! आई सांगते की त्या फार फार पूर्वीच्या काळी लोक झाडं आणि प्राणी शिजवून खायचे. शी! कसं लागत असेल ते! झाडाचा पाला तोंडात घालण्याची कल्पनादेखील तिला करवली नाही; पण आई म्हणते ते अन्न चवदार लागायचं – आपल्या पेयांसारखं – आणि लोकांना खायला आवडायचं आणि काही लोक तर इतके खायचे की ते ढब्बू व्हायचे! म्हणजे तिला असं म्हणायचं असतं की त्यांचा आकार मोठा व्हायचा आणि काही लोकांना खायला पुरेसं मिळायचं नाही; मग ते उपाशी राहायचे आणि आजारी पडायचे. कितीही हुशार असली तरी त्या काळी ‘ढब्बू’ आणि ‘आजारी’ म्हणजे काय असायचं याची कल्पना करणं आरुषीला जड जायचं.
स्वर्गसुख
आरुषी आई-पपांबरोबर एका मोठ्या बागेत एक संगीताचा कार्यक्रम ऐकायला जाणार होती. सहा वर्षांच्या वयातच तिला संगीताची आवड निर्माण झाली होती. ते पोचले तेव्हा बागेत बरीच गर्दी झाली होती. एडन गावातले बहुतेक सगळेच तिथे गाणं ऐकायला आले होते. आयुष्यात समाधान मिळवण्याचा त्यांच्या दृष्टीने हा एक उत्तम मार्ग होता. सर्जनाचा आनंद मिळवण्याचं आणि आपल्या जाणिवेचं क्षेत्र विस्तारण्याचं साधन होतं. मानवी जीवनाचं हेच तर खरं प्रयोजन होतं!
सर्जनाचा मार्ग अवलंबला नसता तर मनुष्यप्राणी कोणत्या मार्गाला लागला असता याचा आरुषीची आई नेहमी विचार करी. तिला माहिती होतं की एक काळ असा होता जेव्हा काही मोजकेच लोक कला, संगीत आणि साहित्याच्या क्षेत्रात गुंतलेले असत आणि व्यापार करून पैसा मिळवणारे लोक त्यांना कमी लेखत. अर्थात तो चंगळवादाचा काळ होता. प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजा भागविल्या जातील आणि प्रत्येकाला काही ना काही कला जोपासण्याची संधी मिळेल असा समाज निर्माण होण्यापूर्वीचा काळ. मुबलक प्रमाणात जीवनोपयोगी साधने जवळ बाळगणारे मोजके लोक आणि फार मोठा वंचित समाज यांच्यात त्या काळी मोठी तफावत होती. जेव्हा सक्तीचा साम्यवाद, आदर्शवादी समाजवाद आणि संधीसाधू भांडवलशाही अयशस्वी ठरले… त्यांच्याद्वारे संपत्ती जमवलेल्या अल्पसंख्याकांवर जेव्हा वंचित समाजाने हल्ला केला – तो काळ. माणूस जबाबदारीने वागण्यास शिकला त्यापूर्वी… बुद्धिप्रामाण्यवादी होऊन माणूस जनावरांच्या स्तरापेक्षा उन्नत झाला त्यापूर्वी… जीवनाची कला अवगत होऊन, स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणार्या धडपडीची उपजत प्रेरणा त्याच्या जनुकांमधून आणि समाजमनातून नाहीशी होऊन त्याच्या जाणिवेचं क्षेत्र रुंदावलं त्यापूर्वी…
आणि नंतर असा एक काळ आला की मूलभूत गरजा भागविण्याच्या सक्तीतून सुटका झाल्याने माणसाला बौद्धिक आणि कलात्मक कार्यासाठी अधिक वेळ मिळू लागला. पूर्वी कधी नव्हती इतकी त्याची सर्जनात्मक क्षमता त्यामुळे जागृत झाली आणि मानवजातीने सर्जनाचा परमोच्च स्तर गाठला. त्यानंतर मानवाची चेतना अधिक विस्तृत झाली. प्रत्येक व्यक्तीची चेतना ही केवळ ज्ञानेंद्रियांमधून प्राप्त होणार्या संवेदांनांतून तयार होणारा सत्याचा आभास न राहता वैश्विक एकात्मतेच्या अनुभूतीतून तयार होऊ लागली. ही अनुभूती शारीर जाणिवेच्या पलीकडे जाणारा आनंद देऊ लागली.
