| हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक ज्येष्ठ कलावंत पंडित प्रभाकर कारेकर यांचे १२ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांना त्यांचे शिष्य सुरेश बापट यांनी वाहिलेली ही श्रद्धांजली. |
नुकतेच दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माझे गुरू, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन झाले आणि एक अत्यंत चपळ, गोड आणि दमदार आवाजी गायक काळाच्या पडद्याआड निघून गेला. खूप प्रतिकूल परिस्थितीवर आपल्या कलेवरील निष्ठेने आणि मेहनतीने मात करून रसिकांच्या मनामध्ये आपल्या रंगतदार सादरीकरणाची कायमची छाप ठेवून हा कलावंत एक यशस्वी आयुष्य जगून गेला.
बालपणी गोव्याहून मुंबईला येऊन गाणे शिकण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत; परंतु त्यांतील काही निवडक प्रसंग त्यांनी त्यांच्या ८० व्या वाढदिवशी कथन केले ते ऐकून त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला. राहण्याची कायमची व्यवस्था होईपर्यंत ते आणि त्यांचे मोठे बंधू नारायणराव हे दोघेही माहिम स्टेशनसमोरील दुकानाच्या फळ्यांवर रात्रीचे झोपत असत. बुवांनी सांगितले की, अश्या वेळी रात्रीचे गस्तीचे पोलीस त्यांना हटकत असत आणि एकदा तर ऐन थंडीच्या दिवसांत कोणीतरी त्यांच्या अंगावरचे पांघरूणच चोरून नेले. पुढे महाराष्ट्र गंधर्व पंडित सुरेशबुवा हळदणकर ह्यांच्याकडे राहून गाणे शिकण्याची सोय झाली. ही एक समाधानाची गोष्ट झाली; तरीसुद्धा पायांत घालायला चपलांचा जोड घेणेही त्या वेळी त्यांना शक्य झाले नव्हते.
अशा खडतर परिस्थितीत अत्यंत चिकाटीने आणि अथक प्रयत्नाने त्यांनी आपले गायनाचे शिक्षण सुरू ठेवले आणि कालांतराने त्याचे चीज मुंबईतील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झाले हे सर्व रसिकांना ठाऊक आहे. ‘प्रिये पहा’ या एका नाट्यगीताने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली, त्याचा योग्य तो उपयोग करून त्यांनी आपल्या संगीत साधनेने अल्पावधीत चांगले यश मिळविले; पण एवढ्याच यशावर समाधान मानणे त्यांच्या शिस्तप्रिय आणि रियाझी स्वभावाला मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी. आर. व्यास ह्यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे उत्तम शिक्षण दीर्घकाळ घेतले. ह्या तीनही गुरूंच्या गायकीतील ठळक वैशिष्ट्ये आपल्या गळ्यावर चढवत बुवांनी आपली स्वतःची स्वतंत्र गायनशैली तयार केली आणि त्याची जादू रसिक मनाला अनेक वर्षं भुरळ घालत राहिली. मी शिकत असतानाचा काळ हा त्यांच्या कारकिर्दीतला अत्यंत व्यग्र काळ होता. प्रत्येक शनिवार – रविवार दौरा, कार्यक्रम हे ठरलेले असायचे; पण कार्यक्रमात इतके व्यग्र असतानाही आठवड्यातील इतर दिवसांत आपला रोजच्या रियाजाचा नेम त्यांनी चुकू दिला नाही. हळूहळू आपल्या मैफिलीतून उत्तम शास्त्रीय संगीत रंगतदारपणे सादर करून त्यांनी आपल्यावरचा ‘नाट्यसंगीत गायक’ हा छाप पुसून टाकला. ह्याचमुळे भारतातील सर्वच मान्यवर संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम होऊ लागले.
१९७९ ते १९८५ ह्या दरम्यान मी बुवांकडे गाणे शिकलो. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीतील ऐन भरातील हा काळ मला जवळून अनुभवता आला हे माझे भाग्य. माझे महाविद्यालयीन शिक्षण सांभाळून रोज मी त्यांच्याकडे तीन-साडेतीन तास रियाजाला व शिकायला जात होतो. कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी हा रियाज चुकवलेला त्यांना चालत नसे;
पण माझ्या शिक्षणाची सुरुवात इतकी सहज झाली नाही. सुरुवातीचे काही दिवस मला नुसतेच यायला सांगून माझी शिकण्याची तळमळ, चिकाटी पारखून मगच मला शिकविण्यास सुरुवात केली. पूर्वीचे सगळेच गुरू आपल्या शिष्यांना असे पारखून घेत असत. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानासुद्धा रोज ते स्वतः नेमाने आठ तास रियाज करत असत. रोज पहाटे लवकर उठून खर्ज-साधना, त्यांनतर एखादे चलन घेऊन ते तासन्तास घोटणे ही शिकवण आवाज तयार करण्यासाठी फार मोलाची ठरली; परंतु अशी साधना करत असताना त्यातील प्रत्येक स्वर योग्य त्या जागी आणि स्पष्ट आले पाहिजेत ह्यासाठी ते आग्रही असत. रोजच्या भोजनाइतकेच रियाजाचे महत्त्व आयुष्यात आहे हे त्यांनी शिष्यांच्या मनावर ठाम बिंबवले. त्यांच्याबरोबर मागे स्वरसाथ करत असताना मी एखादी हरकत किंवा तान पाठोपाठ गायलो की लगेच त्यांची उत्स्फूर्त दाद मिळायची त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत असे.