आरुषीने ही सर्जनात्मक परंपरा आत्मसात करावी आणि तिने सर्जनात्मक क्रांतीत यश मिळवावं असं तिच्या आईचं स्वप्न होतं. आणि त्यातून तिची चेतनाही विस्तृत व्हावी अशी तिच्या आईला आशा होती.
ते महान संगीतकार व्यासपीठावर आले आणि सर्वत्र शांतता पसरली. मधुर संगीताच्या झंकाराने आसमंत भरून गेला. त्या वृद्ध गायकाचे शुभ्र केस त्याच्या मानेवर रुळत होते. त्याच्या सोनेरी त्वचेची झळाळी कमी होऊन ती काशाच्या पात्रासारखी मंद दिसत होती. आत्म्याला स्पर्श करणार्या त्याच्या संगीताच्या माधुर्याच्या विपरीत गांभीर्य त्याच्या मुखावर दिसत होतं. गेल्या शतकात त्याच्या शरीरावर केल्या गेलेल्या अनेक जीवअभियांत्रिकी प्रक्रियांचा अंदाज त्याच्या शांत चेहर्यावरून आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वावरून येणं शक्य नव्हतं. स्वर्गावरील माणसांच्या आधुनिक मापदंडांच्या मानानेदेखील हे संगीताचार्य वृद्ध होते… वृद्ध परंतु निरोगी – या ग्रहावरील इतर सर्वच लोकांप्रमाणे.
“पृथ्वीवरून चालत आलेली संगीताच्या एका घराण्याची परंपरा मी चालवतो. विशेषतः आज मी काही अत्यंत जुन्या चिजा गाणार आहे… मानवाने पृथ्वी सोडण्यापूर्वी हजारो वर्षांच्या परंपरेतून तयार झालेलं हे संगीत आहे. पृथ्वीवरच्या एका प्राचीन संस्कृतीत तयार झालेलं संगीत.”
श्रोते भान विसरून नादमुनींचे संगीत ऐकण्यात मग्न झाले होते. त्यांना माहीत होते की जुन्या परंपरेचे गायक असल्यामुळे कलेचा आविष्कार करतानाच त्यांचं संगीत त्यांच्या मनात स्फुरत होतं. मध्यवर्ती संगीत लायब्ररीतून केव्हाही डाऊनलोड करता येईल असं ठरावीक साच्यातलं संगीत नव्हतंच ते.
“या प्रकारच्या संगीताच्या आराधनेत मी माझं आयुष्य वेचलं आहे. खर्या ज्ञानाचा साक्षात्कार होण्यापूर्वीदेखील कधीकधी काही माणसांची चेतना कशी विस्तृत होत असे याचा तुम्हांला या संगीतातून प्रत्यय येईल.”
त्यानंतर दोन तास त्या बागेत श्रोत्यांना साक्षात्कारासारखे स्वर्गीय सुख अनुभवण्याची पर्वणी मिळाली. भान विसरून ते संगीताचा आस्वाद घेत राहिले. संगीताचार्यांनी पारंपरिक पद्धतीने गायन आणि वादन सादर केले. कायम डिजिटल संगीतात हरवलेल्या लोकांना प्रत्यक्ष संगीत ऐकण्याचा हा अनुभव हवाहवासा वाटत होता. अशा क्वचितच होणार्या मैफिलीतून श्रोत्यांना प्राचीन काळी गुरुशिष्य परंपरेतून संगीत शिकवले जायचे त्याचा ओझरता अनुभव घेता येत असे. ही संगीताची मैफल म्हणजे शतकानुशतके सुप्त राहिलेल्या संगीत, तत्त्वज्ञान किंवा शास्त्रीय चिकित्सा यांसारख्या विविध ज्ञानशाखांतून जोपासलेल्या आणि शेवटी पूर्णत्वाने उमललेल्या मानवाच्या साक्षात्काराच्या बीजांचा सन्मान होता. याच बीजांमधून उत्क्रांत मानवाचा जन्म झाला होता. आजही शाश्वत असलेल्या ज्ञानशाखांच्या या अखंड साखळीचा नादमुनी एक भाग होते… पृथ्वीवरील आदिसंस्कृतीत या ज्ञानशाखा पहिल्यांदा अवतरल्या त्यानंतर पाच हजार वर्षांनी…
आरुषी आश्चर्यमुग्ध होऊन ऐकत राहिली. आपल्याला इतका आनंद का होतोय… आपण इतके भारावून का गेलो आहेत… हे तिच्या लक्षात आले नाही. घरी गेल्यानंतर आणि झोपेच्या अधीन होताना तिच्या मनात नकळतच ते प्राचीन संगीत आत्मसात करण्याची इच्छा जागृत झाली.
आरुषीच्या खोलीत पसरलेली खेळणी उचलायला तिची आई खाली वाकली. हातातल्या इलेक्ट्रोनिक कागदावर चित्र रंगवण्यात आरुषी मग्न होती; पण तिने मान वर करून आईच्या गंभीर चेहर्याकडे नजर टाकली.
“आई, हास ना!”
आईच्या चेहर्यावर स्मिताची रेषा उमटली. आपली छोटी लेक एवढी मनकवडी असावी याचं तिला आश्चर्य वाटलं. यापूर्वीही अनेकदा आरुषीला तिच्या भावना समजल्याचे तिला जाणवले होते. जणू काही जन्मानंतर आठ वर्षांनीदेखील त्यांच्यात एक शारीर दुवा होता. तिला आठवलं, तिचं दूध आटू लागलं होतं आणि आरुषीला अंगावरच्या दुधापासून तोडायची वेळ आली होती तेव्हा तिला किती दुःख झालं होतं. आपल्या बाळाला जवळ घेऊन तिला पोटभर दूध पिताना बघून होणारं समाधान तिला अद्वितीय वाटायचं. पोट भरल्यावरचं बाळाचं हसू पहाण्यासाठी तिने कोणतीही किंमत देऊ केली असती; पण तिला अंगावरच्या दुधापासून तोडल्यानंतरही कितीतरी दिवस आरुषी आणि तिच्या आईच्या अस्तित्वामधील दुवा टिकून होता. कधीकधी आईला वाटे जणू ती एकाच वेळी दोन ठिकाणी आहे… एक स्वतःच्या रूपात आणि एक आरुषी म्हणून. तिचं हे असं वाटणं आरुषीच्या पपाला कधीच समजलं नव्हतं. आरुषी म्हणजे आपलीच प्रतिकृती आहे असं तिला नेहमी वाटे. एक अधिक गोजिरवाणी, अधिक हुशार आणि अधिक मनमोकळी प्रतिकृती. दिसायलासुद्धा आरुषी आईसारखीच दिसे आणि तरीही तिला स्वतःचं व्यक्तिमत्त्व होतं… स्वतःच्या आवडी-निवडी होत्या.
आईच्या मनात स्वप्नं होती… अपेक्षा होत्या. तिच्या लेकीने तिच्यासारखं शास्त्रज्ञ व्हावं, नवीन शोध लावावेत; जमलं तर संगीत शिकावं; काहीतरी सर्जनात्मक करावं. कोणत्याही पालकांनी आपल्या मुलांविषयी पाहावीत अशीच स्वप्नं; शिवाय आरुषी मुलगी होती. तिला सर्वात सुंदर घडवता येणारी वस्तू म्हणजे एक नवीन मानव! एक अमर्याद क्षमता असलेली व्यक्ती आणि ही साखळी पुढे चालू राहील… दृष्टिक्षेपात न येणार्या भविष्यात… शतकानुशतके… तिचं भौतिक अस्तित्व संपुष्टात आल्यावरही तिचा एक अंश या जड विश्वात कायम राहील; पण आरुषी आई होईल का? प्रजनन क्षमता फार थोड्या लोकांना प्राप्त झालेली असते. आई होण्याचं भाग्य किती दुर्मीळ आहे याची तिला जाणीव होती.
प्रकरण पहिले समाप्त…
क्रमशः