स्वरसाथीसाठी संपूर्ण भारतभर त्यांच्याबरोबर दौऱ्यावर असतानासुद्धा त्यांचे सतत गाण्यात राहणे मला एक आदर्श शिकवण देऊन गेले. मैफील चढत्या भाजणीने रंगतदार होण्याच्या दृष्टीने सादरीकरणामध्ये काय काय असावे ह्याची चर्चा ते आपल्याबरोबरील ज्येष्ठ साथसंगतकारांबरोबर करत असत. उपजत गोड व चपळ गळा लाभलेल्या बुवांनी परिश्रमपूर्वक डोळस रियाजाने मैफिली काबीज करण्याची हुकमी हातोटी साधली होती आणि तीच शिकवण त्यांनी आम्हां शिष्यांना दिली. बुवांच्या गायकीतून मला मैफील रंगवण्याचे आणि प्रचंड दमसांसाच्या जलद तानांचे संस्कार मिळाले. दौऱ्यावर असताना बुवांनी मला आपल्या धाकट्या भावाप्रमाणे जपले आणि वेगवेगळ्या शहरांतून प्रसिद्ध असलेले खाद्यप्रकार आवर्जून खायला घातले. त्या वेळच्या मैफिलींचे स्वरूप म्हणजे सुरुवातीला ५० ते ५५ मिनिटे एक राग, त्यानंतर २५ ते ३० मिनिटे दुसरा राग, मग एक ठुमरी, भजन, नाट्यपदे! अश्या चतुरस्र गानप्रकारांनी समृद्ध असलेला सुमारे पावणे दोन तासांचा दमदार पूर्वार्ध असे आणि मध्यांतरानंतर तितकाच प्रदीर्घ उत्तरार्ध. ह्या सर्व मैफिली बुवा आपल्या रियाजी आवाजाने, दमसांसाने आणि प्रसन्न चेहऱ्याने रंगतदार पद्धतीने सादर करत. बुवांच्या मैफिलीमध्ये — मग तो सार्वजनिक गणेशोत्सव असो की संगीत सभेमधील असो – सर्वसामान्य श्रोत्यांपासून ते जाणकार रसिकांपर्यंत प्रचंड उपस्थिती असायची. सुरुवातीच्या ‘सा’ पासून रंगलेली ही मैफील, भैरवीच्या सुरांनी सांगता होईपर्यंत मैफिलीतील श्रोत्यांची संख्या तशीच असायची. ह्या दरम्यान आणखी एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे कार्यक्रमाच्या वेळी आयोजकांना कोणत्याही कारणास्तव त्यांनी कधीही अडवले नाही.
श्रीशांतादुर्गा देवस्थान, कवळे येथे संगीत समारोह आयोजित करण्यात बुवांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यामुळे भारतातील सर्वच नामवंत कलाकारांचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऐकण्याची संधी गोवेकर रसिकांना मिळाली. गोव्यामध्ये अधिकाधिक शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा ह्यासाठी बुवांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे एक उदाहरण आहे. इतर कलाकारांचीही गाणी ऐकून त्यांतून आपल्याला वेगवेगळे शिकायला मिळते असे ते आम्हांला नेहमी सांगत.
शास्त्रीय गायनाबरोबर मैफिलींमध्ये चंदनासी परिमळ, दिनांची माउली, माझ्या देहाची पालखी इ. त्यांनी लोकप्रिय केलेले अभंग अत्यंत ढंगदारपणे सादर करत. विख्यात अभिनेते कै.सतीश दुभाषी ह्यांनी शिवाजी मंदिर येथील कार्यक्रम संपल्यानंतर ग्रीनरूममधे येऊन ‘मैं केहि समझाऊं’ हे कबीर भजन गायची फर्माईश केली आणि बुवांनी ती लगेच पूर्ण केली.
तरुण वयात प्रचंड लोकप्रियता मिळवूनही माझे गुरू कोणत्याही बाह्य आकर्षणांना न भुलता आपल्या कलेशी व साधनेशी कायम एकनिष्ठ राहिले. अश्या आदर्श गुरूंकडे काही काळ शिकण्याचे भाग्य मला मिळाले ह्याबद्दल मी कृतकृत्य आहे. माझ्या गाण्यातून भविष्यात त्यांच्या ह्या गायन संस्काराचे दर्शन घडेल हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
सुरेश बापट
सवाई गंधर्व महोत्सव १९९४. तानपुरा साथीला लेखक
